मुहर्रम : दुःखाचे नव्हे तर प्रेरणेचे स्त्रोत
कत्ल-ए-हुसैन अस्ल में मर्ग-ए-यजीद है
इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद
मुहर्रम संबंधी स्पष्ट माहिती फार कमी लोकांना आहे. अनेक लोकांना असेही वाटते की हा एक सण आहे. पंजे, डोले, ताजीये, सवाऱ्या आणि त्यांच्या मिरवणुका इत्यादीवरून असा समज होणे साहजिकच आहे. 19 जुलै 2023 पासून सुरू झालेल्या मोहर्रमच्या महिन्याबरोबरच सन 1445 हिजरीची देखील सुरूवात झालेली आहे. यानिमित्त मोहर्रम म्हणजे काय? या संबंधीची थोडक्यात आढावा घेतल्यास वावगे ठरणार नाही.
ज्या दिवशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मक्का शहरापासून मदिना शहराकडे हिजरत म्हणजे प्रस्थान केले त्या दिवसांपासून इस्लाममध्ये हिजरी कालगणनेची सुरूवात झाली. त्या कालगणनेचा पहिला महिना मुहर्रम, दुसरा - सफर, तीसरा - रबिउल अव्वल, चौथा- रबिउस्सानी, पाचवा - जमादिल अव्वल, सहावा - जमादिलस्सानी, सातवा - रज्जब, आठवा - शाबान, नववा - रमजान, दहावा - शव्वाल, अकरावा- जिलकदाह, बारावा - जिलहिज्जा.
दि. 10 ऑ्नटोबर 680 इ.स. अर्थात 10 मोहर्रम सन 61 हिजरी रोजी इराकच्या करबला या शहरामध्ये इस्लामी इतिहासामधील एक महत्त्वाची घटना घडली होती. त्या घटनेची आठवण म्हणून शिया मुस्लिम समुदाय हा मुहर्रमला दुःखाचा महिना म्हणून साजरा करतो. त्यांचे पाहून सुन्नी मुस्लिमांमध्येही ही परंपरा रूजली होती. मात्र जसेजसे इस्लामी इतिहासाचे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत गेले तसे-तसे सुन्नी मुस्लिमांच्या लक्षात आले की मुहर्रम साजरा करणे, डोले, पंजे, ताजीये, सवाऱ्या बसविणे, 10 मुहर्रमला मिरवणूक काढणे, त्यात स्वतःला जखमी करून घेणे हे प्रकार जाहीलियत (अज्ञानीपणाचेच) नसून इस्लामविरोधीही आहे.
कहे दो गम-ए-हुसैन मनानेवालों से
मोमीन कभी शोहदा का मातम नहीं करते
है इश्क अपनी जान से ज्यादा आले रसूल से
यूं सरे आम हम उनका तमाशा नहीं करते
रोएं वो जो मुन्कर हैं शहादते हुसैन के
हम जिंदा व जावीद का मातम नहीं करते
इस्लाम एक नैसर्गिक जीवनशैली आहे, ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही साजरे करण्याच्या मर्यादा शरियतने ठरवून दिलेल्या आहेत. मानसशास्त्राद्वारे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की अतिव दुःख व अत्याधिक आनंद या दोन्ही गोष्टी माणसासाठी धोकादायक असतात. म्हणून इस्लाम, जीवनातील प्रत्येक घटना, मग ती कितीही आनंदाची असो किंवा कितीही दुःखाची असो संतुलित पद्धतीने सामोरे जाण्याची शिकवण देतो. आता हे संतुलन कसे साधायचे? तर या संबंधी या ठिकाणी चर्चा करणे शक्य नाही. वाचकांना विनंती आहे की, या संबंधीच्या सविस्तर मार्गदर्शनासाठी कुरआनचा अभ्यास करावा. कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि माणसाने कसे जीवन जगावे याचे सविस्तर मार्गदर्शन त्यात केलेले आहे. एवढेच नव्हे तर त्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्यक्षात जीवन जगून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी (प्रात्याक्षिक) दाखवून दिलेले आहे. थोडक्यात कुरआन आणि सुन्नाह यांच्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे इस्लाम. इस्लाममध्ये अत्याधिक आनंद आणि अतिव दुःख यामध्ये स्वतःवरचे नियंत्रण सोडून देण्यास थारा नाही.
भारतात मुहर्रमची सुरूवात
समस्त इस्लामी जगतामध्ये मुहर्रमच्या 9 आणि 10 तारखेला रोजे ठेवले जातात, विशेष प्रार्थना केली जाते. ताजियादारी ही शुद्ध भारतीय परंपरा आहे. तिचा इस्लामशी काही संबंध नाही. ही परंपरा तैमूरलंगच्या काळापासून (1370-1405) सुरू झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा भारतीय उपमहाद्विप (भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार) मध्ये सुरू आहे. आश्चर्य म्हणजे तैमूरलंगच्या देशात उजबेकिस्तानमध्ये ही परंपरा नाही. तैमूरलंगचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1405 ला झाला. मात्र त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा तैमूर व तुघलक व त्यानंतर मुघलांनी ही परंपरा सामाजिक सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून चालू ठेवली ती आजतागायत चालू आहे.
हुसैन रजि. यांच्या शहादतची पार्श्वभूमी
मंजिलें खुद ही पुकारें तुझको हर आगाज से
इतनी उंची कर तू अपनी वुसअते परवाज को
लोकशाहीचा आत्मा नागरिकांच्या अभिव्यक्तिच्या स्वातंत्र्यात लपलेला आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या काळात व त्यानंतर चारही पवित्र खलिफांच्या काळात अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार सर्व नागरिकांना उपलब्ध होता. खलीफा कोणीही असो, तो निवडलेला असला पाहिजे हा दंडक होता. त्याला प्रशासकीय प्रमुख या नात्याने सर्व अधिकार होते. परंतु तो दोन गोष्टींचा पाबंद होता. एक - इस्लामी कायदा, दोन - मजलिसे शुराचा सल्ला. पाश्चिमात्य लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. इस्लामी लोकशाहीमध्ये अल्लाह सार्वभौम असतो. कुठल्याही देशाचे संविधान त्या देशाचे लोक तयार करतात. इस्लामचा संविधान स्वतः ईश्वराने तयार केलेला आहे. देशाचा संविधान देशाच्या जनतेला समर्पित असतो. इस्लामचा संविधान (कुरआन) संपूर्ण मानवतेला समर्पित आहे.
चार पवित्र खलीफांची नावे खालीलप्रमाणे - 1. हजरत अबुबकर रजि. 2. हजरत उमर रजि. 3. हजरत उस्मान रजि. 4. हजरत अली रजि. यांच्यानंतर हजरत हसन रजि. हे काही दिवसांसाठी खलीफा बनले. परंतु हजरत अमीर मुआविया रजि. यांच्या खलीफा बनण्याच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे नागरिकांमध्ये रक्तपात होईल, असा अंदाज आल्याने त्यांनी स्वतः खिलाफतीचा त्याग केला. तद्नंतर हजरत अमीर मुआविया रजि. यांनी तलवारीच्या बळावर स्वतःला खलीफा घोषित केले व त्यांनी आपल्या कार्यकाळात मजलिसे शुराला सुद्धा बाजूला केले. येणेप्रमाणे पवित्र खलीफांचा काळ संपला आणि बादशाहीचा काळ सुरू झाला. हजरत अमीर मुआविया रजि. यांनी 20 वर्षे शासन केले. या काळात त्यांनी राजधानी मदिना शहरातून हलवून कुफा (इराक) येथे स्थलांतरित केली. त्यांनी आपल्या हयातीतच जोडतोड करून आपला अपात्र मुलगा यजीद (इसवी सन 680 ते 684) याची निवड केली. यापूर्वी कुठल्याही खलीफाने आपल्या मुलाला खलीफा म्हणून निवडलेले नव्हते. येणेप्रमाणे ही दूसरी वाईट परंपरा त्यांच्या काळात सुरू झाली.
करबलाची घटना
सब्र ऐसा की जालीम हैरान हो जाए
हिंमत ऐसी के जुल्म का इम्तेहान हो जाए
यजीदच्या निवडीचा खुला विरोध मुस्लिमांकडून सुरू झाला. जनतेने हजरत अली रजि. यांचे सुपूत्र हजरत हुसैन रजि. यांना खलीफा नेमण्यासाठी आंदोलन सुरू केले. कुफा शहरातूनही लोकांनी हजरत हुसैन यांना बोलावले. त्यांनी आश्वासन दिले की यजीदच्या विरूद्ध आम्ही आपल्यासोबत उभे राहू. आपण येथे यावे आणि या जुलमी बादशाहाला हटवावे. या निमंत्रणावरून हजरत हुसैन रजि. यांनी आपल्या खानदानातील 72 लोकांना घेऊन कुफाकडे प्रस्थान केले. त्यांच्यासोबत महिला आणि मुलं सुद्धा होती. कुफावाल्यांनी हजरत हुसैन यांना निमंत्रण दिल्याच्या बातमीचा सुगावा यजीदला लागला, तेव्हा त्याने संबंधित लोकांना धमकावले. त्यामुळे कुफाचे लोक आपल्या आश्वासनापासून फिरले.
हजरत हुसैन रजि. यांनी आपला एक प्रतिनिधी मुस्लिम बिन अकील रजि. यांना यजीदकडे दूत म्हणून पुढे पाठविले होते. यजीदने त्यांची भरदरबारात हत्या केली. एव्हाना हजरत हुसैन रजि. यांना कुफावाल्यांनी माघार घेतल्याची व यजीदने मुस्लिम बिन अकील रजि. यांची हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माघारी फिरण्याची शक्यताही मावळली होती. फुरात नदीच्या किनारी करबला नावाच्या स्थानावर त्यांनी डेरा टाकला होता. तेव्हा यजीदच्या एका लष्करी कमांडरने ज्याचे नाव इब्ने जियाद होते. चार हजार सैन्यानिशी या 72 लोकांना घेरले व जुल्मी बादशाहा यजीद याचे समर्थन करून त्याच्या दरबारी मंत्री बनण्याची पेशकश केली. परंतु प्रेषित सल्ल. यांचे सख्खे नातू व हजरत अली रजि. सारख्या इस्लामी लष्कराच्या शूर कमांडरचे सुपूत्र हुसैन रजि. असे व्यक्ती मुळीच नव्हते जे जीवाच्या भितीने जुलमी बादशाहाला शरण जातील. त्यांनी इब्ने जियाद याला नकार कळवला. तेव्हा इब्ने जियाद याने त्यांना युद्धाचे आव्हान केले. जे की त्यांनी स्विकारले.
इकडे 72 लोक आणि तिकडे 4 हजार सैनिक. खऱ्या अर्थाने हे एक विषम युद्ध होते तरीसुद्धा हजरत हुसैन रजि. यांनी हे विषम युद्ध लढले. त्यांच्यासोबत असलेले सर्व पुरूष शहीद झाले, फक्त त्यांचे एक सुपूत्र जैनुल आबेदीन वाचले. कारण ते आजारी असल्यामुळे युद्धात सहभागी होऊ शकले नव्हते. इब्ने जियाद याने हजरत हुसैन रजि. यांचे शीर धडापासून वेगळे करून ते यजीदकडे दमीश्क (दमास्कस) येथे पाठवून दिले आणि हे युद्ध संपले. करबलाची ही घटना अत्यंत संतापजनक होती, ज्याची तीव्र प्रतिक्रिया इस्लामी जगतात उमटली. मक्का आणि मदिना सहीत साऱ्या अरबस्थानामध्ये हाहाकार माजला. परिणामी, हजरत अब्दुल्लाह बिन जुबेर रजि. यांच्या नेतृत्वात हजारो लोकांनी उठाव केला. हा उठाव चिरडण्यासाठी यजीदने मदिना येथे आपले लष्कर पाठविले. शहरात प्रचंड रक्तपात घडवून आणला. मोठी लूटमार केली. परंतु या सर्वांमधून निर्माण झालेल्या तणावामुळे यजीदचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र त्याच्या खान्दानातील कुठल्याही व्यक्तीने पुढे येवून खलीफा बनण्याचे धाडस केले नाही. यजीदच्या मुलाला खलीफा बनविण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. परंतु त्याने स्वतःच माघार घेतली आणि जनतेनी हजरत अब्दुल्लाह बिन जुबैर रजि. यांना आपला खलीफा निवडला.
करबलाच्या घटनेपासून कोणता संदेश मिळतो?
करबलाच्या या घटनेमधून प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांना एक संदेश मिळाला की, अत्याचाराच्या पुढे गुडघे टेकणे इस्लामला मान्य नाही. जर जीवाच्या भितीने नवासा-ए-रसूल हजरत हुसैन रजि. यजीदला (अल्लाह क्षमा करो) शरण गेले असते आणि त्याला आपला खलीफा स्वीकार करून मंत्रिपद मिळविले असते तर जगासमोर हा चुकीचा संदेश गेला असता की, मुसलमान हे अत्याचारासमोर नमते घेतात. हजरत हुसैन रजि. यांनी आपला पराजय डोळ्यासमोर दिसत असतांनासुद्धा सत्यासाठी इब्ने जियाद याच्याशी युद्ध केले. विजय डोळ्यासमोर दिसत असताना युद्ध करणे वेगळे पण पराजय डोळ्यासमोर दिसत असताना युद्ध करण्यासाठी फार मोठे धाडस लागते. त्यांनी हे धाडस केले म्हणून आज प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला गर्वाने असे म्हणता येते की, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद. त्यांनी आपले सर्वस्व त्यागले. कुठलाही तह केला नाही. या घटनेमुळे मुस्लिमांना सतत प्रेरणा मिळत राहते. म्हणूनच माझ्या नजरेमध्ये या घटनेचे दुःख व्यक्त करून रडणे, छाती बडवून घेणे, स्वतःला जखमी करून घेणे योग्य नसून उलट या घटनेपासून प्रेरणा घेणे अपेक्षित आहे. इस्लामी इतिहासामध्ये बदरचे युद्ध आणि करबलाचे युद्ध या दोन अशा घटना आहेत की, मुस्लिम समाजाला कितीही मरगळ आली असली तरी ती मरगळ झटकून पुनःश्च भरारी घेण्यासाठी या दोन घटनांची उजळणी करणे पुरेसे आहे.
गुरैज कश्मकसे जिंदगी मर्दों की
अगर शिकस्त नहीं है तो और क्या है शिकस्त
- एम. आय. शेख