प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की ज्या कुणाकडे मुलगी असेल आणि त्याने तिला जीवंत गाडले नसेल (भ्रूणहत्या केली नसेल) तसेच तिला तुच्छ समजले नसेल आणि मुलाला तिच्यावर प्राधान्य दिले नसेल तर अल्लाह त्याला स्वर्गात दाखल करील. (ह. इब्ने अब्बास (र.)) ह. आयेशा (र.) म्हणतात, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, जो माणूस मुली असल्याकारणाने परीक्षेस सामोरे जात असेल आणि तरीही तिचा पिता आपल्या मुलीशी सद्व्यवहार करत असेल तर त्या मुली नरकापासून त्याचा बचाव करतील. (मुस्लिम)
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात की कोणत्याही समूहाचा भाचा त्याच समूहात गणला जाईल. (ह. अबू मूसा (र.), अबू दाऊद) ह. उमर (र.) म्हणतात की एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत आली आणि जाहीर केले की हे अल्लाहचे प्रेषित (स.), माझ्याकडून एक मोठा अपराध घडला आहे. मी कसा पाश्चात्ताप करू? प्रेषितांनी विचारले, तुमच्या आई आहेत का? (हयात) तो माणूस म्हणाला, ‘नाही’. प्रेषितांनी नंतर विचारले, तुमच्या मावशी आहेत? त्या माणसाने उत्तर दिले, ‘होय.’ प्रेषितांनी त्यास सांगितले, तिच्याशी (मावशीशी) सद्वर्तन करा. (तिर्मिजी) प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात की ज्याला आवडत असेल की अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांची त्याच्याशी जवळीक असावी, तर त्या माणसाने नेहमी सत्य बोलावे, लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला तर त्याने विश्वासघात करू नये. आणि शेजाऱ्यांशी सद्व्यवहाराचा पुरावा द्यावा. (ह. अब्दुर्रहमान बिन अबी कुराद, अल बैहकी)
ह. अबू हुरैरा म्हणतात की एका अनुयायीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना सांगितले की हे अल्लाहचे प्रेषित, अमुक महिलेला नमाज, रोजा आणि दान करण्यासाठी लोकांमध्ये बरीच प्रसिद्धी आहे. पण ती आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्यांना कष्ट पोहोचवते. प्रेषित (स.) म्हणाले, तिचे ठिकाण नरक आहे. त्या माणसाने सांगितले की, अमुक एक महिला जास्त असे काही नमाज अदा करत नाही, रोजेही जेमतेम, दानधर्म देखील फारसे करत नाही, पण ती आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत नाही. प्रेषित (स.) म्हणाले, तिचे ठिकाण स्वर्ग आहे. (बैहकी) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, कोण आहे जो माझ्याकडून ह्या गोष्टी शिकू इच्छितो आणि इतर अशा व्यक्तीला शिकवावे जो त्यानुसार आचरण करील? ह. अबू हुरैरा म्हणाले, हे अल्लाहचे प्रेषित, ती व्यक्ती मी आहे. प्रेषितांनी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, ज्या वस्तू अल्लाहने निषिद्ध केल्या आहेत, त्यांच्यापासून स्वतःला वाचवा. अल्लाहने तुमच्या भाग्यात जे लिहिले आहे त्याच्याशी राजी राहा. आपल्या शेजाऱ्यांशी सद्व्यवहार करा, तुम्ही श्रद्धावंत व्हाल. ज्या वस्तू तुम्ही स्वतःसाठी पसंत करता त्याच सर्व लोकांसाठी पसंत करा. तुम्ही मुस्लिम व्हाल. आणि जास्त हसत जाऊ नका. जास्त हसण्याने हृदयावर परिणाम होतो. (ह. अबू हुरैरा (र.), अहमद, तिर्मिजी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment