Halloween Costume ideas 2015

पैगंबरत्वाचे वैशिष्ट्ये आणि माणसांची जबाबदारी


सरकारी सूचना, संदेश, आदेशांचे महत्त्व काय असते हे सांगण्याची गरज नाही. ते स्वीकारण्यास कुणी नकार दिला किंवा त्याचे पालन केले नाही तर काय होऊ शकते याची लगेच कल्पना येते. इतकेच नव्हे तर आदेश घेऊन येणाऱ्या व्यक्तीला योग्य आदर दाखवला गेला नाही तरीही काय कारवाई होऊ शकते हेही जाणवते. जगातल्या सामान्य राज्यकर्त्यांची आज्ञा पाळताना माणूस इतकी सावधगिरी बाळगतो मग सृष्टीचा खरा शासक असलेल्या ईश्वराची आज्ञापालन करण्यात किती काळजी घेण्याची गरज आहे याची जाणीव माणसांना व्हायला हवी. पवित्र कुरआन हा ग्रंथ विश्व निर्मात्याचा मानवजातीला दिलेला शेवटचा संदेश आहे. लोकांनी हा संदेश स्वीकारून, त्यावर विश्वास ठेवून, त्यानूसार आचरण केल्यास ते कल्याण आणि सुखसमृद्धीला पात्र ठरतील, अन्यथा त्यांना या सांसारिक जगातही शिक्षा भोगावी लागू शकते आणि मरणोत्तर जीवनातही ते नरकाचे इंधन बनू शकतात. निर्मात्या ईश्वराने मानवजातीचे जीवन आता या अंतिम संदेशाशी जोडले आहे आणि लोकांचे भवितव्य त्यावरच आधारित आहे. जो कुणी या मार्गदर्शनाचा स्वीकार करेल तो आपले जीवन घडवेल आणि जो यापासून दूर जाईल त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल. हे स्पष्टपणे सांगताना कुरआनमध्ये विश्व निर्मात्याने म्हटले आहे,

कुल् या’अय्युहन्नासु क-द जा-अकुमुल्-हक्कु मिर्-रब्बिकुम्, फमनिह्-तदा फइन्नमा यह्तदी लिनफ्सिही, वमन् जल्ला फइन्नमा यजिल्लु अलय्-हा, व मा अ-न अलय्-कुम् बि-वकीलिन.

अनुवाद :- हे मुहम्मद! (स.) सांगून टाका की, लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य आलेले आहे, आता जो सरळ मार्ग अनुसरील त्याचे सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचे होय, आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही. 

( 10 यूनुस : 108 )

या आयतीमध्येही संपूर्ण मानवजातीला संबोधित करण्यात आले आहे. आदरणीय पैगंबर (स) यांना लोकांसमोर हे जाहीर करण्याचा हुकुम देण्यात आला की तुमच्यापर्यंत अल्लाहचा अंतिम संदेश म्हणजे पवित्र कुरआन आलेला आहे. हाच खरा धर्म आहे. मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी कुरआन आणि अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (स) यांच्या जीवन चरित्रातून सन्मार्ग स्पष्ट झाला आहे. यावर विश्वास ठेवा आणि या मार्गदर्शनाचा स्वीकार करा. त्यातच तुमच्या सांसारिक आणि मरणोत्तर जीवनाचे यश दडलेले आहे. आता जो कुणी यातील मार्गदर्शनाचे, आदेशांचे, सुचनांचे पालन करेल तो स्वत:चेच भले करेल. जो त्यावर विश्वास ठेवणार नाही तो दिशाभूल होऊन चुकीच्या मार्गांवर भटकत राहील. ज्याचे दुष्परिणाम त्याला स्वतःलाच भोगावे लागतील. अल्लाहच्या पैगंबरांची जबाबदारी केवळ संदेश पोहोचवण्याची आहे. लोकांच्या मनात विश्वास बसवणे हे त्यांचे काम नाही आणि त्यांच्यावर तुमच्या कृत्यांची कोणतीही जबाबदारी नाही. तुमच्या आचरणाचे तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. त्यांचे काम तुम्हाला सन्मार्ग दाखवणे आहे. ते स्वीकारण्यासाठी बळजबरी करणे किंवा त्या मार्गाचा अवलंब करायला भाग पाडणे ही त्यांची पद्धत नाही. मार्गदर्शन स्वीकारणाऱ्यांना स्वर्गाची सुवार्ता देणे आणि न स्वीकारण्याचे वाईट परिणाम व शिक्षेपासून लोकांना सावध करणे हेच त्यांचे कार्य आहे. त्यांनी जीवन प्रवासाचा सरळ मार्गही स्पष्ट केला आणि भटकंतीच्या मार्गांपासूनही सावध केले. आता जो कुणी ईशप्रसन्नता शोधू इच्छितो त्याने हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि ज्या मनमौजीला या सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही त्रास सहन करायची हौस आहे, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो! या प्रार्थनेशिवाय अशा माणसांसाठी दुसरे काय म्हणता येईल?

......................... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget