ह. अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) प्रवासावर निघायचे तेव्हा ते आपल्या स्वारीवर स्वार होण्यापूर्वी तीन वेळा अल्लाहच्या महानतचे वर्णन करीत (अल्लाहु अकबर) आणि प्रार्थना करत की “तो किती महान आहे ज्याने ह्या स्वारीला आमच्या स्वाधीन केले, आम्ही त्याच्यावर काबू मिळवला नसता आणि निश्चितच आम्ही आपल्या विधात्याकडे वळणार आहोत. हे अल्लाह! या प्रवासात आम्ही तुझ्याशी नेकी आणि सदाचाराची विनंती करतो. हे अल्लाह, या प्रवासाला आमच्यासाठी सोपं कर आणि आमचा हा प्रवास सुखकर होवो. हे अल्लाह, तू या प्रवासादरम्यान माझा सहवासी आहे आणि माझ्या मागे माझ्या कुटुंबाचे देखरेख करणारा आहे. मी या प्रवासातील अडीअडचणींशी तुझी शरण मागतो आणि भयभीत करणाऱ्या घटना व दृश्यांशी. आणि आपल्या घरी परतताना वाईट अवस्थेत असण्याशी. आणि प्रेषित (स.) घरी परतत त्यावर ते म्हणत असत, “आम्ही वळणारे आहोत आपल्या विधात्याकडे आणि त्याचे गुणगान करणारे आहोत.” (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की “जेव्हा तीन माणसे प्रवासाला निघाले असतील, त्यांनी आपल्यातून एकाला आपला नेता करावा.” (ह. अबू सईद खुदरी, अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शत्रुराष्ट्राच्या प्रवासादरम्यान पवित्र कुरआन घेऊन जाण्यास मनाई केली आहे. (ह. अब्दुल्लाह बिन उमर, अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की “प्रवास प्रकोपाचाच एक भाग आहे जो तुम्हाला झोपू देत नाही की व्यवस्थित खाणे-पिणे देत नाही. प्रवासाचे उद्दिष्ट पूर्ण होताच तुम्ही आपल्या घरी मुलाबाळांकडे परतण्याची घाई करा.” (ह. अबू हुरैरा, बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) एकदा मस्जिदमध्ये बसले असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आली तेव्हा प्रेषितांनी थोडे बाजुला सरकून त्याच्यासाठी जागा करून दिली. ती व्यक्ती म्हणाली, “जागा मुबलक आहे, बाजुला होण्याची गरज नाही.” त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, “एका मुस्लिमाचा हा अधिकार आहे की जेव्हा त्याचा बंधू त्याच्याकडे येत असेल तर त्याने त्याच्यासाठी जागा करून द्यावी. त्याला आपल्या जवळ बसवून घ्यावे.” (ह. वासिला बिन खत्ताब, बैहकी)
ह. मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की “तुम्ही जोवर श्रद्धा धारण करत नाही तोवर स्वर्गात जाणार नाही. आणि जोवर तुम्ही एकमेकावशी स्नेहाचा व्यवहार करत नाही तोवर तुम्ही श्रद्धावंत असू शकत नाही. मी तुम्हाला अशी गोष्ट सांगतो ज्यावर तुम्ही आचरण केलेत तर तुमच्यामध्ये स्नेह वाढेल आणि ती गोष्ट ही की तुम्ही आपसात एकमेकांना सलाम करत जा.” (ह. अबू हुरैरा, मुस्लिम)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment