माफी, सुसंस्कृतपणाचे लक्षण
प्रेरणादायी सत्यकथा
चूक सर्वांकडूनच होत असते. लहान असो, मोठे असो, गरीब असो की श्रीमंत. कोणीही असो. असे म्हटले जाते की, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. परंतु काही लोक असे असतात की जे आपली चूक मान्य करायला तयार होत नाहीत. खरे तर आपली चूक झाली असेल तर, ती मान्य करायला काय हरकत आहे. चूक मान्य केल्याने माणूस काही लहान होत नाही. आपली चूक मान्य करून ती दुरुस्त करणे उलट यात मोठेपणाचा आहे. परंतु काही लोक असे शिरजोर असतात की चूक मान्यच करत नाहीत. माफी मागणे तर दूर.
अनेकांना असे वाटते की हा आत्म-अनादर आहे. माफी मागणे हे सूसंस्कृतपणाचे लक्षण आहे. चांगले आचरण आहे.
एक अशीच सत्य घटना. आपली चूक लक्षात येताच त्या भल्या माणसाने अशा काही पद्धतीने क्षमा मागितली की इतिहासात माफी मागणारा आणि माफी देणारा दोघेही अजरामर झालेत.
एकदा झाले असे की अबू जर गफारी (र.) यांची काहीतरी चूक झाली. आदरणीय बिलाल यांनी सहज ती निदर्शनास आणून दिली. अबू जर यांना ते खुपले नाही. त्यांना राग आला आणि ते आदरणीय बिलाल यांना म्हणाले, "हे काळ्या चेहऱ्याच्या आईच्या मुला, आता तुही माझ्या चुका बाहेर काढशील?"
आदरणीय बिलाल निग्रो वंशीय होते. साहजिकच त्यांचा रंग अतिशय काळा होता. मक्कामध्ये वास्तव्यास असताना ते गुलामीचे जीवन व्यतीत करत होते. त्या काळात उच्च जातीचे लोक कनिष्ठ जातीच्या लोकांना गुलाम बनवून ठेवायचे. जनावरांप्रमाणे या गुलामांची खरेदी-विक्री व्हायची. त्यांना कोणतेच अधिकार नव्हते. मालकाच्या मर्जीप्रमाणे राहावे लागायचे.
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी एकेश्वरत्वाची घोषणा केली आणि इस्लामची शिकवण द्यायला सुरुवात केली. 'सर्व मानवजात समान आहे. माणूस म्हणून सर्वांना समान अधिकार आहेत. गोरा-काळा सर्व समान आहेत. कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, मोठा तो आहे ज्याच्यात अधिक ईशभय आहे.' या शिकवणीने बिलाल प्रेषितांकडे आकर्षित झाले. त्यांनी प्रेषितांचे अनुयायित्व पत्करले.
त्यांच्या मालकाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्याने बिलाल (र.) यांच्यावर खूप अत्याचार करायला सुरुवात केली. भर उन्हात तपत्या वाळवंटात त्यांना झोपवून त्यांच्या छातीवर दगड ठेवायचा. चाबकाचे फटके द्यायचा. बिलाल (र.) सतत एकच शब्द उच्चारायचे 'अहद' अर्थात ईश्वर हा एकच आहे. त्यामुळे त्यांचा मालक अधिकच चिडायचा. आणखीन त्यांच्यावर अत्याचार करायचा. सर्व अन्याय अत्याचार सहन केले परंतु एकेश्वरत्वाची दोरी त्यांनी सोडली नाही.
जेव्हा ही बाब प्रेषितांना समजली तेव्हा त्यांनी अबू बकर (र.) यांना ही गोष्ट सांगितली. अबू बकर (र.) यांनी बिलाल (र.) यांना त्यांच्या मालकाकडून मोठी रक्कम देऊन खरेदी केले आणि मुक्त करून टाकले.
मुक्त होताच ते प्रेषितांच्या समक्ष हजर झाले. प्रेषितांच्या दरबारात त्यांना फार मानाचे स्थान होते. मोठमोठे सरदार व्यापारी आणि उच्च कुळातील लोक उपस्थित असतानादेखील इस्लामची पहिली अजान देण्याचा मान बिलाल (र.) यांनाच मिळाला होता. एवढेच नव्हे तर प्रेषितांच्या संपूर्ण जीवनात बिलाल (र.) हेच अजान द्यायचे. ते फार संयमी होते परंतु आपल्या आईचा अपमान त्यांना सहन झाला नाही.
अबू जर सहज बोलून गेले होते. त्यांना वाटले नव्हते की बिलाल (र.) एवढे मनाला लावून घेतील. अबू जर (र.) यांच्या बोलण्याने बिलाल (र.) यांचे मन दुखावले.
बिलाल (र.) म्हणाले, "पालनकर्त्याची शपथ! मी नक्कीच ही बाब अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर प्रस्तुत करीन. तुम्हाला त्यांच्यासमोर उभे करीन!"
आणि त्यांनी खरोखरच ही बाब प्रेषितांसमोर मांडली. हे ऐकून प्रेषित नाराज झाले. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला.
प्रेषित (स.) म्हणाले, "हे अबू जर (र.), तुम्ही त्याला त्याच्या आईच्या नावाने लाजविले... तुमच्यातील अज्ञानता अजून गेलेली नाही."
प्रेषितांचे हे शब्द ऐकताच आणि ते नाराज झाल्याचे समजताच अबू जर (र.) रडायला लागले, "हे अल्लाहचे प्रेषित (स.)! माझ्यासाठी अल्लाहकडे माफीसाठी प्रार्थना करा."
असे म्हणत, बिलाल (र.) समोर हजर झाले. आपला चेहरा मातीवर ठेवला आणि बिलाल (र.) यांना उद्देशून म्हणाले, "बिलाल (र.)! जोपर्यंत तू माझा चेहरा तुझ्या पायाने तुडवत नाहीस, तोपर्यंत मी मातीतून माझा चेहरा उचलणार नाही." हे पाहून बिलाल (र.) रडत रडत अबू जर (र.) यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या गालाचे चुंबन घेतले आणि उत्स्फूर्तपणे म्हटले, "अल्लाहसमोर नतमस्तक होणाऱ्या या मुखाला मी कसे तुडवू?"
नंतर दोघेही उभे राहिले आणि एकमेकांना मिठी मारून खूप रडले!!
-सय्यद झाकीर अली,
परभणी,
9028065881