Halloween Costume ideas 2015

पवित्र कुरआन : जगण्याची सोपी पद्धत


भारतीय संस्कृती ही तिच्या वैविध्यतेमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे त्यातही देशातील सण, उत्सव ह्याचे सर्वत्र विशेष आकर्षण ठरते. राष्ट्रीय सणांसोबतच रमजान ईद हा जागतिक सण आपल्या देशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यावर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. हा उत्सव साजरा करण्यासाठी ईदचा दिवस तर महत्त्वाचा असतोच परंतु या संपूर्ण महिन्याचे महत्त्व ही अनन्यसाधारण आहे. या महिन्याचे मर्म असे की, गर्भ श्रीमंत असो वा घरी अठराविश्व दारिद्र्य असणारा, दानशूर असो वा चैनीमध्ये जीवन जगणारा सर्वच एकाच उल्हासात असतात. रमजान महिना हा संयम, उपासना, श्रद्धा, विश्वास, दान इत्यादी गोष्टींचा साक्षात्कार घडवून देणारा आहे. या संपूर्ण महिन्यातील घडामोडी व वातावरण पाहून मुस्लिमेत्तर व्यक्तीच्या डोक्यात इस्लामबद्दल अनेक प्रश्नांना भरती येते. इस्लाममध्ये अनिवार्य असणारे पाच स्तंभ म्हणजे इमान, नमाज, रोजा, जकात, हज हे आहेत. या आधारस्तंभाचा उल्लेख हदीस ग्रंथात हदीस ए जिबराईल आणि ईशग्रंथ कुरआनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन मुस्लिमांकडून केले जाते. 

मात्र याबद्दल मुस्लिमेत्तर समाज जेंव्हा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा या अनिवार्य आधारस्तंभांना बोजा समजून हा धर्म त्यांना अतिशय अवघड असल्याचे भासतो. हा भासच त्यांच्या डोक्यात कुरआन व इस्लाम याबद्दल भीती निर्माण करतो. इस्लामोफोबिया वाढण्याचे हे सुद्धा एक कारण आहे. मात्र जास्तीत जास्त लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करतात. आजच्या युगात अभ्यास हा अनेक माध्यमातून केला जातो. त्यातील एक म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडियाही आहे, परंतु यांच्या साह्याने मिळणारी माहिती अनेकदा तुटपुंजी, गैरसमज पसरवणारी व अफवा वाढवणारी असते.

इस्लामची जीवनपद्धती किती साधी, सोपी आणि आदर्श आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त कुरआन आणि आदरणीय पैगंबर (स.) यांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट होते आणि हाच या लेखाचा मूळ उद्देश आहे. कुरआनबद्दलच्या अज्ञानामुळे कुरआन अवघड वाटणाऱ्याला ईशग्रंथ कुरआन स्वतः ग्वाही देतो. कुरआनच्या अध्याय ’तॉहा’च्या आयत 2 मध्ये म्हटले आहे, 

आम्ही हे कुरआन तुमच्यावर यासाठी अवतरले नाही की तुम्ही संकटात पडावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात परिस्थिती अशी होती की अल्लाहचे प्रेषित हे अल्लाहने सांगितलेला धर्म आणि सत्य वचने हाडाचे पाणी करून लोकांना पटवून सांगत. परंतु खूप कमी लोक त्यावर विश्वास ठेवत आणि मोठा वर्ग या सत्य वचनांना मान्य करण्यापासून दूर होता. त्याची काळजी आणि दुःख अल्लाहच्या पैगंबरांना होत होते. त्या वेळी काळोखात चाललेल्या व भरकटलेल्या लोकांनी सत्य वचनाचा स्वीकार करून सत्य मार्गावर चालावे यासाठी पैगंबर रात्र-रात्रभर नमाजमध्ये कुरआन पठण करून अल्लाहजवळ प्रार्थना करत असत. रात्रभर नमाजसाठी उभे राहिल्यामुळे त्यांचे पाय सुद्धा सुजत होते, तेव्हा ही आयत त्यांच्यावर अवतरली. 

कुरआनचे प्रत्येक पान आणि शब्द-न-शब्द त्याच्या सुरेख, स्पष्ट आणि सरळपणाची साक्ष देतो. मानवी जीवनव्यवस्था आदर्श करण्यासाठी जे नियम दिले ते मानवाला कधीही अवघड वाटणार नाहीत. त्यामध्ये रोजा अनिवार्य असण्याचा आदेश आहे, परंतु लगेच काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये रोजा न ठेवण्यासाठी सूटही दिली आहे. त्यानंतर सुटलेला रोजा पुढील एका वर्षात कधीही पूर्ण करण्याची मुभा आहे. किंवा तेही शक्य नसेल तर त्याची जी भरपाई आहे ती सोपी आहे, जसे एका रोजाच्या बदल्यात एका दुर्बलाला जेवू घालणे. हे अध्याय अल्-बकराच्या 184 व्या आयतीमध्ये स्पष्ट आहे,

...तर तुमच्यापैकी आजारी असतील आणि प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकांना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल परंतु उपवास करणार नाहीत त्यांनी दुर्बलांना मोबदला म्हणून जेवू घालावे.

त्याचप्रमाणे ज्यांना कुरआनबद्दल परिपूर्ण माहिती नाही त्यांना नमाज हेही एक अवघड काम वाटते, की दिवस उजाडण्याच्या अगोदर पासून ते दिवसभरातून वेगवेगळ्या वेळेत पाच वेळा अनिवार्य नमाज पठण केली जाते. परंतु सामर्थ्य किंवा ताकद असणाऱ्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आजारी किंवा प्रवासात असेल तर कुरआनने नमाजमध्ये सुलभता करून दिली आहे. जसे आजारी किंवा प्रवासी, आहे त्या परिस्थितीत नमाज पठण करू शकतो.

इस्लामचा मूळ आधारस्तंभ असणाऱ्या ईमानच्या बाबतीतही अल्लाहने लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपले श्रद्धा लपवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. 

तसेच हजचाही आदेश कुरआनमध्ये आहे, पण ज्याची हज करण्याची ऐपत नाही त्यावर हे करणे अनिवार्य नाही. 

जकातच्या माध्यमातून अल्लाहने व्यक्तींना दानशूर बनवून त्यांचे पारडे जड केले आहे. श्रीमंतांनी आपल्या संपत्तीच्या 2.5% रक्कम गरजूंना दान करावी लागेल. ज्यांच्याजवळ एवढी संपत्ती नसेल की त्याने दान करावे त्याला या अनिवार्य स्तंभापासून सूट देण्यात आली आहे. जे व्यक्ती जकात देऊ शकत नाहीत त्यांना कुरआनने जकात अनिवार्यही केली नाही. 

या सर्व उपयोजना इस्लामच्या या पाच आधारभूत स्तंभाबद्दल अतिशय मोजक्या शब्दांत स्पष्ट केल्या आहेत, परंतु कुरआनने प्रत्येक गोष्ट एका श्रद्धावंतासाठी सोपी केली आहे. एका श्रद्धावंताला आणि ईशभय बाळगणाऱ्या व्यक्तीला याची स्पष्टोक्ती आलीच असेल, परंतु जागतिक स्तरावर पसरलेल्या आणि वेगाने वाढत जाणाऱ्या इस्लाम या सत्यधर्माची सत्यता कुरआनमध्ये पडताळून, त्याचा आदर्श नमुना अंगीकारून आपले हे जीवन सफल झाले तर आभाळाला कवेत घेतल्याची भावना जाणवेल. तसेच आपल्या संस्कृतीमध्ये असणारा इस्लाम हा सत्यधर्म अभ्यासण्याचा आणि अंगीकारण्याच्या अभिमानही वाटेल.


- प्रिया कानिंदे सरतापे 

औरंगाबाद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget