Halloween Costume ideas 2015

आधुनिक स्त्री म्हणजे नक्की काय?


स्त्रीच्या संदर्भात आधुनिकतेची खरी व्याख्या काय असावी याची परिपूर्ण चर्चा करण्याची आज आवश्यकता आहे, कारण आधुनिकतेची खोली समजून घेण्यापेक्षा त्याची ’चमकधमक’ याकडेच आजच्या तरुण मुली व महिला यांचा कल जास्त आहे. कोणतीही महिला यशस्वी आहे की नाही हे ठरवण्याचे निकष काय असावेत याचा सखोल विचार होत नाही. तिची अधुनिकता व यशस्वितता ठरवण्याचे सर्वसामान्य (चुकीचे) निकष आहेत. तिची नोकरी, तिची आर्थिक कमाई, तिचे नोकरीतील पद, तिचा फॅशन सेन्स, पाश्चत्य पोशाख इ....पण तिच्या मानसिक स्थितीचं काय? खास करून स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा ती प्रगती साधण्यासाठी करियरच्या या जीवघेण्या स्पर्धेत उडी मारते तेव्हा तिला शारीरिक व मानसिक पातळीवर खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. याचं कारण म्हणजे बाहेर कितीही स्पर्धा असो, नोकरीचा भार असो, तिला एक आई, एक पत्नी या भूमिका पार पाडव्याच लागतात. या भूमिका सांभाळतच बाहेरच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, भावनिक चढउतार, अवघड शारीरिक अवस्था हे सगळे सहन करत करतच तिला घरी व बाहेर दोन्हीकडे तारेवरची कसरत करावी लागते. 

मग या अडचणी लक्षात घेवून इथे विचार करणे आवश्यक ठरते की आधुनिकतेची किंवा यशस्वीतेची यथार्थ व्याख्या काय असावी?

तर आधुनिक स्त्री अशी असावी की ती विचारपूर्वक करियरची निवड करणारी असावी. आपले मत व्यक्त करणारी, सक्षम निर्णय घेणारी, उत्तम पिढी घडविणारी, वैचारिक स्वातंत्र्य असणारी,  हाऊसवाइफ असली तरी स्वाभिमानानेे सांगणारी. (कारण मुलं व कुटुंबासाठी आपल करियर पणाला लावणे ही हार नव्हे तर सन्मान आहे). याउलट पुरुषाइतकेच कमवायचे, त्याच्या खांद्याला खांदा लावूनच चालायचे, या अनाठायी हट्टापायी स्पर्धा करण्याच्या नादात स्वत:चे व कुटुंबाचे नुकसान करून घेणे ही आधुनिकता नव्हे तर वेडेपणा आहे. यामुळे खोटा अहंकार बळावतो. परिणामत: आज कोर्टात घटस्फोटाच्या फायली साचून आहेत. याउलट पुरुषाला घरच्या जबाबदाऱ्या नगण्य असतात. त्यामुळे पैसे, करियर करताना तो या जीवघेण्या स्पर्धेत नेटाने टिकून राहू शकतो. मुस्लिम स्त्रियांबाबत बोलायचे झाल्यास, शरीयत प्रमाणे स्त्रीला कोणतीच आर्थिक जबाबदारी देण्यात आलेली नाही. खर्चाची पूर्ण जबाबदारी ही पुरुषांना देण्यात आली आहे. पत्नीचा पगार पतीपेक्षा जास्त असला तरीही तो तिला घरखर्चासाठी दबाव टाकू शकत नाही. अशा या व्यवस्थेमुळे मुस्लिम स्त्रीवर कमवायचे, जीवघेण्या स्पर्धेत स्वत: चे नुकसान करून घ्यायची गरज नसते...हो! पण तिला शिक्षण घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. मग नंतर कुटुंब, अपत्य,स्वत:चं स्त्रीत्व, स्वास्थ्य, आपली अस्मिता, हिजाब हे सर्व सांभाळून व वेळेची योग्य सांगड घालून इच्छा असेल तर ती करियर करू शकते. तसेच स्त्री सुरक्षा अती महत्वाची असल्याने, इस्लाममधे नोकरीची कही क्षेत्रे निषिद्ध केलेली आहेत. जसे - नाचगाणे असलेली क्षेत्रे, फॅशन शोज, एअर होस्टेस, रात्रीचे कॉल सेंटर, परपुरूषांशी लगट किंवा अंगप्रदर्शन होईल अशी कामे इ.... याव्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रात ती काम करू शकते. आजकाल हिजाब घालून मुस्लिम स्त्रिया सर्व ठिकाणी अग्रेसर दिसतात, डॉक्टर इंजिनीरिंग काय पायलट पण आहेत. त्या सर्रास हेल्मेट घालून दुचाकी, चारचाकी चालवताना दिसतात.

मातृत्व या एका शब्दामुळे स्त्रीचं अखंड आयुष्य बदलले आहे. तिला निसर्गाने स्वत: तून एक नवीन जीव निर्माण करण्याचे वरदान दिले आहे. तो जीव फक्त जन्माला न घालता, त्याला दूध पाजण्यापासून, त्यांना नैतिक मूल्ये व संस्कार देणे, त्यांची मानसिक जडणघडण करणे व पर्यायाने एक चांगली संस्कारित पिढी निर्माण करणे या सर्व महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या तिच्यावर बायडिफॉल्ट आलेल्या. या सर्व गोष्टींचा विचार करून स्त्रीने करियर न करता घरची जबाबदारी सांभाळणे कमीपणाचे आहे का? पण समाजात ’गृहिणी’ या शब्दाला कमावत्या स्त्रीच्या तुलनेत कमी लेखले जाते.तिला काही काम नसतं असा पोकळ विचार केला जातो.  आज हा विचार बदलणे अत्यंत गरजेचं आहे. गृहिणी स्त्री ला कामावत्या स्त्री इतकाच आदर मिळायला हवा, किंबहुना जास्तच.... कारण मातृत्व व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिने तिच्या आयुष्याचा पूर्णवेळ दिलेला असतो. अश्या स्त्रियांना त्यांच्या पतींनी ’माझी यशस्वी पत्नी’ अशी बहाल केलेली पदवी तिच्यासाठी नक्कीच अमूल्य ठरेल.


- मिनाज शेख, पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget