मूलभूत गरजांची पूर्तता
माणसाच्या समोर अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांची नेहमीच प्रश्नरेषा उभी असते. त्यांसाठी त्याची नेहमीच धांदल उडलेली असते. मात्र निसर्गाच्या सान्निध्यात त्याला त्या गोष्टी सहज उपलब्ध होतात ज्यांचा तो आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोग करतो. निसर्गात या वस्तूंचा साठा इतक्या विपूल प्रमाणात कोणी केला? हा साठा ज्या निसर्गकर्त्याने केला आहे त्याला माणसाने विसरून चालणार नाही. तोच तर आहे ज्याने हे जीवन प्रदान केले आणि या जीवनासाठी उपयोगी वस्तूंचा निर्माणकर्ताही तोच आहे.
माणूस आपल्या अनुभवांनी आणि अभ्यासाने निसर्गातील या वस्तूंचा उपयोग करून घेतो. परंतु श्रद्धावंत सोडले तर इतर त्या निसर्गकर्त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करत नाहीत. शिवाय त्यांना या गोष्टीचीही जाणीव नाही की या जीवनाच्या नंतर आपल्याला दुबार जिवंत केले जाईल आणि जीवनासाठी ज्या उपयोगी वस्तू आपण वापरल्या त्यांचा हिशोब त्यांना द्यावा लागेल, याची जाणीव व्हायला हवी आणि सोबतच त्या गोष्टी आपणास कोणी आणि कशा प्रदान केल्यात याचीही जाणीव त्यांना व्हायला हवी.
पृथ्वीवर जेव्हा मानवजात अस्तित्वात नव्हती तेव्हा पृथ्वी अगदीच अस्थिर अवस्थेत होती. तेव्हा येथे ना कोणते प्राणी होते, ना वनस्पती. या पृथ्वीचा अर्थात जमिनीचा निर्मिक ज्याला मानवासारखे अस्तित्व तयार करायचे असल्याने पृथ्वीला स्थिर करणे आवश्यक होते आणि तिला स्थिरता प्राप्त करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच निसर्गकर्ता होता. याचा उल्लेख कुरआनमध्ये अध्याय 'काफ'च्या ७ व्या आयतीमध्ये आहे, "आणि पृथ्वीला आम्ही अंथरले आणि त्यात पर्वत रोवले व त्यात हरतऱ्हेच्या सदृश्य वनस्पती उगवल्या."
या आयतीला विस्तारित करतांना मौलाना अब्दुर्रहेमान किलानी यांनी तैसिरूल कुरआनमध्ये लिहिले आहे की, येथे असा युक्तिवाद आहे की अल्लाहने पृथ्वी इतकी रुंद केली आणि ती पसरवली की ती पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत जन्मलेल्या प्राण्यांसाठी आणि मानवांसाठी निवासस्थान आणि निवारा म्हणून काम करू शकते आणि त्या प्राणी आणि मानवांचे पोट भरण्यासाठी वनस्पतींच्या रूपात पुरेसे अन्न उत्पन्न करू शकते. तसेच या प्राण्यांच्या आणि माणसांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफनही करू शकते. मौलाना पुढे लिहितात की, या आयतीवरून आणि कुरआनमध्ये इतर आयातींवरून हे कळते की पृथ्वीची उत्पत्ती ही वेगळी आणि पर्वतांची उत्पत्ती ही वेगळी गोष्ट आहे. पर्वत पृथ्वीने निर्माण केले नाहीत तर ते नंतर निर्माण झाले आणि पर्वतांच्या निर्मितीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा तिच्या वेगामुळे ती हलायची, तिला धक्के बसायचे आणि ती सतत डोलत असायची. त्यामुळे ती मानव किंवा प्राण्यांसाठी राहण्यायोग्य नव्हती.
अल्लाहने पृथ्वीवर अशा ठिकाणी पर्वतांची साखळी तयार केली आणि त्यांना असे समतोल आणि प्रमाणबद्ध बनवले की पृथ्वीला इकडे-तिकडे झुकण्यापासून थांबवले आणि सजीवांना राहण्यासाठी आणि वावरण्यासाठी योग्य केले. हा पर्वतांचा मुख्य फायदा आहे, त्याशिवाय पर्वतांचे अन्य फायदेदेखील कुरआनमध्ये सांगितले आहेत. हे अल्लाहची परिपूर्ण शक्ती देखील दर्शवते. अल्लाहची ही निर्माणशक्ती अश्रध्दावंतदेखील जाणतात पण ते माणसाला पुन्हा निर्माण करण्याच्या तथ्याला नाकारतात. का कुणास ठाऊक? पृथ्वीवरील उन, वारा, पाऊस समान आहे आणि त्याठिकाणी वनस्पती भिन्न आहेत. म्हणजेच जमिनीचा भूखंड समान आहे, पाणीही तेच आहे, हवामान आणि वातावरणही तेच आहे, पण कुठेतरी झाडे उगवलेली आहेत, त्यातील काही फळे गोड, काही कडू तर काही तुरट आहेत. कुठेतरी धान्य, पिके उगवत आहेत. कुठेतरी झाडे उंचच उंच वाढत आहेत. त्यातील काही फलदायी तर काही काटेरी आहेत, कुठेतरी रंगीबेरंगी, सुंदर आणि सुगंधी फुले उगवत आहेत. जेव्हा या गोष्टी त्यांच्या बहरण्यायोग्य होतात तेव्हा ते एक अद्भुत आणि नयनरम्य दृश्य सादर करतात. या गोष्टी अल्लाहची अद्भुत शक्ती सिद्ध करत नाहीत का? तर मग, पृथ्वीवरील तुमचे विखुरलेले कण गोळा करून तुम्हाला पुन्हा जिवंत करण्याची अल्लाहची शक्ती ओळखणे शक्य नाही का? मूलभूत गरजांची पूर्तता करताना त्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा दाता कोण आणि तो यांचा हिशोब कसा घेईल याची जाणीव करून घेण्याचीही गरज मुलभूतच म्हणावी लागेल.
(क्रमशः)
- हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment