ऑक्टोबर 1956 साली दलित समाजाचे झालेले धर्मपरिवर्तन निःसंशय भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मपरिवर्तन होते. या धर्मांतराला 68 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा फार मोठा कालखंड आहे. ही योग्य वेळ आहे याबाबतीत विचार करण्याची की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतराचा उद्देश यशस्वी झाला काय? याचा मागोवा, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घेत आहे.
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशपातळीवर दलितांनी भाजपला भरपूर मतदान केले होते. इतके की या मतदानाच्या तुफानात मागासवर्गीयांचा बीएसपी सारखा बलाढ्य पक्ष सुद्धा भुईसपाट झाला होता. जो आजतागायत पुन्हा उभा राहू शकलेला नाही. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखी व मतदारसंघामध्ये भाजपाचा स्ट्राईक रेट 80 टक्के एवढा प्रचंड आहे. केंद्रातील भाजप सरकार दलितमित्र सरकार मानले जाते. तरी पण हे सरकार आल्यापासून अधून मधून दलित उत्पीडनाच्या घटना घडत आहेत. याची सुरूवात रोहित वेमुलाच्या आत्महत्येपासून झाली. 29 मार्च 2018 रोजी भावनगर गुजरातमधील टेंबी तालुका उमरालामध्ये राहणाऱ्या एका दलित युवकाला ज्याचे नाव प्रदिप राठौर (21) होते. गावकऱ्यांनी ठार मारले. त्याचा दोष इतकाच होता की दलित असूनही त्याने घोडा खरेदी केला होता व त्यावर बसून तो ऐटीत शेताकडे येणेजाणे करीत होता. 29 मार्च रोजी त्याचे व घोड्याचे प्रेत त्याच्या शेताजवळील रस्त्यात पडलेले आढळून आले. तत्पूर्वी गावातील सवर्णांनी त्याला घोड्यावर न बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. तो घोडा विकणारही होता. पण दरम्यान, त्याची हत्या करण्यात आली.
जुलै 2016 मध्ये गुजरातच्याच उणामध्ये गोरक्षकांनी सात दलित तरूणांना हातपाय बांधून बेदम मारहाण केली होती. तसेच आनंद जिल्ह्यामध्ये गरबा पाहण्यासाठी आलेल्या जयेश सोलंंकी नावाच्या दलित तरूणाची सवर्णांनी हत्या केली होती. तत्पूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दलित वस्त्या जाळण्यात आल्या व अनेक दलितांची हत्या करण्यात आली. त्याचा विरोध केल्याने चंद्रशेखर आजाद ’रावण’ या तरूण नेत्याला रासुखाखाली अटक करून तुरूंगात डांबण्यात आले.
2018 च्या प्रारंभीच भीमा कोरेगाव येथे दलित विरोधी दंगल झाली होती. शिवाय, 2 एप्रिल2018 रोजी अॅट्रॉसिटीज अॅ्नटच्या तरतुदी शिथील केल्याच्या कारणावरून झालेल्या भारत बंदमध्ये 9 लोक ठार झाले होते. जाळपोळ करून कोट्यावधीचे संपत्ती नष्ट करण्यात आली होती. शिवाय, उत्तर प्रदेशच्या कासगंद जिल्ह्यातील निजामपूर गावात एक दलित वकील संजयकुमार व त्याची नियोजित पत्नी शीतल यांच्या लग्नाची वरात गावातून काढू नये यासाठी सवर्णांनी विरोध करून वरात निघाल्यास दंगल होईल, अशी धमकी ऑन कॅमेरा दिली होती. यासंदर्भात प्राईम टाईममध्ये रविशकुमार यांनी या संबंधीचा सविस्तर रिपोर्ट सादर केलेला होता.
2 एप्रिलच्या बंदच्या नंतर ज्या दलितांनी बंदमध्ये हिरहिरीने सहभाग घेतला त्यापैकी 100 लोकांची हिटलिस्ट उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात तयार करण्यात आली व त्यातील क्रमांक 1 वर शोभापूरमध्ये राहणारा गोपीपार्या या दलित तरूणाची हत्या करण्यात आली. बाकीचे तरूण घरसोडून फरार आहेत. मागच्याच आठवड्यात 14 एप्रिल 2024 रोजी सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर गावात आंबेडकर जयंती काढण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला होता. रस्त्यावर टायर जाळण्यात आले होते. सवर्ण लोकांनी गावाच्या वेशीत जयंती मिरवणुकीला नेण्यास विरोध केला होता. 2014 सालापासून या गावात गावकऱ्यांच्या विरोधामुळे आंबेडकर जयंती साजरी झालेली नाही हे विशेष. पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण वाढू दिले नाही अन्यथा त्या ठिकाणी नक्कीच दंगल झाली असती.
पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रकरणांनी व्यथित होऊन (?) ’’पाहिजे तर मला गोळ्या घाला पण माझ्या दलित बांधवांना त्रास देऊ नका.’’ असा सुभाषितवजा सल्ला दिल्यानंतरही अशा घटना घडत आहेत हे विशेष. थोडक्यात स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे लोटल्यावरसुद्धा आरक्षणाशिवाय दलितांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. नागरि हक्क संरक्षण कायदा 1955 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटीज अॅ्नट 1989) हे दोन्ही कायदे सुद्धा दलितांवरील होणाऱ्या अत्याचारांना रोखू शकलेले नाहीत.
बाबासाहेबांनी आरक्षण मिळविण्यासाठी धर्म परिवर्तन केले नव्हते तर समता व सन्मान मिळविण्यासाठी केले होते. 68 वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा जर तो उद्देश साध्य होत नसेल तर धर्मांतरांच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे कोणत्याही सुज्ञ माणसास वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांनीही आपल्या या निर्णयाचा नक्कीच फेरविचार केला असता, असा विचार काही दलित बांधवांमधूनच पुढे येत आहे. म्हणून या संदर्भात शोध घेतला असता ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम’ हे छोटेसे पुस्तक माझ्या हाती लागले. ते एका दमात वाचून काढल्यावर त्यातील लेखकाचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटल्याने सदरचा लेखन प्रपंच मांडला आहे.
सदर पुस्तकाचे लेखक अॅड.आर.एस. विद्यार्थी असून त्यांनी 2010 साली हे पुस्तक लिहिलेले आहे. जे इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट मुंबई यांनी प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयापूर्वीची पार्श्वभूमी व निर्णयाची समिक्षा दोन्हीही गोष्टी नमूद आहेत. त्याचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे -
आर.एस. विद्यार्थी लिहितात, ’’हिंदू धर्माने दलित वर्गाला पशु पेक्षाही अधिक वाईट स्थितीत पोहोचविले आहे. याच कारणास्तव तो आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू शकत नाही. पशुप्रमाणे तो चांगल्या चाऱ्याच्या शोधाला लागला आहे. परंतु, मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आपल्या उद्देशांना तो गांभीर्याने घेत नाही. परंपरागत उच्च वर्णीयांद्वारे निरपराध दलितांवर सातत्याने केल्या जाणाऱ्या अत्याचारांना कसा पायबंद घालावा? हीच दलितांची मूळ समस्या आहे. हजारो वर्षांपासून दलितांवर अत्याचार होत आलेले आहेत. आजसुद्धा होत आहेत. अत्याचारांची सुरूवात कशी झाली आणि आजदेखील या अत्याचारांना का आळा बसत नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
इतिहास साक्षी आहे, या देशाचे मूळ रहिवाशी द्रविड होते. जे अत्यंत सभ्य व शांतताप्रिय होते. आजपासून जवळ-जवळ 5 ते 6 हजार वर्षापूर्वी आर्य लोक भारतात आले आणि द्रविडांवर हल्ले चढविले. फलस्वरूप आर्य आणि द्रविड या दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. चालाक आर्यांनी फसवणूक आणि कपटाचा वापर करून द्रविडांना पराजित केले व या देशाचे स्वामी झाले. या युद्धात सामिल द्रविडांचे विभाजन दोन वर्गात करता येईल. एक - ज्यांनी शेवटपर्यंत आर्यांशी लढा दिला आणि दोन - जे सुरूवातीपासून युद्धात तटस्थ राहिले किंवा युद्धात भाग घेतल्यानंतर थोड्याच वेळाच अलिप्त झाले, अर्थात लढले नाहीत. पहिल्या प्रकारच्या द्रविडांना आर्यांनी अस्पृश्य शुद्र घोषित केले आणि त्यांना अशाप्रकारे तुडविले की, ते लोक हजारो वर्षांपर्यत डोकेवर काढू शकले नाहीत. त्यांचे उद्योगधंदे बंद केले, त्यांना गावाबाहेर वस्ती करण्यास भाग पाडले गेले आणि त्यांना इतके लाचार करून टाकले गेले की जीवंत राहण्यासाठी त्यांना प्रसंगगी मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी विविश व्हावे लागले. जाटव, भंगी, चांभार, महार, खाटिक वगैरे याच वर्गात मोडतात. ज्यांनी युद्धात भाग घेतला नाही त्यांना स्पृश्य शुद्र घोषित करून त्यांना शांतीपूर्वक राहू दिले. कोळी, माळी, पिंजारी, पानके, मांग वगैरे या वर्गात मोडतात.’’ (संदर्भ : पान क्र. 4 व 5).
लेखकाने डॉ.बाबासाहेबांचे म्हणणे खालील प्रमाणे आपल्या पुस्तकात नोंदविलेले आहे, ’’जर तुम्हाला माणुसकीशी प्रेम असेल तर धर्मांतर करा. हिंदू धर्माचा त्याग करा. तमाम दलित अस्पृश्यांच्या शेकडो वर्षांपासून गुलाम ठेवल्या गेलेल्या वर्गाच्या मुक्तीसाठी ऐक्य आणि संघटन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समाधान प्राप्त करावयाचे असल्यास धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करावयाचे असल्यास धर्मांतर करा, आपल्या जीवनाचे साफल्य हवे असेल तर धर्मांत करा, मानवी सौख्य हवे असेल तर धर्मांतर करा, हिंदू धर्म सोडण्यातच सर्व दलित, पददलित, अस्पृश्य, शोषित, पीडित वर्गाचे खरे हित आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.’’ अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा मुख्य उद्देश बाह्य शक्ती संपादन करण्यासाठी निश्चित केला होता. ही गोष्ट आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण बाह्य शक्ती प्राप्त केल्यानेच दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालणे शक्य होईल. या निश्चयाला क्रियान्वित करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑ्नटोबर 1956 रोजी लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. (संदर्भ : पान क्र. 13)
पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर 1956 मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तन केले होते तेव्हा भारतात मुस्लिमांची शक्ती नव्हतीच. त्याशिवाय, त्यावेळी हिंदूंच्या मनात मुस्लिम अथवा इस्लामच्या नावाने इतकी घृणा होती की, जर त्यावेळी आम्ही मुस्लिम झालो असतो तर आम्हाला गावोगावी गाजर मुळ्याप्रमाणे कापून फेकून दिले गेले असते. या सर्व गोष्टी लक्षात घेवून त्यांनी उद्देशाच्या प्राप्तीसाठी बौद्ध धर्म स्विकारून भविष्यकाळात बुद्धीचा उपयोग करण्याचा संकेत देऊन, दलित वर्गाच्या मुक्तीचा खरा मार्ग मोकळा करून एकूण महान कार्य केले होते. परंतु, दुर्देवाने केवळ एक महिना 22 दिवस लोटले की 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
अशाप्रकारे बाबासाहेब हे पाहूच शकले नाही की त्यांनी आपल्या या लोकांना जे की, महान व्याधीने पिडले होते, त्यांना जे रामबाण औषध दिले होते, ते त्यांना लागू तरी पडले काय? किंवा त्याची रिअॅ्नशन तर आली नाही.
बौद्ध धर्म स्विकारून आम्ही आपल्या उद्देशप्राप्तीमध्ये किती यशस्वी झालो यासंबंधी बाबासाहेबांद्वारा निर्धारित कोणताही धर्म स्विकारण्याचा उद्देश दलित वर्गाला बाह्यशक्ती प्राप्त करून देणे असला पाहिजे. म्हणून आम्हाला हे पाहिले पाहिजे की, बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे दलित वर्गाला बाहेरील शक्ती किती मिळाली? काही मिळाली की अजिबात नाही? अथवा या धर्माचा स्विकार केल्याने आमची मूळ शक्ती देखील काही कमीतर झाली नाही? (संदर्भ : पान क्र. 15).
बाबासाहेबांच्या अनुयायांनी प्रथम हे समजून घेतले पाहिजे की, बाबासाहेबांनी ठरवून दिलेल्या धर्मांतराचा उद्देश बाह्य शक्ती प्राप्त करणे होता. बाह्यशक्तीचा अर्थ विदेशी शक्ती नव्हे तर भारतात विद्यमान असलेल्या दुसऱ्या समाजाची शक्ती होय. जी शक्ती प्राप्त करण्यासाठी आम्हाला पूरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. बौद्ध धर्मरूपी परम औषधी घेतल्याने जो विकार आणि उपद्रव आमच्या समाजात उत्पन्न झालेले आहेत, सर्वप्रथम ते शांत केले पाहिजेत. आणि या बौद्ध धर्मरूपी परम औषधीच्या जागी एखादा अन्य धर्म स्विकारावा, जेणेकरून आपण आपल्या धर्मांतराचा उद्देश प्राप्त करून अत्याचारापासून मुक्ती प्राप्त करू शकू. बाबासाहेब यासाठी प्रयत्नशील होते की, माझ्या दलित बांधवांना हिंदूंच्या जुलूमापासून मुक्ती मिळावी. त्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता की, या क्षीण झालेल्या दलित वर्गाला विशिष्ट औषध अर्थात बौद्ध धर्मच दिला पाहिजे, मग गुण येवो की न येवो. म्हणून एकदा तर त्यांनी असे सांगितले होते की, ’’जर मी आपल्या अस्पृश्य बांधवांना अत्याचारापासून मुक्त केले नाही तर स्वतःला गोळी घालून आत्महत्या करेन’’
अशा प्रकारे हे स्पष्ट झाले आहे की, आज जर बाबासाहेब जीवंत असते तर निश्चितपणे त्यांनी बौद्ध धर्म सोडून एखादा अन्य धर्म स्विकारण्यास सांगितले असते. परंतु, बाबासाहेब आमच्यामध्ये नाहीत. म्हणून तर आज आम्हाला त्यांनी निश्चित केलेल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी व स्वतःला अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी बौद्ध धर्माचा त्याग करून एखादा अन्य धर्म स्विकारावा लागेल. (संदर्भ : पेज नं. 19-20).
आम्ही हे पाहिलेच आहे की, बौद्ध धर्माचा स्वीकार ज्या उद्देशासाठी केला होता त्यात तो सपशेल निष्फळ ठरला आहे. म्हणून असा प्रश्न उद्भवतो की, कोणता धर्म आता स्वीकारावा? यासाठी आम्ही हे पाहिले पाहिजे की, बाबासाहेब बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोण-कोणत्या धर्मांना चांगले आणि योग्य मानत होते. त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची खूप प्रशंसा केलेली आहे. आणि म्हटले आहे की, माणसाची माणुसकीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी आहे. (संदर्भ : पान क्र. 22).
आम्हाला आमच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीचा शोध घेतांना हे पाहिले पाहिजे की, लक्षावधी गावांत दररोज आमच्यावर तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार कोठे न कोठे होतच असतात. म्हणून आम्हाला त्याच लक्षावधी गावातील मदत करणारे गावकरी पाहिजेत. आम्हाला रूपया पैशांची मदत करणारे नकोत. आम्हाला क्रूरतेने कत्तल करणाऱ्याचे, हात धरणाऱ्या मदतनीस-मार्शलची गरज आहे. जेणेकरून सर्वप्रथम अत्याचाऱ्यांपासून आमच्या जीवाचे रक्षण होईल. (संदर्भ : पेज नं.23).
धर्म अधिक चांगले जीवन जगण्याची कला आहे. जगात याची तीन रूपे आढळतात. एक - घोर ईश्वरवादी, दोन - घोर नास्तीक आणि तीन - बुद्धीपरक ईश्वरवादी. पहिल्या प्रकारचे लोक माणसाला काहीच महत्व देत नाहीत. दुसऱ्या प्रकारचे लोक माणसालाच सर्वकाही मानतात. हे दोन्ही अतिरेकी मार्ग आहेत. इस्लाम तीसरा मध्यम मार्ग आहे. जो ईश्वरावर विश्वासही ठेवण्यास सांगतो आणि माणसालाही महत्व देतो. तो म्हणतो की साऱ्या जगाप्रमाणे अल्लाहने माणसाची देखील निर्मिती केलेली आहे. परंतु, अल्लाहने माणसाला स्वातंत्र्य दिलेले आहे. माणसाने आपल्या इच्छेप्रमाणे बरे-वाईट कर्म करावेत, अशा प्रकारे आपल्या कर्मांना मनुष्य स्वतःच जबाबदार आहे. अल्लाह नव्हे. अल्लाह असे म्हणत नाही की, निर्बलांवर अत्याचार करा, त्यांचे शोषण करा, त्याने तर अशा अत्याचार पीडितांशी सहानुभूतीचा आदेश दिलेला आहे. आम्ही ईश्वराला मानायचे यासाठी सोडून दिलेले होते की, हिंदू धर्मात सांगितले आहे की, मनुष्य जे कर्म करतो ते ईश्वराच्याच आज्ञेने करतो. अशाप्रकारे अत्याचार करणाऱ्यांचा कोणताही दोष असत नाही. हे ईश्वरवादी तत्वज्ञान आम्हाला पसंत नव्हते. (संदर्भ : पान क्र. 24).
दूसरीकडे आम मुस्लिमांनी मानवी आधारावर अस्पृश्य लोकांना सदैव काही ना काही मदत केलेली आहे. जेव्हा धर्म बदलण्याची गोष्टही निघालेली नव्हती. तेव्हा सुद्धा मुस्लिमांनी अस्पृश्यांना मदत केली. महाडच्या आंदोलनात जेव्हा मंडपाकरिता कोणीही जागा दिली नव्हती तेव्हा मुस्लिमांनीच जागा दिली होती.
दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय पुढाऱ्यांमध्ये भरपूर वादविवाद झाले. अस्पृश्यांच्या मागणीला तुडविण्यासाठी गांधींनी जीनांशी गुप्त करार करण्याचा प्रयत्न केला. गांधी जीनांना म्हणाले, ’’ जर माझ्याशी हात मिळवणी करून तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध केला तर मी तुमच्या सर्व अटी मानण्यास तयार आहे.’’ परंतु, जीनांनी ही गोष्ट मान्य केली नाही. त्यांनी सांगितले की, ’’ आम्ही स्वतः अल्पसंख्यांक असल्यामुळे विशेषाधिकाराची मागणी करीत आहोत. अशा स्थितीत आम्ही दुसऱ्या अल्पसंख्यांकांच्या मागणीला कसा विरोध करू शकू.’’ (संदर्भ : पुना पॅ्नट गांधींच्या नावे, लेखक शंकरानंद शास्त्री पान क्र.13).
बाबासाहेबांनी म्हटले आहे की, ’’ख्रिश्चन व इस्लाममध्ये जी समानतेची शिकवण दिली गेलेली आहे तिचा संबंध विद्या, धन-दौलत, चांगला पोशाख आणि शौर्य यासारख्या बाह्य कारणांशी नाही. माणसातील माणुसकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हाच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा पाया होय. हीच शिकवण हे दोन धर्म देतात.’’
’’धार्मिक संबंधांमुळे तुर्कांचे गठबंधन अरबांशी राहिले. इस्लाम धर्माचा संयोग मानवतेसाठी अत्यंत प्रबळ आहे. ही गोष्ट जगजाहीर आहे. इस्लामी बंधुत्वाच्या दृढतेशी कोणताही अन्य सामाजिक संघ स्पर्धा करू शकत नाही.’’ (संदर्भ : पाकिस्तान अथवा भारताचे विभाजन, लेखक डॉ. आंबेडकर पान क्र. 244).
’’जेथे हिंदू आपल्या सामाजिक कुरीतींच्या चिखलात अडकून पतनाकडे जात आहेत आणि रूढीवादी आहेत तेथे भारताचे मुस्लिम त्या वाईट गोष्टींच्या विरूद्ध आहेत आणि हिंदूंच्या तुलनेत ते अधिक प्रगतीशील आहेत. जे लोक मुस्लिम समाजाला अगदी जवळून जाणतात त्यांच्यासाठी उक्त प्रभावाचा प्रसार त्यांना आश्चर्यचकीत करतो’’ (संदर्भ : पाकिस्तान अथवा भारताचे विभाजन, लेखक डॉ. आंबेडकर पान क्र. 253).
मुस्लिमात देखील जातीयवाद आहे काय?
जरी ख्रिश्चन आणि मुस्लिमात जातीभेद असले तरी ते हिंदूमधील जातीभेदांसारखे नाहीत. या दोहोंत फार मोठे अंतर आहे. त्यांच्यातील जातीभेद त्यांच्या समाजाचे प्रमुख अंग नव्हेत. त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात तर ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन हेच उत्तर देतील. आणि या उत्तराने प्रश्न विचाराचे समाधान देखील होईल. तू कोणत्या जातीचा असे विचारण्याची कोणालाही गरज भासणार नाही. परंतु, आपण एखाद्या हिंदूला विचारले की तुम्ही कोण आहात? तो उत्तर देतो की मी हिंदू आहे तर याने कोणाचेच समाधान होणार नाही. मग पुन्हा प्रश्न विचारणे भाग पडते की तुमची जात कोणती? जोपर्यंत तो आपल्या जातीचे नाव घेत नाही तोपर्यंत कोणासही त्याच्या वास्तविक स्थितीचा पत्ता लागणार नाही. यावरून हे स्पष्ट होते की, हिंदू समाजात जाती-पातीला किती प्राधान्य दिले गेलेले आहे आणि ख्रिश्चन व मुस्लिम समाजात जातीला किती गौन स्थान दिलेले आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जातीभेदाच्या मुळात त्यांचा धर्म नाही. (संदर्भ : पान क्र. 28). वरील विवेचनावरून स्पष्ट झाले आहे की, मुस्लिमामधील जात-पात केवळ सोयीसाठी आहे. मत्सर, द्वेष अथवा तिरस्कारासाठी नाही. तरीसुद्धा याला दोष म्हणून पाहिले तरी मुस्लिमामध्ये जातीभेद इतका खोलवर रूजलेला नाही जितका हिंदूमध्ये रूजलेला आहे. याचे कारण म्हणजे इस्लाममध्ये जातीवादाला स्थान नाही. याउलट हिंदूमध्ये जातीयवाद त्यांच्याच धर्माचा अभिन्न भाग आहे.
जर आमच्या लोकांना चांभार म्हणून संबोधले असते आणि पूर्ण प्रेम आणि मान दिला असता तर त्यात आम्हाला कसला त्रास झाला असता? ब्राह्मणांचा क्षत्रीय अथवा वैश्यांना कोठे त्रास आहे? क्षत्रीयांकडून ब्राह्मण आणि वैश्य कोठे दुखी झालेले आहेत? याउलट ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य लोक तर सहृदयतेने आणि सहयोगाने एकमेकांसोबत राहतात. (संदर्भ : पान क्र. 29). आर.एस. विद्यार्थी यांचे हे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित व विमल किर्तीद्वारा अनुवादित ’दलित वर्ग को धर्मांतर वर्ग की आवश्यकता क्यूं है?’ या सन 1978 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाला आधारभूत माणून लिहिले गेलेले आहे.
सतत होत असलेल्या अत्याचाराने पीडित दलित समाजामध्ये अशा प्रकारचे पुनर्धमांतराचे विचार अलिकडे उघडपणे व्यक्त केले जात आहेत. पुस्तकाच्या माध्यमातून आर.एस. विद्यार्थी यांनी तेच विचार मांडलेले आहेत. ते डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वाचकांच्या नजरेत आणून द्यावेत, एवढाच या लेखामागचा उद्देश्य आहे.
- एम. आय. शेख
लातूर
(लेखक : सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक आहेत)