Halloween Costume ideas 2015
January 2018

-एम.आय.शेख
9764000737
काँग्रेसकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जाते या आरोपा एवढा विनोद गेल्या शंभर वर्षात झालेला नाही. या लांगुलचालनामुळे मुस्लिमांची काय अवस्था झाली हे काँग्रेसनेच नेमलेल्या न्या. सच्चर समितीच्या अहवालात नमूद आहेच. सच्चर समितीचा अहवाल नव्हे तो काँग्रेसचा प्रोग्रेस कार्ड आहे. ज्यात नमूद आहे की, त्यांनी मुस्लिमांची किती प्रगती आपल्या स्वर्णयुगामध्ये घडवून आणली. अनेक लांगुलचालनापैकी एक लांगुलचालन हज सब्सिडी होते. जे 16 जानेवारी 2018 रोजी संपविण्याचे पुण्यकर्म केंद्र सरकारने केले. शेवटी हज सब्सिडी बंद झाली. समस्त भारतीय मुस्लिमांकडून केंद्र सरकारला अक्षरशः धन्यवाद! त्यांनी नकळत का होईना सरकारी पिळवणुकीतून हज यात्रेकरूंची सुटका केली. हज सब्सिडी मुस्लिमांना मिळत होती, हे वाक्य इतकेच खोटे आहे जितके रात्री सूर्य निघतो. मात्र इस्लामोफोबियाने ग्रस्त माध्यमांनी सामान्य हिंदू बांधवांच्या मनामध्ये खोलपर्यंत हा विचार रूजविला होता की, काँग्रेसचे सरकार हे मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी लाखो रूपयांचे अनुदान देते.
अनुदानाची मनोरंजक कथा
    1982 सालापूर्वी हजयात्रा ही समुद्रमार्गे होत होती. त्यासाठी सरकारच्या मालकीचे अनेक जहाज या कामासाठी वापरले जात. हज यात्रे व्यतिरिक्त हे जहाज वर्षभर इतर प्रवासी वाहतुकीचे सुद्धा काम करत. 1982 साली तज्ज्ञांनी सदरची जहाजे ही मानवी वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचा निर्वाळा दिला. म्हणून सरकारसमोर नवीन जहाज खरेदीचा प्रस्ताव भुपृष्ठ मंत्रालयाकडून ठेवण्यात आला. सरकारची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नवीन जहाज खरेदी करणे शक्य नव्हते. म्हणून हज यात्रींना विमानाने जेद्दापर्यंत नेआण करावी, असा एक विचार पुढे आला. मात्र जहाजाचे भाडे आणि विमानाचे भाडे याच्यामध्ये प्रचंड अंतर होते. जहाजाच्या भाड्यामध्ये जेद्दापर्यंत हज यात्रेकरूंची नेआण करण्यासाठी एअर इंडियाने नकार दिला. तेव्हा वाढीव रक्कम सरकारनी एअर इंडियाला द्यावी, असे ठरले. येणेप्रमाणे हज सबसीडिचा जन्म झाला.
    प्रत्येक बाबतीत बेईमानी करण्यात तरबेज सरकारी विभागांपैकी एक एअर इंडियालासुद्धा यामध्ये बेईमानी करण्याची संधी असल्याचा साक्षात्कार झाला. जन्मापासून कुपोषित असलेल्या एअर इंडियाचे कुपोषण या माध्यमातून दूर करता येईल, हे लक्षात आल्यामुळे एअर इंडियाचे अधिकारी कामाला लागले आणि त्यांनी एरव्ही जेद्दाला जाण्यासाठी जेवढे विमानभाडे लागते. हजच्या काळामध्ये ते भाडे दुपटीने तर कधी-कधी तिपटीने वाढविले. वाढीव भाड्याची पावती हज यात्रेकरूंच्या नावाने फाडून सारा पैसा एअर इंडियाने स्वतः गिळंकृत केला. यात आत्तापर्यंत एकाही हाजीला एकाही रूपयाची सबसिडी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हजला जाण्यासाठी एअर इंडियानेच जाणे बंधनकारक होते. दुसर्या विमान कंपनीने हाजींना जाण्याची परवानगी नव्हती.
    सबसिडी त्याला म्हणतात जी सरळ लाभार्थ्याच्या हातात पडते. या ठिकाणी उलट परिस्थिती होती. हजच्या काळात यात्रेकरूंकडून नॉर्मल भाडे घ्यायचे. शिवाय मुद्दाम भाडे वाढवून सरकारकडून सबसिडीच्या नावाखाली प्रचंड रक्कम उकळायची असा खेळ आजतागायत चालू होता. ही सबसिडी बंद करा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः मुस्लिमांनी मागणी केली होती. खासदार ओवीसींनी तर संसदेमध्ये ही मागणी केली होती. अनेक लोक कोर्टामध्ये गेले होते. 2012 साली न्या.आफताब आलम यांच्या खंडपीठाने दहा वर्षात सबसिडी टप्या-टप्प्याने बंद करावी व सबसिडीची रक्कम अल्पसंख्यांकांच्या कल्याणाच्या योजनेमध्ये वापरावी, असा सरकारला आदेशच दिला होता. केंद्र सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी केली. हे बरे झाले. सरकारच्या या निर्णयानंतर चार वर्षे एव्हीयेशन मिनिस्टर राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी स्वतः कॅमेर्यासमोर कबुल केले की, एअर इंडियाचे जेद्दाला जाण्याचे सर्वसाधारण भाडे 30 ते 40 हजार रूपयापर्यंत असते. मात्र हजच्या काळामध्ये तेच भाडे 70 ते 75 हजार रूपये केले जाते व वाढीव रक्कम सबसिडीच्या नावाखाली एअर इंडियाला दिली जाते.
    वाचकांच्या लक्षात सरकारची ही चालाखी आलीच असेल. दरवर्षी भारतातून एक लाखापेक्षा जास्त लोक हजला जातात. प्रत्येकाचे 40 हजार म्हणजे किती प्रचंड रक्कम एअर इंडियाला मिळत होती, याचा अंदाज कोणालाही सहज येवू शकतो. त्यामुळे हज सबसिडी बंद झाल्याचे दुःख झालेच असेल तर ते एअर इंडियाला झाले असेल मुस्लिमांना नव्हे. एवढ्या प्रचंड संख्येने यात्रेकरू मिळत असतील तर कोणतीही हवाई कंपनी प्रवाशांना डिस्काऊंट देऊ शकते. खरे तर हज यात्रेकरूंची नेआण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय टेंडर कॉल करण्यात यावे. यात सर्व कंपन्या चढाओढीने भाग घेतील व ज्यांचे भाडे सर्वात कमी असेल त्यांना कंत्राट देण्यात यावे. यात नक्कीच चार-दोन हजार रूपये प्रत्येक हज यात्रेकरूचे वाचतील, यात शंका नाही. हज यात्रेसाठी दरवर्षी सरकारच्या विदेश मंत्रालयाकडून शेकडो लोक फुकटात जेद्दाची सफर करून येतात. हे अगोदर बंद व्हायला पाहिजे. अशा फुकट्यांवर होणारा खर्चसुद्धा हज सबसिडीच्या नावावरच केला जातो. फुकट्यांची सवलत बंद केल्यास सरकारचा तो ही खर्च वाचेल. हज सबसिडी बंद करत असल्याची घोषणा करीत असतांना सबसिडीची रक्कम अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण (?) मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलेली आहे. त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे सगळ्यांनाच माहित आहे. एकदाची सबसिडी बंद झाली हे बरे झाले त्यामुळे मुस्लिमांवर होणारा लांगुनचालनाचा एक आरोप कमी झाला. सरकारचे धन्यवाद!

लातूर : आयुष्य एकदाच मिळते आणि ते ही नीट जगता येत नसेल तर दुर्देव आहे. आम्हाला जीवन कसं जगावं याचं ईश्‍वरीय मार्गदर्शन उपलब्ध असून देखील आम्ही ते समजून वाचत नाही. आपल्याजवळ सर्वकाही असून देखील असमाधानी आहोत. याचा अर्थ आमच्याकडं भौतिक सुविधांतून आम्ही समाधानी होण्याचा प्रयत्न करतो मात्र ते खरं यशस्वी जीवन नाही. त्यासाठी आम्हाला शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग समजून घेणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्राचे प्रमुख बी.एन. मिश्रा यांनी येथे केले.
    जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र द्वारा 12 ते 21 जानेवारी या कालावधीत इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी मोहिम राबविली जात आहे. यामध्ये कॉर्नर बैठका, वयक्तिक भेटी, सभा घेतल्या जात आहेत. या मोहिमेच्या समारंभ सोहळ्यात हॉटेल अ‍ॅम्बेसीच्या सभागृहात रविवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अबरार मोहसीन होते. मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर,मुफ्ती युनूस यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.एन. मिश्रा पुढे म्हणाले, माणसातही हिंस्त्रता आढळून येते. तो जर बेलगाम वागला तर हैवानाचं रूप धारण करतो. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याला नियंत्रित करणे आपल्या हातात असते, त्याचे समुपदेशन वेळेवर झाले तर तो नक्कीच यशस्वी माणूस बनू शकतो. मात्र हे करण्यासाठी आमच्याकडे त्या प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ईश्वरीय मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य मोहिमेद्वारा सुरू केले आहे, ते स्तुत्य आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
    प्रमुख पाहुणे अशोक गोविंदपूरकर म्हणाले, देशात जाणून बुजून काही लोक अस्थिरता निर्माण करीत आहेत. त्यामाध्यमातून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला अशा स्थितीत शांती कायम राखणे गरजेचे आहे. तरच आमची प्रगती होईल. शांती शिवाय प्रगती ही अशक्य आहे. शहराध्यक्ष अबरार मोहसीन म्हणाले, आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची संतान आहोत.  आम्हाला एकमेकांच्या भल्यासाठी जेवढं काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आम्ही सर्व एकमेकांचे भाऊ-बहिण आहोत. इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग या मोहिमेत सहभागी होवून आमचं जीवन कसं सुखी, संपन्न होईल हे जाणून घेणं गरजेच आहे. प्रास्ताविकात मुहम्मद युनूस पटेल यांनी मोहिमेची रूपरेषा, उद्देश सांगितला. सुत्रसंचालन सलीम शेख यांनी केले.


मस्जीद परिचय : एम.आय. शेख
लातूर : इस्लाममध्ये मस्जिदीला अनन्य साधारण महत्व आहे़ ते इस्लामचे केंद्र आहे़ समाजबांधव सामुहिक पद्धतीने पैसे जमा करून मस्जिद उभारतात़ यामध्ये पाच वेळेसच्या नमाजसाठी प्रामुख्याने मस्जिदचा उपयोग होत असला तरी येथे विवाहासाठी, तंटामुक्तीसाठी तसेच लहान मुलांना धार्मिक शिक्षण देण्यासाठीसुद्धा मस्जिदीचा उपयोग केला जात असल्याचे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक एम़ आय. शेख म्हणाले़
    जमाअते इस्लामी हिंदतर्फे सुरू असलेल्या इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी या मोहिमेअंतर्गत शहरातील लेबर कॉलनी येथील मदनी मस्जिद येथे विविध धर्मातील बांधवांसाठी मस्जिद परिचय कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक अहेमद खान, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, मौलाना इस्माईल कास्मी यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी मनपा सदस्य हाकिम भाई, आसीफ बागवान, हाफिज वाहिद, मुफ़्ती साबेर क़ासमी (इमाम मस्जिद), इस्लामुल हक, परवेज़ शेख, मुजीब शेख, सद्दाम शेख, अबुल्लाह शेख, जमाअतचे माजी शहराध्यक्ष शेख इक्राम, खिजर खान आदी उपस्थित होते.

नागपूर (डॉ.एम.ए.रशीद) - 
कुरआनमध्ये सांगितलेल्या शांती, प्रगती आणि मुक्तिच्या मार्गदर्शनामुळे   द्वेष, घृणा, अन्याय आणि  अत्याचारांचा अंत होऊ शकतो. त्यासाठी सकारात्मक संवादानी रूढ़िवादी विचारांचा अंत होऊन समाजात शांतीपूर्ण वातावरण बनू शकेल, असे विचार जमाअत ए इस्लामी हिंद प्रसार विभागाचे केंद्रीय सचिव इक़बाल मुल्ला यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
    जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र 12 ते 21 जानेवारी पर्यंत इस्लाम :  शांति, प्रगति व मुक्तिसाठी राज्यव्यापी अभियान राबवित आहे. नागपूरच्या तलाव , टाटा पारसी शाळेजवळ  शिक्षक सहकारी बैंक सभागृहमध्ये अभियानाच्या उद्घाटन समारोहात शुक्रवारी ते बोलत होते.
    यावेळी नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, या अभियानचा उद्देश्य सत्यता सांगणे आहे. मानव इतिहास ईशदूत यांनी भरलेला आहे. त्यांनी लोक आणि परलोकचा यशस्वी मार्ग सांगितला. नशा, व्याभिचार, भ्रष्टाचार व अन्यायाने  समाजतील शांति भंग होते. कुपोषण आणि भुखमरीमुळे मृत्यु चिंताजनक आहे आणि ते प्रगती साठी बाधक आहे. इस्लाममध्ये मानव जीवनाला उत्तरदाई बनविले आहे. उत्तरदाई जीवन शांति चे महत्वपूर्ण कारक असल्याचेही मुल्ला म्हणाले.
    नागपूर शहर झोनचे पोलीस उपायुक्त राहुल ए.माकनीकर म्हणाले, इस्लाममध्ये कुठल्याही प्रकारची जोर ज़बरदस्ती नाही. कुरआन सांगतो कि, जर तुम्ही कोण्या एका नाहक माणसाचे प्राण घेतले तर जणू पूर्ण मानवतेचे प्राण घेतले, मग कसे शक्य आहे कि इस्लाम तलवारीच्या बळावर पसरला आहे. आम्हाला इस्लामच्या जिहाद आणि दयाची परिभाषा यावर अवश्य विचार करायला पाहिजे.
   जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष तौफ़ीक असलम ख़ान म्हणाले, या देशात कुणीच उपाशी राहू नये , ना कुणाची इज़्ज़त विकावि आणि ना कुणी आपल्या अधिकारापासून वंचित रहावे. हा जमाअत इस्लामीचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी सांगितले कि, पूर्ण मानवजात एक परिवार आहे आणि मानव सेवा करणारा खरा मानव आहे. स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतरही शेतकरी आत्महत्या करत आहेत. समाज परिवर्तन व्हायला हवे तरच विकास आणि  प्रगती शक्य आहे. त्यांनी सांगितले कि कुरआन आम्हाला शांतिचा संदेश देतो. त्यामुळे कुरआनच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सखोल अभ्यास करून जीवनात त्याचे आचरण करणे गरजेचे आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने आम्ही सर्वांगाने शांती, प्रगती आणि मुक्तीची फळे चाखू शकू. प्रसार विभागाचे राज्य सचिव इम्तियाज़ शेख़ यांनी जमाअतचा परिचय आणि त्याची कार्यप्रणाली यावर प्रकाश  टाकला. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉ.श्रीपाल सबनीस यांनी कार्यक्रमाचे  उद्धाटन करीत सांगितले कि,  इस्लामच्या सखोल अभ्यासाची आवश्यकता आहे. इस्लाममध्ये  शांती, मानवता, समानता आणि उदारतेचा उपदेश आहे. कुरआनच्या शांतिमय संदेशाला पैग़म्बर हज़रत मुहम्मद साहब यांनी अमलकरून हरित क्रांतिचा काळ आणला. त्यांनी स्त्रियांना मर्यादे युक्त जीवन जगण्याचा अधिकार दिला. कुठल्याही गोष्टीवर मुसलमान यांना पाकिस्तानला जाण्याची गोष्ट करणे अत्याधिक अशोभनीय आहे.  मुसलमान याच देशाचा  मूलनिवासी आहे. हिंदू आणि मुस्लिम कट्टरवाद चिंतनीय आहे. यांच्या भांडणामध्ये मानवता नष्ट होत आहे. कुरआन पठन हिदायत सिद्दीक़ी यांनी केले तर प्रोफेसर अय्युब ख़ान यांनी भाषांतर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सुत्रसंचालन अशरफ़ बेलिम यांनी केले. जिल्हाअध्यक्ष डॉ आस़िफुज़्ज़मा ख़ान यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, पुरूष, महिला आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

ऍड. आर.वाय. शेख
सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधिश - मो.9403188314
जपला जेव्हा पहिल्यांदा सत्ता मिळाली. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हापासून घटना बदलण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या काळात घटनेचे पुनरावलोकन करण्यासाठी एक सदस्यीय आयोगही नेमण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्याने त्यांची इच्छा फलद्रुप झालेली नव्हती. 2014 साली मात्र प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर घटना बदलण्यासाठी जे काही प्रयत्न भाजपाने सुरू केलेले आहेत, त्याचा स्फोट 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात झाला. 2014 पासूनच केंद्र सरकारने भाजपाच्या लोकांना अनुकूल निकाल देणाऱ्या न्यायाधिशांना निवृत्तीनंतर राज्यपाल सारख्या पदांनी अनुगृहित करण्याची परंपरा सुरू केली असून, ज्यांनी विरोधात निकाल दिले उदा. न्या. पटेल आदींना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.
    नरेंद्र मोदींची कार्यशैली स्वकेंद्रीत कार्यशैली आहे. केंद्रामध्ये सत्तेत येताच त्यांनी एकेक करून घटनात्मक संस्थेस नुकसान करण्यास सुरूवात केलेली आहे. याचे अलिकडचे उदाहरण गुजरात निवडणुकांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची वर्तणूक आहे. निवडणूक आयोगाने लक्षात येईल अशा पद्धतीने भाजपला अनुकूल अशा पद्धतीने गुजरातमध्ये निवडणुका घेतल्या. भाजपाकडून लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणविल्या जाणाऱ्या माध्यमांना सत्तेत आल्या-आल्याच धक्का दिला
आहे. अनेक वाहिन्या भाजपवाल्यांनी खरेदी केलेल्या आहेत व रिपब्लिकन टी.व्ही. सारखी नवीन वाहिनी सुरू केलेली आहे. बोटावर मोजण्याइतक्या वाहिन्या सोडता बाकी मीडियाही गोदी मीडिया झाल्यासारखा वागत आहे.
    सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त 25 न्यायाधिश काम करीत आहेत. 31 न्यायाधिशांची (उर्वरित पान 2 वर)
जागा सरकारने भरलेली नाही. केंद्र सरकार उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तींची भरती करण्याचे अधिकार आपल्याकडे घेऊ पाहते. सर्वोच्च न्यायालय यासाठी तयार नाही. यातूनच नियुक्त्या रखडलेल्या आहेत. कोर्टावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. तो इतका असहणीय आहे की, याच कारणावरून माजी सरन्यायाधिश न्या. ठाकूर यांना पंतप्रधानांच्या समोर सार्वजनिकरित्या अश्रुपात करावा लागला होता. तरी परंतु, केंद्र सरकारने आपला हेका सोडलेला नाही. सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट नं. 10 मध्ये बसणारे न्या. अरूण मिश्रा यांचे व भाजपचे संबंध जगजाहीर संबंध असल्याची चर्चा आहे. भाजपच्या विरोधात दाखल झालेल्या याचिका सरन्यायाधिश यांच्याचकडे जाणून बुजून पाठवितात आणि ते त्या याचिका रद्द करतात. असा गर्भीत आरोप सरन्यायाधिशांवर आहे. त्यासाठी प्रसाद एज्युकेशन ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील याचिकेमध्ये स्वतः सर न्यायाधिशांवरच संशय घेतल्यावरसुद्धा सरन्यायाधिशांनी स्वतः त्या खंडपीठात राहून नैसर्गिक न्यायतत्वाकडे दुर्लक्ष केलेले आहे. शिवाय, सहारा- बिर्ला डायरीमध्ये नरेंद्र मोदी यांना लाच दिल्याची नोंद होती जेव्हा  ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. ती याचिकासुद्धा न्या. अरूण मिश्रा यांनीच निकाली काढली होती व चौकशीची परवानगी नाकारली होती.
    एकंदरीत या सर्व पार्श्‍वभूमी 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर जाण्याचा घेतलेला निर्णय हा न्यायपालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद ही योग्य आहे की, अयोग्य आहे. याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. खरे तर यावर चर्चा न करता या न्यायाधिशांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर देशात चर्चा व्हायला हवी. पण त्याकडे दुर्लक्ष करून या चार न्यायाधिशांनाच ट्रोल आर्मी टार्गेट करीत आहेत. वास्तविक पाहता ही पत्रकार परिषद फक्त सरन्यायाधिशांविरूद्धच नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या विरूद्धच आहे. केंद्र सरकारविरूद्ध आहे. म्हणून या चार न्यायमुर्तींनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर गांभीर्याने चर्चा होणे गरजेेचे आहे. अन्यथा आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हे न्या. चेलमेश्‍वर यांचे शब्द खरे ठरू शकतील. न्यायालयाच्या सन्मानाच्या नावाखाली, लोकांचा न्यायालयावरचा विश्‍वास कमी होईल, या नावाखाली त्यांनी उचललेले मुद्दे कदापिही दाबले जाऊ नयेत, असे झाल्यास तो खरा देशद्रोह होईल.
    चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत दिलेल्या पत्रात असे नमूद केलेले आहे की, न्यायालयातील कामकाजात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी 2 महिन्यापूर्वी सरन्यायाधिशांसमोर बाजू मांडलेली होती. 12 तारखेला सकाळी ही त्यांनी सरन्यायाधिशांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले होते. मात्र याबाबत निर्णय न घेतल्यामुळे या चार न्यायमुर्तींनी लोकांसमोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
    या न्यायाधिशांच्या म्हणण्याप्रमाणे अलीकडे उच्च व सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकाल दिले आहेत त्यांचा न्यायदान पद्धती व उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य यावर विपरीत परिणाम झालेला आहे आणि सरन्यायाधीश कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीतही अनेक दोष निर्माण झालेले आहेत. वरील बाबी लोकशाहीसाठी घातक असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आणण्याचे धाडस न्यायमूर्तींनी या प्रेस कॉन्फ्रन्सद्वारे व्यक्त केलेले आहे.
    गेल्या काही दिवसांपासून वकील वर्गामधून सुद्धा या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहेत. परंतु, त्याची दखल प्रसार माध्यमांनी (मीडिया) घेतलेली नाही. परंतु, 12.01.2018 रोजी सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत असलेल्या न्यायमूर्तीच्या टीकेची दखल प्रसार माध्यमांनी घेतल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात खळबळ उडाली आहे. आदरणीय ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्‍वर, न्या. रंजन गोगाई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरीयन जोसेफ यांनी त्यांच्या पत्रामध्ये घेतलेल्या आक्षेपापैंकी 5 महत्त्वाचे आक्षेप खालीलप्रमाणे आहेेत.
    अ) सर्व महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सर न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली पिठासमोरच केली जाते. महत्त्वाची प्रकरणे अन्य जेष्ठ न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली खालील पिठाकडे वर्ग केली जात नाहीत.
    ब) देश आणि न्यायपालिका यांच्यावर दुरगामी परिणाम करणाऱ्या प्रकरणांची सुनावणी सारासार विवेक बुद्धीने नव्हे तर आपल्या पसंतीचे पिठाकडे सरन्यायाधीश वर्ग करतात हे अयोग्य आहे.
    क) न्यायाधीश बी.एम. लोया यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहितार्थ याचिका न्यायालय क्र. 10 कडे वर्ग करण्यात आली. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायपीठ वगळता अन्य पहिल्या 4 क्रमांकाच्या पिठाकडे ही जनहित याचिका वर्ग का करण्यात आली नाही?
    ड) न्यायाधीश नेमणुकीसंदर्भाच्या मेमोरेंडम फॉर प्रोसिजर तयार करण्यासंबंधी 5 न्यायाधीशाच्या पिठाने निर्णय दिलेला असतानाही सर न्यायाधीशांनी पुन्हा त्याहून लहान खंडपीठावर बसून त्यावर भाष्य करणे हे अशोभनीय आहे.
    ई) प्रसाद एज्युकेशन ट्रस्ट लखनऊ वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळ्या बाबतची याचिका न्यायाधीश चेलमेश्‍वर यांच्या पीठाने, स्वतः न्या. चेलमेश्‍वर, सर न्यायाधीश दिपक मिश्रा, न्या.एम.बी. लोकूर, न्या. रंजन गोगाई आणि न्या. कुरिअन जोशेफ या 5 सदस्यांच्या पिठाकडे वर्ग केली असतानाही ती न्यायालय क्र. 7 कडे परस्पर वर्ग करण्यात आली आहे.
    सीबीआयचे न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू संदर्भातील याचिकेच्या सुनावणीचे वाटप आणि केंद्र सरकारने देशातील काही वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीत सर न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी अनावश्यक सहभाग दाखविल्याचे प्रमुख आक्षेप आहेत. या प्रकरणात काही वकिलांनी न्यायालयीन भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. लोकशाही प्रधान देशामध्ये झालेल्या अन्यायाबाबत किंवा हक्काची पायमल्ली झाल्याबाबत दुरूस्ती करून घेण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे आशेचे शेवटचे किरण असते. अश्या परिस्थितीत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल संशय निर्माण होत असेल तर कोणीही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही ही बाब लोकशाहीसाठी फारच घातक आहे.
    बी.एम. लोया यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक ही लातूर येथे वकीली करीत असताना झालेली आहे. त्यांच्या स्वभावाची आणि कामकाजाची माहिती बऱ्याच लोकांना आहे. त्यांच्या गूढ मृत्यूबाबत बऱ्याच दिवसांपासून वकील मंडळामध्ये चर्चा होत होती. त्यांच्या गुढ मृत्यूची चौकशी करावी म्हणून लातूर वकील मंडळामध्ये ठराव घेण्यात आला आणि वकील मंडळातर्फे मूक मोर्चा काढून चौकशी करण्याबाबत शासनास निवेदन देण्यात आले. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर त्वरित त्यांच्या मुलाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशां समक्ष निवेदन / स्पष्टीकरण देण्यात आले. नंतरच्या घटनेवरून गंभीर प्रकरण दडपण्यात येत असल्याबाबत बरीच चर्चा होत आहे. न्यायाधीशाच्या गूढ मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असल्यामुळे त्याची निःपक्षपणे चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर योग्य त्या घटना पिठापुढे त्वरित सुनावणी होणे आवश्यक आहे, नाही तर न्याय संस्थेवरील विश्‍वासाला तडे जाऊ शकतात. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
    या सर्व बाबी जनतेसमोर आल्यानंतर काही लोकांनी त्याचे समर्थन केले आणि काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. न्यायपालिका ही घटनेनुसार निर्माण झालेली महत्वाची संस्था असून ही घटना भारतीयांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे न्यायपालिकेमध्ये पडत असलेल्या वाईट प्रथा सर्व लोकांसमोर आणण्यात काहीही गैर नाही. न्यायपालिकेत वाईट पायंडे पाडले जात असतील तर योग्यवेळी लोकांच्या निदर्शनास आणून ते थांबविले गेले पाहिजेत. त्यामुळे वरिष्ठ न्यायाधीशांनी उचललेलेे पाऊल अत्यंत योग्य आहे.
    भारतीय लोकशाहीच्या संरक्षणसाठी न्यायपालिकेवरील विश्‍वास कायम राहील याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे. नसता देशामध्ये बंडाळी माजून ’जिसकी लाठी उसकी भैंस’ असे वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
    उच्च व सर्वोच्च न्यायालयात चुकीच्या पद्धतीने न्याय मिळविण्याचे प्रकार होत असतील तर त्याचे अनिष्ट परिणाम खालच्या न्यायालयात होतील आणि त्यामुळे लोकांचा न्यायपालिकेवरील विश्‍वास उडून जाईल आणि हा वाद कायम राहिला तर लोकशाहीची पाळेमुळे नष्ट होतील.
    न्यायाधीशांनी त्यांच्या पत्रामध्ये काही प्रकरणाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असून अश्याच प्रकारे न्यायालयीन आदेश देण्यात आलेली इतरही प्रकरणे आवश्यकता वाटल्यास निदर्शनास आणून देऊ, असे वरील न्यायाधीशांनी त्याच पत्रामध्ये नमूद केलेले आहे. वरील आरोप चुकीचे आहेत असे कोणीही म्हटलेले नाही परंतु काही लोकांनी ही बाब जाहीरपणे लोकांसमोर आणणे उचित नाही असे नमूद केले आहे. यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, हे लक्षात येते.
    सरन्यायाधिशांची पक्षपाती भूमिका...
    मुख्यतः दोन प्रकरणामुळे चार वरिष्ठ न्यायाधिशांनी सरन्यायाधिशांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक लखनऊ येथील प्रसाद मेडिकल कॉलेजच्या प्रवेश संबंधीची याचिका आहे. ज्यात स्वतः सरन्यायाधिशांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे. दूसरी घटना म्हणजे न्या.लोया यांच्या मृत्यूसंबंधी याचिका सरन्यायाधिशांनी एक ते 9 कोर्टांना डावलून सरळ 10 नंबर कोर्टामध्ये म्हणजे न्या. अरूण मिश्रांकडे वर्ग केली ही आहे.
    एकंदरित सरन्यायाधिशांचे वर्तन हे न्यायिक संकेतांना झुगारणारे असल्यामुळे ईतर न्यायाधिश पत्रकार परिषद घेण्यास बाध्य झालेले आहेत. भारतात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना बरखास्त करण्यासाठी महाअभियोग चालवावा लागतो. ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्यामुळे आपल्याला मिळालेल्या सुरक्षा कवचाचा अनेक न्यायमुर्तींनी गैरफायदा उचललेला आहे. सध्याचे सरन्यायाधिशही सरकारशी अनुकूल भूमिका घेऊन न्यायसंस्थेच्या निष्पक्षपणास हरताळ फासत असल्याचे दिसून येत असल्याने या चारही न्यायमुर्तींकडे तातडीने ही बाब देशासमोर मांडण्याशिवाय दूसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. म्हणून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही योग्य आहे. 12 जानेवारी या दिवसाला सुवर्ण दिवस म्हणून माजी न्या.कोळसे पाटील यांनीही गौरविले आहे. यावरून या पत्रकार परिषदेचे महत्व अधोरेखित होते. एकंदरित या पत्रकार परिषदेमुळे न्यायालयीन भ्रष्टाचाराची साफसफाई झाल्यास ते आपल्या लोकशाहीच्या हिताचेच होईल.

वकार अहमद अलीम
9987801906
चराचर सृष्टी मानवाला न उमगलेली एक गूढ व्यवस्था आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? कोणी केली? का केली? माणसांची उत्पत्ती कोणी, कधी व का केली? याचे उत्तर तो विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरून स्पष्टीकरण देतो, तोच धर्म ! तीच एकमेव जीवनपद्धती!
    इस्लाम केवळ उपासनेचे नाव नाही (धर्म नाही) तर ती एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. इस्लामचे मुख्यत: दोन स्त्रोत आहेत. एक अल्लाहची वाणी ’कुरआन’ आणि दूसरे इस्लामचे अंतीम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांचे आचरण (सुन्नाह). इस्लाम समजण्याचे हेच अधिकृत स्त्रोत आहेत.
    श्रद्धावंत लोकांच्या दृष्टीने धर्म, आस्था आणि भक्ती ही एक अत्यंत भावनिक गोष्ट आहे. विद्रोही, ईश्‍वराच्या अस्तित्वाचा इन्कार करणार्‍या (काफीर) लोकांच्या दृष्टीने धर्म ही अफूची गोळी आहे. शेवटी धर्म म्हणजे काय? त्याची वास्तविकता काय आहे? मानवाला मानवाप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी शक्ती म्हणजे धर्म होय. हैवान आणि सैतानापासून मानव भिन्न आहे हे दाखविणारी गोष्ट म्हणजे धर्म. माणसाला माणसांशी जोडणारा पूल म्हणजे धर्म.
ईश्‍वराचे स्वरूप : आपला देशच नव्हे तर जगातील कुठल्याही भागात, मानवांचा प्राचीन इतिहास व प्राचीन जातीचे अवशेष हेच दर्शवितात की, माणसाचे मन व त्याचे अंत:करण ईश्‍वराच्या कल्पनेविरहित कधीच राहिले नाही. मानवाने प्रत्येक युगात ईश्‍वराला कोणत्या ना कोणत्या रूपात मानले आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची उपासना जरूर केली आहे. ईश्‍वर एकच आहेत की अनेक? त्याचे गूण कोणकोणते? मानवाचे स्थान काय आहे? त्याचा शेवट कसा होणार आहे? मानवाचे ईश्‍वराशी संबंध - (उर्वरित पान 2 वर)
कशा प्रकारचे असले पाहिजेत? अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे म्हणजे धर्म ! धर्म माणसाच्या स्वभावात भिनलेला आहे. मनुष्य प्रथमत:च अस्तित्वात आला तेव्हापासून तो अस्तित्वात आहे आणि जोपर्यंत तो या संसारात आहे, तोपर्यंत तो उरणार आहे.
    मानवाची अगतिकता : मनुष्य ’दास’च म्हणून अस्तित्वात आला आहे. मानवामध्ये प्रचंड शक्ती आणि अधिकार असुनसुद्धा स्वभावत:च तो लाचार आणि दुर्बल आहे. या सृष्टीचा निर्माणकर्ता ज्याने मानवाला जन्म देऊन, सर्वोत्कृष्टपणे त्याला आकार दिले. ”लकद् खलकनल इन्सान फी अहसनील तक्वीम्” (कुरआन : सुरह - अत्तीन, आयत नंं.4). भावार्थ : ”आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केले.”
    मानव सृष्टीमध्ये नव्हता. त्याला जगामध्ये पाठविले गेले. जगात तो चिरस्थायी स्वरूपात राहणार नाही. त्याला हे जग सोडावे लागते. हे एक कष्टू सत्य आहे. ज्याला बुद्धी असणारा कोणीही इन्कार करू शकत नाही. प्रत्येक मुस्लिमाचे प्रेत दफन करताना जीवंत माणसांना याची आठवण दिली जाते.
    ”मिनहा खल़कनाकुम व फिहा नुईदुकूम व मिनहा नुखरिजुकूम तारतन् उखरा” (सुरह : ताहा 20, आयत क्र. 55).    म्हणजेच ”याच जमिनीतून आम्ही तुम्हाला निर्माण केले. हिच्यातच आम्ही तुम्हाला परत नेऊ आणि हिच्यातूनच तुम्हाला दुसर्‍यांदा बाहेर काढू”
    भावार्थ : ”याच मातीतून तुम्हाला जन्माला घातले गेले, यातच तुम्ही वाढलात, या मातीतूनच तुम्हाला बाहेर काढले जाईल आणि आमच्या समक्ष (ईश्‍वरासमक्ष) तुम्हाला उभे करण्यात येवून, विचारले जाईल) जगात तुम्ही काय करून आलात?” मानव या जगात बेजबाबार नाही, तर आपल्या भौतीक जीवनातील प्रत्येक क्षणाचा, कर्माचा तो ईश्‍वरासमोर उत्तरदायी आहे.
    सूर्य व चंद्राचे भ्रमण, दिवस-रात्रीचे उलटफेर, प्रचंड आकारात व वजनाचे पाण्याचे ढग, मृत जमिनीतून जीवनावश्यक धान्य, फळे, वनस्पती आदीमधून सृष्टीच्या इतक्या महान कारखान्याचा निर्माणकर्ता कुणीतरी अज्ञानी बालक नाही.’ ज्याने पोरखेळ म्हणून हे सर्वकाही निर्माण केले.
    ईश्‍वराच्या प्रत्येक कणाच्या निर्मितीत एक गंभीर उद्देश गर्भित असल्याचे दिसून येते. मानवाची निर्मिती करताना ईश्‍वराने मानवाला बुद्धी, विवेक, जबाबदारी, विनियोग अधिकार आणि ईश्‍वरी संतोळीचे मार्गदर्शन दिले. अशा मानवाला मृत्यू देऊन, त्याच्या भौतीक जीवनाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट जीवनकार्याचा हिशोब कधी घेणार नाही, अशी अपेक्षा सुज्ञ माणूस तरी करणार नाही. बौद्धिक दृष्टीने देखील प्रत्येक कृत्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात, अपेक्षित असतात, त्या अर्थी मानवाला हिशोबाशिवाय असेच सोडून दिले जाईल? हे कसे शक्य आहे?
    मानवाची अज्ञानता व विवशता सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, मानवाचा जन्म, मृत्यू देणारा ईश्‍वर आहे हे मान्य केल्यानंतर, मानवाने त्या ईश्‍वरासमोरच आपले मस्तक टेकविले पाहिजे. परंतु, अज्ञानापोटी ईश्‍वराऐवजी ईश्‍वरनिर्मित वस्तुसमोरच तो नतमस्तक होतो. माणसाला ज्या वस्तू प्रचंड आणि शक्तीशाली दिसतात,  अज्ञानामुळे तो त्यांची पूजा करू लागतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, नद्या, पर्वत आणि पशुंची तो ईश्‍वर समजून पूजा करू लागतो. गंभीरपणे विचार केल्यास असे दिसून येते की, या सर्व वस्तू स्वयंनिर्मित नसून, त्यांना निर्माण करणारा आहे. निर्मितीला निर्माता समजले की अज्ञानता आहे. कारण महाप्रचंड पशू सुद्धा किरकोळ मच्छराप्रमाणे मृत्युमुखी पडतो. प्रचंड मोठमोठ्या नद्यासुद्धा कोरडे पडतात. प्रचंड पर्वतांना तर दस्तुरखुद्द मनुष्यच छिन्नविछिन्न करीत असतो. पृथ्वीचे सुफलाम होणे पाण्यावर अवलंबून आहे, जमिनिच्या अखत्यारित नाही. सूर्य, चंद्र व नक्षत्रे सुद्धा एका नियमाला बांधील आहेत. नियमाविरूद्ध ते स्वत: काहीही करू शकत नाहीत. काही अदृश्य शक्ती जगावर आणि मानवांवर राज्य करते अशा भ्रामक कल्पनेतून मानव निर्मित वस्तूंना समर्पित होतो, मग प्रकाश, वायू, जल, पृथ्वी आदि वस्तूंचे विभिन्न देव वेगवेगळे असल्याचे मानतो. त्यांच्या काल्पनिक मूर्ती घडवून त्यांची पूजा करीत असतो. यासंबंधी तुकाराम महाराज म्हणतात,
” तुका म्हणे कैसे आंधळे हे जन । गेले विसरून खर्‍या देवा ॥
आपुला तो एक करूनी घ्यावा । तेणे वीण जीवा सुख नव्हे ॥
अल्ला एक तु, नबी एक तु ।  काटते सिर-पावो हाते नही जीव डराए ॥
(तुकाराम गाथा, वैद्यगोळी, अभंग क्र. 3988)
    यासंबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
” मुहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाणा ।
संघटित केले प्यारे स्वजना, त्या काळी ॥
    लोक प्रतिमापूजक नसावे, त्यांनी एका ईश्‍वरांशी प्रार्थावे ।
    हा मुहम्मदाचा उपदेश नव्हे एकच । देशासाठी ॥
     (संदर्भ : ग्रामगीता)
    विश्‍वव्यवस्थेत वायूची गती, पावसाचे आगमन, नक्षत्राचे भ्रमण, ऋतूचे परिवर्तन यात नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. विश्‍वव्यवस्थेतील सदरहु सह्योग आणि काटेकोरपणा पाहून एक सर्वात महान ईश्‍वर आहे, तोच सर्वांवर राज्य करीत आहे. जर अनेक ईश्‍वरे आपापल्या इच्छेनुसार काम करीत असतील, तर संपूर्ण सृष्टीव्यवस्थाच कोलमडून पडेल. माणसाने कुणा एका सर्वोच्च सत्तेपुढे आपली मान तुकवावी त्याची उपासना करीत रहावी ही त्यांची स्वाभाविक निकड आहे. ही अनादी कालापासून आहे आणि आत्तापर्यंत राहणार आहे. परंतु, मनुष्य केवळ आपली बुद्धी आणि ज्ञानेेंद्रियाच्या आधारे ईश्‍वराचे स्वरूप, त्याचे अस्तित्व व सत्ता जाणू शकत नाही.
    प्रेषितांचे आगमन : ईश्‍वराने मानवाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. मानवामधूनच काही मानवांना प्रेषित म्हणून जगामध्ये पाठविले, जे एकाच ईश्‍वरावर पूरेपूर श्रद्धा (विश्‍वास, इमान) ठेवणारे व ईश्‍वरी इच्छेचे पालन करणारे होते. आपला संदेश प्रेषितांप्रत पोहोचविले. त्यांना सत्यज्ञान देऊन, जीवन जगण्याचा योग्य कायदा शिकविला. ज्या यशस्वी मार्गावरून आदमची संतती दूर गेली होती त्यांना यशस्वी जीवनमार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, म्हणून प्रेषितपदी त्यांची नियुक्ती केली. आद्य मानव ह. आदम (अ.स.) पासून ते अंतीम प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) अशा जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषितांची साखळी ईश्‍वराने निर्माण केली. जगातील विविध भागात प्रेषित आले त्यांनी लोकांना त्यांच्या मायबोली भाषेत ईश्‍वरांचा संदेश पोहोचविला त्या सर्वांचा धर्म एकच होता. सर्वच प्रेषितांनी आपापल्या काळात उत्तम प्रकारे ध्येयपूर्तता केली.
अंतीम प्रेषित : - साडे चौदाशे वर्षापूर्वी ईश्‍वराने अरबस्थानात आपला अंतीम प्रेषित म्हणून ह. मुहम्मद (सल्ल.) यांना पाठविले. पूर्वीचे प्रेषित ज्या कार्यासाठी आले होते, तेच कार्य ह. मुहम्मद (स.) यांनी केले. त्यांनी समस्त मानवांना सत्यमार्गाकडे बोलाविले आणि ईश्‍वरी संदेश लोकांपर्यत पोहोचविला. याच आवाहनाला ’इस्लाम’ म्हणतात. इस्लामचे आणि मुस्लिमांचे कट्टर विरोधक वि.दा. सावरकर प्रेषित मुहम्मद (स.) संबंधी लिहितात, ”मरणासन्न समाजात त्या (इस्लामी) संंस्कृतीने नवचैतन्याचे वारे संचारले होते. ज्या दिवशी मुहम्मद (सल्ल.) पैगंबरांनी (रमजानच्या एक रात्री) कुराण शरीफचा पहिला श्‍लोक उच्चारला त्या दिवसापासून इस्लामी संस्कृतीत, त्या काळच्या अनेक जीर्णशीर्ण संस्कृतीपेक्षा, जे एकंदरीत त्या काळाच्या जगतात, नुसते जगण्यासच नव्हे, तर या जगास जिंकण्यासही समर्थ तर आणि योग्यतर ठरेल, असे काहितरी असामान्य श्रेष्ठत्व, काहीतरी नवे जीवनतत्व होतेच हे निर्विवाद आहे” (संदर्भ : समग्र सावरकर वाङ्मय, खंड 3, पृष्ठ क्र. 356).
    शंकराचार्य देवानंद सरस्वती आपल्या भाषणात म्हणतात, ” इस्लाम ईश्‍वराने निर्माण केलेला सिद्धांत आहे, कोणत्याही व्यक्तीचे तत्वज्ञान नव्हे. हा तोच सनातन धर्म आहे ज्याचा संदेश ऋषी मुनींनी दिला आहे की, सर्वांचा परमात्मा एकच आहे. इस्लामचा मूलमंत्र (कलमा-ए- तय्यब) मध्ये सर्व वेदांचे रस सामावलेले असल्यामुळे, त्यानुसार आचरण करणार्‍यांपेक्षा मोठा धर्मात्मा कोण असेल? अख्ख्या जगानं इस्लाम स्विकारला तरीही त्यात वाईट असे काही नाही. कुरानाची ही शिकवण जर जगभरात पोहोचली तरच शांती प्रस्थापित होईल. त्याला आतंकवादाशी जोडणारे लोक सैतानाची औलाद आहेत.” (संदर्भ : दिल्ली, भाषण - यू ट्यूब)
    ईश्‍वरी संदेश : ईश्‍वरी संदेश समस्त मानवांना आवाहन करतो, मानवाने दुसर्‍या कुणाच्याही पुढे नतमस्तक न होता, केवळ एका निर्गुण, निराकार ईश्‍वरासमोर नतमस्तक व्हावे.
    हे नद्या, पर्वत, हे सूर्य, चंद्र, पृथ्वी, पशू हे सर्व खरे पाहता तुझे सेवक आहेत. त्यांना केवळ तुझ्या (मानवाच्या)  सेवेसाठी निर्माण केलेले आहे. स्वत:च्याच सेवकापुढे नतमस्तक होणे हे केवळ सर्व शक्तीशाली, महान ईश्‍वराशी कृतघ्नता दाखविणेच आहे. नव्हे तर तुझ्या मस्तकाचा अपमान ही आहे. तू (मानव) भौतिकवादाच्या जंगलात हरवून जावे, हे तुझ्यासाठी विनाशक्ती आहे. ईश्‍वरी संदेश मान्य केल्यानंतर माणसातील शक्ती व प्रवृत्ती जागृत होतात. त्यामुळे त्याचे मस्तक इतर कुणापुढे नमत नाही.
    मुक्तीचा मार्ग : मनात पावित्र्य आणि चारित्र्य उभारणीशविाय मुक्ती व कल्याणाचा दूसरा मार्ग नाही. लालसा, अभिलाषा, ईर्षा आणि मत्सराच्या तुच्छ भावना ही शिकवण मानवातून काढून टाकते. हा विश्‍वास आपल्या मानणार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत निराश आणि हताश होऊ देत नाही. कारण तो एका अशा ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतो, जो पृथ्वी आणि आकाशातील सर्व खजिन्यांचा मालक आहे. त्यामुळे साहस, धैर्य, धाडसासह आपल्या वचनावर ठाम राहण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
    मानवी जीवन हे स्वैराचार नसून, त्याच्या प्रत्येक कृती आणि कार्यासाठी तो ईश्‍वरासमोर उत्तरदायी आहे. ईश्‍वरी संदेश मानवाला सत्याचा साक्षात्कार घडविते. इतिहास साक्षी आहे, जेव्हा-जेव्हा मानवाने ही शिकवण स्विकारून, त्यानुसार आचरण केले तेव्हा मानवतेला बहार आलेला आहे. जगाची विद्यमान व्यवस्था सदैव राहणारी नाही तरी एका विशिष्ट समयी ती नष्ट होणार आहे. मानवाला भौतिक जीवनातील प्रत्येक कार्याचा मोबदला मिळण्यासाठी, प्रलयकालानंतर एक शाश्‍वत जीवन आहे. हेच अंतीम सत्य आहे.
    जगात माणूस प्रेम, शांती आणि मुक्तीसाठी अनेक पर्यायाचा विचार करतो, कृती करतो पण ईश्‍वरी संदेशानुसार जीवन आचरणे हेच मुक्तीचे एकमेव व शाश्‍वत पर्याय आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

इस्लाममध्ये मुक्तिची धारणा आणि त्यासाठी आवश्यक असलेले कर्म:
अब्दुल कय्यूम शेख अहमद, औरंगाबाद - 9730 25 4636
सृष्टीच्या निर्माणकर्त्याने मानवाला सदाचार अथवा दुराचार दोन्हीपैकी कोणतेही कर्म करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि दोन्ही प्रकारच्या कर्माचे वेगवेगळे फळ ठरविलेले आहे.वर्तमान जग हे परिक्षा केंद्र आहे तर न्यायनिवाड्याचा दिवस  कयामत  निकालाचा दिवस आहे. वर्तमान जग हे कर्मस्थळ आहे तर पारलौकिक जिवन हे बक्षिस किंवा शिक्षा मिळण्याचे ठिकाण. परिक्षा गृहामध्ये वेळेचे बंधन असते .प्रश्‍नपत्रिका सोडविण्याऐवजी मौजमजा करण्यात वेळ घालविणे निश्‍चितच आपले नुकसान करणे आहे .प्रत्येक माणसाला फक्त एकदाच आपापल्या  जिवनाची परिक्षा द्यायची आहे .मृत्यूनंतर पुन्हा दुसरा कोणताच जन्म नाही . इस्लाममध्ये मुक्तिची धारणा - कयामतच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल जिथे प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे , त्या वेळी अल्लाह आपल्या कृपादृष्टीने ज्या लोकांच्या अपराधाना क्षमा करेल आणि त्यांच्या एकंदरीत कामगिरीवर प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गात दाखला देईल, याला इस्लाममध्ये मुक्ति मिळविणे असे म्हटले आहे. ईश्‍वराच्या प्रकोपापासून आणि नरकाग्नीपासून मुक्तता मिळणे हीच ’ वास्तविक मुक्ति ’ आहे .
        इस्लाममध्ये मुक्तिची अत्यंत अर्थपुर्ण , व्यापक आणि स्पष्ट धारणा आहे. मरणोत्तर जिवनात माणसाला मिळणारी मुक्ति त्याच्या वर्तमान जिवनातील कामगिरीवर आधारित असल्याचे सांगितले गेले आहे. जसे परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काही किमान गुणांची आवश्यकता भासते तसेच मुक्ति प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाला किमान चार कर्माची आवश्यकता असल्याचे कुरआन मध्ये सांगितले गेले आहे.
वेळेचे महत्त्व आणि इतिहासाची साक्ष
             कुरआन सुरे अस्त्र आयत नं. 1 मध्ये वर्णनामध्ये सुरूवातीलाच स्पष्ट सांगितले गेले आहे की ,माणसाचे जिवन या जगात अत्यल्प काळापुरते मर्यादित आहे .आणि ही मुद्दत उघडयावर ठेवलेल्या बर्फासारखी शिघ्रतेने संपणारी आहे. ज्याप्रमाणे बर्फाचा वापर न केला गेल्यास तो विरघळून वाया जातो व नुकसान होते अगदी त्याचप्रमाणे माणसाने आयुष्यातील वेळेचा लाभ घेऊन मरणोत्तर जिवन सफल करण्याकरिता प्रयत्न केले नाहीत तर निश्‍चितच मरणोत्तर जिवनाबरोबर सध्याच्या जिवनातही तो तोट्यात राहील.
    मानव इतिहास साक्षी आहे. ज्या-ज्या समाजाने ईश आदेशाच्या विरुध्द आपली मनमानी केली, अत्याचार व अन्यायाचा मार्ग अवलंबून जगात हाहाकार माजवला, त्यांच्यावर ईश्‍वराचा प्रकोप प्रकटला. त्या प्रकोपाच्या खाणाखूणा आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि मरणोत्तर जिवनात जे भोगावे लागतील ते तर निश्‍चितच आहे.
कायमच्या विनाशापासुन सुरक्षित राहणारे कोण?
       कुरआन सुरे अस्त्र आयत नं. 3 मधील वर्णनानुसार , विनाशापासून सुरक्षित राहू इच्छिणार्‍या माणसांना आवश्यक असे 3 कर्म सांगितले गेले आहेत. 1) जे लोक संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता व एकमेव मालक, पालक, शासक असलेल्या अल्लाहवर श्रद्धा ठेवतात. त्यांच्या अस्तित्वात व गुणात कुणालाही भागीदार ठरवित नाहीत. फक्त त्याच्याच आदेशाचे पालन करून ,नतमस्तक होऊन आपले भक्तीभाव व प्रेमभाव व्यक्त करतात.
2) जे दूराचारापासून दूर राहून सदाचाराचा मार्ग पत्करतात .प्रत्येकाचा हक्क आपली कर्तव्ये मानून आनंदाने पार पाडतात .अल्लाहचा हक्क, आईवडीलांचा, शेजार्‍यांचा, नातेवाईकांचा,गरीब, लाचार आणि प्रत्येक जिवाचा हक्क अदा करतात. प्रत्येकाशी न्यायनिष्ठेने व आदराने वागतात आणि जगात न्याय व सत्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
3) या निष्ठावन्त लोकांनी स्वत:साठी जो सदाचाराचा मार्ग निवडला आहे, त्याचीच शिकवण व उपदेश ते ऐकमेकांना देत असतात आणि दुराचारापासुन ऐकमेकांना रोखून सुधारणेचा प्रयत्न करतात. 4) आणि ही वाटचाल करताना त्यांच्या समोर कितीही संकटे आली,कसल्याही अडचणी निर्माण झाल्या ,कितीही कष्टाना तोंड द्यावे लागले आणि कोणताही त्याग करावा लागला तरीही त्यासाठी लागणारी सहनशिलता ,दृढता, धैर्य ,निर्धास्तता आणि संयम ते ठेवतात.

एम.आय.शेख
9764000737
एकदा प्रेषित सल्ल. यांनी सांगितलेल्या हदिसचा मतितर्था असा की, ” जेव्हा जगातील बुद्धीमान लोक डोक्याला डोके लाऊन एखाद्या जटील समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न करतील व अल्लाह त्यांच्यामधून ते ’समाधान’ काढून घेईल तेव्हा ते सर्वजण एकमेकांकडे हताशपणे बघत राहतील”.
    तीन तलाकच्या बाबतीत संसदेत जे काही घडले त्यावरून वरिल हदीसची आठवण झाली. लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालेले विधेयक राज्यसभेत अडकून पडले. लोकसभेत एकमत झालेल्या राजकीय पक्षांमध्ये राज्यसभेत एकमत होऊ शकलेले नाही.
    आपल्या देशात मुस्लिम तरूणांची अशी अवस्था झालेली आहे की, जिच्याशी ते लग्न करू इच्छितात (हादिया) कोर्ट त्यांना करू देत नाही. ज्यांना सोडू इच्छितात त्यांना ते सोडू देत नाहीत. सामान्यातील सामान्य बुद्धीच्या माणसालाही ज्या गोष्टी कळाल्या, त्या तीन तलाक संबंधी कायद्याचा मसुदा तयार करणार्‍यांना साध्या दोन गोष्टी कळाल्या नाहीत.
    पहिली गोष्ट अशी की, 22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ’तीन तलाक’ला घटनाबाह्य ठरविले, याचा अर्थ तीन तलाक कायद्याने प्रतिबंधित झाला. म्हणजेच देशात आता कोणत्याही पतीला आपल्या पत्नीला तीन तलाक देता येत नाही. दिले तरी लागू होत नाही. मग जी गोष्ट लागूच होत नाही. त्यासाठी तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद कशी काय करता येईल?         दूसरी गोष्ट अशी की, कोणत्याही मुस्लिम महिलेचे असे म्हणणे नव्हते की, त्यांच्या पतीला सरकारने जेलमध्ये टाकावे. त्या फक्त तीन तलाकमुळे आपले लग्न मोडू नये, यासाठी प्रयत्नशील होत्या. कोणती सुज्ञ स्त्री आपल्या पतीला जेलमध्ये घालण्याचा निर्णय घेईल? असे असतानासुद्धा पतीला तीन वर्षे जेलमध्ये पाठविण्याचा एकतर्फी कायदा करण्यात आला. तो करतांना कुठल्याही इस्लामिक विद्यापीठाला किंवा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डला विश्‍वासात घेतले गेले नाही, असे करून सरकारने मुस्लिम महिलांचे कधीही न भरून येण्यासारखे नुकसान केलेले आहे.
    परिणामी, जो कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या. सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे तीन तलाक दिल्यानंतर पती जर तीन वर्षासाठी जेलमध्ये गेला त्याच्या मुलांचे पालनपोषण कोणी करायचे? या प्रश्‍नाचे उत्तर हा कायदा देत नाही. सर्वांना माहित आहे, मुस्लिम समाजामध्ये घोर गरिबी आहे. अशात तलाक पीडित महिला गरीब असेल तर ती आपल्या मुलांचे पालन-पोषण कसे करणार? गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेमध्ये या संबंधी बोलताना सांगितले की, जेलमध्ये गेलेल्या पुरूषाच्या मुलांच्या पोषणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, त्यावर कायदा मंत्र्यांनी तशी तरतूद कायद्यात करणे शक्य नसल्याचे कळविले.
    एकदा का पती जेलमध्ये जावून आला तर तो जेलमध्ये पाठविणार्‍या पत्नीला पुढे पत्नी म्हणून ठेवणार नाही. शिवाय, ’पतीला जेलमध्ये घालणारी’ म्हणून कुख्यात झालेल्या स्त्रीशी दूसरा कोण पुरूष लग्न करणार? शिवाय, जेलमध्ये जाण्याच्या भितीने कोणताही पुरूष तीन तलाक देणार नाही व तिचा सांभाळही करणार नाही. म्हणून या कायद्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणार्‍या महिलांचा अपेक्षाभंगच झाला आहे. 
    मुस्लिम समाजामध्ये तलाक एवढा सहज कसा काय दिला जातो? हे यामुळे हिंदू बांधवांच्या लक्षात येत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांना मुस्लिमांच्या निकाह संबंधी फारशी माहिती नसते. ते हिंदू विवाह आणि मुस्लिम विवाह यांच्यामधील मुलभूत फरकच समजून घेत नाहीत. हिंदू धर्मामध्ये विवाह म्हणजे एक संस्कार आहे. जो कधीही तुटू शकत नाही. त्यासाठीच ’सात जन्माची लग्नगाठ’ असा शब्द प्रयोग केला जातो. या उलट इस्लाममध्ये विवाह म्हणजे,”एक सामाजिक करार आहे” जो एक मुलगा आणि मुलगी मिळून आपल्या अटी-शर्ती प्रमाणे करतात. हा करार शेवटपर्यंत चालला तर ठीक नसेल चालला तर तो भंग करता येतो. समाजामध्ये इतर करार जसे भंग केले जातात, हा ही करारभंग केला जातो. त्यात वाईट असे काहीच नाही. पण हे सहजा-सहजी घडत नाही. लग्न हे शेवटपर्यंत टिकावे, अशी अल्लाहची इच्छा असल्यामुळे ते टिकविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातात. परंतु, प्रयत्नाअंती सुद्धा लग्न टिकविणे दोघांच्याही हितामध्ये नसेल तर करारभंग करणेच कधीही उत्तम. यामुळे दोघांनाही नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळते.
    द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. हे त्यांच्या काळात तीन तलाक देणार्‍या पुरूषांना 30 फटके मारण्याची शिक्षा देत. या सरकारने तसे करणार्‍याला तीन वर्षे तुरूंगात पाठविण्याची शिक्षा प्रस्तावित करून एका प्रकारे देशात शरियत कायदाच लागू केला आहे. करायला गेले एक आणि झाले भरते, अशी विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून शरियत अपरिवर्तनीय आहे, हा जो मुस्लिमांचा दावा आहे तो या ठिकाणी सिद्ध होतो.
    हा कायदा राज्यसभेत अडकून पडल्यामुळे केंद्र सरकार इरेस पेटून अध्यादेशही आणू शकते. येन-केन-प्रकारेन हा कायदा रेटावाच, असे सरकारचे धोरण दिसते. परंतु, यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होणार आहेत. एक तर मुस्लिमांमध्येही परित्याक्ता महिलांची संख्या यामुळे वाढणार आहे. शिक्षेच्या भितीने मुस्लिम पुरूषही तलाक न देता आपल्या पत्नीला वार्‍यावर सोडून देतील.  म्हणजे तलाकही द्यायचा नाही आणि तिचा सांभाळही करायचा नाही, अशा विचित्र अवस्थेत तिला लटकावून ठेवायचे, अशामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात.
2011 च्या जनगणनेनुसार देशातील स्त्रियांची स्थिती
    2011 च्या जनगणनेप्रमाणे लग्नामध्ये टिकून राहण्याचे मुस्लिम स्त्रियांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. म्हणजेच 87.8 टक्के एवढे आहे. या खालोखाल हिंदू महिलांची संख्या 86.2, ख्रिश्‍चन 83.7 टक्के, ईतर 85.8 टक्के आहेत. विधवा महिलांची संख्याही ईतर धर्माच्या तुलनेत मुस्लिमांत सर्वात कमी आहे. म्हणजेच 11.1 टक्के, हिंदूमध्ये ती 12.9 टक्के तर ख्रिश्‍चन 14.6 टक्के व ईतरांमध्ये 13.3 टक्के एवढी आहे. हे सगळे सरकारी आकडे आहेत. ज्यावरून हे सिद्ध होते की, मुस्लिम समाजातील लग्न आणि तलाकची पद्धत ही ईतर समाजांच्या तुलनेत चांगली आहे.
आत्मपरिक्षणाची गरज
    असे असले तरीही इस्लाम सारख्या ईश्‍वरीय मार्गदर्शन प्राप्त धर्मामध्ये ज्या काही तलाकच्या घटना घडतात, त्याही खरे पाहिले तर घडायला नकोेत. अनेक मुस्लिमांचा असा दावा आहे की, मुस्लिमांमध्ये तीन तलाक फार कमी होतात. हा दावा खोटा आहे. उलटपक्षी तीन तलाक दिल्याशिवाय, तलाकच होत नाही, असा गैरसमज समाजामध्ये रूढ आहे. म्हणूनच तीन तलाक रागाच्या भरात जसा दिला जातो, तसाच लेखी सुद्धा दिल्या गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. तीन तलाकच्या बाबतीत काजी, उलेमा आणि वकीलांची भूमिकासुद्धा संतोषजनक नाही. आपले अशिल तीन तलाक देण्यासाठीच आग्रही असतात म्हणून आम्ही तीन तलाक लिहून असे त्यांचे म्हणणे आहे. 
    अनेक मुस्लिम परिवारांमध्ये दोन-दोन मुलींना तीन तलाक दिला गेलेला आहे. त्यामुळे तिसरी मुलगी लग्नास तयार नाही व नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
    नवश्रीमंत मुस्लिमांच्या कृपेने माशाल्लाह मुस्लिमांमध्ये लग्ने ही महाग झालेली आहेत. त्यामुळे तलाक पीडित महिलाच्या पुनर्विवाहाची समस्या सुद्धा दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे.
    मुस्लिमांमधील सर्वच गट तीन तलाक वाईट आहे, असे ठासून सांगतात. त्यामुळे होणार्‍या वाईट परिणामांचीही काळजी करतात. परंतु, प्रत्यक्षात समाजातून तीन तलाकचे उच्चाटन व्हावे, यासाठी कोणताच गट फारशा गांभीर्याने प्रयत्न करतांना दिसून येत नाही. यामुळे ज्या महिला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या त्या नादान आहेत, लोकांच्या हातातील बाहुल्या आहेत, असे म्हणून त्यांची अवहेलना करणे सोपे आहे. मात्र प्रत्यक्षात तीन तलाक झाल्यानंतर त्यांना काय यातना होतात, हे त्याच जाणो.
    दरवर्षी रमजानमध्ये कोट्यावधी रूपयांची जकात काढली जाते. मात्र या दुर्देवी तलाक पीडित महिलांच्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाची कुठलीच ठोस व्यवस्था आपण गेल्या 70 वर्षात करू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत अशी व्यवस्था उभी करण्यास श्रीमंत मुस्लिम, बुद्धिजीवी, उलेमा हजरात पुढे येणार नाहीत, तोपर्यंत या तलाक पीडित महिलांच्या यातना कमी होणार नाहीत.
    शिवाय, शुक्रवारच्या नमाजच्या विशेष संबोधनामध्ये मुस्लिम तरूणांनी तीन तलाक देऊ नये, यासाठी सातत्याने प्रबोधन करण्याची गरज आहे. शिवाय, निकाह नाम्यामध्ये तीन तलाक देणार नाही, अशी अट सामील करण्यासाठी वधु पक्षाने वर पक्षाकडे आग्रह धरावयास हवा. याशिवाय, आपल्याकडे आलेल्या प्रत्येक इच्छुक व्यक्तिचे समुपदेशन केल्याशिवाय काजींनी तलाकनामा लिहून देऊ नये, याचे बंधन काजींवर टाकण्याची आवश्यकता आहे.
    एकंदरित परिस्थितीवरून असे वाटते की, भारतात इस्लाम ही अन्य धर्मांप्रमाणे फक्त एक खुंटलेला धर्म होऊन बसलेला आहे. शुक्रवारची नमाज, ईदची नमाज, रोजे, हज आणि आजकाल निघत असलेल्या पैगम्बर जयंतीच्या मिरवणुकांपर्यंत आपण इस्लामला स्वैच्छेने संकुचित करून टाकलेले आहे. यानंतर मात्र आपण खाण्याच्या, पिण्याच्या, कपड्यांच्या, इतर चालीरितींच्या बाबतीत एवढेच नव्हे तर आपले आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतसुद्धा स्वमर्जीने पाश्‍चिमात्यांचे अनुसरण करतो. हेच कारण आहे की, आमची चाल, चरित्र आणि चेहरा बदललेला आहे. तो सच्चा मुस्लिमासारखा राहिलेला नाही. त्यामुळे अल्लाहची घोषित मदत पुरेशा प्रमाणात येईनाशी झालेली आहे.
    स्पष्ट आहे, अहेकामी इलाही (ईश्‍वरीय आज्ञां)च्या नाफरमानीची शिक्षा आपण भोगत आहोत. त्यातूनच गेल्या 70 वर्षात आपल्यावर असे बादशाह (शासक) मुसल्लत झालेले आहेत. जे आमच्याशी त्याचप्रमाणे व्यवहार करीत आहेत, जसे की त्यांनी वागावयास हवे. म्हणून भारतात आपल्या सोबत जे काही होत आहे, त्याला अल्लाहची आजमाईश समजणे माझ्या मते चुकीचे आहे. ही एक शिक्षा आहे, जी आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे मिळत आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ह्या ईश्‍वरीय शिक्षेमधून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे इस्लामी आदेशांना आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू करून, अल्लाहला हे दाखवून द्यावे की, आम्ही तुला पसंत असलेल्या जीवन पद्धतीनुसार जीवन जगत आहोत. मुस्लिमांनी आता टायगर जिंदा आहे की नहीं याकडे लक्ष न देता स्वतःचा जमीर जिंदा आहे की नाही? याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
    सरकार कसेही करून हे बिल रेटणार यात शंका राहिलेली नाही. या बिलाचे मातम करत बसण्यापेक्षा आपल्या सर्वांनी कुरआनकडे परतणे चांगले. त्यातील आदेशांप्रमाणे जीवन जगणे चांगले. याशिवाय आपली सुटका नाही. शेवटी अल्लाकडे दुआ करतो की,” ऐ अल्लाह!  इस्लामला फक्त एक इबादतींपुरता धर्म न मानता तो पूर्ण जीवन व्यवस्था आहे, याची जाणीव आम्हा सर्वांमध्ये निर्माण करून त्यानुसार जीवन जगण्याची आम्हा सर्वांना शक्ती प्रदान कर” (आमीन.)

तब्बसुम मंजूर नाडकर, मुंबई.
9870971871
    अल्लाहने संपूर्ण विश्‍वाची व त्यातच पृथ्वीची रचना अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे. ती नुसती सुंदरच नाही तर त्यात व्यवस्थापनाची अत्युच्च रचना सामावलेली आहे. ज्यात एका सेकंदाचाही फरक पडत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट केलेले आहे की, आदम अलै. यांची सर्वप्रथम रचना केली गेली आणि त्यांच्यापासून त्यांची पत्नी हव्वा अलै. यांची निर्मिती केली. पृथ्वीवर सर्वात अगोदर हेच जोडपे पाठविण्यात आले व त्यांच्यापासून वाढलेला वंश म्हणजे आज जगात अस्तित्वात असणारे 7 अब्ज लोक होत.
    जगाच्या रचनेमध्ये व मनुष्याच्या उत्पत्तीमध्ये महिलेला जे उच्चस्थान इस्लामने दिलेले आहे तसे स्थान दुसर्‍या कुठल्याही सामाजिक व्यवस्थेत दिलेले नाही. इस्लामी व्यवस्था आणि कायद्याची व्यवस्थित माहिती असेल तर त्यात साडे चौदा वर्षापूर्वी महिलांना जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत ते पाहून लोक आश्‍चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाहीत. असे लोक ज्यांना खरेपणा आवडतो आणि वृत्तीनेही सभ्य आहेत, ते इस्लाममधील खरेपणा स्विकार केल्याशिवाय राहत नाहीत.
    आदर्श समाजाचा पाया स्त्री आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, आईच्या कुषित मुलांची पहिली शाळा साकारतेे. येथूनच या गोष्टीचा निर्णय होतो की, पुढे चालून मुलं चांगली निपजणार का वाईट? यावेळेस झालेले संस्कार मरेपर्यंत टिकून राहतात. स्त्री एक ईश्‍वराची श्रेष्ठ रचना आहे. तिच्यावर मानवी वंशाला जन्माला घालण्याची, आकार देण्याची आणि संस्कार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. हीच जबाबदारी जगातील सर्वात श्रेष्ठ जबाबदारी आहे. स्त्रीने जर ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तर जग सुंदर आणि राहण्यालायक होईल आणि दुर्देवाने स्त्री ही जबाबदारी पार पाडण्यास अयशस्वी झाली तर हे जग राहण्यालायक राहणार नाही.
    यावरूनच एक स्त्रीच्या अस्तित्वाचे महत्व कळू शकते. स्त्रीची भूमिका आई बनण्यापासून घरातून सुरू होते. दगड, मातीपासून तयार केेलेल्या इमारतीला घरपण स्त्री शिवाय येत नाही. स्त्री नसेल तर कितीही मोठी इमारत दगड मातीची आकृतीपेक्षा जास्त मानली जाणार नाही. घराला घरपण देण्यासाठी, सजविण्यासाठी, तिला रोज सकाळी सर्वात अगोदर उठावं लागतं, घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडी-निवडीच्या विचाराप्रमाणे सकाळचा नाष्टा तयार करावा लागतो. त्यानंतर घरातील इतर महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडता-पाडता कधी रात्र होते हे कळत नाही. सकाळी सगळ्यात अगोदर उठलेली गृहिणी झोपायला मात्र सगळ्यात शेवटी जाते. गृहिणी घरात ज्या तत्परतेने काम करते तेवढ्या तत्परतेने पुरूष काम करू शकत नाहीत. तिच्या अस्तित्वाने घर भरून जाते.
    व्यक्तिगत जीवनात असो का सामुहिक जीवनात स्त्रीशिवाय शोभा येत नाही. स्त्री शिवाय जगाची कल्पना सुद्धा करता येत नाही. स्त्रीला पुरूषांबरोबरचे अधिकार देण्याच्या गप्पा तर सगळे मारतात मात्र प्रत्यक्षात तिला तिचे अधिकार कधीच मिळत नाहीत.
    स्त्रीने कार्यक्षम असणे हे समाजहिताचे आहे. ती जर कार्यक्षम नसेल तर समाज वेगाने प्रगती करू शकत नाही. संस्कृती आकार घेऊ शकत नाही. स्त्री जर सुसंस्कारी नसेल तर समाज सुसंस्कृत होऊ शकत नाही.
    इस्लामपूर्व काळात अरबस्थानात महिलांवर भरपूर अत्याचार होत होते. त्यांच्यावर अनेक बंधने लादली गेली होती. समाजात तिला कुठलेच स्थान नव्हते, तिला कुठलेच अधिकार नव्हते, तिचा कुठलाच सन्मान केला जात नसे, स्त्रीला  पुरूषाच्या हातातील बाहुलीप्रमाणे वागणूक मिळत होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिव्य कुरआनच्या मार्गदर्शनाखाली एवढी जबदरस्त समाजसुधारणा केली की, जे अरब आपल्या मुलींना जीवंत गाडून टाकत होते तेच अरब आपल्या मुलींना फक्त लाडाने वाढवतच नव्हते तर त्यांना आपल्या संपत्तीतून हक्कही देत होते.
    इस्लाममध्ये स्त्रीचे अधिकार कुरआन आणि सुन्नतमध्ये स्पष्टपणे नोंदविलेले आहेत. एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे शरियतमध्ये पुरूषाला स्त्रीवर कुठलेच वर्चस्व गाजविण्याचा अधिकार दिलेला नाही. फक्त पतीला पत्नीवर हक्क गाजविण्याचे काही विशेषाधिकार दिलेले आहेत. त्याचा उद्देशही पत्नीवर पतीने हक्क गाजवावा हा नाही. तर कुटुंबाचे संचलन शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे हा आहे. इस्लाममध्ये स्त्रीला जो मान-सन्मान दिलेला आहे तो अवर्णनीय आहे.
    आजकाल मुलींच्या शिक्षणासंबंधी दोन विचारप्रवाह मुस्लिम समाजामध्ये रूढ आहेत. एक विचार प्रवाह मुलींना उच्चशिक्षणापासून रोखू पाहतो तर दूसरा मुक्तपणे उच्चशिक्षण देण्याची शिफारस करतो. माझ्या मते हे दोन्हीही विचार बरोबर नाहीत. मुलींना उच्च शिक्षणापासून रोखणे ही चुकीचे व त्यांना गैरइस्लामी वातावरणात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मुक्त सोडणेही चुकीचे आहे. सत्य या दोघांच्या मध्ये आहे. अर्थात इस्लामी आचारसंहितेच्या परिघामध्ये राहून मुलींना शोभेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा शाखेत उच्च शिक्षण देण्यास हरकत नाही. स्त्रियांचा वावर आज प्रत्येक क्षेत्रात दिसून येतोय. मात्र माझ्या मते महिलांसाठी काही विशिष्ट क्षेत्र चिन्हित करून त्यामध्ये गरजू महिलांचा समावेश व्हावा. खरे पाहता गृहिणी हेच पद कुठल्याही पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे, अशी माझी धारणा आहे.

-कलीम अजीम, अंबाजोगाई
नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवघं जग नवा संकल्प करतो, भारताचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी मात्र ३१ डिसेंबरला जाहीर खोटं बोलून गेले. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रधानसेवकांनी घोषणा केली की ‘मुस्लिम महिला पुरुष पालकाशिवाय (मेहरम) हज यात्रेला जाऊ शकतील, भारताने ७० वर्षांत पहिल्यांदाच असा निर्णय घेतला आहे.’ अशा प्रकारच्या बातम्या वाचून मी चाटच पडलो. कारण चार वर्षांपूर्वी सौदी सरकारने तो निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वी पुन्हा सौदी सरकारने याची पुनर्घोषणा केली होती. मग भाजप सरकार का सौदीचे क्रेडिट घेतो, हे मला पटत नव्हते. वाटलं किमान फेसबूकवर तर लिहावं, पण रविवार असल्याने मी इतर कामात व्यस्त होतो, त्यामुळे लिखाण करता आलं नाही. पण रविवारच्या ब्लॉग लेखनात जाता-जाता म्हणून मी याबद्दल चिमटा काढला होता. दोन दिवस यावर कुणीच प्रतिक्रिया दिली नाही. मग मीच सविस्तर लेख लिहायला घेतला.
रविवारच्या ‘मन की बात’नंतर साहजिकच ही बातमी मीडियासाठी मोठी ठरली. प्रधानसेवकाच्या या खोटारडेपणाची मेन लीड बातमी सर्व प्रसारमाध्यमांनी चालवली. रविवारी बातम्यांचा वानवा असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया बातमी डेव्हलप करू लागला. प्रिंट मीडियाने मुख्य मथळ्याखाली क्रेडिट घेणाऱ्या बातम्या चालवल्या. प्रधानसेवक इथं साफ खोटं बोलून गेले, पण गोदी मीडियाने ‘भाजपचे क्रांतिकारी पाऊल’ या मथळ्यासह बातम्या रंगवल्या.
यातली अजून एक दुसरी बाजू आहे. प्रधानसेवकांच्या घोषणेनंतर लागलीच चालू वर्षात १३०० मुस्लिम महिलांना पुरूष सहकाऱ्यांशिवाय हजला पाठवू, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. मीडियात वाहवाही व क्रेडिट घेण्यासाठी ही घोषणा होती स्पष्ट झालं होतं. नकवींच्या घोषणेची सत्यता पडताळणी केली तर असं लक्षात आलं की तब्बल १२०० महिलानी एकट्याने हज यात्रेला जाण्यासाठी भारत सरकारकडे अर्ज भरले आहेत. त्या अर्जांवर भाजप सरकारने विचार केला आहे. मग तो कथित ‘ऐतिहासिक’ निर्णय भाजप सरकारचा कसा काय होऊ शकतो?
सौदी सरकारने येत्या अकरा वर्षांत आर्थिक सक्षमता मिळवण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रम जाहीर केला आहे. यातून सौदी सरकारने उत्पन्नवाढीचे विविध उपक्रम राबविले आहेत. याच कार्यक्रमाअंतर्गत २७ वर्षानंतर महिलांची ड्रायव्हिंग बंदी उठवण्यात आली, साडे तीन दशकांनंतर देशात सिनेमा हॉल पुन्हा सुरू होणार आहेत. तसंच आयात निर्यात धोरण बदलले आहे, व्हिसा प्रणालीत बदल केला गेला, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सवलती देऊ केल्या आहेत, इत्यादी बाबी ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत आल्या. हज यात्रेचा कोटा वाढविणे हा त्याचाच भाग होता.
हज यात्रेचा कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती, भाविकांची वाढती संख्या पाहता सौदी प्रशासनाने याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या, हळूहळू गेल्या काही वर्षांपासून हज भाविकांचा कोटा वाढविला गेला. सर्वांना हज यात्रेला येता यावे यासाठी सौदी सरकारने २०१४ साली केवळ ४५ पेक्षा कमी वय असलेल्या सदृढ महिला भाविकांना एकट्याने हज यात्रेला परवानगी दिली. काही देशांतून अनेक सिंगल महिला हज यात्रेसाठी पवित्र मक्का शहरात चार-चारच्या गटाने दाखल झाल्या होत्या. गेल्या दीड हजार वर्षांपासून एकटी महिला हज यात्रेला जाऊ शकत नव्हती. त्यांना मेहरम (पालक) व्यक्तींसोबत जसे मुलगा, वडील, भाऊ आणि शौहर यांच्यासोबत ती हज यात्रेला जाऊ शकत होती. भारताने मात्र चार वर्षे उशिराने हा निर्णय लागू केला.
हजयात्रेबाबत सौदीचे निर्णय व आदेश अंतिम असतात. मग भारतच काय तर अन्य इस्लामी देशही याबाबत स्वतंत्र निणर््ीय घेऊ शकत नाहीत. कारण तो हज यात्रेचा प्रमुख आयोजक देश आहे. प्रत्येक देशाला समान संधी मिळावी या हेतूनं सौदी सरकारनं ठराविक कोटा दिलेला आहे. त्यानुसार दरवर्षी हज यात्रेकरू सौदीला हज यात्रेसाठी जातात. कोटा वाढवून द्यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक देश करत आहेत. अनेकदा मागणी करूनही कोटा वाढविला जात नाही, अशी तक्रार भारतासह, सूडान, केनिया, श्रीलंका, पाकिस्तान आदी राष्ट्रांची आहे. युरोपियन राष्ट्रांना जादा सवलती व कोटा का आहे? याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून गरीब देशांचे सौदी सरकारसोबत वाद सुरु आहेत. अरब राष्ट्रांना सवलती व विशेष ट्रिटमेंट दिली जाते, हीदेखील एक तक्रार आहे. अशा तक्रारींकडे सौदी प्रशासन दुर्लक्ष करते. १९८७ साली मक्केत हज यात्रेदरम्यान दंगल घडली होती. यात ४०० पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला होता. इराणने ही दंगल घडवली होती असा आरोप केला जातो. भेदभावाच्या वागणूकीतून त्रस्त होऊन ही दंगल इराणींने घडविल्याचे अनेकजण सांगतात. या घटनेनंतर सौदी सरकारने हज यात्रेचे नियम आणखीन कडक केले, याचा फटका इतर गरीब देशांना झाला.
सौदी सरकारला हज यात्रेतून मोठी आर्थिक उलाढाल होते. गेल्या वर्षी तब्बल ८३ लाख भाविक हज यात्रेसाठी मक्केत आले होते. यातले साठ लाख भाविक उमरा या यात्रेसाठी सौदीत दाखल झाले होते. सौदी सरकारच्या नव्या योजनेअंतर्गत एक कोटी २० लाख भाविक आता हज यात्रा करू शकतात. गेल्या वर्षी ८० लाख ३३ हजार हज भाविकांनी तब्बल २३ अरब डॉलर सौदीत खर्च केले. हा खर्च केलेला पैसा सौदी सरकारच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतो. हज यात्रेकरुंची संख्या वाढल्याने साहजिकच सौदी सरकारच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होणार आहे.
मोदींची घोषणा चार वर्षांनंतर उगाच आलेली नाहीये. राजकीय अभ्यासक या घोषणेला मुस्लिमद्वेषी राजकीय खेळी मानतात. ट्रिपल तलाक रद्दीकरणातून श्रेय लाटून भाजपने आपली हिंदुत्ववादी वोटबँक मजबूत केली आहे. याचाच एक भाग म्हणून वरील विधान होतं. भाजप हज यात्रेसंदर्भात गेल्या अनेक दशकांपासून राजकारण करत आहे. मुस्लिम अनुनयाचा आरोप करत हजप्रमाणे अमरनाथ यात्रेला सबसिडी दिली पाहिजे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करतात. थेट रेल्वेमार्ग टाकून अमरनाथला सर्व जातिधर्मातील भाविकांना सरकार फुकटात पाठवू शकते, पण हज यात्रेसाठी हजारो किलोमीटर लांब परदेशात जावं लागतं, ती फुकटात असू शकत नाही. पण भाजपने मुस्लिमांना हजला सरकार फुकटात पाठवते, असा आरोप सतत केला आहे.


    माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या आदेशांची अवज्ञा करतो आणि जो अल्लाहचे आदेशांची अवज्ञा करताना पाहतो मात्र त्याला विरोध करीत नाही, त्याच्याशी सहिष्णुतेने वागतो. त्या दोघांचे उदाहरण असे आहे की काही लोकांनी एक नौका घेतली आणि फासे फेकले, त्या नौकेत अनेक स्तर होते, वर व खाली. काही लोक वरच्या भागात बसले आणि काही खालच्या भागात. जे लोक खालच्या भागात बसले होते, ते पाण्यासाठी वरच्या लोकांजवळून जात होते जेणेकरून समुद्राचे पाणी भरता यावे, तेव्हा वरच्या लोकांना त्याचा त्रास होत होता. शेवटी खालच्या लोकांनी कुऱ्हाडी घेतली आणि नौकेचा तळ फोडू लागले. वरचे लोक खाली आहे आणि म्हणाले तुम्ही हे काय करीत आहात? ते म्हणाले की आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आणि समुद्राचे पाणी वर जाऊनच भरले जाऊ शकते आणि आमच्या ये-जामुळे तुम्हाला त्रास होतो. म्हणून आम्ही नौकेचा तळ फोडून समुद्रातून पाणी प्राप्त करू.’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे उदाहरण देऊन म्हटले, ‘‘जर वरच्यांनी खालच्यांचा हात धरला असता आणि छिद्र पाडू दिले नसते तर त्यांनाही बुडण्यापासून वाचविले असते आणि स्वत:लाही वाचविले असते. जर त्यांना तसे करण्यापासून रोखले नाही तर त्यांनाही बुडवतील आणि स्वत:ही बुडतील.’’ (हदीस : बुखारी)
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकेदिवशी प्रवचन दिले आणि त्यात काही मुस्लिमांची प्रशंसा केली आणि म्हणाले, ‘‘असे का आहे की काही लोक आपल्या शेजाऱ्यांमध्ये धार्मिक (दीनी) समज निर्माण करीत नाहीत आणि त्यांना शिकवण देत नाहीत आणि धर्म जाणून न घेण्याचे अद्दल घडविणारे परिणाम त्यांना सांगत नाहीत आणि त्यांना वाईट कामांपासून रोखत नाहीत? आणि असे का की काही लोक आपल्या शेजाऱ्यांकडून धर्म शिकत नाहीत आणि धार्मिक समज निर्माण करीत नाहीत आणि धर्म जाणून न घेण्याचे अद्दल घडविणारे परिणाम माहीत करून घेत नाहीत? अल्लाह शपथ! लोकांनी आपल्या शेजाऱ्यांना अवश्य शिक्षण द्यावी, त्यांच्यात धार्मिक समज निर्माण करावी, त्यांना उपदेश द्यावा, त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात आणि त्यांना वाईट गोष्टींपासून रोखावे. तसेच लोकांनी आपल्या शेजाऱ्यांकडून दीन (धर्म) शिकायला हवा, धर्माची समज निर्माण करावयास हवी आणि त्यांचे धर्मोपदेश मान्य करावे लागतील अन्यथा मी लवकरच शिक्षा देईन.’’ मग पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचनपीठावरून खाली उतरले आणि प्रवचन समाप्त केले. श्रोत्यांमधून काही लोकांनी विचारले, ‘‘कोणत्या लोकांविरूद्ध पैगंबरांनी भाषण दिले?’’ दुसऱ्या लोकांनी सांगितले, ‘‘पैगंबरांचा इशारा अशअर कबिल्याच्या लोकांकडे होता. या लोकांना ‘दीन’ची समज आहे, त्याच्या शेजारी नदीकाठी राहणारे ग्रामीण उजड्ड लोक आहेत.’’ जेव्हा या प्रवचनाची बातमी अशअरी लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ते पैगंबरांपाशी आले. ते म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आपण आपल्या प्रवचनात काही लोकांची प्रशंसा केली आणि आमच्यावर रागवलात. आमच्याकडून काय गुन्हा घडला?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांनी आपल्या शेजाऱ्यांना अवश्य शिक्षण द्यावे, त्यांना उपदेश द्यावा, चांगल्या गोष्टींचा सल्ला द्यावा आणि वाईट गोष्टींची मनाई करावी. अशाचप्रकारे लोकांनी आपल्या शेजाऱ्यांकडून ‘दीन’ शिकला पाहिजे, सल्ला व उपदेश मान्य करावा लागेल आणि आपल्यामध्ये धार्मिक समज निर्माण करायला हवी, अन्यथा त्या लोकांना लवकरच या जगात मी शिक्षा देईन.’’ तेव्हा अशअरीन यांनी म्हटले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही दुसऱ्यांमध्ये समज निर्माण करावी काय? (शिक्षण व प्रशिक्षणाचीदेखील आमचीच जबाबदारी आहे?)’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘होय, हीदेखील तुमचीच जबाबदारी आहे.’’ त्यानंतर ते लोक म्हणाले, ‘‘आम्हाला एका वर्षाची मुदत द्या.’’ पैगंबरांनी त्यांना एक वर्षाची मुदत दिली. या मुदतीत त्यांनी आपल्या शेजाऱ्यांमध्ये धार्मिक समज निर्माण करावी आणि आज्ञा सांगाव्यात. यानंतर पैगंबरांनी या आयतीचे पठण केले– ‘‘लुईनल्ल़जीना क़फरू मिम बनी इस्राईला.’’ (हदीस : तिबरानी)
   माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा बनीइस्राईल अल्लाहच्या अवज्ञेची कामे करू लागले तेव्हा त्यांच्या विद्वानांनी त्यांना रोखले, परंतु ते थांबले नाहीत तेव्हा (त्यांच्या विद्वानांनी त्यांच्यावर बहिष्कार घालण्याऐवजी) त्यांच्या सभा-संमेलनांमध्ये बसू लागले आणि त्यांच्याबरोबर खाऊ-पिऊ लागले. असे घडले तेव्हा अल्लाहने त्या सर्वांची हृदये एकसारखी केली आणि मग आदरणीय दाऊद (अ.) आणि मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या वाणीद्वारे अल्लाहने त्यांचा धिक्कार केला कारण त्यांनी अवज्ञेचा मार्ग अवलंबिला आणि त्यातच गुरफटत गेले.’’ अब्दुल्लाह इब्ने मसऊद (रजि.) जे या हदीसचे कथनकार आहेत, म्हणतात की पैगंबर मुहम्मद (स.) टेका लावून बसले होते, मग सरळ बसले आणि म्हणाले, ‘‘नाही, त्या अस्तित्वाची शपथ! ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहेत, तुम्ही निश्चितच लोकांना पुण्याईचा आदेश देत राहाल आणि वाईटपणापासून रोखत राहाल आणि अत्याचाऱ्याचा हात पकडाल आणि अत्याचाऱ्याला सत्यावर बाधित कराल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हा सर्वांची हृदयेदेखील एकसारखीच होतील आणि मग अल्लाह तुम्हाला आपल्या कृपा व उपदेशापासून दूर फेकून देईल, जसे बनीइस्राईलशी अल्लाहने केले होते.’’ (हदीस : बैहकी, मिश्कात)

(२५८) जेव्हा इब्राहीम (अ.) नी सांगितले, ‘‘माझा पालनकर्ता तो आहे ज्याच्या अखत्यारीत जीवन व मृत्यू आहे.’’ तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘‘जीवन व मृत्यू माझ्या अधिकारात आहे.’’ इब्राहीम (अ.) ने सांगितले, ‘‘असे होय, तर अल्लाह, सूर्य पूर्वेकडून उदयास आणतो, तू जरा त्याला पश्चिमेकडून उदयास आणून दाखव.’’ हे ऐकून तो सत्याचा इन्कार करणारा आश्चर्यचकित झाला,२९२ परंतु अल्लाह अत्याचाऱ्यांना सरळमार्ग दाखवीत नसतो.
(२५९) अथवा उदाहरण म्हणून त्या माणसाकडे पहा ज्याचे एका अशा वस्तीवरून जाणे झाले जी आपल्या छतांवर कोलमडून पालथी पडलेली होती.२९३ त्याने सांगितले, ‘‘ही वस्ती, जी नाश पावली आहे हिला अल्लाह कशाप्रकारे पुन्हा जीवन प्रदान करील?’’२९४ यावर अल्लाहने त्याचे प्राण काढून घेतले आणि तो शंभर वर्षांपर्यंत मृतावस्थेत पडून राहिला. नंतर अल्लाहने त्याला पुन्हा जीवन दिले आणि त्याला विचारले, ‘‘सांग तू किती काळ पडून राहिला आहेस?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘एक दिवस अथवा काही तास राहिलो असेन.’’ फर्माविले, ‘‘तुझ्यावर याच स्थितीत शंभर वर्षे व्यतीत झाली आहेत. आता जरा आपल्या अन्न आणि पाण्याकडे पाहा, त्यांच्यात जरादेखील फरक पडलेला नाही. दुसरीकडे आपल्या गाढवाकडेदेखील बघ, (की त्याच्या हाडांचा सापळादेखील जर्जर झाला आहे) आणि हे आम्ही यासाठी केले आहे की आम्ही तुला लोकांकरिता एक निशाणी बनवू इच्छितो.२९५ मग पाहा की हाडांच्या या सापळ्याला आम्ही कशाप्रकारे उत्थापित करून त्याच्यावर मांस व कातडी चढवितो.’’ अशा प्रकारे जेव्हा सत्य स्थिती त्याच्यासमोर पूर्णपणे प्रकट झाली तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला माहीत आहे की अल्लाह प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो.’’

292) परंतु आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या सुरवातीच्या वाक्यानेच हे स्पष्ट झाले होते की पालनकर्ता प्रभु अल्लाहशिवाय दुसरा असूच शकत नाही. तरीही नमरुदने उद्धटपणे त्याचे उत्तर दिले. दुसऱ्या वाःयानंतर मात्र त्याच्यासाठी आणखी काही धिटाईने बोलण्यासारखे राहिले नाही. तो स्वत: जाणत होता की सूर्य आणि चंद्र त्याच अल्लाहच्या आधीन आहेत ज्यास इब्राहीम (अ.) यांनी पालनकर्ता रब मान्य केले आहे. मग शेवटी नमरूदजवळ सांगण्यासाठी राहिलेच काय? अशाप्रकारे जे सत्य त्याच्यापुढे  स्पष्ट  होऊ  लागले  होते,  त्यास  मान्य  करणे  म्हणजे  आपल्या  बेलगाम  सत्तेपासून  हाथ धुण्यासारखे होते. यासाठी त्याच्या (नमरुद) मनातील "तागूत' तयार  नव्हता.  त्यामुळे  नमरुद   फक्त  आश्चर्यचकित  होऊन   राहिला.  गर्वाच्या  अंधारातून   बाहेर   पडून  नमरुद  सत्यवादीतेच्या प्रकाशात येऊ शकला नाही. नमरुदने त्याच्या या "तागूत'ऐवजी अल्लाहला आपला समर्थक आणि रक्षणकर्ता बनविले असते तर आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या वक्तव्‌याने (प्रचार) सरळमार्ग बनला असता.तलमुदचे वर्णन आहे की यानंतर त्या बादशाहाच्या आदेशाने आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांना कैद  करण्यात आले. दहा दिवसांपर्यत ते तुरुंगात राहिले. नंतर बादशाहाच्या दरबारी लोकांनी त्यांना जिवंत जाळण्याचा निर्णय घेतला. त्यांना आगीत झोकून देण्याची घटना घडली ज्याचे वर्णन कुरआनमधे 21:51; 29:16; 37:83 मध्ये उल्लेखित आहे.
293) ही एक अनावश्यक वार्ता आहे की तो मनुष्य कोण होता आणि ती वस्ती कोणती होती. मूळ उद्देशासाठी येथे उल्लेख झाला आहे. त्याचे कारण केवळ हेच दाखविणे आहे की ज्याने अल्लाहला आपला रक्षणकर्ता बनविले होते, त्यास अल्लाहने कशाप्रकारे प्रकाशमय केले. मनुष्य आणि स्थान निश्चितीसाठी आमच्याकडे काहीच साधन नाही व त्याचा काहीच फायदा नाही. परंतु नंतरच्या वर्णनाने हे स्पष्ट होते की ज्या सज्जनाचा इथे उल्लेख आला आहे, ते निश्चितच पैगंबर असतील.
294) या प्रश्नाचे हे उत्तर नाही की ते सद्‌गृहस्थ मरणोत्तर जीवनाला नाकारणारे होते. किंवा त्यांना परलोकविषयी शंका होती. त्यांना सत्याचा अनुभव हवा होता. सत्य त्यांना आपल्या डोùयाने पाहÿन ¿यावयाचे होते जसे पैगंबरांना दाखविले जात होते.
295) एक अशा माणसाचे जिवंत परत येणे ज्यास जगाने शंभर वर्षांपूर्वीच मृत समजले होते, त्यांना स्वत: आपल्या समकालीन लोकांत एक जिवंत निशाणी बनविण्यासाठी पुरेसे होते.

- दीपक त्रंबक गायकवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ भारतीयांबरोबरच  अस्पृश्य समाजाचे नेतृत्व करून त्यांना मानवी मूल्यांचे अधिकार मिळवून दिले. यामुळे त्याच्या या चळवळीत अस्पृश्य समाज वेळोवेळी संगती असला तरी महत्त्वाच्या वेळा मुस्लिमांनीच खंबीरपणे स्वत:च्या खांद्यावर घेऊन त्यांना मोलाची साथ दिल्याची डॉ. आंबेडकरांचा जीवन इतिहासच साक्ष देतो. कारण डॉ. आंबेडकरांची अस्पृश्यांच्या मानवी हक्कांच्या लढाईचा प्रारंभ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने झाला. पण या सत्राग्रहाच्या मंडपासाठी जागा द्यायला त्या वेळी महाडमध्ये एकही सद्गृहस्थ तयार नव्हता. या वेळी संपूर्ण सवर्ण समाजाच्या विरोधात उभे राहून स्वत:च्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता ‘फतेहखान पठाण’ या मुस्लिम व्यक्तीने जागी दिली. एवढेच नाही तर याच महाडमधील तमाम मुस्लिम समाजाने अस्पृश्यांवर सनातन्यांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करून त्याच्या अन्नात माती कालवल्यावर त्यांची आस्थापूर्वक स्वत:च्या घरात नेऊन सुश्रूषा केली व त्याच्या जेवणाची मानवतेच्या मायेने व्यवस्थाही केली. अशीच अस्मितेची, ममतेची, मायेची व मानवतेची महाडपासून सुरू केलेली साथ मुस्लिमांनी नाशिक काळाराम सत्याग्रहातही दिली. या सत्याग्रहाच्या वेळी मानवतेचा पुजारी आणि समता बंधुत्वाचे पायिक असणाऱ्या बाबासाहेबाच्या जीविताला सनातन्यांकडून कोणताही धोका पोहचू नये म्हणून नाशिकमधील झकेरिया मनियार या मुस्लिम सद्गृहस्थाने स्वत:च्या बंगल्यात सुरक्षितपणे राहण्यास जागा देऊन ठेवून घेतले. झकेरिया मनियार यांची ही कामगरिी म्हणजे महाडच्या फतेहखान यांच्यासारखीच फत्ते करणारी होती, यात शंकाच नाही.
मुस्लिम समाज बाबासाहेबांच्या संगती फक्त त्यांच्या सत्याग्रहापुरताच पाठीशी होता असे नाही तर तो बाबासाहेबांच्या सर्वच चळवळींत संगती होता, हे अनेक उदाहरणांरून स्पष्टपणे दिसून येते. जसे इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी अस्पृश्यांच्या न्याय्य मानवी हक्कांविषयीच्या मामल्यांना तीव्र विरोध केला. गांधींचा विरोध म्हणजे संपूर्ण काँग्रेसचा विरोध. माझा जीव गेला तरी मी अस्पृश्यांच्या मागण्या कदापि मान्य करणार नाही, अशी भूमिका गांधींची होती. पण हा विरोध करताना गांधी मुस्लिम, शीख यांच्या मागण्या मान्य करायला एका पायावर तयार होते आणि त्यांनी त्या मागण्या मान्यही केल्या होत्या. पण डॉ. आंबेडकरांच्या विरोधापुढे गांधींचे काही चालेना व आपला डॉ. आंबेडकरांसमोर पराजय होतोय असे लक्षात येताच गांधी एका रात्री हातात भगवद्गीता घेऊन बॅ. जीनांच्या बंगल्यावर गेले आणि गीतेवर हात ठेवून जीनांना म्हणाले की, ‘‘मी तुमच्या सर्वच मागण्या मंजूर करतो, हे गीतेवर हात ठेवून सांगतो. पण तुम्ही परिषदेत डॉ. आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करा.’’ महात्मा समजल्या जाणाऱ्या या माणसाची ही अमानवी चाल ओळखून बॅ. जीना त्यांना म्हणाले, ‘‘गांधी, आम्ही जसे अल्पसंख्याक असून आमचे अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी झगडतो आहे, तोच अधिकार डॉ. आंबेडकर त्यांच्या समाजासाठी वापरत आहेत व संघर्ष करत आहेत. एका अल्पसंख्याक गटाने दुसऱ्या अल्पसंख्याक गटाला विरोध करणे हे न्याय्य नसून अमानवीही आहे.’’ बॅ. जीनांचा हा काँग्रेसच्या मानवतेविरूद्ध आसणाऱ्या विचारांना व महात्म्याला विरोध होतात, तसाच त्यांचा विरोध म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या मानवी हक्कांच्या मागण्यांना मूक संमती होती, हे इतिहास संशोधकांनी व विचारवंतांनी लक्षात घेतले पाहिजे, असे मला वाटते.
मुस्लिम समाज डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी कधी पडद्यामागून तर कधी निधड्या छातीने समोर राहिल्यामुळेच त्यांच्या चळवळीला दुधारी बनली होती, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण घटना समितीत येण्यासाठी डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने कसून विरोध केला होता. हा विरोध इतका तीव्र होता की, काँग्रेसच्या सरदार पटेलांनी तर ‘डॉ. आंबेडकरांसाठी संसदेची दारेच काय पण खिडक्याही बंद केलेल्या आहेत,’ असे जाहीर केले होते. पण संसदेत जाण्याचा इरादा आंबेडकरांचा पक्का होता. डॉ. आंबेडकरांची घटना समितीत अत्यंत गरज आहे, सर्वप्रथम मुस्लिम लीगने ओळखले आणि त्यांना शे.का. फेडरेशनच्या तिकिटावर बंगाल प्रांतातून उभे करून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या मदतीने मुस्लिम लीगने निवडून दिले, पण डॉ. आंबेडकर निवडून येताच त्यांची ताकद ओळखून काँग्रेसने हा प्रांतच फाळणीत पाकिस्तानला न मागता सप्रेम भेट देऊन टाकला आणि डॉ. आंबेडकरांना घटना लिहिण्याची फारच हौस असेल तर त्यांनी पाकिस्तानची घटना लिहून पुरवावी, असे काँग्रेसने म्हटले. कारण बंगाल प्राप्त पाकिस्तानला दिल्यामुळे डॉ. आंबेडकरांचे एवढ्या कष्टाने निवडून आणलेले सदस्यत्वही पाकिस्तानचेच झालेले होते. पण पुढे एवढ्या तोलामोलाचा व विद्वत्तेचा माणूस काँग्रेसकडे नाही हे काँग्रेसच्याच लक्षात लवकर आले आणि त्यांनी डॉ. आंबेडकरांना घटना लिहिण्याची गळ घालून मुंबईतील जयकरांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या झालेल्या रिकाम्या जागेवर निवडून आणले.
मोठ्या कष्टाने पाठिंबा देऊन व मुस्लिम लीगच्या मदतीने डॉ. आंबेडकरांना घटना समितीत पाठवूनही त्याचा उपयोग न झाल्याने मुस्लिम नाराज झाले. पण जेव्हा डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसूदा तयार केल्यानंतर सर्वप्रथम त्या मसूद्याचा उदार अंत:करणाने स्वीकार करून संसदेत बसलेल्या संपूर्ण घटना समितीच्या सदस्यांसमोर ‘काझी सय्यद कमरुद्दीन’ या मुस्लिम सद्गृहस्थाने त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ असे जाहीर संबोधून काँग्रेसला घरचा आहेर दिला.
भारतातले मुस्लिम डॉ. आंबेडकरांच्या पाठीमागे फक्त राजकीय, सामाजिक चळवळींतच होते असे नाही तर ते त्यांच्या शैक्षणिक चळवळीतही बरोबर होते. कारण ज्या वेळी डॉ. आंबेडकरांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली तेव्हा त्यांच्या कार्यावर व धुरंधर नेतृत्वावर खूश होऊन मुंबईतील एक प्रसिद्ध शेठ असलेल्या व मानवी गुणांची जाण असलेल्या ‘हुसेनजी भाई’ या मुस्लिम सद्गृहस्थाने त्यांना त्या वेळी ५० हजार रुपये वर्गणी म्हणून मदत दिली. त्या वेळचे ५० हजार म्हणजे आजचे पाच कोटी हे वेगळे सांगायची गरज आहे, असे मला मुळीच वाटत नाही. एवढेच नाही तर औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाची जागाही डॉ. आंबेडकरांनी मुस्लिम निजामाकडूनच घेतली होती, पण या जमिनीचे रीतसर पैसे त्यांनी नंतर चुकते केले.
डॉ. आंबेडकरांनी सर्वच भारतीयांच्या उन्नतीसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल व देशासाठी केलेल्या अतुलनीय त्यागी देशभक्तीने प्रेरित होऊन देशात सर्वप्रथम १२ जानेवारी १९५३ ला हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी देऊन सन्मान केला. त्या वेळी हे उदारतेचे धोरण मुस्लिम विद्यापीठाला सुचले, पण बनारस हिंदू विद्यापीठाला सुचले नाही. तसेचज्या काँग्रेसने संविधानावर स्वातंत्र्यापासून देशाची सत्ता सांभाळली त्या काँग्रेसलाही या प्रज्ञासूर्य महामानवाला त्यांच्या काळात भारतरत्न द्यावे असे वाटले नाही. तर तो मानही व्ही. पी. सिंग यांनी मिळवून भारतीय सत्तेची लाज राखली, असेच सत्याने म्हणावे लागेल.
मुस्लिम समाजाच्या मानवी मूल्यांनी, जीवनाकडे ध्येयवादी दृष्टीने पाहण्याच्या वृत्तीने व त्यांच्यात असणाऱ्या धार्मिक संघशक्तीने डॉ. आंबेडकर भारावून जात असत. त्यांना मुस्लिमांच्या या गुणकर्तृत्वाचा नेहमीच अभिमान वाटत असे. म्हणून १९३५ ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपल्या समाजबांधवांना १५ मार्च १९२९ च्या ‘बहिष्कृत भारत’ मधून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळी काही अस्पृश्यांनी मुस्लिम धर्मात धर्मांतरही केले होते, पण १९५६ च्या धर्मांतरावेळी बौद्ध धम्माला जवळ केले. त्यांचा हा निर्णय सर्वच भारतीयांत आजही बंधुता पेरणारा आहे व पेरत आलेला असून पुढेही भविष्यात पेरत राहील, यात शंका नाही.

 -शाहजहान मगदुम
नुकतीच भिमा कोरेगाव येथे घडलेली दंगल ही अनेक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील विविध जातीधर्मांचे अनुसरण करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची व विचार करण्यास भाग पाडणारी ठरते. अनेक प्रसारमाध्यमांतील विश्लेषक आणि विचारवंतांनी ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे आरोप केले आहेत, कारण तसे पुरावेही सापडतात. म्हणूनच हे प्रकरण देशवासियांसाठी खरोखरच चिंतेची बाब ठरते. भिमा कोरेगावला एक विशिष्ट इतिहास आहे. तेथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाबद्दल दलित समाजात आदराचे स्थान आहे. दंगल भडकविण्याचे कारस्थान काही माथेफिरूंनी केले खरे, मात्र त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आणि त्याच्या प्रतिक्रिया सर्वांना जाणवल्या. इतकेच काय मुंबईलाही त्याची झळ पोहोचली. त्यावरून आपल्या राज्याचे पोलीस दल समाजमनाची नाडी ओळखण्यात कसे तोकडे पडले आहे, हे विदारकपणे समोर आले. गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती, त्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या जात होत्या, पोस्टर्स लागलेली होती तरी यावर्षी कोरेगावला लाखो लोक येणार आहेत याची कुणकुण पोलिसांना लागलेली नसावी, यापेक्षा दुर्दैव ते कोणते! अलिकडे निघालेले मराठा मोर्चे, त्यात होणारी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी, आधी खैरलांजी आणि आता नितीन आगे हत्या खटल्याच्या लागलेल्या निकालामुळे खदखदणारा असंतोषाला डिवचण्याचे काम ही दंगल भडकविणाऱ्यांनी केले. भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते आणि त्यांनी लोकांना शांततेने बंद पाळण्यासदेखील सांगितले होते. त्याचबरोबर बंद आटोपशीर घेऊन राज्य सरकारला त्यांनी जागृत करण्याचेही काम केले आहे. यानिमित्ताने अल्पसंख्याक ‘एक’ विरुद्ध बहुसंख्यातले ‘अनेक’ अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा एखादा समाज शिकला आणि काहींसा संघटित झाला म्हणजे तो संपूर्ण समाजाचे नेतृत्व करण्याइतका प्रबळ झाला असे होत नाही. याला जोड आर्थिक शक्तिमानतेची साथ मिळावी लागते, तेव्हाच शीर्षस्थ नेतृत्वासाठी हवे असलेले संख्याबळ लोकशाहीत जमा होत असते. महाराष्ट्रात मराठा प्रदीर्घ काळ सत्तेत आहेत, कारण त्यांची आर्थिक साम्राज्ये आहेत. यादव, करुणानिधी, जयललिता हीदेखील याचीच उदाहरणे. आंबेडकरी समाज आता शिकलाय, गटागटात का असेना संघटीत झालाय, पण त्याने आता एक आर्थिक ताकद म्हणून पुढे यायला हवे. त्यासाठी व्यापारउदीम-उद्योग आदी क्षेत्रांत या समाजाला जम बसवावा लागेल. आर्थिक साम्राज्यातून जात आणि धर्माच्या भेदापलीकडील कट्टर समर्थक मतदारांच्या बँका तयार होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. भीमा कोरेगाव येथील प्रकरणाने सबंध देशाचे लक्ष वेधले गेले. एका ऐतिहासिक लढाईच्या उत्सवाला हिंसक वळण लागले. त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. ही दंगल पूर्वनियोजित होती की उत्स्पूâर्त होती याची चर्चा सुरू आहे. ती होत राहील. त्यात कोण चुकले, कोण बरोबर याचीही चर्चा होत राहील. या चर्चेत राजकीय आरोप–प्रत्यारोप होत आहेत. त्यातून दिशाभूल अधिक होत आहे. असे दंगलरूपी आंदोलन दीर्घकालीन राजकारणाचा भाग असू शकते. पण समाज  म्हणून अशी आंदोलने दीर्घकालीन हिताची असू शकत नाहीत. हा सर्व प्रकार गरिबांना गरिबांच्या विरोधात भांडत ठेवण्याचा आहे. या दंगलीत दगड पेâकणारे अन् दगड सहन करणारे आर्थिकदृष्ट्या मागास समूहातील आहेत. अन् विशेष म्हणजे ते सामाजिकदृष्ट्याही बहुजन समाजाचे भाग आहेत. भीमा कोरेगावला आलेले लोक कोण होते? ते केवळ दलित नव्हते. ते गरिबी झटवूâ पाहणारे, संविधान माणणारे या देशाचे जागृत नागरिक होते. ते एका उत्सवाला आले होते. त्यांच्या एकत्र येण्याचे एक सूत्र आहे. त्या सूत्राला बाधा पोहचवण्याचे काम दीर्घकालीन ध्येयाच्या संकुचित राजकीय प्रवृतींनी केले आहे. कारण जाती नष्ट झाल्या पाहिजेत असे म्हणणारे जातीच्या संकुचित प्रवृतीला घाबरत नसतात. ते घाबरत असतात जातीच्या एकोप्याला! दंगलीने एकत्र येणाऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दीर्घकालीन नुकसान करणारी आहे. बहुजन जातीतील लोक एकमेकांविरुद्ध वापरले जात आहेत. हे गरीब बहुजन या दंगलीच्या कारनाम्यात कसे सहभागी होतात? तर यांच्या सामाजिक–शैक्षणिक परिस्थितीचा, आवाक्याचा अन विशेषत: अज्ञानाचा फायदा संकुचित विचारांच्या संघटना सतत घेत असतात. म्हणून यातले खरे नुकसान गरिबांचे आहे. म्हणून हा गरिबांना गरिबीचा लढा असाच लढत राहा यासाठी रचलेला डाव वाटतो. इतक्या भयावह दंगलीनंतर त्यामागच्या उद्देशांचे मास्टर माइंड कोण याचा शोध घ्यायला हवा. भिमा-कोरेगावच्या या प्रकरणाने येथील विविध जातीधर्माच्या लोकांना महत्त्वाचा धडा दिलेला आहे. तेव्हा यापुढे सर्वांनी समाजात, देशात सौहार्दाचे वातावरण कसे निर्माण होईल या दृष्टिकोनातून दंगलसदृश घटनांना अधिक बळ न देता शांतता कशी टिवूâन राहिली याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

जगाची निर्मिती झाल्यापासून हजारो प्रेषित आणि सुधारक येवून गेले. सर्वांनीच समाज सुधारणेचे कार्य केले. पण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याद्वारे जी क्रांती अल्पकाळात घडली त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी प्रस्तुत केलेला ‘इस्लाम’ हा धर्म जीवनाचे सर्वांग सुंदर मार्गदर्शन करणारी समता, बंधुता आणि एकता प्रदान करणारी समाज व्यवस्था देतो. तसेच अल्लाहाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी या धर्तीवर ईश ग्रंथाचे नियोजन केले. पवित्र कुरआन हा ईश ग्रंथाच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. हा पवित्र ग्रंथ कुरआन मुहम्मद (स.अ.) यांच्यावर अवतरीत झाला. जो मानव जातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो. या पवित्र कुरआनचे मार्गदर्शनच ‘इस्लाम’ची शक्ती आहे, जी मनुष्याला विचार आणि आचाराच्या उच्चतम शिखरावर विराजमान करते. शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखविते. कुरआनच्या शिकवणीने विचार, मन आणि बुध्दी यांना चालना मिळते, वैचारिक शक्ती प्राप्त होते, असत्याविरूध्द आणि रूढीवादाविरूध्द प्रत्यक्ष आवाज उठवते आणि प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी सादर केलेल्या इस्लामच्या शिकवणुकीचा माणूस स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मुल्यांना उराशी कवटाळतो. प्रेषित मुहम्मद (स.अ.) इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. एक विख्यात गणिततज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच. हार्टने जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या 100 (शंभर) व्यक्तीमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’  च्या नावाने प्रसिध्द केले आहे.  त्यात पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांना देण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला जातो. ‘इस्लाम’ म्हणजे शांति, नम्रता आणि अल्लाहच्या इच्छेपुढे शरणागती. अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी या जगात पाठविलेला हा धर्म आहे. इस्लामचा अर्थ लक्षात घेतला तर या धर्माने विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश या जगाला दिला आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि ‘हजयात्रा’ ही इस्लाम धर्माचे आधारस्तंभ आहेत.
    इस्लामचे पहिले मुलभूत तत्व - “कलमा-ए- तयब्बा” चा अर्थ आहे अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही व मुहम्मद (स.अ.) अल्लाहचे प्रेषित आहेत.
इस्लामचे दुसरे मूलभूत तत्व - ‘रिसालत’ म्हणजे प्रेषितत्व हे आहे. अल्लाह एकमेव एक आहे व ईशभक्तीच्या श्रध्देला एक संकृती, एक सभ्यता आणि एक जीवनपध्दतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यवहारीक मार्गदर्शन करीत असते. त्यांच्याचद्वारे आम्हांला कायदा प्राप्त होतो. या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून (तौहीद) एकेश्वर वादानंतर रिसालतवर ईमान आणते. इस्लामची समाजरचना या तत्वावर आधारलेली आहे. मूर्ती पुजा इस्लाममध्ये निषिध्द मानली जाते. इस्लाम सामाजिक वृत्तीच्या विकासाला जास्त महत्व देतो हे नमाज, रोजा, जकात, हज यासारख्या मूलभुत धार्मिक कार्याने समजते. इस्लाम माणसाची ईश्वर विषयक जी कर्तव्य आहेत त्यापेक्षा त्याची आपल्या बांधवांसंबंधी जी कर्तव्य आहेत त्याला अग्रक्रम देतो व जगात शांति प्रस्थापित करतो.
नमाज :- उदाहरणार्थ अजान झाली तर सर्व नमाजसाठी मशिदीत जातात. नमाज आदा करतांना मशिदीत गरीब, श्रीमंत, काळे-गोरे एकत्र जमा होतात, राव असो वा रंक असो, खांद्याला खांदा लावून, गुडघे टेकवून परमेश्वराची आराधना (इबादत) करतात. दुसऱ्याला कमी लेखण्याची, तुच्छ समजण्याची प्रवृत्ती इस्लाम धर्मात आढळत नाही. अहंकाराला मुळापासून नष्ट केले जाते. इस्लाम हा पहिला धर्म आहे कि ज्या धर्माने लोकशाही म्हणजे काय हे शिकविले. इस्लामची लोकशाही पाचवेळा दृष्य स्वरूप धारण करते.
    आम्ही सर्व भारतीय. भारतात हिंदू-मंदिरात परमेश्वर आळवतो, मुसलमान - मशीदीमध्ये संभाषण करतो, ख्रिस्त - चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख - गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो. पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून किंवा चर्चमधुन जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिस्त नाही, शीख नाही तो फक्त भारतीय आहे, माणुस आहे हे इस्लाम शिकवतो.  धर्म हा व्यक्ती आणि अल्लाहास जोडण्याचा प्रयत्न करतो हे प्रेषित मुहम्मद (स.अ.) ची शिकवण कुणीही विसरता कामा नये जी जगात शांती निर्माण करते.
    प्रेषित मुहम्मद (स.अ.) जगातले पहिले व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारीक संदेश दिला. केवळ 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन केला. जैद नावाच्या काळया  गुलामाला आपली आत्या बहिण देवून काळया गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या  घस्फोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देवून कोणताच माणूस अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत. सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी एक सिध्दांत आहे. समता, बंधुत्व निरंतर नांदावयास हवे. जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद समाजात कदापी शिरणार नाही अशी इस्लामची तत्वे आहेत जी माणसाच्या वैचारिक प्रगतीची द्योतक आहेत.
    इस्लामचे आगमन भारतात भक्तीमार्गाने इ.स. (629) मध्ये पैगंबराच्या हयातीत झाले. केरळमधील चेरामन पेरूमल मस्जिद भारतामधील पहिली मस्जिद. केरळातील चेरानंद साम्राज्याचा शेवटचा राजाला इस्लामची ओळख झाली आणि त्यांनी मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषित मुहम्मद (स.अ.) याच्या सान्निध्यात राहून त्यांना इस्लाम धर्म स्विकारला आणि स्वत:चे नांव ताजुद्दीन (रजि.) असे ठेवले. जेद्दातील राजाच्या बहीणीशी त्यांनी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाले. जीवनातील अंतिम काळात त्यांनी केरळमधील आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून इस्लाम धर्माचा प्रसार केला.
    इस्लाममधील एक महत्वपूर्ण असलेला स्तंभ जकात आहे. जकात इस्लाम धर्मात गोरगरिबांसाठी आहेत. प्रत्येकी मुस्लीम जो जकात देण्यास पात्र आहे त्यांने आपल्या कमाईच्या प्रतिशेकडा अडीच रूपये प्रमाणे जकात गोरगरिब, अनाथ विधवा अथवा गरजवंतांना द्यावी. गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदतीसाठी प्रेषितांनी जकातची योजना इस्लाममध्ये केली. ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता जकात आहे. दिव्य कुराणच्या सुरह-9:60 मध्ये नमूद केले गेले आहे, जगातील सर्व लोकांनी जर या तत्वावर अनुकरण केले तर भूकबळी, कुपोषण अशा खूपच समस्या दूर होतील.
    इस्लाममध्ये सावकारी निषिध्द आहे. कर्ज दिलेल्या पैशांवर व्याज घेणे निषिध्द (हराम) आहे. अल्लाहने (व्यापाराला वैध केला आहे आणि व्याजाला निषिध्द केले आहे) दिव्य कुरआन (सुरह 2: 275)
    व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ 10 वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. गरीब व गरजवंताना पैसे उधार मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येवू दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहतां आर्थिकदृष्टया इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रयाचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेवून फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजविली. या 1000 वर्षांत एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात. आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे.  व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे.
    भारतात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुख्य कारण गरिबी नसून चक्रवाढ व्याजाचा बोजा आहे. कारण शेतकरी पूर्वीही गरीब होते परंतु गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केली नाही. इस्लामचे हे धोरण स्विकारल्यास आज भारताच्या प्रगतीस पोषक ठरणार आहे. मानवी इतिहासात या नवीन समाजास उच्च स्थान प्राप्त होणार आहे. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्व प्राप्त होते. अर्थात मानवतेच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग याने मोकळा होतो.
    रोजा :- प्रेमाने व सहानुभूतीने वागा, कठोर होवू नका, दयाळू राहा. तुम्ही सदाचरणी बनावे, तुमच्यातील वाईटपणा तुमच्यापासून दूर व्हावा म्हणुन उपवास (रोजे) तुमच्यावर अनिवार्य केले आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, व्याभिचार करू नये, रक्तपात करू नये, एका व्यक्तीचे प्राण वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीचे प्राण वाचविणे आणि एका व्यक्तीची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, तसेच दिला शब्द पाळा, पाप टाळा, विश्वासघात करू नका ही इस्लामची शिकवण व तत्वप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. दारूमुळे मनुष्याचे जीवन यातनामय बनते. उपवास दारूबंदीस जालीम उपाय आहे. एके दिवशी सर्वांना ईश्वराच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे हे विसरू नका. वृध्दापकाळात आपल्या मातापित्याकडे लक्ष देण्यासंबंधी विसरू नका. तहानलेल्यांना पाणी देणे, आंधळयांना मदत करणे, रोजा ठेवा, ज्ञानार्जन करा, त्यामुळे काय निषिध्द आहे आणि काय नाही हे लक्षात येईल.
    हज :- जर ऐपत असेल तर मक्केची हज यात्रा करा. येथे जगातील लोक एकत्र येतात. जगभरातील मुस्लिम संस्कृतीची तोंडओळख होते.
-: मुस्लिमांचे स्त्रियांसाठी योगदान :-
    ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देवून टाकले. प्रसिध्द मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम.एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ 13 वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील 1400 वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही.
    जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापिका अ‍ॅनीमेरी स्किमेल म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असतां असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली. इस्लामच्या शिकवणीत अत्यंत संतुलन आहे तो प्रगतीचा एक मार्ग आहे.
: इस्लाम मुक्तीचा मार्ग :
    मानवी  समाजाला सर्वार्थाने सुखी होण्यासाठी दोन प्रकारच्या मुक्ती आवश्यक असते. एक म्हणजे आध्यात्मिक मुक्ती आणि दुसरी भौतिक मुक्ती. इस्लामच्या अभ्यासाने, शिकवणीने, आचरणाने आध्यात्मिक मुक्ती म्हणजे स्वचित्ताची शुध्दी करणे व विकार मुक्त होणे सहज शक्य आहे. नमाज, रोजा याचे उत्तम उपाय आहेत. भौतिक जगाचे प्रश्‍न व त्यातून उद्भवणारे राग, लोभ हे विकार यापासून तो दूर राहू शकतो. इस्लाम कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भांडण, युध्दापासून दूर राहण्याची शिकवण देतो. अध्यात्माचा खरा अर्थ राग, लोभादी विकारापासून मुक्ती मिळविणे हा आहे. भौतिक मुक्ती मिळवून देण्यासाठी इस्लामने महत्वाची भुमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार, प्रचार इस्लाम नेहमीच करत असतो. प्रचलित काळ भौतिक मुक्तीचा असल्याने दिशा ओळखून सर्व जाती-धर्मीय देशप्रेमींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भौतिक मुक्ती मिळावयास वेळ लागणार नाही.  (लेखिका : अध्यक्षा 11 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल)

प्रा. हाजी फातिमा मुजावर
पनवेल, 8691837086


***
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांची ‘इस्लाम  : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग’ या मोहिमेच्या अनुषंगाने शोधनचे उपसंपादक बशीर शेख यांनी मुलाखत घेतली. त्यांनी मोहिमेच्या अनुषंगाने विविध विषयांवर परखड मते व्यक्त केले. ते वाचकांच्या सेवेत सादर. - संपादक
***
प्रश्न : जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ चा मार्ग ही मोहिम राज्यभर राबवित आहे. याचा उद्देश्य काय?

- बिस्मील्लाह अर्रहमान निर्रहीम. होय बरोबर आहे. 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर ही मोहिम राबविण्याचा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे. जमाअते इस्लामी हिंद एक अशी संघटना आहे की, जी एका अशा भारताची कल्पना करते जिथे कोणी भिकारी नसावा, कोणी वेश्या नसावी, महिलांना, वृद्धांना आणि मुलांना त्यांचे अधिकार मिळावेत, सर्वांना समानतेने वागविण्यात यावे, सगळ्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात. त्यांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात. याशिवाय, सर्व देशवासियांचे अध्यात्मिक जीवन ही समृद्ध व्हावे. सर्व लोकांनी सुखाने रहावे. कोणावरही अत्याचार होऊ नयेत. महिलांविरूद्ध लैंगिक अत्याचार होणार नाहीत, कोणी कोणाची हत्या करणार नाही.
        जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, ज्या अल्लाहने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. एका आई-वडिलांपासून सर्वांना जन्माला घातलेले आहे, त्याचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय वरिल गोष्टी साध्य होणार नाहीत. शिवाय मरणोप्रांत जीवनही सफल होणार नाही. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र या मोहिमेद्वारे प्रयत्नशील आहे की, सर्वजण यशस्वी होऊन अंतिमतः जन्नतमध्ये जावेत.
        जमाअतच्या ध्येय धोरणानुसार नेहमीच चार वर्षाची योजना तयार असते. या मोहिमेची आखणी सुद्धा चार वर्षांपुर्वीच करण्यात आलेली होती. ही मोहिम कुठल्याही घटनेची प्रतिक्रिया नाही. आमचा दावा आहे की, इस्लाम मुळात शांती, प्रगती आणि मुक्ती साठीच आहे. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचविणे ही आम्ही आपली जबाबदारी समजतो. म्हणून ही मोहिम सुरू करण्यात आलेली आहे.

प्रश्न : अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे म्हणजे नेमके काय?
-  अल्लाह हे काही एखाद्या व्यक्तीचे नाव नाही. ती अशी शक्ती आहे जी संपूर्ण विश्वांची मालक आहे. ज्याला सर्व अधिकार प्राप्त आहेत. मानव ही त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. ज्यासाठीच या विश्वाच्या सर्व गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्वांचा मृत्यू त्याच्याच हातात आहे. तो अंतिम निवाड्याच्या दिवसाचा मालक आहे. त्या शक्तीला मुस्लिम अल्लाह म्हणतात. कोणी ईश्वर म्हणतात तर कोणी गॉड म्हणतात. त्याचे मार्गदर्शन सर्वांसाठी आहे. त्याने मानवकल्याणासाठी या पृथ्वीवर वेळोवेळी प्रेषित पाठविले. अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. होत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय जगात शांतता नांदणे शक्य नाही. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे म्हणजे अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे आहे. 
प्रश्न - देशाच्या सद्यःपरिस्थितीवर आपण काय भाष्य कराल?
- हे पहा ! आपल्या देशाने प्रगती केलेली आहे, यात काही वाद नाही. स्वातंत्र्यानंतर घोर गरिबी होती. लोक ठिगळ लावलेले कपडे घालत होते. शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. मात्र वेगाने प्रगती करीत देशात शाळा, महाविद्यालये आणि अनेक विद्यापीठे स्थापन झाली. त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात नव-नवीन अभ्यासक्रम सुरू झाले की, आज विद्यार्थ्यांना हवे त्या शाखेमध्ये इच्छेप्रमाणे शिक्षण घेता येते. शिवाय, बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम झालेले असून, रेल्वेचे जगातील सर्वात मोठे जाळे आपल्याकडे आहे. विमान प्रवासही सहज शक्य झालेला आहे. भुपृष्ठ मार्गही विस्तारलेले आहेत. ही सर्व प्रगती झालेली आहे. हे मान्य आहे. मात्र यासोबत विषमता ही वाढलेली आहे, याचाही इन्कार करता येणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की, कोणाला मोठ-मोठ्या इमारती मिळत आहेत तर कोणाला फुटपाथवर झोपावे लागत आहे. महिलांविरूद्ध हिंसेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या सुरक्षित नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अशक्य झालेले आहे. मोठ-मोठ्या शाळा, महाविद्यालये प्रत्येक गावात उभी आहेत. मात्र त्यांचे शैक्षणिक शुल्क इतके जास्त आहे की, गरीबांची मुले त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत.
मोठ्या प्रमाणात जातीयवाद वाढत आहे, जो समाजाच्या अनेक घटकांमध्ये  फूट पाडत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भारत महासत्ता होवू शकणार नाही. भारताला महासत्ता करावयाचे असेल तर विकासासोबत समता, न्याय, एकात्मता आणि अध्यात्मिकता या क्षेत्रातही प्रगती करावी लागेल. त्यासाठी जमात आपल्या परीने आपली भूमिका बजावत आहे.

प्रश्न : आपल्याला देशात कुठल्या प्रकारचा बदल अपेक्षित आहे?
-  सगळ्यांना समान अधिकार मिळावेत. आज दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार पूर्णतः मिळत नाहीत. शिक्षण आणि शासकीय नौकऱ्यांमध्ये या लोकांचे प्रमाण किती आहे? याचा विचार झाला पाहिजे. समाजाचा एक भाग दाबला जात असेल तर त्याला सर्वांगीण प्रगती म्हणता येणार नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी जेव्हा वाढत जाते तेव्हा वर्गसंघर्षाचा जन्म होतो. गरीब लोक श्रीमंतांवर हल्ले करायला सुरूवात करतात. आज जरी ते दबलेले असतील तरी उद्या ते उठून क्रांती करू शकतात. म्हणून सर्वांसाठी प्रगतीची दारे खुली असणे, सर्वांसाठी समान अधिकार उपलब्ध असणे म्हणजे खरी प्रगती होय. आम्हाला हेच बदल अपेक्षित आहेत. जमाअत या सर्वांसाठी प्रयत्नशील आहे.
प्रश्न - देशात कशा प्रकारची शांती आपल्याला अपेक्षित आहे?
- न्यायाच्या स्थापने शिवाय शांतीची स्थापना होऊ शकत नाही. मी स्वतःला गोरा आणि तुम्हाला काळा समजत असेन, स्वतःला उच्च जातीचा आणि तुम्हाला हलक्या जातीचा समजत असेन, स्वतःला श्रीमंत आणि तुम्ही गरीब आहात हे डोक्यात ठेऊन जर मी तुमच्याशी वर्तन करत असेन तर मी कधीही तुमच्याशी न्याय करू शकणार नाही. जमातचे असे मत आहे की, इस्लामी श्रद्धा ही समाजामध्ये समानता आणते. सबका मालिक एक, हम सब उसके बंदे, मग कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल, सगळे एकसमान आहेत. हे उद्देश्य साध्य करण्यासाठी इस्लामने पाच वेळेसची नमाज अनिवार्य केली, मस्जिदमध्ये सर्व खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात, प्रेषितांच्या काळात अरबी समाजामध्ये उच्च-नीचतेची भावना अतिशय प्रबळ होती. त्यांनी नमाजमध्ये सर्वांना एकत्र उभे करण्याची तरतूद करून ही विषमता मोडून काढली. आज मस्जिदीमध्ये कोट्याधीश जावो, मंत्री जाओ का गरीब भिकारी जाओ सर्व एका रांगेत उभे राहून नमाज अदा करतात. कोणी कोणाला मागे पुढे करू शकत नाहीत. ती समानता आजही जशीच्या तशी पाळली जाते. अशी समानता जेव्हा प्रत्येक समाजात येईल तेव्हा शांती येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. रंग, जात, धर्म हे वेगवेगळे असू शकतात मात्र माणूस म्हणून सर्व समान आहेत. हा विचार जोपर्यंत प्रबळ होणार नाही तोपर्यंत देशात शांती व प्रगती दोन्हीही साध्य होणार नाहीत. यासाठी ईश्वरावर श्रद्धा ठेवणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण सर्व ईश्वराचे बंदे असल्याची भावना प्रबळ होते.
        शांती आणि प्रगतीसाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्वांना हे मान्य करणे आवश्यक आहे की, आपण सर्व एका आई-वडिलांची लेकरे आहोत. इस्लामच्या मुलभूत शिकवणीपैकी ही एक शिकवण आहे. जगातील सर्व माणसे हे आमचे भाऊ-बहीण आहेत. मग ते ऑस्ट्रेलियाचे असोत की पंजाबचे. मलेशियाचे असोत की अमेरिकेचे. काळे असोत की गोरे असोत. श्रीमंत असोत का गरीब असोत. या प्रकारची उदात्त विचारसरणी जोपर्यंत आपल्या समाजामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत शांती स्थापित होणार नाही. जात, रंग, भाषा व प्रादेशिक अस्मिता कुरवाळत बसल्यास कधीच न्यायाची स्थापना होवू शकत नाही. आज 70 वर्षानंतरही आपल्या देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटक-तामिलनाडू जलवाद कायमच आहे. अरे ! आपण सर्व भारतवासी आहोत. देश सर्वांचा आहे, पाणी सर्वांचे आहे, मग हे भांडणं कशासाठी? आपण एकमेकांना एका-आई वडिलांची लेकरे समजत नसल्यामुळे हे सगळे विवाद एका देशाचे नागरिक असून सुद्धा वाढत आहेत. एक आई-वडिलाची लेकरे असल्याची मनापासून श्रद्धा असेल तर माणसाचे मन मोठे होते. परिणामी, देशच काय जगभरातील मानवजातीच्या कल्याणाचा विचार आपल्या मनात येतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हा विचार प्रबळ होणे, शांती स्थापण्याच्या दृष्टिकोणातून अत्यावश्यक असे आम्हाला वाटते.

प्रश्न - इस्लामला कशी प्रगती अपेक्षित आहे?
-  इस्लाम प्रगतीच्या अगोदर डिग्नीटी (सन्मान) चा विचार करतो. आता हेच पहा! प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वीच्या काळात महिलांना, गुलामांना कुठलेच अधिकार नव्हते. जेव्हा प्रेषितांनी स्त्री-पुरूष दोन्ही समान असल्याची घोषणा केली तेव्हा पुरूषांना धक्काच बसला. स्त्रिया मात्र आनंदी झाल्या. त्यांना इस्लामने वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क दिला. त्यांना शिक्षणाचा, व्यापार करण्याचा, लग्न  आपल्या पसंतीने करण्याचा, एवढेच नव्हे तर त्यांना युद्धातसुद्धा जाण्याचा अधिकार दिला. जेव्हा गुलामांना सुद्धा त्यांच्या मालकाएवढेच महत्व इस्लामने दिले तेव्हा गुलामांच्या मध्येही एका नव्या शक्तीचा संचार झाला. याच नव्या विचार सरणीतून हळूहळू  गुलामीच्या पद्धतीचेही उच्चाटन झाले. याला समानता आणि प्रगती म्हणतात.
प्रश्न - मुक्ती संबंधी इस्लामची संकल्पना काय आहे?
- अल्लाहने स्पष्ट सांगितले आहे की, मी जगातील सगळ्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या आहेत. एवढ्या माझ्या सुविधांचा उपयोग घेवूनही तुम्ही
भक्ती मात्र दुसऱ्यांची करणार? हे मी खपवून घेणार नाही. माझ्या अवाज्ञांची तुम्हाला मी शिक्षा देईन. यावर विश्वास ठेवणे प्रत्येकाला आवश्यक आहे. या जीवनामध्ये आपण जे काही करतो त्याचा आपल्याला एक दिवस हिशोब द्यावा लागणार आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. हे असेच उदाहरण आहे जसे,  एका देशाचा नागरिक असतांनासुद्धा जो कोणी त्या  देशाशी एकनिष्ठ न राहता दुसऱ्या देशासाठी हेरगिरी करतो. अशा देशद्रोह्याला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? त्याला मुक्ती कशी मिळेल? जो अल्लाहला सोडून दुसऱ्याची भक्ती करेल त्याला मुक्ती कशी मिळेल? त्याला नक्कीच शिक्षा मिळेल. मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे माणसाने त्याचीच भक्ती करावी, त्याचेच ऐकून रहावे ज्याने त्याला जन्माला घातले. ही तर झाली मुक्तीची व्यापक संकल्पना. व्यक्तिगत स्तरावरसुद्धा भुकेपासून मुक्ती, अपमानापासून मुक्ती, मानसिक तणावापासून मुक्ती मिळविणे सुद्धा यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. इस्लामी जीवन व्यवस्थेमध्ये मानवाच्या या सर्व दुःखापासून मुक्ती देण्याची शक्ती आहे. शेवटची मुक्ती ही नरकापासूनची मुक्ती होय. कुरआनने स्पष्ट म्हटलेले आहे, अल्लाहची आज्ञा मानणारे लोक नेहमीसाठी जन्नतमध्ये मुक्तपणे राहू शकतील. त्या ठिकाणी अनंतकालीन सर्व सुख, सुविधा त्यांंना मिळतील. आज जगात कितीही हुशारी केली तरी अंतिम निवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणूस ईश्वरासमोर अडकून पडेल. तिथे त्यांची हुशारी चालणार नाही.

प्रश्न : आपल्या देशाने भांडवल आणि समाजवादी व्यवस्था अंगीकारली आहे, यासंबंधी आपले मत काय?
- या व्यवस्थेचा एक दोष असा आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो तर गरीब अधिक गरीब. इस्लाम सर्वांना समान आर्थिक संधी देतो. प्रत्येकाची आर्थिक उन्नती होईल, यासाठीही उपाययोजना करतो. कारण समाजामध्ये सगळे समान नसतात. काही दिव्यांग, निराधार असतात. काही लोक काही कारणांमुळे अर्थाजन करू शकत नाहीत. अशा लोकांनाही सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद इस्लाम करतो. त्यासाठी तो श्रीमंतांना आपल्या कमाईतील एक विशिष्ट असा हिस्सा अशा लोकांसाठी दान करण्यासाठी प्रेरित करतो. श्रीमंताच्या बचतीवर किमान अडीच टक्के वर्षाला गरीबांसाठी दान करणे अनिवार्य केलेले आहे. गरीबांना जे काही दान दिले जाते ते अल्लाहला पोहोचते अशी इस्लामची भूमिका आहे. बंदा खुश तो खुदा खुश. माझ्या शेजाऱ्याच्या घरात खायला अन्न नाही आणि मी पुन्हा-पुन्हा हज आणि उमऱ्याला जाण्यासाठी लाखो रूपये खर्च करीत असेल तर माझी ही इबादत स्वीकार केली जाणार नाही.

प्रश्न - संसदेने तीन तलाक देणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना शिक्षा देण्याचा कायदा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यावर आपले काय मत आहे?
- हा प्रश्न फिकाह (इस्लामी न्यायशास्त्र) चा आहे. यासंबंधी सरकारने देशातील उलेमा व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विश्वासात घेतले पाहिजे, कारण ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, असे आमचे मत आहे.

प्रश्न - सध्या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण होत आहे. यासंबंधी आपण काय म्हणाल?
- मला तर वाटत नाही की आम्हा देशबांधवात दरी निर्माण झाली आहे. एवढे निश्चित आहे की, काही लोक दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण मोठ्या संख्येने देशबांधव सहिष्णु, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष आहेत. जे थोडे लोक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या संदर्भात मुस्लिमांची भूमिका कशी असावी, याबद्दल कुरआनमध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. जे तुमच्याशी वाईट वागतात तुम्ही त्यांच्याशी चांगले वागा आणि पहा जे तुमचे कट्टर शत्रु आहेत ते तुमचे जिवलग मित्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. या शिकवणीची मुस्लिमांनी आठवणीने अंमलबजावणी केली तर परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.

प्रश्न - अनेक मुस्लिमांना इस्लामच्या तरतुंदीची जाणीव आहे परंतु, ते आपल्या जीवनात त्यांची अमलबजावणी करीत नाहीत, त्यासंबंधी आपण काय म्हणाल?
- इस्लामच्या शिकवणीं योग्यरित्या न समजल्यामुळे त्यांच्या ज्ञान आणि वर्तनामध्ये तफावत दिसून येते. किती लोकांनी कुरआन समजून घेतलेले आहे? किती लोकांनी कुरआनचे भाषांतर वाचलेले आहे? किती लोकांनी कुरआनची व्याख्या (तफसीर) समजून घेतलेली आहे? किती लोक कुरआनच्या शिकवणीनुसार आपल्या मुलां-मुलींचे विवाह करीत आहेत? जोपर्यंत कुरआन आणि हदीसच्या शिकवणी मुस्लिम लोक आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तनामधील विरोधाभास संपणार नाही.
प्रश्न - शोधनच्या माध्यमाने आपण मुस्लिम तरूणांना काय संदेश द्याल?
- त्यांनी अल्लाहचे आभार मानायला हवेत की, अल्लाहने त्यांना मुस्लिम केले. भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्माला घातले. जी संवैधानिक व्यवस्था आपल्या देशात आहे, कदाचित ती जगात दुसरीकडे नसेल. इस्लामच्या शिकवणीच्या पायावर या व्यवस्थेचा लाभ उठवित मुस्लिम युवकांनी सर्वाधिक लक्ष आपल्या शिक्षणावर केंद्रित केले पाहिजे. तसेच देशात शिक्षणाच्या अनुरूप काम करण्याची संधीपण उपलब्ध आहे. तिचा लाभ उठविला पाहिजे. इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे. तसेच आपली सर्व ऊर्जा ही सकारात्मक पद्धतीने देशाच्या व स्वतःच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे, हाच माझा संदेश आहे.

बशीर शेख
उपसंपादक
9923715373

 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget