आजच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विशेष चर्चेचा विषय आहे. आपल्या भारत देशात स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो, परंतु एवढा मानसन्मान देऊन सुद्धा तिच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे.
आता आपण सक्षमीकरण म्हणजे काय ते बघू. कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीयसह सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्राप्त करून देणे, विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या प्रक्रियेला स्त्री सक्षमीकरण असे म्हणतात. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर या धरतीवर पुरुषांप्रमाणे स्त्री ही एक शक्ती आहे म्हणजेच मानवजातीचे अस्तित्वच स्त्रीपासून आहे असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थच या शक्तीचा विकास करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य,श्रद्धा, धर्म आणि उपासना संधीची समानता प्रदान करणे होय. महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे जेणेकरून त्यांना रोजगार शिक्षण आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील आणि त्यांना सामाजिक स्वातंत्र्य आणि प्रगती मिळेल.
स्त्री सक्षमीकरणात अनेक अडथळे आहेत. जसे स्त्रियांसोबत वाईट वर्तन करून त्यांचा छळ करणे आणि अत्याचार करून अनेक प्रकारे हिनत्त्वाची वागणूक स्त्री जातीला मिळत आहे. महिलांनी फक्त ’चुल वा मुल’ याकडेच लक्ष द्यावे असे अनेकांना वाटत असते. आपल्या देशात लैंगिक असमानता मोठ्या प्रमाणात आहे, जिथे महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या तसेच बाहेरच्या समाजाच्या वाईट वागणुकीचा त्रास होतो. आपल्या देशात जुन्या विचारसरणीच्या वातावरणात राहिल्यामुळे स्त्रिया स्वतःला पुरुषांपेक्षा कमी समजू लागतात आणि त्यांची सध्याची स्थिती बदलण्यात अपयशी ठरतात. भारतातील अनेक भागात महिलांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा भागात महिलांना शिक्षण अथवा नोकरीसाठी घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नाही. कामाच्या ठिकाणी शोषण आणि हिंसाचार अलीकडच्या काळात खूप वेगाने वाढत आहे. काही ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांना रोजनदारी कमी दिली जाते. समान वेळ समान काम करूनही स्त्रियांना कमी मोबदला दिला जातो.
एक दिवस भारतीय समाजातील महिलांनाही पुरुषांप्रमाणेच प्रत्येक संधीचा लाभ मिळेल या आशेने भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालय आणि भारत सरकारने खालील योजना राबविल्या आहेत. जसे ’बेटी बचाव बेटी पढाओ’, स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींचे शिक्षण लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. महिला हेल्पलाइन योजना म्हणजे या योजनेअंतर्गत 24 तास आपात्कालीन सहाय्यक सेवा पुरविली जाते. म्हणजे या योजनेअंतर्गत स्त्री विहित क्रमांकावर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची किंवा गुन्ह्याची तक्रार करू शकते. उज्वला योजना, महिला शक्ती केंद्र, पंचायती राज योजनांमध्ये महिलांसाठी आरक्षण इत्यादी संसदेने सुद्धा अनेक कायदे महिला सक्षमीकरणासाठी पारित केले आहे.
एवढ्या सर्व योजना असूनही पाणी कुठे मुरत आहे हे लक्षात का बरं येत नाही. या पुरुषप्रधान समाजात आजही स्त्री का बरं मागे आहे, तर ज्याप्रमाणे कुरआनने स्त्रियांना पुरुषांबरोबर अधिकार दिलेले आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांचे अधिकार जर मिळाले तर या समाजात स्त्रियांचा दर्जा वाढेल कुरआन सांगतो, स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे, परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांना आहे. (कुरआन 2: 228), ईमानवंत पुरुष व ईमानवंत महिला हे सर्व एकमेकांचे सहकारी आहेत. (कुरआन 9: 71) हे आहेत कुरआनचे आदेश आणि इस्लामने तर ज्ञानार्जनाचे सर्व मार्ग स्त्री व पुरुष दोघांसाठी उघडले आहे. या मार्गातील प्रत्येक अडसर दूर करून प्रत्येक प्रकारची सवलत व सरळ पद्धती स्त्रियांना उपलब्ध करून दिली. इस्लामने स्त्रीच्या शिक्षण वा प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. व्यवसाय आणि कार्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिच्याकरिता व्यापार, कृषी देवाण-घेवाण, उद्योग व निर्मिती, नोकरी, ज्ञानदान, पत्रकारिता व लेखन या सर्व कार्याची परवानगी आहे. या सर्व कार्यासाठी स्त्री घराबाहेर पडू शकते परंतु शरियतच्या चौकटीत राहून.
तर स्त्री सक्षमीकरणाची खरी संकल्पना ही आहे की स्त्रीला तिच्या पायावर उभे करने अत्यावश्यक आहे. तिला तिचे अधिकार मिळायला हवे. ज्याप्रमाणे इस्लामने स्त्री अधिकार दिले आहे ते सर्व अधिकार या देशातील स्त्रियांना मिळाले तर एका नवीन युगाची सुरुवात होणार आणि स्त्रिया देखील सक्षम होण्यापासून वंचित राहणार नाही आणि ती प्रगती पथावर चालेल. जमात-ए-इस्लामी-हिंदने याकडे आपले पाऊल उचलले आहे. या संघटनेमध्ये स्त्रियांना निरनिराळ्या प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. शून्य व्याजावर राहत बँकेकडून कर्जही दिले जातात. स्त्रियांमधील कला-कौशल्याबद्दल माहिती घेऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या कामात ट्रेनिंग दिली जाते. आवश्यकता भासल्यास शिलाई मशीन सुद्धा घेऊन देतात आणि स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे लोकांची विचारसरणी बदलत असली तरी या दिशेने अजून प्रयत्नांची गरज आहे.
- परवीन खान,
पुसद
Post a Comment