Halloween Costume ideas 2015

‘रमज़ान’ कुरआनच्या प्रकाशात


रमज़ान 2024 सुरू होण्यापूर्वीच रमज़ानचा हा विशेष अंक वाचकांच्या हाती देतांना कार्यकारी संपादक म्हणून मला आतीव आनंद होत आहे. तसे पाहता गेल्या काही वर्षांपासून रमज़ान विशेषांक प्रकाशित करण्याची परंपरा शोधन ट्रस्टने कटाक्षाने जपलेली आहे. यावर्षी सुद्धा या विशेषांकामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील लेखकांचे एकापेक्षा एक उत्कृष्ट असे लेख सामील करण्यात आलेले आहेत. यावर्षीच्या विशेषांकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या अंकाचा केंद्रीय विषय ’रमज़ान कुरआनच्या प्रकाशात’ असा आहे. यात रमज़ानचे विशेष महत्त्व काय आहे? कुरआनच्या अवतरणाची पार्श्वभूमी काय आहे? कुरआन समजून घेणे प्रत्येकासाठी का आवश्यक आहे? कुरआन समजून न घेतल्यामुळे माणसाचे काय नुकसान होऊ शकते? जकात काय आहे? तिचे वितरण कसे व्हावे? तिचा उद्देश काय आहे? जकातीमुळे गरीबी निर्मूलन शक्य आहे काय? रमज़ानमध्ये मुस्लिम स्त्रियांची भूमिका? आदी विषयांवर तज्ज्ञांनी पुरेसा प्रकाश टाकलेला आहे. मला विश्वास आहे हा अंक फक्त वाचनीयच नाही तर संग्रहणीय सुद्धा असेल.

रमज़ानचा महिना जेवढा खडतर असतो तेवढाच उपकारक असतो. या खडतर महिन्यातून मिळालेले नैतिक आणि आध्यात्मिक प्रशिक्षण श्रद्धावान व्यक्तीला इतकी ऊर्जा देते की तो पुढील 11 महिने वाईट गोष्टींपासून स्वबळावर लांब राहू शकतो. आज वैज्ञानिक प्रगतीने कहर केलेला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या आविष्काराने माणसाचे जीवन पार पालटून गेले आहे. या दोन्ही गोष्टीचा उपयोग जेवढा मानवी प्रगतीसाठी होत आहे त्यापेक्षा जास्त मानवी अधोगतीसाठी देखील होत आहे. या दोन्ही आविष्कारांमुळे नवीन पिढीतील एक मोठा भाग लैंगिक स्वैराचार आणि नशा करण्याकडे वळलेला आहे. या दोन गोष्टी कुठल्याही देशातील तरूण पिढीला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशा आहेत. खरे तर हे एक असे आव्हान आहे ज्याचा सामना प्रत्येकाला करावा लागणार आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे पसरविल्या जाणाऱ्या स्वैराचारी कंटेंटपासून स्वतः वाचणे आणि आपल्या पाल्यांना वाचविणे यापेक्षा मोठे दुसरे आव्हान नाही. हे आव्हान पेलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्याची सुवर्णसंधी रमज़ानमुळे मुस्लिमांना प्राप्त झालेली आहे. एक महिना सतत पवित्र वातावरणात राहून आध्यात्मिकतेमध्ये लीन झालेला श्रद्धावान व्यक्ती लिलया स्वैराचाराच्या या वादळाला पेलू शकतो. दुसऱ्या कुठल्याच व्यवस्थेमध्ये या वादळाला तोंड देण्याची क्षमता नाही. युरोप आणि अमेरिकेसह आपल्या देशातील महिलांवरील वाढते लैंगिक हल्ले, घटस्फोटांचा वाढता दर, चित्रपटातून दाखविली जाणाऱ्या अमाप हिंसा या सर्वांचा एकत्रित वाईट परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होत आहे. या परिणामापासून स्वतःला वाचविण्याची संधी रमज़ानमुळे आपल्या सर्वांना ईश्वरकृपेने प्राप्त झालेली आहे. म्हणून रमज़ानच्या खडतर प्रशिक्षणाकडे भीतीने पाहून, भूक आणि तहान यांच्यासमोर अवसान गळून पडल्यासाररखे करून परिस्थितीसमोर हत्यार टाकणे हे मुस्लिमांना शोभणारे नाही. उलट या कठीण प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी स्वतःमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कुरआन समजून वाचणे सुरू करा, असा माझा वाचकांना सल्ला आहे. कुरआन सातव्या शतकातील रोमन आणि पर्शियन साम्राज्यातील एखाद्या व्यक्तीवर प्रकट झाला नव्हता. तो तर मक्का शहरातील उंट चारणाऱ्या थेट निरक्षर असलेल्या समाजातील एका व्यक्तीवर (प्रेषित मुहम्मद सल्ल.) अवतरित झाला. याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. मक्काच नव्हे तर अरबस्थानच्या वाळवंटाची उष्णता व त्यात पुन्हा पाण्याचे दुर्भीक्ष्य अशा परिस्थितीतही मुस्लिमांनी रमज़ानचे रोजे ठेवलेले आहेत. त्या तुलनेत तर आपले रोजे अत्यंत सोपे आहेत. घरात पंखे आहेत, अनेक ठिकाणी ए.सी. आहेत, इफ्तारनंतर प्यायला थंडगार पाणी आहे, अजून काय सवलती हव्यात. रमज़ानचा महिना चिंतन, जागृती आणि आत्मउन्नती करण्याचा महिना आहे. एका दृष्टीने व्यक्तिमत्त्वाचे नूतनीकरणच या महिन्याच्या निमित्ताने करण्याची संधी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला दरवर्षी मिळत असते. म्हणूनच जगभरातील मुस्लिम लोक रमज़ानचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. रमज़ान आपल्या आध्यात्मिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने इतर महिन्यांपेक्षा श्रेष्ठ व वेगळा आहे. या महिन्यात ईश्वराची दया आणि कृपा रोजा ठेवणाऱ्यावर अखंडपणे सुरू असते. ईश्वर रमज़ान महिन्यात श्रद्धावंतांना अधिक बक्षिसे देतो व त्यांचा पश्चात्ताप मोठ्या प्रमाणात स्वीकारतो.  दानधर्मामुळे रमज़ानमध्ये बंधुभाव सुद्धा वाढतो. मला विश्वास आहे या अंकातील कंटेंट वाचकांच्या पसंतीस उतरेल. ईश्वर सर्वांना रमज़ानचा लाभ घेण्याची सद्बुद्धी देओ. आमीन. 

- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget