Halloween Costume ideas 2015

रयतेचा राजा-शिवराय माझा

शिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य होते आणि जेव्हा राजा नि:पक्षपातीपणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी राज्य चालवतो तेव्हाच स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात होत असते, हे शिवरायांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.


इतिहासात तसे पुष्कळ राजे होऊन गेले पण छत्रपती शिवरायांसारखे स्थान व सन्मान कोणालाही मिळाला नाही. शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साह आणि उमेदीने साजरी केली जाते, तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही, असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या शिवरायांमध्ये असे काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? हे वेगळेपण समजून घेतले, तर शिवचरित्राचा नीट उलगडा होईल.
    पहिली गोष्ट म्हणजे शिवराय अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेले नव्हते. त्यांनी छोट्या जहागिरीतून मोठे राज्य निर्माण केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात पुष्कळ फरक आहे.
तथापि राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे काही एकमेव नव्हते, इतरांना शिवाजी माहाजांसारखे जनसामान्यांत स्थान मिळाले नाही. त्यांच्या राज्याचे वेगळेपण कोणते, तर त्यांचे राज्य सर्वसामान्य रयतेला आपले वाटत होते. शिवरायांचे कार्य हे आपलेच कार्य आहे, असे त्या रयतेला वाटत होते. त्यांची अनेक उदाहरणे इतिहासात ठळकपणे नोंदवण्यात आली आहेत. पन्हाळगडचा वेढा, आगर्‍याहून सुटका असे अनेक प्रसंग याची ग्वाही देतात. अनेकांनी त्यासाठी हसत हसत मरण पत्करले.
आगर्‍याहू सुटकेच्या वेळी आपण पकडले जाणार, मारले जाणार याची मदारी मेहतरला अन हिरोजी फर्जंदला जाण होती. पण मृत्यूला कवटाळून आत्महुती द्यायला ते दोघे का तयार झाले? शिवरायांनी आरंभलेले कार्य मोलाचे आहे ते पूर्ण व्हायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच त्यांच्या मनात भावना होती. सर्व सहकार्‍यांत, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी महाराज तयार करू शकले यात त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे. असमान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढ्यातच होतात. लोभाने जे लढतात अन मरतात त्यांची नोंद ठेवावी, असे इतिहासाला वाटत नाही.
    त्याकाळी सर्व सामान्य जनता राजा कोण आहे यासंबंधी फारशी काळजी करत नसे. कोणीही राजा आला किंवा गेला, कोणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. शिवाजी महाराजांचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवराय जहागिरदार-देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागले. वतनदार हे मालक नाही, तर रयतेचे नोकर आहेत असे ते रयतेला सांगू लागले व त्याप्रमाणे अनुभव येऊ लागला. रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन मुजोर वतनदारांना जरब बसेल, अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी होऊ लागली. उद्ध्वस्त झालेली गावे शिवरायांनी कौल नामे घेऊन वसवली. नव्याने जमिन कसायला घेणार्‍यांना बी-बियांणे देऊन आणि औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्राधान्य दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा महसूल वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्‍चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व आमलात आणला.
    दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन शिवराय वागले. उलट दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत केली. वतनदारांची व जमिनदारांची अत्यांचारांची व्यवस्था महाराजांनी पार मोडून काढली. रयतेला गुलाम करणार्‍यांना देशमुख, देशपांडे वगैरे ग्रामीण अधिकार्‍यांचे वाडे व कोट पाडून महाराजांनी जमिनदोस्त केले व इतर रयतेसारखी साधी घरे बांधून रहावे असा हुकूम सोडला. त्यामुळे त्यांचा वतनदारीवर दाब बसून रयतेची त्यांच्या कचाट्यातून सुटका झाली. जनता सुखी आणि स्वतंत्र झाली.
    शिवचरीत्रांतील काही बाबी अगदी निर्विवाद आहे. स्त्रीयांच्या अब्रू संबंधींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन ही अशीच एक इतरांपेक्षा वेगळी ठरवणारी बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काही सरंजामदारांच्या काळात स्त्रीयांच्या अब्रूला, विशेषत: गोरगरीबांच्या महिलांच्या अब्रूला किंमत नव्हती. त्या राजे रजवाडे व राजपूत तर सोडाच पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती. आणि त्याविरूद्ध कोणाकडेही दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अशा काळात शिवरायांचा दृष्टिकोन मुलत:च वेगळा होता. या संदर्भात रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्याने केलेल्या अत्याचाराची बाब शिवरायांच्या कानावर आली. पाटलांच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हात पाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर आमलात आली. त्यामुळे रयतेच्या मनातील शिवरायांबद्दल आदर व दरारा वाढला. महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या बरोबर गैर व्यवहार न करता तिची चोळी-बांगडी करून पाठवणी करण्याची कथाही प्रसिद्ध आहे. या घटनेतून शिवरायांची चरित्र संपन्नता स्पष्ट होते.
    लढाईत किंवा लुट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रीया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशी सक्त आज्ञा महाराजांनी दिली होती. सावीत्रीबाई देसाईवर बलात्कार करणार्‍या आपल्या विजयी सेनापती सकुजी गायकवाडचे डोळे महाराजांनी काढून त्यास जन्मभर तुरुंगात डांबले होते.
    रयतेचा गोरगरीब जनतेला, लेकी-सुनांच्या अन्यायसंबंधी शिवाजी महाराजांच्या दृष्टीकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेचा संपत्ती संबंधीचा दृष्टीकोनही खूप वेगळा होता. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशी सक्त आज्ञा महाराजांनी दिली होती. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवरायांना रयतेची अपार निष्ठा देऊन गेली.
    रयतेला हे सारेच नवे होते, कुठे घडत नव्हते असे होते. शिवरायांचे राज्य हे खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष व सर्व समावेशक आणि कल्याणकारी राज्य होते. 2 नोव्हेंबर 1669 च्या एका पत्रात राजांनी दिलेली आज्ञा उल्लेखनीय आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी ‘ज्यांचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा यात कोणी बखेडा करू नये’, असे फरमावले आहे. मुस्लिम धर्माविरूद्ध स्वत:ची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणीही शिवाजी महाराजांचा वापर करत असतील तर त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे हे महत्त्वाचे तत्त्व शिवरायांनी मानले. इस्लाम धर्माबद्दल महाराजांना विशेष आदर असल्याचे दिसून येते. सम्राट औरंगजेबला लिहिलेल्या एका पत्रात महाराज म्हणतात, कुरआन धर्म ग्रंथ हे प्रत्यक्ष ईश्‍वराची वाणी आहे. ती आसमानी किताब आहे व त्यात ईश्‍वराला जगाचा ईश्‍वर म्हटले आहे फक्त मुसलमानाचा ईश्‍वर असे म्हटलेले नाही. हिंदू व मुसलमान जाती ईश्‍वरापाशी एक रंग आहे म्हणून जाती धर्माच्या आधारे कोणावर जुलुम करणे भगवंतांशी वैरत्व करणे होय.
    शिवाजी महाराजांची सहिष्णूता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफीखान या मुस्लिम इतिहासकाराने नोंदवलेला उतारा हा खूप बोलका आहे. “शिवरायांनी सैनिकांकरीता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या-ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे त्यांनी मशिदीस, कुरआन ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस त्रास देता कामा नये. जर एखादा कुरआनचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पुज्य भाव दाखवून ते आपल्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असत. शिवरायांची सुरक्षा केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीचे तपशिल वार वर्णन उपलब्ध आहेत पण एक तरी मशिद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद नाही. शिवरायांचे सरदार व सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते त्यात मुस्लिमांचाही मोठी भरणा होता, हे या यावरून स्पष्ट व्हावे. ते रयतेचे काळजी करणारे राज्य स्थापायला निघाले होते महणून मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. त्यांच्या राज्याचे मोठ शत्रू असलेले राज्यकर्ते मुस्लिम धर्मीय होते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध तर लढावे लागलेच परंतु त्यांना मराठ्यांविरूद्ध अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासात या लढायांच्या सविस्तर नोंदी आहेत. शिवरायांचे वडील शहाजी राजे हे आदील शहाचे विश्‍वासू मनसबदार. आदिलशहाकडूनच शहाजी महाराजांना पुणे परगणाची जहागीरदारी मिळाली. शिवाजी महाराज अनेकांना गुरू मानत होते. त्यात याकुतबाबा या मुस्लिम अवलियाचाही समावेश आहे.
    शिवाजी महाराजांचे अनेक मुस्लिम सरदार व वतनदार होते आणि ते मोठ-मोठ्या हुद्यावर व जबाबदारीच्या जागेवर होते. त्यांच्या खास अंगरक्षकात 11 मुसलमान होते. यातच मदारी मेहतर या अत्यंत विश्‍वासू साथीदाराचा समावेश होता. त्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता शिवरायांना आगर्‍यातून सुटकेसाठी साथ दिली. काजी हैदर वकील तर आरमार प्रमुख सिद्धी हीलाल सारखे बानेदार लोक त्यांच्याकडे होते. शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात बहुसंख्ये साथीदार हे उच्च वर्गीय नव्हते तसेच ते जमीनदार वतनदारही नव्हते ज्या मावळ्यांच्या अव्ह्याभीचारी निष्ठेवर आणि असिम त्यागावर शिवराय अतुलनीय पराक्रम करू शकले. ते खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होतेे.
ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतिके सामान्य जनांना आदरांच्या, श्रद्धेच्या अन् निष्ठेच्या वाटतात त्याच प्रतिमा काही टगे उचलतात आणि त्या विकृत करतात आणि त्याचा गाभाच गारद करून टाकतात. नेमके हेच शिवरायांबद्दल काही प्रमाणात झाल्याचा अनुभव येत आहे. म्हणून आजच्या रयतेने शिवरायांचा खरा इतिहास शोधला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. त्याच्या इतिहासात, विचारात कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त अशे बरेच काही आहे. म्हणून आम्हाला शिवरायांना प्रतिमेच्या बाहेर काढून त्यांच्या विचारांच्या आचरणाची समृद्धी मिळो हीच प्रार्थना.

- अर्शद शेख
9422222332

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget