मुंबई
महाराष्ट्रातील जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू शक्ती दलाचे प्रमुख सिमरन गुप्ता यांनी ख्वाजा मोईन अजमेरी यांच्याबद्दल उद्धटपणे केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे. कारवाईबरोबरच, सरकारनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.
मौलाना फलाही म्हणाले की, मुस्लिमांच्या आदरणीय व्यक्तींबद्दल अपमानास्पद भाषणे व टिप्पण्या हे देशात रोजचेच काम झाले आहे. या सरकारच्या काळात, देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष अशा प्रकारे जोपासला गेला आहे की आपल्या पवित्र व्यक्तिमत्त्वांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि अपमानास्पद शब्द ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने किंवा ती नाममात्र होत असल्याने देशात अशा घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी अजमेरमधील हिंदू शक्ती दल नावाच्या जहाल संघटनेचा प्रमुख सिमरन गुप्ता याने बेतालपणाच्या सर्व मर्यादा मोडून मोईनुद्दीन अजमेरी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून आपला द्वेष व्यक्त करत, अजमेरची दर्गा आणि तेथील मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. अशा घृणास्पद व अपमानास्पद वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो व पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो की समाजात धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या अशा जहाल संघटने विरुद्ध एफआय नोंदवावा आणि कडक कारवाई करावी.
पुणे एपीसीआरचे स्थानिक अधिकारी अन्वर बागबान, जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे जनसंपर्क कार्यकारी शोएब असीम आणि इतरांनी या द्वेषपूर्ण विधानाविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार केली परंतु पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती अभय ठिपसे म्हणाले की, पुणे पोलिसांनी एफआयआर न नोंदवणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी एफआयआर नोंदवावा व दाखवून द्यावे की राज्यात द्वेषयुक्त भाषण किंवा विधाने खपवून घेतली जाणार नाहीत.
Post a Comment