आज भारतीय समाज इतका दूषित, विकृत व द्वेषमूलक झाला आहे की ५-६ वर्षांच्या निरागस, निष्पाप बालिकेपासून ६०-७० वर्षांच्या आजीबाईचीही इज्जत, सन्मान सुरक्षित राहिलेला नाही. कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि बिकाऊ सौंदर्यबाजारच नव्हे तर अत्यंत सुरक्षित असे स्वत:च्या घराच्या चार भिंतीही महिलांसाठी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. हे कटू सत्य आहे. लोकांची मानसिकता इतकी विकृत की ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बलात्कार, विनयभंग वा लैंगिक शोषणाशी संबंधित भडक बातम्या नसतील, तर वर्तमानपत्र वाचण्यात लोकांना मजा येत नाही. ते म्हणतात, आज पेपरमध्ये विशेष काही नाही. याचे मूळ कारण म्हणजे पुरुषांची भोगवादी वृत्ती.
लैंगिक शोषण-
काही गोष्टी अशा आहेत की ज्या लाख प्रतिबंधानंतरही पूर्णत: रोखून धरता येत नाहीत. शरीरसुख ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यात बिघाड झाल्यास ती विकृत ठरते आणि सभ्य समाजाच्या संस्कृतीस बाधा ठरणारी दाहकता ठरते. आम्ही सर्वांनीच २००२ सालच्या गुजरातच्या जातीय दंगली स्तब्धपणे पाहिल्या. सरकारप्रायोजित या दंगलीत मुस्लिम गर्भार स्त्रीच्या पोटात त्रिशूळ खुपसून झालेल्या पाशवी हिंसा असो वा जातीय उन्माद असो, नुकताच कठुआमध्ये ६ वर्षांच्या आसिफाचे मंदिरात सामुहिक बलात्कार व थंड डोक्याने केलेली हत्या असो, या साऱ्यांचा मक्ता घेतला आहे तथाकथित संस्कृतीरक्षक ठेकेदारांनी. जागतिकीकरणाच्या वरवंटा बाजारपेठेतील विकाऊ वस्तू ठरली आहे. महिलांचा ना स्वत:च्या श्रमावर ताबा ना त्यांच्या शरीरावर. महिलांच्या श्रम, मन, शरीर आणि सन्मानावर फक्त पुरुषांचा ताबा. मग तो जातीचा, धर्माचा, कुटुंबीय, शेजारी वा परका असो. या जागतिकीकरणाच्या जात्यात महिला इतक्या भरडल्या जात आहेत की मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या घटना सर्रास व बेधडकपणे होत आहेत.
आसाराम आणि रामरहीम सारखे बाबा स्त्रियांना फक्त मादी समजून भोगत आहेत. निश्चितच हा पुरुषसत्तेचाच घेरा आहे. या घेऱ्यात बाई म्हणजे एक भोगवस्तू हा मनुमताचा जयजयकार घुमत आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या आसारामच्या बातम्या आश्रमाबाहेर आल्या आणि त्याने व त्याच्या आंधळ्या भक्तगणांनी काय समर्थन केले? आसाराम म्हणजे कृष्णाचा अवतार, प्रतिकृष्णच? म्हणून तो अशा रासक्रीडा करणारच. त्यात गैर काय आहे?
कठुआ, उन्नाव, सूरत अशा विविध ठिकाणी बलात्काराच्या घृणास्पद घटना घडल्यानंतर भारतीय समाजाच्या सर्व स्तरांतून संतापाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री संतोष गंगबार यांनी अकलेचे तारे तोडताना सांगितले की भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडल्या म्हणून इतका गदारोळ कशासाठी माजविता?
भारत जगात तीन नंबरी बलात्कारी देश-
भारत जागतिकीकरणाच्या विळख्यात गेला आणि देशातील सब कुछ बदलून गेले. भौतिक समृद्धीसह येथे जीवनाचा वेग भयानकपणे वाढला. त्याने नातेसंबंध उद्ध्वस्त केले. मानसामाणसांत वैर निर्माण झाले. त्यात महिला, दलित व मुस्लिमांच्या अत्याचारात बेसुमार वाढ झाली. संयुक्त राष्ट्र, यू.एन.ओ., क्राइम ट्रेंडस् सर्वे २०१० च्या अहवालानुसार, भारत बलात्कार प्रकरणांत जगात तिसऱ्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेत ८५ हजार ५९३ बलात्कारांची नोंद झाली, ब्राझीलमध्ये ४१ हजार १८० प्रकरणे नोंदविली गेली. भारतात २२ हजार १७२ प्रकरणे नोंदविण्यात आली.
स्त्री-स्वातंत्र्य : पाश्चात्य कल्पना-
पाश्चात्य भांडवलदारांनी स्त्री-स्वातंत्र्याचा सिद्धान्त मांडून तो सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा किंचितही कमी नाही. ती प्रत्येक बाबतीत स्वतंत्र व स्वावलंबी आहे. ही कल्पनाच मुळात स्त्री-हृदयास भुरळ पाडणारी आहे. स्त्रीने झपाट्याने ही कल्पना हृदयाशी कवटाळली. हळूहळू ती आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांबरोबर सामील होत गेली. तिचे अस्तित्व प्रत्येक जीवनक्षेत्रात आवश्यक समजले गेले. तिच्या या स्वैर स्वातंत्र्यामुळे पाश्चात्यांचे संपूर्ण जीवन चुकीच्या मार्गी लागले. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था उद्ध्वस्त झाल्या.
लैंगिक स्वैराचार-
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषाच्या स्वैर व स्वतंत्र देवाणघेवाणीमुळे लैंगिक स्वैराचाराची मानसिकता बळावली आहे. या स्वैराचाराने सार्वजनिक रूप धारण केले. यामुळे एक निर्लज्ज संस्कृतीने जन्म घेतला. हिच्या विषारी प्रभावाने नैतिकतेची पुâलबाग जळून भस्म झाली. आज लाजलज्जा, नैतिकता टाहो फोडत राहिली आहे.
इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा स्त्रीने आपले घर सोडून चारचौघांत आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केले, तेव्हा स्वैराचाराने उग्र रूप धारण केले. कला व संस्कृतीतून लैिंगक भावना व्यक्त होऊ लागल्या. विवस्त्र छायाचित्रे, मूर्ती तयार होत गेल्या. नाचगाण्यांतून स्त्रीदेहाचे हिडीस अवडंबर सुरू झाले. कथा, नाटक, गाणी, चित्रपट आदी माध्यमांतून लैंगिकतेच उदात्तीकरण झाले. पोर्नोग्राफी जगातील सर्वांत फायदेशीर उद्योग ठरू लागला. राहिली कसर इंटरनेटने पूर्ण केली. दारू, व्याज आणि शरीरसुखाचा खुबीने वापर करून स्त्री ही पुरुषाच्या हातातील खेळणे झाली. या उचापतीचा एकच उद्देश... पुरुषाची लैंगिक तृष्णा भागविणे.
इस्लामी मार्गदर्शन-
अशा नाजूक व कठीण परिस्थितीमध्ये इस्लाम आपले मार्गदर्शन करतो. तो स्त्रीचे मूलभूत अधिकारही प्रदान करतो आणि तिच्या विकासाची जबाबदारीही घेतो. इस्लाम स्थिर परिवारास समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक समजतो कारण परिवाराच्या मुळावरच समाज उभारलेला आहे. ‘परिवाराचे स्थैर्य म्हणजेच समाजाचे स्थैर्य आणि परिवाराचे विघटन म्हणजेच समाजाचे विघटन’ असे समीकरण इस्लामने मांडले आहे. सुसंस्कृत आणि सत्शील जीवन हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
ला तकरबुज्जिनाह-
‘व्यभिचाराच्या जवळ जाऊ नका. ही उघड निर्लज्जता आहे व अतिशय वाईट मार्ग आहे.’’ (दिव्य कुरआन, १७:३२)
पवित्र कुरआनमधील ही आयत चारित्र्यसंपन्नतेचे महत्त्व विषद करते. या आदेशामध्ये व्यभिचार करू नका असे सांगितले नाही तर व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका, अशी सक्त ताकीद करण्यात आली आहे. व्यभिचार ही एक अत्यंत निर्लज्जपणाची कृती आहे. निर्लज्जपणासंबंधी कुरआनचा आदेश आहे-
‘‘निर्लज्जतेच्या गोष्टीजवळ जाऊ नका.’’ (दिव्य कुरआन, ६:१५१)
निर्लज्जता अध:पतनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. व्यभिचार मानवी समाजास व मानवास सर्वनाशाकडे नेतो. समाजाच्या स्वास्थ्याचा पाया कुटुंबच असतो. नैतिक समाजाच्या उभारणीसाठी कुरआनने सर्वप्रथम पुरुषांना आदेश दिला आहे,
‘‘हे पैगंबर (स.)! श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्यात. (आपल्या दृष्टीची जपणूक करावी) व आपल्या लज्जास्थानाचे संरक्षण करावे. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे.’’ (दिव्य कुरआन, अन्नूर-३०)
यात पुरुषांना आज्ञा दिली आहे की त्यांनी इतर स्त्रियांचे चेहरे न्याहाळू नयेत. नजरा या कामवासनेस प्रेरक असतात व कामवासना निर्लज्जतेस प्रवृत्त करते. इस्लाममध्ये स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणे, स्त्रियांकडे डोकावून पाहणे निषिद्ध ठरविले आहे. म्हणून स्वच्छ, शुद्ध व नैतिक आचरणासाठी प्रत्येकाने आपल्या नजरेवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. भिरभिरणारी नजर कुलक्षणी मानली जाते. कामवासनेने स्त्रियांडे पाहणे म्हणजे डोळ्यांचा व्यभिचार होय. लज्जारक्षणाचे संरक्षण करणे म्हणजे अनैतिक कामापासून दूर राहणे.
यानंतर स्त्रियांना आदेश देण्यात आला,
‘‘हे पैगंबर (स.) श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या नजरा झुकलेल्या ठेवाव्यात. (आपल्या दृष्टीची जपणूक करावी) आपल्या लज्जास्थानांचे संरक्षण करावे, आपला साजशृंगार दर्शवू नये. याशिवाय जो सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर दुपट्ट्याचे पदर टाकावेत, त्यांनी आपला शृंगार प्रकट करू नये. त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल.’’ (दिव्य कुरआन, अन्नूर-३न्नजरा खाली ठेवाव्यात याचा अर्थ परपुरुषाकडे रोखून पाहू नये, आपली लज्जास्थाने दिसतील अथवा रेखांकित होतील अशा रितीने कपडे वापरू नयेत. शरीराची कमनीयता दृगोचर होऊ नये. आपल्या पोषाखामुळे तिच्या शालीनतेला धक्का पोहोचता उपयोगी नाही. पती, वडील, भाऊ, जवळचे नातेवाईक सोडून परपुरुष ज्यांच्या बाबतीत मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
व्यभिचाऱ्यांना शिक्षा-
पवित्र कुरआनमध्ये सूरह अन् नूर या अध्यायाच्या पहिल्याच आयतीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे,
‘‘हा एक अद्याय आहे जो आम्ही अवतरला आहे आणि याला आम्ही अनिवार्य ठरविला आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट उपदेशपर वचने अवतरली आहेत. कदाचित तुम्ही बोध घ्यावा.’’
म्हणजे सदरच्या अध्यायात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या केवळ शिफारसी म्हणून नव्हे. मनात आले तर मानव्यात अन्यथा वाटेल ते करीत राहावे. असे नाही तर या निश्चितस्वरूपी व त्याचे पालन अनिवार्य आहे. जर तुम्ही ईमानधारक असाल तर त्यांचे अनुकरण करणे तुमचे कर्तव्य ठरते.
व्यभिचारासारखी अमानवी कृती घडू नये म्हणून कुरआनने या अध्यायात अत्यंत कठोर शिक्षेचे आदेश दिलेले आहेत.
‘‘व्यभिचारी पुरुष आणि व्यभिचारी स्त्री, दोघांनाही प्रत्येकी शंभर फटके मारा. आणि त्यांची कीव करू नका. अल्लाहच्या धर्णाच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल. आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रद्धावंतांचा एक समूह उपस्थित राहावा.’’
म्हणजे शिक्षा उघडपणे सर्वांसमक्ष दिली जावी जेणेकरून गुन्हेगारांची फटफजीती आणि इतर लोकांसाठी धडा आणि बोधप्रद ठरावी तसेच या गुन्ह्याचा मानवी समाजावर फैलाव होऊ नये.
सामूहिक उत्पाताचा निर्मूलन-
‘‘आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही, ज्यांनी तुम्हांपैकी पाप केलेले असेल, आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.’’ (दिव्य कुरआन, अनफाल-२५)
आपण ज्या समाजात राहतो त्यातील काही लोक जर काही उपद्रव निर्माण करीत असतील तर ते मुळातच दाबले पाहिजेत. त्यासाठी सर्व समाजाने अतिशय जागरूक राहिले पाहिजे. आपला काय त्याच्याशी संबंध? असे म्हणून डोळेझाक करता उपयोगी नाही. नाहीतर कदाचित त्या उपद्रवापासून मोठा विघातक उद्रेक होऊन उपद्रव निर्माण करणाऱ्यालाच नव्हे तर समस्त समाजालाच जबरदस्त झळ बसू शकते. थोडक्यात, समाजातील सर्वांनीच आपले कान व डोळे उघडे ठेवून वावरले पाहिजे. म्हणजे उपद्रवी लोकांची उपद्रव निर्माण करण्याची हिंमतच होणारन नाही आणि सर्व समौजास सुरक्षितता लाभेल.
कुरआनचा बोध-
संस्कार-सुसंस्कार, आचारविचार, चारित्र्यसंपन्नता, मानसिक-आध्यात्मिक विकास आणि नैतिकता-मानवता, ही आपण शिक्षणाची उद्दिष्टे मानतो. याच सर्व गोष्टींवर कुरआनात भर दिलेला आहे. मानवाला खरोखरीच जर ऐहिक व पारमार्थिक जीवनात सफल व्हायचे असेल तर त्याने अंधश्रद्धेने कुरआनचे केवळ पठण करणे उपयोगाचे नाही तर त्याने जिज्ञासू वृत्तीने ही ईशवाणी अभ्यासली पाहिजे आणि आत्मसात केली पाहिजे. तेव्हाच तो उत्तम कुटुंबप्रमुख, तिपात, भाऊ, पुत्र, उत्तम शेजारी, जबाबदार नागरिक बनू शकतो. या शिकवणीवर चालणारी स्त्री अथवा पुरुष ऐहिक व पारलौकिक सफल जीवनासाठी प्रशिक्षित होऊ शकतो यात शंका नाही. यात कोणतेही अवघड असे तत्त्वज्ञान नाही तर अत्यंत साध्या, सोप्या व सुलभ भाषेत, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सहज समजेल व आकलन होईल असे मार्गदर्शन आहे. खुद्द कुरआन याची साक्ष देतो.
‘‘आम्ही कुरआनास उपदेश मानण्याकरिता सोपे बनविले आहे. तर आहे कोणी उपदेश प्राप्त करणारा.’’ (दिव्य कुरआन, ५४:२२)
कुरआनचा बोध मानवी जीवनाशी सर्वार्थाने निगडीत आहे. सर्वस्पर्शी आहे. मानवी जीवनाची एकही बाब अशी नाही जिला याने स्पर्श केलेला नाही. ईशमार्गदर्शन समजून त्यानुसार आचरण करण्याची सद्बुद्धी ईश्वर आम्ही सर्वांना देवो, हीच प्रार्थना!
- वकार अहमद अलीम