रमजान परिचय या आजच्या लेखात आपण रमजानविषयी माहिती पाहणार आहोत. कारण माझ्या सर्व धर्मीय बंधू-भगिनींच्या मनात रमजान विषयी काही प्रश्न असतात. त्यांना वाटतं की रमजान म्हणजे रोजा, उपाशी राहणे व संध्याकाळी विविध पदार्थ खाणे. तर एवढाच काय तो मर्यादित अर्थ त्यांना माहीत असतो तर त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हा रमजानचा लेख लिहिलेला आहे.
1- रमजानचा मूळ उद्देश काय आहे? रमजानचा मूळ उद्देश आहे ’तक़वा’. तक़वा म्हणजे काय तर ईशभय, पापभीरुता माणसांमध्ये निर्माण करणे. तकवा काय आहे याच उत्तर देताना हदीसमध्ये सांगितलं गेलं की जेव्हा तुम्ही काटेरी रस्त्यातून चालता तेव्हा आपले कपडे कसे सांभाळून-सांभाळून चालता तसेच या जगात वावरताना पापांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला असच सांभाळून चालावे लागेल. काय आहे ना मनुष्य हा कमजोर मनाचा आहे. म्हणजे या जगातील मोहमायेत गुरफटून तो पाप करतो. पाप करतो म्हणण्यापेक्षा त्याच्या हातून पाप घडते.
उदा: खोटे बोलणे... सर्वांना माहिती आहे की ही वाईट गोष्ट आहे तरी आपण खोटे बोलतो, का बोलतो? कधी नाइलाज म्हणून, कधी स्वार्थासाठी कधी वेळ मारून नेण्यासाठी इ.पण आपल्याला माहीत आहे ना की याच्यामुळे स्वतःचे आणि समोरच्याचेही नुकसान होणार आहे, तरीही आपण खोटे बोलतो. मनाला माहीत असतं की हे चुकीचं आहे. कारण मनुष्य हा फितरत वर म्हणजे निरागस जन्माला घातला गेलेला आहे. या जगात येऊन तो वाईट गोष्टी शिकतो. त्याची ही फितरत कुठेतरी दबलेली असते. होते काय तर रोजामुळे ही चांगली फितरत बाहेर येते आणि मनातील नकारात्मकता बाहेर काढायला मदत होते. म्हणजे एखादं भांड काळवंडलं की आपण साबणाने त्याला स्वच्छ करतो. मनाचं असं नाहीये ना... मनाला स्वच्छ व निर्मळ करण्यासाठी कोणताही साबण नाही तर ते स्वच्छ करण्यासाठी आत्मशुद्धीकरण आवश्यक आहे, ते ’रोजा’ने साध्य होतं.
तर आता हे रोजांनी कसं काय शक्य आहे? कारण रोजा तर पोटाचा असतो, उपाशी राहण्याचा असतो, मग तो आत्म्याची ताकद कशी काय बरं वाढवतो? तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं शरीर जे आहे ते दोन घटकांनी मिळून बनलेलं आहे, एक बाह्य शरीर - जे आपल्याला दृष्टीस पडतं ते आणि दुसरं-जो मूळ आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे आत्मा. कारण मृत्यूपश्चात हा आत्माच ईश्वराकडे जाणार आहे आणि त्याच्याशीच त्याच्या कर्माचा सवाल-जवाब होणार आहे. तर शरीराचे लाड आपण खूप पुरवतो. त्याला अन्न, पाणी, ऐश, आराम सगळं देतो, उलट आवश्यकतेपेक्षा जास्तच देतो. आणि त्याच्यामुळे काय होतं आत्म्याकडे लक्ष द्यायचं राहून जातं. आत्म्याचं खाद्य काय आहे तर त्याला ज्या ईश्वराणे निर्माण केले त्याचे आदेश पाळणं, त्याची उपासना करणे आणि ह्या गोष्टी जेव्हा आत्म्याला मिळत नाहीत तेव्हा तो तकव्यापासून दूर होत जातो. रमजानमध्ये काय करतो तर श्रद्धावंत आत्म्याकडे जास्त लक्ष देतो, त्याला त्याचे खाद्य पुरवतो. शरीराला तीन गोष्टींची खूप आवड असते-
1-जास्त खाणे
2- जास्त शारीरिक सुख
3- जास्त झोप व आराम
रोजा या गोष्टींवर बंधन आणतो. खरे पाहता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाईट नाहीत, ईश्वराने यांना हलाल केलेलं आहे. पण रमजानमध्ये रोजाधारकांसाठी ह्या गोष्टी वर्ज्य असतात.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, दिवसभर तो अन्न व पाणी घेत नाही, त्याला शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत तसेच प्रार्थना जास्त असल्यामुळे आणि जेवण नसल्यामुळे त्याच्या झोपण्यावर, आरामावर आपोआपच बंधन येतं. तर काय होतं आता या गोष्टी हलाल असून सुद्धा तो त्याच्यावर संयम राखतो आणि जर हलाल गोष्टीपासून तो संयम राखण्यात सफल झाला तर हा त्याचा संयम जो आहे तो हरामपासून देखील दूर राहण्यात त्याच्या कामी येतो. म्हणजे त्याचं मनोधैर्य आपोआपच वाढतं. मग ज्या वाईट गोष्टी सोडणं व चांगल्या गोष्टी आत्मसात करणं त्याला एरवी जमत न्हवतं ते तो आता रोजाच्या मनोबलामुळे साध्य करू शकतो.
रमजान महिन्याचे महत्त्व काय आहे तर रमजान महिन्यामध्ये एक रात्र आहे जिला ’लैलतुलकद्र’ असं म्हटले जाते. या रात्रीमध्ये पवित्र कुरआनग्रंथ अल्लाहने स्वर्गातून आपले देवदूत जिब्राईलमार्फत खाली उतरवला. आणि नंतर 23 वर्षं देवदूत जिब्राईल अलै.या कुरआनचे श्लोक विविध प्रसंगी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यापर्यंत पोहचवत गेले. तर कुरआन हा ग्रंथ रमजानमध्ये उतरल्यामुळेच या महिन्याचे खूप जास्त महत्त्व आहे. महत्त्वाचे म्हणजे कुरआन हा केवळ मुसलमानांसाठीचा ग्रंथ नव्हे तर तो सर्व मानवजातीसाठी आहे. कुरआनमध्ये प्रबोधन करताना अल्लाह संबोधतो की ’या अय्युहन्नास’ म्हणजे हे तमाम लोकहो, फक्त मुस्लिम न्हवे.
कुरआन आपल्याला जीवन जगण्याची पद्धत शिकवतो. कुरआन व हदीसमध्ये व्यवस्थित व परिपूर्ण अशी सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, आध्यात्मिक व्यवस्था असे सर्वच क्षेत्रांत जीवन जगण्याचे परिपूर्ण नियम सांगितले आहेत. जर प्रत्येक माणसाने यावर आचरण केले तर जगातील सर्व समस्या दूर होतील. किंबहुना जगात समस्या आहेतच यामुळे की माणूस कुरआनच्या शिकवणीपासून दूर गेला आहे. त्यामुळे रमजान महिन्यांमध्ये प्रार्थनेद्वारे माणसाला पुन्हा कुरआनच्या जवळ केले जाते. रमजानमध्ये कुरआन पठण, कुरआन अध्ययनावर जोर दिला जातो. नेहमी असणाऱ्या ज्या पाच फर्ज (अनिवार्य) व्यतिरिक्त तरावीहची अतिरिक्त नमाज अदा केली जाते. त्यामध्ये कुरआन पठण व त्याचा खुलासा सांगितला जातो. त्यामुळे मुसलमान पुन्हा कुरआन संस्मरण करतो, अंमलात आणतो. तसेच या ’ लैलतुल कद्र’ नामक रात्रीमध्ये मुस्लिम अल्लाहकडे आपल्या कळत-नकळत झालेल्या गुन्ह्याची खूप माफी मागतो, प्रायश्चित करतो. त्याची ही विनवणी अल्लाह ऐकतो, त्याचे पाप क्षमून टाकतो, अट फक्त एकच असते की तो गुन्हा त्याने पुन्हा पुन्हा करू नये. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत राहावे. इतर माणसांना त्रास देऊ नये.
तसेच ही रात्र रमजान महिन्यात नक्की कधी आहे हे अल्लाहने उघड केलेले नाही. हदीसींद्वारे ही शेवटच्या दहा दिवसांतील विषम रात्र असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मुसलमान पूर्ण रमजानभर दुआ व अस्तग़फार करतोच पण शेवटच्या या पाच रात्रींमध्ये जागून जास्त प्रार्थना करून जास्त माफी मागतो. मन पवित्र पवित्र करत जातो.
आता आपण रमजानमधील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे जकात. एक असते आपले अल्लाहप्रति कर्तव्य व दुसरे आपले इतर माणसांप्रती कर्तव्य. म्हणजे पुण्य कर्म फक्त नमाज अदा करणे किंवा तसबीहच्या माळा जपणे इथपर्यंत मर्यादित असू शकत नाही तर ते पूर्ण मानवजातीचे भले करणारे असावे. आणि जकात हा पूर्ण मानवजातीचे भले करणारा अल्लाहचा एक फर्ज म्हणजे अनिवार्य-बंधनकारक आदेश आहे.
काय आहे हा जकातचा आदेश? तर प्रत्येक मुसलमानाने वर्षभर कमावलेल्या पैशांमधून शिल्लक राहिलेल्या वर्षभराच्या रकमेवर त्याच्याकडे असलेल्या बँक बॅलन्स, सोने नाणे, चांदी इ.वर 2.5% जकात द्यावी. म्हणजे तेवढी रक्कम कुरआनमध्ये सांगितल्याप्रमाणे दान करावी. ज्या इसमाकडे मग ती स्त्री असो की पुरुष, साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन्न तोळे चांदी असेल किंवा या वजनाच्या रकमेएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असेल त्याने ही जकात देणे बंधनकारक असते. तसेच हे काम तो रमजान किंवा इतर महिन्यातही करू शकतो.
आजच्या स्थितीला आपण पाहाल की भारताची अर्थव्यवस्था खूप विषम झाली आहे. श्रीमंत जास्त श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब जास्त गरीब होत चालला आहे.शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्याचे कारणही व्याजावर आधारित कर्जपद्धती आहे. हे व्याज घेणेदेणे ही इस्लाममध्ये हराम आहे, तो वेगळा मुद्दा आहे. तो आपण नंतर इतर एखाद्या भागात पाहू. इथे महत्त्वाचे हे की आपण जे जकातबद्दल बोलतोय ती अडीच टक्के जकात जर प्रत्येकाने व्यवस्थितपणे गरजूंना दिली तर ही विषमतेची दरी भरण्यास मदत होते. गरिबांच्या अन्न, वस्त्र, निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांना छोटेमोठे उद्योग सुरु करून देणे व इतर अनेक स्वरूपात ही ज़कात कामी येते व मानवजातीचे भले होते. गरीब श्रीमंत दरी कमी होते. पैसा एकाच वर्गाकडे जमून राहत नाही.
तसेच मुसलमानाने फक्त हे अडीच टक्के जकात देऊन थांबायचे नाही तर अल्लाह सांगतो की तुम्ही जकात व्यतिरिक्त सुद्धा इतर दान करत राहा ज्याला ’सदका’ म्हणले जाते आणि त्याच्या काही मर्यादा नसतात, ते प्रत्येक मुस्लिमाच्या स्वेच्छेने कितीही असू शकते आणि वेगवेगळ्या स्वरूपांत असू शकते. म्हणजे एखाद्याला चांगला सल्ला देणे याला सुद्धा सदका म्हणले गेले आहे.
यानंतर आपण रोजाचे वैज्ञानिक फायदे पाहू या- वैज्ञानिक दृष्टिकोनातून रोजामुळे बरेच शारीरिक व मानसिक फायदे होतात. माणसाची पचनसंस्था ही सतत कार्यरत असते. तिला कधीच आराम मिळत नाही. आपण झोपलो तरी पचनाचे कार्य सुरूच असते. रोजामध्ये जवळपास 12 ते 14 तास अन्न व पाणी ग्रहण न केल्याने पचनसंस्था सुधारते, तिची कार्यक्षमता वाढते. चुकीची आहारपद्धती ही आजकल सर्वांचीच समस्या बनली आहे. त्यामुळे शरीरात चरबी साचू लागते. 14 तास उपाशी राहिल्याने शरीराला लागणारी ऊर्जा शरीर ही चरबी वितळवून तेथून प्राप्त करते. त्यामुळे काही अंशी वजन कमी होते जो सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. चरबीच्या गाठी ज्या बारीक गाठी असतात ज्या रक्तवाहिन्यांत चिटकून पडलेल्या असतात. उपाशी राहिल्याने ऊर्जेसाठी त्या काही प्रमाणात शोषल्या जातात व त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. संशोधनातून हेही आढळून आले आहे की, शरीरात जर काही कॅन्सर पेशींची वाढ झालेली असेल तर उपाशी राहिल्याने त्याची वाढ थांबते आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो. या सर्व प्रक्रियांमधून एकंदरीतच शरीर डिटॉक्सिफाय होते म्हणजे विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर फेकली जातात.
रोजामध्ये भांडण, शिवीगाळ,चुगली, हेवेदावे, मत्सर, क्रोध, अश्लीलता हे सर्व निषिद्ध आहे. इथे नमूद करणे आवश्यक आहे की रोजा व्यतिरिक्त एरवी सुद्धा या गोष्टी पापच आहेत, मनाई आहे. रमजानमध्ये फायदा असा होतो की रोजा असल्याने किंवा कुरआन पठण, प्रार्थना याच्यामध्ये माणूस तल्लीन असल्याने सावधपणे त्या गोष्टी टाळल्या जातात. श्रद्धावंतांची जीभ सावरली जाते. भांडण तंटा होत नाही मग मनःशांती मिळते, मनाची ताकद वाढते. मनाची सकारात्मकता वाढते व नकारात्मकता कमी होत जाते. शरीर व मन दोन्ही सुदृढ होतात. तसेच रमजानमध्ये नमाज व सजदे जास्त होतात, लांब होतात त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. मेंदूची कार्यक्षमता वाढते.
जर एखाद्याला वाईट व्यसन वगैरे असेल जसे दारू, तंबाखू,सिगरेट, ड्रग्स वगैरे ज्या हराम गोष्टी आहेत, रोजामध्ये माणूस घेऊ शकत नाही. विज्ञानच्या संशोधनातून असे आढळले आहे की कोणतीही गोष्ट तीन आठवडे सलग केली की मग पुढे ती करणे सोपी होते, म्हणजे ती स्वभावात पक्की बसते. तेव्हा ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल असे व्यसनी लोक रमजाननंतर सुद्धा या व्यसनापासून दूर राहू शकतात. वाईट गोष्टी टाळू शकतात.
- मिनहाज शेख
पुणे
Post a Comment