गरीबी निर्मुलनाची इस्लामी पद्धत
आयीन-ए-मुस्तफा के सिवा हल हों मुश्किलें
सब अ्नल का फरेब निगाहों का फेर है
भांडवलशाही व्यवस्थेमध्ये नाव जरी शेतकरी आणि शेतमजुरांचे घेतले जात असले तरी सत्ता ही कायम चालाक आणि धोरणी लोकांच्या हातात असते. सरकारचे समर्थक भांडवलदार आणि कट्टर कार्यकर्ते वगळता बाकी जनता कायम गरीब, अशिक्षित व रोगट कशी ठेवता येईल याकडेच राजकारण्यांचे लक्ष असते. त्यांना हे ही माहित असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये पुरेशी गुंतवणूक केली तर जनतेची कायमची गरीबी दूर होऊ शकते परंतु राजकारणी असे करत नाहीत. त्यांचेे धोरणच असे असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये पुरेशी गुंतवणूक केल्या जाऊ नये. एवढेच नव्हे तर या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे जेणेकरून सरकार समर्थक भांडवलदार आणि कार्यकर्त्यांना तारांकित शिक्षण संस्थानाचे जाळे विनता येईल व त्यात त्यांनाच लाभ होईल. अलिकडे शेतकऱ्यांविषयक केंद्र सरकारने मान्य केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांचे नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी काढलेले आहेत हे वरील धोरणाचाच एक भाग आहे. लोकशाहीमध्ये त्याच व्यक्ती आणि व्यक्ती समुहांची प्रगती होत असते जे राजकीयदृष्ट्या जागरूक असतात. सरकारवर कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रभाव ठेवून असतात. याच कारणामुळे दर पाच वर्षांनी,’’गरीबी निर्मुलनाचे’’ आश्वासन देऊनही गरीबी निर्मुलन होत नाही.
जनता गरीब व अशिक्षित रहावी म्हणून सरकारी रूग्णालये, शाळा आणि कृषी क्षेत्र ठरवून बकाल ठेवले जातात. म्हणून कुठलीही अस्पृश्यता न बाळगता आपोआप गरीब जनता या तारांकित शाळा आणि रूग्णालयाच्या परिघाबाहेर फेकली जाते आणि यावर कडी म्हणजे कोणाकडे याची तक्रार करता येत नाही. भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक लोकशाहीमध्ये हेच धोरण अघोषितपणे राबविले जाते. जनता अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असेल आणि त्यांच्यातील बहुतेकांचे आरोग्य चांगले नसेल तर गरीबी आपोआप येते व तिच्यासोबत येणाऱ्या वाईट सवई सुद्धा ’एकावर एक फ्री’ या तत्त्वावधानाप्रमाणे आपोआपच येतात. जनतेची पोटा आणि हाताची गाठ घालता-घालता पाच वर्षे कधी निघून गेली व पुढची निवडणूक कधी आली हे जनतेलाच कळत नाही. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच राजकारणाचा पारा गरीब वस्त्यांमध्ये आपोआप चढतो. कार्यकर्त्यांना अचानक महत्त्व प्राप्त होते, त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि निवडणुकांना उत्सवाचे रूप प्राप्त होते. गरीब कार्यकर्त्यांना खूप महत्त्व दिले जाते. चार पैसे मिळत असल्यामुळे ते ऊर फाटेपर्यंत ढोल, ताशे बढवून साहेबांचा प्रचार करतात. निकाल लागले की साहेब नॉट रिचेबल होऊन जातात. त्यांना मंत्रिपदाचे तर कार्यकर्त्यांना रोजगार हमी योजनेचे वेध लागतात. साधारणपणे या विष्यस्सर्कल मधून बाहेर पडणे कोणालाही शक्य होत नाही.
थोडक्यात गरीबी हटविण्यासाठी सरकारची स्थापना केली जाते मात्र सरकारच्या गरीबांच्याविरोधी धोरणामुळेच जर गरीबी येत असेल तर तक्रार कोणाकडे करावयाची? एरव्हीपेक्षा यावेळेस तर परिस्थितीही वेगळी आहे. कोविडच्या साथीचे दोन टप्पे पार पडलेले असून, येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तिसरा टप्पा सुरू होईल, अशा बातम्या अधूनमधून कानावर येत आहेत. कोविडमुळे सरकारचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले असून, सरकारच्या मनात आले तरी ते जनतेची आर्थिक मदत करू शकणार नाहीत,अशी एकंदरित परिस्थिती आहे. अश्या परिस्थितीमध्ये ’अपनी मदत आप’ या तत्वावधानानुसार आपली गरीबी आपणच दूर कशी करू शकतो, यावर गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.
गरीबीचे मुख्य कारण
गरीबीचे मुख्य कारण भ्रष्ट-आचरण आहे. शेती वगळता इतर प्रत्येक क्षेत्राला भ्रष्टाचारी अजगराचा मजबूत विळखा पडलेला आहे. भारतासारख्या अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या देशात एवढे भ्रष्टाचारी लोक निर्माण का झाले, याचा जर विचार केला तर लक्षात येते की, आधुनिक जगात यशाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. यशस्वी तोच ज्याच्याकडे संपत्ती आहे. मग ती संपत्ती त्याने कशी कमावली, याचा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यामुळे दारू आणि ड्रग्जपासून खाद्य पदार्थात भेसळ आणि औषधांमध्ये काळाबाजार करून संपत्ती कमावण्यास मोकळीक आहे. ज्ञान, त्याग, प्रेम, सदाचार, सम्मान, दया, करूणा या मुल्यांचा यशस्वी होण्यामध्ये काहीएक संबंध राहिलेला नाही. मुंबईच्या सिनेउद्योगामध्ये भरपूर पैसा आहे हे माहित असून देखील पूर्वी चांगल्या घरच्या मुली त्या उद्योगात जात नसत. आता पैशासाठी सिनेउद्योग तर सोडाच पॉर्न उद्योगातही चांगल्या घरच्या मुलींना जातांना लाज वाटत नाहीये. नव्हे राजकुंद्रासारखे उद्योगपती या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वदेशी उद्योगाला भरभराटीत आणण्यामध्ये यास्मीन रसूल बेग (40), मुहम्मद आतिफ नासीर अहेमद सैफी (32) अशी सोज्ज्वळ नावे असलेल्या मुस्लिमांचाही सहभाग असल्याची बातमी 19 जुलै 2021 च्या सर्वच वर्तमानपत्रातून झळकलेली आहे. थोडक्यात अवैध मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्यांना समाजामध्ये सन्मान मिळत असल्यामुळे अनेक मुस्लिमही हा सन्मान मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये सामील झालेले आहेत.
संपत्तीचा संचय दुराचारी लोकांच्या हातात झाल्याने सदाचारी लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा फार कमी वाटा येतो. हे गरीबीचे सर्वात मोठे कारण आहे. देशात संपत्ती संचयाची एक आंधळी स्पर्धा सुरू असून, प्रत्येकजण कुठल्याही परिस्थितीत ती स्पर्धा जिंकण्यासाठीच तिच्यात सहभागी होत आहेत. म्हणून राष्ट्रीय संपत्तीचे अभिसरण अनैतिक उद्योगामध्येच होत आहे. यासाठी सर्व समाज जबाबदार आहे. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने स्वच्छ होत नाहीत त्याचप्रमाणे वाममार्गाचे मध्ये अडकलेल्या संपत्तीला वाममार्गाने स्वच्छ करता येत नाही. त्याला हराम आणि हलालच्या कसोटीवर कसून सद्मार्गाकडे वळवावे लागते. तेव्हाच संपत्तीचे अभिसरण समाजातील सदाचारी लोकांकडे सुरू होते. त्यासाठी ज्यांच्याकडे कुरआन नावाचा ईश्वरी ग्रंथ आहे त्यांना पुढे यावे लागेल आणि संपत्ती कमाविण्याची व ती खर्च करण्याची ईश्वरीय व्यवस्था काय आहे? हे जनतेसमोर मांडावी लागेल. थोडक्यात गरीबी निर्मुलनाची इस्लामी पद्धत काय आहे? याचा परिचय जनतेला करून द्यावा लागेल. तो परिचय करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा लेख आहे.
इस्लाममध्ये संपत्तीचे स्थान
एकेश्वरवादाचा त्याग केल्यामुळे माणसाला कोणतीच भीती राहत नाही व तो संपत्ती कमावण्यात आणि खर्च करण्यात कुठल्याही आचार संहितेला बांधिल राहत नाही. म्हणून लोक आपल्या खऱ्या-खोट्या ऐपतीचे प्रदर्शन करण्यासाठी अमाप पैसा मिळेल त्या मार्गाने गोळा करत असतात व तो मिळेल त्या मार्गाने खर्च करत असतात. एकेश्वरवादावर विश्वास माणसाच्या याच प्रवृत्तीला लगाम लावतो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा कणा जकात आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही खालून वर म्हणजे गरीबांकडून श्रीमंतांकडे जाते. या उलट जकात आधारित इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही वरून खाली म्हणजे श्रीमंतांकडून गरीबाकडे येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाईवर कर लावला जातो त्यामुळे कमाई लपविता येऊ शकते आणि कर वाचविता येऊ शकतो. मात्र इस्लाममध्ये कर बचतीवर लावला जातो आणि बचत मात्र लपविता येत नाही. त्यामुळे जकात अदा करावीच लागते.
इस्लाममध्ये संपत्तीचे सर्व व्यवहार शरियतच्या कोंदनात बसविलेले असल्यामुळे आर्थिक व्यवहाराचे अधिष्ठान नैतिक मुल्यांवर ठेवलेले असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये सदाचार, ज्ञान, त्याग, प्रेम, सम्मान, दया, करूणा यांना फार महत्त्व असते. या सर्व कारणामुळे संपत्तीचे अभिसरण समाजामध्ये समप्रमाणात होत असते. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर (सल्ल.) यांच्या आज्ञा पाळा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.’’ ( संदर्भ : सूरे अन्नूर : आयत नं. 56). या आयातीमध्ये नमाजसारख्या अत्युच्च उपासनेसोबत जकातची सांगड घातलेली आहे आणि अशा अनेक आयाती कुरआनमध्ये विखुरलेल्या आहेत ज्यामुळे जकातीचे महत्त्व श्रद्धावान मुस्लिमांच्या मनावर बिंबवले गेले आहे. यामुळे जकात न अदा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नाही आणि दरवर्षी नियमितपणे कोट्यावधी रूपये कुठल्याही ईडी आणि सीबीआयच्या बडग्याशिवाय गरीबांच्या खिशात जातात.
याशिवाय मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीमध्ये एकीकडे नातेवाईकांचा वाटा ठरविण्यात आलेला असला तरी दूसरीकडे वारस नसलेल्या पण गरीब असलेल्या लोकांचाही समावेश वारसांसोबत केलेला आहे. सुबहान अल्लाह (अल्लाह पवित्र आहे)! किती उच्च आणि दैदिप्यमान असा हा नैतिक विचार आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.’’(संदर्भः सुरे अन्निसा : आयत नं.8).
इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये गरीबी निर्मुलनासाठी शासनावर जेवढी जबाबदारी टाकली आहे तेवढीच व्यक्तीवरही टाकलेली आहे. शासनाने आपल्या बैतुलमाल (ट्रेझरी)मधून जनकल्याणाच्या अशा योजना हाती घ्याव्यात ज्यामुळे जनतेची गरीबी दूर होईल तसेच प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमाने आपल्या बचतीमधून जकात द्यावी. त्याशिवाय, सदका (दान), उश्र (कापणीच्या वेळेस धान्याचा विशिष्ट भाग) गरीबांसाठी राखीव ठेवणे, फित्रा इत्यादी मार्गाने गरीबांना आर्थिक लाभ वर्षभर व्यक्तीगत पातळीवरून होत राहील, अशी व्यवस्था केलेली आहे. यामुळे गरीबी निर्मुलनास मदत होते.
अलिकडे गरीबांना मोफत जेऊ घालण्यासारख्या महत्वाच्या बाबीकडे मुस्लिमांचे दुर्लक्ष होत असून यात शीख बांधवांनी बाजी मारल्याचे दिसून येते. इस्लाममध्ये गरीबांना मोफत जेवण देण्याची अनेक ठिकाणी ताकीद करण्यात आली आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये गरीबांना जेवण न देणाऱ्यांच्या बाबतीत तंबी करताना म्हटले आहे की, 1.’’व गरीबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता’’ (संदर्भ : सुरे अलहा्नका आयत नं.34).
2. ’’आणि गरीबांना जेवू घालत नव्हते’’ (संदर्भ : अलमुदस्सीर आयत नं. 44).
3. ’’आणि गरीबाला जेवू घालण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देत नाहीत’’ (सुरे अल्फज्र आयत नं. 18).
वरील आयातींवरून एक गोष्ट तर वाचकांच्या लक्षात येईलच की, गरीबांना मोफत जेवण न घालणाऱ्या लोकांबद्दल ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भातील अधिक तपशील या लेखात देणे शक्य नाही. म्हणून ज्यांना या संबंधी माहिती हवी असेल त्यांनी रास्त कुरआनमधील या आयातींचा अभ्यास करावा.
याशिवाय इस्लाममध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुस्लिमांना प्रेरित करण्यात आलेले आहे. एके ठिकाणी तर अनावश्यक खर्च करणाऱ्यांना सैतानाचा भाऊ सुद्धा म्हटलेले आहे. अनावश्यक परंपरा आणि रितीरिवाजांचे पालन करण्यामध्ये अनेक मुस्लिम लोक आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. विशेषतः लग्न सोहळ्यांमध्ये असा अमाप खर्च केला जातो की त्यामुळे अनेक कुटुंबेही लग्नानंतर दारिद्ररेषेखाली जातात. ब्रँडेड कपडे, सुगंध आणि मॉलमध्ये अनावश्यक खरेदी करून मुस्लिम लोक कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. श्रद्धावान मुस्लिमांना अशा अनावश्यक खर्चापासून अलिप्त राहण्याची ताकीद करूनच कुरआन थांबत नाही तर आपण गरजवंत असतांना सुद्धा दुसऱ्या गरवंतांचा आपल्यापेक्षा जास्त विचार करण्याची उच्च नैतिक शिक्षा तो देतो. म्हणून म्हटलेले आहे की,
3.‘’वायफळ खर्च करणारे सैतानचे बंधू होत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे’’ (बनी इस्राईल आयत नं. 27).
4. हे मानवानों! खा, प्या मात्र मर्यादाभंग करू नका. अल्लाह मर्यादा भंग करणाऱ्या लोकांना पसंत करत नाही. (संदर्भ : सुरे आराफ आयत नं. 31).
या तिन्ही आयातीमध्ये मुस्लिमांना वायफळ खर्च टाळण्यासंबंधी सक्तीने बजावण्यात आलेले आहे. मोफत अन्नछत्र चालवणे आणि वायफळ खर्च टाळणे म्हणजे गरीबीच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांची मदत करण्यासारखे आहे. ह उदात्त शिकवण आजच्या स्वार्थी वर्तणुकीच्या अगदी उलट आहे. कुरआन येथेच थांबत नसून यापुढे म्हणतो की, ’’आणि ते स्वतः (मुस्लिम) गरजवंत असतांना दुसऱ्या गरजूंना आपल्यावर प्राधान्य देतात.’’ (संदर्भ : सुरे अलहश्र, आयत नं.9)
मदीना येथील भातृभाव योजना
एकेश्वरवादाची शिकवण म्नकाच्या मूर्तीपूजकांना मुळीच आवडत नव्हती. त्यामुळे मूठभर मुस्लिम एकीकडे आणि कुरेशचे बलवान मूर्तीपूजक दुसरीकडे असा विषम सामना जेव्हा रंगात आला तेव्हा नाईलाजाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपल्या साथीदारांसोबत मदीना येथे हिजरत करावी लागली. अचानक हिजरत करावी लागल्यामुळे मुस्लिमांना अंगावरच्या कपड्यानिशी जावे लागले. त्यामुळे मदीना शहरात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचीही व्यवस्था नव्हती. अशा वेळेस इस्लामी ब्रदरहुड (भातृभाव योजना)ची ऐतिहासिक घटना घडली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्नकाहून आलेल्या एका मुहाजीरची मदीना येथील एका अन्सारी मुस्लिमांबरोबर जोडी लावून दिली आणि घोषित केले की आजपासून तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. अशा तऱ्हेने मक्का येथील सर्व स्थलांतरीतांच्या जोड्या मदीना येथील स्थानिकांशी लावण्यात आल्या. तेव्हा जगाने पाहिले की त्यांच्यात असे बंधुत्व निर्माण झाले होते की, त्याचे दूसरे उदाहरण त्यापूर्वी किंवा त्यानंतर जगाने पाहिलेले नाही. अन्सारी मुस्लिमांनी आपल्या भावांसाठी आपल्या सर्व चल-अचल संपत्तीची उभी विभागणी करून अर्धी आपल्या स्थलांतरित भावांना दिली. येणेप्रमाणे स्थलांतरित मुस्लिमांची गरीबी दूर झाली. म्नकाहून येणारे मुस्लिम व्यापारी होते त्यांना शेती येत नव्हती तर मदीना येथील स्थानिक मुस्लिम शेतकरी होते त्यांना व्यापार येत नव्हता. दोघांच्या जोड्या लागल्यामुळे शेतीबरोबर व्यापारही सुरू झाल्याने अन्सार आणि मुहाजीर दोघांचीही भरभराट झाली. आज जर कोविडच्या परिस्थितीमध्ये रोजगार हरवलेल्या आपल्या शेजाऱ्याची जबाबदारी प्रत्येक मुस्लिमाने स्वीकारली आणि मदीना भातृभाव योजनेप्रमाणे त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि आपल्या संसाधनामधून अर्धे नाहीतरी किमान त्याच्या गरजेपुरती मदत केली तर त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल व बंधूभाव वाढेल तो वेगळा. तसेच वर नमूद कुरआनच्या इतर आयातींप्रमाणे आचरण केले तर कुठलीही फीत न कापता, कुठल्याही पॅकेजची घोषणा न करता, कुठलाही गाजावाजा न करता गरीबी निर्मुलनाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. यात माझ्या मनात तरी किमान शंका नाही. परंतु असे करण्यासाठी मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे. मोठा त्याग करण्यासाठी मोठे मन लागते आणि मोठे मन इस्लामवर अढळ श्रद्धा असल्याशिवाय मिळत नाही. नुकतीच त्यागाची शिकवण देणारी ईदुल अज्हा झालेली आहे.
यानिमित्ताने प्रत्येक मुस्लिमाने आपला एक गरीब शेजारी आर्थिक मदतीसाठी म्हणून दत्तक घ्यावा म्हणजे नक्कीच गरीबी दूर होईल. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आपल्या देशबांधवांची गरीबी दूर करण्यासाठी मदीना येथील भातृभाव योजनेप्रमाणे त्याग करण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन.
- एम.आय.शेख