प्रेरणादायी सत्यकथा
अल्लाहचे प्रेषित, मुहम्मद (स.) यांनी जेव्हा या जगात डोळे उघडले तेव्हा त्यांचे वडील हजरत अब्दुल्ला हे जग सोडून गेले होते. हजरत अब्दुल्ला, लग्नाच्या काही काळानंतर, व्यापारी काफिल्यासह सीरियाला गेले, परतीच्या प्रवासात आजारी पडले. भर तारुण्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा 22 एप्रिल इ. स. 571 रोजी जन्म झाला.
त्यांची आई, हजरत आमिना यांनी मुलाच्या जन्माची बातमी सासरे, अब्दुल मुत्तलिब यांना पाठवली, जे काबाची प्रदक्षिणा करण्यात मग्न होते. अब्दुल मुत्तलिब घरी आले आणि पवित्र प्रेषितांना काबागृहात घेवून गेले. तेथे त्यांनी बाल प्रेषितांचे, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून आणि वाईट गोष्टींपासून रक्षण करण्याची अल्लाहकडे प्रार्थना केली. अब्दुल मुत्तलिबने, बाल प्रेषितांचे नाव “मुहम्मद” ठेवले. आई आमिनाने आपल्या लाडक्या बाळाचे नाव “अहमद” ठेवले.
अरब लोक लहान मुलांना संगोपनासाठी गाव खेड्यांमध्ये पाठवत असत. खेड्यापाड्यात राहणाऱ्या अरब स्त्रिया वर्षभरात वेगवेगळ्या वेळी मक्केत येत आणि शहरातील तान्ह्या मुलांना वाढवण्यासाठी वाळवंटात घेऊन जात. बनू साद बिन बकर जमातीच्या स्त्रियांनी इतर मुले दत्तक घेतली आणि हजरत हलीमाने मुहम्मद यांना दत्तक घेतले.
पवित्र प्रेषितांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील चार वर्षे बनू सादमध्ये त्यांची दूध आई हलीमाच्या देखरेखीखाली घालवलीत. चार वर्षानंतर बी हलीम यांनी बाल प्रेषितांना, आई हजरत आमिनाच्या स्वाधीन केले.
जेव्हा प्रेषित सहा वर्षांचे झाले, तेव्हा हजरत आमिना त्यांना आपल्या सोबत घेवून माहेरी गेल्या. मदिना हे त्यांचे माहेर. या प्रवासात उम्मे अयमनही त्यांच्या सोबत होत्या. हजरत आमिना एक महिना मदिनामध्ये राहिल्या. तेथे त्या आजारी पडल्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली.
मक्केला परत येताना ‘अबुवा’च्या ठिकाणी त्यांनी देह त्यागला. तेथेच त्यांना दफन करण्यात आले. उम्मे अयमन यांनी मुहम्मद (स.) यांना मक्केत आणले आणि त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांच्याकडे सोपवले. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांच्या सानिध्यात दोन वर्षेही उलटली नव्हती, आजोबांनी आपल्या आठ वर्षांच्या अनाथ नातवाला, आपला मुलगा अबू तालिबच्या हवाली केले आणि देह टाकला. अबू तालिबने बाल मुहम्मदची पालन पोषणाची जबाबदारी उचलली.
जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झालेले, सहाव्या वर्षी आई गेली, आठव्या वर्षी आजोबा. आयुष्यात एक नवीन युग सुरू झाले. वयाच्या आठव्या वर्षी, मुले खेळण्यात मग्न असताना, जगाच्या चढ-उतारांची माहिती नसताना, मुहम्मद (स.) दिवसभर शेळ्यांची काळजी घ्यायचे, त्यांना जंगलात चारायला घेऊन जायचे, जेवणासाठी जंगली बोरे खात आणि पोट भरत असे. घरातील छोटी-मोठी कामे करायचे. मुहम्मद (स.) यांनी आपल्या काकांना मदतीचा हात देण्यासाठी आणि आपल्या काकांच्या खांद्यावरून आपला भार कमी करण्यासाठी, वर नमूद केलेल्या कामांची मागणी केली. जरी अबू तालिबने आपला पुतण्या आणि मुलांमध्ये फरक केला नाही आणि पती-पत्नी दोघांनीही त्यांना खऱ्या मुलाप्रमाणे वाढवले, परंतु आईचे प्रेम आणि वडिलांची करुणा कोणतीही गोष्ट याचे बदल होवू शकत नाही.
वयाच्या आठव्या वर्षी, पवित्र पैगंबर दररोज सकाळी शहराबाहेर जात असत आणि संध्याकाळपर्यंत वाळवंटात एकटे राहत असत. अनेकदा ते अमर्याद आकाश आणि अंतहीन क्षितिजाकडे डोळे लावून बसायचे आणि सूर्यास्तापूर्वी गुरांसोबत गावाकडे परतायचे. ज्याला बाप नाही, ज्याला आई नाही आणि खेळण्याच्या वयात कष्टाची कामे करणारी मुले लौकरच स्वावलंबी बनतात.
अबू तालिब हे व्यापारी होते. ते मुहम्मदला (स.) वयाच्या बाराव्या वर्षी सीरियाला घेऊन गेले. सिरियातील बसरा शहराजवळ त्यांचा ‘कारवाँ’ थांबला. यात्रेकरू ज्या ठिकाणी थांबले होते त्याच ठिकाणी बुहिरा नावाचा साधू एका मठात राहत होता. सिरियाक भाषेत बुहिरा म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती आणि विचारवंत.
अरबांचा हा व्यापारी काफिला जेव्हा मशिदीजवळ थांबला तेव्हा बुहीराने पाहिले की, ज्या झाडाखाली काफिला थांबला होता त्या झाडाच्या फांद्या खाली वाकल्या आहेत. त्याला काफिल्यात एक बारा वर्षांचा मुलगा दिसला. ज्यावर ढगाचा तुकडा सावली धरून आहे.
बुहिराने त्याला शेवटचा संदेष्टा म्हणून ओळखले आणि त्याचे पालक अबू तालिबला, आपल्या पुतण्याची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला दिला. अबू तालिब म्हणाले की,”तुम्ही कसे म्हणू शकता की, हे मूल तेच आहे ज्याचा उल्लेख दैवी ग्रंथांमध्ये आहे.” बुहिराने उत्तर दिले की, “जेव्हा तुम्ही लोक घाटाच्या या बाजूला दिसलात तेव्हा तिथे एकही झाड किंवा दगड असा नव्हता जो नतमस्तक होत नव्हता.”
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment