आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी अल्लाहच्या आज्ञेनुसार मक्कावासीयांना ईश-संदेश पोहोचविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. हा संदेश समाजबांधवांनी मान्य करावा यासाठी अनेक वर्षे सातत्याने कठोर परिश्रम केले, पण बऱ्याच लोकांनी जोरदार विरोध केला आणि क्रूर अत्याचाराद्वारे हा संदेश रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही या परिस्थितीचा आदरणीय पैगंबर (स) यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही किंवा विरोधामुळे ते कधीही लोकांपासून दूर गेले नाही, कारण लोकांच्या मनात ईश-संदेशाबद्दल गैरसमजुतीमुळे शंका होती. एक वेळ अशीही आली जेव्हा मक्केतील बहुदेववाद्यांनी आदरणीय पैगंबर (स) यांच्यासमोर दोन मागण्या ठेवल्या. एक म्हणजे या कुरआन ऐवजी दुसरा कुरआन आणा आणि तसे करता येत नसेल तर किमान त्यात काही बदल तरी करा. जणू ते सांगू इच्छित होते की समाजसुधारणा करायचीच असेल तर सर्वांना मान्य होईल असा बदल तुमच्या संदेशात करा, तुमच्या एकेश्वरवादात आमच्या देवतांनाही काही जागा ठेवा, तुमच्या ईश-भक्तीच्या संदेशात आमच्या स्वार्थाचाही जरा विचार करा आणि मरणोत्तर जीवनावर असलेल्या श्रद्धेत असा काही बदल करा की आम्ही या जगात कितीही मनमानी केली, ईश-आदेशांविरुध्द कितीही द्रोह केला तरीही मरणोत्तर जीवनात आम्हाला मुक्ती जरूर मिळावी. एकेश्वरत्व, प्रेषितत्व व मरणोत्तर जीवन या महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने विचार न करता हे पाषाणहृदयी मक्कावासी हट्ट धरून बसले होते, म्हणून विश्व-निर्मात्याने आदरणीय पैगंबर (स) यांना आपली श्रद्धा स्पष्टपणे जाहीर करण्याचा आदेश दिला.
कुल् याअय्युहन्नासु इन् कुन्तुम फी शक्किम-मिन दीनी फला अअ्बुदुल्लजी-न तअ्बुदू-न मिन् दूनिल्लाहि वलाकिन् अअ्बुदुल्ला-हल्लजी य-त-वफ्फाकुम्, व उमिर्-तु अन् अकू-न मिनल्-मुिअ्मनी-न
अनुवाद :- हे पैगंबर! सांगून टाका की, लोकहो! जर अद्यापही माझ्या धर्मासंबंधी तुम्ही एखाद्या शंकेत असाल तर ऐकून घ्या की तुम्ही अल्लाहशिवाय ज्यांची भक्ती करता मी त्यांची भक्ती करीत नाही, मी तर केवळ त्याच ईश्वराची भक्ती करतो ज्याच्या अधिकारात तुमचा मृत्यू आहे. मला आज्ञा दिली गेली आहे की मी श्रद्धावंतांपैकी व्हावे. ( 10 यूनुस :104 )
म्हणजे लोकहो! श्रद्धेच्या बाबतीत माझी भूमिका शिथिल करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यासाठी जो दबाव तुम्ही टाकत आहात त्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला अजूनही माझ्या धर्माबद्दल शंका आहे, म्हणून जरा नीटपणे ऐकून घ्या, ज्या प्रकारे तुम्ही भक्तीसाठी निरनिराळी देवस्थाने निवडली आहेत व ज्या-ज्या शक्तींची आज्ञापालन करताना तुम्ही ईश्वराची अवज्ञा करत आहात, तसे मी करूच शकत नाही. निर्मितीमध्ये ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते, जिथे कुठे तुम्हाला एखादी शक्ती दिसते, त्याला तुम्ही दंडवत घालता, निर्मितीपैकी ज्याला तुम्ही सामर्थ्यवान समजता, त्याचे तुम्ही दास बनता, पण मी हे काम कधीच करू शकत नाही, कारण प्रत्येक शक्ती ही विश्व-निर्मात्याची निर्मिती आहे आणि या सर्व गोष्टी नश्वर आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन ते देव बनवण्यास अजिबात पात्र नाहीत. मी तर फक्त त्या अस्तित्वावर श्रध्दा ठेवतो ज्याच्या हातात तुमचा मृत्यू आहे. त्यानेच मला आदेश दिला आहे की त्याच्याशिवाय कुणासमोरही नतमस्तक होऊ नका. कुणाच्याही आज्ञापालनात आपल्या निर्मात्या ईश्वराची अवज्ञा करू नका. माझा मार्ग तुमच्या मार्गापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. एकमेव ईश्वर, अल्लाह त्यानेच तुम्हाला निर्माण केले आणि जेव्हा तो इच्छितो तुम्हाला मृत्यू देतो. त्याची पकड तुमच्यावर इतकी मजबुत आहे की तो क्षणभरात तुमचा आत्मा ताब्यात घेतो. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्याच्याकडेच जायचे आहे. मृत्यूनंतर तो तुम्हाला दूबार जिवंत करेल आणि स्वत: प्रत्येकाचा हिशोब घेईल. हीच श्रध्दा ठेवणाऱ्यांसोबत राहण्याचा मला आदेश देण्यात आला आहे.
किती उच्च स्तरीय भाषा आहे कुरआनची! ज्याच्या हाती ’माझा’ मृत्यू आहे असे म्हणण्याऐवजी ’तुमचा’ मृत्यू आहे असे म्हटले गेले आहे. एकाच शब्दात मुद्द्याचे बोलणे, त्याचा युक्तिवाद, पुरावा आणि संदेश आहे. जो माणूस स्वतः निर्मितीसमोर नतमस्तक होतो आणि इतरांनाही नतमस्तक होण्यास भाग पाडतो, जो स्वतः ईश-अवज्ञा करतो आणि दुसऱ्यांनाही अशा मार्गी लावतो, त्याला कल्पना नाही की तो किती मोठा अन्यायी व अत्याचारी आहे.
......... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment