प्रेरणादायी सत्यकथा
अरबस्थानात अशी पद्धत होती की, मूल जन्माला आल्यानंतर त्याला गाव-खेड्यामध्ये राहणाऱ्या स्त्रियांकडे दूध पाजण्यासाठी पाठवून देण्यात येई. सुमारे दोन वर्षे ही मुले मरुभूमीतील त्या स्त्रियांकडे राहत असत. नंतर त्या स्त्रिया या मुलांना त्यांच्या घरी आणून सोडत असत. याकरिता त्यांना मुलांच्या पालकांकडून चांगला मोबदला मिळत असे. हीच त्यांची कमाई असायची.
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला, त्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या अनाथ बाळाकडून आपल्याला दूध पाजण्याचा विशेष मोबदला मिळणार नाही, या भीतीने अनेक स्त्रियांनी बालप्रेषितांना घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी मक्केमध्ये सर्वात उशिरा पोहोचणारी स्त्री, अर्थात दाई हलीमा यांना कोणतेच मूल मिळाले नव्हते, तेव्हा त्यांनी विचार केला या मुलालाच आपण सोबत घेऊन जाऊ या. त्यांनी बालप्रेषितांना सोबत घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघाल्या.
बालप्रेषितांची बरकत त्यांना जाणवायला लागली. त्यांच्या उंटिणीची मरगळ दूर झाली होती. तिची गती इतकी वाढली की, ती काफिल्यात सर्वांत पुढे चालू लागली. सर्वांना आश्चर्य वाटत होते की, या उंटिणीमध्ये एवढी शक्ती आली कुठून!
हजरत हलीमा यांची मुलगी शीमा, बालप्रेषितांचे खूप लाड करायची. प्रेमाने त्यांचा सांभाळ करायची. सायंकाळी जेव्हां स्त्रिया स्वयंपाकात लागायच्या तेव्हां बहिणी आपापल्या भावांना बाहेर घेऊन येत. त्यांना सोबत घेऊन खेळत. एकमेकांशी स्पर्धा करत. माझ्या भावासारखा कुणाचा भाऊ नाही. कोणी आपल्या भावाच्या रंगाचे गुणगान करत, कोणी सुंदरतेचे!
त्यात बनू सआदच्या कबिल्यातील मुलगी, शीमा आपला दूधभाऊ, बाल मुहम्मद (स.) यांना घेऊन यायची आणि दुरूनच म्हणायची, 'माझा भाऊही आला आहे, आता बोला.' तेंव्हा सर्वांच्या माना खाली व्हायच्या. सर्वजण म्हणत, 'तुझ्या भावाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, आम्ही एकमेकांशी बोलत आहोत.' जेव्हा सर्व सहमत होत आणि म्हणत तुझा भाऊ सर्वांत जास्त देखणा आहे. तेव्हां शीमाचा अभिमान गगनाला भिडायचा. ती आनंदाने ही अंगाई म्हणायची,
''पालनकर्त्याचा आशीर्वाद आणि शांती तुझ्यावर असो, हे आमच्या प्रभू, माझ्या भावाला सुरक्षित ठेव, तो घरकुलातील मुलांचा सरदार आहे, उद्या तो मोठ्या झालेल्या तरुणांचा सरदार असेल'' असे म्हणून डोलून जाई.
दर सहा ते सात महिन्यांनी, आदरणीय हलीमा, प्रेषितांना मक्केत आणायची आणि आई आदरणीय आमिना व नातेवाईकांना भेट देऊन परत घेऊन जायची. प्रेषित दोन वर्षांचे झाले तेव्हा दूध सोडवण्यात आले.
आत्तापर्यंत हलीमा सादियाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की, हे एक अद्भुत मूल आहे. त्यांचं प्रेषितांवर खूप प्रेमही होतं. वास्तविक पाहता दोन वर्षांनी दूध सोडवल्यावर बाळ आईच्या स्वाधीन करायला हवे होते, परंतु या अद्भुत बाळाला अजून काही काळ आपल्या जवळ ठेवायचे होते. म्हणून त्यांनी हजरत आमिना यांच्याशी या इच्छेची चर्चा केली. बी हलीमा म्हणाल्या, "मरूभूमीतील मोकळी हवा लहान मुहम्मदसाठी खूप आनंददायी आहे. तसेच मक्केत सध्या साथ पसरली आहे. तेंव्हा मुहम्मद (स.) यांना माझ्यासोबत वाळवंटात राहू दिले तर बरे होईल."
हा युक्तिवाद वाजवी होता. आदरणीय आमिना आपल्या लाडक्यापासून अजून काही काळ वेगळे राहण्यास तयार झाल्या. त्यामुळे प्रेषितांना आणखी काही काळ बी हलीमाच्या सान्निध्यात राहण्यासाठी परत करण्यात आले.
तेथे प्रेषित आपल्या दूध भावांसोबत बकऱ्या चारायला अनेकदा बाहेर जात असत. सुमारे चार वर्षे वय झाल्यानंतर बी हलीमाने प्रेषितांना मक्केत आणून सोडले.
शेळीपालन आणि मेंढपाळाच्या सुरुवातीच्या अनुभवाव्यतिरिक्त, पैगंबरांना त्यांच्या नंतरच्या आयुष्यात या मनोरंजक आणि उपयुक्त व्यवसायाची संधी मिळाली. त्यामुळे अनेक वर्षे ते आपल्या कुटुंबाच्या आणि मक्केतील इतर काही लोकांच्या शेळ्या चारत असत. मेंढपाळ करताना त्यांना विश्व आणि जीवनाचा विचार करण्याची संधी मिळाली. आपला हा अनुभव प्रेषित स. मोठ्या अभिमानाने सांगायचे आणि त्यासाठी अल्लाहचे आभार मानायचे.
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment