Halloween Costume ideas 2015
January 2024


भारतात राजकारण म्हणजे कृतीतील धर्मशास्त्राखेरीज दुसरे काही नाही, असे विधान केल्याने हे संविधान आणि घटनात्मक नैतिकतेच्या विरोधात आहे, याची आठवण करून द्यायला हवी. 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने अल्पसंख्याक  म्हणून दलितवर्गांच्या हिताच्या रक्षणासाठीच्या उपाययोजनांबाबत आंबेडकरांनी 29 मे 1928 रोजी भारतीय वैधानिक आयोगासमोर सादर केलेल्या निवेदनात हे विधान केले होते.

प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा गौरव दिवस आहे. याच दिवशी आपली राज्यघटना लागू झाली. भारत एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आला. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लागू केल्यानंतर केलेल्या भाषणातील अपेक्षा आज फोल ठरल्या आहेत. आजही आपला प्रजासत्ताक अनेक काटेरी झुडुपांमध्ये अडकलेला दिसतो.

6 डिसेंबर 1992 रोजी त्यांनी अयोध्येत जे उद्दिष्ट ठेवले होते ते साध्य केले. मशीद जमीनदोस्त झाली. त्यांना ना केंद्र सरकार, ना लष्कराने, ना न्यायालयांनी रोखले. भारतातील मुस्लिम समाज निराशेच्या गर्तेत फेकला गेला. चर्चचा नाश झाला हेच त्या निराशेचे एकमेव कारण नव्हते. मध्य प्रदेशातील ख्रिश्चन प्रार्थनास्थळांवरील हिंसाचार हा त्याचा पुरावा आहे. त्या देवस्थानांवर ध्वज कोणी लावला हे माहीत नाही. मीडिया मॉब म्हटल्यावरही त्या जमावाची भावना काय आहे, त्यांचे राजकारण काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे हे कोणालाही समजू शकते. मध्य प्रदेशातील ख्रिश्चन चर्चमध्ये ध्वज फडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल असो वा नसो, जातीय द्वेषाचे भाले घेऊन जातीयवादी येथे असतील. त्यांचे वैचारिक आणि राजकीयदृष्ट्या संरक्षण होत आहे.

22 जानेवारी 1999 रोजी मध्यरात्री, ख्रिश्चन धर्मोपदेशक ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या   -(उर्वरित पान 2 वर)

दोन मुलांना जातीयवाद्यांनी ठार मारले आणि ते त्यांच्या जीपमध्ये झोपलेले असताना त्यांना पेट्रोल ओतून पेटवून दिले. गुन्हा काय तर ख्रिश्चन धर्मप्रचार. या हत्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या घटनेला मोठी बातमी दिली कारण ग्रॅहम स्टेन्स हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. त्या काळात भारताला जगासमोर शरमेने मान खाली घालावी लागली होती. भारतात ख्रिश्चन-फ्रेंडली होण्याचा भाजपचा कितीही प्रयत्न असला तरी दुसऱ्या बाजूला संघ परिवार ख्रिश्चन आणि मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार घडवत आहे. 

मणिपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली दंगल अद्याप संपलेली नाही. त्या बंडात ख्रिश्चन समुदायांचे सर्वाधिक नुकसान झाले हे उघड गुपित नाही. मणिपूरमधील सरकारच्या संगनमताने हल्लेखोर देशभर फिरत असल्याचा आरोप ख्रिश्चन चर्चने यापूर्वीच केला आहे.

नागरिकांना दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. लोकांवर काय खावे, काय प्यावे, काय परिधान करावे यासंदर्भात बंधने आणली जात आहेत. बहुमताचा वापर करून अडचणीचे असलेल्यांना दूर करायचे आहे. राज्य आणि केंद्राच्या सामयिक सूचीतील विषयावर कायदे करताना राज्यांना विश्वासात घ्यावे लागते; परंतु केंद्र सरकारला आता तसे वाटत नाही. परस्पर कायदे केले जातात. एकीकडे मुली जागतिक पटलावर भारताचा नावलौकिक वाढवत असताना दुसरीकडे महिलांवर बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले होत आहेत. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावार पदके मिळवून देणार्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होतो. बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे वाचले, तर एक सरकार कायदा हातात घेऊन न्यायालयाच्या अधिकारात हस्तक्षेप कसा करते, हे दिसते.

भारतीय मुस्लिम लोकसंख्येच्या सुमारे पंधरा टक्के म्हणजे सुमारे वीस कोटी आहेत. एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असलेल्या या समाजाला लोकसभेत आणि मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. तथाकथित प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीवरून अशा प्रकारचा उपेक्षितपणा दिसून येतो. आज हिंदुबहुसंख्य रहिवाशांच्या भागात मुस्लिमांना घर भाड्याने मिळणे किंवा मालमत्ता खरेदी करणे कठीण होत आहे. मुस्लिमांच्या मतांची गरज नाही, असे उघडपणे सांगण्याचे धाडस दाखवताना मतांचे ध्रुवीकरण अपेक्षित असते. हा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे.

झुंडशाही करणाऱ्यांची जामिनावर सुटका होताच मंत्री त्यांच्या गळ्यात गळे घालतात, सत्कार करतात, सामूहिक बलात्कार आणि सामूहिक हत्याकांड करणाऱ्यांच्या आरत्या केल्या जातात. हे पाहिले तर देश कुठे चालला आहे, असा प्रश्न पडतो. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुस्लिमांना मारले जाते आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतात. भारतीय राज्यघटना सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या स्वतःच्या धार्मिक विश्वासांनुसार जगण्याचा, उपासना करण्याचा आणि त्यांच्यासाठी उपासनागृहे स्थापन करण्याचा अधिकार देते. लोकप्रिय इच्छा या संकल्पनेचे धार्मिक इच्छेमध्ये रूपांतर केल्याचे परिणाम गेल्या काही वर्षांत आपला देश भोगत आहे, ही आज आपल्या प्रजासत्ताकासमोरील सर्वात मोठी समस्या आहे.

काही आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल सरकार दर वर्षी नाकारते; परंतु त्यात नमूद केलेल्या मानवी हक्काच्या आणि लोकशाही मूल्यांच्या गळचेपीच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रजासत्ताकाच्या सूर्याला राजकीय गुन्हे, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या ढगांनी घेरले आहे. एकाधिकारशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. स्वीकारलेली राज्यघटना आपण एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहोत हे सांगते; परंतु ज्या धार्मिक उन्मादाचे वातावरण तयार केले जात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने बजावूनही धार्मिक उन्माद करणार्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस कोणतेही सरकार आणि पोलिस यंत्रणा दाखवत नाहीत, यावरून न्यायालयाच्या आदेशांनाही कायदेमंडळ काहीच महत्त्व द्यायला तयार नाही, हे स्पष्ट होते.

माध्यम स्वातंत्र्याच्या भारतातील गळचेपीचा जागतिक अहवाल एकदा नजरेखालून घालायला हवा. माध्यमे सरकारमधील नेत्यांच्या हाती आल्याने उघड उघड सरकार आणि मालकांची तळी उचलायला लागली आहेत. त्यामुळे जनतेचे प्रश्न आणि विरोधकांचा आवाजही दाबला जात आहे. भारतीय राज्यघटना आणि त्यातील संसदीय लोकशाही मानणार्या प्रत्येकाला आज ही आव्हाने जाणवत आहेत.

देशात आज स्वातंत्र्याचा अर्थ स्व-तंत्र असा घेतला जातो आहे. संघराज्यीय एकात्मता हे तत्व केंद्र-राज्य संबंधांच्या तणावातून आज अडचणीत आणले जात आहे. धर्मनिरपेक्षतेऐवजी धर्मराष्ट्राचा ढोल बडवला जात आहे. मानवी कारुण्यावर नव्हे, तर आर्थिक समतेवर आधारित समाजवादाच्या संकल्पनेऐवजी कमालीच्या विषमतावादी भांडवलशाहीचा पुरस्कार केला जात असून लोकशाही अत्यंत पद्धतशीरपणे हुकुमशाहीच्या मार्गाने नेली जात आहे. आज प्रजासत्ताकाला दमन आणि प्रलोभन या दोन्हीचाही धोका जाणवतो आहे.

धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबाबत विशेष काळजी घेणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते यात नवल नाही. निवडून आलेली हुकूमशाही म्हणूनही त्याचे वर्णन करण्यात आले आहे. जातीयवाद आणि धर्मांधतेच्या प्रसाराच्या दृष्टीने अशा चिंतांचे स्पष्टीकरण देता येते आणि अशा घडामोडींमधून बाहेर पडणाऱ्या शक्ती आता उघडपणे धर्मांधतेचा मुद्दा मांडत आहेत. आज धर्मनिरपेक्षतेशी मोठ्या प्रमाणात तडजोड केली गेली आहे राज्याचा आणि घटनात्मक पदांवर बसलेल्या सत्ताधारी नेत्यांचा सक्रिय सहभाग हा सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत रचना मानल्या गेलेल्या धर्मनिरपेक्षतेवर निर्विवाद हल्ला आहे.


- शाहजहान मगदुम



मागच्या आठवड्यात सानिया मिर्झाचा विवाह विच्छेद झाला तर अनेक लोकांच्या पोटात गुदगुल्या झाल्या. एक्सवर आलेल्या प्रतिक्रियांचा सार असा होता की, ‘’बरे झाले हिला अद्दल घडली. शोएबने हिला तलाक देवून चांगले काम केले. आता हिचा हलाला होईल वगैरे वगैरे... मात्र सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी जेव्हा पुढे येवून असे सांगितले की, शोएबने सानियाला तलाक दिलेला नसून, सानिया, स्वतः खुला घेवून शोएबपासून विभक्त झालेली आहे. तेव्हा अनेकजण बुचकळ्यात पडले आणि,खुला म्हणजे काय? असा प्रश्न विचारू लागले. यानिमित्ताने चला तर पाहूया खुला म्हणजे काय ते? 

ज्याप्रमाणे मुस्लिम पुरूषाला आपल्या पत्नीला तलाक देण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे मुस्लिम स्त्रीला आपल्या पतीपासून खुला घेण्याचा अधिकार आहे. मात्र या दोन्ही अधिकारामध्ये सुक्ष्म फरक आहे. तो समजून घेणे गरजेचे आहे. पुरूष हा आपल्या पत्नीला तोंडी तलाक देवू शकतो. मात्र स्त्री आपल्या पतीला तोंडी खुला देवू शकत नाही. तिला काझीकडे जावून अर्ज करावा लागतो की, अमूक-अमूक कारणाने मला आपल्या पतीकडून खुला घ्यायचा आहे. तेव्हा काझी पतीला बोलावून घेतो आणि पत्नीची इच्छा त्याच्यासमोर मांडतो. पती जर राजी झाला तर तो खुलानाम्यावर सही करतो आणि दोघे विभक्त होतात. यात पत्नीला पतीकडून घेतलेली मेहेरची रक्कम परत करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये वाचकांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवणे साहजिक आहे तो म्हणजे पतीला पत्नीला तलाक देण्याचा बिनशर्त अधिकार इस्लामने दिलेला असताना पत्नीला मात्र पतीच्या परवानगीशिवाय खुला का घेता येत नाही? हा स्त्री-पुरूषांमध्ये भेदभाव नाही का? तर या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे -

पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसर्यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात.  (सुरे निसा 4: आयत क्र.34)

एक मुलगी आणि एक मुलगा इजाब (मुला कडून लग्नाची मागणी) आणि कुबूल (मुली कडून स्वीकारा) द्वारे निकाह (लग्न) करतात आणि एका नव्या कुटुंबाची पायाभरणी होते. कुटुंब ही एक जगातील सर्वात महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. या संस्थेचा प्रमुख म्हणून ईश्वराने पुरूषाला नेमलेले आहे आणि पत्नीवर त्याला श्रेष्ठत्व बहाल केले आहे. तो आपल्या पत्नी आणि त्या दोघांच्या मिलनातून जन्माला येणाऱ्या मुलं आणि मुलींचा विश्वस्त सुद्धा आहे. तो अत्यंत मेहनतीने, कष्ट करून धन कमावतो आणि आपल्या कुटुंबावर खर्च करतो. पत्नी त्या कुटुंबाला आकार देते. ही ईश्वरीय व्यवस्था आहे. निकाह करताना शरियतने दोघांवरही काही अटी आणि शर्ती लादलेल्या आहेत. दोघेही त्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचा लेखी करार करतात. म्हणजे इस्लाममध्ये लग्न एक सामाजिक करार आहे. हा करार आयुष्यभर टिकून रहावा, अशी ईश्वरीय इच्छा आहे. साधारणपणे हा करार टिकतोही. पण सानिया-शोएब प्रमाणे काही अभागी जोडपी असतात ज्यांच्यामध्ये या कराराचे दोघांपैकी एकाकडून पालन केले जात नाही. तेव्हा दुसर्याला त्या करारातून बाहेर पडण्याचा अधिकारसुद्धा ईश्वराने प्रदान केलेला आहे. पत्नीने करारभंग केला आहे असे वाटल्यास पती कुटुंबप्रमुख या नात्याने तिला कुटुंब या संस्थेतून तलाक देवून बेदखल करतो. जेव्हा पतीने करारभंग केला आहे असे पत्नीला वाटते तेव्हा तिला मात्र कुटुंबप्रमुखाची परवानगी घेवूनच या करारातून बाहेर पडता येते. ही पद्धत कुटुंब या संस्थेमध्येच आहे, असे नाही तक्ष जगात कुठल्याही संस्थेमध्ये हाच नियम असतो. उदा. ’अ’ ने एक व्यापारी संस्था  रजिस्टर्ड पद्धतीने सुरू केली आणि ’ब’ नावाच्या व्यक्तीबरोबर त्याने करार केला की, भांडवल माझे राहील आणि तू काम करशील. या कराराप्रमाणे व्यापार सुरू राहिला आणि भरभराटीला आला तर दोघांचाही फायदा होईल, व्यापार वाढेल आणि दोघेही श्रीमंत होतील. मात्र असे गृहित धरा ’ब’ ने व्यापाराला नुकसान होईल, असे काही कृत्य केले. तेव्हा ’अ’ त्याला न विचारता व्यापारातून बरखास्त करून टाकेल. कारण भांडवल त्याचे आहे व तो व्यापाराचा प्रमुख आहे. याउलट समजा ’ब’ ला काही कारणाने त्या व्यापारी संस्थेतून बाहेर पडायचे असेल तर त्याला स्वतःच्या मनाने बाहेर पडता येईल का? नाही! त्याला ’अ’ ची परवानगी घेऊनच कंपनी सोडावी लागेल. आणि कंपनी सोडताना कंपनीने ज्या सुविधा त्याला दिलेल्या आहेत त्या सोडाव्या लागतील. यात ’अ’ने ’ब’ला काढले हे तलाकचे उदाहरण आहे. आणि ’ब’ ने कंपनीपासून स्वतःला वेगळे करून घेतले हे ’खुला’चे उदाहरण आहे.  

जी पद्धत ईश्वराने वापरलेली आहे तीच पद्धत कंपनीने वापरली आहे. यात न समजण्यासारखे काहीच नाही. पण स्त्री-पुरूष अवाजवी समानतेचे भूत ज्यांच्या डोक्यात बसलेले आहे त्यांना यामागील तत्वज्ञान कळणार नाही किंवा कळून ही ते न कळाल्यासारखे करतील. स्त्री सक्षमीकरणाचे समर्थक असे ही म्हणू शकतात की ईश्वराने पुरुषांनाच कमावण्याची परवानगी का दिली स्त्रियांना का नाही दिली? आम्ही आधुनिक आहोत, स्त्रियांना सुद्धा सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे  राहण्यासाठी तयार करू, मग लग्नानंतर दोघांनीही घराची जबाबदारी अर्धी-अर्धी उचलायला काय हरकत आहे? तर मित्रांनो...! असे प्रयोग युरोप आणि अमेरिकेमध्ये शंभर वर्षांपासून पूर्वी सूरू झाले होते आणि या प्रयोगाची परिणिती कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्यामध्ये झालेली आहे, हे ज्यांना दिसत नाही त्यांनी  असे प्रयत्न आपल्या घराण्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून करावेत आणि त्यांचे परिणाम सोसण्याची ही तयारी ठेवावी आमची काहीच हरकत नाही.

इस्लाममधील खुलाचे पहिले प्रकरण प्रेषित सल्ल. यांच्या हयातीतच झाले. हजरत साबत बिन कैस रजि. यांच्या पत्नी हजरत फातिमा बिन्ते मजल यांनी इतिहासातील पहिला खुला घेतला होता. त्यांनी खुला घेतांना हजरत जैद यांनी लग्नाच्या वेळेस त्यांना दिलेली अंगुरची बाग त्यांनी परत केली होती. सानिया-शोएबच्या बाबतीत जी माहिती पुढे आलेली आहे ती अशी की, शोएबच्या बाह्यख्यालीपणाला कंटाळून तीने त्याच्याकडून खुला घेतलेला आहेे. शोएबच्या बाहेरख्यालीपणाचा आरोप सानियाने नव्हे तर दस्तुरखुद्द शोएबच्या बहिणींनी केलेला आहे. त्यामुळेच त्याच्या बहिणी त्याच्या सना जावेद बरोबर झालेल्या लग्नात सामील नव्हत्या. 

इस्लाममध्ये हलाल गोष्टींमध्ये तलाक म्हणजेच घटस्फोटाला अल्लाहने अत्यंत नापसंत ठरविलेले आहे. मात्र ज्यावेळेस एखाद्या प्रकरणात दुर्भाग्याने पती-पत्नींचे एकत्रित राहणे कुटुंब व्यवस्थेस धोकादायक ठरेल आणि वैवाहिक जीवन यातनांनी भरून जाईल तर अशा परिस्थितीत यातनांचा स्वीकार करून नरकसमान जीवन जगण्याची जबरदस्ती ईश्वराने केलेली नाही. सुरूवातीला सामोपचाराने दोघांत निर्माण झालेले मतभेद मिटविण्याची एक पूर्ण व्यवस्था शरियतमध्ये दिलेली आहे. त्या व्यवस्थेच्या आधीन राहून दोघांमध्ये समेट घडविण्याचा अगोदर प्रयत्न केला जातो. मात्र दोघांमध्ये जेव्हा समेट घडत नाही. तेव्हा दोघांचेही जीवन यातनामय बनविण्यापेक्षा दोघांना विवाहाचा करार मोडण्याचा अधिकार ईश्वराने दोघांनाही बहाल केलेला आहे. समाधानाची बाब ही की जगामध्ये सर्वात जास्त मजबूत कुटुंब व्यवस्था इस्लामला मानणार्यांची असून, तोंडी तलाक आणि खुलाची पद्धती उपलब्ध असतांना सुद्धा सर्वात कमी विवाह विच्छेद मुस्लिमांचे होतात. युरोप आणि अमेरिकेमध्ये नव्याने इस्लामममध्ये प्रवेश करणार्या तरूणींची संख्या कमी नाही. त्यांना जेव्हा इस्लाम स्विकारण्याचे कारण विचारले गेले तेव्हा अनेक कारणांपैकी एक कारण असेही पुढे आले की, मुस्लिम पुरूष युरोपियन पुरूषांपेक्षा कुटुंबाशी अधिक एकनिष्ठ असतात. 

एकंदरित सानिया मिर्झा आणि शोएब यांचा विवाह विच्छेद हा जरी आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय असला तरी यात सानियाचीच बाजू नैतिक आणि मजबूत आहे असे दिसून येते. शोएब मलीकचा धिक्कार स्वतः पाकिस्तानी लोक करीत आहेत, असेही एक्सवरून त्याच्याविरूद्ध ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून लक्षात येते.

- एम. आय शेख 
लातूर


मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा जाहीर पाठींबा असून, त्यासाठी सर्वोतोपरी मदतही करणे सुरू आहे. मराठा आरक्षण पदयात्रा बाराबाभळी (जि. अहमदनगर) येथे रविवारी मुक्कामी होती. मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लीम समाजाने मदरशाची 85 एकर जागा सभेसाठी उपलब्ध करून देत सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. 

बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती. त्यापैकी 85 एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही सेवा दिली असे, मदरशाचे विश्वस्त मतीन सय्यद यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चातही मुस्लीम समाजाच्यावतीने पाणी, सरबत वाटप करण्यात आले होते. 

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता. चेअरमन शेख आसिफ रफिक, सेक्रेटरी सय्यद मतीन ख्वाजा, नदीमोद्दीन प्राचार्यकारी मोहम्मद शादाब यांनी पदयात्रेचे स्वागत केले. मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या राहणे आणि जेवणाचीही व्यवस्था केली गेली. पदयात्रेत महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था विश्वस्तांनी केली होती.रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले, तेथेही मदरशातील विद्यार्थ्यांनी सेवा दिली. याशिवाय मदरसा परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती.

मनोज जरांगे पाटील यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुरआनची प्रतही यावेळी भेट दिली. विश्वस्त मतीन सय्यद म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आमचा सदैव पाठींबा आहे. मदरशातील जरांगे पाटील यांच्या मुक्कामाचे आणि आयोजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुस्लिम आरक्षणासाठीही लढा उभारणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

- बशीर शेख





22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ज्या स्तरावर व्यापक तयारी करण्यात आली होती आणि त्यात सहभागी होण्यासाठी ज्या मोठ्या संख्येने लोकांना जमवण्यात आले होतेे, ते पाहून भारतातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक झाले आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर लागलीच अशी मागणी उठली होती की, ज्यामध्ये 11व्या शतकात महमूद गझनीने तोडफोड केलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराची सरकारने पुनर्बांधणी करावी. जवाहरलाल नेहरू लिहितात की, त्यांनी आणि सरदार पटेल यांनी महात्मा गांधींची भेट घेतली आणि विषयावर चर्चा केली परंतु गांधीजींचे असे मत होते की सरकारने मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी निधी देऊ नये आणि खर्चात वाटाही उचलू नये. त्याच धर्तीवर त्यावेळी देशाचे पंतप्रधान असलेल्या नेहरूंनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे राष्ट्रपती या नात्याने त्यांच्या क्षमतेनुसार नूतनीकरण केलेल्या मंदिराचे उद्घाटन न करण्याचा सल्ला दिला होता. आणि नंतर नेहरूंनी धरणे, सार्वजनिक क्षेत्रातील मोठे उपक्रम, आरोग्याशी संबंधित संस्था आणि शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचे आधुनिक भारताचे मंदिर असे वर्णन केले.

‘एक व्यक्ती एक मत’ या तत्त्वाने देशातील लोकशाही बळकट केली. कामगार, शेतकरी आणि समाजातील इतर घटकांच्या सामाजिक चळवळींमुळे भारतीय लोकशाहीही मजबूत झाली. आणीबाणीची काही वर्षे बाजूला ठेवली तर लक्षात येईल की, स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकशाही अधिक मजबूत आणि सखोल झाली आहे. ही मालिका राममंदिर आंदोलन सुरू होईपर्यंत हे सुरूच होते. हे आंदोलन स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेल्या ‘भारताच्या कल्पनेच्या’ विरोधात होते. रामलल्लाच्या मूर्ती बाबरी मशिदीत नियोजनबद्ध पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या आणि फैजाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी के. के. नय्यर यांनी त्यांना हटवण्यास नकार दिला. यामुळे एका मुद्द्याचा पाया घातला गेला जो भारतीय संविधानाच्या मूल्यांसाठी मोठा धोका बनणार होता.

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद कट रचून पाडण्यात आली आणि आज उद्घाटन झालेल्या भव्य मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. सध्या भारताच्या केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या राजकीय पक्षाने आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी केवळ भावनिक मुद्दे ठेवले नाहीत तर भारतातील लोकशाही मर्यादित आणि कमकुवत केली आहे. राममंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्याचे सांगणे भाग पडले. एकूणच, लोकशाही महत्त्वाकांक्षा आणि चांगले जीवनमान मिळवण्याच्या इच्छा भावनिक मुद्द्यांच्या गराड्यात गुदमरल्या आहेत. सरकार या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नसून वाढत्या किमती आणि जगण्यातील अडचणींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

चांगल्या उद्याची स्वप्ने हवेत विरली आहेत. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य नेत्यांनी ज्या भारताच्या उभारणीचे स्वप्न पाहिले होते तो भारत कुठेच दिसत नाही.

यासोबतच हेही खरे आहे की, गेल्या काही वर्षांत भारतीय लोकशाहीच्या ताकदीची काही उदाहरणेही आपण पाहिली आहेत. कृषी क्षेत्रातील जाचक कायद्यांच्या अंमलबजावणीविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत पोहोचले. महिनाभर चाललेल्या संघर्षात 600 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. लोकशाही मार्गाने सरकारला नमवता येते हे त्यांनी दाखवून दिले. सरकारला कृषीविषयक कायदे मागे घ्यावे लागले. त्यानंतर सरकारने आणखी एक फसवी खेळी केली. मुस्लिमांनाना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) बनविण्यात आला आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) वर काम सुरू करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून शाहीनबाग आंदोलन सुरू झाले ज्याने लोकशाही आंदोलनातून देशाचे भविष्य घडवले जाऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

सुमारे वर्षभरापूर्वी काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेने देशातील जनतेच्या व्यथा आणि समस्याही समोर आणल्या. विविध धर्मांचे पालन करणारे आणि विविध जातींमध्ये विभागलेले भारतीय मुळात एकच असल्याचा संदेशही या प्रवासाने दिला. या भेटीमुळे वातावरणात मिसळलेली उदासीनता आणि निराशेची भावना कमी झाली, लोकांमध्ये आशा निर्माण झाली आणि भूक, निवारा आणि रोजगार या खऱ्या प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधले गेले. या यात्रेला ज्या प्रकारचा जनसामान्यांचा प्रतिसाद दिसला त्यावरून जणू काही लोक अशा कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. आपल्या व्यथा आणि वंचितांना लोकशाही पद्धतीने मांडण्याची संधी ते शोधत आहेत, असे वाटले. या भेटीने राष्ट्रीय स्तरावर एक नवीन संवाद सुरू केला आणि आशा निर्माण केली की आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करू आणि आपल्या लोकांच्या सांसारिक गरजा पूर्ण करू शकू.

या सर्व गोष्टींमुळे फरक पडला, परंतु सांप्रदायिक शक्तींची यंत्रणा इतकी कार्यक्षम, इतकी विशाल आणि इतकी शक्तिशाली होती की त्यांनी लवकरच पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रवचनाच्या केंद्रस्थानी आणले, जे देशात फूट पाडणारे होते आणि जे देशासाठी हानिकारक होते. लोकांच्या मुलभूत गरजांशी काहीही देणेघेणे नव्हते. राम मंदिराचे उद्घाटन ही एक मोठी घटना असल्याचे वर्णन केले जात आहे. संघाच्या सर्व संलग्न संघटना या कार्यक्रमासाठी लोकांची जमवाजमव करण्यासाठी अहोरात्र झटल्या आहेत. अक्षता वाटून लोकांना अयोध्येत येण्याचे आवाहन केले गेले. 

संपूर्ण देश या दिवसाची वाट पाहत होता, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक केला. या सगळ्यात आणखी एक कार्यक्रम सुरू आहे. 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर येथून सुरू झाली असून 20 मार्चला ती मुंबईत पोहोचणार आहे. हा प्रवास हायब्रीड आहे, म्हणजे काही अंतर बसने आणि काही पायी. हा प्रवास मणिपूरपासून सुरू झाला आहे, जिथे गेल्या सात महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मणिपूरमध्ये प्रवासाच्या सुरुवातीलाच लोकांकडून यात्रेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या प्रवासाचा केंद्रबिंदू न्यायावर आहे. आज आपण आपल्या चोहोबाजूला अन्याय पाहतोेय. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती गरिबी आणि आदिवासींच्या हक्कांवर होणारे वाढते हल्ले आणि महिलांच्या प्रतिष्ठेवर या यात्रेचा भर आहे. कदाचित लोकशाही पद्धतीने सर्वसामान्यांच्या समस्या देशासमोर आणण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. मीडियाचा एक मोठा भाग केवळ आणि फक्त राम मंदिराच्या उद्घाटनाचीच चर्चा करत आहे. अशा परिस्थितीत या प्रवासाचा संदेश सर्वत्र पोहोचवणे गरजेचे आहे. राम मंदिर हा भाजप-आरएसएसचा अजेंडा असून त्यातून जातीयवादी आणि निरंकुश राजकारणाला चालना मिळेल. भारत जोडो न्याय यात्रेच्या केंद्रस्थानी घटनात्मक नैतिकतेशी संबंधित मुद्दे आहेत. हा प्रवास कोणत्याही एका पक्षाशी जोडला जाऊ नये. हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि अधिकारांची अभिव्यक्ती आहे. ज्यांना जातीय आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करायचे आहे आणि ज्यांना सर्वसमावेशक भारताऐवजी हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे, त्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.

भारतात, प्रवास हे सर्वसमावेशक मूल्ये जपण्याचे आणि त्याचा संदेश व्यापकपणे पसरवण्याचे एक माध्यम आहे. आज, जेव्हा वैचारिक प्रचार आणि राजकीय मूल्यांची संपूर्ण यंत्रणा एका मागासलेल्या राजकीय युतीद्वारे नियंत्रित केली जाते, तेव्हा न्यायासाठीचा मोर्चा ताज्या हवेच्या श्वासासारखा आहे. कोणीतरी पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रवादाची ज्योत पेटवू पाहत आहे. (अमरीश हर्देनिया यांनी इंग्रजीतून हिंदीत रूपांतरित केले. तर हिंदीतून मराठीत रूपांत बशीर शेख यांनी केले. मूळ इंग्रजी लेख अधिक माहितीसाठी पहावा. लेखक आयआयटी मुंबई येथे शिकविलेले असून 2007 राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत.


- राम पुनियानी


 


कोणतीही परीक्षा घेण्यापूर्वी परीक्षा देणाऱ्याला चांगले शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले जाते. सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. मग परीक्षा घेऊन पेपर तपासले जातात आणि निकाल घोषित केला जातो. मानवी जीवनसुध्दा परीक्षाच आहे आणि या परीक्षेचेही असेच काही साधेसे नियम आहेत. सांसारिक जीवनात कोण चांगली कामे करत राहिला आणि कोण वाईट मार्गावर चालत राहिला याची तपासणी कयामतच्या दिवशी केली जाईल. मग कोण पास झाला आणि कोण नापास हे उघड होईल. ईश्वराच्या आज्ञापालनात यशस्वी ठरणाऱ्या निष्ठावंतांना ईश्वराकडून भरघोस बक्षिसे देण्यात येतील आणि अवज्ञाकारी ठरणाऱ्या बंडखोरांना ईश-न्यायालयात अनंतकाळासाठी शिक्षा ठोठावण्यात येईल; म्हणून माणसाने जन्मभर केलेल्या कर्मांची फाईल निकाली निघण्यापूर्वी आपल्याला काय शिकवले गेले हे मृत्यूपूर्वीच पाहणे अत्यावश्यक आहे. परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक गोष्टी आपल्याला मिळाल्यात का? याचीही खात्री करून घेणे गरजेचे आहे.

माणसावर अल्लाहच्या अमर्यादित कृपा आहेत. त्यातील तीन कृपा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे माणसाला मिळालेली श्रवणशक्ती, दृष्टी आणि बुद्धी होय, जेणेकरून माणसाने आपल्या डोळ्यांनी सृष्टीचे निरिक्षण करावे आणि आपल्या निर्मात्याला ओळखावे. त्याच्या आज्ञा ऐकाव्यात. सत्य काय आणि असत्य काय हे समजावून सांगणाऱ्यांचे बोलणे शांतचित्ताने ऐकून घ्यावे. योग्य काय व अयोग्य काय हे आपल्या बुध्दीनेही ओळखावे. याशिवाय माणसामध्ये आत्माही फुंकला गेला. ज्याद्वारे माणसाला खुद्द बरे-वाईट ओळखता येते. परीक्षेसाठी इतक्या आवश्यक व मुलभूत गोष्टी माणसाला पुरेश्या होत्या, तरीही अंतिम न्यायालयात माणसाने कोणतेही कारण देऊ नये याकरिता आणखी एक सुविधा म्हणून अल्लाहने पैगंबरांची श्रृंखला चालवली. माणसांना परीक्षा देणे सोपे जावे यासाठी अल्लाहने माणसांतूनच काही लोकांना मार्गदर्शक म्हणून निवडले, ज्यांना पैगंबर म्हणतात. ते सर्व उच्च चारित्र्याचे होते. त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग नव्हता. अल्लाहने त्यांच्यावर ज्ञान अवतरित केले. माणसांनी काय करावे आणि काय करू नये हे त्यांनी आपल्या जीवन चरित्रातून स्पष्ट केले आणि परीक्षा सोपी केली, जेणेकरून माणसाकडे कोणतीही सबब शिल्लक राहू नये. आता कयामतच्या दिवशी कुणीही असा तर्क करू शकणार नाही की सत्य-असत्याच्या बाबतीत मला काहीही माहीत नव्हते. हेही म्हणू शकणार नाही की माझा जन्म अधर्मी वातावरणात झाला होता जिथे सारे एकाच रंगात रंगलेले होते, किंवा पोटापाण्यासाठी वणवण फिरताना मला कधीच कळले नाही की सत्य मार्ग कोणता, खऱ्या श्रद्धा कोणत्या व खोट्या कोणत्या यावर मी कधी विचार केला नाही, किंवा मरणोत्तर जीवनाविषयी मला काहीही ठाऊक नव्हते, इत्यादी कोणतीही कारणे माणूस देऊ शकणार नाही. 

अल्लाहने मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबरांना नियुक्त करण्याचे काम प्रथम मानव आदरणीय आदम (त्यांच्यावर शांती असो) यांच्यापासूनच सुरू केले आणि सर्वात शेवटी आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्यावर ही साखळी पूर्ण केली. आदरणीय मुहम्मद (सल्ल.) हे अंतिम पैगंबर आहेत. सुरुवातीपासून सर्व पैगंबरांचा एकच धर्म होता, ज्यामध्ये लोकांनी ढवळाढवळ केली होती. सत्य मार्गामध्ये असत्याची भेसळ केली होती. आदरणीय पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी त्या मूळ धर्माला भेसळीपासून शुद्ध केले आणि मूळ स्वरूपात सादर केले. आता अंतिम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांची आज्ञा पाळणे म्हणजे ईश्वराची आज्ञा पाळणे होय आणि त्यांची (सल्ल.) अवज्ञा करणे म्हणजे ईश्वराची अवज्ञा करणे होय. 

एक गोष्ट नीटपणे समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे या युगात कयामतचा दिवस येईपर्यंत आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) आणि पवित्र कुरआनमधील शिकवणी शिवाय ईश्वराच्या आज्ञापालनाचा खरा आणि सरळ मार्ग दुसरा कोणताही नाही. आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर पैगंबरीय श्रृंखला संपुष्टात आली. विश्व निर्मात्याला जेवढे मार्गदर्शन करायचे होते, ते सर्व त्याने कुरआनच्या स्वरूपात आपल्या अंतिम पैगंबरावर अवतरित केले. आता जो कोणी सत्याचा शोध घेऊ इच्छितो आणि ईश्वराचा आज्ञाधारक भक्त बनू इच्छितो, त्याला ईश्वराच्या अंतिम पैगंबरावर विश्वास ठेवणे, त्यांनी शिकवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. कुरआनमध्ये याच गोष्टीची घोषणा करताना म्हटले गेले आहे,

याअय्युहन्नासु क-द जा’अकुमुर्-रसूलु बिलहक्कि मिर्-रब्बिकुम  फ-आमिनू खैरल्-लकुम, व इन तक्फुरू फ-इन्-न लिल्लाहि मा फिस्-समावाति वल्-अर्जि, व कानल्लाहु अलीमन हकीमन.

अनुवाद 

लोकहो! हा पैगंबर तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य घेऊन आला आहे. श्रद्धा ठेवा, हेच तुमच्या भल्याचे आहे आणि नकार देत असाल तर लक्षात ठेवा आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, बुध्दीमान आहे. ( 4 अन्-निसा : 170 )

म्हणजे हे लोकहो! अल्लाहचे पैगंबर आदरणीय मुहम्मद (सल्ल.) हे सत्य मार्ग घेऊन तुमच्याकडे आले आहेत. लोकांनी ईशधर्मात जी भेसळ केली होती त्यामुळे सत्य काय आणि असत्य काय हे कळणे अवघड बनले होते, पण आता या सर्व भेसळींपासून शुद्ध होऊन धर्म हा आपल्या परिपूर्ण रूपात तुमच्याकडे परत आला आहे. त्यावर श्रद्धा ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही ते नाकारले तर लक्षात ठेवा की यामुळे ईश्वराचे काहीही बिघडणार नाही. नुकसान तुमचेच होईल. अल्लाह एकमेव ईश्वर आहे. आकाशांत आणि पृथ्वीत जे काही आहे त्या सर्वांचा तो एकमेव स्वामी आहे आणि प्रत्येक जण त्याच्याच नियंत्रणात आहे. तो प्रत्येकाची कृत्ये जाणतो. सरतेशेवटी तो प्रत्येकाला चांगल्या कर्मांसाठी बक्षीस देईल आणि दुराचाराची शिक्षाही देईल. आज ही गोष्ट पुढे ढकलली जात आहे म्हणून हे समजू नका की हिशोब होणार नाही. सध्या तो फक्त संधी देत असल्यामुळे पकड टळलेली आहे.

शैक्षणिक परीक्षा आणि जीवन परीक्षा यात मात्र मोठा फरक आहे. विद्यार्थी शैक्षणिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळते, पण जीवनाची परीक्षा पूर्ण झाली, म्हणजे कर्म करण्याची मुदत संपल्यानंतर माणसाचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा ही परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. मृत्यूनंतर, एकतर सुखी व आनंददायी जीवन आहे किंवा दु:ख आणि यातना आहेत. हे नीटपणे लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे.

.............................. क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



जगातील सर्वच धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञानामध्ये महिलांना मानवाधिकारापासून वंचित केले गेलेले आहे आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या आहेत. इस्लाम असा एकमेव धर्म आहे ज्यामध्ये महिलांना अत्यंत सन्मानाच्या नजरेने पाहिले गेलेले आहे आणि पुरूषांच्या बरोबरीने त्यांचे मुलभूत अधिकारसुद्धा स्विकारले गेलेले आहेत. मात्र दुर्दैव असे की, इस्लामला माननाऱ्यांनीसुद्धा आपल्या संस्कृती आणि चालीरितींवर इतरांचा प्रभाव स्विकारून मुस्लिम महिलांना त्यांच्या अनेक ह्नकांपासून वंचित ठेवलेले आहे. उदा. घरातून बाहेर पडण्याच्या बाबतीत त्यांच्यावर अनावश्यक प्रतिबंध लादले आहेत. त्यांच्या आवाजाला सुद्धा परद्याच्या शर्ती लागू केल्या गेल्या आहेत. अज्ञात आणि अस्पष्ट संकटांचे कारण पुढे करून त्यांचा दाखला मस्जिदींमध्ये प्रतिबंधित केलेला आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात शिक्षणापासूनही वंचित ठेवले गेले आहे. फार तर त्यांना घरेलू गोष्टींचे शिक्षण दिले गेले आहे. इस्लामच्या सुरूवातीच्या काळामध्ये मुस्लिम महिला ह्या सामाजिक गतीविधींमध्ये सहभागी होत होत्या. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची खास व्यवस्था केली होती. त्यांनी पुरूषांना ताकीद केली होती की, ज्या महिला मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येऊ इच्छितात त्यांनी त्यांना प्रतिबंध करू नये. प्रेषितांच्या काळात मस्जिदी ह्या फक्त नमाजचीच नव्हे तर शिक्षणाची केंद्र होती. त्यांच्यामध्ये हदीसचे ज्ञान असणाऱ्या महिला होत्या ज्या सामान्य महिलांना हदीसचे शिक्षण देत होत्या. अशा तज्ज्ञ महिलांच्या वर्गामध्ये महिलाच नव्हे तर पुरूषसुद्धा मोठ्या संख्येने हदीसचे शिक्षण घेत होते. माहित नाही कसे पण एका हदीसमध्ये महिलांसंबंधी ’अल्पबुद्धीच्या’ या शब्दाचा अर्थ असा लावला गेला की, महिला या पुरूषांच्या तुुलनेमध्ये कमी बुद्धीमान असतात. जर मुलींना शिक्षणाच्या योग्य संधी मिळाल्या तर त्या मुलांच्या बरोबर किंबहुना अनेकवेळा त्यांच्यापेक्षा जास्त सरस पद्धतीने शैक्षणिक प्रगती करू शकतात. आणि असे इस्लामच्या सुरूवातीच्या काळात घडलेले सुद्धा आहे. प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौलाना मुहम्मद शफी यांनी मारेफुल कुरआन नावाचे भाष्य लिहिलेले आहे त्यात सुरे अनआम आयत क्र. 151 च्या संबंधी भाष्य करताना त्यांनी लिहिलेले आहे की,‘‘ या आयातींमध्ये गुन्ह्याचा जो उल्लेख केला गेलेला आहे तो सकृतदर्शनी हत्येसंबंधी आहे. मात्र यासंबंधी अधिक विचार केला तर आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण न देणे ज्याच्या परिणामास्वरूप मुलं ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. तसेच मृत्यूपरांत जीवनासंबंधी गाफिल राहिलीत किंवा ते वाईट मार्गाला लागतील किंवा अश्लिलतेमध्ये लिप्त होतील, तर हे सुद्धा स्वतः स्वतःच्या मुलांची हत्या करण्यापेक्षा कमी गंभीर कृत्य नाही. जे पालक आपल्या पाल्यांना चांगल्या सवयी आणि चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत नाहीत आणि त्यांना मोकळे सोडून देतात किंवा अशा चुकीच्या सवयी त्यांना लावतात, ज्याच्या परिणाम स्वरूप इस्लामी चारित्र्य त्यांच्यात निर्माणच होत नाही. पालकांचे हे कृत्य सुद्धा मुलांच्या हत्येपेक्षा कमी नाही. आणि स्पष्ट आहे हत्येचा परिणाम फक्त जगातील जीवनावरच नाही तर पारलौकिक जीवनावर सुद्धा होतो. (संदर्भ : तफसिल मारेफुल कुरआन, खंड 3, पान क्रं.484).

मुलींचे शिक्षण आणि विशेष करून इस्लामी शिक्षण सध्याच्या काळात आवश्यक आहे. मुलींवरच या समाजाचे भविष्य अवलंबून आहे. अनेक कारणं आहेत ज्यामुळे मुस्लिमांची नवीन पीढि इस्लामपासून दूर होत आहे. आज इस्लामी शिक्षण घेणाऱ्या मुली उद्या आई बनतील आणि त्यांच्या कुशीत मुलं लहानाची मोठी होतील. तेव्हा त्या मुलांचा इस्लामशी संबंध दृढ होईल आणि बाहेरील जगातील अपरिचित गोष्टींचा त्यांच्यावर वाईट परिणाम होणार नाही.


- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली


पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे



इतिहास म्हणजे काय, किती वर्षांआधीच्या काळाचा इतिहास सत्यावर आधारित आहे असे समजले जाऊ शकते, काळाची कोणती मर्यादा ठरवली जाऊ शकते? म्हणजे शंभर वर्षांपूर्वीच्या १००० वर्षांपूर्वीच्या लिखित वा अलिखित घटनांना आपण सत्यावर आधारित गृहीत धरू शकतो? याहूनही अधिक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या माणसांनी इतिहास लिहिला तो जसाच्या तसाच १००० वर्षांनी जरी आमच्यापर्यंत पोहोचला तर आपण त्याला सत्य इतिहास म्हणू शकतो का? इतिहासकाराच्या भूमिकेचादेखील प्रश्न उभा राहतो. ज्याने इतिहासाची मांडणी केली त्याचा खराखुरा हेतू भावी पिढ्यांपर्यंत तो इतिहास पोहोचवण्याचा होता की त्याचे स्वतःचे काही उद्दिष्ट होते? त्या त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्याने इतिहासाची मांडणी केली. त्याला जे आवडले त्याच घटनांची त्याने निवड केली आणि ज्या घटना सर्वांच्या नसतील त्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्याने त्यांची नोंद घेतली नाही. इथे प्रश्न उभा राहतो की इतिहास म्हणजे खरेच सत्यावर आधारित घटनांची नोंद की काल्पनिक घटनांचे वर्णन? कारण एक भला मोठा काळ संपल्यानंतर ज्या मानवी समाजाने आपल्या राष्ट्राविषयी (राष्ट्राची कल्पना मुळात त्या काळी विकसित झाली होती की नाही अथवा आपण सध्याच्या युगात संदर्भात मागे होऊन गेलेल्या मानवी समूहांना एक भौगोलिक राष्ट्र म्हणतो हाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे.) जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्यासाठी कपोलकल्पित कथांची निर्मिती होते, हा इतिहास असू शकतो का?

आणखिन एक महत्त्वाचा प्रश्न असा की मुळात इतिहासाचा प्रवास मागील पिढ्यांपासून नंतरच्या पिढ्यांपर्यंत कोणाच्या आधारे होतो? इतिहासकारांच्या निधनानंतर त्यांनी संपादन केलेल्या साहित्यात येणाऱ्या पिढ्या ढवळाढवळ करत असतील का? करत नाहीत याचे पुरावे आहेत का किंवा केले जातात हे गृहीत धरले जावे का? त्यांच्यापर्यंत जो इतिहास पोहोचला आहे त्याची वैधता त्यांनी तपासून घेऊन मगच भावी पिढ्यांपर्यंत तो इतिहास जसाच्या तसा पाठवला जातो की त्यातील काही घटना वगळून त्या जागी लोकांना आवडतील अशा घटनांचा समावेश केला जातो?

कोणत्याही काळातील समूहाला आपल्याला सोयिस्कर आणि आकर्षित करणाऱ्या इतिहासाची आवड असते. काही मानवी समूह आपण इतिहास घडवू शकत नाही अशा विचारात असतात. त्याचा नेमका अर्थ काय? कोणत्याही समाजाचे या जागतील जीवनयापन हे खऱ्या अर्थाने इतिहास असतो. पण काहींना तो जसाच्या तसा आवडत नाही. आपल्या स्वप्नातील इतिहास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि म्हणून प्रश्न असा पडतो की इतिहासकाराने संपादन केलेला इतिहास हा खरा की नंतरच्या पिढ्यांनी त्या इतिहासात आपल्या स्वप्नांनुसार आशा-आकांक्षांना सामावून घेण्यासाठी मूळ इतिहासात या गोष्टींचा समावेश केला असेल तर मग याला खरा इतिहास म्हणता येईल काय?

इतिहासाचा प्रवास एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सदैव चालू असतो. प्रत्येक पिढी आपल्या इच्छा-आकांक्षांनुसार इतिहासाची मांडणी करत असताना मानवी समाजाचा मूळ इतिहास कोणता आणि यात किती बदल झाला? मानवांच्या आपल्या इच्छेनुसार इतिहास संपादन करण्यामागचे उद्दिष्ट काय? किंवा इतिहासाचे चक्र एकानंतर दुसर्‍या युगात पदार्पण करताना खरा इतिहास किती प्रमाणात शिल्लक राहतो? हा महत्त्वाचा प्रश्न. मानवी स्वभावाचे हे वैशिष्ट्य आहे की तो इतिहासात जगत असतो. त्याला वर्तमान आणि भविष्याविषयी काहीही महत्त्व वाटत नाही. याचे कारण वर्तमान त्याच्या इच्छांनुसार मिळत नाही आणि भविष्य त्याच्या माहितीपलीकडे असते. खरी समस्या ही की कोणत्याही मानवी समाजाला इतिहास जगता येत नाली. भविष्याविषयीची त्याला कल्पना नसते. अशा परिस्थितीत प्रश्न असा उद्भवतो की माणसाच्या ह्या स्वभावाचे कारण काय? कारण एकच आपल्या अवतीभवती इतर समूहांना, राष्ट्रांना, सभ्यतांना तो ज्या समूहाशी, सभ्यतेशी निगडीत आहे ती सभ्यता त्याला आवडत नसून इतरांप्रमाणे पराक्रम गाजवत एका नव्या सभ्यतेची स्थापना करण्याचे त्याचे उद्दिष्ट असते.

सभ्यता म्हणजे काय? भौतिक प्रगती, नव्या गांची, शहरांची निर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञानाची निर्मिती की भव्यदिव्य इमारतींची निर्मिती? सर्व घटक खऱ्या अर्थाने सभ्यतेच्या व्याख्येत येत नाहीत. सभ्यता म्हणजे विभिन्न समाजांचा समूह. ज्याचे जगणे आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असते. एक असा समाज ज्यात कुणाशी कोणत्याही निकषावर भेदभाव केला जात नाही. तो सर्वसमावेशक समाज असायला हवा. अशा मानवी समूहाची जडणघडण नैतिक मूल्यांवर आधारित असावी. सर्वांशी न्याय्य वर्तणूक केली जावी. समाजातील सर्व नागरिकांना एकसारखे मूलभूत अधिकार असावेत. थोडक्यात फक्त शक्ती आणि संपत्तीच्या जोरावर एखाद्या सभ्यतेची निर्मिती होऊ शकत नाली. अशा सभ्यतेची एक संस्कृती असते. संस्कृती म्हणजे समाज-समूहातील आंतरिक आणि बाह्य जीवन नियमित करणे. भौतिक जीवनाच्या सुविधांची पूर्तता करताना कोणत्याही अल्पसंख्य समूहाला वगळू नये. यासाठी एक उच्चस्तरीय धार्मिक परंपरेची गरज असते. त्याची पूर्तता केले जावे. सभ्यतेच्या वरोल्लेखित मापदंडाविरुद्ध एखाद्या समाज-समूहाचे आचरण असेल तर त्याला सभ्यता म्हणता येत नाली. म्हणजेच आध्यात्मिक मूल्यांची सभ्यता ही अमानुष समाज-समूह आणि सुसंस्कृत समाजामधील सीमा ठरते. कारण मानवी समाज आणि सभ्यता परस्पर भिन्न नाहीत. धर्माच्या आधारावर समाजातील मानवामानवांमध्ये भेदभाव करणे तितकेच कठोर असते, जितकी पर्यावरणाची संकटे कठोर असतात. अशा समाज-समूहात एक प्रकारची पतनाची प्रक्रिया सुरू असते आणि शेवटी त्या सभ्यतेचा अंत होतो. कारण सभ्यतेचा समृद्धीच्या उलट त्याचा प्रवास सुरू होतो.

जगातील नव्या आव्हानांमध्ये शैक्षणिक, तंत्रज्ञान, वैज्ञानिक, बौद्धिक, आर्थिक वगैरेंचा सामना करण्याचे साहस नसेल किंवा त्या आव्हानांना प्रत्युत्तर देण्यासाठीसुद्धा गत काळातील वैभवास पुनरुज्जीवित करण्याचे, मागील इतिहासाला जीवंत करण्याचे प्रति-आव्हानसुद्धा उभे केले जात असते, जे एका नव्या क्रांतीची सुरुवात असते. ती क्रांती कोणत्या दिशेने कार्य करेल याची खात्री नसते. जगात कितीतरी लहानसहान सभ्यातंनी हा मार्ग अनुसरला पण त्यांना अर्थातच यश मिळाले नाही. याचे कारण त्या त्या सभ्यतांमध्ये संकुचित धार्मिक आणि वैचारिक परंपरा, संस्कृतीच्या आहारी गेल्या होत्या. ख्रिस्ती जगतात हे आव्हान इतके शक्तिशाली होते की त्यांनी ख्रिस्ती सभ्यतेचा उद्गम होण्याची सर्व दारे बंद करून टाकली, जी कोणती सभ्यता सध्या ख्रिस्ती जगतात आहे ती आधुनिक विचारांवर, तंत्रज्ञान आणि आर्थिक शक्ती यांची सभ्यता आहे. त्यास ख्रिस्ती धर्मिय सभ्यता म्हटले जाऊ शकत नाली. कशाच्याही कोणत्याही प्रक्रियेचा जन्म हा फक्त एक घटना असते. वृद्धी ही सतत चालणारी प्रक्रिया असते. बऱ्याच समाज-समूहांना, राष्ट्रांना ह्या गोष्टीचे आकलन झाले नसल्याने त्यांनी एखाद्या नव्या संस्कृती-सभ्यतेची सुरुवात केली, पण तिची वाढ करणे, तिला समृद्ध करणे याकडे त्यांनी लक्ष दिले नसल्याने त्या त्या समाज-समूहाचा अंत झाला आणि त्यांचा इतिहास सुदधा कुठे सापडत नाही, कारण इतिहासाची मांडणी करण्यासाठी शैक्षणिक, बौद्धिक क्षमतेची गरज असते, ज्याचे महत्त्व त्या समाज-समूहांना समजले नाही.

कोणत्याही सभ्यतेमध्ये फक्त एकाच धर्माचे, संस्कृतीचे लोक नसतात. समाजात भिन्नभिन्न व्यक्तिमत्व असतात. वेगवेगळ्या मानवी स्वभावांशी, सृजनशीलपणे आपसात सामंजस्य निर्माण करावे लागते. जर एकाच वर्गाची समाजात मक्तेदारी असेल तर समाजात कलह निर्माण होतो आणि ह्या कलहांची वेळीच दखल घेतली गेली नाही तर साऱ्या समाज-समूहाच्या ऱ्हासाची प्रक्रिया सुरु होते आणि दुर्दैवाने याचे भान समाज-समूहाला नसते.


- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.- ९८२०१२१२०७



'म्हैसूरचा वाघ' म्हणून प्रसिद्ध असलेला टिपू सुलतान हा एक महान द्रष्टा होता, ज्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सैन्याच्या विस्तारवादी डावपेचांचा पर्दाफाश केला आणि आपल्या देशवासीयांना आणि देशी राज्यकर्त्यांना एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

टिपूचा जन्म १० नोव्हेंबर १७५० रोजी कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील देवनहळ्ळी गावात हैदर अली आणि फातिमा फखर-उन-निसा यांच्या पोटी झाला. त्याने मार्शल आर्टचे योग्य प्रशिक्षण घेतले आणि वडिलांसमवेत अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. १७८२ मध्ये आपले वडील हैदर अली यांचा युद्धभूमीवर मृत्यू झाल्यानंतर टिपू म्हैसूरचा शासक बनला.

म्हैसूरचा कार्यभार स्वीकारताना त्याने आपल्या लोकांना जाहीर केले - 'जर मी तुम्हाला विरोध केला तर मी माझे नंदनवन, माझे जीवन आणि माझे सुख गमावू शकतो. लोकांचा आनंद हाच माझा आनंद आहे. मला जे आवडतं ते चांगलं आहे असं मला वाटत नाही. परंतु, माझ्या लोकांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे, असे मी मानतो. जे माझ्या लोकांचे शत्रू आहेत ते माझे शत्रू आहेत. आणि जे माझ्या लोकांशी लढत आहेत ते माझ्याविरुद्ध युद्ध पुकारत आहेत असे समजले जाईल.'

टिपूने आयुष्यभर आपले वचन पाळले. हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांच्या सततच्या आक्रमणांना सामोरे जाताना टिपू सुलतानने आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत उत्तरेतील कृष्णा नदीपासून दक्षिणेतील दिंडीगलपर्यंत सुमारे ४०० मैल आणि पश्चिमेकडील मलबारपासून पूर्व घाटापर्यंत सुमारे ३०० मैलांपर्यंत आपले राज्य पसरवले.

टिपू सुलतानने आधुनिक व्यापार, उद्योग, शेती आणि स्थापत्य अभियांत्रिकीला प्रोत्साहन दिले. क्षुल्लक गुन्हेगारांना शिक्षा म्हणून वृक्षारोपण वगैरे समाजकार्य देऊन सुधारण्याचा प्रयत्न केला. टिपू सुलतान हा बहुभाषिक होता, तो कन्नड, तेलुगू, मराठी, अरबी, पर्शियन, उर्दू आणि फ्रेंच भाषेत पारंगत होता. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्याने परिश्रम घेतले. टिपू आपल्या वडिलांप्रमाणे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बाळगणारा आणि सर्व धर्मांप्रती निःपक्षपाती होता. इंग्रजांनी टिपूला दक्षिण भारतातील आपला शत्रू क्रमांक एक समजले. हैदराबादचा ईर्ष्याळू निजाम आणि मराठे टिपूचे यश पचवू शकले नाहीत आणि त्यांनी त्याच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी केली. या सर्वांनी म्हैसूर राज्याची राजधानी श्रीरंगपट्टणमवर हल्ला केला, ज्यामुळे म्हैसूरचे ऐतिहासिक चौथे युद्ध झाले.

टिपू सुलतान आपल्या जनतेचे व राज्याचे रक्षण करण्यासाठी श्रीगंगापट्टणमच्या रणांगणात उतरला, श्रीगंगापट्टणमच्या किल्ल्यात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा करणारा त्याचा दिवाण मीर सादिक व इतरांनी केलेल्या देशद्रोहामुळे टिपू सुलतानचा पराभव झाला. ४ मे १७९९ रोजी सायंकाळपर्यंत शत्रूशी लढताना त्याच्या किल्ल्याला चारही बाजूंनी वेढलेल्या युद्धभूमीत त्याचा मृत्यू झाला.

लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


भारतीय प्रजासत्ताक दिन' हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून गणला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. हा अधिकार भारताच्या राज्यघटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली प्रत्येक नागरिकाला मिळाला आणि प्रजेची सत्ता सुरु झाली. हा  समस्त भारतीय जनतेच्या जीवनातील एक महत्त्वाचा, मौल्यवान तसेच भाग्याचा दिवस आहे. याचे कारण असे की, या दिवशी आपल्या देशाची एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. या देशातील अनेक वीररत्नांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारला या देशातून हद्दपार करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले. या अहिंसक अशा स्वातंत्र्य लढ्यातील एक वैशिष्ट्य असे की, ब्रिटिश सरकारच्या पारतंत्र्याच्या बेडीतून समस्त भारतीयांची सुटका झाली आणि दुसरे वैशिष्ट्य असे की, या देशात सर्वसामान्य जनतेची, अर्थात प्रजेची, म्हणजेच लोकांची सत्ता प्रस्थापित झाली.  लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य स्थापन झाले. त्यासाठी देशाला एका बलदंड संविधानाची निर्मिती होणे आवश्यक होते, ही गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखली व संविधान निर्मितीची जबाबदारी स्वीकारली.

भारतीय संविधान म्हणजे भारतीय जनतेसाठी घालून दिलेली जणू आचारसंहिताच आहे. घटना समितीच्या अथक प्रयत्नांतून, घटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वतापूर्ण अध्ययन आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करून तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यातून भारतीय संविधान जन्माला आले. इतर व्यक्ती, स्थळ, महात्मे,अशा कुठल्याही गोष्टींना महत्त्व न देता केवळ भारतीय नागरिकाना अर्थात या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक जनतेला दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान समर्पित करण्यात आले. आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली...ती या दिवसापासून. जगातील "सर्वोत्कृष्ट आणि विशाल असे संविधान" तयार झाले. जगभरातील लोकशाही देशांमध्ये भारतीय संविधानाची ख्याती आहे. इतकेच नाही तर सर्व कायदे, कलम आणि परीशिष्टांची विस्तृत मांडणी हेही भारतीय संविधानाचे जागतिक वैशिष्ट्य आहे. जगात इतके विस्तृत आणि स्पष्ट उल्लेखित संविधान कोणत्याही देशाजवळ नाही. आजपर्यंत या संविधानाची समीक्षा अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी केली आहे. भारतातील समाज व्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. सामान्यातील सामान्य माणूस असो किंवा अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती असो, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी मांडणी भारतीय संविधानात करण्यात आली आहे.

संविधानाबरोबरच काही मूल्येही अस्तित्वात आली. स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही त्यातील काही महत्त्वाची मुल्ये होत. या देशातील संविधान अंमलात येण्याच्या आधी या देशात प्रचंड विषमता होती. अशा परिस्थितीत खरा एकसंघ समाज निर्माण होणे, हे मुख्य ध्येय संविधानकर्त्यांच्या मनात होते. या देशातील प्रत्येक नागरिकाला दुसऱ्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटला पाहिजे, दुसऱ्याचे जे सुख दुःख ते आपले सुख दुःख वाटले पाहिजे, इतरांचे यश ते आपले यश वाटलें पाहिजे, तरच या देशात लोकशाही समाजवादाची निर्मिती झाली असे म्हणता येईल. संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला, त्या वेळी अशा उदात्त मूल्यांचा विचार करण्यात आला होता, या मूल्यांची जपणूक होण्याच्या दृष्टीने या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विचारमंथन होणे आवश्यक आहे.

या देशाचे संविधान निश्चितच श्रेष्ठ आहे. त्याला राबविणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. आपली कर्तव्य आणि जबाबदारी या भारतीयांनी नीटपणे सांभाळली तर देशाचे चित्र बदलू शकेल.

संविधानाकडे या देशातील विकासाचा दस्ताऐवज म्हणून पाहायला हवे! संविधानातील तरतुदी कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करायला हवा! राजकीय नैतिकता आणण्याचा आग्रह धरायला हवा! वैज्ञानिक दृष्टी बाळगणे आणि त्या वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे हे संविधानानुसार (कलम ५१-क नुसार) प्रत्येक भारतीयांचे मूलभूत कर्तव्य आहे. संपत्तीचे समान वितरण करण्यासाठी संपत्तीची सीमा निर्धारित करायला हवी! निर्धारित सीमेपेक्षा जास्त संपत्ती ही सरकारी खजिन्यात जमा करायला हवी! मग ती उद्योगपतींची असो, राजकारण्यांची असो, की मंदिर ट्रस्टची असो!

देश विज्ञानाच्या बळावर महासत्ता बनू शकतो. भारतात मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस बदलला तर देशही बदलेल. देशाचा विकास होईल.

भारतीय संविधानातील कायदे आजच्याही परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहेत. आजच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकत त्यांच्यात आहे. त्या कायद्यांचा वापर कसा करायचा याचा कृतिकार्यक्रम बनविण्याची गरज आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आपल्या अस्मितेचा विषय झाला पाहिजे, हा दिवस राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, देशाची लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले गेले पाहिजे, मात्र दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही, भारतातील बहुसंख्य जनता ही 'प्रजासत्ताक दिन' म्हणजे सुट्टी साजरी करण्याचा दिवस म्हणून पाहतात. या दिवशी मौजमजा, चैन करण्यात आनंद मानणारी मानसिकता वाढीस लागली आहे. अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा हीच मानसिकता वाढीस लागली आहे. मग हेच काय प्रजासत्ताक राष्ट्राचे स्वरुप, असा प्रश्न मनात उपस्थित होतो. देशातील भ्रष्टाचाराचे स्वरूप दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप घेते आहे, भ्रष्टाचाराचा राक्षस सामान्य जनतेला गिळंकृत करीत आहे, यामुळे सामान्य जनतेचा घटना आणि लोकशाही या दोन्ही वरील विश्वास कमी होत चालला आहे, त्यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात देशाचे फार मोठे नुकसान होत आहे.

धर्मधर्मातील व जातीजातीतील द्वेष वाढत चालले आहेत. त्यातून माणसा माणसांत व समाजा समाजांत फार मोठी दरी निर्माण झाली आहे. याशिवाय स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार, वाढती महागाई, वाढते दारिद्र्य, बेसुमार बेरोजगारी यांसारख्या अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. कायदे पालनाबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. याकरिता प्रत्येक भारतीयाने संविधानाविषयी आदर व अभिमान बाळगून राज्य घटनेचे गांभीर्य ओळखून पालन केले पाहिजे.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

प्रेरणादायी सत्यकथा

ही कथा एका अशा मुलाची आहे जो लहान वयातच अनाथ झाला होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई व आजोबांनी त्याचा सांभाळ केला. त्याने खूप शिकावे, ज्ञानी व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. बालपणापासूनच आईने त्याला चांगले शिक्षण द्यायचे ठरवले. मुलगाही फार हुशार होता. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण मिळवण्यासाठी परदेशात निघाला.

त्या काळात बगदाद हे ज्ञानाचे माहेरघर समजले जायचे. उच्च शिक्षण मिळवण्यासाठी दूरदूरून विद्यार्थी तेथे येत असत. वाळवंटी प्रदेश, पायी प्रवास करण्याच्या तयारीने, हा नवतरुणही बगदादला जायला निघाला. तेव्हा त्याच्या आईने त्याला चाळीस दिनार दिले. दिनार सुरक्षित राहावेत म्हणून आईने शर्टाच्या बगलेत आतल्या बाजूने ठेवून शिवून घेतले. दिनार इतके सुरक्षित होते की बाहेरून कोणालाही त्याचा पत्ता लागत नव्हता.

प्रवासाला निघताना आई म्हणाली, "हे बघ बेटा, मी तुला नेहमी सत्य बोलण्याचा सल्ला देते. कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही खोटे बोलू नकोस. खोटे बोलणे हे मोठे पाप आहे."

आईचा निरोप घेऊन नवतरुण काफिल्यासोबत बगदादकडे रवाना झाला. हा ताफा 'हमदान' येथून पुढे निघाला असता अचानक दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी काफिल्याची सर्व मालमत्ता लुटली; पण त्या मुलाकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही.

थोड्या वेळाने एक दरोडेखोर मुलाकडे आला आणि सहज त्याला विचारले, "तुझ्याकडे काय आहे?"

मुलाने सांगितले,  "माझ्याकडे चाळीस दिनार आहेत."

सर्व जण आपली मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा मुलगा सहज सांगतोय 'माझ्याकडे चाळीस दिनार आहेत!' तेव्हा दरोडेखोराला वाटले, हा उगाचच मस्करी करतो आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष न देता तो पुढे निघून गेला.

त्यानंतर दुसरा दरोडेखोर आला, त्यानेही तोच प्रश्न केला. त्यालाही मुलाने सत्य सांगितले; पण त्यालाही वाटले हा मुलगा विनोद करतोय आणि तो निघून गेला. दोघांनी जाऊन ही घटना त्यांच्या प्रमुखाला सांगितली. सरदाराने त्यांना मुलाकडे पाठवले आणि ते मुलाला सरदाराकडे घेऊन गेले.

दरोडेखोर एका टेकडीवर बसून लुटलेल्या मालाची वाटणी करत होते. सरदाराने मुलाकडे पाहिले आणि विचारले, "खरे सांग, तुझ्याकडे काय आहे?"

मुलगा म्हणाला, "चाळीस दिनार आहेत."

सरदारने विचारले, "ते कुठे आहेत?"

मुलगा म्हणाला, "ते काखेखाली शर्टाच्या आत शिवलेले आहेत."

सरदारने मुलाचे शर्ट काढून उसवून पाहिले. खरोखरच त्यात चाळीस दिनार होते. आश्चर्यचकित होऊन सरदार म्हणाला, "आम्ही दरोडेखोर आहोत आणि जी काही संपत्ती मिळेल ती लुटतो. हे तुला माहीत आहे ना? मग तू आमच्यापासून हे लपवून का ठेवले नाहीस?"

मुलगा म्हणाला,"माझ्या आईने मला निरोप देताना मला सल्ला दिला होता की, नेहमी खरे बोलले पाहिजे. वाईट प्रसंग आला तरी खोटे बोलू नये. मग मी या चाळीस दिनारांसाठी खोटे कसे बोलू शकेन?"

हे ऐकून सरदार अंतर्मुख झाला. तो इतका भारावला की त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने एक थंड उसासा टाकला आणि म्हणाला, "अरे! तू तुझ्या आईचे शब्द पूर्ण केलेस आणि मी.... इतके दिवस अल्लाहला दिलेले वचन मोडत आहे. त्याच्या भक्तांना लुटत आहे."

असे म्हणत त्याने मान खाली घातली. आपल्या पापांचा प्रायश्चित्त करू लागला. दरोडेखोरीचा त्याग करण्याची घोषणा केली. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, "तुम्ही स्वतंत्र आहात. मी हा मार्ग सोडला"

त्याच्या साथीदारांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्याला म्हणाले, "तू दरोडेखोरीत आमचा नेता होता, आता तू बदललास, प्रायश्चित करून सत्मार्गाला लागलास. या मार्गातही तू आमचा सर्वांचा नेता आहेस. आम्हीदेखील हा मार्ग सोडतो."

सर्व दरोडेखोरांनी पश्चात्ताप केला आणि काफिल्याची सर्व मालमत्ता परत केली.

हे नवतरुण होते अब्दुल कादर रह. इराक मधील 'जीलान' या शहरात त्यांचा जन्म झाला होता. त्यावरून त्यांचे नाव अब्दुल कादर जीलानी (रह.) असे पडले. त्यांच्या एका सत्य बोलण्याने दरोडेखोरांनी सत्मार्ग स्वीकारला. खरोखरच सत्याची शक्ती अपरंपार आहे.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


जगभरातल्या राजकारण्यांची एकच चिंता असते. ज्या गोरगरीब जनतेला त्यांनी आपले हक्काचे मतदार समजून वेठीस धरलेले असते त्यांच्यावर त्यांनी आपला अबाधित अधिकार गाजवत राहावा. त्यांच्यावर आपली पकड सुटता कामा नये, ते जसे जीवन जगत आहेत तशाच गरीबीत खितपत त्यांनी राहावं. निवडणुकांच्या वेळी त्यांना आश्वासनांची खैरात द्यावी. त्यांना पुन्हा त्या आश्वासनांद्वारे आपल्याकडे गहाण म्हणून ठेवावे. आजवर तर जगात कोणता सत्ताधारी, राज्यकर्ता, राजकारणी असा उदयास आला नाही ज्याला खरोखरच आपल्या जनेतला गरीबीतून मुक्त करून एका सक्षम मानवासारखे जीवन जगण्यासाठी गोरगरीबांशी खऱ्या अर्थाने सहानुभूती असावी. निवडणुका, आश्वासने या भूलभुलय्यात देशाच्या निरक्षर, अत्यंत दुर्दैवी जनतेस अडकवून ठेवण्यासाठी वाटेल ते करतात. त्यांची एकमेव चिंता अशी की गरीबांची आर्थिक स्थिती सुधारू नये, त्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा हव्या तशा मिळू नयेत, हेच सगळे प्रयत्न कोणत्याही देशाच्या सत्ताधाऱ्यांचा एकमेव आधार असतो. अशा आधारास जर कुणी आव्हान देणारा उभा राहिला तर तो सत्ताधाऱ्यांचा शत्रू ठरवला जातो. एकेकाळी बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशात कमालीची गरीबी होती आणि साहजिकच स्वातंत्र्यासाठी लढा देऊन ते जिंकल्यानंतर कोणत्याही देशाची परिस्थिती तशी होणारच होती. बांग्लादेशाचेही तसेच झाले. परिस्थिती इतकी दयनीय होती की त्या देशाला आंतरराष्ट्रीय केराची टोपली म्हटले जायचे. अशा परिस्थितीत जेव्हा बांग्लादेश गरीबीशी झुंज देत होता. आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि बळकटपणा देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेला मुहम्मद यूनुस नामक एक अर्थतज्ज्ञ समोर आले. त्यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी एक असाधारण योजना आखली, ती म्हणजे ज्या दुर्बल घटकांना कुणी आर्थिक साहाय्य किंवा बँक कर्ज देण्यास तयार नव्हते त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. स्थानिक स्तरावर या योजनेला जे यश मिळाले त्यावरून त्यांनी ग्रामीण बँक उभारण्याचा निर्णय घेतला. १९८३ साली त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली. या बँकेला अनन्यसाधारण यश प्राप्त झाले. ल्या बँकेद्वारे त्यांनी एकूण ३४ अब्ज रुपये बिनव्याजी कर्जपुरवठा केला. एकूण एक कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की कर्जाच्या पतरफेडीची टक्केवारी ९७ इतकी आहे. मुहम्मद यूनुस यांच्या ग्रामीण बँकेच्या धर्तीवर जगभर १०० देशांत ही योजना राबविली जाते. मुहम्मद यूनुस यांच्या मानवतेच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या या महान कार्यासाठी त्याना २००६ साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. 'बँकर ऑफ पुअर' असे त्यांचे कौतुक केले जाऊ लागले. मुहम्मद यूनुस यांचा जन्म १९४० साली चिट्टगाव (बांग्लादेश) मध्ये झाला. त्यांनी १९६९ मध्ये अमेरिकेतली एका विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी.एचडी. ची डिग्री घेतली. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांची चिट्टगाव विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. आणि त्यानंतरच्या त्यांच्या प्रवासाचा तपशील वर दिलेला आहे. सध्या ते का चर्चेत आहेत याचे कारण असे की मुहम्मद यूनुस यांना ढाका येथील एका न्यायालयाने शिक्षा दिली आहे. शिक्षेचे कारण हे की त्यांनी ग्रामीण टेक्निकल कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी मजूर कायद्यांचे उल्लंघन केले, या कंपनीच्या ६४ कर्मचाऱ्यांना पर्मनंट केले नाही, कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी निधीची स्थापना केली नाही. कंपनीच्या नफ्यातून ५ टक्के इतकी रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली नाही. अशा क्षुल्लक कारणासाठी न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यूनुस यांनी स्थापना केलेल्या कंपनीचा बांग्लादेशाच्या आर्थिक व्यवस्थेत ३४ टक्के इतका वाटा आहे. तर ज्या क्षुल्लक कारणावरून एका नोबेल पुरस्कारप्राप्त जगातला असा व्यक्ती ज्याने बांग्लादेशाच्या कोट्यवधि गरिबांची आर्थिक स्थिती सुधारली त्यांना तिथल्या शासनाद्वारे शिक्षा! ज्या योजनेद्वारे बांग्लादेशाची आर्थिक स्थिती इतकी सुधारली की जगभर त्याचे कौतुक केले जाते. मुहम्मद यूनुस यांच्या विरोधात कोणताही आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप नाही. हे शासनकर्ते जे अब्जावधींचे घोटाळे करतात आणि वर्षानुवर्षे गोरगरीबांना वंचित ठेवतात, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एकही पाऊल उचलत नाहीत. उलट त्यांची हरप्रकारे पिळकवणूक करतात. रोजीरोटीच्या समस्येत त्यांना सदैव अडकवून ठेवतात, त्यांना कुठल्या न्यायालयाद्वारे कोणती शिक्षा का होत नाही, ज्या वेळी मुहम्मद यूनुस दुर्बलांसाठी झटत होते त्या वेळी सध्याच्या बांग्लादेशाचे पंतप्रधान जेलमध्ये होते. मुहम्मद यूनुस यांची चूक इतकीच होती की त्यांनी याच काळात एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार केला जर त्यांनी तसा पक्ष स्थापला असता तर शेख हसीनांचे राजकीय जीवन संपुष्टात आले असते. यूनुस यांनी नंतर कोण्ता राजकीय पक्ष न काढण्याचा निर्णय घेतला खरे, पण अशा व्यक्तीला जर बदनाम केले नाही आणि मोकाट सोडले तर हसीना वाजेद यांचे काय झाले असते? इतका हा प्रश्न आहे ज्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती आणि नोबेलविजेत्यांना जेलमध्ये डांबण्याची योजना आखली गेली.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: 9820121207


काँग्रेसच्या नेत्यांनी अंग झटकून काम केले तर चित्र पालटू शकते


काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला 14 जानेवारी रोजी मणिपूरपासून सुरूवात झाली असून 20 मार्च पर्यंत यात्रा चालणार आहे. 15 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघातून 6200 किमीची प्रवास यात्रेदरम्यान होणार आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही राज्यघटनेतील तत्वे प्रस्थापित करण्याचा उद्देश यात्रेदरम्यानचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. यात्रेदिवशीच काँग्रेसचे मुंबईतील लौकिक नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची सत्तेची माळ गळ्यात घालून  काँग्रेस नेते त्यागाच्या भूमिकेत नसल्याचे निर्देश दिले आहेत.  शिवाय, सद्यपरिस्थितीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये क्रांतीकारी उर्जेचा अभाव दिसत असून, त्यांच्या मनात राजकीय भवितव्यावरून खलबते सुरू असल्याचे देवरांवरून दिसते.

राहुल गांधीचा उत्साह जरी भारत जोडो यात्रेसारखा असला तरी काँग्रेसच्या नेत्यांत तो दिसून येत नाही, ही  सध्याची वस्तुस्थिती आहे. दिल्ली दरबारातील काँग्रेस नेते हिरहिरीने जरी भाग घेत असले तरी प्रादेशिक नेत्यांचा उत्साह म्हणावा तसा मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जनतेच्या दरबारात राहुल गांधीना पसंती वाढल्याचे चित्र पहायवसाय मिळत आहे. समाजमाध्यमांवर त्यांची बाजू मांडणारे लाखो लोक सध्या दिसून येत आहेत. इंडिया आघाडीसाठी ही यात्रा फायदेशीर ठरू शकते जर काँग्रेससह आघाडीच्या नेत्यांनी अंगझटकून जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला तर. 

भाजपाच्या ’फोडा आणि राज्य करा’च्या नीतीला जनता विटली असून, महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, प्रांतवाद, शासकीय संस्थांना हाताशी धरून विरोधकांवर तुटून पडणे तसेच विखारी भाषणामुळे माणसांची मने दुभंगली आहेत. शिवाय, आरक्षणाची नुसती आश्वासने भाजपाच्या सत्तेला खाली खेचू शकतात. भाजपाकडे लोकसभा निवडणुकीत उद्वीग्न झालेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी म्हणावी तशी विकासगाथा नव्हती. त्यामुळे भाजपाने राम मंदिराचे कार्ड खेळून ऐन निवडणुकीच्या तोंडावर बहुसंख्यांकांच्या भावनांना चुचकारले आहे. याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात होवू शकतो. काँग्रेसने एकजुटीने इंडिया आघाडीतील नेत्यांना सोबत घेऊन लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुलभूत प्रश्नांवर जरी रान उठवले तरी इंडिया आघाडीला जनतेच्या दरबारातून न्याय मिळू शकतो. महाराष्ट्रातील भाजपाच्या राजकीय खेळीला जनता कंटाळली असून, पुरोगामी विचारधारा, एकात्मतेचा इतिहास टिकवून ठेवण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभी राहण्याच्या तयारीत आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा शिवसेनेबद्दलचा निर्णय जनतेच्या मनाला पटला नाही. लोकशाही व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यामुळे सत्यासाठी व लोकशाही टिकविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता दिल्लीचे तख्त हलवू शकते. महाराष्ट्रातील नेते भारत जोडो न्याय यात्रेतून कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचून आपले विचार, उद्देश आणि विकासाची जुनी परंपरा, भविष्याचा विकासाचा नकाशा पोहोचवितात हे येणारा काळच सांगेल. मात्र काँग्रेसकडूनच जनतेच्या भल्याच्या आणि लोकशाही टिकविण्याच्या आशा आहेत, एवढे मात्र खरे. भारत जोडो यात्रेने काँग्रेसच्या आणि राहुल गांधीच्या प्रतिमेला उजळून काढले असून, जनतेच्या मनात आत्मीयतेची भावना निर्माण झाल्याने तेलंगनासह अन्य राज्यात मताचा टक्काही वाढला आहे.

- बशीर शेख



लोकशाही हा बहुमताचा आणि आकड्यांचा खेळ असला तरी लोकशाही राज्यात अल्पसंख्यांकाचे देशाच्या अस्तीत्वातील स्थान, त्याचे योगदान, ओळखीतील वाटा याला दुर्लक्षीत करता येत नाही. तसे करणे ही लोकशाही मुल्यांची अवहेलना करणारे ठरते. पण स्वातंत्र्यानतंर अवघ्या काही दशकात या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चन वगळून इतर लोक हे हिंदू आहेत. आणि त्यांची संस्कृती हीच भारतीय संस्कृती असल्याचा वसाहतकालीन हिंदू राष्ट्रवाद्यांचा विचार राज्याची धारणा बनायला लागला. अशा प्रतिगामी राज्यविचारात जगत असताना अल्पसंख्यांकांनी अधिकाधीक सतर्क होण्याची गरज असते.

अल्पसंख्यांकांनी राष्ट्रातील आपले योगदान, राष्ट्राच्या ओळखीतील त्यांचे राजकीय आणि सांस्कृतीक स्थान आधिकाधीक बळकट करणे हे बहुसंख्यांकाच्या लोकशाहीतील त्यांच्या सुखकारक भविष्यासाठी गरजेचे असते. पण मुसलमानांनी बहुसंख्यांकांचा राष्ट्रवाद सांस्कृतीक,धार्मिक आधार शोधत दिवसागणिक बळकट आणि आक्रमक होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची चुक केली. आपले या देशातील राष्ट्रीयत्व अबाधीत रहावे. आपल्या नागरीकत्वाला आधारभूत ठरेल, असा इतिहास, संस्कृती व त्याचा वारसा जपावा यासाठी त्यांनी गांभिर्याने प्रयत्न केले नाहीत. धर्म जपणे, त्यातही धर्माचा पुरोहीती अन्वयार्थ काढणे व त्यातून पुढे आलेला संक्षिप्त स्वरुपातला आणि चुकीच्या तर्कांवर आधारीत धार्मिक इतिहास इतकीच आपली ओळख आहे, अशी समज त्यांनी करुन घेतली. त्याशिवाय हा देश उभा राहत असताना आपण दिलेले योगदान, या देशाच्या भलाईचा आपण मांडलेला विचार, या देशाच्या वाटचालीची आपण निर्धारीत केलेली दिशा, त्यासाठी आपल्या इतिहासपुरुषांनी भोगलेले कष्ट याचा मुसलमानांना विसर पडत गेला. दुसऱ्या बाजूने मुसलमानांच्या या देशाच्या - (उर्वरित पान 4 वर)

निर्मितीतील भूमिकेचे विस्मरण आधिक वेगाने व्हावे, यासाठी बहुसंख्यांकवादी राष्ट्रवादी धारणा पुढे रेटणाऱ्या शक्तींनीही जोरकस प्रयत्न केले. या प्रयत्नांना अयोध्या आंदोलनातून एक विखारी चेहरा मिळाल्यानंतर मुसलमान काहीसे अस्वस्थ झाले. पण त्यांना राजकीय निद्रेतून जाग आली नाही.

बाबरी मस्जिद पाडली जाणे हा आपल्या नागरीकत्वावरचा, राष्ट्रीयत्वावरचा आणि देशावर असलेल्या आपल्या आधिकारावरील हल्ला वाटण्याऐवजी तो त्यांना आपल्या धर्मावरील हल्ला वाटायला लागला. या देशात नागरीक म्हणून आपण सामील होऊ शकतो, किंबहूना व्हायला हवे. नागरीकत्व मिळाल्यानंतर आपल्याला आपली संस्कृती, भाषा, धर्म, राजकीय प्रतिनिधीत्व जपण्याचा अधिकार आहे. तो हिरावून अधिकार घेतला जातोय अशी मांडणी करुन लोकशाहीवादी, डाव्या, पुरोगामी विचारांचे लक्ष आपल्या या समस्येकडे वेधण्याऐवजी त्यांनी शुन्य राजकीय भान व अभ्यास असणाऱ्या उलेमांना राजकीय नेतृत्व दिले. हिंदुत्ववाद्यांच्या धार्मिक ध्रुविकरणाला धार्मिक प्रतिक्रीया देऊन अधिक बळकट केले.  त्यांचा हा बालिशपणा उलट त्यांच्या नागरीकत्वाला आधिकाधीक मर्यादीत करणारा व सर्वच पातळीवर त्यांचे विलगीकरण करणारा ठरला. 

बाबरी प्रकरणानंतर अवघ्या पाच सात वर्षांत भाजप सत्तेत आला. काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्षता ही आपली ओळख दर्शवणाऱ्या पक्षाला थेट धार्मिक ओळखीवर आधारीत राजकारणाचा पर्याय भाजपने उभा केला. भाजपचे हे राजकारण हिंदुमध्ये ते बहुसंख्यांक असल्याच्या काँग्रेसने विकसित केलेल्या जाणिवेवर उभे राहिले होते. चार-पाच दशकात काँग्रेसने हिंदुना बहुसंख्यांक असल्याची जाणिव करुन दिली होती.  त्याच भांडवलावर भाजपने बहुसंख्यांकांना ते हिंदू असल्याची जाणिव करुन देऊन सावरकरी राजकीय विचार अंमलात आणला. यातून हिंदुत्वाचे राजकारण पक्के होत गेले. ज्याचा काँग्रेस कोणत्याही पातळीवर कधीच सामना करु शकणार नव्हती. कारण त्यांनी स्वतः उभ्या केलेल्या बहुसंख्यांकवादाला आलेले हे विषारी फळ होते. आतातर पुरती संपलेली काँग्रेस ही लढाई लढण्यासाठी नव्याने तात्काळ उभी राहील ही अपेक्षाही करता येणार नाही.

दुसऱ्या बाजूला मुसलमान हताशपणे हे सर्व पाहत होते. ते काही करु शकत नव्हते. कारण मुसलमानांचेे राजकीय अवकाश व्यापलेल्या त्यांच्या धार्मिक नेत्यांना ही राजकीय मुल्ये कळतच नव्हती. देशाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे? त्यातून आपल्या वाट्याला काय येणार आहे? याचा विचार त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या चार पाच दशकात केला नाही.  राष्ट्र कशावर उभे राहते. राष्ट्रातील आपले नागरीकत्व म्हणजे काय? त्याचा नेमका आधार काय? तो आपण कुठे शोधावा, याचे भान या उलेमा मंडळींना नव्हते. ते इस्लामच्या अध्यात्मिक व्याख्येवरच जीवनाचे शकट हाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून त्यांनी बहुसंख्य मुसलमानांना वैराग्य व संन्यासीपणाचे मुल्यभान देऊन त्यांना राजकीयदृष्ट्या संवेदनशून्य करुन टाकले. त्यातून राजकारणाबाहेर फेकला गेलेला मुसलमान आज बहुसंख्यांकांच्या दयेवर जगायला सिध्द झालाय.

शालेय अभ्यासक्रमात जो विचार राष्ट्रीय संस्कृती म्हणून पेरला जात होता. त्यात आपण कुठेच नाही. त्यावर आक्षेप घ्यावा. आपला देशातील सहभाग नुसता वरकरणी न राहता, अभ्यासक्रमातून या देशाच्या भावी पिढीला जो राजकीय विचार दिला जातोय त्यात तो सामील व्हावा. जर अभ्यासक्रमातील राजकीय विचार एकांगी असेल तर त्यावर आक्षेप नोंदवावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. या देशाचा इतिहास म्हणून जो इतिहास मांडला जातोय, तो चुकीचा आहे. त्यात आपले शत्रूकरण केले जातेय. या शत्रूकरणाचे बाळकडू अभ्याक्रमातून घेऊन बाहेर पडणाऱ्या पिढीच्या हातात उद्याच्या भारताची राजकीय सुत्रे असणार आहेत. त्यावेळी ती पिढी आपल्याकडे कोणत्या नजरेतून पाहील याकडेही मुसलमानांचे राजकीय नेतृव करणाऱ्यांनी लक्ष दिले नाही. जर मुसलमान मुलांना अभ्यासक्रमांतून आपला इतिहास, संस्कृती, लोकजीवन, भाषा आणि जीवनमुल्ये याविषयी कसलीच माहिती मिळाली नाही, तर उद्याचा मुसलमान समाज कसा असेल? त्याला स्वतःविषयी भान कुठून येईल? तो स्वतःविषयी गाफील, अज्ञानाने ग्रासलेला असेल. अशा भविष्यातील अज्ञानग्रस्त मुसलमान समाजाचे राजकीय अस्तीत्व शून्य असेल. जर ते बळकट करायचे तर आपण आपल्या लहान मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. याची जाणीव मुसलमानांना कधीच झाली नाही. गल्लीतील रस्त्यांपासून, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, पुतळे, स्मारके, प्रतिकं यात आपण, आपली संस्कृती, आपला इतिहास, या देशाला घडवणारे मुसलमान इतिहासपुरुष कुठेच दिसत नाहीत. हे वगळले जाणे मुसलमानांना काँग्रेसच्या सत्तेत किंवा आजही कधीच बोचले नाही. त्यातून ते अस्वस्थही होत नाहीत. त्यांची ही संवेदनाहीनता त्यांच्या आजच्या अवस्थेला पुरेशी जबाबदार आहे. 

ढासळणारा आपला मतदानाचा टक्का, मतदार याद्यांमध्ये होणारी अफरातफर, कमी झालेले मुस्लीम प्रतिनिधीत्व, मुस्लीम वस्त्यांचे होणारे झोपडपट्टीकरण, गलीच्छ नागरी वस्त्या, समाजातील शिक्षणसंस्थांची कमी होत जाणारी संख्या, वाढणारे बालमजूरांचे प्रमाण, खाली आलेला आरोग्याचा स्तर, वाढत चालले असंस्कृत जगणे, गरीबीचा उंचावत जाणारा आलेख, पतसंस्था, बँका वगैरेंचे नगण्य प्रमाण यावर मुसलमानांनी कधी मोर्चे काढले नाहीत, आंदोलनं उभी केली नाहीत. बालमजूरीचा प्रश्न उलेमांच्या शुक्रवारच्या खुतब्याचा विषय झाला नाही. शुक्रवारचे खुतबे ज्याला राजकीय महत्व होते, त्यात जेवण करण्याची पद्धत, नखे कापण्याच्या वेळा, कपडे कसे घालावे, किती इंचाचा पायजामा असावा? दाढीची लांबी, सुरमा आणि अत्तर लावण्याची गरज, स्वर्गातल्या अप्सरा, दुध आणि मधाच्या नद्यांची स्वप्ने, पारलौकीक जीवनातील स्वप्नवत गोष्टींच्या पलीकडे येऊन उलेमांनी शुक्रवारच्या खुतब्यातून कधी तरी आजचे जळजळीत राजकीय वास्तव मुसलमानांच्या पदरात टाकले आहे?

खतना का केली जाते? त्याची आजची होणारी टवाळकी कोणत्या सांस्कृतीक मुल्यांवर आधारीत आहे? तलाकचा प्रश्न नेमका कसा आहे? राजकारणाला त्यागून आपण या देशात सुखाने जगू शकू का? शाहबानो प्रकरण काय होते? हलालाचे वास्तव काय? भारतीय मुसलमानांचा सांस्कृतीक वारसा कोणता? यावर उलेमा मस्जिदमध्ये का चर्चा करत नाहीत. नुकतेच खिलाफत चळवळीला 100 वर्षे पुर्ण झाली त्यावर खुतबे द्यावेत असे उलेमांना का वाटत नाहीत? काही दिवसांनी देवबंद चळवळीचा ऐतिहासिक दिन येईल. त्यावेळी कुणीतरी मुसलमानांना देवबंद चळवळीचा इतिहास खुतब्यातून सांगणार आहे का? इकबाल कोण होते? शिबली नोमानींशी मुसलमानांचा काय संबंध होता? ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींचे त्यांच्या इतिहासात काय योगदान? मौलाना आझादांचे तत्वज्ञान आपल्याला काय सांगते? मौलाना हसरत मोहानी कोण होते? मौलाना मदनींचे योगदान काय? यावर उलेमा मस्जिदीतून चर्चा कधी करणार आहेत? मागच्या सत्तर वर्षात मुसलमानांना स्वप्नवत जगवण्याची फळे आज मुसलमान भोगत आहेत, याची जबाबदारी कोण घेणार आहे? आपण आत्मचिंतन कधी करणार आहोत?

काळ बदललाय. ज्ञानाचे आयाम बदलत चालले आहेत. पण उलेमांनी इस्लामची व्याख्या करण्याचे जे  ठोकताळे विकसित करुन ठेवले आहेत. ते किमान सत्तर वर्षे जुने आहेत. इस्लामी ज्ञानविश्वाच्या सुवर्णकाळात म्हणजे ज्या काळात शिबली, सुलैमान नद्वी, आझाद, इकबाल लिहीत होते त्याकाळातील संदर्भ वापरुन अथवा ती दृष्टी घेऊन प्रचंड आधुनिक जगात आपण इस्लामचा अन्वयार्थ लावू शकत नाही. उत्पादनसंस्थेतील बदल, बदलत्या शोषणाची परिमाणे, राज्याची बदलती पद्धत त्याविषयी इस्लामी विचारधारा अथवा राज्याचा विचार, श्रमाचे बदलते स्वरुप त्याविषयी इस्लामी श्रमाची आणि त्याच्या मोबदल्याची संकल्पना, स्त्री शोषणात आलेल्या अनेक नव्या गोष्टी, डिजीटल जगातील नव्या बौध्दीक श्रमाची व्याख्या आपण कशी करणार आहोत? नवी शस्त्रे, नव्या युध्दपध्दती, आर्थिक रचना याविषयी आपण काय मांडणी केली आहे? इस्त्रायलच्या अन्यायाचा इतिहास सांगताना जुने मध्ययुगीन संदर्भ वापरुन या मुद्याचे फारतर अस्मितीकरण करता येईल. पण इस्त्राईलने अख्ख्या जगाच्या शोषणाचा विचार कसा पुढे आणला आहे. तो मुसलमानांनाच नाही तर मानवतेला कसा घातक आहे. याविषयी न बोलता आपण नुसती धार्मिक चर्चा करुन जगात सहानभुती हाशील करण्याचा अतिशय दयनीय प्रयत्न करत सुटलोय. पाकिस्तानसारखा देश धर्माच्या मुद्यावर बनला. तेथील मुस्लीम समाजाची जी अवस्था झालीय त्याहून निराळी बौध्दीक अवस्था भारतीय मुसलमानांची नाही. या आणि  अशा कितीतरी बाबी आहेत ज्याचे आकलन मुसलमान समाजाला नाही. उलेमा तर यापासून कोसो दूर आहेत. 

इतके झाल्यानंतरही आपला राजकीय विचार प्रगल्भ होत नाही. भारतात इतके मॉबलिंचीग होत आहेत. झुंड हत्येचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. अवघ्या दोनेक महिन्यापुर्वी पुसेसावळीची घटना घडली. मुंबई नाशिक रस्त्यावर दोन मुस्लिम तरुणांना गोळ्या घातल्या गेल्या. नाशिकात दोन झुंडहत्या घडल्या. सोळाहून आधिक ठिकाणी मुसलमान तरुणांना मारहाण झाली. धिंड काढली गेली. त्यावर मुसलमानांनी मोर्चे काढले नाहीत. आंदोलने केले नाहीत. झुंडहत्येत मरणाऱ्या मुसलमानांना उलेमांनी मोबलाईज केले ते फिलीस्तीनवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रश्नावर. त्यांना दुआ मागून रडायाला लावले जेरुसलेमच्या मुद्यावर. का तर या अन्यायापेक्षा तो मुद्दा महत्वाचा आहे. इथल्या स्थानिक अन्यायाला, विरोधात गेलेल्या सर्व राजकीय परिस्थितीवर चिंतन न करता हे स्वप्नवत जगणं आपण कधी सोडून देणार आहोत? भारत नरसंहाराच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशा अनेक रिपोर्ट आहेत. जागतिक पातळीवर त्याची चर्चाही होते. ते अहवाल आपण कधी गांभिर्याने घेतले आहेत का? साऱ्याच गोष्टी अल्लाहवर सोडून मुसलमान कोणत्या परलौकीक जीवनाला प्राप्त करु इच्छीत आहेत? अल्लाहने कुरआनमध्ये सामाजिक कर्तव्ये सांगितली नाहीत का?  राज्याची धारणा मांडली नाही का? की फक्त पाचवेळच्या नमाजचा आणि नामजपाचा आदेश दिलाय. इस्लामने जगाला नवा प्रकाश दिला. नवा विचार दिला अशी मांडणी आपणच करत आलोय. तर मग बदलत्या जगाचे संदर्भ लक्षात घेऊन आपण कधी बदलणार आहोत. की आपण स्पेन अथवा अन्य भागातील नामशेष झालेल्या मुसलमानांप्रमाणे नामशेष व्हायची मानसिक तयारी करुन बसलोय?


- सरफराज़ अहमद



हजरत हुजैफा म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स) यांनी ताकीद दिली की रेशीमाची वस्त्रे परिधान करू नका. तसेच सोन्या-चांदीच्या भांड्यामध्ये पाणी पिऊ नका आणि जेवण करू नका. कारण या वस्तू जगात फक्त नाकारणाऱ्यांसाठी आहेत आणि तुमच्यासाठी परलोकात असतील. (बुखारी, मुस्लिम)

हजरत अम्र बिन शुएब (र) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स) यांचे विधान आहे की खा, प्या, दानधर्म करा आणि चांगली वस्त्रे परिधान करा पण यामध्ये काही अतिरेक करू नका. (अहमद, निसाई, इब्ने माजा)

प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, पांढरी वस्त्रे परिधान करा कारण ते जास्त स्वच्छ आणि चांगले दिसतात आणि आपल्या मयतांचा पांढऱ्या कपड्यांच्याच कफनमध्ये अंत्यविधी करा. (अहमद, तिर्मिजी, निसाई, इब्ने माजा)

हजरत आयेशा म्हणतात की एकदा अस्मा बिन्त अबू बकर प्रेषितांच्या सेवेत पातळ कापडाच्या वस्त्रात हजर झाल्या. प्रेषितांनी त्यांच्याकडून आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाले की स्त्री तरुण वयात आल्यानंतर तर त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव इतरांना दिसू नये, फक्त चेहरा आणि हात वगळून. (अबू दाउद)

प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की माझ्या समुदायातील महिलांना सोने आणि रेशम वैध आहे पण पुरुषांसाठी निषिद्ध आहे. (तिर्मिजी, निसाई)

प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, अल्लहाने तुमच्यावर काही गोष्टी अनिवार्य केल्या आहेत त्या वाया घालवू नका. तसेच काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका. त्याने तुमच्यासाठी बऱ्याच वस्तू निषिद्ध केल्या आहेत त्यांच्याजवळ देखील जाऊ नका आणि काही इतर वस्तूंविषयी अल्लाहने मौन बाळगले आहे. ही तुमच्यावर अल्लाहची कृपा आहे. तुम्ही अशा गोष्टींचा उहापोह करू नका. (अबू सआलबा खुर्रम, अद्दारकितनी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(११२) अल्लाह एका वस्तीचे उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचे जीवन व्यतीत करीत होती आणि चहूकडून तिला विपुल उपजीविका पोहचत होती की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतघ्नता दर्शविण्यास प्रारंभ केला. तेव्हा अल्लाहने तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळे अशी चाखविली की भूक व भयाचे संकट त्यांच्यावर पसरले. 

(११३) त्यांच्यापाशी स्वत: त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला, परंतु त्यांनी त्याला खोटे लेखले. सरतेशेवटी त्यांना प्रकोपाने गाठले जेव्हा ते अत्याचारी बनलेले होते.३३ 

(११४) म्हणून हे लोकहो! अल्लाहने जी काही वैध आणि पवित्र उपजीविका तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाहच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच बंदगी करणारे असाल.


३३) नगरीला नाव न उच्चारता उदाहरण म्हणून प्रस्तुत केलेले आहे. सदरहू भाष्यानुसार भय आणि भुकेचे जे अरिष्ट पसरण्याचा या ठिकाणी उल्लेख आहे त्याने, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या नियुक्तीनंतर एका दीर्घ कालावधीपर्यंत जो दुष्काळ पसरला होता, तो अभिप्रेत आहे.



ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्या साथीदारांच्या कारस्थानांविरुद्ध आणि दक्षिण भारतातील विस्ताराच्या ब्रिटिशांच्या महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्याशी अविरत लढा देण्यासाठी 'दक्षिण भारताचा नेपोलियन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैदर अली यांचा जन्म १७२२ मध्ये कर्नाटक राज्यातील देवनहळ्ळी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फतेह मोहम्मद अली आणि आईचे नाव मुजीदान बेगम होते. त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते.

हैदर अली बुद्धीने तीक्ष्ण, इच्छाशक्तीने कणखर, एकाच वेळी अनेक कामे हाताळण्यास सक्षम आणि मनापासून शूर होते. १७४९ मध्ये म्हैसूर संस्थानाचा तरुण सैनिक म्हणून त्यांनी देवनहळ्ळी युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या शौर्याची दखल घेऊन म्हैसूर राज्याचे मंत्री नंजाराज यांनी हैदर अली यांना 'खान' ही पदवी देऊन सन्मानित केले आणि म्हैसूर सैन्यातील बटालियनचे प्रमुख म्हणून पदोन्नती दिली.

हैदर अली हळूहळू १७५८ मध्ये म्हैसूर सैन्याचा कमांडर-इन-चीफ बनले. पुढे ते म्हैसूरचे शासक झाले. हैदर अली धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी सर्व धर्मियांना समान वागणूक दिली. मराठे आणि हैदराबादच्या निजामाला हैदर अली यांच्या यशाचा आणि लोकांमध्ये त्यांच्या प्रतिष्ठेचा हेवा वाटू लागला. ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने त्यांनी म्हैसूरवर अनेकदा हल्ला केला. हैदर अली यांना सुरुवातीचे नुकसान झाले असले तरी त्यांनी यशस्वी प्रतिकार केला आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी आभासी दु:स्वप्न सिद्ध केले.

त्यानंतरही ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हैदर अलीला पुन्हा चिथावणी दिली ज्यामुळे जुलै १७८० मध्ये दुसरे म्हैसूर युद्ध झाले. ते आपला मुलगा टिपू सुलतानसोबत रणांगणावर गेले. हैदर अली यांनी आर्कोट काबीज केले, तर त्याचा मुलगा टिपूने ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा पराभव करून मद्रासपासून सुमारे ५० मैलांवर असलेल्या कांजीवरमवर ताबा मिळवला. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जला धक्का बसला. त्याने ताबडतोब कलकत्ता, मद्रास येथून आपले कमांडर जनरल सर आयर कूटे यांच्या नियंत्रणाखाली मुबलक निधीसह अतिरिक्त सैन्य पाठवले.

हैदर अलींना एकीकडे परकीय शत्रूशी लढावे लागले तर दुसरीकडे निजामाच्या सक्रीय पाठिंब्यासह त्यांच्याविरुद्ध बंड करणाऱ्या मलबार नायर आणि सरदारांना हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी चांगलाच धडा शिकवला.

हैदर अली आपल्या सैन्याला सलग विजयाकडे नेत असताना आजारी पडले आणि ७ डिसेंबर १७८२ रोजी नरसिंगरायुनी पेटा गावाजवळ, जे आता आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात आहे, युद्धभूमीत मरण पावले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम

प्रेरणादायी सत्यकथा

हातिम तायीचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. हातिम हे काही काल्पनिक व्यक्तिमत्त्व नसून एक सत्य आणि खरेखुरे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमात दाखवल्याप्रमाणे हातिम हा काही प्रश्नांची उत्तरे शोधत फिरला नाही, तर हातिम हा तायी नावाच्या एका कबिल्याचा सरदार होता. तो फार दानशूर होता. त्याचे दानत्व फार प्रसिद्ध होते. त्याचा एक मुलगा होता त्याचे नाव आदि होते. हातिम तायीच्या मृत्यूनंतर आदि हा कबिल्याचा सरदार बनला.

आपल्या वडिलांप्रमाणेच तो कबिल्याचा कारभार चालवू लागला. परंतु त्याच काळात एक नवीन शत्रू निर्माण झाला. त्या शत्रूने आदि ज्या भूभागावर राहत होता, त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कबिल्यांशी युद्ध करून ते आपल्या ताब्यात घेतले होते. अनेक कबिले त्या शत्रूच्या ताब्यात गेलेले पाहून आदिला फार चिंता वाटत होती. त्याला असे वाटत होते की निश्चितच पुढचा नंबर आपला आहे. एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती की, आपले सैन्य, आपल्याकडे असलेली ताकद ही फार कमी आहे आणि आपण त्या शत्रूचा मुकाबला करू शकणार नाहीत. या नवीन शत्रूपासून कसा बचाव करावा, याविषयी तो सतत विचार करत होता. त्यासाठी त्याने सीरिया येथील आपल्या मित्राची मदत घ्यायचे ठरविले.

शत्रूविषयी त्याच्या मनात फार चिड होती. त्याने शत्रू पाहिला तर नव्हता फक्त त्याच्याविषयी ऐकले होते. हा शत्रू फार शक्तिशाली असून क्रूर आहे. आजपर्यंत कोणीही त्याला पराभूत करू शकला नाही. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला नेस्तनाबूत करून टाकतो. अशी त्याची धारणा बनली होती तेव्हा. शत्रूविषयी लोकांना तो जागृत करत होता.

एके दिवशी अचानक त्याला समजले की शत्रूसैन्याने त्याच्या कबिल्यावर हल्ला केला आहे. आपण या शत्रूचा मुकाबला करू शकत नाही. आपण मित्रांची मदत मिळवावी या हेतूने त्याने तेथून पलायन केले आणि सीरियाला जाऊन पोहोचला. या घाईगडबडीत त्याने फक्त आपली पत्नी-मुले यांना सोबत घेतले. स्वतःची बहीण देखील कबिल्यामध्ये सोडून तो निघून गेला होता. शत्रू सैन्याला जेव्हा कळाले की आदि हा कबिला सोडून पळून गेला आहे आणि त्याची बहीण मात्र कबिल्यातच राहिली आहे. शत्रूंनी तिला अटक केली आणि आपल्या सरदाराकडे घेऊन गेले.

आदिला जेव्हा हे कळले की, त्याची बहीण कैद करण्यात आलेली आहे; तेव्हा त्याला बहिणीची खूप चिंता वाटत होती. आपल्या बहिणीला कसे सोडवावे याविषयी तो विचार करत होता. एके दिवशी मात्र असे झाले की, आदिची बहीण एका काफिल्यासह सुरक्षित सीरियाला येऊन पोहोचली. आपल्या बहिणीला सुरक्षित पाहून आदिला फार आनंद झाला. परंतु आश्चर्यही वाटत होतं की कोणताही मोबदला न घेता किंवा कोणत्याही अटी शरती न लावता कशी काय मुक्तता केली? याविषयी जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली होती.

शत्रूविषयी बहिणीने मात्र जी हकीगत सांगितली ती ऐकून आदिला आश्चर्याचा धक्काच बसला. बहीण अगोदर आपल्या भावावर रागावली की, तू मला सोडून पळून आलास. नंतर मग राग कमी झाल्यावर तिने सांगितले की ज्या शत्रूला तू वाईट समजून पळून आला होता, ज्याच्याविषयी तू नानाविध गोष्टी सांगत होता आणि त्याची बदनामी करत होता, तो सरदार तर फारच दयाळू नि कृपाळू निघाला. त्याने मला फार सन्मानपूर्वक आपल्या घरी ठेवले आणि एका सुरक्षित काफिल्यासोबत मला इथे परत पाठवून दिले. तू एकदा त्या सरदाराशी भेट. निश्चितच तुझे मत बदलेल आणि त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याऐवजी तू त्याच्याशी मैत्री करशील, असा माझा विश्वास आहे. बहिणीच्या बोलण्याने आदिला विचार करायला भाग पाडले. अशा माणसाला भेटण्याची, स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.

खूप विचार करून आदि शत्रूच्या सरदाराला भेटण्यासाठी निघाला. काही दिवसांनी सरदार आदि आपल्या साथीदारांसह शत्रू सरदाराच्या हद्दीत पोहोचला. तिथल्या लोकांनी आदिला ओळखले आणि आश्चर्याने ओरडले: अहो, हा आदि बिन हातिम आहे. पण कोणीही त्याला अडवले नाही की त्याला छेडले नाही.

आदिला, सरदाराला भेटण्यासाठी सांगण्यात आले. आदि विचार करत राहिला की, माझ्यासोबत कसा व्यवहार केला जाईल. पराभूत सरदाराप्रमाणे अपमानित केले जाईल की टोळीचा प्रमुख म्हणून सन्मान केला जाईल. विचारात हरवून तो मशिदीत पोहोचला. त्याने सरदाराला अभिवादन केले. सरदाराने त्याच्या अभिवादनाला चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आणि विचारले, "तू कोण आहेस?"

तो घाबरून म्हणाला,  "आदि बिन हातिम तायी".

"अच्छा तर, तू आदि बिन हातिम तायी आहेस!"

त्याचे नाव ऐकून आनंद व्यक्त करत आदिचा हात आपल्या हातात घेऊन सरदार घराकडे निघाला.

या वागण्याने आदिला धक्काच बसला. पराभूत सरदाराला इतकी सन्मानजनक वागणूक! वाटेत एका गरीब वृद्ध महिलेने त्यांचा रस्ता अडवला, तिच्यासोबत एक लहान मूल होते. तिने आर्थिक मदत मागितली. सरदाराने लगेच आपल्या खिशात हात घातला, जे काही रक्कम खिश्यात होती ती त्या महिलेला देऊन टाकली. हे दृश्यही आदिसाठी उल्लेखनीय होते. तो विचार करू लागला की, ही व्यक्ती राजा होऊ शकत नाही, अन्यथा सामान्य माणसाने इतके धाडस केले नसते. घरी पोहोचल्यावर आदिचे आश्चर्य आणखी वाढले, हे घर एक साधारण घर होते ज्यात बसण्यासाठी एकच जागा होती, त्यावर उशी होती. त्यावर आदिला बसायला सांगितल्यावर तो म्हणाला, "मी नाही बसणार, आपण बसावे." पण हुकूम आल्यावर त्याला बसावे लागले. यजमान त्याच्यासमोर जमिनीवर बसले. आदिची खात्री पटली की हे अस्तित्व सामान्य अस्तित्व नाही, या अस्तित्वाशी द्वेष नाही तर प्रेम केले पाहिजे. ते अस्तित्व होते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे! आदि म्हणाला, "हे मुहम्मद (स.), मी हे मान्य करतो की आपण अल्लाहचे दूत आहात." प्रेषित आदिवर खूप खूश झाले आणि त्यांनी आदिला त्याच्या काबिल्याचा अमीर घोषित केले.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065851



बिल्कीस बानो यांच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, आणि ते व्हायला हवं. कारण बऱ्याच वर्षांनी न्याय्य न्याय मिळाल्याचे समाधान एकट्या बिल्कीस बानो यांनाच नव्हे तर सर्व नागरिकांना विशेषकरून भारतचाच्या कोट्यवधी गोरगरीब, अत्याचारपीडित, अन्यायाशी झुंज देणाऱ्या लोकांना याचे समाधान झाले आहे की बिल्कीस बानो यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की मी पुन्हा श्वास घेऊ शकते, तेव्हा ती आपल्या एकटीच्या भावनांविषयी सांगत नसून या भावना खऱ्या अर्थाने या देशाच्या पीडितांच्या, असंख्य वंचितांच्या आहेत. बिल्कीस बानो यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की सध्या आपण अनन्यसाधारण वातावरणात जगत आहोत. हा एक असा काळ आहे जेव्हा देशाच्या सत्ताधाऱ्यांनी सर्व शक्ती हिरावून घेतल्या आहेत. म्हणून अशा काळात आपण या निकालाचे स्वागत करायला हवं. सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर पीडितेच्या सर्व नातेवाईकांची सामूहिक हत्या करण्यात आली होती. हे दोन्ही अपराध फक्त त्या एका बिल्कीस बानो यांच्यावरच अत्याचार नाहीत तर तो अपराध मानवजातीविरुद्ध होता. ती गर्भवती असताना तिच्यावर अन्याय करण्यात आला, तिच्या ३ वर्षांच्या चिमुकलीची जमिनीवर आपटून हत्या केली गेली, हा अपराध साधारण नाही. माणुसकी जेव्हा पशूप्रमाणे वागते तेव्हा तसे अपराध घडत असतात. हे अपराध एका नागरिकाविरुद्ध नव्हते, ते मानवतेविरुद्ध आहेत, म्हणून अनन्यसाधारण आहेत आणि म्हणून हा निकाल अनन्यसाधारण आहे. यापुढे तरी कमीतकमी असे गुन्हे घडू नयेत, हाच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ. या निकालामुळे भारतीय समाजावर परिणाम झाला तर याचे समाधान सध्याच्याच नव्हे तर पुढच्या पिढ्यांना लाभदायक ठरेल. 

जर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले तर या गुन्ह्यातील आरोपीना कमीतकमी ३० वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे बिल्कीस बानो यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांचे म्हणणे आहे. तरीदेखील या निकालाने लक्षावधी लोकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या निकालामुळे अशी खात्री झाली आहे की सर्वच काही संपलेले नाही. असा निर्णय देणारे न्यायाधीश आपल्या देशात अजून शिल्लक आहेत. अशा न्यायाधीशांना अशा प्रकारचा निर्णय देण्याची संधी कुणी दिली? जर बिल्कीस बानो जिचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला ती स्वतःसाठी न्याय मागायला उभी राहिली नसती आणि या दारातून त्या दारातून त्या दारात तिला न्य़ाय मागायला शासनांनी लावले नसते तर ज्या न्यायाच्या आशा जागवल्या आहेत त्या जागृत झाल्याच नसत्या. सर्वप्रथम बिल्कीस बानोचे आभार सध्याच्या पिढीनेच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक पिढीने मानले पाहिजेत आणि कितीही अत्याचार झाला असला तरी खंबिरपणे उभे राहायला हवे. न्यायासाठी संघर्षाची तयारी असली तरी न्यायासाठी लढणाऱ्या सर्व शक्ती तिच्या मदतीला धावून येतील.

हे सगळे सांगितल्यानंतर एका बऱ्याच गंभीर बाबीची चर्चा केली गेली नाही तर ह्या सर्व चर्चेला काहीच अर्थ उरणार नाही. आणि त्या गोष्टीकडे आपल्याकडच्या विद्वानांचे, कायदेपंडितांचे लक्ष का गेले नाही. गेले असले तरी त्यावर भाष्य करण्याचे त्यांनी का टाळले, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ती गोष्ट अशी की सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल बिल्कीस बानोच्या बाजूने देतानाच त्या ११ नराधमांनाही जी सवलत दिली त्याचा अर्थ काय आणि त्याचे उद्दिष्ट काय? ती गोष्ट ही की त्या ११ आरोपींना पुन्हा जेलमध्ये टाकण्यासाठी १५ दिवसांची सवलत दिली. याचे प्रयोजन काय आणि त्याहून गंभीर बाब ज्यामुळे या निकालाचे महत्त्व जवळपास संपुष्टात येऊ शकते ती म्हणजे १५ दिवसांची सवलत देत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयात पुन्हा फेरयाचिका दाखल करण्याची अनुमती दिली आहे. याचा अर्थ काय? त्या फेरयाचिकेवर चर्चा होऊन त्याचा निर्णय जर आरोपींच्या बाजूने लागला तर सध्या जो निकाल बिल्कीस बानोच्या बाजूने लागला आहे त्याला काही अर्थ उरणार का? पुन्हा बिल्कीस बानोने सर्वोच्च न्यायालयात जावे? आणि या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी २-४ वर्षे तर लागतीलच. २-४ वर्षांनी जर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया अशीच चालत राहील. ११ लोकांना सोडून देण्याचा निर्णय देण्यात आला तर बिल्कीस बानोने आपल्या बाजूच्या निकाल फक्त फ्रेममध्ये अडकवून ठेवावा लागेल. किंवा आयुष्यभर या कोर्टातून त्या कोर्टात चकरा माराव्या लागतील. या महत्त्वाच्या प्रश्नावर अजून तरी कोणी भाष्य केलेले नाही. याचे कारणदेखील समजत नाली. आम्हाला समजत नाही की त्यांना समजावता येत नाही, हे कुणास ठाऊक?

दुसरा एक निकाल न्यायालयात फिरत आहे, तो म्हणजे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पाडून अवैध सरकार बनवण्याचे आणि शिवसेना कोणाची या विषयीचा. सेनेत फूट पाटून टप्प्याटप्प्यांनी ४० आमदार पळवून नेल्याविषयीचा. त्या पळविलेल्या आमदारांच्या पाठिंब्यावर सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलेल्या अवैध सरकार राज्यात स्थापन करण्याचा गेली दोन वर्षे महाराष्ट्रात अवैध शासन आहे. तरीदेखील त्याचे सारे निर्णय वैध हे प्रकार काय आहेत, याचा उलगडा होऊ शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला तो नर्णय असा की हे सर्व काही अवैध असले तरी याचा निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयाला नसून तो विधानसभा अध्यक्षांना आहे. दोन वर्षांनी विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला की जे काही झाले ते सर्व वैध आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानेदेखील शिवसेनेच्या मालकीचा निर्णय, शिवसेना पळवून नेणाऱ्याच्या बाजूने दिला होता, तोच निकाल विधानसभा अध्यक्षांनी बहाल केला. या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथेच पोहोचले. आता पुन्हा काय होते ह्या न्यायालयातून त्या न्यायालयात जाणे येणे किंवा वर्षानुवर्षे चालत राहणार की अन्यायालाच न्याय समजून घरी बसावे लागणार ठाकरे आणि बिल्कीस बानो यांना.

न्यायालयात कोणत्याही प्रकरणाची सुनावणी होताना असे वाटते की सर्व काही योग्य दिशेने होत आहे. न्यायाच्या बाजूने होत आहे. पण जेव्हा शेवटचा निकाल लागतो तेव्हा हे असे का घडते असा प्रश्न नागरिकांना पडतो. यालाच कदाचित न्याय समजून लोकांनी घरी बसावं काय, हे तर या सर्व खटाटोपामागचे लक्ष्य तर नाही? ही नागरिकांच्या दृष्टीने गंभीर बाब असली तरी तीच सामान्य प्रक्रिया आहे काय?

- सय्यद इफ्तिखार अहमद

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget