Halloween Costume ideas 2015
December 2017

-औरंगाबाद (शोधन सेवा)  
जमाअते इस्लामी हिंदच्या औकाफ सेलच्या वतीने औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर 11 डिसेंबर रोजी दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले व नंतर मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले. वक्फ बोर्डाचा पूर्णवेळ मुख्यकार्यकारी अधिकारी नेमण्यात यावा, ए.के.ए.टी. शेख रिपोर्ट तसेच कृष्णा भोगे रिपोर्ट तात्काळ लागू करण्यात यावी. या दोन्ही कमिशनने दिलेल्या रिपोर्टनुसार दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. वक्फ बोर्डामध्ये कर्मचार्‍यांची कमतरता आहे. मंडळाने भरतीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला पाठविलेला आहे तो तात्काळ मंजूर करून तरूण पिढीतील सक्षम तडफदार व प्रामाणिक युवकांना वक्फ बोर्डात सेवेची संधी द्यावी. वक्फ मंडळाचा अभिलेख स्कॅन करून त्याचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही ते विनाविलंब पूर्ण करण्यात यावे. वक्फ मंडळात तीन हजारांपेक्षा जास्त संचिका नोंदणीसाठी किंवा बदल अहवालासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात. मंडळाच्या कर्मचार्‍यांना एमसीएसआर लागू आहे. त्यांना इतर राज्यशासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सवलती उदा. सेवानिवृत्ती इत्यादीचे लाभ देण्यात यावेत. मंडळातील कर्मचार्‍यांना वर्कशीट (कार्यविवरण पत्रिका) बंधनकारक नाही. त्यामुळे कुठल्या कर्मचार्‍याने काय काम केले हे वरिष्ठांना कळत नाही तरी त्यांना कार्यविवरण पत्रिका लिहिणे बंधनकारक करण्यात यावे. तसेच ते कोणत्या कामाने कार्यालय सोडून कोठे जात आहेत? याचीही नोंद करण्याची त्यांच्यावर सक्ती करण्यात यावी. वक्फ मंडळाच्या निर्णयानुसार राज्य वक्फ मंडळात नोंद असलेल्या मस्जिदींच्या इमाम व मुअज्जनला अनुक्रमे 15 हजार व 8 हजार पगार देण्यात यावा व इतर राज्याप्रमाणे त्यांना सेवानिवृत्तीच्या सवलती सुद्धा देण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
      निवेदनावर औकाफ सेलचे सचिव फहीम फलाही, संयोजक मेराज सिद्दीकी, अ‍ॅड. मोईजुद्दीन बियाबाणी, अब्दुल हमीद खान यांचे हस्ताक्षर आहे.



-एम.आय.शेख
6 डिसेंबर 2017 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलम शहराला इजराईलची राजधानी म्हणून मान्यता दिली व तेल अवीव येथील अमेरिकी दुतावास जेरूसलम येथे हलविण्यास मंजुरी दिली. गेली 70 वर्षे जो निर्णय अमेरिकेच्या आतापावेतो झालेल्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी तहकूब ठेवला होता त्याची अंमलबजावणी ट्रम्प यांनी सगळ्यांचा विरोध डावलून केली. ट्रम्प यांच्या या अविवेकी निर्णयाचा जगाच्या सर्वच भागातून विरोध सुरू झालेला आहे. ट्रम्प यांना मात्र या विरोधाची काडीमात्र परवा नाही. या निर्णयाचा सर्वात कडवा विरोध सऊदी अरब आणि ईरानकडून होण्याची शक्यता होती. म्हणूनच इरानला वेगळे पाडून व सऊदी अरबमध्ये आपल्या जावयाचा मित्र मोहम्मद बिन सलमान याला सत्तेत आणून ट्रम्प यांनी या विरोधाची धार अगोदरच बोथट करून ठेवलेली  आहे. इजराईलची राजधानी तेल अवीव येथून जेरूसलेम येथे हलविण्यामागे ट्रम्प यांचे यहूदी (ज्यू) जावाई जेराड कुश्‍नर यांचे राजकारण असल्याचे स्पष्ट आहे. इजराईल वगळता कोणीही या निर्णयाचे समर्थन केलेले नाही. या निर्णयामुळे मध्यपुर्वेतील राजकीय संतुलन बिघडून रक्तरंजित संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. म्हणून हा विषय काय आहे? हे समजून घेणे अप्रस्त होणार नाही.
ज्यू लोकांचा इतिहास
      ज्यू लोक म्हणजे बनी इसराईलचे लोक हे अल्लाहच्या विशेष मर्जीतील लोक होते. ईसापूर्व 300 वर्षापुर्वी प्रेषित मुसा यांच्यासोबत ज्यू लोकांना इजिप्तमधून निघून सीरियाच्या मार्गाने पॅलिस्टीनमध्ये जावून तेथील जुल्मी राजाबरोबर युद्ध करण्याचा अल्लाहने आदेश दिला होता. तो प्रेषित मुसा यांनी खालील शब्दात ज्यू लोकांना सांगितला.  ”हे माझ्या बांधवानो! या पवित्रभूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे. मागे फिरू नका नाहीतर अयशस्वी व निराश परताल.” (संदर्भ ः सुरे मायदा आयत नं. 21). त्या काळात पॅलिस्टीनमध्ये अमालका नावाची शक्तीशाली राजवट सुरू होती. ज्यू त्यांच्याशी लढू इच्छित नव्हते. त्यांनी प्रेषित मुसा यांना सांगितले की, ”हे मुसा! आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत. तुम्ही आणि तुमचा पालनकर्ता दोघे जा आणि लढा. आम्ही येथेच बसलो आहोत.” (संदर्भ ः कुरआन अल मायदा आयत नं. 24) त्यावर अल्लाहने ज्यू लोकांना खालील शब्दात तंबी दिली. ”बरे तर, तो प्रदेश चाळीस वर्षापर्यंत यांच्याकरिता निषिद्ध आहे. हे भूतलावर वणवण भटकत राहतील. या अवज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका.” (संदर्भ ः कुरआन ः सुरे अलमायदा आयत नं. 26). या व अशा अनेक आदेशांच्या अवज्ञा केल्यामुळे ज्यू समाज अल्लाहच्या नजरेतून कायमचा उतरला व अल्लाहचा त्यांच्यावर कोप झाला.   
पॅलेस्टिनचा इतिहास
      ज्या काळात मानव आपली उपजिविका भागविण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी भटकत होता त्या काळात अरबस्थानमधील अनेक टोळ्यांपैकी ’साम’ टोळीच्या एका शाखेच्या काही लोकांनी ज्यांचे नाव ’कन्आनी’ होते. ईसापूर्व 2500 मध्ये अरबस्थान येथून येवून जॉर्डन नदीच्या किनारी पॅलेस्टीनमध्ये आपली वस्ती केली. जॉर्डन आणि इजिप्तच्या मध्ये असलेल्या जॉर्डन नदीच्या किनार्‍याच्या लगतच्या प्रदेशाला हजारो वर्षापासून इजराईल असे म्हणतात. इजराईलच्या शेजारी सीरिया, इराक आणि सऊदी अरब असून लिबीया, सुडान, युथोपिया, इरान ही त्याच्या जवळ आहेत.
      ह. इब्राहीम अलै. (अब्राहम) सुद्धा इराकच्या ’अर’ येथून येवून पॅलेस्टीन येथे स्थायीक झाले होते. त्यांना दोन मुले होती. एकाचे नाव इसकाह अलै. तर दूसर्‍याचे नाव इस्माईल अलै. असे होते. त्यांनी इसहाक अलै. यांना पॅलेस्टीनमध्ये (बैतुल मुकद्दस) येथे तर ह.इस्माईल यांना मक्का (बैतुल हराम) येथे जावून स्थाईक होवून धर्मप्रचार करण्याचा आदेश दिला. हजरत इसहाक अलै. यांचे पुत्र हजरत याकूब अलै. होते ज्यांना इस्राईल (अल्लाहचा बंदा) म्हणून ओळखले जात होते. आज अस्तित्वात असलेल्या इस्राईल या देशाचे नाव त्यांच्याच नावावरून घेतलेले आहे. इस्राईलच्या भूमीला प्रेषितांची भूमीही म्हटले जाते. कारण याच भूमीमध्ये ह. दाऊद अलै, ह.सुलेमान अलै., ह. याह्या अलै., ह.मुसा अलै., ह. हारूण अलै., ह.ईसा अलै. ही वास्तव्यास होते. ह. इब्राहीम अलै. यांच्यापासून प्रेषितांच्या दोन शाखा निघाल्या. एक- हजरत याकूब उर्फ इस्राईल यांच्यापासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्राईल असे म्हणतात तर ह. इस्माईल अलै. यांच्या पासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्माईल असे म्हणतात. बनी इस्माईलमध्ये प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचा जन्म झाला. ही गोष्ट बनी इस्राईल म्हणजे आजच्या यहुदी आणि ख्रिश्‍चनांना सहन झाली नाही. म्हणून ते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित मानत नाहीत, हेच यहुदी-ख्रिश्‍चन विरूद्ध मुस्लिम यांच्यातील वैराचे प्रमुख कारण आहे.
      दुसर्‍या महायुद्धापूर्वी आटोमन साम्राज्य म्हणजेच उस्मानिया खिलाफतीचा पॅलिस्टीन हा एक भूभाग होता. या साम्राज्याचे शेवटचे खलीफा सुलतान अब्दुल हमीद सानी यांना यहुदी लोकांच्या एका शिष्टमंडळाने भेटून त्यांना पॅलेस्टीनमध्ये यहुदी वस्ती वसविण्याची परवानगी मागितली. त्या बदल्यात आटोमन साम्राज्यावर असलेले कर्ज स्वतः फेडण्याची तयारी दर्शविली. मात्र सुलतान अब्दुल हमीद यांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. 1909 मध्ये सुलतान अब्दुल हमीद यांचा मृत्यू झाला. पहिल्या महायुद्धामध्ये आटोमन साम्राज्याने जर्मनीचे समर्थन केले होते. जर्मनीच्या पाडावाने पहिले महायुद्ध संपले व ऑटोमन साम्राज्यावर ब्रिटीशांनी ताबा मिळविला. त्याचे वेगवेगळे तुकडे केले. तुर्कीचा भाग आपल्या मर्जीतील कमाल पाशा अतातुर्क याला दिला तर हिजाजचा भाग सऊद परिवाराला दिला. पॅलेस्टीनच्या भागावर मात्र दुसर्‍या महायुद्धापर्यंत ब्रिटीशांचाच अंमल होता. म्हणून यहुदी लोकांनी  यहुदी लोकांसाठी ब्रिटीशांकडे पॅलेस्टीनच्या भूभागामध्ये वेगळे राष्ट्र तयार करून देण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांनी दुसर्‍या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भरपूर अर्थसहाय्य केले. हिटलर यांनी यहुदी लोकांवर केेलेल्या आनन्वित अत्याचाराचा दाखला दिला. ब्रिटीशांना दुसर्‍या महायुद्धामध्ये जरी विजय प्राप्त झाला तरी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की त्यांना आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्य द्यावे लागले. परिणामी भारत आणि पॅलेस्टीनवरचा ताबा त्यांनी 1947 व 1948 साली सोडला.
     
यहुदींनी केलेल्या अर्थसहाय्याच्या बदल्यात यहुदींसाठी नवीन राष्ट्र तयार करण्यासाठी ब्रिटीशांनी अमेरिकेच्या मदतीने 1947 साली संयुक्त राष्ट्रामध्ये एक ठराव संमत करून पॅलिस्टीनच्या भूमीवर इस्राईल नावाच्या नवीन देशाची निर्मिती करण्यास मंजुरी मिळविली. संयुक्त राष्ट्राच्या या ठरावाप्रमाणे 14 मे 1948 रोजी त्यांनी पॅलिस्टनवरील आपला ताबा सोडला. मात्र जाता-जाता त्यांनी पॅलिस्टीनची फाळणी करून इस्राईलची निर्मिती केली. सरकारी इमारती, हत्यारे, पोलीस यहुद्यांच्या ताब्यात दिले.
      अरब राष्ट्रांचा याला प्रखर विरोध होता या विरोधाला न जुमानता शेवटी 15 मे 1948 साली इजराईल या देशाची अधिकृत घोषणा झाली आणि लगेचच अरब-इजराईल युद्धाला तोंड फुटले. सऊदी अरब, लेबनान, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांनी संयुक्तरित्या इजराईलवर हल्ला केला. मात्र ब्रिटन आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीमुळे इजराईलने हे युद्ध जिंकले. या युद्धामध्ये अरब राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा 29 ऑक्टोबर 1958 रोजी इजराईलने इजिप्तवर हल्ला करून सीना नावाचा भाग आपल्या राज्यात जोडला. इजराईलच्या या दंडेलशाहीला फ्रान्स आणि ब्रिटनने सक्रीय सहकार्य केले. 6 नोव्हेंबर 1958 रोजी युद्धबंदी करार झाला जो 19 मे 1967 पर्यंत कायम राहिला. 1967 मध्ये मात्र सहा दिवसांचे अरब इजराईल युद्ध झाले. यात इजराईलने अमेरिका आणि ब्रिटीश सैनिकांच्या मदतीने सीनाबरोबर पूर्वी जेरूसलमच्या काही भागावर आणि इजिप्तच्या गोलान टेकड्यांवर तसेच जॉर्डनच्या काही भागावर आपला कब्जा प्रस्थापित केला.
      10 जूनला संयुक्त राष्ट्राने मध्यस्ती करून युद्धबंदी केली पण इजराईलने बळकावलेला प्रदेश त्याच्याकडेच राहिला. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1973 रोजी यहुद्यांच्या पवित्र दिवशी म्हणजे ’यौमे कपूर’ ला इजिप्त आणि सीरियाने संयुक्तरित्या पुन्हा इजराईलवर हल्ला केला. इजराईलने प्रतिकार करीत हा हल्ला परतवून लावला. एवढेच नव्हे तर सुवेज कालव्याच्या पूर्व किनार्‍यावर कब्जा मिळविला. 24 आक्टोबर 1973 रोजी युद्धबंदी झाली आणि संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेने या भागात प्रवेश केला. युद्धबंदी करारात ठरल्याप्रमाणे 18 जानेवारी 1974 रोजी इजराईलने सुवेज कालव्यावरचा आपला ताबा सोडला. यानंतरचे दोन वर्ष शांतीत गेले. मात्र 13 आक्टोबर 1976 रोजी ऐन्टेबे विमानतळावर इजराईली सैनिकांनी एक धाडसी हल्ला करून आपल्या 103 नागरिकांना सोडवून आणले. यानंतर मात्र अरबांची हिम्मत खचली आणि इजराईलशी युद्ध करण्याचा त्यांनी नाद सोडला. 26 मार्च 1979 रोजी इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांनी इजराईलला मान्यता देवून त्याच्याबरोबर तह केला. यानंतर या दोन्ही देशात राजकीय आणि व्यापारिक संबंध सुरू झाले. मैत्रीचा उपहार म्हणून 1982 साली इजराईलने इजिप्तचा जिंकलेला सीनाचा प्रदेश त्याला परत दिला.
      हळू-हळू पॅलेस्टीन व आजूबाजूच्या अरब देशांचा भूभाग बळकावत असतांनाच जुलै 1980 मध्ये पूर्व आणि पश्‍चिम जेरूसलेमला इजराईलने आपली राजधानी म्हणून घोषित केले. 7 जून 1981 रोजी इजराईलने परत एका धाडसी हवाई कारवाईमध्ये इराकचे अणुकेंद्र उध्वस्त केले. 6 जून 1982 रोजी परत एका धाडसी कारवाईमध्ये इजराईली सैनिकांनी लेबनानमधील पीएलओ (पॅलिस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन) चे मुख्यालय उडवून दिले. यात बैरूत शहराचा पश्‍चिमी भाग बेचिराख झाला. अधिक रक्तपात टाळण्यासाठी पीएलओने बैरूत शहर रिकामे करण्याला मान्यता दिली. याचवर्षी 14 सप्टेबरला लेबनानचे निर्वाचित अध्यक्ष बशीर जमाल यांची हत्या इजराईलची गुप्तचर संघटना मोसाद ने केली. यानंतर सुद्धा इजराईलने शेजारी अरब राष्ट्रांना सळो की पळो करून सोडले. इस्राईलने जरी जेरूसलेमला आपली राजधानी घोषित केली मात्र प्रत्यक्षात इस्राईलची राजधानी तेल अवीव शहरात आहे. जेरूसलेमच्या अर्ध्या भागावर म्हणजे पश्‍चिमी जेरूसलेम ज्यात बैतुल मुकद्दस आहे तो भाग अजूनही पॅलेस्टीनचाच भाग म्हणून ओळखला जातो. त्या भागासहीत पूर्व आणि पश्‍चिम जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे बैतुल मुकद्दस सहीत संपूर्ण जेरूसलम शहर आता इस्राईलचे शहर म्हणून भविष्यात ओळखले जाईल. हे अरबांनाच नव्हे तर जगातील इतर मुस्लिम देशांना सहन होण्यासारखे नाही. इस्राईल शहराचे महत्व एका ईश्‍वराला मानणार्‍या यहुदी, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांमध्ये एकसारखे आहे. ख्रिश्‍चन ज्यांना आपले प्रेषित मानतात ते ईसा अलै. यांचा जन्म जेरूसलेमच्या बेथलहेम भागातला. त्यांना याच शहरात यहुद्यांनी क्रुसेडवर चढविले. या नात्याने हे शहर ख्रिश्‍चनांसाठी अत्यंत पवित्र आहे. यहुद्यांच्या मान्यतेप्रमाणे पवित्र विपींग वॉल ही याच शहराच्या एका टेकडीच्यापायथ्याशी आहे. शिवाय त्यांचे पवित्र धार्मिक स्थळ हैकल-ए-सुलेमानी या शहराच्या भूभागात असल्याची त्यांची मान्यता आहे. याच शहरात असलेली मस्जिद-ए-अक्सा ही मुस्लिमांसाठी ’किब्ला-ए-अव्वल’ असून याच मस्जिदीमधून सर्व पैगम्बरांना नमाज पढवून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मेराजच्या रात्री अल्लाहकडे सदेह प्रस्थान केले. म्हणून मुस्लिमांसाठी हे शहर जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. मक्का आणि मदिनानंतर जेरूसलेम हेच मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र शहर आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाची कारणे
      ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयामुळे मुस्लिमांचा या शहरावरील अधिकार तसेच मस्जिद-ए-अक्सा दोन्ही धोक्यात आलेले आहेत. परंतु ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला यासाठी चार महत्वपूर्ण कारणे आहेत. एक - यहुदी समाज अमेरिकेमध्ये फक्त 60 लाख एवढा आहे. मात्र या लोकांचा प्रमुख व्यवसाय व्याजावर आधारित व्यवहार आहेत. म्हणून हा समाज अत्यंत श्रीमंत असा समाज आहे. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या याच समाजाच्या हातात आहेत. अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या पदावर यहुदी लोक अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. माध्यमे मग ती प्रिंट असो का इलेक्ट्रॉनिक्स जवळ-जवळ सर्वांवरच यहुद्यांची मालकी आहे. म्हणून यांच्या मर्जीला डावलण्यासाठी जो धोरणीपणा या पुर्वीच्या अध्यक्षांच्या अंगी होता त्याचा अभाव ट्रम्प यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी यहुदी लॉबीच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतला आहे. 
      दोन - त्यांचे जावाई जेराड कुश्‍नर हे स्वतः यहूदी असून त्यांनीच या निर्णयासाठी ट्रम्प यांच्यावर आतून दबाव आणला असावा.
      तीन - अमेरिका आता खनिज तेलासाठी स्वयंपूर्ण झालेली आहे. 2015 पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या समुद्रधुनीतून फ्रँकिंग पद्धतीने समुद्रतळाला असलेले तेलाचे साठे शोधून काढण्यास अमेरिकेला यश आलेले आहे. तेव्हापासून सऊदी अरबसह मध्यपुर्वेच्या इतर मुस्लिम देशांवर तेलासाठी अमेरिकेचे असलेले अवलंबित्व संपलले आहे. त्यामुळे या देशांच्या नाराजीची फारशी पर्वा करण्याची गरज अमेरिकेला राहिलेली नाही.
      चार - जगामध्ये अस्तित्वात असलेल्या 56 पेक्षा अधिक मुस्लिम देशांमध्ये एकी नाही. ते कितीही नाराज झाले तरी एकत्र येवून कोणाविरूद्ध लढू शकत नाहीत. याची पक्की खात्री अमेरिका आणि इजराईलला आहे. म्हणून सुद्धा ट्रम्प यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. शिवाय, सऊदी अरबचे वली अहेद राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांना आपल्या गोटात वळवून सऊदी अरबचा विरोध होणार नाही, याची पक्की व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मात्र सऊदी अरबची जनता आणि मध्यपुर्वेतील इतर राष्ट्रातील जनता तसेच इजीप्तमधील जनता या निर्णयाने गप्प राहील असे वाटत नाही. या निर्णयानंतर मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जेरूसलममध्ये ज्यू आणि पॅलिस्टीनी जनतेमध्ये चकमकी सुरू झालेल्या आहेत. हमासचे प्रमुख इस्माईल हनिया यांनी तिसर्‍या इंतफादा (सशस्त्र चळवळ) ची घोषणा केलेली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती माईक पेन्स यांना भेटण्यास पॅलिस्टीनचे प्रशासकीय प्रमुख महेमूद अब्बास यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे, त्यामुळे अमेरिकेचे तिळपापड झालेले आहे. एकंदरित परिस्थिती चिघळण्यास सुरूवात झालेली आहे. भविष्यात हे प्रकरण किती चिघळेल याचा अंदाज बांधणे कठिण आहे.


-बशीर शेख
मागचा आठवडा मुहम्मद अफराजुल या मजुराच्या हत्येमुळे गाजला. वास्तविक पाहता अशा हत्या होत राहतात. यापेक्षा जास्त भयानक पद्धतीने खासदार एहसान जाफरी यांना गुलबर्ग सोसायटीमध्ये त्यांच्या घरी आश्रयाला आलेल्या 69 निरपराध मुस्लिमांबरोबर गुजरातमध्ये 2002 मध्ये मारण्यात आले होते. अनेक जातीय दंगलीमध्ये यापेक्षा जास्त क्रौर्य मुस्लिम समाजाने सहन केलेले आहे. मात्र अफराजुलच्या हत्येचे वैशिष्ट्ये हे की, आपल्या कृत्याचे शंभुनाथ रेगर नावाच्या खुन्याने निर्भयपणे समर्थनच केले नाही तर त्याला राष्ट्रवादाचा मुलामा चढवून धीटपणे तो माध्यमांना सामोरे गेला. त्याने हत्याकांडाचा व्हिडीओ आणि त्यानंतरच्या बॅकअप व्हिडीओमध्ये लव्ह जिहाद या शब्दाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे देशामध्ये असा गैरसमज पसरला की, अफराजुल (वय 50) याने कुठल्यातरी हिंदू स्त्रीला आपल्या नादी लावले असावे. वास्तविक पाहता परिस्थिती अशी नाही. अफराजुल तीन मुलींचा बाप होता. त्याच्या दोन मुलींची लग्ने झालेली आहेत. तिसर्‍या मुलीचे लग्न देखील ठरलेले होते. या आरोपासंबंधी बीबीसीचे पत्रकार दिलनवाज पाशा यांच्याशी बोलतांना अफराजुलचा जावाई बरकत अली यांनी सांगितले की, ”दोन वेळच्या भाकरीसाठी जो माणूस आपल्या गावापासून हजारो किलोमीटर दूर येवून घाम गाळत असेल तो काय लव्ह करेल आणि काय जिहाद करेल? आम्ही तर भूकेच्या पुढे विचारसुद्धा करू शकत नाही. शंभुनाथ रेगर याने एखाद्या मुसलमानांला गाठून मारण्याचा निश्‍चय केलेला होता. त्याला अफराजुल सापडला. त्याने त्याला ठार मारले. मी सापडलो असतो तर मला मारले असते. अफराजुल यांचे कुठल्या दुसर्‍या महिलेशी संबंध असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यांना मी इतक्या जवळून जाणतो की त्यांच्या बाबतीत तसा विचार करणेसुद्धा गुन्हा आहे, असे माझे ठाम मत आहे. ” यासंबंधीचा सविस्तर रिपोर्ट बीबीसी हिंदीवर विस्तृत प्रकाशित करण्यात आला होता.
      या घटनेमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिमांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या. ही गोष्ट समजण्यासारखी आहे. मात्र हिंदू बांधवांनी सुद्धा मोकळ्यापणे या घटनेचा निषेध केला. समाजमाध्यमावरच नव्हे तर मेनस्ट्रीम माध्यमांमध्येसुद्धा उघडपणे या घटनेचा विरोध करण्यात आला. याकडे चिकित्सक नजरेने पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, या घटनेचा निषेध एवढ्या मोठ्या प्रमाणावर होण्याचे कारण म्हणजे घटना नव्हे तर घटनेचे चित्रीकरण व समर्थन होय. या चित्रीकरणामुळे आणि आपल्या समर्थनार्थ दिलेल्या राष्ट्रवादाच्या तर्कामुळे अनेक हिंदू बांधवांना या गोष्टींची पहिल्यांदा जाणीव झाली की त्यांच्या तरूण पिढीमध्ये हिंसक विचारांची किती लागण झालेली आहे? त्यांना भीती वाटली की, ज्या राष्ट्रवादाच्या मुलाम्याखाली आज शंभुनाथ उभा आहे उद्या त्यांची आपली मुले उभी राहू शकतील. या उग्र राष्ट्रवादाने तरूण पिढीचे गुन्हेगारीकरण करण्याइतपत मजल गाठलेली आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रप्रेम निर्विवादपणे एक सकारात्मक उर्जेचे स्त्रोत आहे. ते प्रत्येक खर्‍या भारतीयामध्ये असायलाच पाहिजे, यात शंका नाही. मात्र त्याचा अतिरेक तो ही आपल्याच देशाच्या एका निरपराध नागरिकाच्या हत्येमध्ये परावर्तित होत असेल तर ही खरोखरच चिंताजनक बाब आहे.
      आतापर्यंत झालेल्या मॉबलिंचिंगच्या घटनामध्ये अनेक लोकांचा बळी गेलेला आहे. दादरीच्या अख्लाकपासून सुरू झालेली निरपराध मुस्लिमांच्या हत्येची साखळी अफराजुलपर्यंत येवून ठेपलेली आहे. या घटनाचक्रामध्ये लक्षात घेण्यासारख्या काही बाबी आहेत, त्या खालीलप्रमाणे -
1- छोट्या - छोट्या गोष्टीवर ट्विट करणार्‍या पंतप्रधानांनी अफराजुलच्या हत्येवर प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी त्यांनी अशा हत्या करणार्‍यांचा सुभाषित वजा शब्दांमध्ये गुळमुळीत निषेध जरूर केलेला आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम या कथित उग्रवाद्यांवर झालेला नाही. अल्पसंख्यांकांच्या दृष्टीकोणातून ही सर्वात दुर्देवी बाब आहे. पंतप्रधान हा देशाचा सर्वोच कार्यकारी अधिकारी असतो. त्याने घटनेची शपथ घेऊन देशातील सर्व नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वेच्छेने स्विकारलेली असते. पंतप्रधान मोदी तर उठता-बसता आपण 125 कोटी भारतीयांचे सेवक असल्याचे वारंवार सांगत असतात. अफराजुलच्या निघृण हत्येचा निषेध करणे ही पंतप्रधानांची घटनात्मक जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नाही. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अफराजुलच्या हत्येबद्दल जी भूमिका घेतली ती अधिक उठून दिसते.
2. सध्या बस अपघातामध्ये मरण पावलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळते. परंतु, मॉबलिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या एकाही मुस्लिम व्यक्तिला नुकसान भरपाई द्यावी, असा विचार सुद्धा केंद्र सरकारच्या मनामध्ये येवू नये, हे या देशाच्या मुस्लिमांचे नव्हे लोकशाहीचे दुर्देव आहे.
3. या घटनेमध्ये टोकाची भूमिका घेणारा शंभुनाथ एकटा नसून असे शेकडो तरूण तयार झालेले आहेत. यासाठी उग्र हिंदुत्ववादी विचारधारेचे समर्थन करणार्‍या संस्था आणि संघटना जेवढ्या जबाबदार आहेत तेवढ्याच जबाबदार काही वाहिन्यासुद्धा आहेत. ज्यांनी पार्श्‍वसंगीतासह अस्तित्वात नसलेल्या लव्ह जिहाद चे अस्तित्व भारतभर असल्याचे तरूणांच्या मनावर बिंबविले. त्यामुळे शंभुनाथबरोबर या वाहिन्यासुद्धा अफराजुलच्या खुनासाठी त्याच्या इतक्याच दोषी आहेत. या वाहिन्यांचा ढोंगीपणा आणि लव्हजिहादच्या प्रचारातील फोलपणा अफराजुलच्या 6 डिसेंबरला झालेल्या हत्येच्या 14 दिवसापुर्वी एका घटनेतून ठळकपणे अधोरेखित झालेला आहे. ती घटना म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी भारताचा माजी वेगवान गोलंदाज  जहीर खान व चक दे इंडिया फेम सागरीका घाटगे यांचे लग्न होय. या लग्नानंतर दिल्या गेलेल्या मेजवानीमध्ये या जोडप्याचे अनेक हिंदू मित्र मनसोक्तपणे नाचले. वाहिन्यांनी त्याचे चित्रीकरण दाखविले. वर्तमानपत्रांमध्ये कॉलमच्या कॉलम भरून या जोडप्याचे कौतुक करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालदिव येथे सुरू असलेल्या मधुचंद्राची सुद्धा इत्यंभूत माहिती माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचविली गेली. हिंदू-मुस्लिम लग्नांचा मोठा इतिहास या देशाला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे जहीर खानचे कौतुक करायचे दूसरीकडे अफराजुलसारख्या गरिबाला एकट्यात गाठून मारायचे हा शुद्ध ढोंगीपणा आहे. हे जनतेनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
4. त्या संघटना ज्यांनी तरूणांची मने कलुषित केली, गरीब अल्पसंख्यांकांविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण केली. खोटी आश्‍वासने देवून त्यांना झुलवत ठेवले. त्यांच्या मूळ समस्यांना बगल देवून त्यांना बेगड्या राष्ट्रवादामध्ये वाहवत नेले. इतके की त्यांच्यातले खुनी झाले. त्या संघटनाही शंभुनाथ बरोबर अफराजुलच्या हत्येस जबाबदार आहेत.
5. याशिवाय एक महत्वाचा मुद्दा व या हत्याकांडाचा सर्वात दुर्देवी पहेलू असा की, या हत्याकांडाला समाज माध्यमातील काही जल्पजांकडून समर्थनही मिळत आहे. केंद्र सरकार जो पक्ष सत्येत आहे त्या पक्षाने ज्या पद्धतीचे राजकारण देशात सुरू केलेले आहे, त्याचा हा परिणाम आहे.
      या घटनेनंतर मुस्लिमांकडून समाज माध्यमांवर जी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्यातही संतुलनाचा अभाव आढळून आला. इस्लामच्या शिकवणीनुसार आपण शंभुनाथ रेगरला शिक्षेची मागणी करू शकतो परंतु त्याच्याशी घृणा करू शकत नाही. प्रेषितांच्या शिकवणीत ते बसत नाही. कुरआनने एका आई आणि एका वडिलांपासून जगाचा विस्तार झाल्याचे स्पष्टपणे म्हंटलेले आहे. त्यामुळे दुरून का होईना शंभुनाथ आणि तसेच इतर मुस्लिम द्वेष्टे हे जरी वाईट वागत असले तरी ते बृहद मानवतेचे सदस्य आहेत. उम्मते वस्त म्हणून आपल्याला जशास तसे वागता येणार नाही. तसे झाले तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? मग इस्लाम शांतीचा धर्म आहे, असा दावा कसा करता येईल? प्रेषित सल्ल. आणि त्यांच्या सहाबी रजि. यांच्यावर मक्क्यामध्ये काय कमी अत्याचार झाले?
      तरी परंतु मक्का जिंकल्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी आम माफी जाहीर करून या जगाच्या अंतिम दिवसापर्यंत मुस्लिमांना हा धडा घालून दिला आहे की, हिंसेला उत्तर हिंसेने देणे इस्लामच्या शिकवणीत बसत नाही. मुळात टोकाच्या प्रतिक्रिया जे मुस्लिम व्यक्त करीत आहेत, त्यांना कुरआनच्या शिकवणीचा गंधच नाही. त्यांनी कुरआनच्या शिकवणी आत्मसात केल्या असत्या तर अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.
      एकंदरित एकतर्फी सब्र (संयम) हीच आजच्या काळाची गरज आहे. हे सब्र करत असतांना आपल्या या प्रिय देशाला व देशातील इतर समाज बांधवांना जितके प्रेम आपुलकी आणि नैतिकतेची शिकवण देता येईल, तेवढे उत्तम.

-एम. हुसैन गुरुजी
ताइफचा प्रवास
पैगंबर मुहम्मद (स.) त्यांच्या एका साथीदारास घेऊन ताइफच्या प्रवासाला रवाना झाले. ताइफची वस्ती मक्केपासून ऐंशी मैलांवर स्थितहोती. तेथील सरदारांपुढे पैगंबरांनी इस्लामचे आवाहन सादर केले. परतु ताइफवासियांनी पैगंबरांचे आवाहन स्वीकारले नाही. उलट त्यांच्यासोबत खूप वाईट वर्तन केले. त्यांनी काही दुराचारींना त्यांना त्रास देण्याकरिता लावून दिले. त्यांनी दगडांचा इतका वर्षाव केला की पैगंबर रक्तबंबाळ झाले. त्याच्या बुटांमध्ये रक्त गोठले. ही अत्यंत दु:खदायक आणि कठीण घटना होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे सगळे प्रयत्न मानवांच्या मार्गदर्शन व पथप्रदर्शन आणि त्यांना मरणोत्तर जीवनात नरकाग्नीपासून सुरक्षित राखण्यासाठी होते. लोक मात्र या गोष्टींपासून अनभिज्ञ होते. शेवटी पैगंबर मक्केस परतले.
हिजरतची घटना
मक्केत सतत तेरा वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर अल्लाहकडून एक आदेश झाला की आता मक्केहून हिजरत (स्थलांतर) करून मदीनेस प्रस्थान करावे. कारण मक्केत जीवन जगणे त्यांना अजिर्ण झाले होते. त्यांनी आपल्या सोबत्यांनादेखील मदीनेस जाण्याची आज्ञा केली. ते स्वत:सुद्धा इ. सन ६२४ मध्ये मक्का सोडून मदीनेकडे रवाना झाले. या प्रवासाला ‘हिजरत’ म्हणतात. मक्केतून हिजरतच्या रात्री मदीना रवानगीच्या प्रसंगी मक्कावासियांच्या मौल्यवान ठेवी त्यांच्याजवळ ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी त्या सुरक्षितपणे सर्व संबंधितांना परतीची व्यवस्था केली. हिजरतच्या घटनेचा तपशील खूपच ईमानवर्धक आहे परंतु येथे संक्षिप्त वर्णनास पर्याप्त समजले जात आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) मदीनेत
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीनेत शुभागमन झाले. येथे त्यांच्या अनुयायांची एक चांगली अशी विशेष संख्या अगोदरपासून उपस्थित होती. त्यांनी त्यांचीसाथ देण्याचे अभिवचन दिले. मदीनेत यहुदी धर्मीयांचीसुद्धा वसाहत होती. येथे पोहचून पैगंबरांनी इस्लामच्या संदेशास सार्वजनिक स्वरूप देण्याचा क्रम सुरू ठेवला. मदीनेत एक सवलत मिळाली की इस्लामी शिकवणीच्या प्रकाशात एक इस्लामी सोसायटी आणि क्रमश: एक इस्लामी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा मार्ग उघडला गेला. परंतु मक्केच्या विरोधकांनी त्यांना शांततापूर्वक कार्य करण्याची संधी मिळू दिली नाही. त्यांनी योजना तयार करून सैन्याची उभारणी केली आणि मदीनेवर आक्रमण करण्याचा दृढ निर्धार केला.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शांतताप्रिय आणि मनावांशी प्रेमाचे नाते एक महत्त्वपूर्ण पुराव्याची साक्ष पटविणारी ही घटना होय. मक्केत भयंकर दुष्काळ पडला होता. परंतु ते मदीनेत असल्यामुळे तिथे रक्कम गोळा करून पाचशे सुवर्ण नाणी अर्थात दीनार कुरैश सरदार अबू सुफियान यांच्याकडे पाठविले. जरी ते आणि मक्कावासी त्यांचे मोठे शत्रू होते.
मदीनेत यहुद्यांनी त्यांच्याशी समझोता केला. ही संधी शांती व धार्मिक स्वातंत्र्याची साक्ष होती. मदीनेत इस्लामी व्यवस्थेच्या प्रमुखाच्या मानाने त्यांनी दुसरा धर्म असलेल्या यहुद्यांचे मूलभूत अधिकार, त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य, त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या आदराचा समझोता केला. यास ‘मिसाक मदीना’ अर्थात ‘मदीनेचा वचननामा’ म्हणतात. तरीही यहुदी नेहमी या कराराची अवज्ञा करीत राहिले. याव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी कटकारस्थानांच्या माध्यमातून मुहम्मद (स.) व त्यांच्या सोबत्यांविरूद्ध युद्धक योजना बनविल्या.
मदीना वास्तव्याच्या काळात पैगंबर मुहम्मद (स.) यांना मक्का व भोवतालच्या जनजाती आणि यहुद्यांशी लहान मोठी युद्धे करावी लागली. त्यांची संख्या ८२ आहे. यात २७ युद्धांत मुहम्मद (स.) स्वत: सहभागी झाले होते. या युद्धांत दोन्ही बाजूंकडील ठार होणाऱ्यांची संख्या १०१८ आणि अटक होणाऱ्याची संख्या ६५६५ आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी युद्धाचा उद्देश व पद्धतींना आपल्या नैतिक शिकवणींद्वारे मानवी व रचनात्मक स्वरूप व दिशा दिली. समस्त मानवी इतिहासात याचे एखादे उदाहरण आम्हास आढळत नाही. पैगंबरांनी आपल्या सोबत्यांना युद्धाच्या बाबतीत दिलेल्यासूचना व मार्गदशनावर सर्वांनी मानवतावादी दृष्टिोकनातून अवश्य विचार करावा.
प्रतिज्ञाभंग करू नये. शत्रूचे नाक, कान व अन्य अवयव कापू नये. स्त्रिया, निर्बल व अल्पवयस्क, वृद्ध व गुलामांना ठार मारू नये. शेतीवाडीचा सर्वनाश करू नये. फळे असलेले वृक्ष कापू नये आणि पशुंची हत्या करू नये. प्रतिनिधी, राजदूत यांची हत्या करू नये. प्रार्थनागृहांना उद्ध्वस्त करू नये. जे शस्त्रे टाकतील त्यांना ठार करू नये. रात्रीत एखाद्या शत्रूच्या जवळ गेला तर सकाळ होण्यापूर्वी छापा मारू नये.
या युद्धांत मक्का विजय सोडून उर्वरित युद्धांत त्यांनी स्वत:हून प्रथम वार कधी केला नाही. किंबहुना आपल्या व मदीनेच्या रहिवाशांच्या बचावासाठी युद्ध केले गेले. एका प्रसंगी झालेल्या हुदैबियाच्या तहाची घटना सर्वश्रुत व अत्यंत प्रसिद्ध आहे. ते या समझोत्यात अशा शर्ती मान्य करण्यास तयार झाले, ज्यात उघडपणे मुस्लिमांचा अशक्तपणा प्कट होतहोता. या आधारावर त्यांच्या अनुयायी सोबत्यांना हा तह नापसंत वाटत होता. याची एक अट अशी होती की उभयपक्षी परस्परांत दहा वर्षांपर्यंत युद्ध करणार नाहीत. ही महत्त्वपूर्ण अट त्यांच्या शांतताप्रियतेचा सबळ पुरावा होय. मदीनेत सततच्या प्रयत्नांच्या परिणास्वरूप मोठ्या संख्येने लोकांनी इस्लाम स्वीकार केला. येथपर्यंत की पैगंबर दहा हजारांचे सैन्य घेऊन मक्केस रवाना झाले.
मक्का विजय
जगाच्या इतिहासातील ही अद्भूत व अद्वितीय घटना आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवांचे रक्त सांडल्याविना मक्केवर विजय संपादन केला. त्यांनी यासाठी उत्कृष्ट वूâटनीतीचा अवलंब केला. काही मनुष्यप्राणी अवश्य मृत्यूमुखी पडले. परंतु व्यवस्थीतपणे कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची स्थिती उद्भवली नाही आणि ते मक्केत विजेता म्हणून प्रविष्ट झाले. या वेळी त्यांच्या जिभेवर अल्लाहची प्रशंसा व माहात्म्य सुरू होते. उंटावर स्वार पैगंबरांचे डोके विनम्रतेने झुकलेले होते. या प्रसंगी त्यांच्याकडून खाली दिलेल्या उद्घोषणा करण्यात आल्या.
जी व्यक्ती काबागृहात प्रवेश करील त्यास शरण आहे. जो मनुष्य आपल्या घरात दरवाजा बंद करील त्याला शरण आहे. जो कोणी शस्त्रे टाकील त्यास शरण आहे. पळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग केला जाऊ नये आणि जखमी व वैâद्यास ठार मारू नये.
विचार करा की मक्केवर कसे आक्रमण झाले! मक्का अशा तऱ्हेने जिंकला गेला की यात अजिबात रक्तपात झाला नाही. विश्वकरुणासूर्य मुहम्मद (स.) यांचे हे खूप मोठे उदाहरण होय. मक्का विजयाच्या प्रसंगी मोठमोठे सरदार पराभूत मनोवृत्तीने उपस्थित होते.ज्यांनी त्याच्यावर आणि त्याच्या सोबत्यांवर अनन्वीत व अमर्याद अत्याचार व जुलूम केले होते, निरपराध लोकांना ठार मारण्यात आले होते. निवासस्थाने व मालमत्तेवर ताबा ताबा मिळविण्यात आला होता. प्रचंड लूटमार केली होती. हे सगळे युद्धक अपराधी होते. जर त्यांना ठार करण्याचा त्यांनी आदेश दिला असता तरी कोणत्याही कायद्यान्वये ते चुकीचे ठरले नसते. सरदारांना त्याच्या समोर सादर केले गेले. ते सगळे माना खाली घालून उभे होते. या वेळी पैगंबरांनी हे ऐतिहासिक विधान फरमाविले,
‘‘जा, आज तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. आज तुमच्यावर कोणतीही पकड नाही!’’
मानवतेच्या इतिहासात असे एखादे उदाहरण उपलब्ध आहे काय?
मृत्यू
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे दु:खद निधन इ. सन ६३४ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी झाले. त्यांनी कोणतेही सामान आपल्या वारसात सोडले नाही. मृत्यूसमयी त्यांच्या वाचेतून हे शब्द निघाले : नमाज, नमाज, सेविका आणि गुलाम!
आम्ही कितीतरी धार्मिक नेत्यांना पाहत असत की ते कोट्यवधींच्या मिळकतीचे मालक होत असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वारसामध्ये कोणतीही उल्लेखनीय वस्तू नव्हती.
(उत्तरार्ध)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येक मनुष्य रक्षक व देखरेख करणारा आहे आणि त्याला त्या लोकांच्या बाबतीत विचारले जाईल जे त्याच्या देखरेखीत दिले गेले आहेत. नेता (अमीर) ज्या लोकांचा संरक्षक आहे त्याला त्याच्या जनतेच्या बाबतीत विचारणा होईल, आणि पुरुष आपल्या कुटुंबियांचा पालक आहे, तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीत विचारले जाईल आणि पत्नी आपल्या पतीच्या संततीची पालक आहे आणि तिला मुलाबाळांच्या बाबतीत विचारणा होईल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘पालक विंâवा देखरेख ठेवणारा आहे’ म्हणजे त्यांचे प्रशिक्षण व विकासाला जबाबदार आहे. त्याची ही जबाबदारी आहे की त्यांना योग्य स्थितीत ठेवणे आणि बिघडू देऊ नये. जर त्यांचे प्रशिक्षण व सुधारणेकडे लक्ष देत नाही, त्यांना बिघडण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला अल्लाह निवाड्याच्या दिवशी विचारणा करील.
    माननीय मअकिल बिन यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे, ‘‘जो मनुष्य मुस्लिमांच्या जमाअतचा नेता आहे आणि तो त्यांच्याशी अप्रामाणिक राहात असेल तर अल्लाह त्याला स्वर्ग निषिद्ध करील. (हदीस : मुत्तफक अलैहि)
    माननीय मअकल बिन यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने मुस्लिमांच्या जमाअतची जबाबदारी स्वीकारली, मग तो त्यांच्याशी अप्रामाणिक राहिला आणि त्यांची कामे करण्यासाठी स्वत:ला झोवूâन दिले नाही जसे तो स्वत:ची कामे करतो, तर अल्लाह त्या मनुष्याला तोंडघशी नरकात ढकलून देईल.’’ इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, ‘‘मग त्यांचे रक्षण अशा पद्धतीने केले नाही जसे तो स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करीत होता.’’ (हदीस : तिबरानी, किताबुल खिराज)
    माननीय यजीद बिन अबू सुफियान (रजि.) यांच्या कथनानुसार, जेव्हा माननीय अबू बकर (रजि.) यांनी मला सरदार बनवून शाम (मिस्र) कडे पाठविले तेव्हा पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले, ‘‘हे यजीद, तुमचे काही नातेवाईक आहेत, कदाचित तुम्ही जबाबदाऱ्या सोपविताना त्यांना प्राधान्य द्याल, याची सर्वांत जास्त भीती मला तुमच्याकडून आहे.’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर एखाद्याला मुस्लिमांच्या सार्वजनिक कामांची जबाबदार सोपविण्यात आली असेल तर त्याने मुस्लिमांना कोणावर शासन करणारा बनविले, म्हणजे फक्त नातेवाईक अथवा मैत्रीमुळे, तर त्याच्यावर अल्लाहचा कोप असेल. अल्लाह त्याच्याकडून कोणतेही दान स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर त्याला नरकात टाकले जाईल.’’ (हदीस : किताबुल खिराज, इमाम अबू यूसुफ)
    माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय अबू बकर (रजि.) यांनी माननीय उमर (रजि.) यांना सांगितले, ‘‘हे खत्ताबच्या पुत्रा! मी मुस्लिमांवरील प्रेमापोटी तुम्हाला खलीफा निवडले आहे आणि तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर राहिला आहात. तुम्ही पाहिले आहे की पैगंबर कशाप्रकारे आम्हाला आमच्या वर आणि आमच्या कुटुंबियांना आपल्या कुटुंबियांच्या वर प्राधान्य देत होते. इतकेच काय आम्हाला जे काही पैगंबरांकडून मिळत होते त्यातून जे काही उरत होते ते आम्ही पैगंबरांच्या कुटुंबियांना भेट म्हणून पाठवून देत होतो.’’ (हदीस : किताबुल खिराज, इमाम अबू यूसुफ)
    माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांनी (प्रजा व शासनाचे अधिकारी लोक उपस्थित असलेल्या एका सभेत) भाषण करताना म्हटले, ‘‘हे लोकहो! आमचा तुमच्यावर अधिकार आहे की आमच्या मागे आमचे शुभचिंतक बनून राहा आणि सत्कार्यात आमची मदत करा. (मग म्हणाले,) हे शासनाच्या अधिकाऱ्यांनो! अमीरची (नेतृत्वाची) महत्ता आणि त्याच्या सहनशीलतेपेक्षा अधिक फायदा देणारी आणि अल्लाहला आवडणारी दुसरी कोणतीही महत्ता नाही. त्याचप्रमाणे अमीरचे भावनाविवशता आणि अभद्र काम करण्यापेक्षा अधिक नुकसानकारक व वैरी दुसरी कोणतीही भावनाविवशता व अभद्रता नाही. (हदीस : किताबुल खिराज, इमाम अबू यूसुफ)
    माननीय इब्नि उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिमांनी सार्वनिक कामांच्या अधिकाऱ्यांचे आदेश ऐकणे आणि मान्य करणे आवश्यक आहे. मग तो आदेश तुम्हाला पसंत असो वा नसो. मात्र तो जर अल्लाहची अवज्ञा करणारा आदेश नसावा आणि जेव्हा त्याला अल्लाहच्या अवज्ञेचा आदेश दिला जाईल तेव्हा तो आदेश ऐकून घेऊ नये अथवा मानू नये.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)

(२५५) ....याव्यतिरिक्त की एखाद्या गोष्टीचे ज्ञान तो स्वत:च त्यांना देऊ इच्छित असेल.२८२ त्याचे राज्य२८३ आकाश आणि पृथ्वीवर पसरले आहे, आणि त्यांचे संरक्षण काही त्याला थकवून सोडणारे काम नव्हे. फक्त तोच एकटा महान व सर्वश्रेष्ठ सत्ताधीश आहे.२८४  (२५६) धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही.२८५

282) या वास्तविकतेला दाखवून दिल्‌यानंतर अनेकेश्वरत्वाच्या आधारांवर आणखी एक प्रहार पडतो. वरील वाःयात अल्लाहच्या असीम सम्प्रभुत्व आणि अपार अधिकारांचा विचार समोर आणून स्पष्ट केले आहे की त्याच्या साम्राज्यात कोणी भागीदार नाही. कुणाचाही त्याच्याजवळ जोर चालतच नाही जेणेकरून तो आपल्‌या शिफारसींनी अल्लाहचे निर्णय प्रभावित करील. आता दुसऱ्या दृष्टीने हे स्पष्ट केले जात आहे की दुसरा कोणी त्याच्या कामात हस्तक्षेप कसा करू शकेल? जेव्हा दुसऱ्यांकडे हे ज्ञान मुळातच उपलब्ध नाही ज्यामुळे तो या सृष्टी व्यवस्थेला आणि तिच्या अपेक्षा आणि हिताला समजू शकतो. मनुष्य असो की जिन्न व निर्मित किंवा ईशदूत सर्वांचे ज्ञान अपूर्ण व मर्यादित आहे. सृष्टीच्या समस्त वास्तविकतांवर कोणाचीही नजर आच्‌छादित नाही. एखाद्या लहानशा भागावर जरी दासांपैकी एखाद्याचा स्वतंत्र हस्तक्षेप किंवा शिफारस शक्य झाली तर तमाम सृष्टीची व्यवस्था कोलमडून पडेल. सृष्टीची व्यवस्था तर दूरची गोष्ट आहे दास तर आपल्‌या स्वत:च्या अपेक्षा आणि हितांना समजू शकत नाही. दासांच्या अपेक्षांनासुद्धा सृष्टीनिर्माता पूर्णत: जाणून आहे. दासांसाठी तर याशिवाय दुसरा मार्ग नाही की त्या अल्लाहच्या मार्गदर्शनावर आणि शिकवणींवर भरोसा करावा जो ज्ञानाचा मूळ स्त्रोत आहे.
283) मूळ अरबी शब्‌द "कुर्स' आला आहे ज्याला सर्व साधारणत: सत्ता आणि शासनासाठी उपयोगात आणला जातो. उर्दू, हिंदी आणि मराठी भाषेतसुद्धा कुर्स (खुर्च) म्हणून शासनाधिकार (सत्ता) समजले जाते.
284) ही आयत "आयतुल कुर्स'च्या नावाने प्रसिद्ध आहे. यात अल्लाहची परिपूर्ण व वैशिष्टपूर्ण ओळख करून देण्यात आली आहे. असे उदाहरण कुठे सापडत नाही. म्हणूनच हदीसमध्ये या आयतीस कुरआनची सर्वश्रेष्ठ आयत म्हटले गेले आहे. येथे हा प्रश्न निर्माण होतो की अल्लाहचे अस्तित्व व गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख कोणत्या संदर्भात झाला आहे?  याला समजण्यासाठी पुन्हा त्या व्याख्यानावर नजर टाकली पाहिजे जे आयत नं. 243 पासून चालत आले आहे. प्रथमत: मुस्लिमांना सच्‌च्या (सत्य) जीवनधर्मावर (दीन) चालून सत्य जीवनव्यवस्था जगात कायम (स्थापित) करण्यासाठीच्या मार्गात तनमन-धनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. आणि त्या कमतरतेपासून सुरक्षित राहण्याची ताकीद करण्यात आली ज्यांचे भक्ष बनीइस्राईल बनले होते. नंतर या वास्तविकतेकडे निर्देश करून समजाविण्यात आले आहे की यश आणि सफलतेचा आधार संख्या आणि साधनसामुग्रीवर व त्यांच्या अधिकतेवर अवलंबून नसतो तर ईमान, धैर्य, अनुशासन आणि दृढनिश्चयाच्या आधारावर यश अवलंबून आहे. युद्धासोबत अल्लाहची जी तत्वदर्शिता जुडलेली आहे त्याकडे संकेत केला आहे. सृष्टी व्यवस्था सुचारु पद्धतीने सतत चालत राहाण्यासाठी अल्लाह सतत एका गटाला दुसऱ्या गटाद्वारा हटवित राहातो. नाहीतर एकच गटाला कायमस्वरुपी सत्ता व अधिकार प्राप्त झाले असते तर दुसऱ्यांसाठी जगणेसुद्धा अशःय बनले असते. नंतर या शंकेला दूर करण्यात आले की अल्लाहने आपले पैगंबर मतभेद मिटविण्यासाठी आणि संघर्षाचे द्वार बंद करण्यासाठीच पाठविले. त्यांच्या आगमनानंतरसुद्धा विरोध आणि मतभेद मिटले नाही की संघर्ष समाप्त होऊ शकले नाहीत. कारण या मतभेदांना ताकदीने रोखणे आणि मानवजातीला एका विशिष्ट मार्गावर जबरदस्तीने चालवणे, अल्लाहचा शिरस्ता नाही. तसे पाहता मनुष्याची काय बिशाद होती की अल्लाहच्या इच्‌छेविरुद्ध वागला असता. नंतर एका वाक्यात त्यामुळे विषयाकडे संकेत केला गेला. ज्यापासून भाषणाचा प्रारंभ झाला होता. यानंतर सांगितले जात आहे की माणसांची विचारसरणी, धारणा,पंथ आणि धर्म जरी वेगवेगळे आहेत, परंतु सत्य ज्यावर जमीन आणि आकाशाची व्यवस्था आधारित आहे; त्याचा येथे उल्लेख आला आहे. मनुष्यांच्या गैरसमजूतींमुळे कणभराचासुद्धा त्यात फरक होत नाही. माणसांना जबरदस्तीने मानण्यास मजबूर करणे अल्लाहला आवडत नाही. जो त्याला मानेल तो स्वयमही लाभान्वित होईल आणि जो कोणी त्याच्याशी विमुख होईल तर स्वत: नुकसानीत राहील.
285) म्हणजे कोणालाही ईमान (श्रद्धा) आणण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही. येथे "दीन' म्हणजे अल्लाहसंबंधी ती धारणा आहे जी वर "आयतुल कुर्स'मध्ये वर्णित झाली आहे. "दीन' म्हणजे जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था जी या धारणेपासून निर्मित आहे. आयतीचा अर्थ असा आहे की इस्लामच्या या धारणासंबंधी नैतिक आणि व्यावहारिक व्यवस्थेला कोणावर बळजबरीने थोपले जाऊ शकत नाही. अल्लाहने जगाला दिलेली ही देणगी परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे जिला बळपूर्वक लागू केली जाऊ शकत नाही.

    जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत तेल अवीवला इस्राईलची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता होती. ट्रम्प प्रशासनाने आता आपले दूतावास तेल अवीववरून जेरूसलेमला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे जगातील मुस्लिमांना चिथावणी देण्याचाच हा प्रकार आहे. संपूर्ण इस्राईल हे पॅलेस्टाईनची जमीन लष्करी बळावर बळकावून निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी मूलनिवासींना हुसकाविण्यात आले आणि त्यांच्या प्रदेशावर जगाच्या कानाकोपऱ्यातून यहुद्यांना (ज्यू लोक) आणून वसविण्यात आले. मुस्लिम राष्ट्रांची इस्राईलला मान्यता नाही.मात्र अमेरिका व त्याच्या पाश्चात्य मित्रांनी इस्राईलला मदत आहे. त्यांच्या बळावरच इस्राईल इतका फोफावला आणि शक्तिशाली झाला आहे. पॅलिस्टिीनींना जेरूसलेम त्याची राजधानी हवी आहे. गाझापट्टी आणि कोस्टबँक इतकाच प्रदेश आता पॅलेस्टाईनसाठी उरला असून बाकीच्या सर्व भागावर इस्राईलने कब्जा केलेला आहे. जेरूसलेममध्ये मुस्लिमांचे तृतीय पवित्र स्थान मस्जिदे अक्सा आहे. जेथे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मेराजच्या दिव्ययात्रेत सर्व पैगंबरांचे नेतृत्व करीत नमाजचे पठण केलेले होते. ते पवित्रस्थान सध्या इस्राईलच्या ताब्यात आहे. इस्राईलच्या या जुलमापायी व अमेरिका नि पाश्चात्यांची त्याला साथ असल्यामुळे जगात मुस्लिम बंडखोरांची संख्या वाढत आहे. आता ही बंडखोरी (तथाकथित दहशतवाद) संपणार नाही. जो कोणी इस्राईलला साथ देईल तो मुस्लिम बंडखोरीचा शत्रू गृहीत धरला जाईल. जगात तिसरे महायुद्ध यामुळेच भडकणार आहे. हा वाद जर मिटला नाही तर बंडखोरी मिटणारच नाही, हे साधे गणित अमेरिका, रशिया व पाश्चिमात्यांना कळू नये, याचे आश्चर्य वाटते!                      
- निसार मोमीन, पुणे.


दोन दशकांहून अधिक काळापासून गुजरातवर भाजपची मजबूत पकड असली तरी या वेळी त्याचा प्रभाव कमी झाल्याचे जाणवते. राज्यातील आपापल्या समुदायांचे नेतृत्व करणारे तीन युवा चेहरे हे यामागचे मुख्य कारण होय. हार्दिक पटेल – पाटिदार समुदाय, अल्पेश ठाकूर – मागासवर्गीय समुदाय आणि जिग्नेश मेवानी – दलित समुदाय. या तिघांनी गुजरातच्या राजकारणाचे वातावरणच ढवळून काढले आहे. परंतु या सर्वांच्या दरम्यान आणखी एक समुदाय आहे जो कदाचित गुजरातमधील अन्य सर्व समुदायांपेक्षा अधिक पीडित आहे तो म्हणजे मुस्लिम समुदाय. इ. सन २०१२ मध्ये ‘सेंटर फॉर रिसर्च अ‍ॅण्ड डिबेट्स इन डेव्हलपमेंट पॉलिसी’द्वारा अबू साहेल शरीफ आणि बी. एल. जोशी यांनी केलेल्या अध्ययनानुसार, ‘‘उच्च वर्गातील हिंदूंच्या तुलनेत शहरी मुस्लिमांमध्ये ५० टक्के गरीबी अधिक आहे, तर ग्रामीण मुस्लिमांमध्ये उच्च वर्गातील हिंदूच्या तुलनेत २०० टक्के अधिक गरीबी आहे.’’ गुजरातच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुस्लिम १० टक्के आहेत. यापैकी सुमारे ६० टक्के शहरात राहतात. काही काळापूर्वी राज्याच्या उत्पादन व संघटित क्षेत्रात या समुदायाची मोठी शक्ती होती. राज्यात या समुदायाचे १३ टक्के कामगार होते. आज जवळपास ५३ टक्के मुस्लिम स्वत:चा वैयक्तिक रोजगार करतात अथवा तुटपुंज्या मजुरीवर काम करतात. त्यामुळे त्यांच्या मिळकतीत फारशी वाढ झालेली नाही. राज्यात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या दलितांपेक्षा थोडी अधिक आणि पटेलांपेक्षा थोडी कमी आहे म्हणजे यांच्याकडे आपले आंदोलन उभे करण्याचे आणि दबावसमूह बनविण्याचे पर्याप्त संख्याबळ असूनदेखील आजतागायत असे काही घडलेले नाही अथवा या समुदायादरम्यान हार्दिक, अल्पेश, जिग्नेशसारखा एखादा नेता उदयास आलेला नाही. मुस्लिम समाजात समृद्ध व्यापारीवर्ग भयग्रस्त असल्यामुळे एखादे आंदोलन उभे करण्यासाठी पाठबळ देण्याच्या मन:स्थितीत नाही. ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली’ या इंग्रजी नियतकालिकात अभिरूप सरकार यांनी अनिर्बान मित्रा व देबराज राय या दोन अभ्यासकांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की इ. सन १९८४ ते १९९८ दरम्यान संपूर्ण देशामध्ये झालेल्या अनेक दंगलींमध्ये सुमारे १५,२२४ लोक ठार झाले. यापैकी ३० टक्के गुजरातमधील होते. इतकेच नव्हे तर या कालावधीत मुस्लिमांमध्ये प्रतिव्यक्ती खर्च करण्याच्या क्षमतेत झालेल्या वाढीबरोबर हिंदू-मुस्लिम संघर्षदेखील वाढ झाली. यावरून हेच स्पष्ट होते की मुस्लिमांच्या समृद्धतेमुळेसुद्धा त्यांना दंगलीं (इ. सन २००२) मध्ये लक्ष्य बनविले गेले. आपल्या संपत्तीला लुटण्यापासून आणि कुटुंबाला हल्ल्यापासून वाचविण्यासाठी श्रीमंत मुस्लिम कुटुंबांनी (विशेषता इ. सन १९६९ व १९८५ च्या दंगलींमध्ये) आपल्या समुदायाच्या वस्तीकडे पलायन केले. नंतर इ. सन १९८९ ते १९९२ पर्यंत भाजपच्या राम मंदिर आंदोलनादरम्यान समुदायाचे हे वस्तीकरण संपूर्ण गुजरातमध्ये पाहायला मिळाले आणि इ. सन २००२ मधील दंगलींच्या वेळी ते जवळजवळ पूर्ण झाले. म्हणजे पूर्णत: आपल्या वस्तीमध्ये येऊन एकवटले. त्यामुळे मुस्लिम सार्वजनिक मंचांपासून वंचित झाले. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की बदलत्या भारतात मुस्लिम तरुण आपल्या वस्तीतून बाहेर पडू इच्छित नाहीत. कसलीही राजकीय इच्छाशक्ती आढळत नाही. शमशाद पठाण आमि मुजाहिद नफीस यांच्यासारख्या उभरत्या मुस्लिम युवा नेतृत्वाने पुढे येण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याकडे भारतीय मीडियाने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव जाणवत नाही. अशाच काही मुस्लिम तरुणांनी सामाजिक कार्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न केला असता प्रशासन, पोलीस, आयबी आणि ‘गुजरात अशांत क्षेत्र अधिनियम’ यासारखे अडथळे आ वासून उभे ठाकलेले आहेत. राज्यात अनेक क्षेत्रांना ‘अशांत’ घोषित करण्यात आले आहे म्हणजे ते सांप्रदायिकरित्या संवेदनशील समजले जातात. अहमदाबादचा सुमारे ४० टक्के भाग ‘अशांत क्षेत्र’ समजला जातो. या विभागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा खरेदीविक्रीचा व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. हा कायदा सर्वप्रथम माधवसिंग सोळंकी यांच्या सरकारमध्ये अध्यादेशाच्या स्वरूपात बनविण्यात आला. मग इ. सन १९९१ मध्ये विधानसभेतदेखील पारित करण्यात आला. हा कायदा मुस्लिमांच्या डोक्यावर तलवारीसारखे लोंबकळत असतो, असे म्हटले जाते. विशेषत: राजकीयदृष्ट्या सक्रिय असणारे मुस्लिम या कायद्यामुळे प्रभावित झालेले आहेत. या कायद्याने मुस्लिम नागरिकांना सरकारवर अवलंबून राहण्यास विवश केले आहे आणि त्यांच्या दरम्यान नवीन नेतृत्व निर्माण होण्याची शक्यतेवर आघात केला आहे. त्यामुळे मुस्लिम नेतृत्व उदयास येण्यास आपोआपच आळा बसला.

-एम. हुसैन गुरुजी
पैगंबर मुहम्मद (स.) इ. सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का   नगरीत जन्मले. त्यांच्या जन्मनाच्या काही वर्षांपूर्वी त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले होते. जन्माच्या सहा वर्षांनंतर माता आमिनासुद्धा निवर्तल्या. अशा प्रकारे ते बालपणातच अनाथ झाले. त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलीब यांनी केले. त्यांच्या देहावसानापश्चात त्यांचे काका अबू तालीब यांनी त्यांचे पालनपोषण केले.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाच्या भविष्यवाणी अनेक धार्मिक ग्रंथांत स्पष्टपणे आढळून येतात. त्यात वेद, पुराण, तौरेत, बायबल आणि बुद्ध लिखित ग्रंथाची पृष्ठे आदींचा समावेश आहे. जरी या ग्रंथाची पुरेपूर सुरक्षितता होऊ शकलेली नाही. यामध्ये पुष्कळ सारे परिवर्तन स्वत: या ग्रंथांच्या अनुयायांनी केले. परंतु याच्याव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शुभागमनाची भविष्यवाणी व लक्षणे अंकीत आहेत. या सगळ्या गोष्टी शंभर टक्के केवळ आणि केवळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी निगडीत विश्वासपात्र आहेत.
वेदांमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांना नराशंस, पुराणात कल्की अवतार, बायबलमध्ये फारक्लीत आणि बौद्ध ग्रंथात अंतिम बुद्ध म्हटले गेले आहे. त्यांची दुसरी विशेषता ही आहे की इतिहासाच्या संपूर्ण उजेडात ते आले आहेत. अर्थात त्यांच्या जन्मापासून बालपण, तारुण्य, प्रेषित्वाच्या पदावर नियुक्ती आणि पैगंबर बनविल्यानंतर तेवीस वर्षांच्या प्रेषित्वाच्या जीवनाचा सर्व तपशील (यात इ. सन ६३४ मध्ये झालेल्या मृत्यूपर्यंत) प्रमाणित माध्यमातून अभिलेख करण्यात आलेला आहे. आज सुमारे साडे चौदाशे वर्षे झालेली आहेत. परंतु त्यांच्या २४ तासांच्या दैनंदिन जीवनाची उपक्रमशीलता सुरक्षित आहेत.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्टपणे फरमाविले की ‘‘मी कोणताही नवा संदेश आणि नवा धर्म घेऊन आलेलो नाही.’’ किंबहुना अल्लाहच्या मागील पैगंबर व प्रेषितांनी जो संदेश व शिकवणी ईश्वराकडून सादर केल्या होत्या, त्याच त्यांनी समस्त मानवांसमोर सादर केलेल्या आहेत. अशा तऱ्हेने ते इस्लामचे संस्थापकदेखील नाहीत. कारण इस्लाम ईश्वराकडून आहे. यावरून हे स्पष्ट होते की मुहम्मद (स.) अल्लाहचे अवतार नव्हते किंबहुना मानव अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहेत.
बालपण व तारुण्य
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे बालपण त्याकाळातील सर्व प्रकारच्या अनिष्टतेपासून अगदी विशुद्ध व निर्मल होते. ते बाल्यावस्थेतच अनाथ झाले होते. ते नेहमी सत्य बोलत असत. कधी खोटे बोलले नाहीत. त्यांच्या स्वभावात लज्जा व संकोच ठासून भरलेला होता. पावित्र्य व निर्मलता त्यांना अत्यंत प्रिय होती. त्यांचे व्यवहार असे खरे होते की ज्या लोकांनीसुद्धा त्यांच्यासोबत व्यापार व प्रवास केला, त्यांनी सदैव त्यांची स्तुतीच वर्णन केली. कोणी क्षूद्र श्रेणीची तक्रारदेखील केली नाही. त्यांचे जीवन अतिशय साधे, सरळ आणि स्वाभिमानी होते. एखादा मानव याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यांचे निवासस्थान, पोषाख, राहणीमान, खाण्यापिण्याचा सर्व तपशील पुस्तकांमध्ये आलेला आहे.
त्यांच्या अंतरंगात स्वत:च्या जातीसाठी बदला घेण्याची भावना आढळून येत नसे. ते खूप क्षमा करणारे होते. कधी एखाद्या गुलाम, सेविका, बालके किंवा स्त्रीला त्यांनी मारले नाही. ते निर्बल, गुलाम व अनाथ बालकांवर खूप प्रेम करीत असत. ते सदैव पशुपक्ष्यांवर दया व वात्सल्याने वर्तन करीत आणि दुसऱ्यांनादेखील यासाठी खूप आग्रह करीत असत. ते वचनाचे दृढनिश्चयी, खूप पाहुणचार, आदरातिथ्य आणि शेजाऱ्यांशी सद्वर्तन करीत असत. दासांच्या अधिकारांचा खूप अधिक विचार ठेवत असत. अरब समाजात मूर्तिपूजा आम होती. त्याच्याशिवाय मोठमोठ्या अनिष्ठता सामान्यपणे आढळून येतसोत्या. परंतु लोक यांना दूषित समजत नसत. उदा. मदिरा, जुगार, व्यभिचार, निर्लज्जता, खून, लूटमार, विनाशकारी कार्ये आणि बालिकांना जिवंत दफन करणे इत्यादी या सगळ्या वाईटपणापासून ते नेहमी अलिप्त व शुद्ध राहिले.
त्यांनी व्यापार केला आणि स्वत:च्या प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेच्या आधारावर खूप यशस्वी ठरले. पंचवीस वर्षांच्या वयात हजरत खदीजा (रजि.) नामक महिलेसोबत विवाह केला. त्या दोनदा विधवा झालेल्याहोत्या. निकाहच्या वेळी त्यांचे वय चाळीस वर्षे होते. यांच्यापासून त्यांना काही अपत्येसुद्धा झाली. ज्यांत तीन सुपुत्र व चार सुकन्यांचा समावेश होता. तिन्ही सुपुत्र बालपणातच वारले. ते चाळीस वर्षांच्या वयात प्रविष्ठ झाले. तेव्हा मक्केत सत्यवान व विश्वस्त म्हणून प्रसिद्ध झाले होते. गरीब, विधवा, अनाथ, वाटसरू यांच्यासोबत ते शुद्ध हृदयता व प्रेमाची वागणूक करीत आणि त्यांच्या गरजांची सदैव परिपूर्तता करीत असत.
त्यांना अशांती, उपद्रव, जुलूम आणि अत्याचाराचा खूप तिटकारा होता. विवेक सांभाळताच त्यांनी सामाजिक व लौकिक जीवनास जवळून पाहिले. आपल्या जातीतील विकृती व बिघाडास पाहून ते फार दु:खी व शोकाकुल झाले. काबागृह एक ईश्वराच्या उपासनेचे घर आणि भक्तीसाठी बनविले गेले होते. परंतु लोकांनी यात ३६० मूर्ती आणून ठेवल्या होत्या. अरबमध्ये कबिले व टोळ्यांचे जीवन सर्वत्र आढळून येत असे. प्रत्येक जातीचे दैवत भिन्न भिन्न होते. विवाहपश्चात ते मक्केपासून काही अंतरावर एका पर्वतावर हिरा नामक गुफेत विराजमान होऊन एकांतमध्ये विचार चिंतन करीत असत. त्यांच्या समाजात काही मोठ्या मानवी सुशीलतादेखील आढळून येत होत्या. परंतु यामध्ये उल्लेखित घातक बिघाड उत्पन्न झाले होते. संपूर्ण समनाजात जुलूम, अत्याचार व अशांतता आम होती. बलवान निर्बलास दाबून ठेवित असे. न्यायनिवाडा समाप्त झाला होता.
अशा अवस्थेत ईश्वराकडून जिब्रिल नावाचे ईशदूत आले आणि मुहम्मद (स.) यांना दर्शविले की तुम्हाला अल्लाहने पैगंबर बनविले आहे. आपण केवळ अरब देशच नव्हे किंबहुना जगाच्या सकल मानवांचे प्रेषित बनविले गेले आहात.
या भारदस्त व कठीण उत्तरदायित्वाच्या अकस्मात ओझ्यामुळे स्वाभाविकपणे ते भयग्रस्त झाले. घरी परतले. धर्मपत्नी खदीजा (रजि.) यांना संपूर्ण वृत्तान्त कथन केला. तिने सांत्वना दिली की अल्लाह तुम्हाला व्यर्थ घालविणार नाही. आपण सदैव सत्य बोलता.
आप्तस्वकीयांसोबत सद्वर्तन करता. भुकेल्यांना जेऊ घालता. पाहुणचार करता. गरीब व असहाय लोकांची मदत करता. पत्नी आपल्या पतीची दुसऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक रहस्य जाणणारी असते. खदीजा (रजि.) यांची ही साक्ष मुहम्मद (स.) यांच्या सत्यतेचा फार मोठा पुरावा होय.
हिरा गुफेतून मक्का येथे परतल्यावर ते पुन:श्च एकांतात गेले नाहीत. येथे कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की मुहम्मद (स.) पैगंबर बनण्याची तयारी करती होते. वास्तविक प्रेषित्व व पैगंबरी ही श्रम व पराकाष्ठा करून प्राप्त करण्याची वस्तू नाही. अल्लाह आपल्या दासांपैकी एखाद्या विशेष दासाला स्वत: निर्वाचित करून पैगंबर बनवित असतो. त्याच्याद्वारे मानवाचे मार्गदर्शन व पथप्रदर्शनाचा मार्ग लाभत असतो. त्याचे व्यावहारिक जीवन लोकांना अल्लाहच्या मर्जीनुसार वाटचाल करण्याचा मार्ग प्रशस्त करीत असतो. अशा प्रकारे मुहम्मद (स.) प्रेषित्व परंपरेतील अंतिम प्रेषित आहेत. हा गैरसमज व्हावयास नको की ते केवळ समाजसुधारक होते. अशा तऱ्हेने त्यांची स्थिती एखाद्या संत किंवा पीरासारखी नव्हती. ते खरे तर अल्लाहचे पैगंबर होते. या भानाने अल्लाहच्या दासांपर्यंत संदेश पोहचविण्याचे कार्य ईश्वराची आज्ञा व पथप्रदर्शनानुसार पार पडत असते. केवळ २३ वर्षांच्या संक्षिप्त जीवनकाळात त्यांनी आपल्या प्रेषित्वाच्या अंतर्दृष्टी व नेतृत्वाद्वारे संपूर्ण अरब देशात एक समग्र क्रांती प्रस्थापित केली आणि उत्कृष्ट मानवांचे एक मोठे संघटन तयार केले.
आवाहनाचा प्रारंभ
पैगंबर नियुक्त केल्यानंतरक त्यांनी मक्केत त्या काळातील प्रथेनुसार सफाच्या पर्वतावर चढून लोकांना एकत्र होण्यासाठी साद घातली. लोक मोठ्या प्रमाणावर जमले. प्रथम त्यांनी लोकांना पृच्छा केली, त्याच्याविषयी ते काय मत बाळगतात? लोक उत्तरले, आपण नेहमी सत्यवान व विश्वस्त मनुष्य राहिला आहात! आपण कधी असत्य बपोलला नाही. याच्या पश्चात त्यांनी फरमावले, जर मी सांगेन की एक सैन्य निकट तुमच्यावर हल्ला करणार आहे, तर तुम्ही मान्य कराल काय? लोकांनी प्रत्युत्तर दिले, ‘होय, मान्य करू!’ यांच्यानंतर त्यांनी आपले आवाहन सादर केले.
इथे समग्र विचार केल्यावर लक्षात येते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रथमच आपले आवाहन आणि संदेश समस्त लोकांसाठी सादर केले. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ही ज्ञात होते की त्यांनी अरब समाजात आढळणाऱ्या अनिष्ठतेच्या समाप्तीकरिता समाजसुधारणेसाठी वेगवेगळ्या चळवळी आरंभिल्या नाहीत. किंबहुना रबच्या बंदगीचे एकच आवाहन सादर केले.
आवाहनाचा विरोध
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना आवाहन केले की एक अल्लाहची उपासना करा आणि एखाद दुसऱ्यास त्याच्यासोबत सहभागी कदापि करू नका. लोकांच्या विचारानुसार प्रस्तुत आवाहन त्यांच्या वाडवडिलांच्या धार्मिक कल्पनांच्या विरूद्ध होते. या आवाहनास मूठभर लोकांनी प्रतिसाद देऊन स्वीकार करून घेतले. परंतु बहुसंख्येने त्याचा कडाडून विरोध केला. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत: संयम पाळला आणि त्याच्या अनुयायांना सुद्धा अद्भूत सहनशीलतेचा उपदेश केला. परंतु विरोधात उग्रस्वरूप उत्पन्न होत गेले. त्यांच्या साथीदारांना अग्नीवर निजवले गेले, चाबकाने मारणयात आले.विविध पद्धतींनी त्यांना जुलूम व अत्याचाराचा बळी ठरविले गेले.आरोप अन् खोट्या प्रचाराचे रान उठविले गेले. येथपर्यंत की एका पर्वताच्या खोऱ्यात तीन वर्षांपर्यंत त्यांच्या सोबत्यांना व परिवारजनासह सगळ्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सोबत्यांना एका खोऱ्यात कैद करण्यात आले.निष्पाप बालके मातांच्या छातींमध्ये दूध नसल्यामुळे धाय मोकलून रडत होती. परंतु निर्दय व कठोर अंत:करणाचे विरोधक खोऱ्याच्या किनाऱ्यास उभे राहून जोरजोरात हसत होते. त्यांना थोडीसुद्धा दया येत नव्हती. तीन वर्षांनंतर काही मानवी सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांच्या मध्यस्थी व प्रयत्नाने या खोऱ्यातून त्यांची सुटका झाली. परंतु मक्केत विरोध कमी होत नव्हता. किंबहुना यामध्ये दिवसागणिक तीव्रतेत वाढ होत होती.
(पूर्वार्ध)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget