१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले अझिमुल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. ज्या वेळी स्थानिक राज्यकर्ते, संस्थानांचे प्रमुख कोणत्याही कृती योजनेशिवाय ब्रिटीशांशी लढण्याची इच्छा व्यक्त करत होते, तेव्हा अझिमुल्ला यांचे असे मत होते की केवळ बळाचा आंधळा वापर करण्यापेक्षा नियोजित कृतीने अधिक परिणाम होतील.म्हणूनच त्यांनी ब्रिटिशांशी लढण्यासाठी रणनीती आखली.
ते इंग्रजी आणि फ्रेंच शिकले. कानपूर कॉलेजमध्ये शिकले आणि तिथेच ते अध्यापक झाले. कानपूरचे राज्यकर्ते नानासाहेब पेशवे यांना अझिमुल्ला यांच्या प्रतिभेची माहिती झाली आणि त्यांनी त्यांना आपले वकील होण्याची ऑफर दिली.
कानपूर संस्थानाच्या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी नानासाहेबांच्या निमंत्रणावरून अझिमुल्ला इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी काही वर्षे व्यतीत केली. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी ब्रिटिशांचे राजकारण जवळून पाहिले. भारताच्या परतीच्या प्रवासात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या.
जेव्हा ते माल्टाला पोहोचले तेव्हा त्यांना कळले की रशियन सैन्याने माल्टा येथे अँग्लो-फ्रेंच सैन्याचा पराभव केला आहे. म्हणून रशियाच्या लष्करी क्षमतेचे निरीक्षण करण्यासाठी ते कॉन्स्टँटिनोपलला गेले. नंतर त्यांनी फ्रान्स आणि क्रिमियाला भेट दिली आणि संबंधित देशांच्या राज्यकर्त्यांचे राजकारण आणि युद्धनीती पाहिली. त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यास प्रेरित केले.
जे देश ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यास तयार होते त्यांच्याशी अझिमुल्ला यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी नानासाहेबांसमोर आपले विचार व्यक्त केले आणि १८५७ च्या बंडाला पाठिंबा मिळवण्यासाठी स्थानिक राज्यकर्त्यांना पत्रे लिहिली. त्यांच्या पत्रांमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
इंग्रजांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये ‘पयाम-ए-आझादी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी अवधच्या बेगम हजरत महल, मौलवी अहमदउल्ला शाह, झाशीच्या लक्ष्मीबाई, मोगल राजपुत्र फिरोज शाह आणि तात्या टोपे यांना नाना साहेबांसह इंग्रजांविरुद्ध रणनीती आखण्यात मदत केली.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात जवळजवळ पराभवाची परिस्थिती निर्माण झाली असताना नानासाहेब, हजरत महल आदींसह ते नेपाळच्या जंगलात परतले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक आणि लष्करी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना ऑक्टोबर १८५९ मध्ये अझिमुल्ला खान यांचे निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment