Halloween Costume ideas 2015
Latest Post


पोंछकर अश्क अपनी आँखों से 

मुस्कुराओ तो कोई बात बने

सर झुकाने से कुछ नहीं होता 

सर उठाओ तो कोई बात बने

नफरतों के जहां में हमको 

प्यार की बस्ती बसानी हैं

दूर नहीं कोई कमाल नहीं

पास आओ तो कोई बात बने

मजान संपल्या-संपल्या जमाअते इस्लामी हिंद तर्फे देशभरात ईद मिलन कार्यक्रमांना सुरूवात झालेली आहे. या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी जमाअतचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत. वर्तमानपत्रातून अशा कार्यक्रमांचे फोटो वाचकांनी पाहिले असतील. फोटो आणि त्याखालची बातमी यातून ईद मिलनाच्या कार्यक्रमाचा उद्देश पुरेसा स्पष्ट होत नाही म्हणून या विषयावर संक्षेपमध्ये लेख लिहून वाचकांपर्यंत या कार्यक्रमांचा उद्देश काय आहे हे पोहोचविण्यासाठी हा लेखन प्रपंच.

ईद मिलन तो बहाना है

आपस में संवाद बढाना है

जेव्हापासून 4जी स्मार्ट फोन आणि स्वस्त इंटरनेटचा सुळसुळाट वाढला आहे तेव्हापासून समाजात संवाद तुटलेला आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये पूर्वी जसे एकत्र येण्याची अनेक कारणं उपलब्ध होती. उदा. नाटक, मैदानी खेळ, वादविवाद स्पर्धा इत्यादी. या गोष्टी आता जवळ-जवळ संपुष्टात आलेल्या आहेत. खेळ सुद्धा आपण आता एकांतात बसून मोबाईलवर पाहण्यात आनंद मानतो. एकाच घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांकडे स्वतंत्र स्मार्ट फोन असल्यामुळे प्रत्येकजण घरात असूनसुद्धा एकटा आहे. मुलांचा पालकांशी, पालकांचा मुलांशी, पतीचा पत्नीशी, पत्नीचा पतीशी, भावाचा बहिणीशी, बहिणीचा भावाशी संवाद आतापावेतोच्या सर्वात कमी पातळीवर येवून स्थिरावलेला आहे.  अशात समाजा-समाजामध्ये संवाद होणे कठीणच झालेले आहे. संवाद खुंटल्यामुळे दुरावा वाढलेला आहे. बहुसंख्य बांधवांशी अल्पसंख्यांकांचा संवाद बहाल करावा व दोन्ही समाजामध्ये होत असलेला दुरावा कमी करावा या उदात्त हेतून जमाअते इस्लामी हिंद विविध कार्यक्रम आयोजित करत असते. ईद मिलन त्यातल्या त्यात एक असा कार्यक्रम असतो ज्यात बहुसंख्य समाजाची मंडळी मोठ्या प्रमाणात  आनंदाने सहभागी होत असतात. 

युनान, फारस व रूमा सब मिट गए जहां से

लेकिन अभी है बाकी नामो निशां हमारा

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा

थोडकयत आपसात संवाद साधून राष्ट्रहित साध्य करण्यासाठी ईद मिलनाचे कार्यक्रम जमाअते इस्लामी हिंद आयोजित करत असते. ज्याप्रमाणे 20 टक्के शरीर पंगू ठेवून कोणताही खेळाडू कुठल्याही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे 20 टक्के अल्पसंख्यांना बाजूला सारून कोणताही देश आंतरराष्ट्रीय पातळीवर महासत्ता बनू शकत नाही. कोणत्याही देशाला महासत्ता बनविण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. 1. मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि निर्यात. 2. राजकीय स्थैर्य 3. सामाजिक न्याय. या तिन्ही गोष्टी आपल्याकडे कितपत आहेत याचा प्रत्येक वाचकाने स्वतंत्रपणे विचार करावा. भांडवलशाही लोकशाही व्यवस्था ही कल्याणकारी व्यवस्था असल्याचे मानले जाते. आपल्या देशातही हीच व्यवस्था आहे. ही कल्याणकारी आहे तर वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे? व्याजाचा विळखा नागरिकांच्या गळ्याभोवती का आवळला जात आहे? समाजातील प्रत्येक गटात वर्षागणिक आत्महत्यांचा दर का वाढत आहे? बेरोजगारी दिवसेंदिवस का वाढत आहे? राजकीय भ्रष्टाचार हिमालया एवढा का वाढत आहे? संविधान हजारो कायदे, लाखो पोलिस, हजारो न्यायालय, लाखो वकील, हजारो न्यायाधीश असून सुद्धा गुन्हेगारी का वाढत आहे? आर्थिक विषमता वाढून देशाची संसाधने मुठभर लोकांच्या हातात का गोळा होत आहे? शिक्षण घेणे महाग का होत आहे? आरोग्य सुविधा सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर का जाताहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जबाबदार नागरिकांनी एकमेकांशी संवाद करणे गरजेचे आहे की नाही? या गरजेपोटीच ईद मिलनाचा कार्यक्रम नेमाने जमाअते इस्लामी हिंद घेत असते. 

एक महत्त्वाचा प्रश्न वाचकांना मी विचारू इच्छितो तो म्हणजे इंग्रजही बाहेरून आले होते आणि मुस्लिम राजेही बाहेरून आले होते. इंग्रजांनी या देशाला कधीच आपला देश मानला नाही. त्यांनी येथील संसाधने लूटून ब्रिटनला नेली, शेवटी स्वतःही ब्रिटनला निघून गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी भारतीय नागरिकांना गुलामासारखी वागणूक दिली. तरी बहुसंख्य बांधवांना इंग्रजांनी त्यांच्या देशांविषयी प्रचंड आपुलकी आहे. मुस्लिम शासक भलेही बाहेरून आले, या देशावर शासन केले.  येथील संसाधनांचा येथेच वापर केला. ते राहिले देखील येथेच. मरण पावले देखील येथेच. त्यांच्या काळात स्थानिक लोकांवर अत्याचार झाले नाहीत असे नाही. परंतु, इंग्रजांच्या तुलनेत मात्र कमी झाले एवढे नक्की. असे असतांना मुस्लिम शासकांविषयी पराकोटीचा द्वेष का? या प्रश्नाचे उत्तर असे की, इंग्रजांची अनैतिकतेवर आधारित चंगळवादी जीवनशैली आपल्या देशातील बहुसंख्यांकांनाच नव्हेच अल्पसंख्यांकांना सुद्धा आकर्षित करते. याउलट इस्लामची नैतिकतेवर आधारित साधी (कदाचित रूक्ष) परंतु, शितल जीवनशैली कोणालाच आकर्षित करत नाही. परंतु, ही कुरआनवर आधारित ईश्वराने निश्चित केलेली जीवनशैली हीच सर्व मानवसमाजासाठी  या लोकीच नाही तर परलोकी सुद्धा यशस्वी करणारी आहे हे जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी नेमाने ईद मिलनचा कार्यक्रम आयाजित केला जातो. 

जगाच्या इतिहासावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी एक गोष्ट ठळकपणे लक्षा त येते ती म्हणजे दुराचाऱ्यांच्या व भ्रष्टाचाऱ्यांच्या नेतृत्वात आदर्श व्यवस्थेची रचना होऊच शकत नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी बसचे उदाहरण घेऊ. गृहित धरा आपल्याला पूर्वेकडे एका गावी जायचे आहे. आपण बसमध्ये बसलो तिकीट घेतलं, कंडा्नटरने डबल बेल दिली आणि चालकाने बस सुरू केली. थोड्याच वेळात प्रवाशांच्या लक्षात आले की, बस आपल्या गंत्वय दिशेकडे न जाता पश्चिमेकडे जात आहे. प्रवाशांनी आरडा ओरडा केला तरी चालक काही दाद देत नाही तो पिलेला असल्याचेही लक्षात आले. अशा परिस्थिती प्रवाशांच्या कहातात काहीच राहत नाही. चालक ज्या दिशेला बस जाईल त्या दिवशी नाईलाजाने त्यांना फरपटत जावे लागेल. देश ही एका बस प्रमाणे आहे. याचे स्टेरींग जर का आपण चांगल्या लोकांच्या हातात दिले तर ते देशाला योग्य दिशेला घेऊन जातील आणि जर का जात, पात, धर्म, पैसा, दारू इत्यादी घेऊन देशाचे स्टेरिंग अनैतिक आणि भ्रष्ट चालकाच्या हातात दिले तर तो देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, यात शंका नाही. लोकशाही ही लोण्यासारखी असते. ज्याप्रमाणे दूध चांगले असेल तर त्यापासून तयार होणारे लोणी दुधापेक्षा चांगले निघेल. जर का दूध विषारी असेल तर त्यापासून निघणारे लोणी दुधापेक्षा जास्त विषारी असेल. हीच गोष्ट समस्त नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून ईद मिलनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. चांगले चालक निवडण्याची संधी आहे. ही संधी नागरिकांनी वाया घालू नये. हे या निमित्ताने मी स्पष्ट करू इच्छितो. आदर्श शासन व्यवस्था जगामध्ये कधी अस्तित्वात होती का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. अशी व्यवस्था 40 वर्षे अस्तित्वात होती. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वातील मदीनेतील दहा वर्षांची सत्ता आणि त्यानंतर 4 पवित्र खलीफांची 30 वर्षांची सत्ता ही मानवी इतिहासामध्ये आदर्श अशी लोकशाही व्यवस्था होती. या व्यवस्थेपूर्वी अरबस्थानमध्ये राहणाऱ्या रानटी समाजाचेे रूपांतर इस्लामी खिलाफतीच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये नैतिक समाजामध्ये झाले. जे अरबी लोक दारूवर प्रचंड प्रेम करत होते त्यांनी कुरआनमध्ये नशाबंदीची आयत अवतरीत झाल्या बरोबर एका क्षणात दारू सोडली. अशी सोडली की आज 1400 वर्षानंतरही त्या लोकांनी दारूला हात लावला नाही. जे लोक मुलींना जीवंत जमिनीमध्ये पुरत होते त्या लोकांनी मुलींना आपल्या संपत्तीतून वारसा हक्क देण्यास सुरूवात केली. विधवांच्या इद्दतीची मुदत संपण्यापूर्वीच त्यांना पुनर्विवाहाचे प्रस्ताव येवू लागले. मक्का शहरातून आलेल्या मुहाजीरांना मदीना येथील अन्सारनी अशी मदत केली की त्यांच्या त्यागाचे दुसरे उदाहरण आजपर्यंत सापडू शकलेले नाही. या 40 वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा उमवी, अब्बासी आणि उस्मानी खिलाफतीचा काळ जो की 3 मार्च 1924 रोजी संपला. आदर्श जरी नसला तरी आजच्या जागतिक लोकशाही पेक्षा (काही अपवाद वगळून) कितीतरी पटीने चांगला होता. 

इस्लामी व्याजमुक्त अर्थव्यवस्था, व्याजावर आधारित भांडवलशाही व्यवस्थेपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्याची क्षमता इस्लामच्या परदा व्यवस्थेमध्ये आहे. याचा परिचय करून देण्यासाठी ईद मिलनचा कार्यक्रम घेतला जातो. थोडक्यात देशाला, देशाच्या संविधानाला, लोकशाहीला आणि कुटुंब व्यवस्थेला वाचवायचे असल्यास इस्लामशिवाय पर्याय नाही. हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ईद मिलनच्या निमित्ताने संवाद साधला गेला पाहिजे. म्हणूनच जमाअते इस्लामी हिंदतर्फे ईद मिलनचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 


- एम. आय. शेख

लातूर



ते दिवस गेले जेव्हा राजकारणी जनतेशी खरे बोलायचे. राजकारण हा फसवणुकीचा खेळ आहे आणि जनतेच्या हिताच्या किंमतीवर राजकारण्यांसाठी ही लक्झरी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे, हे जगातल्या राजकारण्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीवरून सहज लक्षात येते. खरं बोलणारा राजकारणी आजकाल क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वसाधारणपणे असे मानले जाते की द्विमुखता, दुटप्पीपणा आणि फसवेगिरी ही त्यांची विशेष वैशिष्ट्ये आहेत, जरी ते तत्त्वांची आणि विचारसरणीची शपथ घेतात. पण इच्छा आणि निर्धार असेल तर राजकारण नैतिकतेवर आधारित करता येईल यात शंका नाही.

द्वेषपूर्ण राजकारण करणाऱ्यांचा भारतात फूट आणि वैमनस्य असलेल्या राजकीय विचारधरा राबविण्याचा गेल्या दहा वर्षांपासून आटोकाट प्रयत्न सुरू आहे. या दहा वर्षांत केंद्रातील सत्ताधारी जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. अशा राजकारण्यांचा सर्वांत वादग्रस्त पैलू म्हणजे त्यांनी भारतीय मुस्लिमांना उपरे किंवा घुसखोर म्हणून चित्रित केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांचा विभाजनवादी दृष्टिकोन अधोरेखित तर होतोच, शिवाय धार्मिक तणावही वाढतो, ज्यामुळे देशात ध्रुवीकरण आणि जातीय संघर्ष वाढतो. अशा प्रकारच्या विभाजनकारी डावपेचांमुळे भारताची एकता तर कमी होतेच, शिवाय भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेला आणि नागरिकत्वाच्या हक्कांनाही धोका निर्माण होतो.

अल्पसंख्याक, कनिष्ठ जाती आणि कामगारवर्गाला उपेक्षित करणारी भाजपची धोरणे आणि प्रशासकीय कारभार अनेकदा दिसून येतो. भारतीय मुस्लिमांविषयी द्वेषपूर्ण राजकारण्यांनी यापूर्वी आधी त्यांची तुलना ’कुत्र्याच्या पिल्लां’शी करणे आणि आता त्यांना ’घुसखोर’ ठरवणे, हे केवळ दूषित राजकारणाचे स्वरूप स्पष्ट करते. भारतीय राज्यघटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्याची आणि कमकुवत करण्याची चिंताजनक प्रवृत्ती या टिप्पण्यांनी निदर्शनास येते.

भारतीय मुस्लिम देशाच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग आहेत, लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेतात आणि देशाच्या वाढीत आणि प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देतात. समाजकार्य, विज्ञान, शिक्षण, इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, साहित्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. भारताच्या वसाहतवादविरोधी लढ्यात आणि राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांमध्ये त्यांची भूमिका लक्षणीय राहिली आहे, ज्यात बहुतेकदा बलिदानाचा समावेश आहे ज्यामुळे देशाची अस्मिता, लोकाचार आणि नशीब आकारास मदत झाली आहे. दूषित विचारसरणीच्या राजकीय शक्तींनी ब्रिटिश वसाहतवादाशी हातमिळवणी केली. याउलट वसाहतवादविरोधी मुस्लिम नेत्यांनी केवळ सहभाग घेतला नाही आणि प्राणांची आहुती दिली नाही, तर आधुनिक घटनात्मक लोकशाही म्हणून भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक मूल्यांना आकार देण्यास मदत केली.

भारतीय मुसलमानांना घुसखोर ठरवून दूषित विचारसरणीच्या राजकारण्यांनी भारतीय राज्यघटनेचे पावित्र्य तर कमी केलेच, शिवाय भारताच्या वैविध्यपूर्ण वारशात मुस्लिमांनी दिलेल्या योगदानाची समृद्ध मांडणीही नाकारली. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे भारतीय नागरिकत्वाची संकल्पना चव्हाट्यावर येण्याचा धोका तर आहेच, शिवाय राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचविणारी विभाजनवादी कथाही कायम राहते. शिवाय, समता, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटनेतील अधिकारांची तत्त्वे जपणाऱ्या सर्व भारतीयांसाठी मोदींची वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह आहेत. मुस्लिमांचा भारतीय लोकशाहीत तितकाच वाटा आहे जेवढे भारतातील इतर नागरिकांचा आहे.

दूषित विचारसरणी ही भारतीय राजकारण, समाज आणि संस्कृतीच्या जडणघडणीत घुसखोरी करणारी परकीय आयात आहे. अस्सल भारतीय मूल्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करत असताना, भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास, समाज आणि संस्कृतीपेक्षा तेथील जातीयवादी प्रवृत्ती आणि धार्मिक आणि वांशिक अस्मितेवर लक्ष केंद्रित करणे युरोपियन विचारसरणीशी अधिक साम्य आहे. भारताच्या बहुलवादी परंपरा आणि संमिश्र संस्कृतीतून बाहेर पडण्याऐवजी दूषित विचारसरणीची मुळे वांशिक राष्ट्रवाद, धार्मिक राष्ट्रवाद आणि वांशिक लोकशाही या युरोपीय संकल्पनांमध्ये सापडतात. दूषित राजकारणाच्या या आयात केलेल्या विचारसरणीने अनेकदा धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांच्या किंमतीवर भारतीय बहुलवादी अस्मितेला संकुचित, बहिष्कृत शब्दांत पुन्हा परिभाषित करण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे.

जातीय तेढ निर्माण करून आणि फुटीरतावादी अजेंडा राबवून दूषित विचारसरणीचे राजकारणी आपला सत्ताआधार बळकट करण्याचा आणि लोकसंख्येच्या काही घटकांमध्ये पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा दृष्टिकोन केवळ भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही तत्त्वांना कमकुवत करत नाही तर विविध समुदायांमध्ये अविश्वास आणि वैर वाढवून देशाची सामाजिक रचना उलगडण्याचा धोका आहे. शतकानुशतके भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या बहुलतावादी विचारसरणीचा अशा विभाजनकारी विचारसरणी विरोध करीत आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भारताची ताकद विविधतेत आहे आणि अस्मितेची अखंड दृष्टी लादण्याचा कोणताही प्रयत्न देशाच्या लोकशाही मूल्यांच्या आणि सर्वसमावेशक वारशाच्या विरोधात आहे.

दूषित राजकारणाने वापरलेले डावपेच, त्यात मुस्लिमविरोधी प्रचार आणि दिशाभूल करणारी रणनीती यांचा समावेश आहे. फुटीरतावादी मुद्द्यांवर जनतेचे लक्ष केंद्रित करून आणि जातीय तेढ निर्माण करून द्वेषपूर्ण राजकारण करणारे नेते आपल्या प्रशासनातील अपयश आणि धोरणातील त्रुटींपासून लक्ष विचलित करू शकतात. भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण करून दूषित राजकारण धार्मिक आणि वांशिक अस्मितेला आवाहन करून आपला मतदार आधार भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिमांना ’परके’ म्हणून किंवा राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षिततेला धोका म्हणून चित्रित करून लोकसंख्येच्या विशिष्ट घटकांमध्ये पाठिंबा मिळविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

दूषित विचारसरणी विविध समुदायांमध्ये अविश्वास आणि वैमनस्य निर्माण करून देशाच्या सामाजिक रचनेला कमकुवत करते. समृद्ध सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक विविधतेचा उत्सव साजरा करणारी भारताची ताकद नेहमीच बहुलवादी मूल्ये राहिली आहे. अशा विचारसरणीचा विभाजनकारी अजेंडा भारतीय अस्मितेच्या संकुचित आणि बहिष्कृत दृष्टिकोनाला चालना देऊन ही विविधता नष्ट करण्याचा धोका आहे. विभाजनकारी मुद्दे आणि धार्मिक ध्रुवीकरणावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकास, सामाजिक विषमता आणि पुरोगामी प्रशासकीय सुधारणांसारख्या देशासमोरील वास्तविक आव्हानांचा सामना केला जात नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांपेक्षा प्रबळ अस्मितेच्या राजकारणाला प्राधान्य देऊन दूषित विचारसरणीचे राजकारण भारताच्या प्रगती आणि विकासात अडथळा आणते.

त्यामुळे दूषित राजकारण धार्मिक आणि वांशिक विभाजनाचा फायदा घेऊन अल्पकालीन निवडणूक लाभ देऊ शकते, त्याचे दीर्घकालीन परिणाम भारताच्या एकतेला, प्रगतीला आणि आंतरराष्ट्रीय स्थानाला घातक आहेत. सर्वसमावेशक प्रशासनापेक्षा विभाजनकारी डावपेचांना प्राधान्य देऊन दूषित विचारसरणी भारतीय समाजाची जडणघडण कमकुवत करते आणि भारताच्या अस्मितेचा अविभाज्य घटक असलेल्या लोकशाही मूल्यांना दुर्बल करते. चुकीची माहिती, धार्मिक ध्रुवीकरण आणि वंचित गटांना डावलले जाणे हे त्यांच्या विभाजनकारी दूषित राजकारणाचा एक भाग आहे. त्यांची नेतृत्वशैली आणि धोरणे भाजपच्या व्यापक वैचारिक चौकट प्रतिबिंबित करतात, जे इतरांच्या किंमतीवर समाजातील काही घटकांना प्राधान्य देते.

धर्म किंवा वांशिकतेच्या आधारे समाजाला उपेक्षित करणारी विभाजनवादी रणनीती अवलंबण्याऐवजी, एकता जोपासणे महत्वाचे आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या भारताला विध्वंसक मार्गापासून दूर नेण्यासाठी सत्तापालट करण्याची हीच वेळ आहे कारण भारतातील प्रगती आणि समृद्धी धर्मनिरपेक्ष एकात्मतेवर अवलंबून आहे.

अल्लामा इक्बाल एके ठिकाणी म्हणतात की तत्त्वे आणि सचोटी नसलेले राजकारण अत्याचार आणि बर्बरता आणते आणि चांगुलपणा आणि न्याय दडपून टाकते. आजचे राजकारणी तथाकथित लोकशाहीचा आश्रय घेतात आणि त्याच्या नावाखाली आपल्या दुष्कृत्यांना वैध ठरवतात. आज कोणतीही लोकशाही केवळ सत्तेसाठी, सत्ता टिकविण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या विरोधकांना दूर ठेवण्यासाठी संघर्षाची कहाणी सांगते. राजकीय पक्ष हे कटू स्पर्धा आणि सत्तेच्या लोभाचे प्रतीक आहेत. नियम, कायदे आणि तत्त्वे वाऱ्यावर सोडली जातात आणि स्वार्थी उद्दिष्टे आणि हेतू कोणत्याही पद्धतीने साध्य केले जातात.

आजचे राजकारणी नैतिक मूल्ये आणि राजकारण वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहीत आहे की सभ्यता अल्पकालीन उद्दिष्टांचा अवलंब करण्यास परवानगी देत नाही परंतु मूल्यांना प्राधान्य देते जेणेकरून एक चांगली नैतिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था प्रस्थापित होईल. स्वार्थासाठी नैतिक मूल्यांचा आणि तत्त्वांचा बळी दिला जात असल्याचे दिसून येते. जगातील बहुतांश भागांतील सध्याचे राजकीय वातावरण नैतिक भावनेपासून वंचित आहे; संधीसाधूपणा हा राजकारण्यांच्या श्रद्धेचा विषय बनला आहे.


- शाहजहान मगदूम



4 एप्रिल 2024 रोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने त्याला ’न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. यामध्ये जातीय जनगणना, आरक्षणावरील 50 टक्क्यांची कमाल मर्यादा हटवणे, तरुणांना रोजगार, इंटर्नशिपची व्यवस्था, गरिबांना आर्थिक मदत आदी आश्वासने देण्यात आली आहेत. महिला, आदिवासी, दलित, ओबीसी, शेतकरी आणि तरुण व विद्यार्थी यांना न्याय देण्यावर या जाहीरनाम्याचा भर आहे. काँग्रेसच्या प्रव्नत्याने सांगितले की, भाजपच्या गेल्या 10 वर्षांच्या राजवटीत समाजातील विविध घटकांवर झालेला अन्याय संपुष्टात आणण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

या जाहीरनाम्याचा निषेध करताना  नरेंद्र मोदी म्हणाले की, या जाहीरनाम्यावर (स्वातंत्र्यपूर्व) मुस्लिम लीगच्या विघटनकारी राजकारणाचा ठसा आहे आणि त्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव आहे. हे ऐकून आरएसएसचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांचे ते म्हणणे आठवले ज्यात ते म्हणतात, ’’हिंदू राष्ट्राला मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट असे तीन अंतर्गत धोके आहेत’’ (संदर्भ ’बंच ऑफ थॉट्स’) यापैकी दोन गोष्टींवर भाजप वेळोवेळी विविध पातळ्यांवर चर्चा करत आहे आणि अजूनही चर्चा करत आहे. जातीयवाद हे भाजपचे प्रमुख शस्त्र आहे. 1937 च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी मुस्लिम लीगचा जाहीरनामा आणि निवडणूक कार्यक्रमात मुस्लिम अस्मितेशी संबंधित मागण्या होत्या आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी सकारात्मक पावले उचलल्याचा उल्लेख नव्हता.

भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि मुस्लिम लीगचे पूर्वज एकमेकांचे सहयोगी असल्याचे बरोबरच सांगितले. सत्य हे आहे की धार्मिक राष्ट्रवादी गट - मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि आरएसएसमध्ये अनेक साम्य आहेत. वसाहतवादी भारतात होत असलेल्या बदलांना प्रतिसाद म्हणून या तीन संघटना समाजातील घटत्या घटकांनी स्थापन केल्या होत्या. ब्रिटिश भारतात, औद्योगिकीकरण, आधुनिक शिक्षणाचा प्रसार आणि न्यायव्यवस्था आणि नवीन प्रशासकीय व्यवस्थेची स्थापना तसेच दळणवळणाच्या साधनांच्या विकासामुळे अनेक नवीन वर्ग उदयास आले - कामगार वर्ग, आधुनिक सुशिक्षित वर्ग आणि आधुनिक उद्योगपती. त्यामुळे जुन्या शासक वर्गातील जमीनदार व राजे-नवाबांना धोका वाटू लागला. आपले सामाजिक-राजकीय-आर्थिक वर्चस्व संपुष्टात येईल, असे त्यांना वाटत होते.---(उर्वरित पान 2 वर)

नारायण मेघाजी लोखंडे, कॉम्रेड सिंगारावेलू आणि इतर अनेक उदयोन्मुख लोकांनी कामगारांना एकत्र केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर अनेक पक्ष या वर्गांच्या राजकीय अभिव्यक्तीचे प्रतीक म्हणून उदयास आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही या पक्षांची मूलभूत मूल्ये होती. जमीनदार आणि राजांच्या घसरत चाललेल्या वर्गाने यूनाइटेड पेट्रियोटिक असोसिएशनची स्थापना केली, जी ब्रिटिशांशी एकनिष्ठ होती. या वर्गांचा जाती आणि लिंगभेदावर पूर्ण विश्वास होता. कालांतराने ही संघटना विखुरली आणि त्यातून 1906 मध्ये मुस्लिम लीग आणि 1915 मध्ये हिंदू महासभा उदयास आली. सावरकरांनी त्यांच्या ‘‘एसेंशियल्स ऑफ हिंदुत्व’’ या पुस्तकात प्रतिपादन केले आहे की भारतात दोन राष्ट्रे आहेत - हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र. यातून प्रेरित होऊन 1925 मध्ये स्थापन झालेल्या आरएसएसने हिंदु राष्ट्राचा अजेंडा स्वीकारला तेव्हा लंडनमध्ये शिकणाऱ्या काही मुस्लिम लीग समर्थकांनी ’पाकिस्तान’ हा शब्द तयार केला. या दोन्ही प्रवाहांच्या समर्थकांनी अनुक्रमे हिंदू राजे आणि मुस्लिम राजे-नवाबांचा काळ हा देशाच्या इतिहासाचा सुवर्ण आणि महान काळ मानला. या दोघांनी स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांना पूर्ण साथ दिली. त्यांची रणनीती अशी होती की ब्रिटिशांसोबत मिळून त्यांना त्यांच्या शत्रूंचा (हिंदू किंवा मुस्लिम) सामना करायचा होता. हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधारस्तंभ सावरकर यांनी अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या 19व्या अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले होते, आजचा भारत हे दुसरे एकसंध राष्ट्र म्हणून मानले जाऊ शकत नाही. उलट येथे हिंदू आणि मुस्लिम अशी दोन प्रमुख राष्ट्रे आहेत. आरएसएस चे अनौपचारिक मुखपत्र ’ऑर्गनायझर’ ने लिहिले, ..हिंदू हे भारतातील एकमेव राष्ट्र आहे आणि आपली राष्ट्रीय रचना या भक्कम पायावर घातली गेली पाहिजे...हे राष्ट्र हिंदू, हिंदू परंपरा, संस्कृती, कल्पना आणि महत्वाकांक्षा यावर उभारले जाईल.  

मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेने 1939 मध्ये बंगाल, सिंध आणि उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांतात संयुक्त सरकारे स्थापन केली. सिंधमध्ये मुस्लीम लीगने विधीमंडळात पाकिस्तान निर्मितीच्या समर्थनार्थ ठराव मांडला तेव्हा हिंदू महासभेचे सदस्य गप्प राहिले. सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीतून प्रसारित केलेल्या आपल्या निवेदनात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा या दोघांनाही ब्रिटिश सरकारविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. ते दोघे आणि आरएसएस 1942 च्या भारत छोडो आंदोलनापासून दूर राहिले. सावरकरांनी इंग्लंडला दुसरे महायुद्ध जिंकण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. ते म्हणाले, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात हिंदू महासभेच्या शाखांनी हिंदूंना (ब्रिटिश) लष्कर, नौदल आणि हवाई दल आणि लष्करी उपकरणे तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये सामील होण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या वेळी सुभाष बोस यांची आझाद हिंद फौज ब्रिटीश सैन्याशी लढत होती, त्या वेळी सावरकर ब्रिटिश सैन्याला मदत करत होते.

हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग हे दोन्ही पक्ष इंग्रजांच्या हिताचे समर्थन करत होते हे स्पष्ट आहे. सुभाषचंद्र बोस यांचा या दोन्ही संघटनांच्या जातीय राजकारणाला कडाडून विरोध होता आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याच्या बोस यांच्या आवाहनाकडे दोघांनीही लक्ष दिले नाही. जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी, जे बंगालच्या मुस्लिम लीगच्या युती सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी व्हाइसरॉयला पत्र लिहून 1942 च्या चळवळीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आणि बंगालमध्ये चळवळ चिरडली जाईल याची खात्री करण्याचे आश्वासन दिले. 26 जुलै 1942 रोजीच्या त्यांच्या पत्रात त्यांनी लिहिले, काँग्रेसने सुरू केलेल्या कोणत्याही व्यापक आंदोलनामुळे प्रांतात जी परिस्थिती उद्भवू शकते त्याबद्दल आता मी काही सांगू इच्छितो. सध्या सत्ता असलेल्या कोणत्याही सरकारने युद्धाच्या या काळात सामान्य लोकांना भडकवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला पाहिजे, ज्यामुळे अंतर्गत गडबड होऊ शकते आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणेच आंबेडकरांनीही मुस्लिम राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद या विचारधारा एका चौकटीत ठेवल्या. 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, हे विचित्र वाटेल पण श्री सावरकर आणि श्रीमान जिना हे एक राष्ट्र विरुद्ध दोन राष्ट्रांच्या मुद्द्यावर एकमेकांच्या विरोधात न राहता एकमेकांशी मैत्रीपूर्ण होते. दोघेही सहमत आहेत - फक्त सहमत नाहीत तर आग्रही आहेत - की भारतात दोन राष्ट्रे आहेत - एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे हिंदू राष्ट्र. 

दलित लोकांच्या हिताच्या चर्चा भाजप-आरएसएसला मान्य नाहीत, कारण ते त्यांच्या हिंदु राष्ट्र अजेंड्याच्या विरोधात आहेत, यात नवल नाही. पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रातील वंचित वर्गाची काय अवस्था आहे, हे आपल्या सर्वांसमोर आहे. काँग्रेसच्या आशावादी जाहीरनाम्यावर मोदींनी केलेली टीका त्यांच्या वैचारिक पूर्वजांच्या विचारसरणीशी सुसंगत आहे. 

- राम पुनियानी

(मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवाद अमरीश हर्देनिया केला तर हिंदीचा मराठी अनुवाद बशीर शेख यांनी केला.) 

लेखक आयआयटी मुंबई येथे शिकवतात आणि 2007चे राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत)


वनस्पती संसाधनांचा वापर


नैसर्गिक संसाधनांमध्ये जैविक संसाधने विशेष करून वनस्पती आणि त्यांची उत्पादने हा जैव विज्ञान परिषदांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच 'बायोप्रोस्पेक्टिंग आणि प्लांट रिसोर्स युटिलायझेशन' म्हणजे जैव-अन्वेषन आणि वनस्पती संसाधनांचा वापर हा विषय विविध विद्यापीठांमध्ये पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो. 

अन्न या मुलभूत गरजेची पुर्तता वनस्पती करतात. गहू, तांदूळ, मका, हरभरा, बटाटा, रताळे, ऊस यांसारख्या अन्न पिकांचे आकारविज्ञान, शरीरशास्त्र, साठवलेल्या अन्नधान्याच्या सूक्ष्म-रासायनिक चाचण्या यामध्ये अभ्यासल्या जातात. जनावरांसाठी चारा किंवा चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वारी, बाजरी, लसूणघास, मका इ. पिकांचाही अभ्यास यात केला जातो. वनस्पती तंतू आणि धागे म्हणून वापरल्या जाणाऱ्या कापूस, ताग, बरू किंवा घाघरू, नारळाच्या जटा, सांवरी किंवा सिल्क कॉटन यांसाठी योग्य रंग पद्धती वापरून संपूर्ण तंतूंचे आकारशास्त्र आणि सूक्ष्म शरीरशास्त्र सुद्धा याच शाखेत येते. औषधी वनस्पतींमध्ये कोरफड, तुळस, कडुलिंब, अश्वगंधा, अडुळसा आणि सुगंधी वनस्पतींमध्ये गुलाब, मोगरा, पुदिना, निलगिरी यांसारख्या वनस्पती शिकवल्या जातात. मोहरी, भुईमूग, सोयाबीन, नारळ, सूर्यफूल, एरंडी या तेलबिया तसेच डिंक, राळ, टॅनिन, रंग उत्पादन करणारी झाडे, इंधन आणि लाकडी वस्तूंच्या उत्पादनासाठी लागवडीच्या झाडांचा अभ्यास येथे केला जातो.

याबाबतीत कुरआनमध्ये अध्याय ताहाच्या आयत ५३ मध्ये म्हटले आहे,

"तोच, ज्याने तुमच्यासाठी जमिनीची चादर अंथरली, आणि तिच्यात तुमच्यासाठी चालण्यास मार्ग बनविले, व वरून पर्जन्यवृष्टी केली, मग त्याद्वारे अनेक जातीच्या वनस्पती निर्माण केल्या."

या आयतीचे स्पष्टीकरण देताना भाष्यकार मौलाना मुफ्ती मुहम्मद शफी (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) यांनी आपल्या मआरिफुल कुरआन या ग्रंथात  'अज्वाजम्-मिन्-नबातिन शत्ता' म्हणजे 'विविध वनस्पतींच्या अनेक जोड्या' असा उल्लेख केला आहे. याचे तात्पर्य म्हणजे अल्लाहने इतक्या प्रकारच्या वनस्पती निर्माण केल्या आहेत की त्यांची मोजणी आणि सर्वेक्षण मानवाला शक्य नाही. मग प्रत्येक वनस्पती, जसे औषधी वनस्पतींची फूले, फळे, झाडाची साल यांमध्ये असे गुणधर्म ठेवले आहेत की वैद्यकीय शास्त्रज्ञ आणि औषध शास्त्रज्ञ आश्चर्यचकित आहेत. कित्येक वर्षांपासून यावर संशोधन चालू असतानाही हे कोणीही सांगू शकत नाही की हा अंतिम प्रबंध आहे आणि आता यापेक्षा जास्त कोणी लिहू शकणार नाही. वर नमूद केल्याप्रमाणे मौलाना पुढे लिहितात की या सर्व विविध प्रकारच्या वनस्पती माणसासाठी, त्याच्या पाळीव प्राण्यांसाठी आणि वन्य प्राण्यांसाठी अन्न किंवा औषध आहेत. त्यांच्या लाकडाचा वापर माणूस घरे बांधण्यासाठी आणि हजारो घरगुती वस्तू बनवण्यासाठी करत असतो. या सर्व वस्तू योगायोगाने निर्माण झाल्यात का? कुरआनमध्ये नैसर्गिक संसाधनांचा ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आला आहे तिथे त्या निसर्गकर्त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली गेली आहे जो एकमेव आहे. त्या अस्तित्वाला जाणणे हे माणसाचे कर्तव्य आहे.

(क्रमशः)

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


जर दोन माणसांमध्ये परस्पर विरोध झालेला असेल तर एक तिसरी व्यक्ती दोघांशी प्रामाणिकपणे मैत्री ठेवू शकते. पण अशा संबंधात दुटप्पीपणा नसला पाहिजे. म्हणजे दोन्हींशी मैत्री करावी आणि त्या दोघांच्या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात जेणेकरुन त्या दोघांचे संबंध आणखीन जास्त बिघडतील. ही भयंकर अनैतिक गोष्ट आहे. चहाडी करण्यपेक्षाही वाईट प्रकारची. कारण चहाडी करणारा माणूस एका माणसाविषयी दुसऱ्याला बोलतो. पण दुटप्पी माणूस आपल्या दोन्ही मित्रांच्या गोष्टी परस्परांना पोहचवितो. दुटप्पी माणूस फक्त एका माणसाची गोष्टच दुसऱ्या माणसाला सांगत नसून तो एका माणसासमोर त्याची प्रशंसा करतो आणि तिथून निघाला की त्याची टिंगलटवाळी करतो. दांभिकपणात ज्या दोन गोष्टी आढळतात त्यात हा दुटप्पीपणादेखील आहे.

एकदा हजरत अब्दुल्लाह बिन उमर यांना सांगण्यात आले की आम्ही जेव्हा अधिकारी आणि सत्ताधारी लोकांकडे जातो तेव्हा जे काही बोलतो, करतो आणि त्यांच्याकडून निघाल्यानंतर दुसरेच काही बोलत असते. अब्दुल्लाह इब्न उमर म्हणाले, की आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात याला दांभिकपणा म्हणत होतो. तसे पवित्र कुरआनात सुद्धा अशा व्यवहाराला दांभिकपणाच म्हटले गेले आहे.

“आम्ही जेव्हा श्रद्धावानांकडे जातो तेव्हा त्यांना सांगतो की आम्ही श्रद्धा धारण केली आहे, तेच जेव्हा आपल्या सैतानांकडे जातात तेव्हा म्हणतात की आम्ही तर तुमच्याच बरोबर आहोत. त्यांची तर आम्ही थट्टा करत होतो.” (पवित्र कुरआन-२)

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींमध्ये अशा लोकांविषयी फार कठोर शब्दांत वर्णन केलेले आहे. असे म्हटले आहे की कयामतच्या दिवशी दुटप्पी माणसाची अवस्था सर्वांत वाईट होईल.

दुसऱ्या एका हदीसमध्ये असे सांगितले आहे की जो माणूस या जगात दुतोंडी असेल कयामतच्या दिवशी त्याच्या तोंडात दोन जिभा असतील.

दुसऱ्याच्या बाबतीत खोटे विचार बाळगण्याचा असा परिणाम होतो की अशा माणसाला दुसऱ्याच्या प्रत्येक कार्यात उणिवा आढळतात आणि कोणत्याही कार्यात त्याला सौंदर्य दिसत नाही. दुसऱ्या लोकांकडल्या वाह्यात अशा गोष्टी सांगत असतो आणि म्हणून अशा लोकांना त्याची रीत पसंत पडत नसल्याने ते त्याच्यापासून संबंध तोडून टाकतात ज्यामुळे आपसात द्वेष आणि शत्रुत्व निर्माण होते. अल्लाहने ताकीद दिली आहे की हे श्रद्धावंत लोक हो, दुसऱ्याविषयी चुकीचे विचार बाळगू नका, हा गुन्हा आहे. (पवित्र कुरआन-हुजुरात:२)

(शिबली नोमानी, सीरतुन्नबी खंड-६)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(२९) आपला हात गळ्यात अडकवू नका आणि त्याला एकदम सैलदेखील सोडू नका की तुम्ही तिरस्कृत व लाचार बनून राहावे.१२ 

(३०) तुझा पालनकर्ता ज्याच्यासाठी इच्छितो, विपूल उपजीविका करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो, तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर ठेवणारा आहे आणि त्यांना पाहत आहे. 

(३१) आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ  आणि तुम्हालासुद्धा. वस्तुत: त्यांना ठार करणे एक मोठा अपराध आहे. 

(३२) व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. 

(३३) कोणाचीही हत्या करू नका जिला अल्लाहने निषिद्ध ठरविले आहे, परंतु न्याय व सत्यानिशी आणि जी व्यक्ती अन्यायाने ठार केली गेली असेल तिच्या वारसास आम्ही किसास (बदला) च्या मागणीचा हक्क दिला आहे.१३ म्हणून त्याने हत्येसंबंधी मर्यादा ओलांडू नये१४ त्याला मदत दिली जाईल.१५


१२) ‘हात बांधून घेणे’ ही कंजूसपणासाठी उपमा आहे व हात मोकळे सोडण्याने वायफळ खर्च अभिप्रेत आहे.  

१३) मूळ शब्द ‘त्याच्या वलीला आम्ही सुल्तान प्रदान केले आहे’ असे आहेत. सुल्तानने या ठिकाणी ‘प्रमाण’ अभिप्रेत आहे ज्याच्या आधारे तो किसास (बदला) ची मागणी करू शकतो.  

१४) हत्या करण्यात मर्यादा ओलांडण्याचे अनेक प्रकार असू शकतात व त्या सर्वांची मनाई आहे. उदा. सुडाच्या आवेशात अपराध्याशिवाय इतरांनाही ठार करणे, किंवा अपराध्याला यातना देऊन मारणे, अथवा ठार केल्यानंतर त्याच्या शवावर राग काढणे, अथवा खुनाचा मोबदला वसूल केल्यानंतर पुन्हा त्याला ठार करणे, इ.  

१५) त्या वेळपर्यंत इस्लामी राज्य प्रस्थापित झाले नव्हते म्हणून, त्याला मदत कोण करील या गोष्टीचा उलगडा केलेला नाही. हिजरतनंतर जेव्हा इस्लामी राज्य प्रस्थापित झाले तेव्हा त्याला मदत करणे त्याच्या मित्रांचे किंवा त्याच्या जातबिरादरीचे काम नव्हे तर इस्लामी राज्य व त्याच्या न्यायसंस्थेचे काम आहे, असे निश्चित केले गेले. कोणत्याही व्यक्तीला अगर समूहाला स्वत:च सूड घेण्याचा अधिकार नाही तर हे अधिकारस्थान इस्लामी राज्याचे आहे की न्याय मिळविण्यासाठी त्याची मदत मागितली जावी.


मुस्लिमांसाठी ‘पाच न्याय’ मागण्या - शिक्षण, आरक्षण, संरक्षण, प्रतिनिधित्व व विकास


आज मुस्लिम समाजास सामाजिक व राजकीय दृष्ट्या एकाकी पाडून त्यांना बहिष्कृत करण्याचा डाव होत आहे. त्यांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या उद्योग, व्यापार, व्यवसायावर बंधने आणून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. एकंदरीतच त्यांना सर्वांगांनी उध्वस्त करून त्यांचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न होत आहे. भेदभाव, जात धर्मवाद, सामाजिक बंधने व बहिष्कार यामुळे मुस्लिम समाज यापूर्वी कधीही नाही एवढा बेदखल व शक्तीहीन झालेला आहे. कमजोर, दुर्बल, पीडित, शोषित, अन्याय अत्याचारीत झालेला हा समाज लोकशाही संविधानिक हक्क, अधिकारापासून वंचित झालेला आहे. यापूर्वी झालेल्या अनेक अभ्यास व सर्वेक्षणातून मुस्लिम समाज दलितांच्या पेक्षा मागासलेला म्हणून निष्कर्ष समोर आलेला आहे. त्यांच्या लोकशाही हक्क, अधिकारासह सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आलेला आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील इतर समाज घटकांच्या बरोबरीने वाटचाल करायची असेल तर समाजास खालील महत्त्वाच्या गोष्टींवर व सरकारकडे मागण्यांवर जोर द्यावा लागेल.

शिक्षण 

कोणत्याही समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय अशक्य आहे. हे इस्लामनेही अधोरेखित केलेले आहे. परंतु आज मुस्लिम समाज शिक्षणाच्या बाबतीत अतिशय पाठीमागे पडलेला दिसून येतो. याबाबती समाजाने आधुनिक काळाशी जोडून घ्यावे लागेल. समाजातील बऱ्याच मुलांचे शिक्षण हे मदरशातून होते. हे आधुनिकतेशी न जुळणारे आहे.  काही मुले उर्दू भाषेतून शालेय शिक्षण घेतात. परंतु या भाषेतून उच्च शिक्षणाच्या संधी कमी आहेत. मुलींना ‘तहजीब’ च्या नावाखाली उर्दू शिक्षणात घातले जाते. त्यामुळे ही मुले उच्च शिक्षणातून बाहेर पडतात. मुलांना इतर समाजातील मुलांबरोबर सहशिक्षण शाळेपासून उच्च व व्यावसायिक शिक्षणापर्यंत मोफत मिळणे गरजेचे आहे. मुलींच्या उच्च शिक्षणावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी शिष्यवृत्ती देऊन शिक्षण प्रवाहात टिकवणे जरुरी आहे. एमपीएससी, यूपीएससी, इतर व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुलांना बार्टी, सारथी, महाज्योती सारख्या शिक्षण सुविधा मुस्लिम समाजांतील मुलांनाही मिळणे गरजेचे आहे.

आरक्षण 

इतर समाजाच्या बरोबरीने प्रगती व्हावी या दृष्टीने मुस्लिम समाजास शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण असणे अत्यावश्यक आहे. ओबीसी व इतर वर्गातील आरक्षणा बरोबरच इतर सर्व समाजास पाच टक्के आरक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने पाच टक्के आरक्षण मंजूर केले होते व ते कोर्टानेही योग्य व न्याय असलेचा निर्णय दिला होता. याबाबतीत येणाऱ्या सरकारने तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लिमांना इतर समाजाच्या बरोबरीने येण्यास मदत होईल. ज्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलांना व बेरोजगार तरुणांना योग्य न्याय मिळेल.

संरक्षण 

आज सर्वात ज्वलंत आणि ऐरणीवर आलेला मुस्लिमांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आज सामाजिक, राजकीय परिस्थिती इतकी स्फोटक झालेली आहे की कोणत्याही कारणास्तव, कोठेही, कांहीही घडू शकते. मुस्लिमांबद्दल इतर धर्मियांमध्ये इतके विष पेरून ठेवले आहे की अगदी शिल्लक कारणांनी सुद्धा तणावपूर्ण व दंगल सदृश्य वातावरण तयार होते. यातून मुस्लिमांची घरे, वाहने, मदररसे, उद्योग, व्यापार यावर हल्ले होत आहेत. प्रसंगी यातून निष्पापांना आपला जीवही गमवावा लागतो. ही एक प्रकारे माणुसकीची हत्याच म्हणावी लागेल. मॉबलिंचिंग सारखी घटना म्हणजे कायदा हातात घेऊन जोपासलेली एक क्रूर रानटी संस्कृतीच म्हणावी लागेल. दलित, मुस्लिम, आदिवासी यांना अमानुषपणे छळणे व त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांच्या डोक्यावर वर मुतणारी ही कोणती संस्कृती आपण रुजवतो आहे? बलात्कार, दंगली करणाऱ्यांचे सत्कार होत आहेत. अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना आहेत. अनेक वेळा संविधानिक पदावर बसलेली मंडळीच या गोष्टींना खत पाणी घालत आहेत व अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत. मुस्लिमांचे जगणे आणि जीवनच डावावर लागल्यासारखे झाले आहे. जीवन मरणाचा प्रश्न त्यांचे समोर उभा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणे गरजेचे आहे. याबाबतीत ‘जातीय धार्मिक द्वेष व दंगल विरोधी कायदा’ करणे सर्वात प्राधान्याचा मुद्दा आहे.

प्रतिनिधित्व 

मुस्लिमांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये योग्य न्याय वाटा मिळालाच पाहिजे. परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये अनेक लोकशाही संस्था व शासन पुरस्कृत सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मुस्लिम समाज लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज आहे. त्यांना वेगवेगळ्या लोकशाही व शासन संस्थांमध्ये योग्य व न्याय प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक गोष्टींचे हक्क, अधिकारांचे यथायोग्य संरक्षण व जतन होईल. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, शिक्षण, पोलीस, संरक्षण, राजकारण तसेच शासन पुरस्कृत संस्था, कला, साहित्य संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना योग्य व न्याय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे संरक्षण व सर्वसमावेशी होईल. आज उघड उघड सर्वच क्षेत्रांमध्ये मुस्लिमांना डावलले जात आहे. राजकारणामध्ये तर मुस्लिमांना अस्पृश्य ठरवले आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देशद्रोही समजले जाते. काही राजकीय पक्ष त्यांची मते नको म्हणण्यापर्यंत मजल गेलेली आहे. बीजेपी सारख्या सर्वात मोठ्या पक्षाचा संसदेमध्ये एकही मुस्लिम प्रतिनिधी असू नये ही खरेच सोचनीय गोष्ट आहे. त्यामुळे मुस्लिमांना लोकशाही संस्था व इतर शासन पुरस्कृत संस्थांमध्ये योग्य व न्याय प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे.

विकास 

लोककल्याणकारी राज्यव्यवस्थे-मध्ये समाजाच्या प्रत्येक समाज घटकांचा कशाप्रकारे सर्वांगीण विकास करता येईल हे पाहिले पाहिजे. हीच लोकशाही संस्कृती व व्यवहार आहे. याबाबतीत मुस्लिमांनाही त्यांच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे. यापूर्वी मुस्लिमांच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास अनेक आयोग व विशेष समितींद्वारे केलेला आहे. यामध्ये केंद्रीय स्तरावर मुख्यतः न्यायमूर्ती सच्चर आयोग व रंगनाथ मिश्रा समिती यांचे सर्वेक्षण अहवाल आहेत. महाराष्ट्र राज्य पातळीवर डाॅ. मेहमदुर रहेमान कमिटीनेही मुस्लिमांच्या परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे. या सर्वांमधून मुस्लिमांचे मागासलेपण अधोरेखित झालेले आहे. मुस्लिमांची सर्व क्षेत्रातील एकंदरीत परिस्थिती दलितांपेक्षाही वाईट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने या अभ्यास अहवालांमध्ये मुस्लिमांच्या विकास व सुरक्षेसाठी अनेक शिफारशी केलेल्या आहेत. परंतु केंद्राने व राज्यानेही याबाबतीत गांभीर्याने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. शिक्षण, नोकरी बरोबरच मुस्लिमांचे उद्योग, लघुउद्योग, स्वयंरोजगार, व्यापार, शेती, राहणीमान, आरोग्य, सार्वजनिक सोई सुविधा, बँकांचे अर्थसहाय्य तसेच अशाच इतर अनेक बाबींमध्ये मुस्लिमांच्या विकासाचा टक्का घसरलेला आहे. याबाबतीत मुस्लिमांचे सर्वांगीण विकासाचे दृष्टीने योग्य व न्याय कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

मुस्लिमांची राजकीय भूमिका, कार्यक्रम व मागण्या संदर्भात केलेले लिखाण फार तपशिलात न जाता त्रोटक व ढोबळ स्वरूपात केलेले आहे. याबाबतीत सविस्तरपणे चर्चा व मांडणी करता येईल. सर्वसामान्यांना संघटित करण्याची दृष्टीने एक विचार, भूमिका, कार्यक्रम व मागण्या कोणत्या असाव्यात? या उद्देशाने सदरचे लिखाण केलेले आहे. लोकशाही चळवळ व संस्कृती मजबूत करून त्यामध्ये सर्व समाज घटकांचे हक्क, अधिकार व हीत कसे जपता येईल या दृष्टीने तत्वविचार व कृती कार्यक्रम राबवणे अत्यंत जरुरीचे आहे. मुस्लिमांनी वरील विचारांशी द्रोह न करता सच्चा, प्रामाणिक व निष्ठेने कार्य करणाऱ्या प्रतिनिधींची निवड करावी. याबाबतची पक्की हमी व गॅरंटी त्यांचेकडून घ्यावी. मुस्लिमांची मते घेऊन पुन्हा त्यांचेच विरोधी विचारांच्या मर्कटलिला मध्ये सामील होणारा नसावा. स्वतःचा स्वार्थ व भ्रष्टाचार लपविण्यासाठी कोणत्याही राजकीय तडजोडी करणारा व आपल्या विचारांना तिलांजली देणारा नसावा. आपले आणि समाजाचे हीत व कल्याण करणारा असावा. आपणही स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाच्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता दृढनिश्चयाने मतदान करावे.

(उत्तरार्ध)


- शफीक देसाई

सामाजिक कार्यकर्ते 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget