‘अबराहा’ हा इथियोपिया देशाचा कैसर कालीन गवर्नर होता. तो फार गर्विष्ठ आणि हेकेखोर होता. त्याने ‘येमेन’वर विजय मिळवला. येमेनवर विजयप्राप्तीनंतर त्याचा अहंकार अधिकच वाढला. अरबचे लोक दरवर्षी काबागृहाला जातात आणि हज्ज करतात. त्याची अशी इच्छा होती की, त्या लोकांनी सनाआमध्ये येऊन हज्ज करावे. त्यासाठी त्याने सनाआ या शहरामध्ये इ. स. ५७० मध्ये एक प्रार्थनगृह बांधले आणि अरबांना आवाहन केले की मक्केला जाऊन काबागृहाचे हज्ज करण्याऐवजी सनाआमध्ये येऊन या इमारतीत हज्ज करावे. एका धर्माविरुद्ध उचललेले हे टोकाचे पाऊल होते.
अरब लोक एकेश्वरवादी होते. शिवाय पवित्र काबागृह हे त्यांचा जीव की प्राण होता. त्यामुळे अरबांनी त्याचा कडाडून विरोध केला. ‘कनाना’ टोळीतील एक माणूस रागाच्या भरात येमेनला गेला. अबराहाने बांधलेल्या प्रार्थनागृहात शौचास बसला आणि त्याला अपवित्र केले. ही घटना ऐकल्यावर अबराहाला खूप राग आला. अपादमस्तक अहंकारात बुडालेला असल्याने त्याने संयम गमावला आणि पवित्र काबागृहाचा नाश करण्यासाठी हत्तींच्या सैन्यासह मक्केवर चढाई केली. त्याला आपल्या सैन्यावर खूप गर्व होता. माझ्या सैन्याचा कोणीच मुकाबला करू शकत नाही, या अविर्भावात तो वावरात असे. त्याच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर हत्तींचा समावेश होता.
त्याच्या सैन्याच्या पुढील पथकाने अब्दुल मुत्तलीबच्या दोनशे ते चारशे उंटांसह मक्केतील लोकांचे सर्व उंट आणि इतर गुरेढोरे हाकलून नेली. त्या काळी अब्दुल मुत्तलिब पवित्र काबागृहाची देखभाल करायचे.
या घटनेने अब्दुल मुत्तलिब यांना खूप दुःख झाले. ते अबराहाशी बोलायला त्याच्या सैन्यात गेले. जेव्हा अबराहाला कळले की, कुरैशचा सरदार त्याला भेटायला आला आहे, तेव्हा त्याने अब्दुल मुत्तलिबला आपल्या तंबूत बोलावले. अब्दुल मुत्तलिब अतिशय देखणा माणूस होता. त्याची ललाट प्रकाशमान होती. अबराहा, अब्दुल मुत्तलिब जवळ आला आणि विचारले, “सरदार! तुमचा इथे भेट देण्याचा उद्देश काय आहे?” अब्दुल मुत्तलिब यांनी उत्तर दिले की, “आमचे उंट आणि बकऱ्या इ. जे तुमच्या सैनिकांनी हाकलून इकडे आणले आहेत, तुम्ही ही सर्व गुरे आमच्या स्वाधीन करा.” हे ऐकून अबराहा म्हणाला, “हे सरदार! मला वाटले होते की तू खूप धाडसी आणि अद्भुत माणूस आहेस. पण तू मला, तुझ्या उंटांबद्दल विचारून माझ्या नजरेत तुझी प्रतिष्ठा कमी केलीस. उंट आणि शेळीचे वास्तव तरी काय आहे? तुझ्या काबागृहाची तोडफोड करून उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलो आहे. तू त्याबद्दल बोलला नाहीस.”
अब्दुल मुत्तलिब म्हणाले, “माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की पवित्र काबागृह हे माझे घर नाही, ते तर ईश्वराचे घर आहे. तो स्वतः त्याचे घर वाचवेल. मला माझे उंट हवे आहेत?” हे ऐकून अबराहा गर्वाने म्हणाला, “हे मक्केचे सरदार! ऐका! मी काबाची, वीट न् वीट पाडून टाकीन आणि त्याचे नाव आणि निशाण पृथ्वीवरून पुसून टाकीन. कारण मक्केच्या लोकांनी माझ्या प्रार्थनागृहाचा अपमान केला आहे, मी बदला घेण्यासाठी काबागहाचा नाश करीन. मला वाटते की हे करणे आवश्यक आहे.”
या संभाषणानंतर अबराहाने सर्व गुरेढोरे परत सोडण्याचे आदेश दिले. अब्दुल मुत्तलिब सर्व उंट आणि बकऱ्या बरोबर घेऊन त्यांच्या घरी गेले आणि मक्केच्या लोकांना म्हणाले, “तुमची संपत्ती, गुरेढोरे घ्या आणि मक्केतून निघून जा. डोंगराच्या माथ्यावर चढून, दरडींमध्ये लपून आश्रय घ्या.” नंतर ते स्वतः आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन काबागृहामध्ये गेले. दरवाजाची कडी धरली. अत्यंत पोटतिडकीने रडत रडत अल्लाह दरबारी प्रार्थना करू लागले. ‘हे अल्लाह! खरंच, प्रत्येक जण स्वतःच्या घराचे रक्षण करतो. म्हणून आपल्या घराचे रक्षण कर. आपल्या अनुयायांना मदत कर.’’
ही दुआ करून अब्दुल मुत्तलिब, आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन पर्वताच्या शिखरावर चढले आणि ईश्वराच्या सामर्थ्याचा गौरव करू लागले.
सकाळी जेव्हा अबराहा आपले सैन्य व हत्तींसह काबागृहावर आक्रमण करण्यासाठी निघाला आणि “मगमस” या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याचा ‘महमूद’ नामक हत्ती एकदम खाली बसला. कितीही प्रयत्न केले तरी हत्ती काबागृहाच्या दिशेने पुढे जात नव्हता. त्याला उलट दिशेला नेले तर चालायला लागायचा आणि काबागृहाकडे फिरविले की खाली बसायचा. त्याच स्थितीत ईश्वराचा क्रोध प्रकट झाला. लहान पक्ष्यांचे थवे आपल्या चोचीत आणि पंज्यांमध्ये तीन-तीन खडे घेऊन समुद्राच्या दिशेने पवित्र काबागृहाकडे येऊ लागले. त्यांना ‘अबाबिल’ म्हटले जाते. अबाबिलच्या या शूर सैन्याने अबराहाच्या सैन्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली की अबराहाचे सैन्य आणि त्याच्या हत्तींची दाणादाण उडाली.
वरून सोडलेला खडा सैन्य आणि हत्तीच्या शरीरातून पार होत होता. अबराहाच्या सैन्यातील एकही माणूस जिवंत राहिला नाही. अबराहा आणि त्याच्या हत्तींसह ते सर्व जण अशा प्रकारे मरून गेले की त्यांचे शरीर जमिनीवर विखुरले गेले. ‘सत्य आहे, पृथ्वी आणि आकाशांचे लष्कर अल्लाहच्याच अधिकारांत आहेत आणि तो जबरदस्त व बुद्धिमान आहे.’
पवित्र कुरआनच्या सूरह फीलमध्ये या घटनेचा उल्लेख आलेला आहे. तो असा आहे, “तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी काय केले? काय त्याने त्यांची युक्ती फोल ठरविली नाही? आणि त्यांच्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाठविले जे त्यांच्यावर खड्यांचा मारा करीत होते. मग त्यांची अशी दशा करून टाकली जसा (जनावरांनी) खाल्लेला भुसा. (चघळलेल्या पेंढ्यासारखे केले.)
जेव्हा अबराहा आणि त्याच्या सैन्याचा अंत झाला तेव्हा अब्दुल मुत्तलिब डोंगरावरून खाली आले आणि ईश्वराचे आभार मानले. त्यांच्या या प्रतिष्ठेची चर्चा दूरदूर पसरली. सगळीकडे त्यांचे कौतुक होऊ लागले. संपूर्ण अरब जगतात या घटनेला प्रसिद्धी मिळाली. सर्व अरब लोक त्यांचा अधिकच आदर-सन्मान करू लागले. ही घटना इतकी अद्भुत होती की अरब लोक या वर्षाला हत्तींचे वर्ष म्हणू लागले. या वर्षाला यामुळेही महत्त्व प्राप्त झाले की घटनेच्या पन्नास दिवसानंतर पवित्र प्रेषित मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला.
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment