Halloween Costume ideas 2015
October 2018

आदरणीय उमर बिन खत्ताब (रजि.) म्हणतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘कर्मांचा दारोमदार फक्त निय्यत (उद्दिष्ट) वर आहे. म्हणून माणसाला तेच फळ मिळेल ज्याची  त्याने निय्यत केली असेल. उदा. ज्या व्यक्तीने फक्त अल्लाह आणि पैगंबरांसाठी हिजरत (स्थलांतर) केली असेल त्याचीच हिजरत खरी हिजरत आहे. ज्याने रुपया-पैशांसाठी अथवा  स्त्रीशी विवाह करण्यासाठी हिजरत केली असेल तर त्याची हिजरत धनसंपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी गणली जाईल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
कोणत्याही सत्कृत्याचा मोबदला त्या सत्कृत्यामागे उद्देश (निय्यत) काय आहे, हे पाहूनच दिला जाईल. म्हणूनच उद्देशाला असाधारण महत्त्व आहे. खरे तर अल्लाहजवळ कर्माचा उद्देशच  महत्त्वाचा आहे. इस्लाममध्ये हिजरत (स्थलांतर) हे खूप मोठे सत्कर्म आहे. एखाद्या ठिकाणी सन्मार्गावर जगणे अशक्यप्राय झाले असेल तर ते ठिकाण सोडावे, हिजरत करावी; पण  सत्याची कास सोडू नये असा संकेत इस्लामी शास्त्रात आहे. मात्र हे एवढे महान सत्कर्मसुद्धा जर अल्लाहऐवजी संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर अल्लाहजवळ त्याची काही एक  किंमत नाही. एखादे सत्कर्म कितीही मोठे असू द्या, ते जर फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी नसेल, नावलौकिकासाठी असेल, स्वार्थासाठी, संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर  न्यायनिवाड्याच्या दिवशी त्याची काहीच किंमत होणार नाही. त्याची गत खो्या पैशासमान होईल.
आपण दैनंदिन जीवनात अनेक सत्कर्मे करतो. नमाज, रोजा, जकात, हज असेल किंवा गोरगरीबांची सेवा, मातापित्यांची सेवा इ., ही सर्व सत्कर्मे आपल्या उपयोगी पडतील, जर ती  फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असली तरच! अन्यथा जर ती ‘शो’साठी असतील तर सपशेल व्यर्थ आहेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट म्हणणे आहे. माझे एखादे  सत्कर्म फक्त माझ्या अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असेल तर पेपरला फोटो, बातमी येवो अगर न येवो, समाजात त्याची चर्चा होवो वा न होवो, मला काय फरक पडणार? हा आहे  खरा नि:स्वार्थीपणा! पैगंबरांच्या एका हदीसचा आशय असा आहे की न्यायदानाच्या दिवशी अल्लाह कोणाची नमाज, रोजे, हज, दानधर्म त्याच्या तोंडावर फेकून देईल आणि त्याला कठोर शिक्षा करील. कारण त्याची नमाज अल्लाहसाठी नव्हती, जगाला दाखविण्यासाठी होती! त्याचे रोडे, दानधर्म आणि हज अल्लाहसाठी नव्हते तर समाजात त्याचे कौतुक व्हावे म्हणून होते. हीच गत प्रत्येक शो-पीस कर्माची होईल.
पैगंबरांचा उपरोक्त उपदेश समस्त मानवजातीला सावधान करत आहे की प्रत्येक सत्कर्म हे फक्त अल्लाहला राजी करण्यासाठी करा! वाहवा व्हावी, नावलौकिक व्हावे यासाठी कदापि  करू नका!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

(१६२) बरे हे कसे शक्य आहे की जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे  अंतिम ठिकाण जहन्नम(नरक) आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे?
(१६३) अल्लाहपाशी दोन्ही प्रकारच्या माणसात कित्येक पटीचा फरक आहे आणि अल्लाह सर्वांच्या कृत्यांवर नजर ठेवतो.
(१६४) खरे म्हणजे ईमानधारकांवर अल्लाहने तर हे फार मोठे उपकार केले आहे की त्यांच्या दरम्यान खुद्द त्यांच्याचपैकी एक अशा पैगंबराला उभे केले जो त्याची संकेतवचने त्यांना  ऐकवितो, त्यांच्या जीवनाला सावरतो आणि त्यांना ग्रंथ व विद्वत्तेची शिकवण देतो. वास्तविक पाहाता हेच लोक यापूर्वी उघडपणे मार्गभ्रष्ट झाले होते.
(१६५) आणि ही तुमची काय स्थिती आहे की जेव्हा तुमच्यावर संकट कोसळले तेव्हा तुम्ही म्हणू लागला की हे कोठून आले?११५ वस्तुत: (बदरच्या युद्धात) याच्यापेक्षा दुप्पट संकट  तुमच्याकरवी (विरूद्ध पक्षावर) कोसळलेले आहे.११६ हे पैगंबर (स.)! यांना सांगा, हे संकट तुम्ही स्वत:च ओढून घेतले आहे,११७ अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.११८
(१६६, १६७) जी हानी युद्धाच्या दिवशी तुम्हाला पोहोचली ती अल्लाहच्या आज्ञेने होती आणि ती यासाठी होती की अल्लाहने पाहावे की तुमच्यापैकी कोण ईमानधारक आहे आणि दांभिक  कोण? ते दांभिक की जेव्हा त्यांना सांगण्यात आले, ‘‘या, अल्लाहच्या मार्गात युद्ध करा किंवा कमीतकमी (आपल्या शहराचे) रक्षण तरी करा,’’ तेव्हा म्हणू लागले, ‘‘जर आम्हाला माहीत  असते की आज युद्ध होईल तर आम्ही अवश्य तुमच्याबरोबर आलो असतो.’’११९ ही गोष्ट जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते ईमानपेक्षा कुफ्रच्या अधिक जवळ होते. ते आपल्या मुखाने अशा  गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या मनामध्ये नसतात, आणि जे काही ते हृदयात लपवितात अल्लाह त्याला चांगलेच जाणतो.
(१६८) हे तेच लोक आहेत जे स्वत: तर बसून राहिले आणि यांचे जे भाईबंद लढावयास गेले आणि मारले गेले त्यांच्या संबंधाने यानी सांगून टाकले की जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले  असते तर मारले गेले नसते. यांना सांगा की जर तुम्ही आपल्या या वचनांत खरे असाल तर स्वत: तुमचा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला टाळून दाखवा.
(१६९) जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले त्यांना मृत समजू नका, ते तर खरे पाहता जिवंत आहेत,१२० आपल्या पालनकर्त्यापाशी उपजीविका प्राप्त करीत आहेत,
(१७०) जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यावर ते प्रसन्न व खूश आहेत,१२१ आणि समाधानी आहेत जे ईमानधारक त्यांच्या पाठीमागे जगात राहिले आहेत आणि  अद्याप तेथे पोहचलेले नाहीत, त्यांच्यासाठीदेखील कोणत्याही भयाचे अथवा दु:खाचे कारण नाही.
(१७१) ते अल्लाहचे बक्षीस व त्याच्या कृपेबद्दल आनंदी व प्रसन्न आहेत आणि त्यांना कळून आले आहे की, अल्लाह ईमानधारकांचा मोबदला वाया घालवीत नाही.


११५) वरिष्ठ साहबा (रजि.) तर निश्चितच वस्तुस्थितीला चांगले समजून होते आणि संभ्रमात पडू शकत नव्हते. परंतु साधारण मुस्लिम समजत होते की जेव्हा अल्लाहचे पैगंबर  मुहम्मद (स.) आमच्यात आहेत आणि अल्लाहची मदत आणि समर्थन आमच्या बाजूने आहे तर कोणत्याच स्थितीत शत्रू आम्हाला पराजित करू शकत नाही. म्हणून उहुद युद्धात  मुस्लिमांचा पराजय झाला तर त्यांच्या आशा भंग झाल्या आणि ते स्तब्ध होऊन विचारू लागले की हे काय झाले? आम्ही अल्लाहच्या दीन (धर्म)साठी युद्ध करीत होतो, त्याच्या मदतीचे  वचन आम्हाला होते, अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) स्वत: मैदानात होते आणि तरीही आम्ही पराजित झालो? आणि पराजित झालो अशा लोकांशी जे अल्लाहच्या दीन (धर्म)  संपविण्यास आले होते? या आयती याच विस्मयाला नष्ट करण्यासाठी अवतरित झाल्या होत्या.
११६) उहुद युद्धात मुस्लिमांची सत्तर माणसे शहीद झाली. या विपरीत बदर युद्धात शत्रूचे सत्तर सैनिक मुस्लिमांच्या हस्ते मारले गेले होते आणि सत्तर सैनिक कैद करण्यात आले  होते.
११७ ) म्हणजे ही विपत्ती तुमच्या चुकांचा आणि उणिवांचा परिणाम आहे. तुम्ही संयमाला आपल्या हातातून सोडले होते. काही कामे ईशभयविरुद्ध केली होती, आदेशाच्या विरुद्ध  वागलात, संपत्तीच्या मोहात अडकला, आपसात तंटा व मतभेद केले, मग का म्हणून विचारता की हे संकट कोठून आले?
११८) म्हणजे अल्लाह तुम्हाला विजय देण्याची शक्ती ठेवतो तर तो तुम्हाला पराजयसुद्धा देण्याची शक्ती ठेवून आहे.
११९) अब्दुल्लाह बिन उबई जेव्हा तीनशे दांभिकांना घेऊन मधूनच परत फिरला तेव्हा काही मुस्लिमांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला आणि साथ देण्यास राजी करण्याचा प्रयत्न  केला. उत्तरात तो म्हणाला की आज युद्ध होणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही परत जात आहोत. जर आजच युद्ध सुरु झाले असते तर आम्ही सर्वजण नक्कीच  तुमच्याबरोबर आलो असतो.
१२०) तपशीलासाठी पाहा, सूरह २ (अल्बकरा) टीप. १५५)
१२१) हदीस संग्रह `मुस्नद अहमद' मध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे की जी व्यक्ती सत्कर्मे करून जगाचा निरोप घेते त्याला अल्लाहजवळ आनंदमय आणि सरस जीवन  प्राप्त् होते की यानंतर तो कधीही जगात परत येण्याची इच्छा करीत नाही. शहीद याला अपवाद आहे. शहीद इच्छितो की परत परत जगात जावे आणि पुन्हा पुन्हा ते रसास्वादन, सुखानुभूती आणि आनंद प्राप्त् करत जावा जे अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करताना त्याला प्राप्त् होते.

- राम पुनियानी

अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने डॉ. फारूखी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये 2/1 ने असा निर्णय दिला की, या संबंधी दिलेल्या जुन्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी हे प्रकरण संविधान पिठाकडे वर्ग करण्याची गरज नाही. या निर्णयात असहमती दर्शविणार्‍या न्यायमुर्तींनी मात्र याउलट मत नोंदवत या प्रकरणाला सात न्यायाधिशांच्या संविधान पिठाकडे वर्ग करण्याच्या पक्षामध्ये आपले मत नोंदविले. असे मानले जात होते की, मस्जिद इस्लामचा अविभाज्ज भाग नाही. या निष्कर्षामुळे इलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो निर्णय प्रभावित होईल, ज्यात बाबरी मस्जिदच्या भूमीचे तीन भागामध्ये विभाजन करून त्याला सुन्नी वक्फ बोर्ड, रामलला विराजमान आणि निर्मोही आखाड्याला देण्याबद्दल निर्णय देण्यात आला होता.
    डॉ. फारूखी प्रकरणामध्ये दिलेला निर्णय हा या तर्कावर आधारित होता की, नमाज ही कुठल्याही मोकळ्याजागी अदा केली जाऊ शकते. त्यामुळे मस्जिद इस्लामचा अविभाज्ज अंग आहे, असे म्हणण्यात काही हशील नाही. दूसरीकडून असा तर्क देण्यात आला की, जर का मस्जिदी ह्या इस्लामच्या सिद्धांतांचे पालन करण्याकरिता आवश्यक नाहीत तर जगात एवढ्या मोठ्या संख्येने मस्जिदी कशासाठी आहेत? निश्‍चितरूपाने या मुद्दयावर आणखीन गहनपणे विचार करणे आवश्यक होते.
    आता अयोध्येच्या जमिनीच्या तंट्याशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जरी अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्या जमिनीला (उर्वरित लेख पान 7 वर)
तीन भागात विभाजित करण्याचा निर्णय दिला होता तरी या निर्णयाचा आधार कुठलाही भूमिअभिलेख नव्हता. उलट हिंदूंच्या एका मोठ्या गटाची आस्था आहे की, भगवान राम यांचा जन्म त्याच ठिकाणी झाला, या गृहितकावर आधारित होता. जमिनीसंबंधीचे तंटे कसे सोडविल्या जावेत? भूमिअभिलेखाच्या आधारावर की आस्थेच्या तर्कावर? आस्था कुठल्याही न्यायालयाच्या निर्णयाचा आधार होऊ शकते का? किंवा व्हायला हवी काय? एवढेच नव्हे तर ही आस्थासुद्धा निर्माण केली गेेलेली आस्था आहे; आणि या आस्थेची निर्मिती संघ परिवाराद्वारे चालविण्यात आलेल्या राम मंदिर आंदोलनाद्वारे केली गेली. या आंदोलनाचे नेतृत्व अगोदर विहिंपने व नंतर भाजपने केले.
    हा जो दावा केला जातोय की, विवादित स्थळावर राममंदिर उभे होते, ज्याला पाच शतकांपूर्वी पाडण्यात आले होते. तो अतिशय संदेहास्पद आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जेव्हा कथित रूपाने राम मंदिर पाडले गेले त्या काळात श्रीरामाच्या मोठ्या भक्तांपैकी एक गोस्वामी तुलसीदास अयोध्यामध्येच राहत होते. असे असतांनासुद्धा त्यांनी आपल्या कुठल्याही रचनेमध्ये अशी कुठलीही घटना घडल्याचे म्हटलेले नाही. उलट त्यांनी आपल्या एका दोह्यामध्ये लिहिले आहे की, ते अत्यंत सुलभपणे कोणत्याही मस्जिदीमध्ये राहू शकत होते. त्या ठिकाणी रामजन्म झाला या आस्थेने मागील काही दशकांमध्येच जोर पकडलेला आहे.
एकेकाळचे महान माहितीपट निर्मात्यांपैकी एक आनंद पटवर्धन यांनी आपल्या श्रेष्ठ कृती, ”राम के नाम” मध्ये दाखविलेले आहे की, कशाप्रकारे अयोध्येमधील कित्येक मंदिरांचे महंत हा दावा करतात की, श्रीराम यांचा जन्म त्यांच्याच मंदिरात झाला होता. पौराणिक काळाला इतिहासाच्या कुठल्याही कालखंडाशी जोडणे सोपे नाही.
    आता आपल्या समोर काही अन्य प्रश्‍न आहेत. पहिला प्रश्‍न असा की, मस्जिदीच्या आत रामललाच्या मूर्तींची स्थापना करणे हा अपराध होय. आपण त्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीशी परिचित आहोत, ज्या परिस्थितीमध्ये अयोध्येच्या त्या काळाचे जिल्हा दंडाधिकारी के.के. नय्यर यांनी मुर्त्यांना तेथून तात्काळ हटविलेल्या नव्हत्या. याच नय्यर यांनी सेवानिवृत्त होताच भारतीय जनसंघाचे सदस्यत्व स्विकारले होते. दूसरा अपराध असा की, दिवसाच्या सूर्यप्रकाशामध्ये, सर्वांच्या डोळ्यादेखत मस्जिदीला उध्वस्त करण्यात आले. तेव्हा उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाला लिखित शपथपत्र देऊन मस्जिदीला नुकसान होऊ देणार नाही, याचे आश्‍वासन दिले होते. एवढे असूनही ही घटना घडली. या सर्व प्रक्रियेला लिब्राहन आयोगाने, ”एक षड्यंत्र” असे म्हटलेले आहे. ज्यावेळेस कारसेवक मस्जिद उध्वस्त करत होते, त्यावेळेस भाजपा नेता लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे त्या ठिकाणी मंचावर उपस्थित होते. त्यांना त्यांच्या या गुन्ह्यात केलेल्या भागीदारीचे बक्षीस म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान सुद्धा देण्यात आलेले होते. या गुन्ह्याच्या दोषींना शिक्षा व्हायला नको का? त्यावेळेसे ही घटना चित्रित करण्यास गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली होती, त्यांचे कॅमेरेही फोडण्यात आले होते. कोणत्याही जमिनीच्या विवादाचा निर्णय अभिलेखाच्या आधारे व्हायला हवा. विवादित जमीन शेकडो वर्षांपासून सुन्नी वक्फ बोर्डाच्या नियंत्रणात राहिलेली आहे. 1985 साली कोर्टाने मस्जिदीशी संलग्न भूमीवर हिंदूना एक ओटासुद्धा बांधण्यात अनुमती दिलेली नव्हती. या घटनाक्रमाशी संबंधित सर्व अभिलेख उपलब्ध आहेत. काही लोक या प्रश्‍नाची शांतीपूर्ण उकल कोर्टाच्या बाहेर करण्याच्या बाता मारत आहेत. यातील कित्येक लोक तीच भाषा बोलत आहेत जी भाषा संघाला आवडते. ते मुस्लिमांना म्हणतात की, त्यांनी जमिनीवरचा आपला दावा सोडावा व मंदिर बांधण्यास आडकाठी आणू नये. त्या बदल्यात त्यांना दुसरीकडे मस्जिद बांधण्यासाठी जमीन दिली जाऊ शकते. अशीही धमकी देण्यात येत आहे की, जेव्हा भाजपला उपयुक्त बहुमत मिळेल तेव्हा संसदेद्वारा कायदा करून त्याच ठिकाणी राम मंदिर बांधण्यात येईल.
    वाटाघाटी म्हणजे एक अशी प्रक्रिया असते की, ज्यात दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकले जाते. आणि प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन्ही पक्षांना काहीतरी सोडण्याच्या बदल्यात काहीतरी दिले जाते. आणि त्यावर दोन्ही पक्ष संम्मत होतात. जो फार्मुला सध्या पुढे केला जातोय त्यात तर मुसलमानाचे पूर्णपणे समर्पण होईल. आज आपल्याला गुन्हेगारांना शिक्षा देणे आणि बाबरी मस्जिदीच्या प्रश्‍नाला कायदेशीर पद्धतीने सोडविण्याची गरज आहे. न्याय केल्याशिवाय शांती प्रस्थापित होत नाहीत. बाबरी मस्जिद उध्वस्त झाली त्या लज्जास्पद दिवसाला हिंदू शौर्य दिवसाच्या रूपाने साजरा केला जात आहे. विघटनकारी, जातीयवादी राजकारण आम्हाला किती खोल अंधारामध्ये ढकलू पाहत आहे. आज भारतासमोर अनेक मुलभूत समस्या आवासून उभ्या आहेत. लोकांना रोजगार आणि डोक्यावर छप्पर उपलब्ध करून देणे यासारखे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र संघ परिवाराने, राम मंदिर आणि पवित्र गाय सारख्या मुद्यांना पुढे करून आपली राजकीय आणि सामाजिक शक्ती वाढविलेली आहे. आपल्याला रूग्णालयांची आणि विद्यालयांची गरज आहे, उद्योग धंद्यांची गरज आहे. जेणेकरून बेकार युवकांच्या हाताना काम मिळेल. निवडणुकांच्या ठीक अगोदर अयोध्येचा मुद्दा उकरून काढणे दुर्भाग्यपूर्ण आहे. याचाचा अर्थ असा की, पुढील निवडणुकांमध्ये सामान्य लोकांच्या मुलभूत समस्यांऐवजी मस्जिद आणि मंदिरावर चर्चा होईल. जे लोक समानता आणि न्यायाधारित समाजाच्या निर्मितीचे समर्थक आहेत त्यांना या गोष्टीची खात्री करावी लागेल की, पुढील निवडणुकीचा अजेंडा सामान्य लोक आणि त्यांचे मुद्दे राहतील मंदिर आणि मस्जिद नव्हे. 

(इंग्रजीतून भाषांतर अमरिश हरदेनिया आणि हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख)

 सुमय्या नईम शेख, मुंबई
    आधुनिक जगातील मानवी समाजामध्ये दुराचाराने थैतान घातले आहे. विशेषकरून स्त्रियावरील अत्याचारामध्ये वृद्धी होत आहे. त्यांचे शोषण होत आहे, मानवी हक्कापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास त्यांना मूल्याधिष्ठित आधुनिक शिक्षण देेणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्था ही आदर्श बनली पाहिजे. मुलींमध्ये धैर्य आणि आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी एकीकडे त्यांना आधुनिक शिक्षण देण्याची गरज आहे तर दूसरीकडे इस्लामी मुल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे आधुनिक काळाच्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्या तयार होतील. याच उद्देशाने 4 मार्च 1984 रोजी गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (जीआयओ)ची स्थापना करण्यात आली.
    जीआयओचा यावर ठाम विश्‍वास आहे की, इस्लामी शिकवण महिलांच्या उद्धाराकरिता सहाय्यभूत आहे. विद्यार्थींनीना त्याद्वारे जीवन ध्येयाची प्राप्ती होईल. या कामाकरिता विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेतच. परंतु, विद्यार्थीनींबाबत परिस्थिती निराशाजनक आहे. आदर्श समाज निर्मिती करिता विद्यार्थी युवतींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. कारण भावी पिढ्यांना नीतीमत्तेचे बाळकडू त्यांचे मार्फतच पाजले जाणार आहे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून जीआयओची स्थापना झाली आहे. याच हेतूपोटी सदर संघटना कार्यरत आहे. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ही अखिल भारतीय पातळीवरील विद्यार्थीनींची संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे पालकत्व त्यास प्राप्त आहे. आदर्श मानवी समाजाच्या पुनर्स्थापनेकरिता विद्यार्थीनींना इस्लामी मार्गदर्शनाद्वारे शिक्षित करणे हे जीआयओचे प्रमुख कार्य होय. अशा प्रकारे कुटुंब व समाजामध्ये असणारी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका व स्थानाविषयी जीआयओद्वारे आपल्या सभासदांमध्ये जाणीव निर्माण करण्याचे कर्तव्य पार पाडले जाते. इस्लामी शिकवणीनुसार मुलींचे आचरण असावे हाच हेतू जीआयओ बाळगते. या हेतूपूर्तीकरिता जीआयओ विविध शिबिरांचे आयोजन करते. वेगवेगळ्या मोहिमा राबविते, मुलींच्या शिक्षणास चालना देते. त्याचबरोबर समाजात मुलींना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याचे कर्तव्यही बजावते. सदरची संघटना अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असून, चारित्र्यवान मुलींची पिढी घडविण्यात अग्रेसर आहे.

काही घटना, प्रसंग आठवणींच्या पलिकडे जात नाहीत. विस्मृतीच्या अडगळीतूनही गच्च धुक्यातून वाट सापडावी, तशा त्या सापडतात. सुखद किंवा दुःखद असे कप्पे न करता त्या सहज दुधावरच्या साथीसारख्या तरळत राहतात. या आठवणींना सल असते-नसते. कोणत्या भावनांचा रंग यांना द्यावा नाही कळत - पण या जगण्याचं तत्वज्ञान मांडत राहतात.
    अगदी परवा कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणं झालं, एक शहर, महाराष्ट्र-कर्नाटक सिमा प्रश्‍नांवरून भिजत ठेवलेल्या घोंगड्याच गाव... भाषिक अस्मितेच्या, प्रांतिक अस्तित्वाच्या झगब्यात स्वतःची कट्टरता दाखवणारं सुंदर शांत (?) शहर. सकाळी दहाला शार्प शहरी स्टँडवर उतरून संयोजकांना बोलावून घेतलं. ’एनजीओ’ म्हणून ’महिला सक्षमीकरणा’वर कार्य करणारी तरूण मंडळीची कर्तबगार संस्था... अवघ्या दहाच मिनिटात त्यांनी मला रिसिव्ह केलं. दुचाकी किंवा इतर वाहन नसल्याने मी सरळ त्यांच्या सोबत ऑटोरिक्शाकडे धावलो. सर्वसाधारण पेहराव्यातून मुस्लिम दिसणारा युवक कानडी बोलत होता. आम्ही आमचे ठिकाण-पत्ता सांगितला. ’साठ’ रूपयाच्या भाडेवर आम्ही अ‍ॅटो केली.
    हॉलमधील साध्या विषयावरील चर्चासत्रात मराठी-कानडी अशा दोन्ही भाषेतून काही मनोगत झाली. मतमतांत्तरे आणि बौद्धिक समाधान माणून मी परतीला निघालो. दुपारचे चारेक वाजलेले. ऑक्टोबर हिटला सुरूवात. मी स्टॅण्डपर्यंत जाणारी रिक्षा घेतली. यावेळी माझ्यासोबत सकाळचेच दोघेजण सोबतीला. मी मराठी बोलणार्‍या ऑटोवाल्यांना बोलावलं. ”सेनेच्या नावाने केसरी रंगाचा स्टॉप’ होता. रिक्शावाल्याच्या गळ्यात गंडेदोरे आणि वाढलेल्या दाढीने कपाळी नाम ओढलेला. ’किती होईल भाडे?’- मी, चाळीस रूपये- तो ”आम्ही तिघे मागे बसलो. आमच्यातला एक म्हणाला सकाळी साठ रूपये सांगितले. स्टॅण्डवरून एकाने इथपर्यंत... त्यावर रिक्शावाल्यानं जरा मोठ्यानं उत्तर दिलं. बहुतेक तुम्ही मामूच्या स्टॉपवरून आलात, मुस्लिम आहेत ते, तसंच करतात. तुम्ही ’जय महाराष्ट्र’ म्हणालात म्हणून मी दहा कमीच सांगितले तुम्हाला. भाषेचा अभिमान हाय आम्हांला. त्याच्या उत्तराने माझ्या सोबतच्या दोघांना कसेतरी वाटले. चेहर्‍यावरून तरी एवढेच दिसतच होते. ते दोघेही कानडी भाषिक आणि मी मराठी मुसलमान!! ऑटोवाल्याला आम्ही तीघे मराठीच वाटलो.
    दूसरा प्रसंग, मराठी प्राथमिक शाळेतला... शहर महाराष्ट्रातलं... गच्च लोकसंख्येचे श्रीमंत शहर.. विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने सहज सुत्रसंचालक म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सगळी तयारी सुरूय. येणार्‍या पालकांची व्यवस्था करण्यात शिपाई कर्मचारी वर्ग गुंतलेला. सत्ताधारी पक्षाचे मंत्री वगैरे लवाजम्याची वाट पाहत मान्यवर शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक वगैरे सगळे धावपळीत. मुख्याध्यापकांच्या केबीनमध्ये एका सातवीच्या विद्यार्थ्याला मॅडम खूप रागवत होत्या. त्याच्या आई-वडिलांची कार्यक्रमाला अनुपस्थिती होती म्हणून त्या मुलासोबत त्याचे चाचा आलेले होते. त्यांनाही केबीनमध्ये बोलावण्यात आले. मॅडम यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना विसंवाद-मग वाद वाढला. केबीनबाहेर मोठ्याने आवज येऊ लागला. मी ऐकत उभा होतो शांत. शेजारून जाणार्‍या शिपायाने कंमेट केली,” तुमचेच लोक”... सगळे असेच. मी स्टेजवर आलो सरळ. उगीच माईक व्यवस्थित लावल्या सारखा केला. मांडव सजावट करणार्‍या ’मुल्ला डेकोरेशनवाल्याला बोलावलं जवळं, तो म्हणाला दरवर्षी इथलं काम मलाच मिळंतय, शिक्षक स्टाफ प्रेमळ आहे, मदत करतात सारे फक्त बिर्याणी मागतात तेव्हा आणून द्यावी लागते बस्स. फटाके फुटावेत धुसमुसत तशा अनेक प्रसंगाची आठवमाळ फुटू लागलीय पण या शेवटच्या प्रसंगाने तर मी फुटलोच...
    शासकीय कामाचा अतिरिक्त भाराने वैतागलेले शिक्षक मित्र, मतदार यादी, नवीन नाव नोंदणी किंवा पटसंख्या वाढविण्यासाठी गल्ली वस्त्यांतून भेटीचा कार्यक्रम अशी आखणी होत होती.
    कुठल्यातरी जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रमुख वक्ता म्हणून हजेरी लावली. सगळा स्टाफ आपल्या कामात व्यस्त. मी गुपचुप स्टाफरूममध्ये ओळखीच्या शिक्षक मित्रासोबत सगळ्या आडनावाचे शिक्षक कामात व्यग्र. कार्यक्रमाला तासभर अवकाश होता अजून. स्टाफरूम मध्ये खुर्च्या नवीन आणलेल्या बहुतेक. तेवढ्या एक मॅडम आत आल्या, आणि बिस्मिल्ला म्हणत खुर्चीवर बसल्या. बाकीचे सगळे वेडावल्यासारखे किंवा वेडेवाकडे... माझं फळ्यावर प्रमुख पाहूणे म्हणून लिहिलेलं ठळक अक्षरांत नाव. मोठे डोळे करून पाहत बसलो...
    थोड्यावेळची शांतता आणि त्यांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या. म. ’देसाई, कुठला एरिया मिळालाय” फॅक्टरी जवळचा...” तुम्हाला हो मराठे सर” मला मोठ्या मशिदीपासून दर्ग्यापर्यंत तीन गल्ल्या” ” म्हणजे अतिरेक्यांच्यात फिरणार म्हणा तुम्ही? कुणीतरी तरूण शिक्षक मध्येच बोलला. मघाशी ’बिस्मील्ला’ म्हणणार्‍या शिक्षिका ताडकन उठून बाहेर गेल्या. मघाची सारी तोंड सरळ झाली.. माझ्या चेहर्‍यावर काही नाही दिसत मी शांत... कार्यक्रम सुरू झाला. स्वागत परिचय संपेपर्यंत धावत-घाईत कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर आले. माझ्याजवळची खुर्ची सरकावून बसले... राम म्हणत, चेहा रूमालाने पुसून घेतला. मला नथूरामाची गोळी आणि बापूंचा हे राम दोन्ही धाडकन् लागले.
    मी जयंतीवर बोलायला उभा राहिलो. पहिल्यांदा म.गांधी सोबतचे खान अब्दुल गफारखान आठवले. पण विषारी पेरणीचं पीक काळजां वाहू देणार्‍या माणसांसमोर मी मर्यादा पाळली. ’सरहद गांधी’ मी बोलण्यातून हद्दपार केले.
    रिक्शावाला, शिपाई, मॅडम, मुल्ला मांडववाला... बिस्मिल म्हणणारी स्त्री शिक्षिका, रामराम म्हणत खुर्चीवर बसणारे प्रमुख अध्यक्ष ही अपसमजांचे प्रतिक प्रतिनिधी.
    मी मौन अहिंसक माकडासारखा तिन्ही वेळा कान, तोंड, डोळे उघडे असून निःशब्द बहिरा आंधळा... लेखणीतून गोंधळ पाझरतो.. अधूनमधून काळजाला भिजवत... अस्वस्थ पाऊस बरसत राहतो.
 
- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668

जीवन रहस्यमयी आहे़  आम्ही जन्मापासून सद्यस्थितीच्या वयापर्यंत जेवढे जगलो आणि जे पाहिले त्यावर प्रकाश टाकला तर आशा, अपेक्षांचा ताळमेळ लागत नाही़  जसं आपल्या शरिरात जे बदल होतात ते आपल्याला दिसत नाहीत परंतु जाणवतात. आपण असेच पुढे वाढत असतो़ या दरम्यान, एखादा त्रास सुरू झाला की आपण डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा तो सांगतो की तुम्हाला हा आजार जडला आहे़  तुम्हाला या गोळ्या घ्याव्या लागतील, एवढ्या दिवस आराम करावा लागेल आणि तुम्ही जर असं नाही केलं तर तुमचा आजार बरा होणार नाही. तो वाढतच जाईल जो तुमच्यासाठी अत्यंत घातक आहे. येथपावेतो की तुमची दिनचर्या जर अशीच ठेवाल अन् वेळेत याचे प्रिस्क्रीप्शन घेतले नाही तर ते तुमच्या जीवावर बेतेल़ या भितीने आम्ही डॉक्टराचं म्हणणं ऐकत असतो आणि गोळ्या औषध घेत असतो़ आणि काही दिवसात आमचा आजार बरा होतो़ म्हणजेच आम्ही दुसर्‍याच्या सांगण्यावरून स्वत:त बदल केलेला असतो़ परंतु ज्यावेळी आमचं शरीर आजाराकडे वळत असतं त्यावेळी आमचं मन, शरीर आम्हाला संकेत आणि लक्षणे दाखवत असतं की तुला हे होत आहे, तू असं रहा, तू असं खा, हे घेतलं पाहिजे, हे नको घे, तरी परंतु आम्ही या दुखण्याकडे, या संकेताकडे जाणते अजानतेपणात दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागते़ परंतु, वेळेतच जेव्हा पहिली वेदना झाली, पहिल्यांदा संकेत मिळालं तेव्हाच आम्ही स्वत:त बदल केले, मनाप्रमाणे चालले तर निश्‍चितच आम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही़  पैसाही अन् वेळेही वाचतो़  यातून बोध एवढाच घ्यावा लागतो की, आम्हाला अंतरमनाचं ऐकावं लागतं त्याचं जर ऐकलं नाही तर आम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागतं़  आम्ही दुसर्‍याला मार्गदर्शन करतो की, असं राहिलं पाहिले, असं जगलं पाहिजे, परंतु, ज्यावेळी स्वत:वर वेळ येते त्यावेळेस आम्ही तसं वागत नाही़  आम्ही स्वत:त ते बदल करत नाही़  ज्यामुळे आम्हाला अतोनात नुकसान होऊन जातं़ 
    तसेच आमच्या रोजच्या दिनचर्येत आम्ही आपल्या होत असलेल्या चुकांना पांघरून घालतो. आपण ज्यावेळी कुठली चूक करत असतो त्यावेळी मनात हे चुकीचं आहे असं वाटलं की आपण त्या ठिकाणी सुधार करायला हवं मात्र तसंच आपण पुढं चलतो. नंतर मनात वारंवार त्या गोष्टी घोळत असतात. जर का आपण अशी चूक होताना तिथेच मनाला थांबविले व बरोबर गोष्टीचा आग्रह केला तर आमच्यात बदलाला वाव मिळतो. तसेच आपण प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टीने पहायला हवी. विवेक जागृत ठेवायला हवा. जेणेकरून आपण कुठलीही गोष्ट डोळे झाकून करणार नाही. मनाला वारंवार सकारात्मक गोष्टीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा. मनात वाईट गोष्ट येत असेल तर तिथेच विचार करायचे थांबावे अन् नैतिक गोष्ट मनात आणून त्यावर चालावे. आम्ही जशा दुसर्‍याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो त्याच पद्धतीने आपल्यात तसे बदल घडणे आवश्यक आहे. शेवटी आमच्या बेचैन अंतरमनावर जालीम उपाय कुरआननं सांगितला आहे. कुरआनमध्ये अल्लाहने म्हंटले आहे की, ” लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे, ही ती गोष्ट आहे जी अंतःकरणात जो विकार आहे त्यावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरिता मार्गदर्शन आणि कृपा आहे. (कुरआन ः 10ः57)
    त्यामुळे आपण एकदा संपूर्ण कुरआन समजून वाचावेे. त्यामुळे निश्‍चितच आपलं अंतरमन त्यामुळे प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. ते आपलं सुख याच मार्गदर्शनावर निहित असल्याचं ठामपणे तुम्हाला सांगेल. त्यामुळे स्वतःत बदल करायचा असेल तर अंतरमनाला काय वाटते? त्याच खाद्य काय आहे? हे आम्हाला शोधणे गरजेचे आहे. निश्‍चितच ते कुरआनमध्ये आहे.
  
- बशीर शेख

विश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी वेढला जात आहे. मग ती समस्या सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो की शैक्षणिक. त्याला कारणेही अनेक आहेत. उदा. भ्रष्टाचार, गरीबी, कुपोषण, व्यसनाधिनता. आज व्यसनाच्या आधीन युवावर्ग जात आहे. तो बुलेट ट्रेनच्या गतीने, व्यसन मग ते दारूचे असो, चरस, गांजा, तंबाखू, गुटखा, ड्रग्स, धुम्रपान या व्यसनामध्ये भरडला जात आहे. त्याला वेळीच थांबविले नाही तर आपला समाज उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. याची अनेक उदाहरणे असून, रेव्हपार्टीज याचे जीवंत उदाहरण आहे.     
    राजधानी मुंबई ते लहान-लहान खेड्यात (ग्रामीण भत्तगात) हे नशेचे वादळ उग्ररूप धारण करत आहे. अनेक कुटुंबाची राखरांगोळी होत आहे.
    दारू सर्व दुष्कृत्यांची जननी असून, ती शासनाची परवानगी असल्याशिवाय व्यवहारात आणता येत नाही. सिगारेट शरीराला धोकादायक आहे, असे पाकीटावर लिहिलेले असले तरी आज तरूण पिढी, किशोरवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत. अनेकांना जीवनात यश मिळवता आलेले नाही किंवा अपयश पचवता आले नाही. जीवनात सुख-समाधान नाही, अपेक्षा भंग, जीवनाचा झालेला गुंता, प्रयत्न न करता यशाच्या मागे मृगजळासारखा धावणारा जेव्हा आयुष्याच्या लढाइत हरतो व नशेच्या आधीन होऊन आयुष्याची अल्पावधीत वाट लावायला तयार होतो. नशेच्या आहारी गेल्यावर त्याला संस्कार व मानवतेची ओळखच राहत नाही. नातीगोती तो विसरतो. मग हे सागरात उसळणार्‍या लाटेला सामोरे जाण्याइतपत कठीण होते. मौजे खातीर मित्राच्या आग्रहास्तव, केलेल्या कृत्याच्या दलदलीत तो फसला जातो. त्याला कारणे पण आहेत. घरातील मोठ्याचे अनुकरण, आई-वडिलांचे भांडण-तंटे, पॉकेटमनीतून मिळणारा अमाप पैसा, व्यवसायात तोटा, मनासारखे यश न मिळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी तो अवैध मार्गाचा अवलंब करतो. यातून तो व्यसनात कसा अडकला हे त्याचे त्यालाच कळत नाही. मग ती दारू असो की नशेचे इंजेक्शन असो की धुम्रमापन असो! ’गुटखा’ प्रकार इतर देशात पाहायला ही मिळत नाही.
    आपण तंबाखूचे वाईट परिणाम पाहतो. तंबाखू सेवनाने दरवर्षी लाखोंचे बळी जातात. कर्करोगाच्या आहारी युवावर्ग जात आहे. तरूण पिढी संपूर्ण पोखरली जात आहे. नशेची ही ज्वलंत समस्या आज भयंकर गंभीर रूप धारण करत आहे. दारू ही पाश्‍चात्यांच्या अनुकरण  आणि फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेवन केली जात आहे. मोठ-मोठ्या पार्टीज मध्ये तरूण मद्यधुंद होतात. पण भविष्याचा कधी विचार केलेला नसतो.
    आज नशेच्या वस्तू मिळण्याची सुविधा इतकी सुलभ झाली आहे की अनेक सोयी हाकेच्या अंतरावर उपलब्ध झालेल्या आहेत. याचे दुष्परिणाम कळत असले तरी युवा पिढी नशेच्या आधीन जात आहे. 90 टक्के बलात्काराच्या घटना या नशेत केेलेल्या पाहावयास मिळतात. तरूण-तरूणी अती झाल्यानंतर आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेत आहेत. अल्कोहोल मिश्रित द्रव्य पिऊन अनेक लोक वाहन चालवून नाहक अनेकांचे प्राण घेत असल्याच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत. 
    याशिवाय, एक वेगळच व्यसन आजच्या युवा पिढीला जडले आहे. ते म्हणजे मोबाईलचा अतीवापर.त्यामुळेे निद्रानाशावर उपाय म्हणून युवावर्ग नशेच्या आहारी जात आहे. चित्रपटातील अश्‍लिल दृश्ये पाहून आलेल्या उत्तेजनेवर उपाय तो नशेतूनच शोधतो. तेंव्हा तो त्याच्या दुष्परिणामाला विसरतो. क्षणिक सुखासाठी आयुष्याची राख करतो, दारू व्यसनासाठी आग्रह करणारे, दुःखात कोणीच साथ देत नसल्यामुळे तो एकांकी जीवनाचा नाश करायला धजतो. खरच यावर गंभीरतेने विचार करायची वेळ आली आहे.
    मनात ईशभय असेल तर माणूस वाईटापासून अलिप्त राहतो. तरूण वर्गात मानसिक बळ निर्माण करून आत्मनिर्भयतेने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपले पाल्य शाळेत कोणत्या सवयींच्या मित्रासोबत आहेत यावर पाल्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
    ज्वलंत नशेची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यासाठीच जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ’नशेचा नाश देशाचा विकास’ ही नशा विरोधी मोहिम 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत नुकतीच राबवून समाजाचे लक्ष या महत्वाच्या प्रश्‍नाकडे वेधलेले आहे. यातून झालेल्या जनजागृतीतून अनेक लोकांचे भले होईल, यात शंका नाही. मोहीम जरी संपली तरी प्रश्‍न संपलेला नाही याची  सर्वांनी मिळून जाण ठेवण्याची गरज आहे. आणि नशेच्या या अजगर रूपी विळख्याला नष्ट करायचे आहे.
 
- डॉ.आयेशा पठाण
9158805927 (नांदेड)

जम्हूरियत व त़र्ज-ए- हुकूमत है जिसमें
बंदों को गिना जाता है तोला नहीं जाता

कशाही जगातील सर्वश्रेष्ठ शासन पद्धती मानले जाते जे की खरे नसल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. लोकांनी, लोकासाठी, लोकांद्वारे चालविली जाणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या आता बदललेली असून, ती पुढार्‍यांनी, पुढार्‍यांसाठी, पुढार्‍यांद्वारे चालविली जाणारी शासनपद्धती असे तिचे स्वरूप झालेले दिसत आहे.   आपल्या देशातच नव्हे तर जगातील बहुतेक देशात लोकशाहीच्या नावाखाली एक वेगळीच व्यवस्था जन्माला आलेली आहे जिच्यामध्ये चांगली माणसं निवडूणच येऊ शकत नाहीत. लोकशाहीचा सरळ संबंध विकासाशी जोडला जातो. असेही म्हटले जाते की लोकशाहीशिवाय प्रगती शक्य नाही. मात्र हे खरे नाही. अनेकांचे शोषण करून लोकशाही अस्तित्वात येते व शोषणावरच टिकून राहते हे मात्र सत्य आहे. नैतिकतेचा आणि धर्माचा त्याग केल्याशिवाय, लोकशाहीची स्थापना आणि प्रगती शक्य नाही. पश्‍चिमेने आपल्या धर्म आणि धार्मिकतेचा त्याग करूनच लोकशाहीची जोपासना केलेली आहे. धर्माला व्यक्तीगत जीवनापर्यंत सीमित करून त्याला सार्वजनिक जीवनामध्ये अनुपयुक्त ठरवूनच लोकशाहीने प्रगती केलेली आहे. गरीब लोकांना व्याजाच्या तर, कमकुवत लोकांना शक्तीच्या बळावर दाबूनच लोकशाही बळकट होत असते. अमेरिकेची लोकशाही आज ज्या मजबूत स्थितीत आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला कोट्यावधी रेड इंडियन्सचा बळी घ्यावा लागला होता. ऑस्ट्रेलियाची लोकशाही आज ज्या मजबूत स्थितीत आलेली आहे तिला या स्थितीमध्ये आणण्यासाठी लाखो ’अबोरगिनीज’ (मूळ ऑस्ट्रेलियन आदिवासींचा) बळी घ्यावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये अगदी अलिकडच्या काळापर्यंत मोठ्या हॉटेलांच्या प्रवेश द्वारांवर, ”कुत्र्यांना आणि काळ्यांना प्रवेश निषिद्ध” अशी पाटी लावल्या जात होती. कोट्यावधी काळ्यांना गुलाम बनवून अमेरिकेला नेवून, त्यांचे रक्त शोषून, अमेरिकेने आजची दैदिप्यमान अशी भौतिक प्रगती साध्य केलेली आहे. गरीबाच्या शोषणाशिवाय लोकशाहीमध्ये प्रगती शक्यच नाही. मजुरांच्या शोषणाशिवाय लोकशाहीमध्ये उद्योग बहरतच नाहीत. हे कटू मात्र सत्य आहे.
    लोकशाहीमध्ये सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. 51 टक्के अशिक्षित आणि मजूर एकीकडे आणि 49 टक्के शिक्षित डॉक्टर, वैज्ञानिक आणि इंजिनिअर दूसरीकडे असले तरी सत्ता 51 टक्के वाल्यांचीच येणार. हे लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्देव आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”ज्ञानी आणि अज्ञानी कधीच एकसारखे असू शकत नाहीत” या तत्वालाच लोकशाहीमध्ये हरताळ फासण्यात येते. आपण आजारी पडलात तर आपल्याला एमडी. डीएनबी. डॉक्टरकडेच जावे असे वाटते. आपल्याला घर बांधायचे असल्यास उत्कृष्ट आर्किटेक्ट आणि इंजिनिअरकडेच आपण जातो. आपल्या खटल्याच्या पैरवीसाठी उत्कृष्ट वकील कोण आहे याचा तपास करूनच आपण त्याच्याकडे आपली केस सोपवितो. पण देश चालविण्यासाठी आपण अशा कुठल्याही नैपुण्याची अपेक्षा करत नाही. किंबहुना लोकशाहीमध्ये तशी अपेक्षा करणे शक्यही नसते. परिणामी, चुकीची माणसे सत्तेत जातात आणि लोकशाहीच्या नावाखाली देशामध्ये भ्रष्ट व्यवस्था धष्टपुष्ट होत जाते.
    आपल्या देशात तर राजकीय पक्षांना निवडून देणार्‍या लोकांपैकी अनेक लोक हजार-पाचशे रूपये घेऊन मतदान करतात. राजकीय पक्षांना मिळणारा निधी हीच भ्रष्टाचाराची जननी आहे. उद्योगपती आणि मोठ्या व्यापार्‍यांकडून बेनामी चंदा घ्यायचा, त्यावर निवडून यायचे व शासनात आल्यावर उद्योग आणि व्यापार स्नेही धोरण राबवायचे. केवळ भाषणामध्येच शेतकरी, शेतमजूर व गरीबांचे नाव घ्यायचे. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा उदो-उदो करायचा, त्यांचे भव्य पुतळे उभे करायचे मात्र त्यांच्या शिकवणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. याकडे सर्वपक्षीय एकमत असल्याचे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. प्रत्येक समाजातील आपल्या कलाने वागण्याचे संकेत देणार्‍या मुठभर लोकांना मोठे करायचे मात्र व्यापक समाजाचे कल्याण होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंबहुना समाजामध्ये गरीबी आणि अडाणीपणा कायम राहील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे. असेच लोक सर्वपक्षीय धोरण असल्याचे दिसून येते. याच श्रीमंत धार्जिण्या धोरणामुळे आपला देश एका अभूतपूर्व अशा कोंडित सापडलेला आहे. राष्ट्राची सर्व संसाधने ज्यांच्या हाती आहेत, त्यांच्यापेक्षा ज्यांच्याकडे सीमित संसाधने आहेत, असे खाजगी लोक, खाजगी रूग्णालये, शाळा, महाविद्यालय सरकारपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कसे काय चालवू शकतात? याचे कोणालाच आश्‍चर्य वाटत नाही, याचेच आश्‍चर्य वाटते.
    काही ठराविक लोक / घराण्यासाठीच संपूर्ण शासकीय यंत्रणा राबते की काय? अशी शंका यावी इतपत लोकशाहीचे केंद्रीकरण झालेले आहे. सरकार बनविण्यामध्ये किंवा पाडण्यामध्ये जो जेवढी मोठी भूमिका बजावण्याच्या स्थितीत असेल तेवढा मोठा लाभ त्याला लोकशाहीमध्ये मिळत असतो. त्यामुळे विषमतेमध्ये कमालीची वाढ होताना दिसते. नेते अल्पावधीतच गबर होतांना दिसत असल्यामुळे त्यांच्याबद्दल आम नागरिकांच्या मनामध्ये द्वेष खदखतोय. सत्तेसाठी अर्थकारण करून सामान्यांचा बळी दिला जात आहे. सर्वसामान्यांचा राजकारणाशी संबंध पाच वर्षातून फक्त एक दिवस येतो ज्या दिवशी तो ’मतदार राजा’ असतो. समाजाच्या संसाधन विहीन लोकांपर्यंत लोकशाहीची गोमटी फळे पोहोचतच नाही, असे एकंदरित चित्र आहे.
    कोणतीही व्यवस्था तत्वतः स्विकारली की तिचे लाभ आपोआप मिळत नाहीत. त्या व्यवस्थेला रूजविण्यासाठी व्यवस्थेचे नेतृत्व करणार्‍यांना त्याग करावा लागतो. आपल्याकडे नेत्यांनी त्याग करावा, या संकल्पनेचा मृत्यू लाल बहादूर शास्त्रींच्या निधनाबरोबरच झालेला दिसतो. आता तर लाखोंनी त्याग केला तरी चालेल पण लाखोंच्या नेत्यांनी त्याग केलेला चालणार नाही, अशी एकंदरित अवस्था झालेली आहे. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देण्यात येणार्‍या मदतीमध्ये सुद्धा आपल्याकडे भ्रष्टाचार होतांना दिसतो. संवेदनहीनतेची एवढी खालची पातळी आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेने गाठलेली आहे.   
    वंचितांविषयी दया, करूणा, न्याय, बंधूभाव जोपासावा लागतो तेव्हा कुठे लोकशाही रूजते. त्यासाठी फक्त कायद्याचे राज्य आणून भागत नाही तर न्यायाचे राज्य आणावे लागते, अशी इस्लामची धारणा आहे. राजेशाही, घराणेशाही आणि लोकशाही या सगळ्या संकल्पना आजमावून झाल्या. मात्र कुठेच कल्याणकारी शासनव्यवस्था अस्तित्वात आलेली नाही. ती कशी आणता येईल, याचे उत्तर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिनामध्ये कल्याणकारी लोकशाही स्थापन करून व इस्लामचे चार पवित्र खलीफांनी ती पुढे चालवून जगाला दाखवून दिलेले आहे. जरी आज प्रत्यक्षात तशी खिलाफतीवर आधारित लोकशाही व्यवस्था 56 पैकी एकाही मुस्लिम देशात शुद्ध स्वरूपात आढळत नसली, तशी व्यवस्था देण्यात जागतिक स्तरावर मुस्लिमांना अपयश आले असले तरीही तत्वतः तीच उत्कृष्ट शासन पद्धती आहे, यात वाद नाही. तिची इमारत धर्माच्या अर्थात इस्लामच्या पायावर आधारित असल्यामुळे तिचा परिचय करून घेणे अनाठायी होणार नाही.
    पाश्‍चीमात्य लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते तर इस्लाममध्ये अल्लाह. लोकशाहीमध्ये नेते जनतेला जबाबदार असतात तर इस्लामी लोकशाहीमध्ये खलीफा अल्लाहला जबाबदार असतो.
    इस्लाममध्ये मनुष्य जन्मतःच ’स्वतंत्र’ असतो ही गोष्ट पहिल्या दोन खलीफांच्या ऐतिहासिक वक्तव्यातून साकारलेली आहे. दुसरे खलीफा हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांनी आपल्या राज्यपालांना उद्देशून म्हटले होते की, ” तुम्ही माणसांना कधीपासून गुलाम बनविले आहे. त्यांच्या मातांनी तर त्यांना स्वतंत्र जन्म दिला होता”. चौथे खलीफा हजरत अली रजि. यांचेही एक वाक्य इस्लामी इतिहासात अजरामर झाले आहे, ते म्हणतात, ” तुम्ही कोणाचे गुलाम बननू नका तुम्हाला अल्लाह ने स्वतंत्र जन्माला घातले आहे.” या दोन्ही खलीफांच्या वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की, इस्लाममध्ये माणसाला स्वातंत्र्य हे जन्मजात मिळाले आहे. म्हणजे स्वातंत्र्य हा पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
    स्वातंत्र्याच्या या व्याख्येत जीवित राहण्याचा, बोलण्याचा , संघटित होण्याचा, धर्माचा अर्थात सर्व मुलभूत अधिकार अंतर्भूत  आहेत. एवढेच नव्हे तर त्यात माहितीचा अधिकार सुद्धा सामिल आहे. म्हणूनच एक अरबी बद्दू (खेडूत) द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांना शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मस्जिदीमध्ये सर्वासमक्ष थेट प्रश्‍न विचारू शकतो की, ”सर्वांना बैतुलमाल मधून मिळालेला कपडा कमी होता तुमच्या अंगावरील नवीन सदरा त्यात होऊ शकत नव्हता. मग हा नवीन सदरा तुम्ही कसा काय शिवला?” त्याचे उत्तर खलीफांना द्यावे लागले मगच पुढचे भाषण करता आले.
    इस्लाम एक प्रतिगामी धर्म असल्याचा चुकीचा विचार काही लोकांच्या मनामध्ये खोलवर रूतून बसलेला आहे जो की चुकीचा आहे. तो कसा हे पाहणे उद्बोधक ठरेल. कुरआनमध्ये अल्लाहने स्पष्ट म्हटलेले आहे की, ”अल्लाहजवळ दीन (धर्म/ व्यवस्था) फक्त इस्लामच आहे. ज्यांना ईश्‍वरीय ग्रंथ दिले गेले त्यांनी त्यानंतरही मतभेद केले. असे तेव्हा, जेव्हा त्यांच्याकडे ज्ञान आलेले होते, त्यांनी एकमेकांविषयी असलेल्या दुराग्रहामुळे केले. जो अल्लाहच्या आयातींना नकार देईल त्याचाही हिशेेब अल्लाह लवकरच घेतल्याशिवाय राहणार नाही” (सुरे आले इमरान ः आयत नं.19). या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, व्यापक जनकल्याणासाठी जी शासन व्यवस्था आहे ती एकमेव म्हणजेच इस्लामी खिलाफत व्यवस्था आहे. तिची रचना कशी असते? ती कशी काम करते? हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. ज्यांना या विषयी अधिक माहिती हवी आहे त्यांनी मौलाना अबुल आला मौदूदी यांचे पुस्तक ’खिलाफत और मुलूकियत’ चा अभ्यास करावा. या ठिकाणी विस्तारभयामुळे त्याचा उल्लेख टाळला जात आहे.
    वरील आयत वाचल्यानंतर मुस्लिमेत्तर बांधवांचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की, खरी जनकल्याण करणारी शासन व्यवस्था फक्त इस्लामच आहे तर मुस्लिम्मेतरांचे काय? त्यासाठी मी असो स्पष्ट करू इच्छितो की, जरी अल्लाहला पसंत असणारी व्यवस्था ही इस्लामी खिलाफतीवर आधारित लोकशाही असली तरीही इस्लामी रियासतीमध्ये बिगर मुस्लिमांना राहता येत नाही, असे नाही. उलट त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची असते. अल्पसा सुरक्षा कर ज्याला ’जिझीया’ म्हणतात अदा करून प्रत्येक मुस्लिमेत्तर अल्पसंख्यांक समुदायाला सुरक्षितपणे इस्लामी रियासतीमध्ये राहता येते. एवढेच नव्हे तर ते आपल्या धर्मआचरणासाठीही स्वतंत्र असतात. यासाठी कुरआनमध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की,” जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की भूतलावरील सर्व लोक श्रद्धावंत व आज्ञाधारकच अर्थात (मुस्लिमच) असावेत तर सर्व पृथ्वीवासियांनी तशी श्रद्धा ठेवली असती. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते श्रद्धावंत (मुस्लिम) बनतील? (सुरे युनूस ः आयत नं.99).
    याचा अर्थ असा की, अल्लाहची जर अशी इच्छा असती की पृथ्वीवर फक्त मुस्लिमच असावेत दूसरे कोणी असू नयेत तर तसे करणे अल्लाहला सहज शक्य होते. परंतु, त्याने तसे यासाठी केलेले नाही की, प्रत्येक माणसाला त्याने स्वतंत्रपणे विचार करून धर्म स्विकारण्याचा अधिकार दिलेला आहे.
    दूसर्‍या ठिकाणी अधिक स्पष्टपणे अल्लाह म्हणतो की, ”धर्माच्या बाबतीत कोणावरही जोर जबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले आहे. आता ज्याने कोणी तागूत (गैर इस्लामी व्यवस्था) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने असा एक मजबूत आधार धारण केला, जो कधीही तुटणार नाही. आणि अल्लाह (ज्याचा त्याने आधार घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे. (संदर्भ ः सुरह बकरा आयत नं. 256).
    वरील आयातीवरून स्पष्ट आहे की, इस्लामी रियासतीमध्ये राहणार्‍या प्रत्येक बिगर मुस्लिम व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे धार्मिक आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच आजही लाखो मुस्लिम्मेत्तर बांधव खाडीच्या देशात राहतात, कोट्यावधी रियाल कमावितात व आपल्या देशात पाठवितात पण धर्मामुळे त्यांच्यापैकी कोणा एकाचीही मॉबलिंचिंग करून हत्या करण्यात आल्याची बातमी नाही. थोडक्यात सर्व व्यवस्था आजमावून झालेल्या आहेत. फक्त इस्लामी व्यवस्था ही आजमावण्याची शिल्लक आहे.
    भारतीय मुस्लिमांना ही संधी आहे की त्यांनी आपल्या नेक आचरण, वाणी आणि लेखनीने इस्लामच्या कल्याणकारी शिकवणीला अतिशय नम्र परंतू खंबीरपणे देशबांधवांसमोर मांडावी. शेवटी कोण किती दिवस नुकसान सहन करील? इस्लामी जीवन व्यवस्थेचा अव्हेर केल्याने होणारे व्यक्तीगत, सामाजिक आणि राष्ट्रीय नुकसान फारकाळ कोणीही सहन करू शकणार नाही. शेवटी एक ना एक दिवस प्रत्येक समजदार माणसाला इस्लामी व्यवस्थेची अपरिहार्यता मान्य करावीच लागेल. ही प्रक्रिया युरोप आणि अमेरिकेमध्ये सुरू झालेली आहे. भारतामधील  मुस्लिम हे धर्मांतरित मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या विषयी असलेला राग, द्वेष, अज्ञानता, पक्षपात यामुळे अजूनही भारतात ही प्रक्रिया वेगाने सुरू झालेली नाही. इस्लामने निषिद्ध केलेल्या गोष्टी केवळ पश्‍चिमेमध्ये मान्यता प्राप्त असल्यामुळे त्या आपल्या जीवनात लागू करून देशबांधव किती दिवस नुकसान सहन करतील? बुद्धिवादी देशबांधवांना इस्लामची सत्यता एक ना एक दिवस पटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने व सातत्याने प्रयत्न करावे लागतील एवढेच. या संदर्भात सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ” अल्लाह के दीन की पैरवी करने में, उसके अहेकाम (आदेश) पर अमल करने में, और उस दीन की रू से जो कुछ हक (सत्य) है उसे हक और जो कुछ बातिल (झूठ) है उसे बातील कहने में उन्हें कोई बाक (संकोच) नहीं होगा. किसी की मुखालिफत (विरोध), किसी की तान व तश्‍नी (व्यंग), किसीके एतराज (आक्षेप) और किसीकी फब्तीयों और आवाजों की वो परवा न करेंगे. अगर राय अम्मा (बहुमत) इस्लाम के मुखालिफ (विरूद्ध) हो और इस्लाम के तरीके पर चलने के माअना (अर्थ) अपने आपको दुनियाभर में नक्कू (एकटे पडणे) बनालेने के हों, तब भी वो उसी राह पर चलेंगे जिसे वो सच्चे दिल से हक (सत्य) जानते हों.” (संदर्भ ः तफहिमुल कुरआन खंड 2 पान क्र. 482).
    प्रसिद्ध शायर वसीम बरेलवीने म्हटलेलेच आहे, कौनसी बात कब, कहां और कैसे कही जाती है, ये सलीका हो तो हर बात सुनी जाती है. भारतीय मुस्लिमांना हाच सलीका (ढंग) आत्मसात करावा लागेल. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की अल्लाहने आम्हा भारतीय मुस्लिमांना एवढी शक्ती, सलीका द्यावा की आम्ही इस्लामची खरी ओळख देशबांधवांपर्यंत पोहोचवू शकू. आमीन.

- एम.आय.शेख
9764000737

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी आदरणीय आयशा (र.) यांनी पैगंबरांना विचारले, ‘‘हे पैगंबर (स.), उहुदच्या प्रसंगापेक्षाही भयंकर प्रसंग कधी आपण अनुभवला?’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हो, आयशा! माझ्या जीवनातील सर्वांत कठीण प्रसंग उकबा ताइफ) च्या दिवशीचा होता.’’ हा तो दिवस होता जेव्हा पैगंबर (स.) मक्कावासीयांकडून निराश होऊन  ताइफवासीयांकडे सत्याचा संदेश देण्यासाठी गेले होते. तेथील सरदार ‘अब्द या लैल’ने गुंडांना पैगंबरांच्या मागे लावले आणि त्यांनी सदुपयदेशाच्या प्रत्युत्तरात पैगंबरांवर दगडांचा वर्षाव  केला. पैगंबर (स.) रक्तबंबाळ झाले व बेशुद्ध होऊन कोसळले. मग अत्यंत निराश व दु:खी अवस्थेत तेथून परत निघाले. जेव्हा कर्नुस्सआलिब या ठिकाणी पोहचले तेव्हा दु:ख थोडे  हलके झाले. अल्लाहने प्रकोपाच्या फरिश्त्याला पैगंबरांच्या सेवेत पाठविले. तो फरिश्ता पैगंबरांना म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.)! जर तुम्ही म्हणाल तर मी अबू कुबैस आणि  जबले अहमद या दोन पर्वतांना एक दुसऱ्यावर आदळतो जेणेकरून या दोन पर्वतांमधील हे अत्याचारी लोक छिन्नविच्छिन्न होऊन नष्ट व्हावेत.’’ क्षमामूर्ती पैगंबर (स.) उत्तरले, ‘‘नाही,  कदापि नाही! मला माझे कार्य करू द्या, मला या माझ्या भावंडांना ईश-प्रकोपापासून सावध करू द्या, कदाचित अल्लाह त्यांना सद्बुद्धी देईल अथवा यांच्या संततीमधून असे लोक  उपजतील जे सत्याचा स्वीकार करतील.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
पैगंबर मुहम्मद (स.) यांची क्षमाशीलता शब्दाच्या पलीकडची आहे. तिचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ते केवळ क्षमामूर्ती होते. स्वत:वर अपकार करणाऱ्यांवर त्यांनी उपकारच  केले. विष पाजणाऱ्यांनाही त्यांनी प्रेम दिले. ठार करायला आलेल्यांना प्राणदान व दया शिकविली. ताइफवासीयांकडून पैगंबरांची झालेली दयनीय अवस्था पाहून कोणी म्हणेल की अशा  असहाय परिस्थितीत ते क्षमा न करतील तर काय? पण आता हा चक्क पर्वतराज, फरिश्ताच त्याच्या समोर उभा आहे आणि या ताइफच्या अत्याचाऱ्यांना चिरडून टाकण्याची आज्ञा  मागत आहे! तरीही पैगंबर (स.) अशा रक्तबंबाळ अवस्थेतही ताइफवासीयांना क्षमा करत आहेत. किती महान आहे ही क्षमा! या क्षमेचे फळ? तेही तेवढेच महान आहे! आज त्या  ताइफवाल्या गुंडांची, सरदारांची मुलेबाळे, संपूर्ण ताइफवासी पैगंबरांवर जीवापार प्रेम करणारे मुस्लिम आहेत. ही क्षमाशीलता अंगीकारल्याशिवाय कोणी पैगंबरांचा खरा अनुयायी होऊ  शकत नाही. समस्त मानवजातीसंबंधी निखालस प्रेम, आपुलकी असल्याशिवाय हे शक्य नाही. क्षमाशीलतेचा हा पैगंबरी गुण त्यांच्या सर्व अनुयायांनी अंगीकारल्यास निश्चितच चित्र  बदलेल.
‘‘सलाम उस पर के जिसने खूँ के प्यासों को कबाएँ दीं।
सलाम उस पर के जिसने गालियाँ खाकर दुआएँ दीं!’’

- (संकलन : डॉ. सय्यद रफीक)

(१५४) त्या दु:खानंतर मग अल्लाहने तुम्हांपैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरविली की ते पेंगू लागले.११२ पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्त्व केवळ आपल्या  स्वत:च्या फायद्याचेच होते, अल्लाहच्या बाबतीत तर्हेतर्हेचे अज्ञानपूर्ण विचार करू लागला जे संपूर्णपणे सत्याविरूद्ध होते. हे लोक आता म्हणतात, ‘‘या आदेश देण्याच्या कार्यवाहीत  आमचादेखील काही वाटा आहे?’’ यांना सांगा, ‘‘(कोणाचाही कसलाही वाटा नाही) या कामाचे सर्व अधिकार अल्लाहच्या हातात आहेत’’ वास्तविक पाहाता या लोकांनी आपल्या मनात जी  गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत. त्यांचा खरा उद्देश हा आहे की, ‘‘जर नेतृत्वाचे अधिकारांत आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो  नसतो.’’ यांना सांगा, ‘‘जर तुम्ही आपल्या घरातदेखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वत: होऊन आपल्या मृत्यू-स्थानाकडे निघून आले असते.’’ आणि हा प्रसंग  ओढवला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या मनांत लपलेले आहे, अल्लाहने त्याची परीक्षा घ्यावी आणि जे काही तुमच्या हृदयात आहे. ते साफ करून टाकावे. अल्लाह मनांची  स्थिती चांगलीच जाणतो.
(१५५) तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचे कारण असे होते की, त्यांच्या काही उणिवांमुळे शैतानने त्यांचे पाय डळमळीत केले  होते. अल्लाहने त्यांना माफ केले, अल्लाह फार क्षमाशील व सहनशील आहे.
(१५६) हे ईमानधारकांनो, काफिर (अधर्मी)प्रमाणे गोष्टी करू नका ज्यांचे आप्तेष्ट व नातेवाईक एखादे वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात (आणि तेथे एखाद्या अपघाताला बळी पडतात) तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती. अल्लाह अशा तर्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनांतील  शल्य व दु:खाचे कारण बनवून टाकतो.११३ एरवी खरे पाहता मारणारा व जीवन देणारा तर अल्लाहच आहे आणि तुमच्या सर्व कृतीचा तोच निरीक्षक आहे.
(१५७) जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाहची जी कृपा व क्षमा तुमच्या वाट्यास येईल ती त्या सर्व वस्तूपेक्षा जास्त उत्तम आहे, ज्या हे लोक जमा  करतात.
(१५८) आणि मग तुम्ही मरा अथवा मारले जा कोणत्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना एकवटून अल्लाहकडेच रुजू व्हावयाचे आहे.
(१५९) (हे पैगंबर (स.)!) ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता  तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा. मग जेव्हा  एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.
(१६०) अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत  करू शकेल? तर मग जे खरे ईमानधारक आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.
(१६१) कोणत्याही नबीचे हे काम असू शकत नाही की त्याने अपहार करावा११४ - आणि जो कोणी अपहार करील तो आपल्या अपहारासहित पुनरुत्थानाच्या दिवशी (कयामत) हजर  होईल, - मग प्रत्येक जीवाला त्याच्या कमाईचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावर काहीही जुलूम होणार नाही.


११२) हा एक असा विचित्र अनुभव होता जो त्या वेळी इस्लामी सैन्याच्या काही लोकांना आला होता. माननीय अबू तलाहा (रजि.) जे त्या लढाईत सामील होते, स्वयं वर्णन करतात की  त्या स्थितीत आमच्यावर अशी ग्लानि आच्छादित झाली होती की तलवार हातातून निसटत होती.
११३) म्हणजे या गोष्टी वास्ताविकतेवर आधारित नाहीत. सत्य तर हेच आहे की अल्लाहचा निर्णय एखाद्याच्या टाळल्याने टळत नाही. परंतु जे लोक अल्लाहवर ईमान राखत नाही  आणि सर्व काही आपल्या प्रयत्नांवर आणि उपायांवर आश्रित समजतात; त्यांच्यासाठी अशाप्रकारचे अनुमान दु:खदायी बनतात आणि ते पश्चात्ताप करू लागतात की असे न करता तसे
केले असते तर हे न घडता ते घडले असते.
११४) ज्या धनुष्याधाऱ्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी खिंडीत सुरक्षेसाठी नियुक्त केले होते, त्यांनी जेव्हा पाहिले की युद्धसंपत्ती गोळा केली जात आहे तेव्हा त्यांना वाटले की आता  सारी युद्ध संपत्ती (गनीमत) त्याच लोकांना मिळेल जे लोक त्यास गोळा करीत आहेत आणि आम्ही गनीमत वितरणाच्या वेळी त्यापासून वंचित राहू. याच कारणाने त्यांनी आपली जागा 
सोडली होती. युद्धसमाप्तीनंतर जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे परत आले तेव्हा त्यांनी त्या लोकांना बोलावून अवज्ञेचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी (सैन्याने) असे बहाणे प्रस्तुत  केले जे अतिफुटकळ होते. यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``खरे हे आहे की तुम्हाला आमच्यावर विश्वास नव्हता. तुम्ही विचार केला की आम्ही तुम्हाला धोका देऊ आणि  तुम्हाला हिस्सा देणार नाही.'' या आयतचा संकेत याचकडे आहे. अल्लाहच्या कथनाचा हा अर्थ आहे की जेव्हा तुमच्या सेनेचे कंमांडर स्वत: अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) होते आणि  सर्व त्यांच्या हातात होते. तेव्हा तुमच्या मनात ही शंका कशी आली की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातात तुमचे हित सुरक्षित राहणार नाही? काय अल्लाहच्या पैगंबरांपासून तुम्ही ही  अपेक्षा ठेवता की जो माल त्याच्या निगरानीत असेल तो ईमानदारी आणि न्यायोचित पद्धतीऐवजी दुसऱ्या पद्धतीने वितरीत होऊ शकतो?

जमाते इस्लामी हिंद च्या राज्यव्यापी नशा विरोधी अभियानाची सुरुवात दि. 02/10/2018 झाली आहे. आठवडाभर चाललेल्या या मोहीमेद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे नशापान सर्व प्रकारचा व्यसनाधिनता कशी समाज विघातक आहे याबाबत चे प्रबोधन, मार्गदर्शन,समुपदेशन व उपचार केले गेले.
    सर्व प्रकारचे व्यसन हे समाजासाठी फार घातक असल्याचे आज जनसामान्यांच्या लक्षात आलेले आहे. पण नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी काही अहवाल पाहूया.
1) भारत सरकारद्वारे संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की अमली पदार्थांच्या तस्करीत तब्बल 455% ची वाढ झालेली आहे. ही अकड़े वारी फक्त 3 वर्षाची आहे म्हणजे 2011 ते 2013 या दरम्यान अधिकार्‍यांनी 105173 टन अमली पदार्थ जप्त केले आहे 64737 न्यायलयीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
2) इकॉनोमिक टाइम्स च्या 22 जुलाई 2016 च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य मादक पदार्थ सेवनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये देशात सगळ्यात अग्रेसर राज्य आहे.
3) अमली पदार्थ सेवन करून करण्यात येणार्‍या आत्महत्या पैकी जवळजवळ 40 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत असतात.
4) इंडियन एक्सप्रेस 25 जुलै 2016 नुसार दर 96 मिनिटात एक भारतीय अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू पावतो.
5) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) ची एक रिपोर्ट सांगते व्यसनाधीनतेमुळे  होणार्‍या अकाली मृत्यूमध्ये 1 ते 5 या गुणांका मध्ये भारतीय 4 क्रमांकावर येतात.
    असे अनेक धक्कादायक रिपोर्टस आपल्याला ऑनलाईन वाचता येतील.
व्यसनां बाबतीत इस्लामी धोरण :
मदिरा व कुरआन
1) हे श्रद्धावंतांनो, ही दारु आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.  (5:90)
2) शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारु व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?  (5:91)
3) अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा, परंतु जर तुम्ही अवज्ञा केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहचविण्याची फक्त जबाबदारी होती.   (5:92)
मदिरा पैगंबरांच्या दृष्टीने
मदिरेबद्दल पवित्र कुरआनमध्ये जे काही सांगण्यात आले आहे, त्याचे स्पष्टीकरण पैगंबर मुहम्मद (स) यांच्या अनेक कथनांवरुनही होते. पैगंबरोनी सांगितले आहे, प्रत्येक नशा आणणारी मादक वस्तू ख़म्र (दारु) आहे , अशी प्रत्येक वस्तू निषिध्द आहे.
    पैगंबर सल्ल. यांनी आणखी म्हटले आहे, ’नशा आणणारे प्रत्येक पेय निषिध्द आहे आणि प्रत्येक मादक व अंमली वस्तू मी वर्ज्य करतो.’ मद्याचे दुष्परिणाम आणि तिच्यापासून होणार्‍या हानीबद्दल इस्लामच्या दृष्टिकोनाचे अनुमान केले जाऊ शकते, अल्लाहचे पैगम्बर (सल्ल.) यांनी सांगितले की, अल्लाहने धिक्काराचा वर्षाव केला आहे मद्यावर (दारुवर), ते पिणार्‍यावर, प्यायला देणार्‍यावर, त्याची विक्री करणार्‍यावर, ते खरेदी करणार्‍यावर त्याचे उत्पादन करणार्‍यावर, ज्यांच्याखातर त्याचे उत्पादन केले जाते त्यांच्यावर, त्याची वाहतूक करणार्‍यावर आणि ज्याच्याकडे ते आणले जाते त्याच्यावरही. दारुबद्दल इस्लामचा कडकपणा इतका आहे की एकदा एका माणसाने पैगंबर (सल्ल.) यांना प्रश्‍न केला,  औषधामध्ये आणि औषधी स्वरुपात दारुचा वापर करण्याची परवानगी आहे काय? तेव्हा पैगंबरांनी सांगितले,  दारु औषध नाही तर तो एक रोग आहे.’
    व्यसनाधीनता एक मानसिक रोग असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा मान्य केले आहे. त्या अनुषंगाने प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व अध्यात्म या माध्यमांबरोबर वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने सुद्धा या भस्मासुराचा मुकाबला करणे अनिवार्य झाले आहे. या अनुषंगाने व्यसन मुक्ती केंद्रांमार्फत हे आव्हान पेलण्याचे गतिमान काम महाराष्ट्रात माजी समाजकल्याण मंत्री शिवाजी मोघे साहेबांच्या कालखंडात महाराष्ट्रभरातील जिल्हानिहाय व्यसन मुक्ती केंद्रांनी हाती घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्जेदार व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा येथे आहे. येडाई व्यसनमुक्ती केंद्राद्वारे डॉक्टर संदीप तांबारे व त्यांचे सहकारी अगदी तळमळीने हे सेवा कार्य करत आहेत. त्यांच्याकडून संकलित केलेल्या माहितीची काही ठळक मुद्दे आपल्या समोर मांडत आहे :
    सर्वात आधी व्यसने जडण्याची कारणे  प्रामुख्याने दोन असतात :
1)  माणसाला उत्तेजनाची (स्टीमुलेशन) पावलो-पावली गरज पडत असते अशा वेळी मादक पदार्थांनाच बळी पडण्याची शक्यता जास्त असते
2)  सामाजिक आव्हाने पेलू न शकण्याची तीव्र भावना निर्माण होणे.
    आता व्यसनमुक्तीसाठी च्या काही प्रमुख व निवडक युक्त्या पाहूया.
1) व्यसनांना विरोध असावा पण त्या व्यसनाधीन माणसाचा तिरस्कार, टेहळणी, हेळसांड होता कामा नये कारण तो एक आजारी माणूस आहे.
2) वैद्यकीय शास्त्रात शास्त्रोक्त पद्धती व्यसनांच्या पाशातून मुक्तीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा वापर नातेवाईक व मित्रांनी केला पाहिजे.
3) प्रत्येक व्यसनाधीन माणसाच्या व्यसनमुक्तीसाठी घरातील महिला अतिशय महत्त्वाचा घटक ठरतात. कारण एका स्त्री चा बाप किंवा भाऊ किंवा पती किंवा मुलगा/मुलगी या अशा जिवलग नात्यांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. यासाठी महिलांना व्यसनमुक्तीच्या अभ्यासक्रमाचा योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
4) रुग्णाला औषध उपचाराची सुद्धा गरज असते यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात ठराविक काळासाठी रुग्णाला दाखल करावे लागते.
5) व्यसनमुक्त झालेल्या इसमाचा पुनर्वसन हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे जेणेकरून पुन्हा ती व्यक्ती व्यसनाच्या वाटेवर जाऊ नये. ते पुनर्वसन तीन पातळ्यांवर करावं लागतं. सामाजिक, पारिवारिक व आर्थिक.
    पुनर्वसनाच्या कार्यक्रमाचा पूर्ण शास्त्र व्यसनमुक्ती केंद्रात उपलब्ध असतो व तज्ज्ञ मंडळी रुग्णाच्या गरजेनुसार त्याला व परिवारातील सदस्यांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शन करत असतात. आजच्या घडीला दारु, अमली पदार्थ, वेगवेगळी औषधी, गुटखा, तंबाखू, सिगारेट व बिडी अशा अनेक प्रकारच्या व्यसनांनी समाजाला पछाडले आहे अशा परिस्थितीमध्ये सध्याचे सरकार या मुद्यावर कमालीचे उदासीन असल्याचे दिसते. म्हणून प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व उपचाराचे कार्य माणुसकीला बांधील सामाजिक संस्था व व्यसनमुक्ती केंद्रांनाच करावे लागेल व ते आपण केलेच पाहिजे.
(लेखक जमाते इस्लामी हिंद उस्मानाबादचे सदस्य आहेत.)

- सलीम बशीर मनियार
उस्मानाबाद/ 9763727300

व्यभीचार हा फौजदारी गुन्हा नाही, समलैंगिकता हा पण फौजदारी गुन्हा नाही, मग कााय विवाह फौजदारी गुन्हा आहे?
6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाला ’गुन्हेगार कृत्या’ बाहेर काढले. 27 सप्टेंबर 2018 ला, ”व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” असा ऐतिहासिक निकाल दिला. या दोन्ही निकालांनी समाजासमोर असा प्रश्‍न उभा केला आहे की, जणू विवाह करणे हाच ”फौजदारी गुन्हा” आहे. ’व्यभिचाराला गुन्हा मानणारे कलम 497 भादंवि’ घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, ”स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हक्कावर’ शिक्कामोर्तब केले आहे. आयपीसीतील कलम 497 मुळे महिलेची स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख संपुष्टात येते आणि ती नवर्‍याची मालमत्ता बनते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कलम 497 रद्द करतानाच, गुन्हेगारी दंड संहितेतील कलम 198 ही घटनाबाह्य ठरविण्यात आले आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्या.अजय खानविलकर, न्या.आर.एफ. नरीमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा या पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
    जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून, विवाहबाह्य संबंधा संदर्भातील या तरतुदीला आव्हान दिले होते. यास सरकारचा विरोध होता. सरकारचे म्हणणे होते की, व्यभिचार गुन्हाच गणला जावा अन्यथा विवाहाचे पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. 497 कलमामुळे देशातील विवाहसंस्था टिकून आहे. हे कलम काढल्यास विवाहसंस्था कमकुवत होईल, असे सरकारने सांगितले होते.
    लैंगिकता - विवाह, समलैंगिकता आणि व्यभिचार या तिन्ही कृतींमध्ये लैंगिकता हा कॉमन फॅक्टर आहे. प्रेम म्हणजे यौवन प्रेम (सेक्युअल लव्ह) आहे. जे स्त्री-पुरूषांना आकर्षणाचे आरंभिक कारण बनते आणि नंतर त्यांच्यात जवळीक निर्माण करते. करूणा म्हणजे तो आध्यात्मिक संबंध आहे जो दांपत्तीक जीवनात हळूहळू घट्ट होत जातो. यामुळेच विवाहसंस्थेस बळकटी येते. पती-पत्नी एकमेकांचे जीवलग बनतात व सुख-दुःखात सामील होतात. 
    लैंगिकता ही एक सहज प्रकृती आहे. भूख, तहान लागणे, मलमूत्र विसर्जन, याप्रमाणेच मानवामध्ये लैंगिकता ही सहज प्रवृत्ती आहे. यासाठी जगातील सर्व धर्म, जातीं आणि देशांमध्ये विवाहसंस्था अस्तित्वात आहे. असे असले तरी या ठिकाणी आपण मुख्यतः इस्लामिक विचारधारेतून याचा आढावा घेऊ.
    निकाह - इस्लामी कौटुंबिक कायद्याचा पहिला उद्देश शील व चारित्र्याचे रक्षण होय. व्यभिचाराला तो हराम ठरवितो. स्त्री आणि पुरूषांना आपल्या शरीर संबंधाची प्राकृतिक गरज ’निकाह’च्या आधीन राहून पूर्ण करण्यास भाग पाडतो. निकाहमुळे माणसाचे चारित्र्य अबाधित राहते. ते नग्नता व निर्लज्जपणापासून दूर राहतात. तसेच त्यापासून माणसांचे सांस्कृतिक बिघाडापासून रक्षण होते. म्हणूनच पवित्र कुरआनमध्ये ’निकाह’ साठी ’एहसान’ शब्द योजला गेला आहे, एहसान म्हणजे किल्लाबंदी (तटबंदी) ज्या ’स्त्री’शी निकाह केला जातो, ती ’मुहसना’ असते. म्हणजे ती त्या किल्ल्याच्या रक्षणात प्रवेश करते, जो निकाहच्या स्वरूपात तिच्या व तिच्या शिलाच्या रक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होते की, निकाहचा पहिला उद्देश्य शील व चारित्र्याचे रक्षण करणे असा आहे.
निकाहसंबंधी कुरआनमध्ये म्हटले आहे की, ”मग तुम्ही त्यांच्या पालकांच्या अनुमतीने त्यांचेशी निकाह करा आणि उचित प्रकारे त्यांचा ’महर’ अदा करा. जेणेकरून त्या मुहसना बनतील आणि उघडपणे किंवा चोरून, लपून व्यभिचार कर्म करणार्‍या होणार नाहीत.” (कुरआन, सूरह निसा, आयात-25).
    पती-पत्नींना वैवाहिक बंधनात केवळ यासाठीच बांधले जाते की, अल्लाहने निर्धारित केेलेल्या ’सीमां’च्या आत राहूनच, त्यांनी आपली नैसर्गिक कामेच्छा पूर्ण करावी. तसेच त्यांचे हे संबंध प्रेम-जिव्हाळ्यावर आधारभूत असावेत, ज्यायोगे निकाह करून संस्कृती व सभ्यतेचे जे उद्देश निगडीत आहेत त्यांनी एकत्रितपणे पार पाडावेत. त्यांच्या कौटुंबिक जीवनात त्यांना आराम, संतोष, समाधान व शांती लाभावी.
    ”आणि तुम्ही त्याच्या चिन्हांपैकीच एक आहात की, त्याने तुमच्यासाठी खुद तुमच्यामधूनच जोड निर्माण केली आहे जेणेकरून तुम्हाला त्यांचेपासून शांती, समाधान लाभावे आणि त्यानेच दोघांत प्रेम, जिव्हाळा व करूणा निर्माण केली आहे. ”(कुरआन, सूर-अर-रूम 30, आयत 21).
    निर्माणकर्त्याच्या तत्वदर्शितेची क्षमता ही आहे की, त्याने मानवाच्या एकाच जातीचे रूप बनविले नाही तर त्यास दोन जाती (लिंग) मध्ये निर्माण केले, जे मानवतेत समान आहेत. त्यांच्या निर्मितीचे मूळ एकच आहे. परंतु, दोन्ही, एकमेकांपासून भिन्न शारीरिक बनावट, भिन्न मानसिक आणि मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये तसेच भिन्न भावना व इच्छा देऊन निर्माण केले गेले. त्यांच्यामध्ये आश्‍चर्यकारक अनुकूलता ठेवली की त्यांच्यापैकी प्रत्येक, एकमेकासाठी पुरक आहेत. तो तत्वदर्शी सृष्टा या दोन्ही जातींना सुरूवातीपासून एका विशेष अनुपाताने निर्माण करीत आहे. हे स्पष्टतः पुरावा आहे की, एक तत्त्वदर्शी निर्माता आणि एकमेव निर्मात्याने त्याच्या सामर्थ्याने या सर्वांचे प्रबंध करून ठेवले आहे.
    ”जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा”(दिव्य कुरआन) अर्थात हे प्रबंध पूर्ण इराद्याने केला आहे. पुरूषाने त्याच्या नैसर्गिक इच्छा व गरजा, स्त्रीजवळ आणि स्त्रीने तिच्या कामेच्छा व गरजा पुरूषांशी भागवाव्यात, ज्यास सृष्टी निर्मात्याने एकीकडे मानवी वंशाला बाकी ठेवण्याच्या आणि दूसरीकडे मानवी संस्कृती व सभ्यतेला अस्तित्वात आणण्याचे साधन बनविले आहे. जर स्त्री-पुरूषांत ते आकर्षण ठेवले नसते, जे त्यांच्या मिलनाने प्राप्त होते तर मानवी सभ्यता व संस्कृती अस्तित्वात येण्याचा प्रश्‍नच नव्हता. शांती आणि समाधानासाठी, दोघे मिळून घरोबा करण्यास विवश बनले. यामुळेच कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली आणि याचमुळे सभ्यता आणि संस्कृती विकसीत झाली. कोण बुद्धीमान व्यक्ती विचार करू शकतो की ही महान कृती, प्रकृतीच्या आंधळ्या शक्तीनिशी, संयोगवश, अॅटोमॅटिक अस्तित्वात आली आहे? किंवा अनेकाअनेक ईश्‍वराचे हे प्रबंध आहे? हे तर एका तत्वदर्शी आणि एकमेव तत्वदर्शीच्या, तत्वदर्शीतेची स्पष्ट निशाणी आहे, स्पष्ट पुरावा आहे.
    दाम्पत्य जीवनासाठी मार्गदर्शन करताना दिव्य कुरआन आदेश देतो, ” तुमची पत्नी तुमच्यासाठी शेती आहे. जेव्हा इच्छा होईल तेव्हा तिच्याकडे जा. परंतु, भविष्याची काळजी घ्या. आणि ईश्‍वरी कोपाचे भय बाळगा आणि जाणून असा की, तुमची त्याच्याशी भेट होणारच आहे. (सूरह बकरा-2, आयत - 223). याचा भावार्थ असा की, संतती उत्पादनासाठी पुरूषाने आपल्या पत्नीकडे जावे. पण एका ठिकाणी कुरआनमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष प्राप्त करण्यासाठीही पत्नीकडे जावे. एका ठिकाणी असेही सांगितलेले आहे की, ”त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात. (सुरह बकरा, आयात 187).
    जसे पोशाख आणि शरीरामध्ये काही एक पडदा नसतो तसेच पती-पत्नीचे आपआपसातील संबंध आणि मिलाफ, एक अभिन्न गोष्ट आहे. पोशाख माणसाचे शरीर झाकते आणि बाह्यवातावरणातील दुष्परिणामांपासून त्याचे रक्षण करते. दाम्पत्याला पोशाखाची उपमा यासाठीच दिली आहे की, पती-पत्नीमधील वैवाहिक बंधन त्याच स्वरूपाचे असावे, जसे शरीर आणि पेहरावाचे असते. त्यांची मने व आत्मे एकरूप झालेली असावीत. दोघांनी एकमेकांच्या दोषांवर पांघरूण घालावे आणि शील व अब्रुवर दुष्प्रभाव टाकणार्‍या गोष्टींपासून त्यांनी एकमेकांचे रक्षण करावे. प्रेम, जिव्हाळा आणि करूणाची हीच मागणी आहे. इस्लामी दृष्टीेने दाम्पत्यासंबंधाचा तोच मूळ आत्मा आहे. एखाद्या दाम्पत्यामध्ये ही भावना नसेल तर जीवन मृतवत होईल.
    इस्लामने वैवाहिक जीवनामध्ये जे कायदे बनविले आहेत. त्यामध्ये हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवला गेला आहे. एकमेकांतील संबंधात मनाची विशालता, औदार्य ते दाखवू शकत नसतील तर नाईलाजाने एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होणे हेच अधिक उत्तम. कारण प्रेम व करूणारूपी आत्मा निघून गेल्यानंतर, दाम्पत्य संबंध एक निव्वळ ’प्रेत’च उरते. त्या प्रेताची विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी निर्माण होईल आणि कौटुंबिक जीवनाचे संपूर्ण वातावरण ’विषमय’ होईल. म्हणून यासंबंधी कुरआन आदेश देतो, पती-पत्नींनी एकमेकांपासून फारकत (विभक्त) घेतलीच, तर अल्लाह आपल्या विशाल सामर्थ्याने, प्रत्येकाला दुसर्‍यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व दृष्टा आहे.”(सू. निसा 4, आयत नं.130). विवाहा संबंधी अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. म्हणतात, ह.अब्दुल्ला बिन मसऊद (रजि.) कथन करतात, ह. मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले, ”हे तरूणांनों! जो निकाहच्या जबाबदार्‍या उचलण्याचे सामर्थ्य राखतो. त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा ’नजर’ (दृष्टी) खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो.” म्हणजे नजरेला इतस्तःत फिरण्यापासून आणि वासना शक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवितो.
    आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही. त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधुनमधून रोजा (उपवास) ठेवावा. (हदीस - बुखारी शरीफ).
    म्हणजे लज्जा हा गुण चांगूलपणा आणतो. लज्जा असा गुण आहे जो सत्कर्म आणि सदाचाराचा स्त्रोत आहे. हा गुण ज्या व्यक्तीच्या अंगी असेल तो दुष्कर्म आणि दुराचाराजवळ जाणार ही नाही उलट सत्कर्म आणि भलाईकडे प्रवृत्त होईल.
व्यभिचारासंबंधी कुरआन स्पष्ट आदेश देतो,
”व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग आहे” (सुरह बनी इस्राईल, आयत 32). व्याभिचारामध्ये समलिंगी संभोग, नग्नता, अश्‍लिलतेच्या सर्व गोष्टी येतात. व्यभिचाराच्या जवळसुद्धा फिरकू नका. हा आदेश प्रत्येक मानवासाठी आणि समस्त मानवजातीसाठी सुद्धा आहे. व्यक्तीसाठी हा आदेश म्हणजे केवळ व्यभिचार कार्यापासून दूर राहू नका तर व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टीपासून सुद्धा रहावे. समाजासाठी या आदेशानुसार त्याचे कर्तव्य ठरते की, सामाजिक जीवनात व्यभिचार, व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टी आणि व्यभिचाराच्या करणांना, कोणत्याही स्थितीत नष्ट करावे.
    सृष्टी निर्मात्याचे वरील प्रमाणे दिलेल्या आदेशाचे अवलोकन करून त्या कसोटीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन्ही ऐतिहासिक निकालांविषयी विचार केला तर त्यात खालील गोष्टी आढळून येतात.
    ’6 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ’समलिंगी संभोग’ गुन्हेगारी कृत्य ठरत नाही.’ समलिंगी संबंध निश्‍चितच निसर्गविरूद्धी आहे. सृष्टी आणि त्यातील सजीवांचा निर्माता अल्लाहने, सर्व सजीवांमध्ये नर आणि मादा निर्माण करून, वंश वाढविण्याची व्यवस्था केली आहे. स्त्री-पुरूष मिलनाने एक कुटुंब अस्तित्वात यावे व त्यायोगे एक सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी. कुटुंब व्यवथेतच सभ्यतेचे व नैतिकतेचे बाळकडू पाजले जाते. याच उद्देशासाठी स्त्री, पुरूष असे दोन जाती बनिवल्या आणि त्यात एक दुसर्‍यासाठी आकर्षण ठेवले गेले. त्यांची शारीरिक आणि मानसिक रचना दाम्पत्य उद्देशाच्या पुर्तीसाठीच केली गेली. परंतु, मनुष्य प्रकृतीविरूद्ध कार्य, समलिंगी संभोग करून, त्यावेळी ते अनेक अपराध करणारा ठरतो.
    मानव समुहाशी असा मनुष्य उघड विश्‍वासघात करतो तो स्वतःला वंशवृद्धी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी अयोग्य बनवितो. आपल्या बरोबरच दुसर्‍या एका पुरूषाचा आणि दोन स्त्रियांचे जीवन बरबाद करतो. हे कृत्य मानवी सभ्यतेच्या सीमा पार करणारे आहेत. हा उघड-उघड व्यभिचार आहे. जो अत्यंत वाईट कृत्य आहे. यासंबंधी कुरआन आणि मानसशास्त्रीय आधारांवर माननीय एम.आय. शेख यांनी शोधनमध्ये अंक 39 मध्ये एक अतिशय बोधप्रद लेख लिहिला आहे तसेच जहीर सय्यद यांनीही, समलैंगिकतेसंबंधी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. (शोधन ंक 40) म्हणून पुनरूक्ती टाळून केवळ एवढेच म्हणतो की, मानवाने प्रकृतीविरूद्ध कोणतेही कृत्य करू नये.
    27 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ” व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” यामध्ये अतिशय चिंतनीय बाब म्हणजे, ”महिलांना विवाहबंधनात राहूनही, लैंगिक स्वायतत्ता दिली पाहिजे. विवाह याचा अर्थ एकमेकांची स्वायतत्ता संपणे नाही, लैंगिक पर्याय निवडणे हा मानवी स्वातंत्र्याचा आवश्यक घटक आहे. अगदी खाजगी बाबतीत स्त्रीच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे” असे मत निकालपत्रात नोंदविले गेले आहे.
    याचा आधार घेत एका विवाहित महिलेने, तिच्या पती-व्यतिरिक्त इतर पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवणे, आणि त्यामुळे तिला गर्भधारणा झाली तर, कोण पुरूष, दुसर्‍याच्या अपत्याला, स्वतःचे अपत्य समजून ते सर्वकाही करेल? जे तो स्वतःच्या अपत्याबाबत करील. यामुळे समाजात ’हरामी’ अपत्यांची फौज तयार होईल. मानवी स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन सर्वत्र स्वैराचार फोफावेल. कुटुंबव्यवस्था नितीमान समाज, संस्कृती बनण्याचे कार्य उधळून लावले जाईल.
    भारत सरकारचे कलम 497 बद्दलचे म्हणणे अत्यंत दुरूस्त आहे पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहे. समलैंगिकतेसंबंधी जो निकाल आला, त्यानंतर देशात जो ’उन्मादी’ वातावरण तयार झाले आता या निकालानंतर त्यात तुफानी वाढ होईल. कायद्याची कडक बंधने असतानाही  स्त्री-पुरूषांचे अनैतिक संबंध बलात्कार, विनयभंग याचे प्रमाण चिंताजनक इतके आहेत या दोन्ही निकालानंतर परिस्थिती किती वेगाने बदलेल हे येणारा काळच ठरवेल. पण.. समाज सुधारक व भारत सरकाने या दोन्ही निकाल, त्याचे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना, यासंबंधी गंभीरपणे विचार करावा. अन्यथा भारतीय सभ्यता, संस्कृतीचा र्‍हास होणार? ही मात्र काळ्या दगडावरील रेषाच ठरेल.

- वकार अहमद अलीम
9987801906

एक ही धुन है के इस रात को ढलता देखूं, अपनी आँखों से सूरज को निकलता देखूं
जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशी संघटना आहे की, जिचा सरळ संपर्क देशबांधवांशी आहे. कोणत्याही कार्यक्रमात सर्व समाजाला सोबत घेण्याकडे जमाअतचा कल असतो. मुस्लिम्मेतरांकडे उदार दृष्टीने पाहण्याची जमाअतची शिकवण आहे. यासंदर्भात जमाअतचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचे विचार नक्कीच उद्बोधक ठरतील. ते म्हणतात, ”मुस्लिमांमधून साधारणतः जी आंदोलने उदयास येतात ती दोनपैकी एका कारणासाठी केली जातात. 1. इस्लामच्या एखाद्या विषयाला घेऊन. किंवा 2. मुस्लिमांच्या जीवनाशी निगडित एखाद्या विषयाला घेऊन. परंतु, आम्ही जमाअतच्या माध्यमाने समग्र इस्लामला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जमाअते इस्लामी आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये दूसरा फरक असा आहे की, दुसर्‍या कुठल्याही मुस्लिम संघटनांची आंदोलने इतर समाजाच्या संघटनांच्या आंदोलनासारखीच असतात. मात्र आम्ही ठीक त्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, जी पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठरवून दिलेली आहे.
    इतर मुस्लिम संघटनांमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला सामील करून घेतले जाते जो जन्माने मुस्लिम असेल. त्यांची अशी धारणा असते की, जो मुस्लिम वंशात जन्मला तो चारित्र्यानेही मुस्लिम असणार. परिणामतः अशा संघटनांमध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांचा शिरकाव होतो. असे लोक जे विश्‍वासू नसतात, कोणतीही जबाबदारी पेलण्यास लायक नसतात. मात्र आम्ही जमाअतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला या गृहितकावर घेत नाही की, आमुक एक जण मुस्लिम घरात जन्माला आहे म्हणून त्याचे वर्तनही इस्लामीच असेल. इस्लामचा कलमा, त्याचा अर्थ यांचा समजून उमजून स्विकार केल्यानंतर त्याच्यावर येणार्‍या जबाबदार्‍यांची चांगल्या प्रकारे जाण निर्माण झाल्यावरच आम्ही कोणत्याही व्यक्तीला जमाअतमध्ये घेतो. संघटनेत आल्यानंतरही ईमान (श्रद्धा) मध्ये टिकून राहण्यासाठी ज्या आवश्यक शर्ती आहेत त्याचे पालन त्याच्याकडून केले जाते किंवा नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. येणेप्रमाणे मुस्लिम समाजातील चांगल्या चारित्र्यातील लोकांनाच वेचून-वेचून जमाअतमध्ये घेतले जाते.  म्हणजे चांगल्या चारित्र्याचे लोकच जमाअतमध्ये येतील याकडे लक्ष दिले जाते.
    अन्य मुस्लिम संघटनांची दृष्टी भारत आणि भारतात राहणार्‍या मुस्लिम समाजापर्यंतच सीमित असते. कोणाची नजर गेलीच तरी जास्तीत जास्त -(उर्वरित लेख पान 2 वर)
 जागतिक मुस्लिम समाजांच्या प्रश्‍नापर्यंत जाते. या संघटनांना मुस्लिम समाजातील प्रश्‍नांमध्येच रस असतो. त्यांच्या उपक्रमांमध्ये असे काहीच नसते जे देशबांधवांना आकर्षित करेल. उलट कधी-कधी त्यांचे उपक्रम असे असतात की, बिगर मुस्लिमांना इस्लामकडे आकर्षित होण्यामध्ये बाधाच निर्माण होते. मात्र जमाअतमध्ये समग्र इस्लाम हाच उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याने याकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो. इस्लाम समग्र मानवजातीसाठी आहे. म्हणून आमची दृष्टी कुठल्याही विशिष्ट अशा समाज, देश किंवा त्यांच्या तात्कालीक प्रश्‍नांमध्ये गुरफटलेली नाही. उलट आमची दृष्टी समग्र मानवजाती व जगावर पसरलेली आहे. आमची अशी धारणा आहे की, मानवजातीचे प्रश्‍न हे आमचे प्रश्‍न आहेत. कुरआन आणि हदीसमध्ये त्या प्रत्येक प्रश्‍नाचे समाधान आहे व तेच समाधान आम्ही सर्वांसमक्ष ठेवतो. त्यातच सर्वांचे यश व कल्याण नीहित आहे. आमच्या या अजेंड्यामुळे मला विश्‍वास आहे की, फक्त मुस्लिमांमधीलच नव्हे तर मुस्लिम्मेतरांमधील सद्प्रवृत्तीचे लोक सुद्धा जमाअते इस्लामीकडे आकर्षित होतील.” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 8-9).
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मानवतावादी दृष्टीकोण कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ती शिकवण म्हणजे,
1.    ” लोकहो! आम्ही तुम्हाला एक पुरूष व एक स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले. जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकपणे अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान (ईशपरायण) आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात ः आयत नं.13).
2.    ”ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मळ पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्‍याचशा निर्मितींवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.” (सुरह बनी इसराईल आयत नं. 70)
    कुरआनच्या वरील दोन्ही संदेशांमध्ये जात आणि धर्मावरून कुठलाही फरक केलेला नाही. समतेची एवढी मोठी शिकवण दुसरी असू शकत नाही. हीच शिकवण जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. हीच शिकवण परिणामकारकरित्या जगासमोर मांडण्याचे कार्य जमाअत गेल्या 77 वर्षांपासून करत आहे.
    जगण्याचा हा स्वच्छ, सरळ आणि तणावरहित मार्ग त्या लोकांना मुळीच आवडत नाही ज्यांचे व्यवसाय हरामचे आहेत. दारू, व्याज, जुगार, अश्‍लिलता म्हणजेच समाजाला नुकसान पोहोचविणार्‍या वस्तूंच्या निर्मितीत जो वर्ग गुंतलेला आहे त्याला जमाअतचे हे कार्य आवडत नाही, हे ओघानेच आले. दुर्दैवाने सत्तेत आणि मीडियात याच वर्गाचे प्राबल्य आहे.  म्हणूनच जमाअतचा संदेश खरा असूनही बहुसंख्य लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचत नाही. उलट माध्यमांमधून इस्लाम विरूद्धचा प्रचार सातत्याने व आक्रमक पद्धतीने होत असल्यामुळे देशबांधवांमध्ये मुख्यत्वाने इस्लाम व पर्यायाने मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज खोलवर रूजलेले आहेत.
    या दुष्प्रचाराच्या वाईट परिणामापासून देशबांधवांना वाचवून त्यांच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्याचे मोठे आवाहन जमाअत समोर आहे. त्यासाठी जमाअतच्या सदस्यांना अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत.
वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान म्हणजे काय?
एक सफ मे खडे हो गए महेमूद व अयाज
न कोई बंदा रहा न कोई बंदानवाज
    जमाअते इस्लामी हिंद वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान या संकल्पनेवर ठामपणे विश्‍वास ठेवते. अरबी भाषेमध्ये ’वहदत’ या शब्दाचा अर्थ ’एक’ असा आहे आणि ’इलाह’ म्हणजे पूजनीय. येणेप्रमाणे वहदत-ए-इलाह म्हणजे अल्लाह एक होय व तोच पूजनीय आहे, या विश्‍वाचा निर्माता आहे, शासक व मालक आहे. म्हणून त्याचे आदेश सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव मुकाट्याने मानतात. सूर्य, चंद्र, तारे लाखों वर्षांपासून अल्लाहने ठरवून दिलेल्या कक्षेमध्ये ठरवून दिलेले काम करत आहेत. निसर्गाची दिनचर्या ठरवून दिल्याप्रमाणे चालू आहे. कोणी अल्लाहला मानो किंवा न मानो, अल्लाहची कृपा सर्वांवर सारखीच आहे. ही संकल्पना म्हणजे वहदत-ए-इलाह.
    आता पाहूया, वहदत-ए-इन्सान म्हणजे काय? आपण आताच पाहिले आहे की, सुरह हुजरात आयत नं. 13 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, समस्त मानव समाज हा एकाच आई-वडिलांचा विस्तार आहे. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या जवळ-जवळ आठ अब्ज मानवांचे आई-वडिल एकच आहेत. म्हणजे समस्त मानवसमाज हा एकच आहे. या सत्याचा ठाम विश्‍वास मनाशी बाळगणे म्हणजेच वहदत-ए-इन्सान.
    सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. सर्वांचे अवयव सारखेच आहेत. सर्वांचे रक्त सर्वांना अर्थात रक्त गटाप्रमाणे चालते. फक्त वर्ण व चेहरेपट्टी वेगवेगळी आहे व तीही या कारणाने आहे की त्यांना ओळखता यावे. थोडक्यात जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीचा रक्ताचा नातेवाईक आहे. समस्त मानवजात रक्ताच्या नात्याने बांधलेली आहे. वहदत-ए-इन्सान या संकल्पनेबद्दल बोलताना जमाअतचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदाभेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.
    मतभेद कोणामध्ये होत नाहीत? एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्‍चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही.
    आपल्याला आश्‍चर्य वाटायला हवे की, असे विचार आणि दृष्टीकोण माणसांमध्ये कसे काय उपजले? अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला? माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले? नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली? साधारण बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकतो की, काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीयांमध्ये तशी भिन्नता तर आढळून येत नाही जशी बैल आणि घोड्यामध्ये, बकरी आणि उंटामध्ये आढळून येते व ज्या कारणांने त्यांना वेगवेगळे समजता येईल. हे काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीय हे सर्व एकाच हाडामांसाचे बनले आहेत. शरीर, बुद्धी, मन, अवयव व त्यांच्या क्षमता सर्व सारख्याच आहेत. या सर्वांची मानसिकता, भावना एक सारख्याच आहेत. यांची बलस्थाने व यांच्यातील त्रुटी यासुद्धा एकसारख्याच आहेत. यांच्यात अशी कोणतीही गोष्ट वेगळी नाही की ज्या आधारे आपण यांना ’वेगळे’ घोषित करू शकू. यांच्यातील सर्व गोष्टी समान आहेत. म्हणूनच ते सर्व एक आहेत. येथे कुरआनचा तो आदेश लागू होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत. मग ते काळे असो का गोरे, अरबी असो का अरबेत्तर त्यांच्यातील वंश, कबिले आणि राष्ट्रीयत्वात्वर आधारित विभाजन फक्त त्यांना ओळखण्यापुरते आहे त्यापेक्षा अधिक नाही.
    या दोन मुलभूत शिकवणी वहदत-ए-इलाह आणि वहदत-ए-इन्सानचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगात अनेक प्रेषित आले. इस्लाम कुठलाही नवीन धर्म नाही. कुरआन हा नवीन ग्रंथ नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही अशी नवीन शिकवण जगाला दिलेली नाही, जी की, त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांपेक्षा वेगळी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची शिकवण ही ईतर प्रेषितांची शिकवणच आहे. फक्त त्याचे आधुनिक नाव इस्लाम आहे. आणि या शिकवणीच्या शेवटच्या ग्रंथाचे नाव कुरआन आहे. जगातील प्रत्येक बुद्धीवादी ज्याने हा ग्रंथ समजून वाचला तो या सत्यावर ठाम आहे की, हा ग्रंथ माणसां-माणसांमध्ये भेद करत नाही. समस्त मानवजात एक आहे. हाच दृष्टीकोण जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांसंबंधी आहे. (संदर्भ ः रूदाद भाग क्र. 5 पान क्र. 21 - 22 वर आधारित).
 
- एम.आय. शेख - 9764000737

- मुंबई (नाजीम खान) 
देशात नशेच्या आहारी जावून लाखो लोक आपले जीवन उध्वस्त करीत आहेत. त्यामुळे नशायुक्त पदार्थांवर बंदी आणणे व लोकांचे मन परिवर्तन करून देश नशामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी केले.
    जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे ’नशेचा नाश देशाचा विकास’ या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी अंधेरी वेस्ट मधील मेअर हॉल मुंबई येथे 2 ऑक्टोबर रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर विशेष आमंत्रित म्हणून ब्रह्मकुमार तपस्विनी, नशाबंदी महाराष्ट्राचे अमोल मडामे, मौ.अतिकुर्रहमान कास्मी, अब्दुल हफिज भाटकर, मुंबई शहर जेआयएचचे सचिव हुमायूं होते. महेफूज सिद्दीकी जोगेश्‍वरी यांनी कुरआन पठण करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
    पुढे बोलताना तौफिक असलम खान म्हणाले, नशा आणणार्‍या पदार्थांवर उदा. दारू, गांजा, तंबाखू इत्यादीवर शासकीय प्रतिबंध लादून काहीही साध्य होणार नाही, असे प्रयोग मागेही झालेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही याची मागणी करणार नाही. आम्ही या पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी करूच पण याशिवाय, लोकांनी स्वयंस्फूर्तीने या गोष्टींचा त्याग करावा, यासाठी या अभियाना दरम्यान जनजागृती करण्याचा आमचा माणस आहे व हे काम फक्त मोहिमेपुरते राहणार नसून पुढेही सुरूच राहील. नशाबंदीसाठी या क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांचीही मदत घेण्यात येईल. आमचा खरा उद्देश लोकांचे मन परिवर्तन करणे आहे. प्रास्ताविकात मजहर फारूख म्हणाले, नशेचा नाश केल्याशिवाय देशाचा खरा विकास होणार नाही. आपला देश हा जगातील सर्वात तरूण देश आहे. युरोपमध्ये माणसे उतारवयाकडे झुकलेली आहेत. आमची अशी धारणा आहे की, केवळ विकासाचे नारे देवून विकास होणार नाही. विकास करण्यासाठी नशामुक्त असणारी, सुदृढ आरोग्य असणारी, काम करणारी युवा पिढी आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल, अन्यथा नाही. या मोहिमेत जमाअत महाराष्ट्रात समग्र नशाबंदी करण्याचा आग्रह शासनाकडे करेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन जमाअततर्फे देण्यात येईल. राज्यात कुठे-कुठे दारू आणि तत्सम नशा आणणार्‍या पदार्थांची विक्री किती प्रमाणात आणि कशी होते, यासंबंधीचीही माहिती आम्ही मोहिमे दरम्यान, गोळा करणार आहोत. ही माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या शितकालीन अधिवेशनामध्ये शासनाला सादर करून संपूर्ण नशाबंदीची मागणी करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रात टोबॅको फ्री झोन निर्माण करण्यासाठीही सरकारकडे मागणी करण्यात येईल. आज शाळा, महाविद्यालयांच्या अगदी जवळपास तंबाखू आणि गुटख्यांच्या पुढ्या सर्रास उपलब्ध होतात. हे सगळं बंद व्हायला पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या आसपास तंबाखू विकणार्‍यांना परवानगी देण्यात येवू नये, तसेच खाण्याचीही परवानगी नसावी. याची मागणी जमात करणार आहे. तंबाखूला नशा आणणारा पदार्थ म्हणून आपण मान्यता देत नाही म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार अगदी सहज होत आहे आणि याला तरूण बळी पडतात.
    मंचावरील उपस्थितांची समयोचित भाषणेही झाली. आभार हुमायू यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. 

औरंगाबाद (प्रतिनिधी) 
- महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांची एकत्रित मोट बांधून अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तनाची हाक मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दिली. औरंगाबादच्या इतिहासातील मोठ्या सभांपैकी एक  सभा होण्याचा मानही आघाडीला मिळाला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत रखरखत्या उन्हात नागरिकांनी 7 तास  सभास्थळी ठाण मांडून दोघांनाही शांतपणे ऐकले आणि शपथ घेतली की आम्ही मतदानही याच वंचित बहुजन आघाडीला करणार.
    यावेळी खा. असदोद्दीन ओवेसी म्हणाले, गेल्या 70 वर्षापासून जनतेची लूट सुरू आहे. अन्याय संपवायची वेळ आता आली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. जे संविधान आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यांच्या अनुयांयाना आज अन्याय का सहन करावा लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातून उतराई करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांना संसदेत पाठवायचे आहे. त्यांच्याच नेतृत्वात ही आघाडी निवडणूक लढवेल. त्यांनी डॉ.आंबेडकर यांना महात्मा गांधीपेक्षा श्रेष्ठ नेता म्हटले. राज्यातील समस्त बांधवांच्या कल्याणासाठी हे परिवर्तन करायलाच हवे, असे आवाहन करीत ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्याचे सरकार दिवाळखोरांचे सरकार आहे. वंचित समाज मागच्या दोन निवडणुकांपासून प्रक्रियेतून बाहेर पडला आहे. ओबीसींना आवाहन करतो की, त्यांनी वंचित आघाडीलाच मदत करावी. द्वेषाच्या राजकारणाला मुठमाती दिली पाहिजे. नक्षलवाद्यांवर कारवाई करता मग सनातन्यांवर का कारवाई करत नाही? असा सवाल करीत त्यांनी भाजप, काँग्रेस - राष्ट्रवादीवर टिका केली. ते पुढे म्हणाले, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वतः खात नाहीत; पण दुसर्‍याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतकर्‍यांना हमीभाव दिला जात नाही. यासाठी त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. येत्या 8 दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर नव्याने आंदोलने छेडले जाईल, असा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला. यावेळी लाखोंचा जनसमुदाय टाळ्यांनी प्रोत्साहन देत होता.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही स्त्रीयांशी फक्त त्यांचे सौंदर्य पाहूनच विवाह करू नका, शक्य आहे की त्यांचे सौंदर्य त्यांचा विनाश करील. तद्वतच केवळ त्यांची संपत्ती पाहूनही  त्यांच्याशी विवाह करू नका. शक्य आहे की संपत्तीमुळे त्यांनी तुमची अवज्ञा करावी. खासकरून जेव्हा तुमच्या व तिच्या आर्थिक परिस्थितीत खूप तफावत असेल तेव्हा अवज्ञेची दाट  शक्यता असते. – तुम्ही (दीन) चारित्र्यालाच प्राधान्य देऊन त्यांच्याशी विवाह करा. एक काळीसावळी, मोलमजुरी करणारी मात्र चारित्र्यसंपन्न स्त्री (अल्लाहच्या नजरेत त्या रूपवान व  धनाढ्य स्त्रीपेक्षा) बेहतर आहे.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा म्हटले की, ‘‘सहसा चार बाबींचा विचार करून स्त्रीयांशी विवाह केला जातो.
(१) तिची संपत्ती पाहून,
(२) तिचे खानदान, कुळाचे श्रेष्ठत्व पाहून,
(३) तिचे सौंदर्य पाहून आणि
(४) तिची (दीनदारी) चारित्र्यसंपन्नता पाहून.
तुम्ही हे सदैव ध्यानात ठेवा की तिच्या चारित्र्यसंपन्नतेलाच प्राधान्य द्यावे.’’
(इब्ने माजा, दारमी, अबू दाऊद)

निरुपण
विवाह करताना बहुतांशी लोक फक्त सौंदर्य आणि संपत्तीलाच प्राधान्य देतात. आचारविचार, चारित्र्यसंपन्नतेला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. वैवाहिक जीवनाच्या खNया सुखसमाधानासाठी सौंदर्यापेक्षा व संपत्तीपेक्षा चारित्र्यसंपन्नताच अधिक महत्त्वाची आहे. मानवी जीवनात शीलाला जे महत्त्व आहे ते सौंदर्याला व संपत्तीला कदापि नाही. म्हणूनच आपल्या जीवनाच्या साथीदाराला निवडताना चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देण्यासंबंधी पैगंबरांनी उपदेश केला आहे. हा उपदेश केवळ मुलगी पसंत करतानाच नव्हे तर मुलगा पसंत  करतानाही महत्त्वाचा आहे. निव्वळ सौंदर्य व संपत्ती पाहून करण्यात आलेले विवाह अनेकदा मोकळीस येतात आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
आचारविचारांना, चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देणे हेच माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. जे लोक शीलतेकडे दुर्लक्ष करून केवळ संपत्ती व सौंदर्याच्या मागे धावतात त्यांना खरे  वैवाहिक सुखसमाधान कदापि लाभू शकत नाही. सद्य अनुभव असा आहे की लोक म्हणतात आमच्या मुलाला स्थळ पाहा. ‘अट काय?’ अशी विचारणा केल्यावर त्यांची पहिली डिमांड असते की मुलगी गोरीपान, सुंदर हवी! आणि वर हुंडा भरपूर हवा. खरे पाहता, या दोन्ही गोष्टी चारित्र्यासमोर गौण आहेत. हुंडा घेणे देणे तर चक्क हराम आहे. पैगंबरांच्या उपरोक्त  उपदेशाचा सारांश हा आहे की एकाधी काळीसावळी मात्र शीलवान, चारित्र्यसंपन्न मुलगी एखाद्या रूपवान, गोऱ्यापान, धनाढ्य व चंगळवादी विचारसरणीच्या मुलीपेक्षा केव्हाही बेहतर आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

(१४६) ज्यांच्यासह मिळून असंख्य ईशभक्तांनी युद्ध केले. अल्लाहच्या मार्गात जी संकटे त्यांच्यावर कोसळली त्यामुळे ते हताश झाले नाहीत, त्यांनी दुबळेपणा दाखविला नाही. ते  (असत्यापुढे) नतमस्तक झाले नाहीत.१०७ अशाच संयमी लोकांना अल्लाह पसंत करतो.
(१४७) त्यांची प्रार्थना केवळ हीच होती, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या चुका आणि उणिवांबद्दल क्षमा कर, आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचे जे काही उल्लंघन झाले असेल ते माफ  कर, आमचे पाय स्थिर कर आणि काफिर (विरोधक)विरूद्ध आम्हाला मदत कर.’’
(१४८) सरतेशेवटी अल्लाहने त्यांना जगातील लाभदेखील दिले व त्याहून श्रेष्ठतर, परलोकांतील लाभदेखील प्रदान केले. अल्लाहला असेच सत्कर्मी लोक पसंत आहेत.
(१४९) हे ईमानधारकांनो, जर तुम्ही त्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागला ज्यांनी कुफ्र (अधर्म)च्या मार्गाचा अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत मागे नेतील१०८ आणि तुम्ही  असफल व्हाल.
(१५०) (त्यांच्या गोष्टी चूक आहेत) सत्य असे आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा व साहाय्यक आहे आणि तो सर्वोत्तम साहाय्य करणारा आहे.
(१५१) लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यांच्या मनावर दरारा बसवू यासाठी की त्यांनी अल्लाहबरोबर अशांना ईशत्वात भागीदार ठरविले आहे ज्यांच्या  भागीदार असण्यासंबंधी अल्लाहने कोणतीही सनद उतरविली नाही. त्यांचे शेवटचे ठिकाण जहन्नम (नरक) आहे आणि फारच वाईट आहे ते ठिकाण जे त्या अत्याचाऱ्यांच्या नशिबी येणार  आहे.
(१५२) अल्लाहने (समर्थन व साहाय्याचे)जे वचन तुम्हाला दिले होते ते तर त्याने पूर्ण केले. सुरवातीला त्याच्या हुकुमाने तुम्हीच त्यांना ठार करीत होता. पण जेव्हा तुम्ही दुबळेपणा  दाखविला व आपल्या कार्यात आपापसांत मतभेद दाखविले, आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहने तुम्हाला दाखविली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता (म्हणजे युद्धातील लुटीचा माल)  तेव्हा तुम्ही आपल्या सरदाराच्या आज्ञेविरूद्ध गेला. - कारण की तुम्हापैकी काहीजण  इहलोकाचे इच्छुक होते आणि काहीजण मरणोत्तर जीवनाची इच्छा बाळगून होते. - तेव्हा  अल्लाहने तुम्हाला अधर्मियांच्या विरोधांत पराभूत केले की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी आणि सत्य असे आहे की असे असूनसुद्धा अल्लाहने तुम्हाला माफच केले१०९ कारण  ईमानधारकांवर अल्लाह फार कृपादृष्टी ठेवतो.
(१५३) आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढीत होता, कोणाकडे वळून पाहण्याचे भानदेखील तुम्हाला राहिले नव्हते, आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारीत होता.११०  तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लाहने असा दिला की तुम्हाला दु:खापाठोपाठ दु:ख दिले१११ म्हणजे भविष्यकाळांत तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून  निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे निराश होऊ नये, अल्लाह तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे.


१०७) म्हणजे आपश्या संख्येतील कमी व युद्ध सामग्रीची कमतरता आणि दुसरीकडे शत्रुची अधिक संख्या आणि शक्ती पाहून यांनी असत्यवादीपुढे आपले हात टेकले नाहीत.
१०९) म्हणजे तुम्ही चुक अशी केली होती की अल्लाहने तुम्हाला क्षमा केली नसती तर तुमचे उन्मूलन निश्चित झाले असते. ही अल्लाहची कृपा व त्याचे समर्थन होते आणि त्याची  मदतच होती ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर काबू प्राप्त् केल्यानंतर बेहोश बनले आणि अकारण स्वत: परास्त होऊन निघून गेले.
१०८) म्हणजे ज्या द्रोही स्थितीतून (सत्य नाकारण्याच्या) तुम्ही बाहेर निघून आलात त्याच स्थितीत हे तुम्हाला पुन्हा नेतील. दांभिक आणि यहुदी, उहुद युद्धातील पराजयानंतर मुस्लिम  लोकांत हा विचार पसरविण्याचा प्रयत्न करीत होते की मुहम्मद (स.) खरोखरच अल्लाहचे पैगंबर असते तर ते पराजित झालेच नसते. हा तर एक सर्व सामान्य आपल्यासारखा माणूस  आहे. हे सामान्य माणूसच आहेत, आज जय तर उद्या पराजय! अल्लाहच्या ज्या समर्थनाचा व मदतीचा त्यानी तुम्हाला विश्वास दाखवला आहे, ते केवळ एक ढोंग आहे.
११०) उहुद युद्धात मुस्लिमांवर अचानक जेव्हा दोन्ही बाजूने हल्ला झाला आणि ते विखुरले गेले तर काहीजण मदीनाकडे पळत सुटले आणि काही उहुद पर्वतावर चढले परंतु पैगंबर  मुहम्मद (स.) एक इंचसुद्धा आपल्या जागेवरून हलले नाहीत. शत्रुंची चोहोबाजूने गर्दी होती, दहाबारा माणसांची मूठभर जमात (समुदाय) जवळ होती; तरीसुद्धा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) या नाजुक स्थितीत पर्वताप्रमाणे आपल्या जागी अडिग राहिले आणि पळणाऱ्यांना आवाज देत होते, ``इलैया इबादल्लाही, इलैया इबादल्लाह'' (अल्लाहच्या दासांनो माझ्याकडे या, अल्लाहच्या दासांनो, माझ्याकडे या.'')
१११) दु:ख पराजित होण्याचा, दु:ख या बातमीचे (अफवा) पसरविण्याचा की पैगंबर मुहम्मद (स.) शहीद झाले, दु:ख आपले सैन्य मोठ्या प्रमाणात ठार केले जाण्याचा आणि जखमींच!  दु:ख याचे की आता तर घरसुद्धा सुरक्षित नाही. तीन हजार शत्रू ज्यांची संख्या मदीना शहराच्या लोकसंख्येपेक्षासुद्धा जास्त आहे. शत्रुचे सैन्य पराजित सैन्याला पायदळी तुडवित वस्तीत  घुसतील आणि सर्वांना ठार मारतील.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget