ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन - भाग-1
भारतात, मध्यपूर्वेत उदयास आलेल्या, सेमिटीक धर्ममतासंबंधी झालेले लिखाण, एकांगी स्वरुपाचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, सेमिटीक धर्ममतासंबंधी गैरसमजच जास्त दिसून येतात. अलिकडच्या काळात, महाराष्ट्रात तात्त्विक स्वरुपाच्या चर्चा करणारी नियतकालिके फारशी नाहीत. परंतु नागपुरवरुन ‘आजचा सुधारक’ या नावाने तत्त्वज्ञानाची चर्चा करणारे मासिक काढले जाते. त्यात मुलभूत स्वरुपाची तात्विक चर्चा आणि विवेकवाद यांना प्राधान्य देणारे लिखाण प्रसिध्द केले जाते. त्यामध्ये विवेकवादावर चर्चा करीत असताना एका महाराष्ट्रातील समिक्षकाने, इस्लामच्या संदर्भात, इस्लाम हा सेमिटीक धर्म असल्याने त्यात विवेक, बुध्दीवाद आणि कसलीही मूलभूत तात्विक सुत्रे नसून, इस्लाम केवळ पोथीनिष्ठता असलेला धर्म आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन केलेले होते. थोडक्यात, इस्लामच्या बाबतीत केले जाणारे लिखाण केवळ अज्ञानापोटी नसून मोठ्या प्रमाणावर मुद्दाम गैरसमज पसरविणारे असते. वास्तविक, इस्लाम हा धर्म ग्रंथावर आधारलेला ग्रंथवादी आणि साक्षात्कारवादी धर्म असला तरी, त्यात केवळ शब्दप्रामाण्य नसून विवेकवाद आणि मुलभूत स्वरुपाचे व्यापक तत्वज्ञान आहे.
एका अर्थाने, इस्लाम म्हणजे अल्लाह आणि मानव यांच्या प्रतिकात्मक भेटीचे साकार रुप आहे. येथे अल्लाह याचा अर्थ एका विशिष्ट काळात, एका विशिष्ठ प्रकारे, व्यक्त होणारे परमेश्वराचे स्वरुप, असा होत नाही, तर काळ, इतिहास व घटना यांच्यापासून अलग आणि स्वतंत्र असा परमेश्वराचा, मुलभूत स्वरुपाचा, सृजनशील आत्मप्रत्ययकारी अविष्कार, असा त्याचा अर्थ होतो. मानव म्हणजे केवळ एक अधःपतित व ईश्वरी चमत्काराची प्रतिक्षा करणारा सामान्य प्राणि, असा त्याचा अर्थ नसून, आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर ‘अल्लाहच्या पूर्णत्त्वाचे’ स्वरूप देणारा सत्याविष्कार आणि ईश्वराचे सनातन व चिरंतन मूल्य व अस्तित्व यांची जाणीव करुन देणारे सत्य-कथन, असे मानले गेले आहे. त्या अर्थाने, इस्लाममध्ये मनुष्य आणि ईश्वरी साक्षात्काराकडे वेगळ्या प्रकारे पाहिले गेले.
इस्लामच्या तत्वज्ञानात, अल्लाह म्हणजे ईश्वर आणि माणूस आणि ज्ञानाचा सिध्दांत, यांचे स्वरुप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात ईश्वरी साक्षात्काराला विशेष महत्त्व आहे. इस्लामने ‘अवताराची’ किंवा ‘प्रत्यक्ष ईश्वराच्या अवतरणाची’ संकल्पना स्विकारलेली नाही. कारण, इस्लामी तत्वज्ञानानुसार, ईश्वरी अवताराची कल्पना, मानव, मानवी स्वरुप, ईश्वराच्या सर्वव्यापी, सर्व कल्याणकारी अनंत स्वरुपावर, एकप्रकारे मर्यादा घालणारे असते किंवा ख्रिश्चन धर्मामधील ईश्वराच्या व्यक्तिकरणाचे स्वरुपदेखील, परमेश्वराच्या अनंतत्वामध्ये, त्याच्या विश्वव्यापी चेतना शक्तीला मर्यादा घालणारेच आहे. म्हणून या मुलभूत सुत्राच्या परिणामातून, इस्लामने साक्षात्काराचा सिध्दांत मांडलेला आहे. इस्लामच्या प्रतिपादनानुसार, प्रत्येक काळात परमेश्वरच माणसाच्या उध्दारासाठी प्रेषित पाठवतो. कारण, मानवी प्रज्ञेला मानवी माध्यमातूनच जास्त प्रत्ययकारी स्वरुपात प्रबुध्द केले जाऊ शकते. इस्लामनुसार, प्रत्येक काळात पाठविलेले संदेश माणसाला योग्य प्रकारे सुरक्षित ठेवता न आल्याने किंवा त्यांचे योग्य प्रकारे ग्रहण करता न आल्याने, ईश्वराच्या संदेशात विकल्प निर्माण होउन मानवी समाजाचे अधःपतन होत राहिले. म्हणूनच, पुन्हा एकदा हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.)आणि कुराण यांच्या स्वरुपात, मानवी समाजाच्या मार्गदर्शनासाठी साक्षात्कार-रुपाने पाठविले गेलेले संदेश म्हणजे इस्लाम होय.
इस्लामच्या प्रतिपादनानुसार कुरआन हे ईश्वरी संदेशाचे व्यक्त स्वरुप आहे. आणि म्हणून कुरआनमधील तत्वे, मूलभूत प्रेरणा आणि शिकवण यांचे स्वरुप अनादी व चिरंतन आहे. त्यामध्ये जसे तात्कालिक व प्रादेशिक संदर्भ आहेत, त्याचप्रमाणे, आनंदी प्रेरणांची सूत्रेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात आहेत.
इस्लामच्या तत्वज्ञानात, ‘साक्षात्काराच्या संकल्पनेला’ एक विशेष महत्त्व आहे. पैगंबर (सल्ल.) यांना ईश्वरी साक्षात्कार ताबडतोब किंवा अचानक झालेला नाही. त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्षे संसारात आणि चिंतनात घालविल्यानंतर आणि ‘सत्यवादी’ व ‘परोपकारी’ म्हणून समाजाची मान्यता मिळविल्यानंतर, टप्प्या-टप्प्याने, ईश्वरी संदेशाचे अवतरण झाले आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर पैगंबर (सल्ल.) अंतर्मुख बनत गेले. चिंतनासाठी हिराच्या डोंगरावरील गुहेत बसू लागले. अशा प्रक्रीयेत, 41 वे वर्ष सुरु झालेल्या रमजान महिन्यात ‘लैलतुल कदर’ च्या रात्री त्यांना ‘अल्लाह’ चा संदेशवाहक ‘जिब्राईल अलै.’ चे दर्शन झाले. परिणामी पैगंबर (सल्ल.) यांच्या भावविश्वात आणि मानसिक प्रक्रियेत प्रचंड उलथापालथ झाली. त्यांचे जीवन नखशिखांत ढवळून निघाले. आपल्याला झालेल्या साक्षात्काराच्या प्रत्ययकारी आणि चेतनामय जाणिवेने पैगंबर (सल्ल.) विव्हळ झाले. त्या प्रत्यकारी अनुभवासाठी तळमळू लागले. देवदूत जिब्राईलने त्यांच्या ज्ञानचक्षूंचा मार्ग मोकळा करुन, जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन दिले.
दुसरे म्हणजे ईश्वरी संदेश पैगंबर (सल्ल.) यांना एकाचवेळी प्राप्त झाले नाहीत, तर त्यांच्या 23 वर्षाच्या पुढील कालखंडात वेगवेगळ्या प्रसंगी अनेक प्रश्नांची उकल करीत असतांना, त्यांना साक्षात्कारी संदेश दिले गेले आहेत. या सर्व संदेशांचे एकत्रित व लिखित स्वरुप म्हणजेच कुरआन होय. याचा अर्थ असा की, इस्लाममधील ईश्वरी संदेश आणि तत्त्वे ही केवळ अधिभौतीक, अगम्य, रहस्यमय सुत्रे, या स्वरुपात दिलेली नाहीत. किंवा सर्वसमावेशक नीतितत्वे किंवा प्रमेये या स्वरुपात दिली गेली नाहीत. कारण, सर्वसमावेशक, नीतितत्वे किंवा प्रमेये यांचा वापर करीत असताना, माणसांनी त्यात, सर्व प्रकारचे घोटाळे नंतरच्या काळात केल्यामुळे आणि त्या प्रमेयांचे सोयीस्कर अर्थ लावल्यामुळे, अध्यात्मिक अराजकच निर्माण झाले होते. म्हणून मानवी जीवनात निर्माण होणारी एखादी प्रत्यक्ष समस्या आणि त्या समस्येची कालसापेक्ष व विवेकनिष्ठ उकल करण्यासाठी साक्षात्कार रुपाने दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन, म्हणजे कुरआन आणि इस्लाम आहे. म्हणजे इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन, म्हणजे कुरआन शरीफ आणि इस्लाम आहे. म्हणजे इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप समस्याप्रधान व व्यावहारिक जसे आहे, तसेच त्यात अनादी चिरंतन स्वरुपाची प्रमेये देखील दिसून येतात. त्या अर्थाने, कुरआन हा ईश्वराने दिलेला शेवटचा धर्मग्रंथ मानला गेला आहे. कारण अज्ञेय अधिभौतिक प्रमेयापासून सुरुवात करुन, मानवी जीवनातील प्रत्यक्ष प्रश्नांची इश्वरी मार्गदर्शनानुसार उकल करण्यापर्यंतची ही प्रक्रिया आहे. त्यात जसा अनादी प्रेरणांचा अंश आहे. तसाच मानवी जीवनातील उणीवा आणि माणसाची दुर्बलता आणि विवेकनिष्ठ क्षमता यांचा समन्वय साधून करण्यात आलेले मार्गदर्शन देखील आहे. हा प्रवास अव्यक्तापासून ते व्यक्त मानवी जीवनापर्यंतचा आहे. त्यात परमेश्वराची प्रचंड अविष्कारी चेतना आणि परमेश्वराचा अंश असणार्या, परंतु विकारी, तसेच विवेकाची क्षमता असलेल्या, मानवी चेतनेचा समन्वय आहे.
याच कारणासाठी हे संदेश पैगंबर (सल्ल.) याना तीन प्रकारे प्राप्त झाले. इस्लामनुसार, ईश्वराच्या संदेशाचे प्रक्षेपण प्रत्यक्षपणे होत नाही तर प्रेषितांच्या मनात जाणिवांच्या माध्यमातून संदेश प्रक्षेपित केले जातात. स्फूर्तिद्वारे ईश्वराच्या संदेशांची जाणीव करुन देण्यात येते. त्याचे स्वरुप खूपच गूढवादी आणि संपूर्णपणे व्यक्तीगत आत्मजाणिवेचे असते. दुसर्या प्रकारात, प्रेषिताला निद्रित अवस्थेत, स्वप्नांच्या माध्यमातून किंवा त्याच्या आत्मचक्षूंना होणार्या भासातून, ईश्वरी ज्ञानाची जाणीव होत असते. तिसर्या प्रकारामध्ये ईश्वराच्या देवदूताकडूनच प्रेषिताला साक्षात्कार रुपे मार्गदर्शन केले जाते.
इस्लामी तत्वज्ञानात, प्रेषित आणि साक्षात्कार यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मुळात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना ईश्वरी ज्ञानाची जाणीव अचानक झालेली नाही. तर अनेक वर्षाच्या चिंतनानंतर आणि तसेच जीवनाच्या व्यावहारिक अनुभवांनी परिपक्वता आल्यानंतर त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी ईश्वरी ज्ञान आणि मानवी जीवन यांना जोडणारे तत्व दिसून येते. म्हणून इस्लाम हा केवळ ग्रांथिक आणि साक्षात्कारी धर्म राहत नाही तर मानवी मनाच्या परिपक्वतेतून प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून प्रेषितांंना ईश्वरी ज्ञानाची जाणीव साध्य होते. म्हणजे इश्वराने सांगितलेल्या ज्ञानासोबतच प्रज्ञा, चिंतन, अनुभव आत्मप्रत्यय आणि विश्वभान यांच्या संकल्पीत परिणामातून हे ज्ञान प्रेषितांना झालेले दिसून येते. इस्लाममधील ही तात्विक प्रक्रियाच मोठी विलक्षण आहे. इस्लाममध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे मानवीपण आग्रहाने वारंवार प्रतिपादन केले आहे. मुहम्मद सल्ल. तुमच्या सारखे एक सर्वसामान्य माणूसच होते, हे आग्रहाने मांडलेले आहे. तसेच ते केवळ संदेशवाहकच होते हे ठासून सांगितलेले आहे. यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एकतर ईश्वरी ज्ञान आणि यासर्व विश्वाच्या रहस्यांचे आकलन माणूसच करु शकतो. अवतार किंवा आणखीन दुसरी कोणतीही गोष्ट पुढे आणली की मानव बुध्दी , प्रज्ञा आणि जाणीव यांचे अवमुल्यन केल्यासारखे होते. कारण या सृष्टीत मनुष्यप्राण्याइतका श्रेष्ठ अन्य कोणीही नाही. म्हणून अवतार कल्पना इस्लामने नाकारुन मानवी श्रेष्ठत्त्वाचा सिध्दांत मांडला आहे. त्याचबरोबर इश्वर अवतार घेतो, या संकल्पनेत मानवी दोषासहित इश्वराचे चित्रण करणे म्हणजेच इश्वराचे मानवीकरण करणे हे ईश्वर संकल्पनेला आणि पावित्र्याला बाधा आणणारे असते. हे इस्लामचे सुत्र आहे. म्हणूनच इस्लाम आग्रहाने प्रेषितत्वाचा पुरस्कार करतो.
दुसरी गोष्ट म्हणजे इस्लामने कुरआनमधून श्रेष्ठ बुध्दीवान माणसे आणि सर्वसामान्य माणसे असा भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत अमान्य केलेला आहे. ईश्वरी ज्ञान हे खरोखरच जाणीवांचा प्रकाश असेल तर त्याचा बोध सर्वांनाच झाला पाहिजे हि इस्लामची धारणा आहे. म्हणून त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे साधेपण आणि सामान्य आणि सर्वसाधारण माणसात असणारी प्रज्ञा, यावर भर देण्यात आला आहे. इस्लामचे हे सुत्रच विलक्षण प्रगल्भ आहे. यात समतेचा एवढा खोलवर विचार केला आहे की त्यामध्ये बुध्दीमान आणि सर्वसाधारण माणूस असाही भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत इस्लाम मानत नाही.
म्हणूनच कुरआन शरीफ नुसार परमेश्वराने प्रत्येक विभागात सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शनासाठी संदेश पाठविले. म्हणूनच कुरआनमध्ये एक वचन येते की, ‘परमेश्वर प्रेषितांत भेद करीत नाही. त्याचबरोबर या प्रेषितांच्या सर्वसामान्यत्त्वाच्या सिध्दांतातून इस्लाम श्रेष्ठीजनाचा सिध्दांत नाकारतो. त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. हे शेवटचे प्रेषित म्हटले गेले आहेत. ते शेवटचे प्रेषित याचा अर्थ असा की, इश्वरी ज्ञान जर आतापर्यंत श्रेष्ठीजनांची मक्तेदारी होती. ते ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविले गेले आहे. म्हणजे ज्ञान हे जेंव्हा सर्वसामान्य माणसांपर्यंत येते, तेंव्हा ज्ञानाचे एक वर्तुळ पुर्ण होते. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे सर्वसामान्य माणसाचे प्रतिक आणि प्रतिनिधी होते. आणि ज्ञान पुन्हा जेंव्हा सामान्य स्तरापर्यंत येउन पोहचते तेंव्हा परमेश्वराला पुन्हा वेगळा प्रेषित पाठवण्याची गरजच भासत नाही. कारण, आता मानवी बुध्दी आणि प्रज्ञा, यांचा विकास एवढा प्रगल्भ झाला आहे की, स्वतंत्रपणे साक्षात्काररुपाने किंवा अन्य कोण त्याही प्रकारे ज्ञान पाठविण्याची गरज शिल्लक राहत नाही. आणि म्हणूनच इस्लाममध्ये त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना शेवटचे प्रेषित म्हटले आहे. एका अर्थाने, या सुत्रातून इस्लामने मानवी श्रेष्ठत्वाचा सिध्दांतच मांडला आहे. (क्रमशः)
- मरहूम प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफराज अहमद)