आमीन उल खौली (1895 ते 1966) इजिप्तचे एक मोठे साहित्यिक होऊन गेले. अरबी भाषेमध्ये त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. फवाद अव्वल विद्यापीठामध्ये ते अरबी भाषेचे विभागप्रमुख होते. जामिया अरबीया (अरबी विद्यापीठ) कैरोचे ते अरबी भाषा विभागाचे अधिष्ठाता होते. 1919 साली इजिप्तमध्ये झालेल्या बंडामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. ते साद जगलोलचे निकटवर्तीय होते. त्यांच्या विद्यार्थ्यांची लांबलाचक यादी आहे. त्यांच्यात एक नाव डॉ. आएशा अब्दुर्रहमान यांचे सुद्धा आहे. त्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत्या.
आएशा अब्दुर्ररहेमान (1913-1998) यांना जागतिक स्तरावर बिन्त-अल-शाती अलशातीच्या नावाने ओळखले जात होते. त्यांचे वडील कैरोच्या जामे अझहर विद्यापीठातून शिकलेले होते. बिन्त-अल-शाती यांनी वयाच्या 7 व्या वर्षी कुरआन मुखोद्गत केले होते. त्यांनी काहिरा विद्यापीठातून अरबीत साहित्याचे उच्च शिक्षण घेतले होते. त्यांनी 9 देशामध्ये शैक्षणिक काम केले होते. त्यानंतर त्यांचा ओढा कुरआनकडे लागला होता. त्या मोरोक्कोच्या अलकरवीन विद्यापीठामध्ये तफसीर विभागाच्या प्राध्यापिका होत्या. काहिरा विद्यापीठात प्राध्यापकपदी काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांना साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यात आंतरराष्ट्रीय किर्तीचा शाह फैसल पुरस्कारही सामील होता जो त्यांना 1994 साली प्राप्त झाला होता.
बिन्त अल शाती यांनी 40 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली होती. यापैकी बहुतेक पुस्तके अरबी भाषेत लिहिलेली होती. त्यांनी अनेक ऐतिहासिक पत्रांचे भाषांतर देखील केले होते. प्रेषित सल्ल. यांच्या खानदानातील त्यांनी लिहिलेली एक सीरीजही आहे. उम्मुल नबी, निसाउन्नबी, बिन्तुल नबी, जैनब बतलतुल करबला शिवाय कुरआनवर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. बयानुल कुरआन हे कुरआनवरील भाष्य, अलएजाजुल बयानुल कुरआनुल करीम, अलकुरआन वल तफसीरूल अलअसरी, मकाल फिल इन्सान इत्यादी.
शेख अमीन अल कौली यांचा देखील कुरआनच्या अभ्यासावर दांडगा प्रभाव होता. त्यांनी कुरआनमधील मुल्ये उघडून जगासमोर सादर केली. त्यांनी कुरआनच्या अभ्यासाची एक पद्धत सांगितलेली आहे. ती अशी की, एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्याशी संबंधित कुरआनमधील आयाती एकत्र कराव्यात आणि त्यानंतर त्याच्यावर विचार करावा. तेव्हा कुठे त्याचे नवनवीन अर्थ लक्षात येतात. कुरआनचे ज्ञान आणि कुरआनच्या भाष्यासंबंधी त्यांचे मत जे त्यांनी लिहिलेल्या साहित्यात नमूद आहे. अत्यंत प्रसिद्ध आहे.
आयएशा अब्दुर्ररहमान यांनी स्वीकार केले होते की, 20 वर्षापर्यंत अरबी भाषेवर प्रभुत्व मिळविल्यानंतर त्यांच्या पतीने त्यांना कुरआनच्या अभ्यासाकडे वळण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी अनेकवेळा यासाठी आपल्या पतीला उडघपणे श्रेय दिले होते. अल एजाजुल बयानी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ज्या लोकांना श्रेय दिले त्यात त्यांच्या पतीचे नाव सुद्धा सामील आहे. अल तफसिरूल बयानी च्या शैलीबद्दल लिहिताना त्यांनी स्पष्टपणे या गोष्टीचा स्विकार केला आहे की, वस्तुतः ही शैली त्यांच्या पतीची होती. शेख अमीनुल खौली यांचे साहित्य, त्यांचा अभ्यास, कुरआनवरील त्यांचे प्रभुत्व एकीकडे मात्र त्यांना जगाशी परिचित करून देण्यामध्ये मोठा वाटा बिन्तुल शाती ह्या होत्या. जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना अशी लायक पत्नी मिळणे दुर्मिळ गोष्ट आहे. या ठिकाणी म्हणून म्हणावेसे वाटते बिन्तुल शाती ह्या त्यांच्या उत्तम विद्यार्थीनी आणि चांगली पत्नी होत्या.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment