मुस्लिमांसाठी कुरआन समजून वाचण्यासाठी एवढेच कारण पुरेसे आहे की हा इश्वरीय ग्रंथ आहेद्द ’कुरआन’ हा अरबी भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ ’वाचणे’ असा आहे. हा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ असल्याकारणाने हे नाव या ग्रंथाला सार्थक असेचे आहे.
अवतरणाची सुरुवात
प्रेषित मुहम्मद (सल्लम) हे मक्का शहराचे रहिवासी होते. ते एक गंभीर प्रवृत्तीचे व्यक्ती होते. त्यांची सचोटी व प्रामाणिकपणा सर्व शहराला माहीत होता. वयाची 40 वर्षे संपून त्यावर काही महिने झाले आणि अचानक त्यांना खरी स्वप्नं पडू लागली. स्वप्नही इतकी स्वच्छ की जशी आपण दिवसांच्या उजेडात घटना घडतांना पाहतो तशी. रात्री ते जे स्वप्नात पाहतं दिवसा अगदी तशाच घटना घडतं. त्यामुळे ते अंतर्मुख झाले आणि मक्का शहराच्या जवळ असलेल्या एका उंच अशा टेकडी मध्ये एका गुहेत जाऊन तासनतास बसू लागले. ती गुहा आजही अस्तित्वात असून तिचे नाव गारे हिरा असे आहे. एकांतात बसून आपल्याला पडत असलेल्या स्वप्नांबाबत चिंतन करत असतांना एके दिवशी अचानक एक देवदूत त्यांच्या समोर प्रकट झाला, ज्याच्या आगमनामुळे ती गुहा प्रकाशमान झाली. त्या देवदूताने ह. मुहम्मद (सल्लम) यांना सांगितले की वाचा त्यावर ह. मुहम्मद (सल्लम) उत्तरले की, मला वाचता येत नाही. तेव्हा त्या देवदूताने त्यांना जोरात मिठी मारली व म्हणाला वाचा तेव्हा त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिले की, मला वाचता येत नाही. तेव्हा त्या देवदूताने त्यांना पुन्हा मीठी मारली. तिसऱ्या मिठी नंतर मात्र ह. मुहम्मद सल्लम यांनी देवदूताने उच्चारलेल्या वाक्यांची पुनरूक्ती केली, त्यातील पहिली आयत होती-
‘‘वाचा, हे पैगंबर सल्लम. आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने (सूरे अलक क्र 96: आयत क्र 1)
दुसरी आयत होती-
’निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली.’
(सूरे अलक़ क्र 96: आयत क्र 2)
येणे प्रमाणे कुरआनच्या अवतरणाची सुरुवात झाली. या दिव्य घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की प्रेषित मुहम्मद सल्लम हे निरक्षर होते म्हणून कुरआन हा इश्वरी ग्रंथ आहे. कारण एक निरक्षर माणूस एवढ्या उच्च कोटीचा ग्रंथ निर्माण करूच शकत नाही जो ग्रंथ समस्त मानवजातीच्या कल्याणाचे मार्गदर्शन करू शकेल.
कुरआन वाचण्यासाठीचे कारण क्रमांक 1)
माणसाला समूह जीवनात राहावे लागते, मग तो समूह एका कुटुंबाचा छोटा समूह असो किंवा एका राष्ट्राचा मोठा समूह असो. जसे कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही नियम तयार करणे गरजेचे असते तसेच राष्ट्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या प्रगतीसाठी सुद्धा काही नियम करणे गरजेचे असते.
आता प्रश्न हा निर्माण होतो की हे नियम कसे असावेत? तर त्याचे उत्तर असे आहेत की सर्वांना समान संधी देणारे आणि सर्वांना समान न्याय देणारे असावेत.
मग असे नियम कोण करू शकतो? तर त्या बाबतीत आंतरराष्ट्रीय ख़्यातीप्राप्त विचारवंत सय्यद अबूल आला मौदुदींचे मत खालीलप्रमाणे आहे. म्हणतात की-
माणूस कितीही उच्च दर्जाचा असो, एक असो का त्याच्यासारखे अनेक असोत, सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरी मानवी ज्ञान प्राप्त करण्याच्या स्वाभाविक मर्यादा, त्याच्या बुद्धिमत्तेची मर्यादित झेप, त्यावर पुन्हा इच्छा आकांक्षांचा प्रभाव, इतरांच्या बाबतीत पक्षपात करण्याची त्याची सहज प्रवृत्ती या सर्व गोष्टींपासून माणसाला मुक्ती मिळविणे कदापि शक्य नाही, म्हणून या गोष्टीची शक्यता शून्य आहे की तो एक अशी व्यवस्था बनवू शकेल जी सर्वांना शंभर टक्के न्याय देऊ शकेल. (संदर्भ: तफहिमात खंड 3 पान क्रमांक 14) . म्हणून मानवतेला न्याय देणारी व्यवस्था निर्माण करावयाची असेल तर तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.
कुरआन वाचण्यासाठीचे कारण क्रमांक:2)
इस्लाम पृथ्वीतलावरील एकमात्र (खरा) सनातन धर्म आहे. कारण या पृथ्वीतलावर आलेल्या पहिल्या जोडप्यापासून आज एकविसाव्या शतकात राहणाऱ्या आधुनिक 800 कोटी लोकांपर्यंत सर्वांसाठी यात मार्गदर्शन उपलब्ध आहे.
ईश्वरी मार्गदर्शनाशिवाय मानवी समूहाचे जीवन निश्चितपणे भरकटते. याचे पुरावे आपल्या अवतीभवती इस्तस्त विखुरलेले आहेत. आज माणसेच माणसावर वर्चस्व गाजवत आहेत. त्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देत आहेत. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्यांवर अत्याचार करत आहेत. त्यातल्यात्यात महिला आणि मुलींवर तर जास्त अत्याचार करत आहेत. दारूपासून ड्रग्जपर्यंत मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारी विषारी द्रव्ये विकत आहेत. खोटं बोलत आहेत. विश्वासघात करत आहेत. व्याभिचार करत आहेत. बलात्कार करत आहेत. एक ना अनेक वाईट गोष्टी करत आहेत. यांचे दुष्परिणाम त्यांना व त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर सर्व समाजाला भोगावे लागत आहेत.
हे वाचून साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न उत्पन्न होईल की हे सर्व सामाजिक प्रश्न आहेत व हे प्रश्न हाताळण्यासाठी देशातील पोलीस व न्यायालये समर्थ आहेत, त्यांचे ते पाहून घेतील, त्यासाठी कुरआन वाचण्याची गरज काय? तर या प्रश्नाचे उत्तर असे की, शेकडो वर्षांपासून जगातील प्रत्येक देशात अनेक पोलीस स्टेशन्स अस्तित्वात आहेत, न्यायालये आहेत, कायदे आहेत, वकील आहेत, न्यायाधीश आहेत, आणि हे सर्व मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करीत आहेत. मग हे प्रश्न संपलेत का? गुन्हेगारी थांबली का? स्पष्ट आहे, याचे उत्तर नाही असेच आहे. उलट ही खल प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कर्करोग पसरावा तशी पसरत आहे. तिने सर्व समाजाला विळखा घातलेला आहे. त्या विळख्यात अडकलेला समाज गुदमरत चाललेला आहे.
तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी की, कायदेशीर कारवाई करून माणसाच्या खल प्रवृत्तीला लगाम लावता येत नाही तर त्याच्या अंतःकरणात दबलेल्या अवस्थेत असलेल्या सदप्रवृत्तीला चालना दिल्यास या खल प्रवृत्तीला आपोआपच लगाम बसेल. या सद्प्रवृत्तीला खतपाणी घालण्यासाठी म्हणून कुरआनवाचणे गरजेचे आहे.
तुम्ही जोपर्यंत कुरआन वाचणार नाहीत तोपर्यंत यासंबंधी ईश्वरी मार्गदर्शन काय आहे हे तुम्हाला कळणार नाही व साहजिकच तुम्ही खलप्रवृत्ती सोडणार नाही. तुम्ही जर मन लावून मातृभाषेत कुरआन वाचला तर त्यातील आयाती तुमच्या लक्षात येतील, त्यांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होईल व तुमच्या अंतःकरणातील सदप्रवृत्तींना चालना मिळेल, मग तुम्ही आपोआपच वाईट गोष्टींच्या जवळ देखील फिरकणार नाही.
हा केवढा मोठा फायदा आहे? याचा डोळे बंद करून, खोल श्वास घेऊन, शांतपणे मनन करून पाहा, तुमचे अंतःकरण स्वतः तुम्हाला ग्वाही देईल की चल उठ...! आपण कुरआन वाचू या. यासाठी म्हणून तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.
कुरआन वाचण्यासाठीचे कारण क्रमांक 3)
मानवाला यशस्वीपणे जगण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. आपल्या या गरजेच्या पूर्ततेसाठी तो अनेक मार्ग चोखाळत असतो. त्यापैकी वाडवडिलांपासून चालत आलेल्या परंपरा हा प्रमुख मार्ग आहे.
जगातील सर्वाधिक माणसं आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरांमधून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. हा प्रकार अत्यंत घातक असतो, कारण यातून चूक होत असते. वाडवडील जर चुकीच्या मार्गाने जगले असतील तर आपणही त्याच चुका करण्याची शक्यता असते. वाडवडिलांसाठी जो नैसर्गिक सन्मानाची भावना आपल्या मनात असते त्यामुळे त्यांच्या चालीरीतींची वस्तुनिष्ठ समीक्षा करण्याच्या भानगडीत न पडता त्या आहेत तशाच अवलंब करण्याकडे माणसाचा कल असतो आणि हा कलच माणसाला खऱ्या मार्गदर्शनापासून वंचित ठेवतो.
सृष्टीच्या अस्तित्वाची गरज काय?
या सृष्टीच्या अस्तित्वाची गरज काय? ती का निर्माण करण्यात आली? कोणी निर्माण केली? हे समजण्यासाठी माणसाला खरे ज्ञान असणे आवश्यक असते. शिवाय माणसाला नैतिकतेची काय गरज आहे? आपण अनैतिक वागलो तर काय फरक पडतो? संस्कृती म्हणजे काय? ती कशी आकार घेते? समाजामध्ये कसे राहावे? समाजाची उभारणी कोणत्या पायावर करावी? त्यासाठी कोणते नियम असावेत? हे सर्व जाणणे माणसासाठी आवश्यक आहे.
साहजिकच हे मार्गदर्शन ईश्वरी असायला हवे तरच ते सर्वांसाठी समान उपयोगी राहील. याच कामासाठी ईश्वराने प्रेषित पाठवले. प्रेषित कोणाला म्हणतात? या पृथ्वीतलावर किती आणि कोठे-कोठे प्रेषित आले? त्यांचे काय झाले? त्यांनी कोणते मार्गदर्शन आणले होते? त्यांचा इन्कार करणाऱ्यांना कुठले परिणाम भोगावे लागले? त्यांचा कसा विनाश झाला? अंतिम प्रेषित कोण आहेत? त्यांचे जीवन कसे होते? त्यांचे मार्गदर्शन काय आहे? त्याचा स्वीकार केल्याने आपल्याला काय लाभ होईल? त्याचा इन्कार केल्याने आपल्याला कोणत्या नुकसानाला सामोरे जावे लागेल? या संबंधीची इत्यंभूत
माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. कारण प्रेषितांचा इन्कार केल्यामुळे जी चंगळवादी जीवनशैली माणूस निवडतो ती त्याला एकट्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला सामुदायिक अपयशाच्या खोल दरीत ढकलते? हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. चंगळवादी जीवनशैलीची निवड करणाऱ्यांचे जीवन तणावपूर्ण तर मृत्यू वेदनादायी कसा होतो? आणि मृत्युपरांत अनंत काळासाठी त्याला कोणत्या यातना सहन कराव्या लागणार आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल. कारण दुसरा कुठलाही ग्रंथ तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही.
यासंबंधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात-
हिदायत की अहमियत
इंसान को दुनिया मे जिंदगी बसर करने के लिए रहनुमाई (मार्गदर्शन) की ज़रूरत होती है. अपनी और अपने कायनात (सृष्टी) और अपने वजूद (अस्तित्व) की गर्ज़ो-ओ-गायत (आवश्यकतायें) समझने के लिये जो इल्म (ज्ञान) उसे दरकार (आवश्यक) है, और अपने अख़लाख़ (नैतिकता), तहेजीब (चालचलन), मुआशरत (सामाजिकता) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिये, जिन उसूलों का वो मोहताज (विवश) है, उन सब के लिये उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहनुमा (मार्गदर्शक) तस्लीम (स्वीकार) करना चाहिये, और सिर्फ उसी हिदायत (उपदेश) की पैरवी इख्तीयार (स्विकार) करनी चाहिये जो अल्लाहने अपने रसूलोंके ज़रिये से भेजी हैं.
अल्लाह को छोडकर किसी दुसरे रहनुमा की तरफ तरफ हिदायत के लिये रूजू करना और अपने आप को उसकी रहनुमाई के हवाले कर देना इंसान के लिये बुनियादी तौर पर एक गलत तरिका-ए-कार है. जिसका नतिजा हमेशा तबाही की सूरत मे निकला है और हमेशा तबाही की सूरत मे ही निकलेगा.
(संदर्भ : तफहिम-उल-कुरआन जिल्द दो पेज नं 7)
मानवी मार्गदर्शन
ईश्वराला सोडून कुठल्या दुसऱ्या मार्गाने मार्गदर्शन घेण्याची दुसरी एक घातक परंपरा समाजात रूढ आहे. जिचा परिणाम नेहमीच भयानक राहिलेला आहे. अनेक अंधश्रद्धांचा जन्म यातूनच झालेला आहे. अनेक महिला याच मानसिकतेतून जीवनातून उठलेल्या आहेत. याच कारणामुळे मानवता अनेकदा उद्ध्वस्त झालेली आहे. हे मार्गदर्शन मानवी मार्गदर्शन होय.
संत, महात्मे, बूवा, बाबा, पीर, फकीर कितीही विद्वान असले तरी शेवटी माणसंच असतात आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे, हे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे व रोज होत आहे. असे कितीतरी लोक जे स्वतःला संत, महात्मे म्हणवून घेतात, अत्यंत घाणेेरड्या कारणासाठी तुरूंगात जाऊन आलेली आहेत. ते काय मार्गदर्शन करणार? त्यांच्यातील काही मंडळी खरोखरच चांगल्या प्रवृत्तीची जरी असली तरी त्यांच्या मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेवर नैसर्गिक मर्यादा असतात. म्हणून शेवटी ईश्वरी मार्गदर्शन हेच सुरक्षित मार्गदर्शन होय. आणि जगामध्ये कुरआन हे एक असे मार्गदर्शन आहे की ज्याच्या ईश्वरी आणि सुरक्षित असण्यावर कोणताही संतुलित बुद्धीचा माणूस शंका घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.
कुरआनला न समजता वाचण्याची (तिलावत करण्याची) एक परंपरा अनेक शतकापासून सुरू आहे. अशा पठणाने पुण्य जरी मिळत असले तरी मार्गदर्शन मिळत नाही आणि जोपर्यंत मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत माणूस नीट वागत नाही. जोपर्यंत माणूस नीट वागत नाही तोपर्यंत समाज नीट राहत नाही. म्हणून या रमजानमध्ये संपूर्ण कुरआन समजून वाचण्याचा दृढनिश्चय करू या. ज्यांनी हा निश्चय पूर्ण केला त्यांना स्वतःलाच रमजान संपल्यानंतर आपल्यात चमत्कारिक बदल झाल्याचे लक्षात येईल.
-एम. आय. शेख,
लातूर
Post a Comment