गेले चार महिने इस्रायल-गाजा युद्ध सुरू आहे. या युद्धात आजवर जवळपास ३२ हजारांपेक्षा जास्त माणसे मारली गेली. यात १५००० लहान मुले-मुली आहेत. ९००० पर्यंत महिला आहेत. ७२ हजार जखमी झालेले आहेत. यातील ११५०० गंभीर आहेत. किती इमारती, दवाखाने, शाळा वगैरे संस्थांची नासधूस केली गेली याची दृष्ये पाहायला उपलब्ध आहेत. त्याचा तपशील कशासाठी, पण एकीकडे हे सर्व घडत असताना दुसरीकडे आधुनिक विचारांवर आधारित जग इस्लाम धर्माच्या शिकवणींचा देखावा मांडणारे, गरीब-कष्टकरी लोकांच्या समस्या जगाच्या पटलावर मांडणारे गप्प बसलेले आहेत की जसे इस्रायलमधून येणारे क्षेपणास्त्र कुणी ब्र शब्दही काढला तर त्यांच्या दिशेने सुटतील, म्हणून भयभीत आहेत. इतकी लाचारी पत्करायची असेल तर जगण्यात आणि मरणात अंतरच काय? जगायचे तरी कशासाठी जर तुम्ही तोंडसुद्धा उघडू शकत नसाल तर?
आधुनिक सत्ताधारी व्यवस्थेने गुलामीचे स्वरूप बदलून टाकले आहे. ते तुम्हाला गुलाम बनवत नाहीत, तुम्ही स्वतः त्यांची गुलामी पत्करता. कुणाचा दबाव नसतानादेखील तुम्ही सत्ताधाऱ्यांची लाचारी करता. आपल्या घरी आपल्या व्यवसायात व्यस्त असताना तुम्ही स्वतःला चोवीस तास व्यवस्थेचे गुलाम समजू लागतात. ही सत्ताधारीवर्गाने तुमच्यावर लादलेली मानसिक गुलामी आहे. या गुलामीत अडकलेली मानवजात गाजामध्ये जो रक्तपात चालला आहे तो उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, पण त्याची मानसिक स्थिती इतकी दुर्बल की जे काही चालले आहे ते चुकीचे आहे असेही शब्द त्यांच्या तोंडातून फुटत नाहीत. गुलामीची ही पराकाष्ठा आहे. बौद्धिक, आत्मिक, नैतिक, विवेकी हे सारं काही गमावून बसलेत. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही की याचे भानसुद्धा राहिलेले नाही की आपण कोणत्या मानवी मूल्यांना गमावून बसलो आहोत.
पाश्चात्य विचारवंत, सत्ताधारीवर्गाने स्वातंत्र्य, लोकशाही, मानवाधिकार या मूल्यांना शस्त्र म्हणून उपयोगात आणले आहे. याच शस्त्रांनी त्यांनी अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लीबिया इत्यादी देशांची सभ्यता नष्ट केली आणि विध्वंसाची नवीन सभ्यता रुजविली. आता गाजामध्ये जे काही चालले आहे ते याच विध्वंसाची मालिका आहे, पण याचा शेवट ज्या दिवशी इस्रायल शेजारील राष्ट्रे संपुष्टात येतील तो काळ असेल!
तसे पाहिल्यास गाजाच्या बाबतीतच पाश्चात्य राष्ट्रांची ही भूमिका नाही. यूक्रेनविषयीही ते तसेच गप्प आहेत. दोन वर्षे होत आली तरी तिथले युद्ध थांबत नाही. असे वाटते ही विचारधारा जाणूनबुजून पाश्चात्य राष्ट्रांनी स्वीकारली आहे. युद्धात जर दोन देश गुंतलेले असतील तर दोघांचे आर्थिक नुकसान होत असते. इथली परिस्थिती वेगळी आहे. रशियाला या युद्धातून कमाई होत आहे अशा बातम्या आहेत. खरे-खोटे त्यांनाच माहीत.
गाजाचे लोक जगाला विचारत आहेत की हे मानवी सभ्यतेचे सर्वेसर्वा! हे अत्याचार कुठवर, होय तुम्हाला आमच्या शस्त्रांची कामगिरी पाहायची असेल, पण त्यासाठी आमची कत्तल कुठपर्यंत! तुमच्या जमिनी पावसाअभावी कोरड्या झाल्या असतील, पण आमच्या रक्ताने जमिनीची तहान भागवणार आहात काय? तुम्हाला आपल्या मैफली रंगवायच्या असतील, पण त्यासाठी आमच्या दुःखाच्या डोंगरावर अक्षूंची वृष्टी कुठवर आम्ही दाखवावी. साऱ्या जगाला मृत्यूचे, रक्तपाताचे नृत्य पाहायचे असेल त्यासाठी आम्ही आपल्या जखमांचे प्रदर्शन करत राहावं का?
पॅलेस्टिनी उपदेशकाने शुक्रवारच्या विशेष नमाजच्या वेळी प्रवचन देताना असे म्हटले की “या वेळी काय बोलावे हे मला कळत नाही. कुणाशी बोलावे हेही कळत नाही. ऐकणारा कुणी आहे? जर या उम्माहला, ३२००० शलीद, ७० हजार जखमी आणि २० लाख विस्थापित, भुकेलेले लोकसुद्धा निद्रेतून जागे करत नसतील तर माझ्या प्रवचनान कोण जागे होणार?”
पॅलेस्टाईनच्या दुसऱ्या एका नेत्याने एका कार्यक्रमात असे आश्वासन दिले की आम्ही गाजा पुन्हा उभारू, पूर्वी जसा होता त्याहून सुंदर. अधिक शाळा, विद्यापीठे, हॉस्पिटल्स इत्यादी, कारण आम्हाला अनुभव आहे पुनश्च उभारणीचा, प्रलयानंतर कसे उभे राहावे याचा अनुभव आहे. मी वचन देतो की गाजा पुनश्च उभारणार. कारण जागे होणे पुन्हा उभे राहणे आमच्या डीएनएत आहे. पण मला माहीत नाही की जग जागे होईल का? त्यांनी विध्वंसाला सामान्य कृती, रक्तपातासही विकासाची प्रक्रिया बनविली आहे. पण मी आश्वासन देतो की आम्ही पुन्हा उभारणार. पूर्वीपेक्षा जास्त दिमाखाने आणि हा विध्वंस शेवटचा असेल!
असे वाटते गाजामधील सध्याची पिढी जमीनदोस्त होईल, त्यांचे रक्त त्यांच्या धरतीला पुनर्जीवित करेल, जी मानवता जमीनदोस्त झाली ती जमिनीतून उगवेल. त्याला अंकूर फुटतील, त्यांचे लहान-मोठे वृक्ष होतील पुढे जाऊन एका नव्या पिढीच्या सभ्यतेचा उगम होईल. त्या गाजाभोवतालच्या जमिनीनवर वृक्ष, झाडे सुकलेली, कुजलेली असतील, त्यांची पाने गळलेली असतील, त्यांचा शेवट जवळच असेल आणि ज्या सभ्यतेने अत्याचाऱांची परिसीमा गाठली होती, ती प्रकृतीच्या नियमानुसार कायमची लोप पावेल आणि पुन्हा कधी तिचा उदय होणार नाही.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment