अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (स) आणि त्यांच्या पुर्वी अल्लाहने ज्या ज्या पैगंबरांची नियुक्ती जगभरात केली होती, त्या सर्व पैगंबरांनी आपापल्या प्रदेशात कोणती मोहीम राबवली? त्यांनी असे कोणते वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले? ज्यामुळे ’माणसांमधील सर्वश्रेष्ठ समूह’ हा सर्वोच्च सन्मानाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवला गेला. त्यांचे ध्येय काय होते? याविषयी पवित्र कुरआनमध्ये विश्व निर्मात्याने म्हटले आहे,
लकद् अर्-सल्-ना रुसुलना बिल्-बय्यिनाति व अन्जल्-ना मअहुमुल् किता-ब वल्-मीजा-न लियकुमुन्नासु बिल्-किस्ति, व अन्-जल्-नल् हदी-द फीहि बअ्सुन शदीदुंव् व मनाफिउ लिन्नासि व लियअ्-लमल्लाहु मंय्-यन्सुरुहू व रुसुलहू बिल्-गय्-बि, इन्नल्ला-ह कविय्युन अजीजुन.
अनुवाद :- निश्चितच आम्ही आपल्या पैगंबरांना स्पष्ट प्रमाण आणि सूचनांसह पाठवले आणि त्यांच्यासोबत ग्रंथ व तराजू अवतरित केले जेणेकरून लोक न्यायाच्या बाजूने उभे राहावेत, आणि आम्ही लोखंड अवतरित केले ज्यामध्ये प्रचंड कठोरता आहे आणि ते लोकांसाठी विविध प्रकारे लाभदायी आहे, हे सर्व तुम्हाला यासाठी देण्यात आले की अल्लाह त्या लोकांना वेगळे करू इच्छितो जे न पाहता अल्लाह व त्याच्या पैगंबरांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात, निश्चितच अल्लाह मोठा बलवान व दबदबा राखणारा आहे. ( 57 हदीद : 25 )
मौलाना सय्यद अबुल् अअ्’ला मौदूदी (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो) यांनी या आयतीच्या स्पष्टीकरणात लिहिले आहे की,
या आयतीमध्ये पैगंबरांनी केलेल्या कार्याचे सार सांगितले गेले आहे, जे नीट समजून घेतले पाहिजे. यात म्हटले गेले आहे की, जगभरात अल्लाहकडून आलेले सर्व पैगंबर तीन गोष्टी घेऊन आले होते.
1) बय्यिनात :- म्हणजे स्पष्ट प्रमाण, जे हे स्पष्ट करत होते की ते खरोखर अल्लाहचे पैगंबर आहेत, देखावा निर्माण करणारी माणसे नाहीत. ते जे बोलत आहेत तेच सत्य आहे आणि ज्या गोष्टींना ते खोटे म्हणत आहेत त्या गोष्टी वास्तविकत: असत्यच आहेत. हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे स्पष्ट व पुरेसे युक्तिवाद होते. त्यांनी मार्गदर्शनात कोणत्याही शंकेला जागा ठेवली नाही. श्रद्धा, नैतिकता, उपासना व व्यवहार इत्यादींच्या बाबतीत सरळ व सन्मार्ग कोणता जो लोकांनी पाळला पाहिजे आणि कोणते मार्ग चुकीचे आहेत जे टाळले पाहिजेत हे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले होते.
2) ग्रंथ :- ज्यामध्ये सन्मार्गावर चालण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व शिकवणी लिहीलेल्या होत्या, जेणेकरून लोकांनी मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी त्याकडे वळावे.
3) तराजू :- म्हणजे सत्य असत्याची ती कसोटी जी तराजूप्रमाणे मोजून दाखवते की आचार-विचार, नैतिकता व व्यवहारातील वेगवेगळ्या टोकांच्या भुमिकांमध्ये न्यायोचित गोष्ट कोणती आहे.
या तीन गोष्टींसह पैगंबरांना ज्या उद्देशाने विविध प्रदेशात पाठवले गेले होते तो उद्देश हा होता की, माणसांचे वर्तन आणि त्यांची जीवन व्यवस्था ही वैयक्तिक आणि सामूहिकरित्या न्यायावर प्रस्थापित व्हावी. एकीकडे प्रत्येक माणसाने ईश्वराचे हक्क, स्वत:चे हक्क आणि ज्या ज्या माणसांशी त्याचा संबंध येतो त्या सर्व लोकांचे हक्क जाणून घ्यावेत आणि त्यासंबंधीची आपली कर्तव्ये पूर्ण न्यायाने पार पाडावीत. दुसरीकडे सामूहिक जीवनव्यवस्था अशा तत्त्वांवर उभी राहावी की समाजात कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला जागा राहू नये, सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूचे कमीअधिक होण्यापासून रक्षण व्हावे, सामूहिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समतोल प्रस्थापित व्हावा आणि समाजातील सर्व घटकांना न्यायपूर्वक त्यांचे हक्क मिळावेत व त्यांनीही आपली कर्तव्ये पार पाडावीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, वैयक्तिक आणि सामाजिक न्याय हे सर्व पैगंबरांचे ध्येय होते. त्यांना प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात न्याय प्रस्थापित करायचा होता, जेणेकरून माणसाला त्याची धारणा, त्याचे मन, चारित्र्य, वर्तन आणि त्याच्या कामात समतोल साधता यावा. याबरोबर त्यांना मानव समाजाची संपूर्ण व्यवस्थाही न्यायावर प्रस्थापित करायची होती जेणेकरून व्यक्ती आणि समाज हे दोघेही प्रतिकार करण्याऐवजी आध्यात्मिक, नैतिक आणि भौतिक कल्याणासाठी एकमेकांना मदत करू शकतील. पैगंबरांच्या कार्याचे वर्णन केल्यानंतर लगेच हे म्हटले गेले आहे की, आम्ही लोखंड अवतरित केले ज्यामध्ये प्रचंड कठोरता आहे आणि ते लोकांसाठी विविध प्रकारे लाभदायी आहे हे म्हणणे सहजपणे सूचित करते की येथे लोखंड म्हणजे राजकीय आणि युद्धशक्ती आहे. सांगण्याचा मुद्दा काय? तर अल्लाहने आपल्या पैगंबरांना न्याय प्रस्थापित करण्यासाठी फक्त योजना देऊन पाठवले नाही, तर ते व्यवहारात अंमलात आणण्याचा प्रयत्न करणे हादेखील त्यांच्या मिशनचा एक भाग होता. यासाठी ती शक्ती प्राप्त करावी लागते जी खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था प्रस्थापित करू शकते, त्यात व्यत्यय आणणाऱ्यांचा विरोध मोडून काढू शकते आणि त्यांना शिक्षा देऊ शकते.
( अनुवाद: तफ्हीमुल्-कुरआन ऊर्दू
खंड 5 - पृष्ठ 321 ते 323 )
येथे दोन गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. एक तर युद्ध या विषयासंबंधी इतके गैरसमज पसरलेले आहेत की सुशिक्षित लोकही नकळत त्यांना बळी पडतात. एका मर्यादित लेखात ते सर्व गैरसमज दूर करणे शक्य नाही. त्यासाठी सविस्तर अभ्यासाची गरज आहे. दुसरे, येथे वाचकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, या पैगंबरीय कार्यात अल्लाहला लोकांची मदत का हवी आहे? या प्रश्नाचेही उत्तर मौलाना मौदूदी (र) यांच्या स्पष्टीकरणात मिळते. ते लिहितात की, अल्लाहला लोकांच्या मदतीची गरज या कारणास्तव नाही की तो कमकुवत आहे किंवा तो आपल्या सामर्थ्याने हे काम करू शकत नाही, बिलकुल नाही. त्याने तर माणसाची परीक्षा घेण्यासाठी ही पद्धत अवलंबली आहे आणि या परीक्षेत उत्तीर्ण होऊनच माणूस आपल्या प्रगतीच्या आणि कल्याणाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. अल्लाहने ठरवले तर तो आपल्या एका इशाऱ्याने सर्व ईशद्रोहींना मात देऊ शकतो आणि त्यांच्यावर आपल्या पैगंबरांना विजय आणि वर्चस्वही मिळवून देऊ शकतो, हे करण्यास तो पूर्णपणे समर्थ आहे, पण त्यात पैगंबरांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांची काय कमाल असेल? ज्यासाठी ते बक्षिसास पात्र ठरावेत? म्हणूनच अल्लाहने हे कार्य आपल्या जबरदस्त सामर्थ्याने करण्याऐवजी आपल्या पैगंबरांना स्पष्ट प्रमाण, ग्रंथ आणि तराजू देऊन, त्यांना माणसांमध्ये पाठवण्याची पद्धत अवलंबली. लोकांना न्यायाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि अन्याय व अत्याचारापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यासाठी अल्लाहने सर्व पैगंबरांची नेमणूक केली. हे आवाहन किंवा हा ईश-संदेश स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार अल्लाहने मानवजातीला दिला. मग ज्यांनी हे मान्य केले, त्यांना आवाहन केले की, चला, ही न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मला आणि माझ्या पैगंबरांना सहकार्य करा आणि दडपशाही व अन्यायी व्यवस्था बाकी ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर लढा द्या. अशा प्रकारे अल्लाह हे पाहू इच्छितो की माणसांपैकी न्याय्य गोष्टींना नाकारणारे कोण आहेत आणि कोण अन्यायकारक गोष्टी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते कोण आहेत जे न्याय्य गोष्टींना मान्य केल्यानंतर त्याचे समर्थन करण्याऐवजी आणि त्याकरिता लढा देण्याऐवजी पळवाटा शोधतात आणि कोण आहेत ते नशीबवान! जे अदृश्य ईश्वरासाठी, जगात सत्याचे अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि या संघर्षात आपल्या मालमत्तेची आणि आपल्या जीवांची कुर्बानी देतात. जे या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांच्यासाठीच भविष्यात यशाची दारे उघडतील.
( अनुवाद: तफ्हीमुल्-कुरआन ऊर्दू
खंड 5 - पृष्ठ 323 )
पवित्र कुरआनची ही महत्वपूर्ण आयत, व्यक्ती आणि समाजाला योग्य दिशा दाखवते आणि माणसाच्या जीवनाचे ध्येय ठरवते. प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन सफल आणि यशस्वी करण्यासाठी या आयतीमध्ये उल्लेखित ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यश प्राप्त करायचे असेल तर ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःला विचारावे की मी कोण आहे? या जगात मला काय करायचे आहे? कुठे पोहचायचे आहे? काय मिळवायचे आहे? हे लवकरात लवकर ठरवणे अत्यावश्यक आहे, कारण मृत्यू केव्हा येईल आणि माणसाची परीक्षा कधी संपेल हे सांगता येत नाही. मग ध्येय निश्चित केल्यानंतर त्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करणे हेही आवश्यक आहे. या मार्गात यशस्वी होण्यासाठी निश्चितच अल्लाहची मदत मिळेल आणि या कार्यात अनेकांची साथही मिळेल. त्यासाठी पवित्र कुरआन आणि आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांचे जीवन चरित्र वाचावे लागेल. ज्यांमध्ये प्रत्येक क्षेत्राशी संबंधित परिपूर्ण मार्गदर्शन आहे. हा अभ्यास करताना वेळप्रसंगी जाणकारांचीही मदद घ्यावी लागते. समृद्ध, सकारात्मक आणि परिपूर्ण आयुष्य जगता यावे या हेतूने एक अभ्यास म्हणून ही लेखमालिका लिहिली गेली आहे. या मालिकेचा अंतिम भाग इन्शाल्लाह पुढील आठवड्यात प्रकाशित होईल. या लेखांचा फायदा लेखकाबरोबर वाचकांनाही नक्कीच होईल ही आशा आहे.
....................... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.