Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग १०)

उमेदीची फलश्रुती आणि कृतघ्नतेचे परिणाम


निसर्गातील देणग्यांमध्ये अन्न ही फार मोठी देणगी आहे. माणूस राब राब राबतो तो पोटाची खळगी भरण्यासाठी. यासाठीच माणूस शेती-बाडी करण्यात आणि त्यामध्ये वेगवेगळे संशोधन करण्यात पटाईत आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. तरीही आपण पाहतो काही सधन शेतकरी सोडले तर बाकीच्या शेतकऱ्यांची अवस्था हवी तेवढी सक्षम दिसत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यांमध्ये आपल्या निसर्गकर्त्याकडून योग्य उमेद न बाळगणे, ईशकृतघ्नता, अहंकार हीदेखील कारणे आहेत.

शेतीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण देशाचे पोट अवलंबून असते. परंतु शेतकऱ्यांना या गोष्टीची खात्री देता येत नाही की शेतात पेरलेले बी उगवेल की नाही, उगवलेले पीक वाढेल की नाही, वाढलेले पीक बहरेल की नाही किंवा बहरलेले शेत कापणीपर्यंत टिकेल की नाही. शेतकरी फक्त एक उमेद राखू शकतो, पिकाला कापणीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या निसर्गकर्त्याचीच आहे. बहरलेल्या पिकांचा अहंकार बाळगला आणि आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्नता दर्शविली तर त्याचे परिणाम आपण ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या स्वरूपात पाहत असतो.

याबाबतीत एक सत्य प्रसंग कुरआनमध्ये अभ्यासायला मिळतो. अध्याय अल्-कहफ च्या आयत क्रमांक ३२ मध्ये आहे,

"हे‌ पैगंबर (स.), त्यांच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करा. दोन व्यक्ती होत्या, त्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षाच्या दोन बागा दिल्या आणि त्यांच्याभोवती खजुरीच्या झाडांची कुंपणे लावली आणि त्यांच्या दरम्यान शेतजमीन ठेवली."

भाष्यकारांनी याचे वर्णन करताना सांगितले आहे की त्या व्यक्तीला ज्या द्राक्षाच्या बागा दिल्या होत्या त्या दोन्ही बागा दरवर्षी फळांनी भरभरून जायच्या आणि या दोन बागांच्या मध्ये एक कालवा होता जेणेकरून हवा तितका पाणीपुरवठा होत रहावा. या सर्व गोष्टींचा त्या बागायतदाराला घमंड होता. तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन आपल्या संपत्तीबद्दल बढाई मारू लागला. त्याला चिडवत तो म्हणाला, "माझी संपत्ती तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि माझ्याकडे नोकर व प्राणीही भरपूर आहेत. मला वाटत नाही की ही बाग कधीही नष्ट होईल."

दुसरी व्यक्ती श्रद्धावंत होती, त्या घमंडी व्यक्तीचे हे बोलणे ऐकून ती त्याच्या कृतघ्नतेवर आक्षेप घेत निसर्गकर्त्याच्या शक्तीबद्दल आणि त्याच्यासोबत कृतघ्नतेच्या परिणामांबद्दल सतर्क करायची. पण ती व्यक्ती कृतघ्नतेच्या इतक्या खालच्या पातळीवर पोहचली होती की ती निसर्गकर्त्याच्या अस्तित्वाला विसरून गेली होती. शेवटी त्याचा परिणाम असा झाला की, तीची फळे आणि माल आपत्तीने नष्ट झाला.

या प्रसंगातून आपल्याला एवढा बोध तर नक्कीच व्हायला पाहिजे की आपल्या पोटाची जबाबदारी निसर्गकर्त्याची आहे. आपल्याला त्याच्याशी कृतज्ञ राहून प्रत्येक गोष्टीवर त्याचेच सामर्थ्य असल्याची श्रद्धा ठेवावी लागेल. मग ती गोष्ट शेती करणे असो वा दुसरी कोणतीही गोष्ट.

(क्रमशः)


- हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget