जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील म्हणजेच आपल्या भारत देशातील लोकसभेच्या 2024 ला होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला आता प्रसार माध्यमांतून सुरुवात झाली आहे, कधी नव्हे इतका यंदा निवडणुकीचा माहोल सर्वत्र दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून ही निवडणूकीच्या तोंडावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे, पक्षांतर बंदीचा कायदा असूनही कायद्याच्या पळवाटा शोधून आयाराम गयाराम संस्कृतीला ऊत आला आहे. निवडणुकीच्या काळात भरघोस आश्वासने देऊन निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांची घोर प्रतारणा केली आहे, सत्तेसाठी कायपण या वृत्तीने मतदारांची घोर फसवणूक झाली आहे. कोट्यवधी रुपयांची खोकी घेऊन एका रात्रीत पक्ष फोडून सत्तेत सहभागी होऊन बिनदिक्कतपणे आपणच कसे या देशाचे तारणहार आहोत हे दाखवण्याची अहमिका सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर खरी जबाबदारी ही ’मतदार राजा’वर आहे. लोकशाहीत संविधानाने प्रत्येकाला मताचा जो अधिकार दिला आहे,तो फारच मोलाचा आहे.
मात्र सध्या इव्हिएम मशीन बद्दलच मोठ्या प्रमाणात शंका घेतल्या जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्य मतदार आपण दिलेल्या मताचे योग्य ते मुल्यमापन होणार की नाही, अशा द्विधा व शंकास्पद मनस्थितीत आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि संविधान पारीत करण्यात आले, संविधानाने या देशात लोकशाही समाजव्यवस्था स्विकारली आहे, त्यामध्ये दर पाच वर्षाने निवडणूक ही प्रक्रीया अपरिहार्य झाली आहे, अर्थात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्या आवश्यक ही आहेत, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला ज्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला आहे. मग तो गरीब असो, अगर श्रीमंत असो,स्त्री असो किंवा पुरुष असो, नोकरदार असो अथवा व्यावसायिक असो, सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित असो. दर 5 वर्षाने त्याला मतपेटीतून आपणांस हवा तो आणि तसा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. मात्र अलीकडे या देशातील निवडणूका म्हणजे एक चिंतेचा व चिंतनाचा विषय झाला आहे. सामान्य पण सुसंस्कृत नागरिकांना या निवडणूका म्हणजे संकट वाटते आहे, तर काहींना पैसे मिळवण्यासाठी संधी वाटते आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पासून ते देशातील लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम - दाम - दंड-भेद याचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे,या देशातील सामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे, त्याला असुरक्षितता जाणवते, निवडणुका जवळ आल्या की, त्यातील काही अनिष्ट प्रकारामुळे सज्जन व सुज्ञ नागरिक निवडणुका पासून दूर राहणे पसंत करतात. राजकारणातील अनीती, दबंगगिरी,व भ्रष्टाचार इतका वाढला आहे की त्यामुळे सामान्य माणसाला जगणे दिवसेंदिवस कठीणच होतं चालले आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अर्थात संपूर्ण देशभरातून विविध माध्यमांतून ते आपल्या समोर येत आहे.
आपण ज्या विश्वासाने निवडून देतो ते बहुतांशी लोकप्रतिनिधी जनतेशी प्रतारणा करतात.ते निवडून येताच प्रामाणिक रहात नाहीत.ते मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करतात. प्रशासनाला हाताशी धरून, गुंडांना अभय देऊन, लुच्चाना व बगलबच्चांना पाठीशी घालून ते भ्रष्टाचारातून मिळवलेल्या प्रचंड संपत्तीचे मालक बनतात.भूतकाळात तसेच वर्तमान काळातील अनेक आर्थिक घोटाळे याची साक्ष देतात. अलिकडच्या काळात ईडी, सीबीआय, आयटी या प्रशासकीय यंत्रणेने हे सर्व काळी कृत्ये सर्वसामान्य जनतेच्या समोर आणलेली आहेत.
गेल्या 74 वर्षातील वास्तव पाहीले असता संपूर्ण देशभरातून, बहुतांशी राज्यात दर 5 वर्षांनी ज्या निवडणुका होतात त्यामध्ये पुन्हा-पुन्हा तोच आणि तसाच अनुभव जनतेला येत आहे. स्वच्छ पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते, निरामय आरोग्य, आदर्श शिक्षण, यासारख्या मुलभूत सुविधा संपुर्णपणे उपलब्ध करुन देण्यात आजही अपयश आले आहे, कचरा उठाव, ड्रेनेज व्यवस्था, नद्या नाले, तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आलेली दिसते, पण हा पैसा योग्य त्याठिकाणी खर्च न होता लोकप्रतिनिधी आपल्या घशात घालतात, हे विदारक सत्य अनेकदा जनतेच्या डोळ्यासमोर आले आहे.पण या सत्ताधिशांसमोर कुणी ’ब्र,सुद्धा काढत नाहीत, हे वास्तव आहे.
ते चोखतात आता, हाडे नव्या पिढीची ।
अद्यापही दिलेला नाही, डकार त्यांनी ।।
या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण अशा खोट्या व भ्रष्ट उमेदवारांना निवडून देतो.या दैनंदिन जीवनातील वेदनांना व व्यथांना आपण मतदारच प्रथम जबाबदार आहोत.हे वास्तव नाकारता येणार नाही
या वेदनांना व व्यथांना संपविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीना देशभरातून मतदानाचा अधिकार वापरून हकलून लावले पाहिजे. प्रामाणिक व चारित्र्यवान उमेदवारांना उभे करून निवडून आणले पाहिजे.अन्यथा आपले व आपल्या देशाचे आपणच नुकसान करणार आहोत, हे लक्षात ठेवा. खडतर प्रयासाने व परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य आणि भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संधी साधू,स्वार्थी व मतलबी, नैतिक अधःपतन झालेल्या व पाकीट संस्कृतीलाच महत्व देणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या बगलबच्चांना मतपेटीतून हक्क बजावून हकलून लावले पाहिजे. सेवाभावी, प्रामाणिक, नि:स्वार्थी व अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा व पाठबळ दिले पाहिजे. प्रचंड खर्चिक निवडणूकां हे देशापुढील संकट समजून निवडणूकीतील पावित्र्य जपले पाहिजे. चांगल्या व सज्जन लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपणच आपल्या जगातील आदर्श अशा लोकशाही समाजवाद मानणाऱ्या या देशाचे संरक्षण केले पाहिजे.खरं तर आपणच आपले पावित्र्य व नितीमुल्ये जपली पाहिजेत व हा देश वाचविला पाहिजे.अन्यथा रशिया, चीन या देशातील लोकशाहीचा गळा दाबून सत्ताधीश जसे हुकुमशाही राबवत आहेत, तशीच बिकट परिस्थिती आपल्या देशात यायला वेळ लागणार नाही. अत्यंत कष्टाने, असिम त्यागाने, आणि हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलीदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, ते टिकवण्यासाठी निवडणूकीतील नीतीमुल्ये व पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येकांनी कंबर कसण्याची गरज आहे.
- सुनिलकुमार सरनाईक, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : 9420351352,
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment