महंमद बख्त खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सुलतानपूर येथे झाला. त्यांनी कमांडर-इन-चीफची जबाबदारी स्वीकारून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरूद्ध १८५७ च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील नायक आणि नायिकांना सक्षम नेतृत्व प्रदान केले.
ब्रिटिश सैन्यात त्यांना सुमारे ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता रोहिलखंडमध्ये खान बहादूर खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात त्यांनी ब्रिटिश सेनापतींचा पराभव केला. पुढे त्यांनी बरेली येथील ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना ताब्यात घेतला आणि आपल्या सैन्यासह दिल्ली गाठली.
मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांनी सरसेनापती म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी सैन्यात सुसूत्रता आणली. त्यांनी ‘ग्रेटर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल’ची स्थापना करून लोकशाही सुधारणांना सुरुवात केली आणि विशेष घटनात्मक धोरण तयार केले. स्वतंत्र राजवटीवर वैयक्तिक मतभेद आणि स्वार्थाचा प्रभाव असू नये, असे त्यांना वाटे.
अशा प्रकारे मुहम्मद बख्त खान यांनी आपल्या कार्यात उत्कृष्ट राज्यकर्तेपणाचे प्रदर्शन केले. इंग्रजांना दिल्लीतून हाकलून देणे पुरेसे नव्हते; त्यांना भारतातील जवळपासच्या राज्यांतूनही संपवायचे होते.
मुहम्मद बख्त खान आपल्या कार्यात व्यस्त होते, राजघराण्यातील ईर्ष्यावान सदस्यांनी आणि स्वार्थी व्यापाऱ्यांनी बादशहा जफर यांची दिशाभूल केली. परिस्थिती समजून घेताच बख्त खान यांनी स्वेच्छेने सेनापतीपदाचा त्याग केला.
नंतर त्यांनी स्वत:च्या सैन्यासह ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध अनेक लढायांचे नेतृत्व केले. शेवटी जेव्हा दिल्लीचा पराभव अटळ झाला तेव्हा बख्त खान यांनी बादशहाला अवध संस्थानाच्या लखनौला जाण्याचे आमंत्रण दिले. परंतु सम्राटाने त्यांच्या सल्ल्याला प्रतिसाद दिला नाही कारण तो त्याच्या सभोवतालच्या धूर्त लोकांच्या प्रभावाखाली होता.
त्यानंतर बख्त खान दिल्ली सोडून अवधला पोहोचले. बेगम हजरत महल सोबत त्यांनी ब्रिटीश सैन्याशी लढा दिला. पण, लखनौ ताब्यात घेतल्यावर ते बेगम हजरत महलसह नेपाळच्या टेकड्यांवर परतले. तेथूनच मुहम्मद बख्त खान यांनी ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढण्याचे प्रयत्न सुरू केले, परंतु नेपाळचे शासक जंग बहादूर यांच्या असहकारामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांविरुद्ध बंड करून विविध लढाया यशस्वीपणे लढणारे मुहम्मद बख्त खान १३ मे १८५९ रोजी शेवटपर्यंत लढताना मरण पावले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment