भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या मुस्लिम वीरांची संक्षिप्त गाथा
ब्रिटीश छावण्यांमध्ये दहशत निर्माण करणारे मौलवी अहमदुल्ला शाह फिजाबादी यांचा जन्म १७८७ मध्ये सध्याच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील मौलवी मोहम्मद अली खान होते. मौलवी यांचे मूळ नाव सय्यद अहमद अली खान होते. त्यांच्या धार्मिक ज्ञानार्जनामुळे त्यांना मौलवी ही पदवी प्राप्त झाली. लोक त्यांना मौलवी मानत आणि आदर देत असत. त्यांनी इतर शैक्षणिक अभ्यासाबरोबरच मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले.
हैदराबादचे निजाम, नवाब यांच्या निमंत्रणावरून मौलवी अहमदुल्ला शाह इंग्लंड, इराक, इराण आणि मक्का व मदीना या देशांच्या दौऱ्यावर गेले. भारतात परतल्यानंतर मौलवी अहमदुल्ला सूफी विचारसरणीकडे आकर्षित झाले आणि 'कादरी' सिलसिलामधील सय्यद फुरखान अली शाह यांचे शिष्य बनले. लोकांमध्ये सूफी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी अहमदुल्ला शाह यांना त्यांच्या पीरने (गुरू) ग्वाल्हेरला पाठवले.
लोकांना सूफी तत्त्वज्ञानाचा प्रचार करतानाच शोषक परकीय राजवटीविरुद्ध बंड करण्याची प्रेरणाही ते देत होते. यामुळे इंग्रज अधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले. दरम्यान, १८५७ चे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. मौलवी अहमदुल्ला यांनी त्यात उडी घेतली आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध लढा दिला आणि त्यांच्यावर अनेक विजय नोंदवले.
सरदार हिखमतुल्ला (ईस्ट इंडिया कंपनीचे पूर्वीचे उपजिल्हाधिकारी), बेगम हजरत महल (अवधची राणी), खान बहादूर खान (रुहेलखंडचा शासक), फिरोजशहा, (मोगल राजपुत्र) यांनी इंग्रजांविरुद्ध लढलेल्या अनेक युद्धांमध्ये मौलवी अहमदुल्ला यांनी वैयक्तिकरित्या भाग घेतला होता.
ईस्ट इंडिया कंपनीने मौलवी अहमदुल्ला यांना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पोवेनचे राजे जगन्नाथ सिन्हा यांच्या लोभी भावाने सिन्हा यांना पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात आमंत्रित करण्यासाठी पोवेनला गेले असता मौलवीची गोळ्या झाडून हत्या केली. मौलवी अहमदुल्ला शाह फिजाबादी पोवेन येथे सिन्हा कुटुंबियांच्या शेजारी होते, त्या वेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नंतर सिन्हा यांच्या भावाने मौलवी अहमदुल्लाचा शिरच्छेद केला आणि त्यांचे डोके कापडाने झाकून शाहजहांपूर येथील जवळच्या ब्रिटिश पोलिस ठाण्यात नेले. अशा प्रकारे मौलवी अहमदुल्ला शाह फैजाबाद १५ जून १८५८ रोजी हुतात्मा झाले.
सर्वांत भयंकर देशद्रोह करणाऱ्या 'द बीस्ट ऑफ पोवेन'ला इंग्रजांकडून बक्षीस मिळालं. मौलवी अहमददुल्ला शाह फिजाबादी यांच्या मृत्यूची बातमी ऐकून इंग्रज सेनापतींना प्रचंड आनंद झाला. त्यांना वाटले की ते 'उत्तर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या अत्यंत शक्तिशाली शत्रूचा' खात्मा करू शकतात.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment