लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (सूरह अल हुजरात 49: आयत क्र.13)
इस्लाम एक जागतिक धर्म असल्याचे वर नमूद आयातीमधून स्पष्ट होते. या आयातीमध्ये जो जागतिक बंधुत्वाचा विचार मांडलेला आहे तो कुरआनमधील अनेक आयातींमध्ये आलेला आहे. इस्लाम एक सर्वसमावेशी धर्म असून, यात जाती व्यवस्था नाही. माणसाच्या कातडीच्या रंगाला, भाषेला, संस्कृतीला, चालीरितीला यात काडीचे महत्त्व नाही. श्रीमंत आणि गरीब असा भेद नाही. हा असा धर्म नाही ज्यात फक्त नमाज, रोजा, हजसारख्या काही धार्मिक विधींचा समावेश आहे. उलट ही एक अशी जीवन व्यवस्था आहे जी ईश्वराने माणसासाठी पसंत केलेली आहे. ज्याचा उल्लेख कुरआनमध्ये खालील शब्दात आलेला आहे.
‘‘अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या (धर्मविरोधी) आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले. आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.’’ (सूरह आले इमरान 3: आयत क्र.19)
या दोन आयातीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, ऐहिक आणि पारलौकिक जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग केवळ इस्लाम आहे. हा दावा नसून वास्तव आहे. याचे उदाहरण ते लोक आहेत जे लोक कुरआनच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगत आहेत ते आरोग्यदायी आणि शांतीपूर्ण जीवन जगत आहेत. जीवनात यशस्वी होत आहेत. या उलट जे कुरआनच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून जीवन जगत आहेत. मग ते मुस्लिम का असेनात. जीवनात अयशस्वी होत आहेत. त्यांचे जीवन तणावपूर्ण असून, त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांनी घेरलेले आहे. मरेपर्यंत त्यांना शांतता लाभत नाही. थोडक्यात इस्लाम हा मानवतावादाचा समर्थक असून, मानवकल्याण हाच इस्लामचा उद्देश आहे. हे साध्य करण्यासाठी इस्लामने राज्याचे, युद्धाचे, तहाचे, कायद्याचे, अर्थव्यवस्थेचे, न्यायव्यवस्थेचे, समाज व्यवस्थेचे विशिष्ट असे नियम दिलेले आहेत. ज्याला शरियत असे म्हणतात.
इस्लाम ग्लोबल असल्यामुळे त्यामध्ये राष्ट्रवादाला स्थान नाही, असा गैरसमज अनेक लोकांचा आहे. म्हणूनच इस्लाम अगोदर का राष्ट्र अगोदर? कुरआन श्रेष्ठ का संविधान श्रेष्ठ? असे प्रश्न मीडियामध्ये मुस्लिमांना विचारलेले जातात आणि समर्पक असे उत्तर देण्याऐवजी मुसलमान भांबावून जातात. याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आजचा लेखन प्रपंच.
‘‘ज्या लोकांनी श्रद्धा स्वीकारली आणि स्थलांतर केले आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण पणाला लावले व आपली मालमत्ता खर्च केली व ज्या लोकांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना आश्रय दिला व त्यांना मदत केली; ते खरोखर एकमेकाचे वाली आहेत. उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा तर ठेवली परंतु ज्यांनी स्थलांतर केले नाही त्यांच्याशी पालकत्वाचे तुमचे काहीही संबंध नाहीत जोपर्यंत ते स्थलांतर करून येत नाहीत. परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडून मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमचे कर्तव्य होय; परंतु अशा कोणत्याही जनसमुदायाच्याविरूद्ध नव्हे की ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे. जे काही तुम्ही करता ते अल्लाह पाहतो.’’ (सूरह अनफाल 8: आयत नं. 72)
कुरआनची ही आयत त्या लोकांना चकित करणारी आहे जे समजतात की इस्लाममध्ये राष्ट्रवादाला थारा नाही. इस्लाममध्ये भक्ती केवळ अल्लाहची आहे म्हणून ’राष्ट्राची भक्ती’ करण्याची संकल्पना नाही. मात्र राष्ट्रावर प्रेम हा इस्लामी श्रद्धेचा अनिवार्य भाग आहे. या आयाती संबंधी भाष्य करताना आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामिक विद्वान सय्यद अबुल आला मौदूदी लिहितात, ‘‘ही आयत इस्लामच्या संवैधानिक तरतुदींपैकी एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे. या तरतुदीत असे म्हटलेले आहे की, ’’ विलायत (संरक्षकाचा) संबंध केवळ मुस्लिमांचा आपसामध्येच असेल. जे इस्लामी राष्ट्राचे निवासी असतील किंवा बाहेरून हिजरत (स्थलांतर) करून इस्लामी राष्ट्रात आलेले असतील तर त्यांचे इतर मुस्लिमांशी, जे इस्लामी राष्ट्राच्या सीमेबाहेर राहतात त्यांच्याशी धार्मिक बंधुभावाचे संबंध आवश्य असतील परंतु विलायतीचे (संरक्षणासंदर्भात) संबंध असणार नाहीत. याचप्रमाणे त्या मुस्लिम लोकांशी सुद्धा, ’’संरक्षणासंदर्भात’’ संबंध असणार नाहीत जे हिजरत करून आलेले नाहीत. शिवाय ते मुसलमान जे दारूल कुफ्र (अल्लाहचा इन्कार करणाऱ्यांच्या) राष्ट्राचे नागरिक असतील आणि काही कामानिमित्त ते दारूल इस्लाम (इस्लामी राष्ट्रा) मध्ये आलेले असतील त्यांच्याशी ही विलायतीचा संबंध असणार नाही. ’विलायत’ हा अरबी भाषेचा शब्द असून, त्याचा उपयोग समर्थन, सहाय्यता, मदत, मित्रता, संरक्षण, नातेसंबंध इत्यादी मिळत्या जुळत्या अर्थाने केला जातो. या आयतीच्या संदर्भात स्पष्टतेने म्हटलेले आहे की, ते नातेसंबंध जे एका राष्ट्राचे आपल्या नागरिकांशी आणि नागरिकांचे आपल्या राष्ट्राशी असते. तसेच नागरिकांचे आपआपसात असतात. तसे संबंध इतर राष्ट्रातील मुस्लिमांशी असणार नाहीत. म्हणून ही आयत मुस्लिम लोकसंख्येला संवैधानिक आणि राजनैतिक विशेष नातेसंबंधांपासून वेगळे करते. या विलायतच्या न होण्याचे व्यापक परिणाम होतात. उदा. विलायत संबंध नसल्यामुळे ’दारूल कुफ्र’ आणि ‘दारूल इस्लाम’ मधील राहणारे मुस्लिम एकमेकांचे वारस बनू शकत नाहीत. कायदेशीर पालक बनू शकत नाहीत इतकेच नव्हे तर आपसात लग्न देखील करू शकत नाहीत. तसेच दारूल कुफ्रमध्ये असलेल्या मुस्लिम व्यक्तिला दारूल इस्लाममध्ये अधिकाराचे पद सुद्धा मिळू शकत नाही. या व्यतिरिक्त ही आयत इस्लामी राष्ट्राच्या विदेश नितीवरसुद्धा प्रभाव टाकते. यानुसार इस्लामी राष्ट्राचे दायित्व त्या मुस्लिम लोकसंख्येपर्यंतच मर्यादित आहेत जे त्यांच्या राष्ट्राच्या सीमेअंतर्गत राहतात. सीमे बाहेरच्या मुस्लिमांसाठी दायित्वाचे ओझे त्यांच्यावर येत नाही. याचसाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, ’’मी कोणा अशा मुस्लिम व्यक्तीचा मददगार व संरक्षक नाही जो अनेकेश्वरवादी लोकांच्या दरम्यान राहतो.’’ अशा प्रकारे इस्लामच्या या संवैधानिक तरतुदीने त्या भांडणाचे मूळच कापून टाकलेले आहे जे आंतरराष्ट्रीय तणावाचे कारण बनते. जेव्हा एखादे राष्ट्र आपल्या सीमेबाहेर राहणाऱ्या अल्पसंख्यांकांची जबाबदारी आपल्यावर घेते तेव्हा असा तणाव निर्माण होतो. ज्याला युद्धाने सुद्धा सोडविता येत नाही.
वरील आयातीमध्ये दारूल इस्लामच्या बाहेर राहणाऱ्या मुस्लिमांना राजनैतिक संरक्षणाच्या संबंधाने वेगळे केले आहे. आता या आयातीचा पुढचा भाग हे स्पष्ट करतो की, या नात्याशी वेगळे होवून सुद्धा धार्मिक बंधु या नात्याने ते वेगळे नाहीत. जेव्हा कोठे त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर इस्लामी बंधुत्वाच्या आधारावर ते दारूल इस्लामच्या शासनाला मदतीची हाक देवू शकतात. अशावेळी दारूस्सलाम मध्ये राहणाऱ्यांचे कर्तव्य बनते की, पीडित मुस्लिम बंधुंची सहाय्यता करावी. मात्र या सहाय्यतेचे कर्तव्य अंधाधूंद पद्धतीने पार पाडले जावू शकत नाही. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय दायित्व आणि नैतिक मर्यादांना डोळ्यासमोर ठेवूनच पार पाडले जावू शकते. अत्याचारी राष्ट्राशी दारूल इस्लामचे करार मदार झालेले असतील तर अशा परिस्थितीत तेथील पीडित मुस्लिमांची कोणतीच मदत केली जाणार नाही, जी त्या कराराच्या नैतिक जबाबदारीच्या विरूद्ध असेल. या आयतमध्ये करारासाठी ’मिसाक’ हा शब्दपयोग करण्यात आलेला आहे. मिसाक त्या प्रत्येक गोष्टीला म्हणतात ज्याच्या आधारावर एखादे राष्ट्र सामान्यपणे विश्वास करते की आमच्या दोघात युद्ध नाही. मग त्या दोघात युद्ध करण्याचा व न करण्याचा करार झालेला असेल किंवा नाही. अशा राष्ट्राविरूद्ध नाही ज्यांच्याशी तुमचा करार झालेला आहे. या तरतुदीमुळे स्पष्ट होते की, दारूल इस्लामच्या सरकारने आपले मैत्रिपूर्ण संबंध एखाद्या राष्ट्राशी स्थापित केले असतील तर ते फक्त दोन राष्ट्रांचे संबंध नाहीत तर दोन्ही राष्ट्रात राहणाऱ्या लोकसमुदायांचेही संबंध आहेत. त्यांच्या नैतिक दायित्वात मुस्लिम शासनासह मुस्लिम जनता सुद्धा सामील आहे. इस्लामी शरियत या गोष्टीची परवानगी देत नाही की, मुस्लिम देशांनी दुसऱ्या देशांशी करार केला असेल तेव्हा ते त्यांच्या नैतिक जबाबदारीतून मुक्त होऊ शकतात. ते बिल्कुल मुक्त होवू शकत नाहीत. याचे उत्कृष्ट उदाहरण सुलै हुदैबिया जी घटना आहे. जी सहाव्या हिजरीमध्ये मक्कापासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या हुदैबिया या ठिकाणी घडली. या घटनेत प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि म्नका शहरातील अनेकेश्वरवादी सरदार सुहैल बिन उमरू यांच्यामध्ये शांतता करार झाला. या करारानुसार मक्का येथील कोणताही नागरिक मदिना येथे गेल्यास त्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. मक्केवाल्यांच्या हवाली करतील आणि जर मदिना येथून कोणताही नागरिक मक्का येथे पळून आला तर मक्कावाले त्याला परत करणार नाहीत. या करारावर ज्या क्षणी सह्या झाल्या त्या क्षणी मक्का शहराकडून अबु जुंदर बिन सुहैल रजि. ही मुस्लिम व्यक्ती जखमी अवस्थेत प्रेषितांसमोर आली आणि त्यांनी विनंती केली की, ’’ हे प्रेषित सल्ल. या लोकांनी माझे खूप हाल केलेले आहेत. मला आपण आपल्यासोबत मदीना येथे घेवून चला.’’ तेव्हा प्रेषित सल्ल.यांनी त्यांना मक्का शहरात परत पाठविले. मुस्लिम असूनसुद्धा त्यांना मदिनाला नेण्यात आले नाही. कारण मक्का येथे राहणाऱ्या मुस्लिमांचा मदिना येथे मुस्लिमांशी विलायतचा संबंध नव्हता. थोडक्यात राष्ट्राविषयी प्रेमच नव्हे तर संरक्षण विषयक जबाबदारी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची तेवढीच आहे जेवढी त्या राष्ट्रात राहणाऱ्या इतर नागरिकांची आहे.
- एम. आय. शेख
Post a Comment