पॅलेस्टाईन आणि इजराईल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला, युद्ध म्हणणे हेच चुकीचे आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इजराईलच्या एका संगीत महोत्सवावर हल्ला केल्याने जे काही लोक मारले गेले त्याला निमित्त करून इजराईलने पॅलेस्टीनी लोकांचा जो नरसंहार सुरू केला आहे तो एकतर्फी आहे. 105 दिवस संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये या आठवड्यात या संदर्भात एक वांझोटा का असेना युद्धबंदी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला अमेरिका वगळता बाकी 14 सुरक्षा परिषदेतील देशांनी पाठिंबा दर्शविला. अमेरिकेने अलिप्त राहणे पसंद केले. यापूर्वी तीन वेळा आलेले प्रस्ताव अमेरिकेने वेटो केले होते म्हणून प्रस्ताव मंजूर झालेले नव्हते. यावेळेस मात्र तो तटस्थ राहिल्यामुळे प्रस्ताव मंजूर झाला. अमेरिकेच्या या तटस्थतेच्या धोरणाकडे पाहून नेतनयाहू यांचा जो जळफळाट सुरू आहे ते पाहता अमेरिकन प्रशासनाने स्वतःहून घोषणा केली की हा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला तरी तो मान्य करण्यास इजराईल बाध्य नाही. यावरूनच या प्रस्तावाची किंमत काय हे सहज लक्षात येते.
या प्रस्तावामुळे फक्त एका गोष्टीचा अंदाज येतो की, इजराईल विषयी जो बायडन यांचा संयम समाप्त होत आहे. जो बायडन यांचा संयम समाप्त होण्यामागे तीन कारणे आहेत. एक इजराईलचा अभूतपूर्व अत्याचार, ज्याकडे पाहून जागतिक जनमत अमेरिकेविरूद्ध होत आहे. दोन येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांच्या इजराईल समर्थनामुळे नाराज होवून मतदार त्यांच्या विरोधात जावू शकतील. तीन मध्यपुर्वेतील तेलसंपन्न जुन्या मित्रांमध्ये पसरत असलेली तीव्र नाराजी.
1948 साली स्थापना झाल्यानंतर इजराईल विरूद्ध संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये एखादा प्रस्ताव पारित होण्याची ही पहिलीच घटना आहे. फक्त एवढेच या युद्धबंदी प्रस्तावाचे महत्त्व आहे. गझा आणि वेस्ट बँकमध्ये जी कार्पेट बाँबिंग इजराईलने केलेली आहे ती पाहता गझा हे राहण्यासाठी योग्य ठिकाण राहिलेले नाही, एवढे मात्र नक्की. आंतरराष्ट्रीय मीडिया जरी 30 हजार पॅलेस्टीनियनचा मृत्यू झाल्याचे सांगत असला तरी या आकड्याला कुठलाच आधार नाही. रफा बॉर्डरवर आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक उभे असून, त्यापासून काही मीटर अंतरावर पॅलेस्टाईन मुले भुकेने तडफडून मरत आहेत तरी इजराईल मदत आत येवू देत नाही. एअर ड्रॉप केलेल्या मदतीचे कंटेनर अंगावर पडून अनेक पॅलेस्टीन लोक मरण पावलेले आहेत. या संबंधीचे जे व्हिडीओ एक्सवर येत आहेत ते पाहण्याचे धाडस होत नाहीये. या सर्व स्थितीला इजराईलपेक्षा अमेरिका जास्त जबाबदार आहेत एवढे मात्र नक्की.
Post a Comment