रमजानमध्ये रोजे ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड असते पण जकात देणाऱ्यांची संख्या तेवढी नसते. जकात देण्याएवढी आर्थिक परिस्थिती भक्कम असूनही अनेक लोक एक तर जकात देत नाहीत किंवा दिली तरी तंतोतंत हिशेब करून देत नाहीत. हिशेब करून दिल्यास जास्त पैसा द्यावा लागेल याची त्यांना भीती वाटत असते. सर्वात मोठा त्याग आर्थिक त्याग असतो. हा त्याग करण्याचे धाडस सगळ्याच साहेब-ए-निसाब लोकांमध्ये असतेच असे नाही. जकात एक अनिवार्य आर्थिक इबादत आहे.
कुरआनमध्ये किमान 32 ठिकाणी नमाज कायम करण्याबरोबर जकात देण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. यावरून ईश्वराच्या नजरेमध्ये ज़कात किती महत्त्वाची आहे याचा अंदाज वाचकांना येवू शकतो. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडित व साधु-संन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जे सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने आणि चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजू आणि पाठींना, डागले जाईल - हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.’’ (कुरआन : सूरह अत्तौबा 9: आयत नं. 34-35)
वरील आयत कुठल्याही श्रद्धावान व्यक्तीचा काळजाचा थरकाप उडविण्यासाठी पुरेशी आहे. संपत्तीचा मोह माणसाला सोडवत नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा फरमाविले होते की, संपत्तीची भूक माणूस जेव्हा थडग्यात जातो तेव्हाच शमते. माणसाला एका डोंगराएवढे सोने जरी प्राप्त झाले तरी तो दुसऱ्या डोंगराएवढ्या सोन्याची अपेक्षा करेल. आज आपण पाहतो की, अनैतिक मार्गाने अमाप संपत्ती गोळा करून देखील लोकांची पुन्हा संपत्ती गोळा करण्याची भूक काही केल्या कमी होत नाही. नुकताच अंबानी परिवारामध्ये अनंत अंबानी यांचा लग्नपूर्व सोहळा पार पडला. त्यात संपत्तीची किती विभत्सपणे लूट करण्यात आली हे जगाने पाहिले. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये काही लोकांकडे त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त संपत्ती जमा होते. तर बहुतेक लोकांकडे त्यांच्या गरजेपेक्षा खूपच कमी संपत्ती हातात येते. त्यामुळे जे सामाजिक असंतुलन निर्माण होते तेच अन्याय, अत्याचार आणि गुन्हेगारीला जन्म देत असते. जकात देणे किती जीवावर येते याचे सर्वात मोठे उदाहरण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या निधनानंतर समोर आले होते. अरबस्थानामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी जकात देण्यास नकार दिला होता. तेव्हा प्रथम खलीफा हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी त्यांच्याशी युद्ध करून जकात वसूल केली होती.
जकातीचे महत्त्व
जकात सन 2 हिजरीमध्ये अनिवार्य करण्यात आली. जकात देण्यास इन्कार करणारी व्यक्ती मुस्लिम राहत नाही तर तिचा समावेश काफिरां (इन्कार करणाऱ्या) मध्ये होतो. जकात या शब्दाचा अर्थ वाढ तसेच स्वच्छ करणेे असा होतो.
’’ज्या लोकांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले आहे, आणि मग ते कंजूषपणाने वागतात तर त्यांनी या भ्रमात राहू नये की हा कंजूषपणा त्यांच्यासाठी चांगला आहे. नव्हे, हे त्यांच्याकरिता अत्यंत वाईट आहे. जे काही ते आपल्या कंजूषपणाने गोळा करीत आहेत तेच पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील जोखड बनतील. पृथ्वी व आकाशांचा वारसा अल्लाहकरिताच आहे, आणि तुम्ही जे काही करता अल्लाह त्याबाबत सर्वज्ञ आहे. ’’ (सूरह आलेइमरान 3: आयत नं. 180)
एकंदरित जकात ही अत्यंत महत्त्वाची आर्थिक इबादत आहे आणि यावरच समाजाचे आर्थिक स्वास्थ्य अवलंबून आहे. ज्यांचा अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर विश्वास आहे त्यांनी या गोष्टीची मूळीच चिंता करू नये की, जकात दिल्याने त्यांच्या संपत्तीमध्ये घट होईल. अल्लाहने स्वतः फरमाविले आहे की, मी तुमची अशा ठिकाणाहून मदत करेन ज्याची तुम्हाला कल्पनासुद्धा असणार नाही. रमजानमध्ये जकात काढण्याचा आपल्या सर्वांचा परिपाठ आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही. अल्लाहवर विश्वास ठेवून आपण सर्वजण अगदी काटेकोरपणे जकात काढूया. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, ’’ आम्हा सर्वांना वेळेवर जकात अदा करण्याची समज आणि धाडस दे, आमीन.’’
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment