काळाचे हे चक्र आम्ही लोकांमध्ये आळीपाळीने फिरवतो. कोण अल्लाहशी एकनिष्ठ आहेत हे जाणून घेण्यासाठी. पवित्र कुरआनमधील सूरह आलिइमरान मधील आयत क्र.140मध्ये अल्लाहने ही गोष्ट सांगितली आहे. ह्या आयतीचा संदर्भ तसे उहुदच्या युद्धाशी होता, ज्यामध्ये मुस्लिमांना काही अंशी पराजय पत्करावा लागला होता. ह्या आयती अगोदरच्या आयतीत तो संदर्भ अल्लाहने वर्णन केलेला आहे की सध्या तुम्हाला दुःख पोहोचले आहे, पण तुमच्या आधीच्या लोकांनादेखील अशाच दुःखाला सामोरे जावे लागले होते. कारण अल्लाहला ही माहिती करून घ्यायची होती की कोण अल्लाहशी एकनिष्ठ आहेत आणि तसेच तुमच्यामधीन काहींना या घटनेवर साक्षीदार करायचे होते. जे लोक त्या वेळी उहुदच्या युद्धास सामोरे गेले त्यांना संबोधून अल्लाह म्हणतो की तुम्ही स्वर्गात जाणार हे तुम्ही समजत होता, पण अल्लाहला तर याची परीक्षा घ्यायची होती की तुमच्यामधील कोण धैर्य राखणारे आहेत. अल्लाह म्हणतो की तुम्हाची अजून मृत्यूशी भेट झालेली नसताना तुमची ही अभिलाशा होती. आता मृत्यू तुमच्या समोर आहे. तुमच्या डोळ्यांदेखत तुम्हाला याची जाणीव होईल की अल्लाहच्या आज्ञेशिवाय कुणाला मृत्यू येत नाही आणि तो केव्हा, कधी, कसा येईल हे सर्व एके ठिकाणी नोंदवलेले आहे.
ह्या साऱ्या गोष्टी ज्या अल्लाहने म्हटल्या आहेत याचा सारांश एकच की जे काही तुम्हाला आज दुःखातून जावे लागत आहे ते असे नाही की हे सर्व काही तुमच्याचबरोबर घडत आहे. तुमच्या आधी दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागला होता. आज तुम्हाला त्या यातना सहन कराव्या लागत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे अल्लाहने ठरवलेले होते. तो त्याचा निर्णय होता. त्याला हे पाहायचे होते की कोण त्याच्याशी एकनिष्ठ आहे आणि कोण यातनांना सामोरे जाऊनदेखील अल्लाशी एकनिष्ठ असतो. श्रद्धेवर ठाम राहतो. म्हणजे जगाचा हा सारा कारभार एका योजनाबद्ध रीतीने चालतो. उहुदच्या वेळी मुस्लिमांना जो पराभव पत्करावा लागला होता तोदेखील अल्लाहच्या योजनेचाच एक भाग होता, कारण विजय आणि पराजयदेखील आळीपाळीने लोकांना मिळत असतात. कोणत्याही एका समूहाची यावर कायम मक्तेदारी नाही. ही गोष्ट अल्लाहने ह्या आयतीमधील जो मूळ उद्देश सांगितला आहे त्याद्वारे लोकांना ठणकावून सांगितले आहे की आम्ही काळाला कुणा एका जनसमूहासाठी नव्हे तर साऱ्या मानवांसाठी निर्माण केले आहे. काळाचा उलटफेर सर्वांसाठी आहे, गोष्ट इतकीच नाही की ते साऱ्या जनसमूहांसाठी आहे. अल्लाह म्हणतो की आम्ही प्रत्येक माणसासाठी काळाचे चक्र विहित केले आहे. तेव्हा जनसमूहांनाच नाही तर प्रत्येक माणसाला त्या कालचक्रातून जावे लागणार आहे.
ह्या आयतीअगोदर ज्या आयती आल्या आहेत त्या अल्लाहच्या ह्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. अल्लाह म्हणतो की तुमच्या पूर्वीदेखील मानवांच्या बऱ्याच काही व्यवस्था होत्या, बराच काळ माणसामध्ये लोटला आहे. ह्या धर्तीवर संचार करा आणि पाहा, ज्या लोकांनी हे मानण्यास नकाल दिला त्यांची कशी गत झाली, कोणत्या परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागले. त्या आधी अल्लाहने एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की जे लोक आर्थिक टंचाईच्या काळात तसेच आर्थिक विपुलतेच्या काळात आपली संपत्ती जनकल्याणासाठी खर्च करतात म्हणजे काळाचे चक्र फिरत असताना माणसांनी लक्षात ठेवावे की त्यांना जनकल्याणासाठी खर्च करावा लागेल, मग ते आर्थिक टंचाईत असोत की भरभराटीत. याचाही हिशोब जेव्हा काळाचे चक्र बदलेल तेव्हा लोकांकडून अल्लाहला घ्यावाच लागेल. त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि लोकांना क्षमा करावी लागेल. एकदा काळाच्या ओघात माणूस सापडला की त्याला ह्या सर्व गोष्टींचा जाब द्यावा लागेल. लोकांच्या आर्थिक समस्यांच्या फायदा घ्यायचा नाही. सर्वच माणसांना कधी ना कधी एकमेकांशी कर्ज घ्यावे लागत आहे. अशा वेळी कर्जदाराकडून वाटेल ते व्याज घेऊ नये, याचा देखील हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणजे जेव्हा काळाचे चक्र फिरते तेव्हा एका ठराविक काळात माणसाने काय काम केले, मानवतेसाठी कोणते भले केले, माणसावर कसे अन्याय-अत्याचार केले, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ह्या सर्व बाबींचा हिशोब बदलत्या काळात प्रत्येक माणसासमोर ठेवणार आहे. कारण काळाचे चक्र आळीपाळीने प्रत्येक माणसाच्या जीवनात फिरत राहते.
जेव्हा एखाद्या जनसमूहावर आपत्ती कोसळतात त्याचे कारण बाहेरील वातावरणात शोधण्याची गरज नाही. ह्या आपत्तीं माणसामध्येच दडलेल्या असतात. एखादे राष्ट्र म्हणजे त्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची विस्तारित ओळख तसेच माणसाचा विस्तार म्हणजे एका सभ्यतेचा उदय. म्हणजे सभ्यतांचा उदय झाल्यानंतर त्याचा ऱ्हास एका माणसाचा ऱ्हास. त्याच्या व्यक्तिमत्त्वात निर्धाराचा अभाव होतो. एका माणसाला जे लागू आहे ते साऱ्या समूहाला लागू होते. माणसापासून जे विधान सुरू होते, त्याचा प्रवास समूहापासून सभ्यतेपर्यंत असतो. याचा अर्थ असा की माणसाला बाहेरील शत्रूंची गरज नसते. त्याचा शत्रू त्याच्या अस्तित्वातच असतो. म्हणूनच काळाचे चक्र साऱ्या मानवांमध्ये फिरत असते जसे पवित्र कुरआनात अल्लाहने सांगितले आहे, माणूस स्वतःच आपल्या विघटनाला कारणीभूत असतो. त्याला बाहेरील शक्तींना दोष देण्याची गरज नाही.
कोणत्याही सभ्यतेची सुरुवात एका ठराविक कालखंडात, एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माणसांद्वारे होते, जसे माणसामधील गुण, अवगुण, क्षमता, नैतिकता, अध्यात्म. त्याचे विस्तारित रूप म्हणजे सभ्यता समूह, सभ्यतेला केंद्रस्थानी न ठेवता अल्लाहने प्रत्येक माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. जे काही एका माणसाविषयी सत्य आहे तेच एका समूहासाठी सत्य असणार. माणसांना कोणत्या आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे त्याचा स्रोत माणसामाणसांमध्ये दडलेला असतो. जर एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला केला तर त्याचे परिणाम सैन्यालाच नाही तर प्रत्येक नागरिकाला भोगावे लागतात. म्हणून काळ प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. एका जनसमूहाची नाही तर त्या समूहातील एकन् एक सदस्याची परीक्षा घेत असतो. जमिनीत बियाणे घातल्यावर ते उगवणार. एका ठराविक कालावधीत त्यांची वाढ होत राहते.
त्यानंतर त्यांचे आयुष्य संपते. तसेच काही माणसांच्या जीवनाचे आणि माणसांनी घडवलेल्या सभ्यतेचे असते. त्याचे विघटन होणार. त्याचे कारण म्हणजे स्वनिर्धार संपुष्टात येणे. जसे त्या बियाणापासून उगवलेल्या झाडाचे झाले तसेच. या विश्वाचा आरंभ झाल्यापासून आजपर्यंत आणि एका ठराविक काळापर्यंत सदैव विस्तार होत आहे. त्याचप्रमाणे माणवजातीचे देखील आहे. कारण तोदेखील या विश्वाचाच एक अंश आहे. जसे विश्वात दर सेकंदाला फेरबदल होत असतात तसेच मानवजातीमध्ये देखील फेरबदल होत राहतात. ही दैवी योजना आहे. यालाच काळाचे उलटफेर म्हटले गेले आहे. काळाचे खाली-वर होत राहणे हीदेखील निर्मात्याने ठरवलेली योजना आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनासाठी त्याची चाके अपरिहार्य असतात तशाचप्रमाणे मानवजातीच्या या धर्तीवरील प्रवासासाठी काळाचे चक्र अपरिहार्य आहे. एका आव्हानाला प्रतिसाद देताना आणखी आव्हाने समोर येतात, त्याचबरोबर त्याचा प्रतिसाद आणि याचा परिणाम म्हणजे एका नंतर दुसरे चक्र. जे काही जन्माला येते त्याचा अंत होणारच. कोणतीही आचारसंहिता त्याला वाचवू शकत नाही हा प्रकृतीचा नियम आहे. हे चक्र सर्व सजीवनिर्मिती तसेच वनस्पतींमध्ये लागू असते. काळचक्र एक प्रकारे हे कॉसमॉससारखे आहे जेथे सदैव विद्धंस आणि पुनर्वसन चालू असते. म्हणजेच मानवी जीवन एकसारखे नसते. सतत बदलत राहते. आज एखादे राष्ट्र, समूह, सभ्यता प्रगतीच्या शिखरावर असेल तर दुसरा समूह विनाशाच्या गर्तेत सापडलेला असतो. हे समूहजीवन चाकासारखे खाली-वर होत राहते. कधी एक सभ्यता इतर सभ्यतांची वाढ होऊ देत नाही, त्यांना खुंटित करून टाकते. तसे इस्लामिक सभ्येतेने साऱ्या जगातील सभ्यतांना एक प्रकारे बंदिस्त केले होते, कारण त्या वेळी जगाच्या पटलावर या सभ्यतेने एक आदर्श विचारसरणी आणि एक सर्वश्रेष्ठ आचारसंहिता सादर केली होती.
ज्या सभ्यतांना तीव्र आव्हानांना तोंड द्यावे लागते ते त्याला बळी पडतात. निरनिराळ्या शक्ती एक जाळे त्या सभ्यतांभोवती विणतात. ज्यामुळे त्यांचा कायमचा अंत निश्चित होतो. ज्या सभ्यता अशा आव्हानांना प्रत्युत्तर देतात त्या पुन्हा जीवित होऊ शकतात, पण यासाठी अल्लाहने एक नियम केलेला आहे तो असा की माणसांनी आपली परिस्थिती बदलायला स्वतः पुढे यावे, संघर्ष करावा तरच अल्लाह त्यांची दुरवस्था बदलतो. कोणत्याही जनसमूहाच्या परिस्थितीत अल्लाह तोवर बदल करत नाही जोवर ते स्वतः बदल करत नसतात. अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहाला दाई करण्याचे ठरवतो मग त्या जनसमूहाला त्याच्याव्यतिरिक्त कुणीही मदत करू शकणार नाही. (प. कुरआन, 13:11)
दुसऱ्या ठिकाणी अल्लाहने निर्णायक घोषणा केलेली आहे की तुम्ही जर पुढे आला नाहीत तर अल्लाह तुम्हाला कठोर शिक्षा देईल आणि तुमच्याजागी इतर समूह उभे करील. तुम्ही त्याचे काहीही करू शकणार नाही, कारण अल्लाहच सर्वस्व सामर्थ्यवान आहे. (प. कुरआन, 9:39)
इस्लामी सभ्यतेचा जन्म सहजासहजी झाला नव्हता, तसेच कोणत्याही सभ्यतेचा जन्म सहज सोपा नसतो. जन्मावेळी कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. इस्लामचेही तसेच झाले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा इस्लामचा प्रसार सुरू केला तेव्हा लोकांनी सहजासहजी प्रतिसाद देऊन तो धर्म स्वीकारला नाही. ज्या मूठभर लोकांनी स्वीकारला त्यांना अतोनात यातनांना तोंड द्यावे लागले. जेव्हा इस्लामचा प्रसार सुरु झाला तेव्हा विजय मिळाल्यावर त्या मुस्लिमांनी ज्यांनी इराकच्या सासानी सत्ताधीशांना पराभूत केले होते त्यांना हे कसे शक्य झाले असे विचारल्यावर ते लोक म्हणाले, आमच्यासारखा निराधार आणि दरिद्री त्या वेळी कुणी नव्हता. उपासमार काय असते ते आम्हालाच माहीत. दुसऱ्यांना उपासमारीची कल्पना करवत नाही. आम्ही पालापाचोळा खायचो. तसेच विंचू आणि साप खात होतो. हेच आमचा आहार. या उघड्या जमिनीशिवाय दुसरे कोणतेच आमच्या राहण्याचे ठिकाण नव्हते. उंट आणि मेंढ्यांच्या केसांनी विणलेले कपडे आमची वस्त्रे. एकमेकांची हत्या करणे, एकमेकांवर दरोडा टाकणे हाच आमचा धर्म होता. आम्ही आमच्या मुलींना जमिनीत पुरून टाकत होतो, जेणेकरून त्यांनी आमच्या आहारात सहभागी होऊ नये... आणि अशा परिस्थितीत अल्लाहने आमच्याकडे सर्वस्व परिचित माणसाला पाठवले. आम्हाला त्यांचा वंश माहीत होता. त्यांचा चेहरा आणि त्यांचे जन्मस्थान आम्हाला माहीत होते. त्यांचे घराणे आमच्या घराण्यांपैकी सर्वोत्तम होते. ते सर्वथा आमच्यामध्ये सर्वो-त्कृष्ट होते. कमालीचे सत्यवान आणि कमालीचे सहनशील. त्यांनी आम्हाला त्यांचा धर्म स्वीकार करण्याचे निमंत्रण दिले. ते बोलले आणि आम्ही बोललो. त्यांनी सत्य सांगितले, आम्ही खोटे बोलत होतो. ज्या अरबांनी त्यांचा विरोध केला होता त्यांनी स्वेच्छेने किंवा अनिच्छेने त्यांची साथ दिली. जे लोक अनिच्छेने त्यांच्यात सामील झाले त्यांचे शेवटी कल्याण झाले आणि जे स्वेच्छेने त्यांच्यात सामील झाले ते अधिकाधिक समाधानी झाले. संघर्ष आणि दारिद्र्याने भरलेल्या आपल्या पूर्वीच्या स्थितीपेक्षा त्यांच्या संदेशाची महानता आम्ही ओळखली होती. अशी गोष्ट सुरुवातीच्या मुस्लिमांची आहे. त्यांनी एका नंतर एक राष्ट्र जिंकले आणि इस्लामी सभ्यतेला जगभर सर्वदूर पोहोचविले. (संदर्भ - ‘ढहश ॠीशरीं -ीरल उेर्पिींशीीीं’ लू र्कीसह घशपपशवू, ऊर उरिे झीशीी, 2007)
वर वर्णन केलेला मजकूर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद होता पहिल्यावहिल्या मुस्लिमाचा. कवी अल्लामा इकबाल यांनी सकारात्मक प्रतिसादाविषयी म्हटले आहे, अल्लाहला संबोधून ते म्हणतात---
तू रात्र आणि अंधाराची निर्मिती केली
तो अंधार दूर सारण्यासाठी त्यामध्ये
मी दिवा प्रज्वलित केला.
तू मातीची निर्मिती केली,
मी त्या मातीतून प्याला बनवला.
जंगल, डोंगर आणि कालव्याची निर्मिती केली,
मी बागा लावल्या, फुलांची शेती पिकवली.
- सय्यद इफ्तिखार अहमद
98201 21207
Post a Comment