Halloween Costume ideas 2015
October 2020


देशातील परिवर्तनवादी चळवळींचे ध्येय आहे आदर्श भारत निर्मितीचे! अर्थात समताधिष्ठित, बंधुभावाधिष्ठित, न्यायाधिष्ठित समाज निर्मितीचे. महाराष्ट्र तर या बाबतीत अग्रेसर राज्य असून त्याला ’फुले-शाहू-आंबेडकरी’ विचारांचा रास्त अभिमान आहे. आदर्श समाज निर्मितीच्याच उदात्त उद्दीष्टाने निर्मात्याने या धरतीवर सुरूवातीपासून पैगंबरांना पाठविले. प्रत्येकाने आपापल्या भौगोलिक क्षेत्रात व आपापल्या समाजात या आदशर्र् क्रांतिसाठी पराकोटीचा संघर्ष केला. पैगंबरी शृंखलेतील शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी 1442 वर्षांपूर्वी ही आदर्श क्रांति घडवून एक आदर्श समाज उभा केला. जेथे स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय प्रत्यक्षात प्रस्थापित होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या क्रांतीचे गुणगान करतांना राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात. ‘ तेरावी सद्दीची पैगंबरी खुण! दावीतो प्रमाण कुराणात!

जगी स्त्री पुरूष सत्यधर्मी होती! आनंदे वर्तती ज्योती म्हणे!‘

फुलेंचा हा दुर्मिळ अखंड त्यांनी लिहिलेल्या ’सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या मूळप्रतीच्या मुखपृष्ठावर असून हरी नरके यांनी इंग्लंडच्या म्यूझियम मधील मूळ प्रतीवर स्वत: वाचलेला आहे. मात्र येथील प्रस्थापितांनी बहुजन समाजाला मुस्लिमांशी जोडणारा हा अखंड मुद्दामहुन त्या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्यांतून गाळून टाकला. तो पून्हा या ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी समस्त परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांची गरज आहे.  

संतश्रेष्ठ तुकोबांच्या गाथेतही पैगंबरांचा आदरयुक्त उल्लेख आहे. आवल नाम आल्ला बडा लेते भूल न जाये! आल्ला एक तू नबी एक !! धृ !! (संत तुकाराम महाराज अभंग गाथा - देहू देवस्थान - अभंग - 440) तुकोबांनी अनेक अभंगांतून एकाच इश्‍वराची, समतेची, बंधूत्वाची, न्यायाची ठाम भूमिका मांडली आहे.

छत्रपति शिवरायांनी देखील कुराणाबद्दल, पैगंबरांबद्दल आदर व्यक्त केला आहे. राष्ट्रपिता फुल्यांनी पैगंबरांवर पहीला पोवाडा लिहिला. या पोवाड्यात महात्मा फुले लिहितात, 

‘ कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !   जात प्रमादास खोडी बूडी !

मोडिला अधर्म आणि मतभेद ! सर्वात अभेद ठाम केला !‘

अर्थात-पैगंबरांनी श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद नाकारला ! गुलामगिरी (दास्यत्व) नाकारली. जाती-पातीला बुडासकट नष्ट केले! अधर्म आणि भेदाभेद मोडून काढला! सर्वात अभेद, समता, बंधुभाव ठाम केला! एक भारतीय महान सुपुत्र डॉ.इक्बाल (रह.) पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेचे वर्णन करतांना म्हणतात, ‘ एक ही सफमें खडे हो गए मेहमूद व अयाज! ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज.‘ अर्थात राष्ट्रप्रमुख व शिपाई एकाच रांगेत खांद्याला खांदा लाऊन उभे ठाकले! कोणी गुलाम राहिला नाही ना कोणी मालक!

पैगंबरांनी ही महान सामाजिक क्रांती घडवतांना संपूर्ण समाज व्यसनमुक्त केला. दारू व तत्सम नशा आणणारे पदार्थ हराम, निषिध्द ठरविले. आज आपल्या देशात व्यसनाधिनता वाढत आहे. पैगंबरांनी दारूचे उत्पादन, वाहतुक, खरेदी-विक्री व सेवन या सर्व गोष्टी हराम ठरविल्या! समाज व देशहितासाठी हे करावेच लागेल. र्दु्दैवाने आपले सरकार पैशांसाठी लॉकडाऊन मध्ये सुध्दा दारूला बंद करत नाही! सरकारला दारूपासून मिळणार्‍या उत्पन्नाची चिंता आहे, दारूपासून उध्वस्त होणार्‍या संसाराची व इतर दुष्परिणामांची नाही.

अर्थव्यवस्थेमध्ये जी अभूतपूर्व क्रांति पैगंबरांनी घडवली त्यात व्याज देण्या-घेण्या वर बंदी हे अत्यंत महत्वाचे घटक आहे! तुकोबांनी आपली वडिलोपार्जित व्याजाची कागदपत्रे इंद्रायणीत बुडविल्याचे सर्वज्ञात आहे. एकीकडे पैगंबरांनी व्याजाला हराम ठरवले तर दुसरीकडे श्रीमंतावर जकात अनिवार्य केली. याचा ईष्ट परिणाम  हा झाला की समाजातील प्रत्येक कुटूंब जकात देण्या इतपत सधन झाले! जकात घेणारा कोणी शोधून सापडेना!

पैगंबरांची शैक्षणिक क्रांति अभूतपूर्व आहे! स्त्री पुरूषांवर, मुला-मुलीवर, अबाल वृध्दांवर शिक्षण अनिवार्य ठरवून त्यांनी एका निरक्षर समाजाला 100 टक्के साक्षर केले. साक्षर कैद्यांना प्रत्येकी 10 निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याची ऐतिहासीक शिक्षा देऊन त्यांनी आपल्या ठायी असलेली शिक्षणाची महत्ता विषद केली. स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरांनी घडवलेली क्रांति अविस्मरणीय अशी आहे! स्त्री शिक्षण, वारसाहक्क, विधवा विवाह, स्त्री-भृणहत्या बंदी, व्याभिचारी नराधमांना कठोर शासन आदी पैगंबरांचे कार्य बोलके आहे. नसता आपल्या देशात आजही उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये घडलेली घटना आणि ती हाताळणारे निष्क्रीय नव्हे अत्याचारींचे समर्थक शासन आणि तितक्याच निष्क्रीयतेने हा सर्व अत्याचार पाहणारी जनता या सर्व बाबी अत्यंत निंदनिय आहेत.

पैगंबरांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी घडवलेल्या या महान, न भूतो न भविष्यती अशा क्रांतीचे श्रेय यत्किंचितही स्वत:कडे न घेता सारे श्रेय जगत निर्मात्या अल्लाहला दिले! मी तुमच्यासारखाच एक सामान्यकार्यकर्ता! हे सर्व या अल्लाहच्याच कृपेमुळे घडले अशी ठाम भूमिका घेऊन स्वत:ची विनम्रता त्यांनी जगापुढे ठेवली. मी जे काही करतो ते नि:स्वार्थपणे केवळ अल्लाहसाठी! नावलौकीकासाठी कदापि नव्हे! याच निस्वार्थपणाची आज नितांत गरज आहे. नसता अनेक चळवळींमध्ये केवळ कार्यकर्त्यांच्या स्वार्थी वृत्तिमुळे फूट पडत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे योग्य प्रबोधन महत्वाचे आहे. केवळ स्वार्थासाठी जर आपण चळवळींचे नुकसान करत असू तर आपल्याला या महापुरूषांचे नाव तरी घेण्याचा नैतिक अधिकार आहे का?  हा विचार प्रत्येकाने करावयास हवा. आज विघटनाची नव्हे तर संघटनेची नितांत गरज आहे. भारतातील परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यकर्त्यांनी पैगंबर आणि त्यांच्या कार्याकडे सामाजीक परिवर्तन घडवणारे क्रांतिदूत या दृष्टीने पाहिले पाहीजे. आपल्याला अपेक्षित परिवर्तन घडविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकजूट अनिवार्य आहे. आज अनेक कार्यकर्ते ही एकजूट घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत व त्यांना यशही येत आहे. मराठा, मुस्लिम, माळी, महार, मातंग इ. प्रमुख समाज घटकांमध्ये ऐक्य दिवसेंदिवस वाढत आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र शाखेने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ’सामाजिक ऐक्य परिषदेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सामाजिक ऐक्य परिषदेचे खंदे समर्थक आदरणीय ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. वारकरी चळवळीतील समतेचा, बंधूत्वाचा, न्यायाचा एक खंदा समर्थक हरपला! सिंह हरपला! सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना आदरांजली!

पैगंबर जयंती साजरी करणार्‍या त्यांच्या अनुयायींचे अर्थात मुस्लिम बांधवांचे हे आद्यकर्तव्य आहे की त्यांनी पैगंबरांचे हे खरे क्रांतिकारी कार्य सर्वधर्मीय समाजबांधवांपर्यंत पोहचवावे. त्यासाठीच  हा अल्पसा लेख!


- डॉ. रफिक पारनेरकर


बांधावर नेत्यांचे दौरे : शेतकर्‍यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न



“परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील 22  जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हाता-तोंडाशी आलेली पीके डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी हताश झालेले आहेत. केंद्र,राज्य शासनाने शेतकर्‍यांना सावरण्यासाठी तातडीची मदत देऊन त्यांची असहाय्यता दूर करावी. या कामी केंद्र सरकारनेही सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ राज्य सरकारची मदत करावी.”

 - रिजवानुर्रहेमान खान, प्रदेशाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, महाराष्ट्र.


परतीच्या पावसाने जाता-जाता तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना अक्षर: झोडपून काढले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर सहीत 19 जिल्ह्यांत शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केलेे. विशेष: मराठवाडा आणि पंढरपूर परिसरातील शेती अक्षर: डोळ्यादेखत उध्वस्त झाली.  सोयाबीन हे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरतात. अशातच हाता-तोंडाशी  आलेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे  कुठे ते कुजले, कुठं त्याला मोड फुटली आणि अनेक ठिकाणी पीक कापून झाकून ठेवलेल्या गंजी डोळ्यादेखत वाहून गेल्या आणि शेतकरी असहाय्यपणे त्याकडे बघत राहिले. 

शेतकर्‍यांनी हमखास फायदा देणारे पीक म्हणून ऊसाची लागवड केली होती. त्यावरही अतिवृष्टीचा परिणाम झाला. लवकर गाळप सुरू झालं तर थोडाफार ऊस उपयोगाला येईल अन्यथा उसाचे पीकही नष्ट झाल्यातच जमा आहे. पावसामुळे शेतात साचलेले पाणी उतरायला आणि चिखल संपायला बराच वेळ  लागणार आहे. चिखलात ऊसाच्या फडात जावून तोडणी करणे शक्य नाही. म्हणजे सोयाबीन वाहून गेले आणि ऊस सडून गेले. या दोन पिकाशिवाय, तूर, कापूस, मूग, उडदाची दैना झाली. एकूणच खरीपामध्ये येणारी सर्व पीके जाता-जाता पाऊस सोबत घेऊन गेला. ग्रामीण भागात या परतीच्या पावसाला काळे दिवस म्हणून शेतकरी संबोधू लागलेले आहेत. या पीकावर शेतकर्‍यांनी जे-जे मनसूबे बांधलेले होते ते-ते उध्वस्त झालेले आहेत. राज्य शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे जरी आदेश दिले असले आणि मागच्या सरकारने सांगितलेल्या प्रमाणे 72 तासाच्या आत फोटो काढून अपलोड करायचा हे ही सोपे काम नाही. नेहमीप्रमाणे शेतकर्‍यांच्या या असहाय्यतेचा अंदाज राज्यात सर्वप्रथम शरद पवारांना आला आणि कोविडच्या साथीच्या परवा न करता या 81 वर्षीय नेत्याने थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी भेट घेऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. केंद्र आणि राज्य शासनाकडे मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. तदनंतर शेतीच्या नुकसान पाहणीसाठी सत्ताधारी, विरोधक आणि अन्य नेत्यांनी बांधावर गर्दी केली. शेतकरी नेते राजू शेट्टी लातुरात म्हणाले, ’शेतीचे जवळपास 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य शासनाने तात्काळ मदत द्यावी’. 

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र शेतकर्‍यांची अवस्था पाहून कोणीही नगदी मदत देण्यास तयारी दाखवत नाही. सध्या अनेक नेते शासनाकडे बोट दाखवित आहेत.  केंद्र व राज्य शासनानेही गतीने पंचनामे करावेत. महसूलचे मनुष्यबळ कमी पडले तर कोविडमध्ये जशी अन्य विभागातील कर्मचार्‍यांची सरकारने मदत घेतली तशी मदत घेऊन पंचनामे लवकर करावेत. अतिव नुकसान झालेल्या शेतकरी, मजुरांना अन्नधान्य पुरवठा करावा. अतिवृष्टीत ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांच्याही घरांचे सर्वेक्षण केले तर असहाय्य झालेल्या शेतकरी व महाराष्ट्रजनांना दिलासा मिळेल. एवढे मात्र नक्की.  


- बशीर शेख, उपसंपादक  9923715373




१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर इंग्रजी सत्तेने मुस्लिम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लिम समाजाला बाजूला सारले. मुस्लिम समाजाची मदरसा शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भुमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या ऐतिहासिक पध्दतीची मुहुर्तमेढ रोवली. अनेक मौलवींना फासावर टांगले. मुस्लिम विद्वानांच्या कत्तली घडवून आणल्या. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय दमनाचे प्रयत्न चहुबाजूने सुरु होते. या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या सर सय्यद यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या अभ्युदयासाठी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली. इसवी सन १८७५ मध्ये स्थापन झालेल्या या कॉलेजचे नंतर अलिगड युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर झाले. कालांतराने वद्यापीठातून अलिगड चळवळ उदयास आली. त्यातून जन्मलेला विचारप्रवाह आजही मुस्लिम समाजाला दिशा देण्याचे काम करतो. हा विचारप्रवाह समृध्द व्हावा म्हणून सर सय्यद यांनी खुप खस्ता खाल्ल्या. अवमानना सहन केली. हालअपेष्टा सोसल्या. मोहम्मदन कॉलेज उभे करण्यासाठी सर सय्यद यांनी अक्षरशः भिक मागितली. 

मुस्लिम समाजाच्या विरोधात घेतलेल्या टोकाच्या भुमिकेमुळे इंग्रजांविषयी समाजात पराकोटीची द्वेषभावना होती. मदरसा शिक्षणप्रणालीवरील आघातामुळे मुस्लिम समाजात इंग्रजीविषयी देखील रोष होता. इंग्रज आपली भाषा आणि संस्कृती मोडीत काढत आहेत, असे त्यांना वाटत होते. अशा विरोधी परिस्थितीत सर सय्यद यांनी वास्तवाचे भान घेउन इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा विचार मांडला.  त्यामुळे सर सय्यद यांना विरोध होणे स्वाभाविक होते. मुस्लिमांना सर सय्यद इंग्रजीच्या व इंग्रजांच्या समर्थनात आहेत, असे वाटे. त्यामुळे ते त्यांच्याविरोधात गेले. अनेक वर्तमानपत्रात सर सय्यद यांच्याविरोधात लेख प्रकाशित झाले. काहींनी  तर फतवे देखील आणले. पण सर सय्यद या साऱ्यांना बधले नाहीत. 

प्रख्यात विद्वान मौलाना अल्ताफ हुसैन हाली हे सर सय्यद यांचे मित्र होते. त्यांनी सर सय्यद यांचे पहिले चरित्र लिहिले आहे. ‘हयात ए जाविद’ या नावाने ते विख्यात आहे. त्यामध्ये सर सय्यद यांनी कशापध्दतीने निधी जमवला त्याची माहिती दिली  आहे. सर सय्यद यांनी सुरुवातीला बनारसमधील आपल्या काही हिंदू आणि मुस्लिम मित्रांकडे मदत मागितली. सर सय्यद हे बनारस मध्ये इंग्रजांच्या सेवेत कार्यरत होते. मोहम्मदन  कॉलेजच्या स्थापनेनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. बनारसमधून मिळालेल्या रकमेतून महाविद्यालयाची उभारणी अशक्य होती. मग अलिगड, लाहोर, पटियाला, पटना, मिर्झापूर, हैदराबाद अशा अनेक शहरात देणग्या गोळा करण्यासाठी फिरायला लागले. अख्ख्या भारतभर सर सय्यद यांनी पायपीट केली.

बक्षिस योजनेतून वीस हजार रुपये जमवले  

नवाब अमुजान हे सर सय्यद यांचे जवळचे नातवाईक होते. एकदा सर सय्यद यांनी त्यांना मुस्लिम समाजातून शिक्षणसंस्थेसाठी दहा लाखांचा निधी जमवता येईल का? असा प्रश्न केला. त्यावेळी अमुजान यांनी  दहा लाख पैसेही जमवणे शक्य नसल्याचे सांगून सर सय्यद यांचा विचार मोडीत काढला होता. कालांतराने मोहम्मदन कॉलेज उभे राहिले. मौलाना हाली हा प्रसंग नोंदवून लिहितात, ‘‘ असे अनुभव आल्यानंतरही सर सय्यद थांबले नाहीत. अवघ्या वीस वर्षाच्या काळात महाविद्यालयाची सात – आठ लाख रुपयाची इमारत उभी राहिली. आणि महाविद्यालयाचे वार्षिक निधी संकलन ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.’’ 

सर सय्यद यांनी मोहम्मदन कॉलेजसाठी निधी जमवताना प्रचंड खस्ता खाल्या. स्वतःची आणि कुटुंबांची सर्व संपत्ती महाविद्यालयाला दिली. सुरुवीतीच्या काळात सर सय्यद यांनी महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध होईना, तेव्हा एक बक्षिस योजना जाहिर केली. अनेक वस्तू बक्षिसाच्या रुपात ठेवल्या. मुस्लिम समाजातून ही बक्षिस योजना जुगारासारखी असल्याची टिका झाली. धार्मिक दृष्टीने हे ‘हराम’ ( निषिध्द ) कार्य असल्याचे म्हटले गेले. मात्र सर सय्यद यांचा विचार बदलला नाही. त्यातून संस्थेला तब्बल २० हजार रुपयांचा नफा झाला. तो सर  सय्यद यांनी महाविद्यालयासाठी वापरला. 

ओवाळणीच्या रकमा घेतल्या, स्वतःचे ग्रंथालयही विकले. 

पटियाला संस्थानचे वजीर खलिफा सय्यद मोहम्मद हसन खाँ यांना नातू झाल्याचे सर सय्यद यांना समजले. त्यांनी वजीरसाहेबांना ओवाळणी म्हणून पाच रुपये मागितले. पण सर सय्यद ओवाळणी का मागत आहेत, याची वजीर साहेबांना कल्पना होती. वजीर साहेबांनी सर सय्यद यांच्या महाविद्यालयाला मोठी रक्कम निधी म्हणून दिली. महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पैश्याची चणचण जाणवू लागली, त्यावेळी सर सय्यद यांनी स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथ विकले. त्यातूनही गरज भागेना तेव्हा मित्रांच्या ग्रंथालयातील ग्रंथ निधी म्हणून घेउन ते विकले. तर कधी गाण्याच्या कार्यक्रमात गजला गाउन पैसा मिळवला. तर कधी स्वतःच्या चित्रकलेचे वेड त्यांच्या कामी आले. चित्रे बनवून ती विकली. त्यातून त्यांनी पैसा उभा केला. सर सय्यद यांचा जन्म उच्चभ्रु कुटुंबात झाला होता. त्यांचे अजोबा सर सय्यद यांची उर्दु बिघडू नये म्हणून त्यांना गल्लीतल्या मुलांमध्ये खेळायलाही पाठवत नसत. ते सर सय्यद महाविद्यालयासाठी स्वतःची पत, प्रतिष्ठा विसरुन पडेल ते काम करायला लागले. कधी बाजारात पुस्तकांचे दुकान लावत तर कधी त्याच बाजारात झोळी पसरुन भिक मागायला लागत. एकदा सर सय्यद  मदत मागायला येत असल्याचे पाहिल्यानंतर काही विरोधकांनी लघवीनंतर स्वच्छतेसाठी वापरलेल्या विटांचे तुकडे त्यांच्या झोळीत टाकले. सर सय्यद यांनी आनंदाने त्याचाही स्विकार केला. पण आपली ध्येयनिष्ठा अढळ राखली.

हास्यकथा कथन

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात शहरामध्ये विनोदविरांच्या हास्यकथा कथनाचे कार्यक्रम व्हायचे. लोक त्यातून आनंद घ्यायचे. पण कथाकथनकाराकडे अतिशय तुच्छ नजरेने पाहायचे. त्यांना समाजात विदुषकांसारखे अत्यंत वाईट स्थान होते. पण त्यातून पैसा चांगला मिळायचा. सर सय्यद यांना मोहम्मदन महाविद्यलयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरु करायची होती. त्याकरीता पैसा जमवण्यासाठी सर सय्यद यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. पण सर सय्यद यांच्या मित्रांनी समाजात अप्रतिष्ठा होईल म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सर सय्यद निर्णयावर ठाम होते. त्यांनी हास्यकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर सय्यद यांनी अत्यंत जोशपुर्वक भाषण केले. मौलाना हाली यांनी त्यातील काही अंश ‘हयात ए जावीद’ मध्ये दिला आहे.  सर सय्यद त्या भाषणात म्हणाले, ‘‘ कौन है जो आज मुझको स्टेज पर देखकर हैरान होता होगा ? वही जिनके दिल में कौम का दर्द नहीं. वही जिनका दिल झुठी शेखी और झुठी मशख्त ( मोठेपणा ) से भरा हुआ है ।  आह उस कौमपर जो शर्मनाक बातों को अपनी शेखी और इफ्तेखार ( गर्व /अहंकार ) का बाईस समझे और जो काम कौम और इन्सान की भलाई के लिए नेक नियती से किए जाएं उनको बेइज्जती के काम समझे । आह उस कौमपर जो लोगों को धोका देने के लिए मुकर व पिंदार ( धोका आणि दुराभिमान ) के काले सुत से बने हुए तखद्दुस के बुर्खे को अपने मुंह पर डाले हुए हो, मगर अपनी बदसुरती और दिल कि बुराई का कुछ इलाज न सोचें । आह उसपर जो अपनी कौम को जिल्लत और निकबत के समंदर में, डुबता हुआ देखे, और खुद किनारे पर बैठा हसता रहे अपने घर में खुले खजाने ऐसी बेशरमी और बेहयाई के काम करें जिनसे बेशरमी व बेहयाई भी शरमा जाए, लेकीन कौम के भलाई के काम को शरम और नफरे  का काम समझे । ( लाजिरवाणे आणि हेटाळणीचे काम )

ऐ रईसों और दौलतमंदो । तुम अपनी दौलत व हिश्मत पर मगरुर होकर यह मत समझो की कौम की बुरी हालत हो और हमारे बच्चों के लिए सबकुछ है, यही उन लोगों का खयाल था जो तुमसे पहले थे । मगर अब इन्हीं के बच्चों की वह नौबत है, जिसके लिए हम आज स्टेज पर खडे हैं । ऐ, साहिबों । हर कोई तस्लीम करता है के, तालीम न होने से कौम का हाल रोज बरोज खराब होता जाता है । कौम के बच्चे इखराजात  ए तालीम  के सरअंजाम न होने से ( शिक्षणाचा खर्च उचलण्याची ऐपत नसल्याने  ) जलील और रजील होते जाते हैं । (अपमानित होणे )  मैने कोई पहलू ऐसा नहीं छोडा जिससे कौम के गरीब बच्चों के इखराजात ए तालीम में मदत पहुंचे । मगर अफसोस कामयाबी नहीं हुई । खुद लोगों से भिख मांगी मगर कलील मिली । ( कमी प्रमाणात मिळाले. ) व्हॉलेंटर बनाने चाहे मगर बहोत कम बनें  और जो  बने उनसे कुछ बन न आई । पस मैं स्टेज पर इसलिए आया हूं के कौम के बच्चों की तालीम के लिए कुछ कर सकूं ।’’

सर सय्यद यांच्या या भाषणावरुन त्यांची भुमिका व त्याविषीयीची तडफ दिसून येते. सर सय्यद अनेक संस्थानिकांकडेही निधीसाठी गेले होते. आपल्या अनेक मित्रांकरवी त्यांनी संस्थानिकांशी संपर्क केला. हैदराबादचे सहावे निजाम मीर महिबूब अली यांना सर सय्यद भेटायला गेले. पण मीर महिबूब अलींशी त्यांची भेट झाली नाही. तर प्रवासाचा खर्च निघावा म्हणून सर सय्यद यांनी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. स्वतः नर्तकाच्या भुमिकेत स्टेजवर उभे राहिले.  मोठ –मोठ्या श्रीमंत व्यक्तींनाही त्यांनी निधीसाठी साद घातली. निधीसाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने मुस्लिम समाजाने त्यांच्या या कार्याची दखल त्यांच्या हयातीत आणि मृत्युनंतरही म्हणावी तशी घेतली नाही. 


- सरफराज अहमद

मो. ८६२४०५०४०३

(सदस्य, गाजियुद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर, संपादक- डेक्कन क्वेस्ट)



ज्या अर्थी आम्ही नारदवंशीय आहोत आणि आमचा जन्म सर्वपित्नी अमावस्येच्या मध्यरात्री मुळ नक्षत्रात झालेला आहे आणि या पृथ्वीतळावरील तमाम मनुष्यप्राणी आम्हाला पत्रकार म्हणून ओळखतात,( काही जळाऊ प्रवृत्तीचे नतद्रष्ट आम्हाला पत्रावळीकार म्हणतात. असो.) त्या अर्थी कोणत्याही घटनेच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही केव्हाही, कोणत्याही ठिकाणी जाऊन, कोणालाही हवे ते किंवा नको ते प्रश्न विचारून त्याच्याकडून हवी ती माहिती काढून घेऊन, ती हव्या त्या प्रकारे किंवा नको त्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवून कोणाच्याही मुळावर उठू शकतो. हा आमचा जन्मसिद्ध आणि घटनादत्त अधिकार आहे आणि आम्ही कोणत्याही घटनात्मक पदावर आरूढ नसल्यामुळे वागण्याबोलण्याचे तारतम्य बाळगून तो आम्ही बिनदिक्कतपणे बजावत असतो. (याला आमचे काही मित्र निर्लज्जपणा म्हणतात. म्हणोत बापडे.)

आज रामप्रहरी (काही धर्मनिरपेक्ष लोक याला सकाळ म्हणतात, पण पुढेमागे आम्हाला आमचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी कोणाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही अशीच भाषा वापरतो. असो.) बायकोने समोर आदळलेला कपभर चहा पोटात ढकलून, (दिवसभरात स्वखर्चाने आम्ही फक्त एवढंच पोटात ढकलतो. बाकी सर्व आमची पत्रकारिता सांभाळून घेते! असो.) खांद्यावर झोला अडकवून आम्ही घराबाहेर पडलो. फिरता फिरता आम्ही 'मातोश्री' महालाजवळ पोहोचलो. तिथल्या द्वारपालांच्या हातात बिस्किटांचे पुडे होते. ते बिस्किटं खाण्यात दंग होते. एका कोपऱ्यात बिस्किटांची ५०-६० खोकी पडलेली होती. चौकशीअंती ती बिहारला पाठविण्यासाठी मागवलेली आणि आता काहीच कामाची नसलेली बिस्किटं असल्याचं कळलं. तिकडे जाऊन आम्ही हळूच पाच सहा पुडे आमच्या झोळीत टाकून घेतले. (झोळीत असलं फुकटचं काही पडल्याशिवाय पत्रकार असल्याचा फिलच येत नाही! अर्धी सोय तर झाली. आता फक्त कोणीतरी चहा पाजणारा शोधायला हवा.असो.) अंगणातच एका बाजूला दोन चार मावळे तुतारी कुंकण्याचा सराव करीत होते. त्यांना टाळून आम्ही हळूच दिवाणखान्याच्या दारापाशी पोहचलो. सरळ आत जाऊन मिळवलेल्या बातमीपेक्षा दाराआड लपून मिळविलेली बातमी जास्त खरी आणि खुसखुशीत असते याचं बाळकडू आमची पत्रकारिता बाल्यावस्थेत असतांनाच आम्हाला आमच्या ज्येष्ठांनी पाजलेलं असल्यामुळे आम्ही दाराच्या आडोश्याला थांबणंच पसंत केलं. आतमध्ये सामानाची बांधाबांध सुरू होती. प्रत्यक्ष उधोजीराजे आणि बाळराजे समोर उभे राहून कामावर देखरेख ठेऊन होते. 'वर्षा'वर जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू असावी असा आम्ही अंदाज बांधला आणि आमचे डोळे भरून आले.'कशाला उगीच थोड्या दिवसांसाठी धावपळ करता ? उगाच जा जा अन् ये ये.' असं उधोजीराजेंना समजवावं असं क्षणभर वाटलं, पण आम्ही दाराबाहेर असल्यामुळे तो मोह आवरला. आम्ही तसे आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे आमची विचारसरणी अशीच आहे, की माणूस इकडे आपली स्वप्ने रंगवत असतो आणि तिकडे देवाजीच्या ( इथे देवानाना नागपूरकरांचा दुरान्वये ही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी.) मनात वेगळेच काहीतरी असतं. नंतरचा आतला संवाद ऐकून ती तयारी 'वर्षा'वर जाण्यासाठी नाही तर 'बिहार'ला जाण्यासाठी सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आमच्या मनावरचं मणभर दडपण कमी झालं! आत उधोजीराजे आणि बाळराजेंचा संवाद सुरू होता. बाळराजे :- डॅड, मी जायलाच हवं का बिहारला, प्रचारासाठी ? उधोजीराजे :- जायलाच हवं का म्हणजे ? अरे जायलाच हवं. किंबहुना मी तर म्हणीन की तिथे तू जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाळराजे :- पण डॅड, संजय अंकल तर सांगतात की, तिथे आपली तितकी ताकद नाही म्हणून. मग ज्या परीक्षेत आपल्याला भोपळाच मिळणार आहे ती परीक्षा आपण द्यायचीच कशाला ? राज अंकल कसा कधी कधी गॅप घेतात तसा आपल्याला नाही का घेता येणार ? उधोजीराजे :- अरे, गॅप घ्यायला ती काय बारावीची परीक्षा आहे की काय आणि असा घाबरतोस कशासाठी, मी आहे ना तुझ्या पाठीशी, ऑनलाइन! बाळराजे :- डॅड, मी काय महाराष्ट्र आहे का, माझ्या पाठीशी तुम्ही ऑनलाइन राहायला ? आणि तो चिन्हांचा काय गोंधळ आहे हो, डॅड. कधी बिस्कीट तर कधी ती तुतारी की काय ती ? उधोजीराजे :- अरे बाबा, आपल्याला बिस्कीट नको होतं म्हणून त्यांनी आपल्याला तुतारी दिली. समजलं? बाळराजे :- मला समजलं हो डॅड, पण त्या अमृता आंटींना नाही ना समजलं . त्या फोन करून मला विचारत होत्या. उधोजीराजे :- (वैतागून) काय विचारात होत्या त्या ? बाळराजे:- त्या विचारात होत्या की इतकी वर्षे आम्ही चॉकलेट देत होतो ते चाललं तुम्हाला आणि आता निवडणूक आयोगानं बिस्कीट दिलं तर का नाही चाललं?


-मुकुंद परदेशी

_मुक्त लेखक,

भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

आपल्या घरात आग लागली असताना घरचे लोक आपलं घर नव्हे संसार वाचवायचा प्रयत्न करतात. घर म्हणजे नुसत्या भिंती, दारं, खिडक्या आणि छत नसते. घर म्हणजे आपल्या उभ्या जीवनाचा आधार, आपला संसार एवढेच नव्हे तर आपल्या संस्कृतीसभ्यतेची ती पाऊलखूण असते. आपल्या व आपल्या कुटुंबचा इतिहास असतो. मग अशा इतक्या महत्त्वाच्या घराला अग्नीपासून वाचवण्याचा आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतो. आपला देश सर्व देशवासियांसाठी एका घरासारखाच आहे. हे घर आज चोहोबाजूंनी पेटलेलं आहे. आपण स्वतःचं घर आगीत खाक होताना काहीच न करता नुसते बघत बसत नाही. घराबरोबर आपला जीव सुद्धा पेट घेईल म्हणून अगदी जसे प्रयत्न करतो तसे प्रयत्न आज आपल्या देशाला या आगीपासून वाचवण्याचे कुणी प्रयत्न करत असेल असे दिसत नाही. या गोष्टी लोकांच्या नजरेस आणून देण्याची गरज नाही. कारण प्रत्येक नागरिकाला देशाच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पना आहे. प्रत्येकाला दुसरा एखादा कुणी या घराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत नाही. ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ते या पेटलेल्या घराला वाचवण्याचे प्रयत्न तर सोडाच ते घराबाहेर देखील पडायला तयार नाहीत. त्यांना या आगीवर विश्वास असेल कदाचित की काहीही झाले तरी आपण घराच्या ज्या भागात आहोत तिथं काहीही होणार नाही. देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. जीडीपी दर किती होता किती खाली गेला हे या देशाच्या सामान्य नागरिकाला कळत नसते. फक्त आपल्या घरच्या मुलाबाळांचं, आईवडिलांचं कमीतकमी दोन वेळचं पोट भरण्याइतकी कमाई होईल का? याचीच त्याला चिंता असते. मुलांना शाळेला पाठवायचा विचार तर कोट्यवधींनी सोडूनच दिलाय. बेरोजगार युवक ज्यांनी शर्थीचे प्रयत्न करून शिक्षण घेतलं, एका उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहिली त्यांना नोकरी मिळणार का? हीच चिंता आहे. यांची आणि गत सहा-सात वर्षांच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, कधी नोटबंदीमुळे तर कधी कोरोना लॉकडाऊनमुळे अशा कोट्यवधींची स्वप्नंदेखील धुळीस मिळाली आहेत. काही जण विचार करत असतील की सध्या जरी अर्थव्यवस्था कोलमडली तरी फक्त हे भारतातच घडले नाही तर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोरोनामुळे पणाला लागली आहे. आपण एकदा या संकटातून बाहेर पडलो तर आपल्या देशाचीही स्थिती सुधारेल. पण इतर देशांमध्ये एक व्यवस्था आहे ती राबवण्यासाठी यंत्रणा आहे. ती चालवण्यासाठी राज्यकर्ते आहेत. आपल्याकडे व्यवस्थाच उरली नाही, यंत्रणेची चिंता नंतरची गोष्ट. व्यवस्था असती तर नक्कीच अर्थव्यवस्था सुधारली असती. आपल्या देशात लोकशाही आहे. जर सत्तारुढ पक्ष आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास अपयशी ठरत असेल (प्रयत्न केले तरच यशापयशाचा प्रश्न उद्भवेल) तर मग विरोधी पक्षाचे नेते जैं पक्षाकडून जनतेला आशा होती तो पक्ष उरला कुठे? काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी काही काँग्रेस नेत्यांविषयी जाहीरपणे आरोप केला की ते आतून भाजपला पाठिंबा देत आहेत हे वास्तव आहे. पण बराच उशीर झाला राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाला हे कटु सत्य समजायला. नोटबंदीपासून आजवर सरकारने जे काही निर्णय घेतले, मग ते इथल्या पब्लिक सेक्टर, रेल्वे स्टेशन, विमानतळ, रेल्वेचे आंशिक खाजगीकरण हे जे सगळे निर्णय सरकारने घेललेले आहेत ते काही भारतातील १३० कोटी जनतेच्या हितार्थ नाही तर काही बड्या उद्योगपतींच्या अर्थव्यवस्थेसाठी घेतलेले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आर्थिक मंदीच्या काळात जेव्हा लहान मोठे कारखाने उद्योग-व्यापार बंद होत आहेत अशात अंबानी अडानींना हजारो कोटींचा फायदा होतो कसा? म्हणजे भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीला जात असताना देखील त्याचा लाभ अडानी-अंबानींना होतो हे समजण्यासारखी गोष्ट नाही. हा सगळा खाटाटोप जो या सरकारने चालवला आहे यामागे नक्कीच एक विचारसरणी आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे किंवा फक्त कोरोनामुळेच ही अवस्था झालेली नाही. भारतातील ८० टक्के जनतेला गरीब बनवणं यामागे सरकार आणि ज्या विचारधारेचे हे सरकार आहे त्यांचं हे कारस्थान आहे. म्हणून अर्थव्यवस्था बिघडली तर तिला सावरता येते पण ती संपुष्टात आणणेच ज्यांचा विचार आहे त्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक दिवाळखोरीची कीव येते. घरात आग लागली असता ती जर विझवण्याचा विचार केला नाही तर मग संपूर्ण घर आणि घरात बसलेले त्याच आगीत जळून खाक झाल्याशिवाय राहाणार नाहीत. जगातील सभ्यता-संस्कृतीचा नेहमी नाश होत असतो आणि नवनवीन सभ्यता उदयास येत असतात हे विनाश आणि उदय त्या त्या संस्कृतीतील विचारवंत आणि शासनकर्त्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षमतेवर अवलंबून असतात. इतर जनसमुदायांविषयी द्वेष, जातियवाद, जातीव्यवस्थेवर ज्यांची विचारसरणी आधारित असते अशा संस्कृती जगातून किंवा राष्ट्रातून नष्ट होत असतात. आपल्या देशाचाही भला मोठा इतिहास याविषयीचा आहे. ज्या संस्कृती आपसातील योगदान, कल्याणकारी उपक्रम आणि मानवतेच्या भल्यासाठी कार्यरत असतात तेच फक्त कायम राहातात. या विरुद्धच्या विचारधारेने शेवटी संस्कृतीचा हास होणे अटळ असते.


- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७

(जागतिक गरीबी निर्मूलन दिन विशेष - 17 ऑक्टोबर 2020)

Poverty

कोणालाही गरीबी आवडत नाही, परंतु कोणाचा जन्म गरीबीत होतो, तर कधी वाईट परिस्थिती एखाद्याला गरीब बनवते. कधी एखाद्याचे संपूर्ण आयुष्यच गरीबीत संघर्ष करीत संपतो तर कधी कुणाचे आयुष्य फक्त दोन वेळेच्या भाकरी साठीच भटकत असते. जगात कुठे-कुठे तर गरीबांची अत्यंत गंभीर दयनीय स्थिती आहे की आपल्याला विश्वासच बसणार नाही. गरीबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचा आधारभूत गरजा सुद्धा पुर्ण होत नाही. माणूस सर्वकाही ढोंग करू शकतो, परंतु पैशाचे सोंग केली जात नाही, म्हणजेच पैशाचा अभाव पैशानेच पूर्ण होतो. जगभरातील कोट्यवधी लोक आजही उपाशीपोटी झोपतात. कचऱ्याच्या ढीगात मुले अन्न निवडताना दिसतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक दृश्ये आढळतात. कोरोना काळाच्या सुरूवातीस परिस्थिती कोणापासून लपलेली नाही, लॉकडाउन मध्ये मजुरांचे पलायन आणि त्यांची दयनीय अवस्था, जरा कल्पना करून बघा की आपल्यातील किती वृद्ध, मुले, गरोदर स्त्रिया किंवा आजारी लोक हजारो किलोमीटर भुकेने-तहानलेल्या त्रासामध्ये ओझे घेवून भर उनात पायी चालू शकतात? त्या गरीबांनीच इतका त्रास सहन केला.

गरीबी रेषेचे निर्धारण :- वी.एम. दांडेकर आणि एन. राठ यांनी 1971 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारीच्या आधारे दारिद्ररेषेचे मूल्यांकन करून शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात 2250 कॅलरी पुरेशी मानली. नंतर 1979, मध्ये अलाघ टास्क फोर्सने शहरी भागासाठी 2100 कॅलरीपेक्षा कमी आणि ग्रामस्थांसाठी 2400 पेक्षा कमी कॅलरीवाल्यांना गरिबीरेषेखाली मानले. डी.टी. लकडावाला समिती 1993 ने काही वेगळ्या सूचना केल्या. तेंडुलकर समिती 2005, ने ग्रामीण भागातील गरीबांसाठी 27 रुपये आणि शहरीसाठी 33 रुपये खर्च मानला. सी. रंगराजन समिती 2012 ने एका दिवसाला शहरी भागासाठी 47 रूपये आणी ग्रामीण भागासाठी 32 रुपये पेक्षा कमी खर्च करणार्यास गरीबीरेषेखाली निश्चित केले. या समितीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी देशातील 36.3 कोटी लोक गरीब होते. जागतिक बँकेच्या मते, दिवसाला 3.2 डॉलर किंवा सुमारे 244 रुपये कमावणारी व्यक्ती भारतात गरीब आहे. तर, अमेरिकी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दोन लोकांच्या कुटुंबासाठी 11 लाख 73384 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न हे दारिद्ररेषेखालील मानले जाते. उपसहारा प्रदेश आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक गरीबी आहे. दारिद्र हे विविध सामाजिक निर्देशकांद्वारे मुल्यांकित केले जाते, जसे की उत्पन्नाची पातळी, खर्चाची पध्दती, निरक्षरतेची पातळी, कुपोषणामुळे, सर्वसाधारण प्रतिकारांची कमतरता, आरोग्य सेवांचा अभाव आणि शुद्ध पाण्याची कमतरता, नोकरीच्या संधी तोटा, स्वच्छता आणि इतर वस्तूंचे विश्लेषण. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2006 ते 2016 या वर्षात देशातील दारिद्रतून 27.10 लोक बाहेर पडले आहेत. तरीही सुमारे 37 कोटी लोकसंख्या आजही गरीब आहेत.

वाढत्या गरीबीची कारणे : - वाढती लोकसंख्या, वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी, मर्यादित साधने, शेती उत्पादनांचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ, शेतीचे लहान-लहान तुकडे होणे, रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर, शेतकरी जवळील अपुरे भांडवल, पारंपारिक कौशल्यांचे आणि कामाचे निर्मूलन, अशिक्षितपणा, आरोग्याच्या समस्या यामुळे निर्धनतेचे चक्र वाढतच आहे आणि या समस्येमुळे समाजात गंभीर गुन्हे आणि इतर समस्या उद्भवतात. स्वतः नियोजन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, दररोज देशातील सुमारे अडीच हजार मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडतात. दुसरीकडे, अन्न-धान्य साठवण व्यवस्थापनात कमी, गोदामांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळे दरवर्षी हजारो टन धान्य सडते.

गरीबी निर्मूलनासाठी शासकीय उपाय योजना : - वेतन रोजगार कार्यक्रम (मनरेगा), नई मंजिल (शिक्षण व आजीविका कार्यक्रम), स्वयंरोजगार कार्यक्रम, राष्ट्रीय आजीविका मिशन, दीनदयाल अंत्योदय योजना, महिला किसान सशक्तिकरण योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना - कार्यक्रम, अन्न सुरक्षा कार्यक्रम (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013) सामाजिक सुरक्षा कार्यक्रम - (राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अन्नपूर्णा योजना, शहरी गरीबी उन्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, ग्रामीण कामगार रोजगार हमी कार्यक्रम, पंतप्रधान ग्रामीण गृह योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती आणि इतर.

कोरोना गरीबी वाढवेल : - संयुक्त राष्ट्रांच्या संशोधनानुसार जर कोरोना सर्वात वाईट स्थितीत पोहोचला तर भारतातील 10.4 कोटी नवीन लोक गरीब होतील. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने भारतात रोजगार विषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार भारताची एकूण कामगार संख्या 50 कोटी आहे. त्यातील 90 टक्के हे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. कोरोना संकटामुळे 40 कोटीहून अधिक कामगार जास्तच गरीब होतील. भारतातील गरीब वर्गात, आदिवासी, मागासवर्गीय, दलित आणि शहरी कामगार, शेती करणारे कामगार, सामान्य मजूर, अजूनही खूपच गरीब आहेत आणि ते भारतातील सर्वात गरीब वर्गात मोडतात.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 : - अन्नाच्या अभावामुळे उपासमारीच्या स्थितीत ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 मध्ये 117 देशांपैकी भारत 102 व्या क्रमांकावर आहे, तर शेजारी देश नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी नागराज नायडू असे म्हणाले, जगातील बरीच माणसे इतकी भुकेली आहेत की, त्यांना भाकरी मिळणे म्हणजे देवाला भेटण्यासारखे आहे आणि “गरीबी कोणत्याही गुन्ह्याशिवाय शिक्षा देण्यासारखे आहे. जागतिक असमानता खूप आत पर्यंत शिरली आहे. हे आश्चर्यकारक आहे की पृथ्वीवरील संपुर्ण संपत्तीपैकी 60 टक्के संपत्ती ही फक्त 2 हजार अब्जाधीशांकडे आहे आणी ती सातत्याने प्रचंड वाढतच आहे.

नीती आयोगाच्या मते : - नीती आयोगाच्या 2019 च्या एसडीजी इंडियाच्या अहवालात असे दिसून आले आहे की देशातील 22 ते 25 राज्यांमध्ये गरीबी, भूक आणि असमानता वाढली आहे आणि 2020-21 च्या अर्थसंकल्पाच्या एका महिन्यापूर्वीच हा अहवाल प्रसिद्ध झाला. 2005-06 ते 2015-16 या दहा वर्षात गरीबांच्या संख्येत घट झाली होती. नीती आयोगाच्या मते, एसडीजी लक्ष्य 1 म्हणजेच गरीबी निर्मूलनाच्या संदर्भात 2018 मध्ये 54 गुणांवरून खाली घसरत सन 2019 मध्ये 50 गुणांवर आला आहे आणि शून्य भूक एसडीजीचे लक्ष्य 48 अंशांवरून खाली 35 पर्यंत खाली आले आहे, ही आंकडेवारी परिस्थिती खराब असल्याचे दर्शवित आहे. राष्ट्रीय स्तरावर, उत्पन्न असमानता निर्देशांकातही 7 अंकाची घट झाली आहे, म्हणजे असमानता वाढली आहे. नीती आयोगाच्या सतत टिकाऊ विकास लक्ष्य निर्देशांक (एसडीजी) 2019-2020 च्या अहवालानुसार, 2030 पर्यंत गरीबीमुक्त भारताच्या लक्ष्यात देश चार गुण खाली घसरला आहे. 2018 च्या अहवालानुसार दारिद्र आणि बेरोजगारीमुळे दररोज मोठ्यासंख्येने लोक आत्महत्या करीत आहेत.

गरीब आणि श्रीमंत यांच्यात आर्थिक दरी सतत वाढत आहे : - ऑक्सफॅम इंडियाची आर्थिक असमानता अहवाल 2020 मध्ये असे म्हटले आहे की जगातील गरिबी आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी सतत वाढत आहे, 2019 मध्ये याच अहवालात असे दिसून आले होते की देशातील सर्वोच्च एक टक्का श्रीमंत लोक दररोज 2200 कोटी कमवतात आणि 2018 मध्ये याच अहवालात असे म्हटले गेले होते की भारतातील एक टक्के श्रीमंत हे देशाच्या 73 टक्के संपत्तीचे मालक आहेत. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात अब्जाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे हे एक महत्त्वाचे सत्य आहे. देशाच्या एकूण 63 अब्जाधीशांची संपत्ती भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प (2018-2019) च्या 24,42,200 कोटींपेक्षाही जास्त आहे. जगातील एकूण 2153 अब्जाधीशांची संपत्ती जगातील लोकसंख्येच्या तळाच्या 60 टक्के (4.6 अब्ज लोक) पेक्षा अधिक आहे. क्रेडिट सुईस ग्लोबल अॅसेट्स रिपोर्ट 2019 नुसार जागतिक आर्थिक व्यवस्था खराब होत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वसमावेशक विकास निर्देशांक 2018 नुसार 74 उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक 62 वा आहे. नेपाळ (22 वे), बांगलादेश (34) आणि श्रीलंका (40) व्या नंबरवर आहे, म्हणजे भारत देश यांचाही मागे आहे. या अहवालानुसार, 10 पैकी 6 भारतीय दररोज 234 रुपयांपेक्षा कमी कमवून कुटुंब चालवतात.

आजच्या आधुनिक युगात सुद्धा मूलभूत सेवा नसल्यामुळे दररोज बरेच लोक जीव गमावतात. दुर्गम भागांची अवस्था आजही अतीशय वाईट आहे. वाढती महागाई आणि नैसर्गिक आपत्ती गरिबांच्या दुर्दशामध्ये आणखी भर घालते. आजही मुले भुकेने रडताना दिसतात. जगात अनेक गरीबांना रुग्णवाहिका मिळत नाही, तर कोणाला वेळेवर उपचार मिळत नाही, तर कोणाला रेशन मिळत नाही आणि माणुसकी मारली जाते, अशा बातम्या अनेकदा वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहिल्या व वाचल्या जातात. गरीबी मुलांपासून त्यांचे निरागस बालपण हीरावून घेते. गरिबीमुळे खराब वातावरण निर्माण होते, गरीबीत स्वच्छ अन्न, शुद्ध हवा व पाण्याची कमतरता, रोगराई आणि निम्न राहणीमान, झोपडपट्ट्या, घाण वातावरणाची समस्या होते. देशाला विकसित करण्यासाठी, सर्वप्रथम, प्रत्येक हाताला काम मिळाले पाहीजे. रोजगार, योग्य वेतनश्रेणी आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मजबूत करणे अत्यंत महत्वाचे आहे. शहरांकडे कामासाठी जाणारे गावांचे स्थलांतर थांबवावे लागेल, गावांना समृद्ध करावे लागेल जेणेकरुन तेथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. जेव्हा प्रत्येकाकडे काम असेल, तरच ते गरीब त्यांच्या मुलभूत गरजेवर खर्च करण्यास सक्षम राहतील आणि राहणीमान सुधारतील म्हणजेच गरिबी निर्मूलनाशिवाय देशाचा विकास अशक्य आहे.

- डॉ. प्रितम भि. गेडाम

भ्रमणध्वनी क्रं 082374 17041



‘गांधीजी होते म्हणून’ लिहितांना लेखकाने ‘माझ्या डोळ्यासमोर सामान्य जिज्ञासू नागरिक आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरणारे सर्वसामान्य कार्यकर्ते होते असे म्हटले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी यांना मिळाली अफाट लोकप्रियता हा ज्या दुष्टप्रवृत्तींना अडसर वाटू लागला. त्यांनी महात्मा गांधीजींच्या विरोधात गरळ ओकून त्यांच्याबद्दल द्वेश पसरविण्याचे उद्योग सातत्याने सुरू ठेवले आहेत, अलिकडे तर त्यांच्या प्रतिमेवर गोळी झाडून त्यातून भळाभळा रक्त येणारा व्हिडीओ समाजमाघ्यमांवर व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या एकूणच व्यापक कार्याचा समर्थपणे प्रतिवाद करता यावा अशा उद्देशाने कोल्हापुरातील सामाजिक चळवळीत अग्रभागी असणारे कार्यकर्ते (कै.) बाळ पोतदार यांनी गांधीजी होते म्हणून पुस्तक लिहिले आहे, त्यांचा उद्देश निश्चितच अनाठायी तर नाहीच पण योग्य वेळी त्यांनी या पुस्तकाद्वारे केलेला विवेचनात्मक प्रतिवाद निश्चित स्वागतार्ह आहे.

सध्या गांधीजींचे विरोधक नथुराम गोडसेला हुतात्मा ठरवू पाहत आहेत. मात्र हे विरोधक गांधीजींचे विचार संपूर्णपणे पुसून ही टाकू शकत नाहीत ही त्यांची खरी अडचण झाली आहे. मग हे सनातनी विरोधक गाधींजींच्या बद्दल खोटेनाटे विपर्यास्त व बिनबुडाचे आरोप करून गांधीजींच्या विषयी मोठ्या प्रमाणात संभ्रम व द्वेश पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरुण पिढीला गांधीयुगाचा सखोल अभ्यास नसल्यामुळे त्यांचा गैरसमज होईल अशी धादांत खोटी विधाने करण्यात ही सनातनी टाळकी मश्गूल आहेत. त्यांना श्री. पोतदार यांनी या पुस्तकातून थेट व बिनचूक उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस म्हणतात, “लोकशाहीच्या पराभवाचा पराक्रम असंख्य संवेदनाशून्य नागरिक पेरत असताना लेखकाची संवेदना मात्र गांधीजींच्या उमाळ्याने ओतप्रोत भरून वाहते आहे.” श्री. पोतदार यांचे विचार ज्यांनी जवळून ऐकले आहेत त्यांना डॉ. सबनीस यांचे वरील उद्गार तंतोतंत पटल्याशिवाय राहणार नाही.

श्री. पोतदार यांचे पूर्वायुष्य मार्क्सवादी विचाराने भारलेले होते. मार्क्सवादाचा त्यांचा सुक्ष्म अभ्यास होता. त्या अंगाने ते खरे व्यासंगी मार्क्सवादी होते, त्यामुळे या ग्रंथात त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रकरणाला विश्लेषणात्मक तसेच मूल्यमापनदृष्ट्या उंची प्राप्त झाली आहे. अत्यंत संयत व सविस्तर लेखनशैलीच्या खूणा पानापानांवर दिसून येतात.

1857 सालच्या ब्रिटीश सत्तेच्या विरोधात झोलल्या बंडात हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचा संदर्भ महत्वाचा ठरतो. दिल्लीचा मोगल बादशहा बहाद्दूरशहा जफरच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यांच्या संघर्ष पर्वात हिंदू-मुस्लिम ऐक्याची साक्ष ब्रिटीश सरकारने अनुभवली. हा इतिहास या पुस्तकात श्री. पोतदार यांनी अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर 1858 च्या अगोदर भारतीय जनतेमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेदभाव नव्हता, असा ऐतिहासिक निष्कर्ष या पुस्तकांमुळे नोंदला गेला आहे. या नोंदीला आजच्या जातीयवादी संदर्भात फार मौलीक महत्त्व असून हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने तो पुरेसा अर्थपूर्ण आहे. खर्या अर्थाने अशा ऐतिहासिक पुराव्यांची गरज आजच्या काळात प्रत्कर्षाने जाणवत आहे, श्री. पोतदार यांच्या या पुस्तकाने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदू-मुस्लिम वर्गाच्या ऐतिहासिक वास्तवाच्या शोधात 1870 नंतर ब्रिटीश राजवट मुस्लिमांच्या पक्षपातात उतरल्याचे सत्य या ग्रंथाने या पूर्वार्धातच मांडले आहे. हिंदू-मुस्लिम व ब्रिटीश या त्रिकोणातील ऐतिहासिक अनुबंधनाचा सूक्ष्म अभ्यास हे बाळ पोतदार यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. या विषयाच्या मांडणीतील लेखक पोतदार यांनी पुढील प्रमाणे काही सुत्रे अधोरेखित केलेली आहेत. ती म्हणजे 1) 1920 ते 1925 हा काळ हिंदू-मुसलमानांच्या राष्ट्रीय भावनेच्या उत्कर्षाचा काळ होता. 2) 1925ते 35 या कालखंडात हिंदू-मुस्लिमांच्या राष्ट्रीय वृत्तीला दूराभिमानाने विकृत स्वरुप आले. 3) याच विकृतीतून हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम हिटलर मुसोलिनीचा उदय झाला. 4) 1933 नंतर याच द्विराष्ट्रावादाला हिटलर मुसोलीनीच्या फॅसिझमचे आकर्षण वाटू लागले. 1937 नंतर ही भावना वाढली आणि 1940 मध्ये लिगने पाकिस्तानचे ध्येय ठरवून विभागणीचे राजकारण केले. 5) या सर्वांचा परिणाम म्हणजे क्रांतिकारक राष्ट्रीय भावना दूभंगली व द्विराष्ट्रवादाची विकृती जन्माला आली. ताचेच रुप म्हणजे फाळणी लेखकाने या सर्वांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही मांडणीच ऐतिहासिक वास्तवाचे अंतरंग अभिव्यक्त करणारी आहे.

श्री.पोतदार यांच्या इतिहासाच्या अभ्याबरोबरच वस्तूनिष्ठ सत्याचे विवेचन व विश्लेषण थक्क करून सोडते. त्यांनी टिळक व गांधीजींच्या राजकीय भूमिकांचे केलेले मूल्यमापन ही महत्त्वाचे ठरते. गीतेचा प्रभाव टिळक व गांधीजींच्यावर असला तरी दोघांच्या राजकारणची पद्धती भिन्न होती हे लेखकाने अनेक पुरावे देऊन नोंदवले आहे.

मुस्लिम समाजातील सुशिक्षीत वर्गाला खिलपतीबद्दल आस्था नव्हती, त्यामुळे खिलापत चळवळीचे नेतृत्व मुल्ला मौलवी यांचेकडेच राहीले तसेच देशातील काही भूभागावर आपले राज्य निर्माण करता यावे असे स्वार्थी राजकारण मुस्लिम लिगचे होते, ही सूत्रे अभ्यासपूर्व मांडतांना लेखकाचा राजकीय व्यासंग किती व्यापक होता ही दिसून येते. या ग्रंथात इस्लामचा उदय नावाचे एक प्रकरण आहे. गांधीजींचे राष्ट्रप्रेम व मानतवादी दृष्टीकोन समजून घेताना त्यांच्या कर्तृत्वाला हिंदू-मुस्लिम प्रश्न व फाळणीचे आव्हान निर्णायक ठरते. तेवहा लेखक केवळ भारतीय मुस्लिमांचा इतिहास न अभ्यासता ते देशाचा परिपे्रक्ष ओलांडून मध्ययुगीन इस्लामच्या उदयापर्यंत थेट भिडतात. अरबस्थानच्या वाळवंटातील अरंबांची जीवनपद्धती, इस्लामचा दिग्वीजय, युरोप आशियातील परिस्थिती, मोहम्मद पैगंबरचा अरब टोळ्यांना एकजीनसी बनवण्याचे कार्य, त्यांच्या मृत्यूनंतरची आबू बकर-उमर या खलिफांची कारकिर्द अशा इस्लामी इतिहासाची धार्मिक सामाजिक व राजकीय मांडणी समर्थपणे करतात. अरबी इस्लाम भारतात आल्यावर बाबर अकबर परंपारही तपशीलाने मांडली आहे.

गांधींच्या आकलनासाठी इस्लामचा पूर्वेइतिहास आवश्यक आहे, ही श्री. पोतदार यांची धारणास सर्वार्थाने योग्य आहे. 20 पानांचा इस्लाम विषयक तपशील गांधींच्या कर्तृत्वासमोरील आव्हाने समजूनस घेण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

मोतीलाल नेहरूप्रणीत स्वराज्यपक्षाची स्थापना, 1923 च्या कायदे मंडळाच्या निवडणुका, कौन्सिल प्रवेशाचे राजकारण, काँग्रेसमधील मतभेद, शासनाची दडपशाही, हिंदू-मुस्लिम दंगली, हदिू महासभेचा उदय, धर्मांतरीत हिंदूच्या शुद्धीकरणाची मोहीम, मुस्लिमांच्या तंजीम व तबलीक चळवळी, सायमन कमिशनचा विरोध, मोतीलाल नेहरूप्रणीत राज्यघटना मसुदा, वसातीचे स्वराज्य भेदभंगाची चळवळ, पुणे करार अशा असंख्य घटना ऐतिहासिक सूत्रामध्ये वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्या आहेत.

सध्याच्या दूषित आणि दिशाहीन राजकीय पर्यावरणात या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होणारे आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात व महात्मा गांधींचे महात्म्य या विषयांवर अनेकांनी भरभरून लिहिले आहे, परंतु सूक्ष्म अवलोकन करून तपशीलवार मांडणी केलेले व तत्कालीन भारतीय राजकारणाचे वस्तूनिष्ठ व सर्वस्पर्शी विचारवंत लेखकांच्या यादीत स्वत:चा नामोल्लेख होत्यास भाग पाडावे आहे. लेखकाच्या चिंतनात्मक, मूल्यमापनात्मक आणि विश्लेषणात्मक लेखणीचा गौरव होणे अपरिहार्य आहे.

 - सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी :९४२०३५१३६२

नाव : गांधीजी होते म्हणून....

प्रकाशक : किसान शक्ती प्रकाशन, 1403 ई, शाहूनगर, कोल्हापूर-416 008

पृष्ठे : 288

मूल्य : 250/-



मुंबई

अंजुमन-ए- इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे ‘सर सय्यद एक्सलेन्स नॅशनल अवॉर्ड’ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान,  तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण आणि स्त्री सबलीकरणाचा पुरस्कार, आपल्या 97 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयापासून म्हणजेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक ते थेट पदव्युत्तर व संशोधन आदी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार शिक्षण देत आहे. या सर्व बाबींचा विचार करून संस्थेच्या अविरत प्रयत्नांच्या सन्मानार्थ अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार शनिवार दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी ऑनलाईन सोहळ्यात संस्थेला प्रदान केला.

रु. 1 लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रसिद्ध वरिष्ठ रेडियोलोजिस्ट डॉ. झहीर काझी यांनी हा सन्मान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमात सर सय्यद इंटरनॅशनल एक्सलेन्स ॲवॉर्ड हे अमेरिकेचे प्रा. गेल मिनॉल्ट यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मेघालय राज्याचे राज्यपाल मा. श्री. सत्य पाल मलिक तर अध्यक्षस्थानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर, रजिस्ट्रार अब्दुल हामीद (आपीएस), वेबमास्तर डॉ. फैजा अब्बासी, प्रा. शाहीद शकील आदी उपस्थित होते. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचेवतीने अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी हे पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जहीर काझी म्हणाले की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने आमच्या संस्थेला हे पुरस्कार दिल्याबद्दल मी माझ्या संस्थेच्यावतीने आभार मानतो. अंजुमन-ए-इस्लाम ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत आहे.

या संस्थेमधून एकाचवेळी सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अभियांत्रिकी, युनानी मेडिसीन, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉस्पिटलिटी, केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, होम सायन्स, टीचर्स ट्रेनिंग व इतर कौशल्यविकास कार्यक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात महाविद्यालय कार्यरत आहेत.

या संस्थेच्या माजी विद्यार्थी जगभरात वेगवेगळ्या नवाजलेल्या संस्थेमध्ये वाणिज्य, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, आरोग्यशास्त्र या क्षेत्रात आपली सेवा बाजावत आहे. सोलापूर येथे व्यावसायिक अभ्यासक्रमसोबत प्राथमिक ते हायस्कूलपर्यंत इंग्रजी माध्यमची शाळा सुरू असून होटगी येथे संस्थेच्यामार्फत यावर्षी फॉर्मसी व इतर पदवीचे अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. सोलापूर सेंटरचे को-ऑर्डिनेटर रियाजअहमद पीरजादे यांनी हे पुरस्कार संस्थेला मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. जहीर काझी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

कार्यक्रमाची सुरूवात कुराण पठण करून करण्यात आली. कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. मुजाहिद बेग यांनी आभार मानले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अंजुमन-ए-इस्लामचे पनवेल स्थित अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक व काळसेकर टेक्निकल कॅम्पसमध्ये पदविका ते पदव्युत्तर तसेच पुढील संशोधनात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. अंजुमन-ए-इस्लाम ला या पूर्वीही अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्डबद्दल समाजातील सर्व वर्गातून संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख व पदाधिकारी तसेच मुंबई शिक्षण संस्थांचे एकझ्युकेटीव चेअरमन बुरहान हारिस आणि संस्थाचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.


Kuran

कुरआनकडे आकर्षित होण्याचे माझे पहिले कारण म्हणजे कुरआननी माणसाला ज्या धर्मात जन्माला त्याच धर्मात मरेपर्यंत राहण्याची सक्ती नाकारली. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे कुरआनने धर्म स्वातंत्र्य दिले. कुरआनपूर्व काळामध्ये राजाला ईश्‍वराचा अंश मानण्याचा प्रघात होता. त्यामुळे प्रजेला राजाला वंदन (सज्दा) करावा लागत असे. ब्रिटनसारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये सुद्धा, ”किंग कँग डू नो राँग” म्हणजे राजा चुकच करू शकत नाही, अशी मान्यता होती. यामागे सुद्धा राजाला ईश्‍वरी अंश मानण्याचाच विचार होता. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कितीही मोठा असला तरी तो चुकणारच. पण एकदा का त्याला ईश्‍वरीय रूप प्रदान केले गेले की मग त्याच्याकडून चूक होणार नाही, अशी धारणा मनाशी पक्की करण्यात काहीच अडचण राहत नाही. आणि त्यामुळे राजाने केलेले अत्याचारसुद्धा सुसहाय्य होत.


कुरआनने सर्वप्रथम सर्व भ्रामक ईश्‍वरी संकल्पनांचा इन्कार करून एक ईश्‍वराची संकल्पना मांडली. त्यामुळे आपोआपच मानवनिर्मित धर्म सोडून खर्‍या धर्माकडे वळण्याची सोय झाली. ज्यांना कोणाला, ”वहेदत” एका ईश्‍वराची संकल्पना पटली त्याला जन्मलेल्या आपल्या धर्मातच नाविलाजाने मरेपर्यंत राहण्याची सक्ती संपली. माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांनी कुरआनचा संदेश लक्षात आल्यावर मरेपर्यंत जन्मलेल्या धर्मात राहण्याची सक्ती झुगारलेली आहे.

या ग्रंथाकडे आकर्षित होण्याचे दूसरे कारण म्हणजे यात आचरण स्वातंत्र्याची संकल्पना मोठ्या आकर्षक स्वरूपात मांडलेली आहे. एकतर्फी चांगले कृत्य करून त्याचा परिणाम ईश्‍वरावर सोडल्यामुळे माणसाला एक आत्मिक आनंद मिळतो. दुसर्‍यांचे हक्क देण्याकडे माणसांचा कल वाढतो. आज जगामध्ये प्रत्येकजण स्व:चा हक्क प्राप्त करण्यासाठी इतरांशी भांडताना दिसतो. मात्र त्याचवेळेस दुसर्‍यांचे हक्क नाकारण्याकडे सर्वांचाच कल दिसून येतो. कुरआनने एकतर्फी पुण्यकर्म करून फळाची अपेक्षा इतरांकडून न करता साक्षात ईश्‍वराकडून करण्याची जी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेने मला मोहिनी घातली. आपला हक्क आपल्यासारख्या इतर माणसाकडे मागण्यापेक्षा तो सर्वशक्तीमान ईश्‍वराकडून मागणे मानवासाठी कधीही सन्मानजनक आहे.

कुरआनकडे आकर्षित होण्याचे एक महत्त्वाचे कारण असे की, अज्ञान काळामध्ये माणसाकडून ज्या काही चुका होतात, जी काही अपकृत्य होतात कुरआनवर विश्‍वास ठेऊन सद्वर्तन करण्यास सुरूवात करताच अज्ञानकाळात केलेल्या सर्व अपकृत्यांची क्षमा मिळवून देण्याची हमी कुरआन देतो. मात्र यासाठी मागील काळात केलेल्या अपकृत्यांबद्दल माणसाला खरा पश्‍चाताप होणे व भविष्यात पुन्हा तशी अपकृत्य करणार नसल्याचा निश्‍चय करणे बंधनकारक आहे. ही फार मोठी सवलत ईश्‍वराने माणसाला दिलेेली आहे. 

कुरआनकडे आकर्षित होण्याचे कारण म्हणजे कुरआनच्या शिकवणीमध्ये हिकमत (जीवनात येणार्‍या वेगवेगळ्या परिस्थितीला कसे तोंड द्यावे याचे नैतिक शिक्षण म्हणजे हिकमत) हा फार महत्त्वाचा भाग आहे. ज्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये येणार्‍या चढ उतार, चांगल्या-वाईट घटनांना यशस्वीपणे धैर्याने तोंड देण्याची शक्ती माणसामध्ये निर्माण होते. 

कुरआनमध्ये दिलेले समानतेचे तत्व हे कुरआनकडे आकर्षित करण्याचे फार मोठे कारण आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”लोकहो !  आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.” (सुरे हुजरात आयत नं.13).

या आयातीने एका फटक्यात जगात अस्तित्वात असलेल्या जवळ जवळ 800 कोटी लोकांना भाऊ-बहिण करून टाकलेले आहे. यापेक्षा उदात्त विचार दूसरा कुठला असू शकत नाही. एक माणूस म्हणून दुसर्‍या माणसावर प्रेम करणे यापेक्षा मानवतेचा सन्मान दुसरा काय असू शकतो? या विचाराने वंशवाद, रंग, जात, धर्म, भाषा, राष्ट्र या सर्व विचारांच्या पुढे जावून माणसाला माणूस म्हणून सख्या भावा-बहिणींप्रमाणे एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली. ही फार मोठी वैचारिक देणगी ईश्‍वराने माणवाला दिलेली आहे. या आयातीवर विश्‍वास ठेऊन माणसाने जर जीवन जगायचे ठरवले तर कुठलाही संकुचित विचार त्याच्या मनामध्ये टिकू शकणार नाही. या आणि अशाच अनेक आयती कुरआनमध्ये आहेत. यामुळे मानवजातीमध्ये खरी समानता रूजू शकते. 

कुरआनमध्ये अनेक ठिकाणी आई-वडिलांचा सन्मान करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. ही अतिशय मोलाची शिकवण आहे. आजकाल तर भौतिक सुखाच्या मागे पळणार्‍या नवीन पिढीला वृद्ध आई-वडिलांकडे पहायला सुद्धा वेळ नाही. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वेगाने वाढत आहे, हे विदारक सत्य आहे. कुरआनने तरूण मुलांना आपल्या आई-वडिलांची सेवा स्व:च्या घरी ठेऊन करण्याची ताकीद केलेली आहे. एका ठिकाणी म्हटलेले आहे कि, ”आई-वडिलांशी सद्वर्तन करा, जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ’ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला.” (सुरे बनी इसराईल आयत नं. 23) ही आणि हिच्यासारख्या आयतींमध्ये आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व कुरआनमध्ये अधोरेखित केले आहे. कुरआनकडे आकर्षित होण्याचे हे एक मोठे कारण आहे. 

जगामध्ये कुरआनने स्त्रीला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार इतर कुठल्याच व्यवस्थेमध्ये देण्यात आलेले नाहीत. विशेष: आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क कुरआनने 1442 वर्षापूर्वी दिले. इतर व्यवस्थांमध्ये हा हक्क कायद्याने तो ही खूप उशीरा दिला. सर्वातप्रथम हा हक्क महिलांना देण्याचा मान कुरआनकडे आहे. हे सुद्धा कुरआनकडे आकर्षित होण्याचे हे एक मोठे कारण आहे. 

कुरआनमध्ये मृत्यूपश्‍चातच्या जीवनाची जी संकल्पना मांडलेली आहे ती, कुठल्याही विवेकी माणसाला पटण्यासारखी आहे. तर्कसंगत आहे. आपण पाहतो जगामध्ये अनेक गोष्टी अशा घडतात की सकृतदर्शनी त्यात अत्याचार करणार्‍याची सरशी होती. उदा. एका माणसाने 10 खून केले. त्याला एकदा फाशी झाली. मग त्यामुळे त्याचा बदला पूर्णपणे घेण्यात आला, असे म्हणता येणार नाही. थोडक्यात हे जग अपूर्ण आहे. याला पूर्ण होण्यासाठी मृत्यनंतर अत्याचार करणार्‍याच्या पदरात अत्याचाराचे माप तर पुण्यकर्म करणार्‍याला पुण्याचे माप टाकल्याशिवाय हे जग पूर्ण होणार नाही. या जगातून मृत्यू झाल्यानंतर सुटका झाली असे म्हणता येणार नाही. मृत्यू पश्‍चात त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब होऊन त्याला त्याचा बदला दिल्याखेरीज मानवी जीवन परिपूर्ण होणार नाही, ही एक जबदरस्त संकल्पना आहे, जी कुठल्याही बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखी आहे. 

एकंदरित हे आणि असेच अनेक मुद्दे कुरआनमध्ये जे की, गांभीर्याने वाचल्यास कोणालाही आकर्षित करू शकतात. जसे त्यांनी मला आकर्षित केले आहे.


- किशन जयवंतराव पाटील 

मुखेड जि.नांदेड 

मो.9175793247



क्या हुआ अगर हमको दो-चार मौजे छू गईं

हमने बदला है न जाने कितने तुफानों का रूख

तीन तलाक, हज सबसिडी, बुरखा, लव्ह जिहाद, कोरोना जिहाद, युपीएससी जिहाद असे एक ना अनेक विषय आहेत जे मीडियाला प्रिय आहेत. काहीही करून मुस्लिम समाजाविषयी सामान्य जनतेमध्ये गैरसमज वाढत राहतील यासाठी मीडिया ’रेडिओ रवांडाप्रमाणे’ अहोरात्र रविवारची सुट्टी सुद्धा न घेता अपप्रचार करत असतो. त्यातच या आठवड्यात मदरसे या विषयाची भर पडली. त्याचे झाले असे की, आसाममध्ये सरकारी अनुदानप्राप्त अरबी मदरसे आणि संस्कृत पाठशाळा यांची मदत बंद करण्याचा राज्यातील भाजपा सरकारने निर्णय घेतला. तर लगेच आसाममध्ये मदरशांवर प्रतिबंध लादण्यात आला, अशी मीडियामधून हाकाटी पिटण्यास सुरूवात झाली. तोच धागा पकडून महाराष्ट्रातसुद्धा भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आव्हानात्मक भाषा करून महाराष्ट्रातही मदरशांची शासकीय मदत बंद करण्याचे किंबहुना मदरसेच बंद करण्याचे आवाहन केले. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये एक छदामही मदरशांना मिळत नाही. एवढी साधी माहिती आमदार महोदयांना नसावी, याचेच आश्‍चर्य वाटते. किंवा मुद्दामहून आमदार महोदयांनी जाणून बुजून ही थाप मारली असावी. या संदर्भात  एक गोष्ट मात्र सत्य आहे की, केंद्र सरकारने आपल्या बजटमध्ये मदरशांच्या अपग्रेडेशनसाठी निधी वाढवून दिला आहे. त्याबाबतीत सुद्धा सत्य वेगळेच आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार मागील बजट मधील अल्पसंख्यांक कल्याण निधीचा मोठा भाग खर्चच झाला नसल्याचे म्हटले आहे. हे सत्य बहुतेक लोकांना माहित नाही. युपीएच्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्या मदरशांमध्ये गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय शिकविले जातील. त्यांना थोडेशे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अनुदानाचे निमित्त करून सरकारला मदरशांच्या व्यवस्थापनामध्ये दखल देण्याची संधी मिळेल म्हणून बहुतेक मदरशांनी तो निधी नाकारला होता. अपवाद काही मदरसे असतील ज्यांनी हा तुटपुंजा निधी स्विकारला. याचा महाराष्ट्राशी दुरान्वयेही संबंध नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एकमताने या सरकारी योजनेचा उलेमांनी विरोध केला, असे असतांनासुद्धा मुद्दामहून मदरशांचा विषय चर्चेत आणून मदरशांविषयी गुढ वातावरण निर्माण करण्याचा आमदार महोदयांचा प्रयत्न आहे, यात शंका नाही.  

मदरशांसंबंधी सत्य परिस्थिती 

एबीपी माझाशी बोलतांना आ. अतुल भातखळकर यांनी मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाते, असा गंभीर आरोप अतिशय बेजबाबदारपणे केला. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा वाचकांनी लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे मदरसे हे गावामध्ये असतात, जंगलात, वाळवंटात किंवा दूर एव्हरेस्टवर नसतात. शिवाय मदरशांमध्ये कोणालाही मुक्त प्रवेश असतो. त्या काही प्रतिबंधित इमारती नव्हेत. ज्यांना मदरशांमध्ये काय शिकविले जाते? ते देशाच्या हिताचे आहे का विरोधात आहे? याची खात्री करावयाची असेल त्यांनी मदरशांमध्ये जाऊन खात्री करावी. उगाच मीडियामध्ये मोघम आरोप लावू नयेत.

जेव्हा लॉ कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जात नाही, मेडिकल कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण दिले जात नाही तेव्हा मदरशामध्येच इतर विषयांचे शिक्षण देण्याचा आग्रह कशासाठी? मदरसे हे धार्मिक शिक्षण देण्याचे केंद्र आहेत आणि तेथे शिकविणारे शिक्षक सुद्धा त्याचविषयातीलच तज्ज्ञ आहेत. लोकांनी दिलेल्या तुटपुंज्या चंद्यातून या मदरशांची कुतरओढ सुरू असते. तेथे गणित, विज्ञान, इंग्रजी याचे शिक्षण द्यावयाचे ठरविले तरी निधीअभावी ते देता येत नाही. ही झाली सामान्य मदरशांची स्थिती. मात्र काही मदरसे जे मोठ्या शहरात आहेत त्या ठिकाणी गणित, इंग्रजी, विज्ञानच नव्हे तर संगणकाचे ज्ञान सुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे. उदा. दारूल उलूम देवबंद, नदवतुल उलूम लखनऊ इत्यादी. 

मदरशांच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केल्यामुळेच आजही मुस्लिम समाजामधील मदरशांमधून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात नैतिकता आढळून येते. मागच्या पीढितील राजा राममोहन रॉय, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मुन्शी प्रेमचंद, राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, मौलाना अबुल कलाम आझाद, राष्ट्रपती फकरूद्दीन अली अहेमद यासारखे उंचीचे नेते मदरशातून निघालेले आहेत. याची जाण आधुनिक पीढिला नसावी. आजपर्यंत मदरशातून शिकलेला एकही विद्यार्थी बलात्कार करताना पकडला गेला नाही, चोरी करताना पकडला गेला नाही किंवा कुठलाही अन्य अपराध करताना पकडला गेला नाही. ही उपलब्धी काही कमी नाही. आज देशाला नितीमान जीवन जगणार्‍या नागरिकांची सर्व क्षेत्रात प्रचंड वाणवा आहे. मदरसे ती उणीव काही प्रमाणात का होईना भरून काढतात. खरे तर ही मोठी राष्ट्रसेवा मदरसे करतात. मदरशातून शिकून बाहेर निघालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक छोटेमोठे व्यवसाय थाटलेले आहेत. त्यातून ते नैतिक व्यवहार करून ग्राहकांची म्हणजे पर्यायाने देशाची सेवाच करत आहेत. 

मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक देशातील सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर भरतात. परंतु त्यांच्या  पाल्यांच्या शिक्षणाचा भार सरकारवर पडत नाही. मदरशातून शिकलेले विद्यार्थी व्याजी कर्ज घेत नाहीत, म्हणून बँकांना बुडवत नाहीत, शासकीय नोकरीस पात्र नसतात म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वर त्यांचा भार पडत नाही. नीट सारख्या परीक्षेमध्ये सहभागी होण्यास पात्र नसल्यामुळे इतर विद्यार्थ्यांची तेवढीच स्पर्धा कमी होते. कुठलेही तांत्रिक शिक्षण घेत नसल्यामुळे आजन्म ग्राहक बणून राहतात व व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळवून देतात. मदरशांमधून अरबी भाषा शिकून अनेक विद्यार्थी गल्फमध्ये जातात  व तेथे काम करून मौल्यवान असे परकीय चलन देशात पाठवितात. त्यासाठी खरे तर आमदार भातखळकरांनी त्यांचे आभार मानायला हवेत. 

मदरशाचे विद्यार्थी कधीच मोर्चे, धरणे, उपोषण करत नाहीत व कधीच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत नाहीत. हे विद्यार्थी प्रामाणिक, इमानदार आणि नितीमान असतात. ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात एकनिष्ठ राहतात. ते ईशभय बाळगणारे असल्यामुळे त्यांच्यावर सहज विश्‍वास ठेवता येतो. जिहादचे शिक्षण दिले जात नसल्यामुळे मदरशांमधून आजपर्यंत एकही आतंकवादी निपजलेला नाही. बॉम्ब कशाला म्हणतात याची साधी कल्पनासुद्धा त्यांना नसते. जिहादचा ज्यावेळेस धर्मग्रंथांमध्ये संदर्भ येतो त्यावेळेस ते ’जिहाद-ए-अकबर’ म्हणजेच स्व:च्या षडरिपूंविरूद्ध जिहाद करण्याचे शिक्षण त्यांना दिले जाते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे मदरशांतून शिकलेले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात असोत भ्रष्टाचारापासून मैलोगणिक दूर असतात. नीतिमान नागरिक देशात कुठून निपजत असतील तर ते मदरशांतूनच निपजत आहेत. 

लालकृष्ण आडवाणी जेव्हा उपपंतप्रधान होते तेव्हा त्यांनी देशातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण पोलिसांमार्फत करून घेतले होते. तेथे काय शिकविले जाते? त्यांना निधी कोठून मिळतो? तेथून बाहेर पडलेले विद्यार्थी काय करतात? या सर्वांची चौकशी करून लोकसभेमध्ये त्यानी घोषणा केली होती की, भारतातील मदरशांमधून कुठलेही गैर कायदेशीर कृत्य घडत असल्याचा पुरावा मिळून आलेला नाही. असे असतांनासुद्धा त्यांच्यावर देश विघातक शिक्षण घेत असल्याचा आरोप करणे या सारखे दुर्दैव ते कोणते? हा शुद्ध इस्लामोफोबियाचा प्रकार आहे.


- एम. आय शेख


पवित्र कुरआनमध्ये अल्लाहनं म्हटलं आहे की, “प्रत्येक जनसमूहाचे एक लक्ष्य असते, एक दिशा असते ज्याकडे तो वळत असतो.” आपल्या जीवनाचा ठरलेला उद्देश साकार करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. जनसमूहातील समंजस आणि जबाबदार मंडळी आपल्या जनसमूहास त्यांच्या उद्दिष्टांची वारंवार आठवण करून देत असतात. म्हणजेच कोणत्याही जनसमूहाची खरी ओळख त्यांनी ठरवलेल्या ध्येयावर होते. पुढे जाऊन अल्लाहने मुस्लिमांना उद्देशून असे स्पष्ट सांगितले आहे की, “तुम्ही (म्हणजे मुस्लिमांनी) मानरजातीच्या भल्यासाठी पुढाकार घ्या.” म्हणजेच अल्लाहने मानवजातीच्या भल्याची, त्यांच्या कल्याणाची जबाबदारी मुस्लिम समूहावर टाकली आहे, हे स्पष्ट आहे. आणखीन एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी उभं केलं आहे.” भल्या गोष्टी, भली कर्म करण्यास लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुस्लिमांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. तात्पर्य हे की मुस्लिमांना या जगात स्वतःच्या हितासाठी, मौजमजा करण्यासाठी पाठवले गेले नाही. निसर्गाचा नियम आहे की कोणतीही रचनात्मक कामे करत असताना वाईट वृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न करताना यातना, अत्याचार सहन करावेच लागतात. वाईट गोष्टी वा कृत्यांचा प्रसार-प्रचार करताना लोकांच्या विरोधास सामोरे जावे लागत नाही. मुस्लिमांचं जगणं म्हणजे आयुष्यभर सतत संघर्षाचं जगणं आहे. या जगात ऐशोआरामात जीवन व्यतीत करणं हे त्यांचं शेवटचं उद्दिष्ट नाही. त्यांनी स्वतःला अल्लाह आणि त्याच्या आदेशांना पूर्णपणे समर्पित केलेले असते आणि या जगात अल्लाहल्या अदेशांचं पालन करत आपल्या सोयीसुविधा लोककल्याणासाठी समर्पित करायच्या असतात. चांगली कामं करीत असताना अल्लाहनं मुस्लिमांवर टाकलेली जबाबदारी पार पाडीत असताना लोकांचा विरोध हा होणारच. मुस्लिमांना अल्लाहच्या मर्जीनुसार जगू न देण्याचा त्यांनी चंग बांधलेला असतो. अगोदर तोंडी विरोध करतील. मग यातना-त्रास देण्यास सुरुवात करतील. मुस्लिमांना मानसिक आणि मग शारीरिक यातना देतील विनाकारण त्यांची संसारे उद्वस्त करतील. हे सर्व त्यांनी स्वतःहून ठरवलेल्या उद्दिष्टानुसार करणयात येते. याच कार्यासाठी त्यांनी स्वतःला जणू वाहून घेतलेलं असते. अशात मुस्लिमांनी त्यांच्या अत्याचारांना घाबरून आपली विधायक कार्ये सोडून द्यावीत हीच विरोधकांची रणनीती असते. मुस्लिमांनी जर त्यांना घाबरून आपलं कर्तव्य पार पाडणे सोडून दिले तर मग मुस्लिम म्हणून जगण्यात काही अर्थच उरत नाही. मुस्लिमांनी स्वतःवरील अन्याय-अत्याचाराचा पाढा वाचायचा नसतो. कोणत्याही यातना अत्याचारांना न जुमानता आपली कर्तव्ये पार पाडायची असतात. अन्याय-अत्याचार सहन करणे आणि इतरांवर अत्याचार करणं या दोन्ही गोष्टींपासून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना दूर राहाण्यास सांगितलं आहे. प्रेषितांनी आपल्या उभ्या जीवनात याच सिद्धान्तावर अचरण केले आहे. आपल्या प्रेषितकाळाच्या जवळपास २३ वर्षे त्यांना दर दोनअडीच महिन्यांनी लहानमोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. समोर कितीही मोठे आव्हान उभे असले तरी ते कधी घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या अनुयायांची अशी फळी तयार केली ज्यांनी त्यांच्या आदेशांचे पालन करीत जगभर इस्लामचा प्रसार-प्रचार केला. म्हणूनच आपण आज मुस्लिम आहोत. प्रेषितांना त्यांच्याच लोकांनी, नातेबाईकांनी कडाडून विरोध केला. त्यांनी कधी त्यास भीक घातली नाही. त्यांना अमिष दाखवले गेले ते त्यांनी धुटकावून लावले. जर त्यांच्यावरील अत्याचारांना बळी पडून आपल्या विरोधकांची तक्रार मांडतच बसले असते तर त्यांनी इस्लामला जगभर पसरवले नसते. मुस्लिमांनी देखील याच गोष्टींचा आधार घेतला पाहिजे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांची प्रत्येकासमोर रात्रंदिवस तक्रार मांडत राहणे त्यांचे काम नाही. अल्लाहने घालून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता अशा तहेने होणार नाही. भारतात आणि जगात फक्त मुस्लिमांवरच अत्याचार होत नाहीत, इतर जनसमूहांवर मुस्लिमांपेक्षा जास्त अन्याय-अत्याचार होत असतात. स्वतःमध्येच अडकून न पडता इतर लोकांवरील अत्याचारांना रोखण्यास मुस्लिमांनी पुढे आले पाहिजे. कारण इतर जनसमूहांवर नव्हे तर अल्लाहने मुस्लिमांना इतर लोकांच्या कल्याणासाठी या धरतीला उभे केलेले आहे, याची जाण आणि भान मुस्लिमांनी ठेवायला हवे. तरच त्यांचं जगणं सार्थक होईल. तसे न केल्यास फक्त आपल्यासाठी सुखसुविधांची मागणी करत बसणं, आपल्यावरील अत्याचारांच्या तक्रारीवरच आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत बसणं म्हणजे आपणच स्वतःस संपवण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. सा. शोधन याच गोष्टींचा प्रचार-प्रसार आजवर करीत आले आहे आणि यापुढेही याच उद्दिष्टासाठी सतत प्रयत्नशील राहाणार आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो. ९८२०१२१२०७


हाथरस येथील दलित मुलीच्या हत्येची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने  या घटनेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेत सीएनएन या प्रतिष्ठित वाहिनी सह अनेक वाहिन्यांनी भारतात बलात्कार का थांबत नाहीत यावर पैनल डिस्कशन सुद्धा आयोजित केले होते. भारतीयांचा हा किती मोठा सामाजिक अपमान म्हणावा? या विषयावरुन तिकडे देशाची प्रचंड बदनामी सुरू आहे तर इकडे प्रचंड राजकारण सुरू आहे. जात पंचायतींचे आयोजन करून आरोपींना बिनशर्त सोडले नाही तर देश चालू देणार नाही अशा धमक्या उघडपणे दिल्या जात आहेत. या घटनेकडे फक्त एक घटना म्हणून पाहणे उचित होणार नाही कारण ही एक स्वतंत्र घटना नाही तर कोपर्डी, निर्भया, आसिफा, हैद्राबादची डॉ. प्रिती रेड्डी आणि आता मनिषा अशा एक ना अनेक मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या साखळीची एक कडी आहे. विदेशी महिला सुद्धा ह्या दुष्टचक्रातून सुटलेल्या नाहीत हे सातत्य भयावह आहे. म्हणून या घटनेविषयी स्वतंत्र चर्चा करण्यापेक्षा यावर सांगोपांग चर्चा करणे अनुचित होणार नाही.

चांगले आणि वाईट यांच्यातला  फरक न करता पश्चिमेकडून आलेल्या प्रत्येक  गोष्टीचे आपल्या देशात स्वागत केले जाते. हे बलात्काराचे पहिले कारण. ते कसे याचा तपशील पुढे येईलच. तत्पूर्वी एक दुर्दैवी घटना पाहू. 2017 साली नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री नववर्ष साजरा करण्यासाठी बेंगलुरूच्या बिग्रेड रोड, कमर्शियल स्ट्रीट आणि एम.जी. रोड येथे जमलेल्या हजारो स्त्री-पुरूषांच्या संरक्षणासाठी दीड हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. परंतु एवढ्या पोलीसांसमक्ष गर्दीत सामील शेकडो महिलांचा विनयभंग करण्यात आला. असे अश्लील चाळे करण्यात आले की ज्यांचे वर्णन शब्दांमध्ये करणे शक्य नाही. येवढी मोठी राष्ट्रीय शरमेची घटना अलीकडे दुसरी झाली नाही, परंतु पाहिजे तेवढी लाज आपल्याला या घटने नंतर ही आलेली नाही. हे त्यानंतरच्या घटनांवरून सिद्ध झालेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा जे लोक स्वीकार करतात त्यांना त्यापासून होणारे नुकसान आपसुकच सहन करावे लागते. दुसऱ्या कोणाला त्यांचे नुकसान करण्याची आवश्यकता नसते. प्राचिन हिंदू संस्कृती आणि इस्लाम यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या भारतीय गंगा-जमनी संस्कृतीचा काही लोकांना संपूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यामध्ये जसे हिंदू सामील आहेत तसेच काही मुस्लिमही सामील आहेत.

त्यातूनच महिलांच्या पोशाखाकडेच नव्हे तर संपूर्ण महीलांकडेच  बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. समाजमाध्यमांच्या गतिमान प्रगती नंतर वेगाने हा फरक पडलेला आहे. याची सुरूवात महिलांच्या जबाबदारीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात पडलेल्या फरकातून झालेली आहे. प्राचिन हिंदू परंपरा आणि इस्लाम यामध्ये महिलांकडे घरातील जबाबदारी तर पुरूषांकडे घराच्या बाहेरील जबाबदारी अशी सरळ-सरळ विभागणी करण्यात आलेली होती. आजच्या काळात ही विभागणी अमान्य करण्यात आलेली आहे. स्त्रीलाही पुरूषांच्या बरोबर घराबाहेरील कामे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा विचार भारतीय नाही, तो पश्चिमेकडून घेतलेला आहे. चरित्रहीन पाश्चिमात्य पुरूषांनी आपल्या अपवित्र क्रियाकलापांच्या सोयीसाठी महिलांना कामानिमित्त घराबाहेर काढूनही त्यांना सेवेचेच काम दिलेले आहे. परिणामी त्यांची निवड सेल्सगर्ल, बार गर्ल, रिसेप्शनिस्ट, पर्सनल असिस्टंट, रूम अटेंडंट, एअर होस्टेस, डांसर सारख्या पदावर करण्यात येते. फार कमी प्रमाणात महत्वाची पदे त्यांना दिली जातात. 

अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही महिला ही राष्ट्रपती म्हणून स्विकार्य नाही, हे सत्य नाकारण्या सारखे नाही. हवाई सुंदरी या पदाची तर मोठी गंमतच आहे. जी कामे घरात केली तर हिणकस वाटतात तीच कामे हवाई सुंदरींकडून विमानात घेतली जातात. त्याचा मात्र मोठा मान समजला जातो. याची विसंगती महिलांच्याही लक्षात येत नाही. पुरूषांच्या लक्षात येते मात्र ते सोयीनुसार गप्प असतात.

वास्तविक पाहता गृहिणी म्हणून काम करणे हा स्त्रीत्वाचा सर्वोच्च सन्मान असतो. कारण मूल जन्माला घालणे आणि त्याच्यावर चांगले संस्कार करणे आणि देशाला चरित्रवान नागरिकांचा अखंड पुरवठा करणे यापेक्षा महत्वाचे काम जगात दूसरे कोणतेही नाही. मानव वंशाचे अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे. आणि हे काम स्त्रीच चांगल्या प्रकारे करू शकते यात शंका नाही. कारण तिची जडण घडण नैसर्गिकरित्या त्या कामाला अनुकूल अशी असते. इस्लाममध्ये या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिलेल आहे. घराची जबाबदारी नाकारल्यामुळे पाश्चिमात्यांची कुटुंब व्यवस्था ढासाळलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अभ्यासाकडे कसे वळवावे, हा आमच्या पुढील सर्वात मोठा प्रश्न आहे, अशी चिंता हिलरी क्लिंटन यांनी 18 जुलै 2009 रोजी मुंबईच्या सेंट झेवियर सभागृहामध्ये बोलतांना व्यक्त केली होती. आई आणि वडील दोघेही जर कामानिमित्त नित्यनियमाने घराबाहेर राहत असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. मात्र एवढी साधी बाबही या उच्चशिक्षित अडाण्यांच्या लक्षात येत नाही.  

महिलेची घरातील उपस्थिती घरावर नियंत्रण ठेवते. मिरजोळी चिपळूनच्या प्रसिद्ध उर्दू लेखिका फेरोजा तस्बीह यांच्या मते स्त्री ही घररूपी राज्याची राणी असते. घरातील व्यवहारांचे नियंत्रण करण्याचा तिचा अधिकार असतो. आधुनिक लोक या विचाराला नाकारून महिलांना रोजगारासाठी घराबाहेर काढतात. येथेच पोशाखाचा प्रश्न निर्माण होतो. घराबाहेर जातांना नीट-नेटके कपडे घालणे, थोडासा साज श्रृंगार करणे ह्या स्त्री सुलभ भावनेतून त्या टापटीप राहण्याचा प्रयत्न करतात. एकतर तारूण्य, दूसरा श्रृंगार वर पाश्चिमात्य पद्धतीचे तोकडे आणि तंग कपडे यातून मग त्या पर पुरूषांच्या नजरेच्या कचाट्यात सापडतात. बेपर्दगीसे हवस पैदा होती है, या पुरूषी प्रवृत्तीतून सातत्याने महिला अडचणीत येतात. वाईट पुरूषांना जिथे संधी मिळेल तिथे ते महिलांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. वश झाली तर ठीक नाही तर तिचा विनयभंग प्रसंगी बलात्कार करतात.

खुशबू जो लुटाती है मसलते हैं उसीको, 

एहसान का ये बदला मिलता है कली को 

यावर एक सोपा उपाय इस्लामने सांगितलेला आहे, 

ज्याला परदा म्हणतात. परदा व्यवस्थेचा उद्देश महिलेला डांबून ठेवणे नव्हे तर तिच्या सौंदर्याला पब्लिक अनलिमिटेडच्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड करणे हा आहे. त्याच्यासाठी लिमिटेड की जो तिचा पती आहे, ’’मी स्वतःला परद्यामध्ये ठेवून पाहिले तर मला स्वातंत्र्याचा अत्युच्च अनुभव आला’’ असे नॉवोमी वॉलिफ नावाच्या अमेरिकी लेखिकेने म्हंटलेले आहे. ती पुढे म्हणते की, ती एक सुंदर महिला होती. तिला जेव्हा घराबाहेर पडावे लागत होते, तेव्हा स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कित्येकतास आरशासमोर उभे राहून तयारी करावी लागत होती. ती जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जात होती, तर स्वतःला लोकांच्या कौतुकास्पद नजरेमध्ये असल्याचा तिला भास होत होता. आपल्याला सर्व लोक सुंदर समजतात आणि आपल्याकडे पाहतात यातून तिलाही आनंद मिळत होता. मात्र तिला या गोष्टीची भितीही वाटत होती की, वाढत्या वयामुळे ती लोकांच्या नजरेतून जाईल. मग पुरूषांच्या नजरेच्या आकर्षणाच्या केंद्रात राहण्यासाठी तिला जास्त मेहनत व जास्त कॉस्मेटिक्सवर खर्च करावा लागत होता. स्वतःला ती प्रदर्शनीय वस्तू समजत होती. तिने इस्लाम स्विकारल्यानंतर जेव्हा परद्याचा उपयोग केला तेव्हा स्वतःला पहिल्यांदा पुरूषांच्या वाईट नजेरपासून सुटका करून घेत स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. (संदर्भ : दावत, 5 सप्टेंबर 2008, पान क्र. 1)

लैंगिक प्रेरणा ही भुकेनंतर दूसऱ्या क्रमांकाची तीव्र प्रेरणा असते. वर्तन स्वातंत्र्याने तिच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य असते. केवळ शरियतच्या व्यवस्थेअनुसारच तिच्यावर नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी शरियतने स्त्री आणि पुरूष यांना समाजात वावरण्यासाठी आचार संहिता घालून दिलेली आहे. स्त्रीयांना परदा तर पुरूषांना दाढी ठेवणे, नजर खाली ठेवून चालणे, परस्त्रीचा संपर्क टाळणे इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की इस्लामच्या परदा व्यवस्थेला बहुतांशी लोकांचा विरोध आहे. मात्र ही धारणा चुकीची आहे. प्ल्यू ग्लोबल अ‍ॅटीट्यूड प्रोजेक्ट नावाच्या संस्थेने युरोप व अमेरिकेमध्ये बुरख्यासंबंधी सर्व्हे केला तर 28 टक्के लोकांनी त्याला विरोध तर बाकीच्यांनी त्याचे समर्थन केले होते. (संदर्भ : लोकमत 11-7-2010 पेज नं. 3) 

आँखों को गुस्ल दो गुनाह बहोत किया है, 

दिल ने शिकायत की और तडपा दिया है 

इस्लामशिवाय अन्य जीवनपद्धतीमध्ये परदा पद्धती नाही. त्यामुळे महिला बाजारात येतात व सार्वजनिक होतात. अर्थात त्यांचे सौंदर्य जे की, व्यक्तीगत राहणे अपेक्षित होते ते सार्वजनिक होते त्यातूनच वाईट चारित्र्याच्या व्यक्तींचे फावते. एकतर्फी प्रेमातून महिलांवर अ‍ॅसिड हल्ले, चेहऱ्यावर ब्लेडने वार करणे, असे प्रकार केले जातात. पर पुरूषांच्या जाचामुळे कंटाळून अनेक महिला आत्महत्या करतात. अनुराधा बाली आणि चंद्रमोहन बिष्णोई अर्थात चाँद आणि फिजा यांच्यातील प्रेमप्रसंगाच्या घटनेतून बुद्धिमान लोकांना बोध घेता येईल.

 चंद्रमोहन बिष्णोई हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते तर अनुराधा बाली ही सरकारी वकील होती. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नटून-थटून मैत्रीणीसोबत चंदीगढच्या एका हॉटेलमध्ये गेली होती. त्याच हॉटेलमध्ये चंद्रमोहन जेवायला आले होते. त्यांची नजर तिच्यावर पडली आणि ती त्यांना भावली. त्यातून आपली सर्व शक्ती पणाला लावली. स्वतः धर्म बदलून चाँद झाले तर अनुराधाला फिजा होण्यासाठी भाग पाडले. तिला हस्तगत केले. मन भरल्यावर तिला वाऱ्यावर सोडून दिले. ती इतकी वैफल्यग्रस्त झाली की तिने आत्महत्या केली. तिच्या शरीरातून दुर्गंधी उठली तेव्हा लोकांना कळाले की, तीने आत्महत्या केलेली आहे. अनुराधा जर का बेपर्दा होवून हॉटेलमध्ये गेली नसती तर तिला अशा दुर्देवी मरणाला कवटाळावे लागले नसते. चंद्रमोहन आजही आपल्या पूर्वपत्नीबरोबर आनंदात आहेत. अनुराधा मात्र या जगात नाही. 

आश्चर्य या गोष्टीचे आहे की, परदा न केल्यामुळे शेकडो महिला पुरूषी अत्याचाराच्या बळी पडलेल्या आहेत. तरीपण महिलांच्या लक्षात ही साधी गोष्ट येत नाही की, आपण पुरूषी अत्याचाराला का बळी पडत आहोत? काही पुरूष वासनांध असतात. अशा पुरूषांना केवळ संयमाने वागा, असे सांगून भागत नाही. समाजात कोण वासनांध आहे? हे समजून येत नाही. म्हणून बुरखा घातला तर सर्वच पुरूषांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. 

आमच्यासाठी काय हितावह आहे? व काय नाही? याचा निर्णय सर्व शक्तीमान अल्लाहखेरीज कोणीच करू शकत नाही. मानव संस्कृतीचे स्थैर्य लाज-लज्जेवर अवलंबून आहे. जर मानवांनी तेच सोडले तर मानव आणि जनावर यात फरक तो काय  

अल्लाह पाक आपल्या सर्वांना चांगली समज देओ.    

आमीन


- एम.आय. शेख



फ्रीडम हाऊस’ या अमेरिकन संशोधन  संस्थेच्या एका नव्या अहवालानुसार,  नियंत्रण कडक करण्यासाठी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासाठी सरकारे कोरोनाव्हायरस साथीचा फायदा घेत असल्यामुळे जगभरात लोकशाही संकटात आहे. ‘फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ नामक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात 80 देश असे आढळून आले आहेत ज्यांचे स्वातंत्र्य बिघडले आहे, त्यापैकी अनेक राष्ट्रे चीन आणि कंबोडियासारखी दडपशाही किंवा हुकूमशाही सरकारे आहेत, असे अहवालात म्हटले आहे. त्यात भौगोलिकदृष्ट्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यांच्या संदर्भात विविध देशांमधल्या स्वातंत्र्याचा आढावा दिला गेला आहे. स्वातंत्र्याच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात  आलेल्या 210 देशांमध्ये भारताचा 83 वा क्रमांक लागतो. भारत तिमोर-लेस्ते आणि सेनेगल या देशांसह स्वतंत्र लोकशाही या श्रेणीत शेवटच्या पाच क्रमांकामध्ये आहे. यापूर्वी लोकशाही सूचकांकाच्या (डेमोक्रॅसी इंडेक्स) जागतिक क्रमावारीत भारताची 10 व्या स्थानावरून 51व्या स्थानावर घसरण झाल्याची बाब द इकनॉमिस्ट इंटेलिजन्ट्स यूनिटने (ईआययू) 2019साठी जानेवारी 2020 मध्ये जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. भारतातील लोकशाही सदोष  असून भारतात नागरी स्वातंत्र्यामध्येही घसरण झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही देशाची मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझिलसारख्या देशाने 52 वे स्थान पटकावले आहे. ईआययू संस्थेकडून 165 स्वतंत्र देश आणि दोन क्षेत्रातील लोकशाहीची सद्यस्थितीचा अभ्यास करूनच दरवर्षी हा  अहवाल प्रसिद्ध केला जातो.


यंदाच्या अहवालात भारताचे लोकशाही  सूचकांकामधील स्थान 10 व्या स्थानावरून 51व्या स्थानावर आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या ऱ्हासामुळे भारताची ही घसरण झाल्याचे यात म्हटल्याने केंद्र सरकारसाठी हा अहवाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. 2018मध्ये भारताचे एकूण अंक 7.23 एवढे होते. ते घसरून 6.90 झाले आहेत. यंदा भारताचा समावेश त्रुटीपूर्ण लोकशाहीमध्ये करण्यात आला आहे.


तसेच मुदित कपूर, शमिका रवी, अनुप मलानी आणि अर्णव अगरवाल यांनी अभ्यासाअंती तयार केलेल्या आगामी अहवालात स्पष्ट अनुमान काढण्यात आले आहेत. त्यांना असे आढळून आले की, कोरोना विषाणूशी संबंधित 92 टक्के लोकांच्या मृत्यूंची नोंद लोकशाही देशांमध्ये (जगाच्या एकंदर लोकसंख्येपैकी 48 टक्के लोकसंख्या लोकशाही देशात राहाते) झाली. तर उर्वरित 8 टक्के मृत्यूंची नोंद मिश्र व्यवस्थेत किंवा  हुकुमशाहीवादी देशांत (जगातील उर्वरित 52 टक्के लोकांचे घर) झाली. या विषमतेचा त्यांनी आणखी सखोल अभ्यास केला, त्यावेळी हुकुमशाहीवादी देशांपेक्षा लोकशाहीवादी देशांमधील कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येभोवतीचा सरासरीचा लंबक सातत्याने हलताना आढळून आला. मात्र, त्याचवेळी झापडबंद प्रशासकीय व्यवस्था असलेल्या देशांमधील उपलब्ध डेटा संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. यातून असा निष्कर्ष निघतो की, हुकुमशाहीवादी देशांची सरकारे कोरोना विषाणूसंदर्भातील घटना आणि त्याच्याशी संबंधित मृत्यूंची आकडेवारी दाबून ठेवत असावेत. अमेरिकी सरकारकडून निधी घेणाऱ्या ‘फ्रीडम हाऊस’चे अध्यक्ष मायकल जे. अब्रामोविट्झ यांच्या मते, जागतिक आरोग्य संकट म्हणून जे सुरू झाले ते लोकशाहीच्या जागतिक संकटाचा भाग बनले आहे. जगाच्या प्रत्येक भागातील सरकारांनी सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे आणि लोकशाही व मानवअधिकारांचा अवलंब करण्याची संधी हिरावून हिरावून घेतली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर 2020 या कालावधीत ‘फ्रीडम हाऊस’ आणि ‘सर्व्हे फर्म जीक्यूआर’ यांनी 105 देशांतील आणि प्रदेशांतील सुमारे 400 पत्रकार, कार्यकर्ते, सनदी अधिकारी आणि तज्ज्ञांचे सर्वेक्षण केले. ‘फ्रीडम हाऊस’ने आंतरराष्ट्रीय विश्लेषकांशीही सल्लामसलत केली आणि अहवालात समाविष्ट असलेल्या एकूण देशांची संख्या 192 वर आणली. सरकारची पारदर्शकता, प्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वासार्ह निवडणुका, सत्तेचा दुरुपयोग रोखणे आणि असुरक्षित गटांचे संरक्षण हे लोकशाहीचे पाच प्रमुख स्तंभ कोरोना काळात संकटात सापडले असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. अहवालाच्या सहलेखिका सारा रेपुची म्हणाल्या, नवीन कोविड युगातील कायदे आणि पद्धती बदलणे आगामी काळात अवघड़ जाणार आहे. मूलभूत मानवी अधिकारांचे नुकसान साथीच्या रोगाच्या पलीकडे दीर्घकाळ टिकेल.


धोक्यात आलेले पाच स्तंभ

कोरोनाव्हायरसचा प्रभावाबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता वर्तविण्यात अनेक जागतिक नेते अपयशी ठरले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. सर्वेक्षणात 62 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी आपल्या राष्ट्रीय सरकारकडून व्हायरसशी संबंधित माहितीवर अविश्वास दाखवला. पारदर्शकतेचा मुद्दा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या राजकारण्यांकडून निराधार किंवा दिशाभूल करणारी विधाने करण्यापासून ते सक्रिय भ्रष्टाचारात गुंतलेल्या कंपन्या आणि मंत्र्यांपर्यंत असू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांची कॉविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह चाचणी आली. ट्रम्प यांचे वरिष्ठ सहकारी होप हिक्स यांची विषाणू टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांची  टेस्ट घेण्यात आली होती.


प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे

सर्व्हे करण्यात आलेल्या किमान 91 टक्के देशांनी साथीच्या रोगादरम्यान प्रसारमाध्यमांवरील निर्बंध वाढविले आहेत. या संकटकाळात वृत्तांकन करीत असलेल्या पत्रकारांना अटक करण्यात आली आहे, त्रास देण्यात आला आहे आणि प्रसारमाध्यमांची ओळख पुसून टाकण्यात आली आहे; वृत्तवाहिन्या  बंद करून ऑनलाइन सेन्सॉर करण्यात आल्या आहेत. 

सर्वसामान्य नागरिकांनाही मोकळेपणाने बोलण्याच्या मर्यादांना तोंड द्यावे लागत आहे. उदाहरणार्थ, किर्गिझस्तानमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांबद्दल बोलल्यानंतर जाहीर माफी मागावी लागली, असे एका सर्वेक्षण प्रतिसादकर्त्याने सांगितले. आणखी एक उदाहरण म्हणजे चीन, ज्याने शासन संदेशाच्या विरोधात माहिती देणाऱ्या कोणावरही कारवाई केली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

चीनमधील वुहान येथील डॉक्टर ली वेन्लियांग यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा या विषाणूबद्दल धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या गैरवर्तनाची कबुली देणाऱ्या एका निवेदनावर स्वाक्षरी करून घेतली. नंतर त्यांनी या विषाणूची पॉझिटिव्ह चाचणी केली आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांचा मृत्यू झाला आणि चिनी सोशल मीडियावर शोक आणि संतापाची लाट उसळली.

कोरोना काळात सतत सरकारी सत्तेचा गैरवापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. लायबेरियात सुरक्षा दलांनी कर्फ्यूच्या आदेशांची क्रूर अंमलबजावणी केली, असे एका व्यक्तीने सर्वे क्षणादरम्यान सांगितले. कझाकीस्तानमध्ये साथीच्या रोगांदरम्यान राजकीय छळामध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे आणि कंबोडियात प्रशासनाने राजकीय विरोधावर कारवाई करण्यासाठी या उद्रेकाचा उपयोग केला आहे, असे एका तज्ज्ञाने सांगितले. 

सत्तेचा हा गैरवापर आणि साथीच्या नव्या निर्बंधांचा वंचित समाजावर आणि अल्पसंख्याक गटांवर विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेत मुसलमानांवर ’सुपरस्प्रेडर्स’ असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

भारतातील मुस्लिमांवर हिंसक हल्ले, छेडछाड, जबरदस्तीने हकालपट्टी आणि साथीच्या रोगादरम्यान वाढत्या इस्लामोफोबियामुळे भेदभाव केल्याच्या घटना घडल्याची तक्रार त्यांनी केली आहे. अहवालात म्हटले आहे की कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित केले जात असल्यामुळे सरकारे आणि इतर कलाकार संवेदनशील गटांविरुद्ध सतत होणारे अत्याचार वाढवण्यात यश आले आहे. अखेरीस, साथीच्या रोगामुळे जगभरातील निवडणुकांमध्ये व्यत्यय आला आहे आणि काही हुकूमशाही सरकारे या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोप तज्ज्ञांनी केला आहे. उदाहरणार्थ, हाँगकाँगच्या अर्धस्वायत्त चिनी शहरात सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्याऐवजी सरकारने साथीच्या रोगांचा हवाला देत निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली आणि लोकशाही समर्थक अनेक उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली.

चीनमध्ये जून महिन्यात सरकारविरोधी, लोकशाही समर्थक आंदोलनानंतर हे वादग्रस्त पाऊल उचलण्यात आले. अनेकांचे म्हणणे आहे की, शहराच्या स्वातंत्र्याला मोठा धक्का बसला. अमेरिका, बेलारूस, श्रीलंका आणि बुरुंडीसह इतर अनेक देशांनी आरोग्य संकटामुळे त्यांच्या निवडणुका तडजोड होण्याची शक्यता पाहिली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. ‘फ्रीडम हाऊस’ने जगभरातील सरकारांना आणि व्यवसायांना अनेक  शिफारस केलेल्या कृतींद्वारे आपल्या लोकशाहीचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. उदाहरणार्थ, संस्था आणि देणगीदारांनी आर्थिक मदत, कौशल्य प्रशिक्षण किंवा तांत्रिक सहाय्ययांच्या माध्यमातून मुक्त आणि स्वतंत्र माध्यमांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. नागरी समाज गट आणि मानवाधिकार संघटनांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, ज्यांची सेवा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, अशीही शिफारस करण्यात आली होती. या अहवालात डेमोक्रॅटिक सरकारांना मानवी हक्कांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्याचे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले होते, विशेषतः जेव्हा ते स्त्रिया आणि वांशिक किंवा धार्मिक अल्पसंख्याकांसारख्या संवेदनशील गटांना लक्ष्य करतात. सरकारी अधिकाऱ्यांसह मानवाधिकाराच्या गैरवापराला शिक्षा देण्यासाठी सरकारे व्हिसा बंदी आणि मालमत्ता गोठवण्याचा वापर करू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले आहे, साथीच्या रोगाच्या खूप आधीपासून सुरू झालेले लोकशाही प्रशासनाचे संकट, आरोग्यसंकट कमी झाल्यानंतरही कायम राहण्याची शक्यता आहे कारण आता लागू होणारे कायदे आणि नियम उलटे करणे कठीण जाईल.  निर्बंध असूनही संशोधक पत्रकारिता पुढे सरसावली आहे. दरम्यान, दडपशाही देशांमध्येही जगभरात जनआंदोलने सुरू आहेत. ‘फ्रीडम हाऊस’च्या संशोधकांच्या मते, 158 देशांनी प्रात्यक्षिकांवर निर्बंध लादले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून किमान 90 राष्ट्रांनी लक्षणीय आंदोलने अनुभवली आहेत.

भारताला मिळालेले एकूण गुण 2019 सालाच्या 75 वरून 2020 साली 71 पर्यंत कमी झाले आहेत. इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत, भारताला 55 गुण मिळाले आणि देशाला पार्टली फ्री श्रेणीत वर्गीकृत केले.

जागितक पातळीवर मूल्यांकन करण्यात आलेल्या 195 देशांपैकी 83 (43 टक्के) देश ‘फ्री’ श्रेणीत, 63 देश (32 टक्के) ‘पार्टली फ्री’ श्रेणीत, तर 49 देश (25 टक्के) ‘नॉट फ्री’ श्रेणीत समाविष्ट झाले आहेत. गेल्या दशकात ‘फ्री’ श्रेणीतल्या देशांचा वाटा तीन टक्क्यांनी कमी झाला आहे, तर ‘पार्टली फ्री’ आणि ‘नॉट फ्री’ श्रेणीत देशांची टक्केवारी अनुक्रमे दोन आणि एक टक्क्यांनी वाढली आहे. ’फ्री’ श्रेणीत फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि लक्झेमबर्ग ही राष्ट्रे अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकावर आहेत.

अहवालात, ट्युनिशिया हा एकमेव असा देश आहे की ज्याने 85 राष्ट्रांच्या ’फ्री’ श्रेणीत भारतापेक्षा कमी गुण मिळवले आहेत. ‘फ्रीडम हाऊस’च्या मते, वर्ष 2019 हे जागतिक स्वातंत्र्यामध्ये आलेल्या घसरणीचे सलग 14 वे वर्ष होते. 2019 साली 64 देशांमधल्या लोकांना त्यांचे राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हिरावण्याचा अनुभव आला, तर केवळ 37 देशांमध्ये लोकांच्या अनुभवात सुधारणा झाली. जगातल्या 41 प्रस्थापित लोकशाहीपैकी 25 मध्ये इंटरनेटवरील बंदी सहन करावी लागली. दरडोई उत्पन्न, जागतिकीकरणासाठी दरवाजे खुले ठेवणे, आरोग्यसेवा यंत्रणांचे स्वरूप आणि भौगोलिक तसेच लोकसंख्याशास्त्रीय घटक इत्यादी घटकही कदाचित अधिक महत्त्वाचे असू शकतात. राजकारणाला महत्त्व आहेच परंतु कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर पुढील काही महिने आणि वर्षांमध्ये लोकशाहीवादी देशांमधील उत्पादकतेचे प्रश्न महत्त्वाचे असतील.


- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक 

8976533404


trump  Joe

3 नोव्हेंबर 2020 रोजी होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या  निवडणुकातील दोन प्रमुख उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जोबायडन यांच्या दरम्यान 29 सप्टेंबर रोजी पहिली वादविवादाची फेरी झाली. चर्चेची ही फेरी क्वि लँडच्या ओहायओ शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. या चर्चेपुर्वी दोन्ही उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. जशी की अपेक्षा केली जात होती, ट्रम्प यांनी आपल्या हाडेलहप्पी स्वभावाप्रमाणे आरडाओरडा करून चर्चेत वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या संबंधी चर्चे त असलेल्या आयकर संबंधीच्या मुद्याला हात घातला. त्यांनी ट्रम्प यांना विचारले की, तुम्ही किती आयकर भरलात? त्या संबंधीचे रिटर्न जगाला कधी दाखवाल? तेव्हा ट्रम्प म्हणाले की, ते लवकरच    आपले रिटर्नस् जाहीर करणार आहेत. तेव्हा पुन्हा बायडन यांनी प्रतीप्रश्न केला. केव्हा? इन्शाअल्लाह तुम्ही दाखवाल. बायडन यांनी इन्शाअल्लाह हा शब्द उच्चारताच ट्रम्प सहीत अमेरिकेचे अनेक नागरिक गोंधळून गेले. अनेकांसाठी हा शब्द नवीन होता. अनेक लोकांनी गुगलवर इन्शाअल्लाह या शब्दाचा अर्थ शोधण्यास सुरूवात केली. तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिम लोकांनी लगेच हा शब्द केव्हा उच्चारला जातो, त्याचा अर्थ काय, इत्यादी बाबतची माहिती तत्परतेने सोशल मीडियावर टाकली. दिवसभर हा शब्द समाजमाध्यमांवर ट्रेंड करत होता. 

या चर्चेची पहिली फेरी जिंकल्याचा दावा दोन्ही उमेदवार जरी करत असले तरी ही चर्चा घडवून आणणाऱ्या अँकरची मात्र दमछाक झाली. त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांना आवरण्यासाठी भरपूर कष्ट पडले. अनेकवेळा ट्रम्प यांना गप्प बसविण्यासाठी कठोर शब्दांचा उपयोग करावा लागला.

या चर्चेमधून एक भीतीदायक सत्य पुढे आले की, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निवडणुकीत पराजय झाल्यास तो स्वीकारण्यासाठी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ट्रम्प यांना येत्या निवडणुकीत सातत्याने पराभवाची भीती वाटत असल्यामुळे त्यांनी आतापासूनच पोस्टल बॅलेटचे निमित्त पुढे करून निकालांना सर्वो च्च न्यायालयात आव्हान देण्याचे सुतोवाच केलेले आहे. कोर्टात त्यांच्या बाजूने निकाल लागेल, याची त्यांना खात्री वाटत असून, त्यांच्या या पावित्र्याने अमेरिकेतील सज्जन नागरिक मात्र धास्तावले आहेत. 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget