Halloween Costume ideas 2015

सज्जनांचे मौन हे देशासाठी सर्वाधिक घातक : डॉ. रफिक पारनेरकर


लातूर (प्रतिनिधी)

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता देशात टिकून राहण्यासाठी सज्जनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जर सज्जन पुढाकार घेत नसतील तर हे देशासाठी सर्वाधिक घातक असल्याचे मत सद्भावना मंच महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. रफिक पारनेरकर यांनी येथे व्यक्त केले. 

लातूर येथील जमाअते इस्लामी हिंद कार्यालयात शुक्रवारी लातूर शहरातील सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पारनेरकर बोलत होते. मंचावर प्रा सुभाष भिगे, प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा विजयकुमार शिंदे, रामराजे अत्राम, डॉ. अशोक नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. रफिक पारनेकर म्हणाले, आपल्या देशाचे वैशिष्ट्ये अनेकतेत एकता आहे. हे वैशिष्ट्ये जगातील एकमेव आहे. परस्पर प्रेम व सदभावना आणखीन वृद्धींगत 

करण्याच्या उदात्त हेतुने सर्वधर्मीय बांधवासह सद्भावना मंच लातूरची स्थापना करण्यात येत आहे. कुरआनमध्ये ईश्वराने समस्त मानवजातीला उद्देशून म्हटले आहे, ‘हे लोकहो ! आम्ही तुम्हाला एकच पुरूष आणि एकाच स्त्री पासुन निर्माण केलेले आहे. मग तुमच्या बिरादऱ्या व कबिले बनवीले.’ अर्थात समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे. ही पवित्र कुरआनची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्रातील महान संत तुकाराम महाराज म्हणतात की,’अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न-भिन्न.  आधुनिक विज्ञानाची सुद्धा हीच भूमिका आहे. 

समस्त मानवजातीत रक्ताचे नाते असल्याचे विज्ञानानेही सिध्द केले आहे. म्हणूनच तर आपण रक्तदान, नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रांन्सप्लांट इ. अवयांचे प्रत्यारोपण करतो व ते कोणालाही जीवदान देते. अर्थात समाजात जो भेदाभेद दिसतो ते थोतांड आहे. म्हणूनच संत तुकोबारायांनी सांगितले, भेदाभेद भ्रम अमंगल. आपल्या देशाला सद्भावनेचा महान वारसा लाभला असल्याचे डॉ. रफिक पारनेकर म्हणाले. यावेळी डॉ. सुभाष भिंगे म्हणाले, सद्भावना मंचची स्थापना ही गरजेची आहे. जमाअते इस्लामी हिंद ने उचलले हे पाऊल वाखाण्या जोगे आहे. हर्षवर्धन कोल्हापुरे म्हणाले, आजची देशातील परिस्थिती पाहता सद्भावनेसाठी पुढे येणे जिकरीचे बनले आहे. समाजातील संवेदनशील आणि एकतेला प्रोत्साहन देणाऱ्यांनी या मंचमध्ये सामील होणे आणि देशातील अखंडता कायम ठेवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. रामराजे अत्राम, विजयकुमार शिंदे यांनीही राज्यभरात सद्भावना मंचची उभारणी होण्यासाठी आमचे सहकार्य असल्याचे सांगितले. 

यावेळी प्रा. घार, नरसिंग घोडके, प्रा. नरसिंगे, श्रीहरी कांबळे, रणजित जाधव, फादर सुभान रकटे सतिश यादव, उस्मान गुरूजी, सौदागर आदींसह शैक्षणिक, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक जमाअते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष आरीफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन अ.रहेमान सय्यद यांनी केले. आभार एम.आय.शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जमात इस्लामी हिंद लातुर शहरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget