Halloween Costume ideas 2015

रहस्य : रमजानच्या महिन्याचे


इस्लामी दिनदर्शिकेच्या नवव्या महिन्याला रमजानुल मुबारक म्हणजे बरकतचा महिना म्हणतात. बरकत या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, म्हणजे भरभराट, समृध्दी, सुपीकता, सुपरिणाम, कोणत्याही कामात व व्यवहारात कल्पनेपेक्षा अधिक प्राप्ती किंवा फायदा इत्यादी. या सर्व अर्थांनी रमजानचा महिना मोठ्या बरकतीचा महिना आहे कारण या महिन्यात अल्लाहच्या बरसणाऱ्या कृपांना मर्यादा नाही. सदाचरणाचे शुभ परिणाम, अनेक पटीने मिळणारे पुण्य, बक्षिसांचा वर्षाव, क्षमायाचना व प्रायश्चित्तावर मिळणारी माफी, अशा अनेक उपलब्धींमुळे हा महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यातील प्रत्येक क्षण खजिन्याप्रमाणे आहे. या पवित्र महिन्यात कोणकोणते यश दडलेले आहेत हे लोकांना कळले असते तर त्यांनी इच्छा केली असती की संपूर्ण वर्ष या महिन्याप्रमाणेच जावे. 

प्रश्न पडतो की रमजानमध्ये प्राप्त होणाऱ्या या सर्व कृपा कशामुळे आहेत? याबाबतीत पवित्र कुरआन आपल्याला सांगतो की, शह्-रु रमजानल्लजी उन्जि-ल फीहिल्-कुरआनु हुदल्-लिन्नासि व बय्यिनातिम्-मिनल-हुदा वल्-फुरकानि

अनुवाद :- रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले, मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी (2 अल्-बकरह-185)

रमजानची शुभकारिता आणि त्यातील सर्व कृपांचे एकमेव कारण म्हणजे अल्लाहने या महिन्यात पवित्र कुरआन अवतरित केले. या आयतीमध्ये कुरआनच्या तीन विशेष गुणांचे वर्णन करण्यात आले आहे.

मानवजातीसाठी मार्गदर्शन :

कुरआनचे एक वैशिष्ट्य ’अल-हुदा’ म्हणजे मार्गदर्शन आहे. हा शब्द ज्या अनेक अर्थांनी वापरला जातो, कुरआन त्या सर्व अर्थांनी मार्गदर्शक ग्रंथ आहे.

हा ग्रंथ शिष्टाचार शिकवतो. उपासनेच्या पद्धती समजावून सांगतो. कौटुंबिक व सामाजिक जीवनात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करतो. या ग्रंथात अर्थशास्त्र व राजकारणाची तत्त्वे आहेत. स्वतंत्र, निर्भीड व निष्पक्ष न्याय व्यवस्था स्थापन करून कायम ठेवण्याची तत्वे आहेत. उत्तम जीवन जगण्यासाठी मोलाचे उपदेश आहेत. याबरोबर विविध समुदायांंच्या प्रगतीचा व विनाशाचा इतिहास आहे. त्या ऐतिहासिक कारणांची आणि परिणामांची चर्चा आहे. थोडक्यात, हा ग्रंथ प्रत्येक समस्येचे निराकरण करतो व प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करतो आणि हेच योग्य आहे व त्यामध्ये कोणतीही चूक असणे शक्यच नाही, ही खात्रीही देतो

 स्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट मार्गदर्शन : 

हा ग्रंथ केवळ मार्गदर्शनच करत नाही तर अनेक अशी तथ्ये मानवजातीसमोर मांडतो ज्यांना स्पष्टीकरणाची गरज नाही. हा ग्रंथ मानवजातीला जी दिशा देऊ इच्छितो आणि जी जीवनपद्धत स्वीकारण्याची आज्ञा देतो, त्यावर निरुत्तर करणारे जोरदार युक्तिवादही करतो, जे तर्कशुद्ध आणि नैसर्गिक आहेत. ज्यांमध्ये माणसाच्या आंतरिक आणि बाह्य जगातील संकेतांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मानवी अस्तित्वात आणि संपूर्ण विश्वात पसरलेल्या चिन्हांद्वारे विश्व-निर्मात्याचे एकेश्वरत्व आणि माणसांचे मरणोत्तर जीवन सिध्द करताना कुरआन जेव्हा हे आवाहन करतो की अल्लाहने आपल्या पैगंबरावर जे मार्गदर्शन अवतरित केले आहे ते स्वीकारा, त्यामध्ये तुमच्या सांसारिक आणि मरणोत्तर जीवनाचे कल्याण आहे, तेव्हा तो फक्त युक्तिवादच करत नाही तर ऐतिहासिक पुरावेही देतो. या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो एक-एक व्यक्ती, समाजाचे चित्रण करतो. ईश-मार्गदर्शन स्वीकारून यशस्वी ठरलेल्या व्यक्तींचा, समुदायांचा इतिहास सांगतो. याबरोबर ज्या-ज्या व्यक्ती, समूह व राष्ट्रांनी ईश-मार्गदर्शन नाकारले त्यांचा विनाश कसा झाला याचाही उल्लेख करतो. या संदर्भात स्पष्ट पुरावे म्हणून हा ग्रंथ महत्त्वाच्या पैगंबरांचे जीवन-चरित्र समोर ठेवतो. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहचवला आणि वाईट शक्तींशी संघर्ष करून ते जगले. कधी वाऱ्याची दिशा बदलण्यात ते यशस्वी ठरले, तर कधी त्यांनी या कामी येऊन, आपल्या श्रद्धा, विश्वास व भुमिकेवर अटळ राहून ’ईश्वरीय मार्गदर्शनाचा दीप’ प्रज्वलित केला, ज्यामुळे पुढच्या पिढीचा मार्ग प्रकाशमय झाला.

आदरणीय पैगंबर मूसा (त्यांच्यावर शांती असो) यांचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता. फिरऔन या क्रूर राजाने आदरणीय पैगंबरांच्या समाजबांधवांना गुलामगिरीत जखडून ठेवले होते. जे अत्यंत दयनीय, असहाय व लाचारीचे जीवन जगत होते. अशा परिस्थितीत कोणतेही पाठबळ नसताना केवळ ईश्वराच्या भरवशावर आदरणीय पैगंबर (स.अ.) यांनी मोठ्या हिंमतीने राजासमोर ईशसंदेश ठेवला आणि त्याला सत्यमार्गी लागण्याचे आवाहन केले. याबरोबर त्यांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध दृढतेने संघर्ष केले. परिणामी सत्यतेच्या जोरावर व आपल्या निर्मात्या ईश्वराच्या पाठिंब्याने त्यांनी क्रांती घडवली. प्रचंड शक्ती व सामर्थ्य असूनही फिरऔन स्वतःही बुडाला आणि त्याचे साम्राज्यही नष्ट झाले. याचे कारण काय होते? विश्व-निर्मात्याविरुध्द फिरऔनची बंडखोरी, कृतघ्नता व प्रजेवर त्याने केलेले क्रूर अत्याचार व घोर अन्याय होत. दुसरीकडे ईश्वराप्रती निष्ठा व प्रेम होते. मानवजातीची चिंता आणि अन्याय व अत्याचारातून त्यांच्या सुटकेसाठी संघर्ष होता.

कुरआनमध्ये आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांच्याशिवाय इतर अनेक पैगंबर, त्यांचे सहकारी व इतर काही श्रध्दावंतांचा उल्लेख आहे. ज्यांचे चरित्र सद्गुणांनी भरलेले आहे. सर्व पैगंबरांनी धर्म-मार्गात आपल्या भूमिकेवर ठाम राहून आपली निष्ठा सिध्द केली. ईश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे एकाग्रतेने पालन केले. ईश्वराच्या मर्जीसमोर नतमस्तक होताना त्यासाठी आपले सर्वस्व त्यागण्याची तयारी ठेवणाऱ्या पैगंबरांच्या विलक्षण कथा या ग्रंथात आहेत ज्यांना कुरआनने आदर्श व स्पष्ट पुरावे म्हणून मानवजातीसमोर ठेवले. लोक पैगंबरांच्या जीवनातील सत्य घटनांना भाकडकथा समजतात. असे तथाकथित विचारवंत स्वतःला   -(पान 16 वर)

कितीही पुरोगामी समजत असले तरीही त्यांचे ज्ञान त्या अजाण बालकासारखे आहे जो आपल्या गैरसमजुतीला सत्य समजतो आणि ते इतरांनीही मान्य करावे असा हट्ट धरतो. अशा लोकांना आवाहन करावेसे वाटते की जरा नीट आणि समजून कुरआन वाचा म्हणजे तथ्य काय ते कळेल.

सत्य-असत्याची कसोटी :

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य ’अल-फुरकान’ म्हणजे सत्य आणि असत्याची कसोटी आहे. हा ग्रंथ सत्य आणि असत्य यामधील फरक स्पष्टपणे दाखवतो. चुक की बरोबर, योग्य की अयोग्य हेही स्पष्टपणे मांडतो. यश आणि अपयशाची स्पष्ट व्याख्या करतो. सत्यमार्गात यशस्वी ठरलेल्या महान व्यक्तींबरोबर अपयशी ठरलेल्या अधर्मी व सत्याविरोधी लोकांचाही उल्लेख करतो, हा ग्रंथ स्वर्गातील कृपा आणि नरकातील यातनांचे दृश्य डोळ्यांसमोर आणतो, स्वर्गास पात्र ठरणाऱ्या आणि नरकात पोहोचणाऱ्या लोकांची मनोवृत्ती दाखवतो. या ग्रंथात ईश-कृपा आणि ईश-प्रकोपाचा उल्लेख आहे. ईश्वरावर विश्वास नसल्यास बनणारी सैतानी वृत्ती आणि श्रध्दा व आज्ञापालनातून विकसित होणारे व्यक्तिमत्त्व यातील फरक हा ग्रंथ दाखवतो. अध्याय अल-फुरकान आणि अल-मुअमिनून याची स्पष्ट उदाहरणे आहेत.

पवित्र कुरआनचा प्रत्येक शब्द स्पष्ट व निर्णायक आहे. त्यामध्ये जे काही सांगितले गेले ते खरे असल्याबद्दल, आकलन व आचरण करण्यास सोपे असल्याबद्दल कोणतीच शंका नाही. अल्लाहने हा ग्रंथ जसा अवतरित केला तसाच आजही सुरक्षित आहे व पुढेही राहणार. खुद्द अल्लाहने हा ग्रंथ सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे मागील ग्रंथांप्रमाणे त्यात कुणीही, कोणतीही भेसळ करणे शक्यच नाही. कुरआनने जीवनाविषयी दिलेला दृष्टिकोनही स्पष्ट आहे आणि दाखवलेली दिशाही अगदी स्पष्ट आहे, कारण पवित्र कुरआन हा दिव्य प्रकाश आहे. इतकेच नव्हे तर दीपस्तंभ आहे. जो अंधारात भरकटलेल्या आणि वादळांनी वेढलेल्या मानवजातीच्या जहाजाला सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहचवू इच्छितो, पण त्यापासून लाभ घेण्याऐवजी माणसाला आपल्या कमकुवत दृष्टीने किनारा गाठायची हौस आहे. त्याला ’प्रयोग’ करण्याचा खुळा नाद जडला आहे. परिणामी, जसे समुद्रातील खडकाला धडकणारे जहाज नष्ट होते तसेच मागील काही वर्षांत जगभरात एकामागून एक अनेक विचारधारा जोरात आपटल्या. तरीही माणसं ’अब की बार’ काहीतरी वेगळं करायच्या तयारीत आहेत. एक मात्र नक्की की माणसाने कितीही डोके आपटले तरीही सरतेशेवटी त्याला आपल्या निर्मात्याचे मार्गदर्शन घ्यावेच लागणार आहे. मग सतत आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याला दुर्बुद्धी नाही तर काय म्हणणार? रमजानच्या महत्त्वाचे रहस्य हेच आहे की या महिन्यात विश्व-निर्मात्या ईश्वराने मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पवित्र कुरआन अवतरित केले, जसे त्यापूर्वीही काही प्रमुख ईशग्रंथांचे अवतरण याच महिन्यात केले होते. अल्लाहने ज्या महिन्यात मार्गदर्शनासाठी ग्रंथ अवतरित केले, त्याच महिन्यात माणसांचे अंतःकरण हे मार्गदर्शनासाठी तयार व्हावे आणि माणसातील ईशभय हा गुण विकसित व्हावा या उद्देशाने रोजे ठेवण्याची आणि कुरआनचे पठण व श्रवण करण्याची योजना दिली. रोजा आणि कुरआन या दोन्हीच्या माध्यमातून भक्ताला अल्लाहशी जवळीकता साधता येते. पवित्र कुरआन हा ग्रंथ म्हणजे अल्लाहने आपल्या भक्तांच्या आत्म्यांशी केलेले संबोधन आहे. या ग्रंथाचे पठण व श्रवण आणि रोजा ठेवणाऱ्या व्यक्तीलाही अल्लाहशी विशेष जवळीकता प्राप्त होते. अशा प्रकारे रमजान आणि कुरआन हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात. कुरआनचा लाभ कुणाला होतो? जो मनात ईशभय बाळगून वाईट गोष्टींपासून सुरक्षित राहू इच्छितो आणि ईशभय हा गुण विकसित होण्यासाठी रोजा ठेवणे आवश्यक आहे.सध्याच्या चंगळवादी जीवन व्यवस्थेमध्ये माणूस एक अर्थप्राप्ती करणारा श्वापद बनलेला आहे. पैसा कमाविण्यासाठी काहीही अनैतिक करण्यात लोकांना वाईट वाटत नाही. या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ लोकांना सदाचरणासाठी प्रोत्साहित तर करतोच, त्याबरोबर बौद्धिक समाधानही देतो. ज्यामुळे जीवनात सकारात्मकता वाढते आणि मानसिक स्थैर्य व शांती लाभते. ज्याची आजच्या काळात खूप गरज आहे.


 - अब्दुल कय्यूम शेख अहमद,

 औरंगाबाद. 9730254636 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget