Halloween Costume ideas 2015
March 2018

    माननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा मनुष्य दुर्भाग्यशाली आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ‘तवक्कुल’ म्हणजे अल्लाहला आपला प्रतिनिधी बनविणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. पालनकर्त्याला प्रतिनिधी म्हणतात आणि सुख-समृद्धीबाबत विचार करणारा आणि वाईटापासून वाचविणाऱ्याला पालनकर्ता म्हणतात.
    ‘मोमिनचा प्रतिनिधी अल्लाह आहे.’ याचा अर्थ असा होतो की त्याला यावर दृढविश्वास असतो की अल्लाहकडून जे काही येते ती भलाई आहे, त्यातच माझ्याकरिता समाधान आहे, अल्लाह ज्या स्थिती ठेवील त्यावर मी आनंदी आहे. मोमिन स्वत:हून प्रयत्न करीत असतो आणि मग मामला अल्लाहच्या हवाली करतो आणि म्हणतो, ‘‘हे पालनकर्त्या! तुझ्या दुर्बल दासाने हे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी दुर्बल व विवश आहे. या कामात जी काही त्रुटी राहिली असेल तिला तू पूर्ण कर. तू वर्चस्वशाली व शक्तिशाली आहे.’’
    एक मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.)! मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अगोदर तू तिला बांधून ठेव मग विश्वास ठेव.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : एखाद्या वस्तूला प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यांचा पूर्णत: अवलंब करा आणि मग अल्लाहपाशी दुआ करा की ‘‘मी उपाय केला आहे, आता तू मदत कर.’’ हे आहे ‘तवक्कुल!’
    माननीय अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचे मन प्रत्येक डोंगरकपारीत भटकत असते. जर एखादा मनुष्य आपल्या मनाला डोंगरखोऱ्यात भटकण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला कोणती दरी त्याला नष्ट करील याची अल्लाहला पर्वा नाही. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवील त्याला अल्लाह त्या डोंगरकपारीत आणि मार्गांवरून भटकण्यापासून आणि नष्ट होण्यापासून वाचवील.’’ (हदीस : इब्ने माजा)
स्पष्टीकरण : जर मनुष्य अल्लाहला आपला प्रतिनिधी व पालनकर्ता बनवीत नसेल तर त्याचे मन नेहमी उद्विग्न राहील आणि अनेक मनोवृत्तींचे घर बनून राहील, परंतु जो मनुष्य आपल्या मनाला अल्लाहकडे वळवील त्याला निश्चिंतता प्राप्त होईल.
पश्चात्ताप आणि क्षमायाचना
    माननीय अनस बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास गुन्हा केल्यानंतर क्षमा मागण्यासाठी जेव्हा अल्लाहकडे परततो तेव्हा अल्लाहला आपल्या दासाच्या परतण्यावर त्या मनुष्याच्या तुलनेत अधिक आनंद होतो, ज्याचे आयुष्य ज्या सांडणीवर अवलंबून होते ती सांडणी एखाद्या वाळवंटात हरवली असेल आणि मग त्याला ती अचानक सापडली असेल (तर ती सांडणी सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.) अशाच मनुष्याच्या पश्चात्तापाने अल्लाहला आनंद होतो. इतकेच नव्हे तर अल्लाहचा आनंद त्याच्या तुलनेत वाढलेला असतो कारण तो दया व कृपेचा स्रोत आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
    माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह रात्री आपला हात पसरतो जेणेकरून ज्या मनुष्याने दिवसा एखादे पापकर्म केले असेल त्याने रात्री अल्लाहकडे परतावे आणि दिवसा तो आपला हात पसरतो जेणेकरून रात्री जर एखाद्याने पापकर्म केले असेल तर त्याने दिवसा आपल्या पालनकत्र्याकडे परतावे आणि पापकर्मांची क्षमा मागावी. अल्लाह असेच करीत राहील, सूर्य पश्चिमेला उगवेपर्यंत (म्हणजे अंतिम निर्णयाचा दिवस येईपर्यंत). (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘अल्लाहचे हात पसरणे’ म्हणजे तो आपल्या पापी दासांना बोलवितो की
    माझ्याकडे या, माझी दया तुम्हाला आपल्या बाहूत घेण्यास तयार आहे. जर तुम्ही तात्पुरते भावनेच्या भरात रात्री पापकर्म केले असेल तर दिवस उजाडताच क्षमा मागा, जर उशीर कराल तर शैतान तुम्हाला आणखीनच दूर करील आणि अल्लाहपासून दूर जाण्यात आणि दूर जात राहण्यात मनुष्याचा नाश आहे.

२८०) तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल.३२४
(२८१) त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.
(२८२) हे ईमानधारकांनो! जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसांत कर्जाची देवघेव कराल,३२५ तेव्हा ते लिहून घेत जा.३२६ उभयपक्षांमध्ये न्यायपूर्वक एका माणसाने दस्तऐवज लिहावे. ज्याला अल्लाहने लिहिण्या-वाचण्याची क्षमता प्रदान केली आहे, त्याने लिहिण्यास नकार देता कामा नये. त्याने लिहावे आणि दस्तऐवजाचा मजकूर त्याने सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते (अर्थात कर्ज घेणारा), आणि त्याने अल्लाहचे, आपल्या पालनकत्र्याच्या क्रोधाचे भय बाळगले पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काहीही कमी-जास्त करू नये. परंतु जर कर्ज घेणारा स्वत: नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुखत्याराने न्यायसंगतरीतीने मजकूर सांगावा. नंतर आपल्या पुरुषांपैकी३२७ दोघांची यावर साक्ष घ्या. जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी. हे साक्षीदार अशा लोकांपैकी असावेत ज्यांची साक्ष तुमच्यात मान्य असावी.३२८ साक्षीदारांना साक्षीदार म्हणून काम करण्यास सांगितले गेल्यास त्यास त्यांनी नकार देऊ नये. बाब लहान असो किंवा मोठी, मुदत ठरविण्याबरोबरच तिचे दस्तऐवज लिहून घेण्यात आळस करू नका. अल्लाहजवळ ही पद्धत तुमच्यासाठी अधिक न्यायसंगत आहे, त्यामुळे साक्ष सिद्ध होणे सवलतीचे ठरते, आणि तुम्ही शंका-कुशंकांमध्ये गुंतण्याची शक्यता कमी राहते....३२४) याच आयतपासून शरियत (धर्मशास्त्र) चा आदेश देण्यात आला आहे. व्यक्ती कर्जफेड करू शकत नसेल तर इस्लामी न्यायालय सावकारास सवलत देण्यास बाध्य करील आणि काही स्थितीत न्यायालयास कर्ज पूर्ण माफ करण्याचा किंवा काही भाग माफ करण्याचा अधिकार आहे. हदीसकथन आहे की एका व्यक्तीच्या व्यापारात तोटा आला आणि त्याच्यावर कर्जाचे ओझे चढले. मामला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर गेला. त्यांनी लोकांना अपील केले की आपल्या भावाची मदत करा. अनेक लोकांनी त्याला आर्थिक सहाय्य केले तरी पूर्ण कर्जफेड होऊ शकली नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सावकाराला बोलावून घेतले आणि त्याला राहिलेली रक्कम सोडून देण्यास सांगितले. फिकाह विद्वानांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत राहाते घर, खानपानाची भांडी, नेसायचे पोषाख आणि कमाईची संसाधनं सावकारला जप्त करता येत नाही.
३२५)     यावरून हा आदेश स्पष्ट होतो की कर्जाच्या देवाणघेवाण मामल्यात मुदत निश्चित होणे आवश्यक आहे.
३२६)     सामान्यत: मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या कर्जाच्या मामल्यात लिखापढ करण्यास अप्रिय व अविश्वासपूर्ण  समजले  जाते. परंतु  अल्लाहचा  आदेश  आहे  की  कर्ज  आणि  व्यापारी  व्यवहार  लेखी  स्वरुपात असणे आवश्यक आहे. आणि त्यावर ग्वाही (साक्ष) घेणे आवश्यक आहे जेणेकरून लोकांच्यामध्ये साफ व सरळ व्यवहार व्हावेत. हदीसकथन आहे की तीन प्रकारच्या व्यक्ती अशा आहेत की ज्या अल्लाहशी विनंती  करतात पण अल्लाह त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
(१) ती व्यक्ती ज्याची पत्नी संबंधितांशी वाईट वर्तणूक ठेवून आहे आणि तिला तो तलाक देत नाही.(२) तो माणूस जो अनाथ मुलास सज्ञान होण्याअगोदर त्याचा माल (संपत्ती) त्याच्या हवाली करतो. (३)  तो माणूस जो कोणाला कर्ज देतो आणि कोणालाही त्यावर साक्षीदार बनवत नाही.
३२७)     म्हणजे मुस्लिम पुरुषांमधून. यावरून कळून येते की जेथे साक्षीदार बनविणे आपल्या अधिकारात असेल तिथे मुस्लिमाने केवळ मुस्लिम व्यक्तीलाच साक्षीदार बनवावे. होय, मुस्लिमेतरांचे साक्षीदार मुस्लिमेतर होऊ शकतात.
328)     म्हणजे ऐरेगैरे ग्वाही देण्यास सक्षम ठरत नाही. चारित्र्यसंपन्न, सत्यप्रिय व विश्वासू लोकांनाच साक्षीदार बनवावे.

बेळगाव-
    साप्ताहिक शोधनचे स्तंभलेखक, कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी, लेखक, साहित्यिक रामचंद्र रेडकर, वय ७८ यांचे वृद्धापकाळाने टिळकवाडी, सोमवार पेठ येथील राहत्या घरी दि. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे २ भाऊ, ३ मुली, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
    सारस्वत बँक कणकवली येथील कर्मचारी दिलीप रेडकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. तसेच दै. तरुण भारत मधील माजी कर्मचारी गणेश रेडकर यांचे ते वडील होते.
    रेडकर यांना सीमा प्रश्नासंबंधीचा अभ्यास होता. त्यांनी सीमाप्रश्नासाठी तुरुंगवासही भोगला होता. त्यांच्या हयातीत सीमाप्रश्न सुटावा अशी त्यांची इच्छा शेवटपर्यंत होती.
    तसेच त्यांनी लेखन, साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला होता. दै. तरुण भारत मधील अक्षरयात्रा, खजाना, वाचकांचा पत्रव्यवहार यासाठी लिखाण केले होते.
    अनेक आध्यात्मिक मासिकांमध्येही त्यांचे साहित्य प्रकाशित झाले होते. त्यांना आध्यात्मिकतेची आवड होती. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
    त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दु:खात शोधन परिवार सहभागी आहे. त्यांना मरणोत्तर जीवनात शांतता लाभो अशी अल्लाहजवळ प्रार्थना आहे.

औरंगाबाद येथे तबलीग जमातचा इज्तेमा (धार्मिक संमेलन) पार पडला. या संमेलनात अंदाजे ऐंशी लाख शिस्तबद्ध शांतताप्रिय आणि समाजहितैषी मुस्लिम बांधवांनी भाग घेतला होता. तीन दिवसांच्या या इज्तेमात इस्लामप्रेमाचे, मुस्लिम ऐक्याचे, ताकतीचे आणि बुद्धिकौशल्याचेही दर्शन घडले. या संमेलनातील पाणी व्यवस्था, अन्न नियोजन, शौचालये, मंडप, वाहनतळ, सूचनाफलक, रस्त्यांची व्यवस्था, खाण्याची, राहण्याची, विश्रांतीची व्यवस्था आदी नागरी नियोजनाचा आराखडा खऱ्या अर्थी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक प्रकारे कार्यशाळाच होती. विशेष म्हणजे हा प्रचंड लोकसमुदाय गिनिज बूक वा लिम्का बूक मध्ये रेकॉर्ड करण्यासाठी जमला नव्हता. केवळ अल्लाह तबारक तआला व प्रेषित मुहम्मद (स.) साठीच एकत्र आला होता. प्रवचनात इतर जणांवर आक्षेप, टीकाटिप्पणी वा गरळ नव्हती. धार्मिक प्रदर्शनाचे डीजे बनवून, झेंडे नाचवून व स्वत:ही हिडीस नृत्य करून उन्मादी प्रदूषण नव्हते. विशेष म्हणजे दुसऱ्या धर्मियांना खीजविण्यासाठी वा धाक दाखविण्यासाठी ‘तमाशा’ नव्हता. हा इज्तेमा सरकारी अनुदान व लोकवर्गणीखेरीज केवळ तबलीग जमातच्या सदस्यांच्या चंद्यावरच आयोजित करण्यात आला होता. खंडणी गोळा करून चंगळमंडळ नव्हती. निखालस धार्मिक संमेलन होते! गेल्या अध्र्या शतकापासून तबलीग जमात भारतीय मुस्लिमांत व समाजात ही अत्यंत शिस्तप्रिय, शांतताप्रिय, ईमानदार, विवेकी, चारित्रसंपन्न अशा स्वयंसेवकांची (साथी) फौज निर्माण करण्यात व्यस्त आहे. एक प्रकारे समाज घडविण्याचे राष्ट्रीय निर्माणकार्य करीत आहे. समाजोपयोगी व राष्ट्रविधायक युवक निर्माण करीत आहे. इतर स्वयंसेवकांप्रमाणए प्रचारमाध्यमांना हाताशी धरून पराचा कावळा करीत नाही. आपणच एकमेव राष्ट्र घडवित आहोत असा टेंभाही मिरवित नाही. त्यामागे जमातचे धोरण अगदी स्पष्ट आहे. इतर स्वयंसेवकांप्रमाणे खायचे दात एक व दाखवायचे दात एक नाहीत. समाजात द्वेष पसरविण्याचे, दुफळी माजविण्याचे काम तबलीग जमात करीत नाही. याची नोंद प्रसारमाध्यमांनी घेऊ नये याचे शल्य वाटते.
-निसार मोमीन, पुणे.

-शाहजहान मगदुम
राज्यघटनेने अनुच्छेद २१नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. याच अनुच्छेदाअंतर्गत सरन्यायाधीशांसह पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एकमताने शुक्रवारी ऐच्छिक इच्छामरणाचाही मूलभूत अधिकार काही अटींवर ९ मार्च रोजी दिल्यानंतर याबाबत नव्याने चर्चेची वादळे उठली आहेत. भा.द.वि. १८६० च्या सेक्शन ३०० नुसार आपल्या देशातले वैद्यकीय अधिकारी अशा प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीत असल्यास दोषी ठरू शकतात. कलम २१ नुसार जगण्याच्या अधिकाराबरोबर मृत्यूच्या अधिकारही चर्चिला जातो. आजच्या धावत्या युगात अनेकांना इच्छामरणाची इच्छा वाटू लागली आहे. सन्माननीय जगण्याऐवजी ‘अ’सन्माननीय मरण पत्करू लागले आहेत. यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे समाजातील नैतिकतेचा ऱ्हास होय. अध्यात्माकडे दुर्लक्ष करून आधुनिकतेच्या युगात मनुष्य निसर्गावर किंबहुना निसर्गनियमांवर मात करण्याची आकांक्षा बाळगून असतो. त्या माहीत असते की कोणत्याही सजीवाला मरण हे अटळ आहे. मात्र आपल्या अनावश्यक स्वार्थापोटी तो मरण पत्करणाचा निर्णय घेऊन टाकतो. जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही हे त्याला ठाऊक असूनसुद्धा तो मरणाला कवटाळण्याची भाषा करतो. ही गोष्ट विधीलिखित आहे हे जवळपास सर्वच धर्म सांगतात. तरीही त्यात मनुष्य कुरघोडी करण्यास मागेपुढे पाहात नाही. काही वेळा तो विवश असेलही मात्र ईश्वरेच्छाविरूद्ध वागण्यात मोठे नुकसान आहे हे त्याला कळेनासे झाले आहे. इच्छामरण ही प्रगत मानवाची गरज ठरू पाहात आहे आणि व्यवस्थाच मानवावर इच्छामरण अप्रत्यक्षरीत्या लादू इच्छित आहे. विज्ञानाच्या मदतीने मानव मरणाला लांबवू शकतो पण त्याच्यावर विजय मिळवू शकलेला नाही. ते शक्य पण नाही. जर इच्छामरणाचा अधिकार दिला तो एक प्रकारे खून करण्याचा परवानाच ठरेल. अडचणी, संघर्ष आणि तडजोडीच जगणे एवढे निरर्थक का वाटते? जिथे आपल्याला निसर्गाने ठरवलेले आयुर्मान दिले आहे ते कमी का करू पाहतो आहोत आपण. आज मानवांतील नीतिमत्तेचा ऱ्हास झाल्यामुळे लोकांना जगण्यातली सहजता लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच इच्छामरण कायद्यात एक सुखाची वाट दिसू लागली आहे. हा कायदा जीवणाच्या अंतिम सत्याला अनुसरून नाही. कारण अंतिम सत्य मृत्यू होणे होय. तो स्वत:हून करणे नाही. ईश्वराने जन्म दिला आहे तर त्याच्या मान ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत बिनधास्त जगायला हवे. अनेक कारणे अशी आहे की संवेदनशील व्यक्तीला त्या क्षणी जगणे निरर्थक वाटते. इच्छामरण हे स्वत:हून स्वत:साठी मागितलेले मरण आहे तर दयामरण हे दुसऱ्याने दिलेले मरण आहे. अरुणा शानभाग या जवळपास चाळीस वर्षे कोमातच अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अरुणा शानभागच्या दयामरणासाठी अर्ज केला होता. तिथे इच्छामरण नव्हते. आणि नारायण लवाटे यांनी वयाच्या ८८व्या वर्षी तर इरावती लवाटे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी या दांपत्याने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. इच्छामरण की दयामरण हाही विचार केला तर इच्छामरण म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर आत्महत्या आणि दयामरण म्हणजे खून! त्यामुळे इच्छामरणाचा कायदा झाला तर या कायद्याचा गैरवापरच जास्त प्रमाणात होईल. आज समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे दाखले पावलोपावली मिळतात. जन्मदात्या आईवडिलांनाच वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. आज जगात इतके दारिद्र्य आहे की, लोक भीक मागून रस्त्याच्या काठावर, पुलाखाली राहून जीवन जगतात. एवढेच नाही तर काहीजणांना इतके अपंगत्व आहे की, जन्मापासून अशा व्यक्ती परावलंबी असतात. अशा अपंगत्व व दारिद्र्यातही रस्त्याने फरकटत फरकटत भीक मागून आयुष्य जगणारे लोक पाहिले की असे वाटते, मानवामध्ये जगण्याची किती उमेद आहे! त्याच्या जीवनात काहीच सुंदर नसेल पण त्याला जगातील सुंदरता पाहायची असेल! वंचिताचे, अभावाचे जीवन जगताना असे अनेक लोक दिसतात. त्या वेळी मनात विचार येतो, प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा निर्मात्या ईश्वराने अधिकार प्रदान केला आहे. जन्म कुठे घ्यावा, हे जसे आपल्या हातात नाही, तसेच मृत्यू कसा यावा, हेही आपल्या हातात नाही. मग निसर्गनियमानुसार जीवन जगण्यास काय हरकत आहे? अनेक विकसित देशांत दयामरण कायदेशीर करण्यात आले असले तरी त्याच्या दुरुपयोगामुळे तो पुन्हा बेकायदेशीर ठरवला जात आहे. भारतातली समाज व्यवस्था अशा कायद्यांना धार्जिणी नाही. दयामरणाच्या कायद्यामुळेही कौटुंबिक स्तरावर अनेक अविश्वासाच्या आणि कुशंकांच्या वावटळी निर्माण होऊ शकतात. आपल्या देशात अनेक धर्म नांदतात. धार्मिक स्तरावर अनेकांचा मरणात हस्तक्षेप करण्यास विरोध आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहच्या मर्जीच्या विरोधात जीव घेण्यास विरोध आहे. आयुष्य ही ईश्वराची देणगी आहे आणि दु:ख, वेदना याही जीवनचक्राचा एक भाग आहेत. त्या कृत्रिमरीत्या संपवण्याचा अधिकार मनुष्याला नाही.

-कलिम अजीम, अंबाजोगाई
‘सुप्रीम कोर्टाने बाबरी मस्जिदसाठी पूर्ण जागा दिली तरी देशात शांती प्रस्थापित होणार नाही,
          रामजन्मभूमी १०० कोटी  लोकांच्या भावनेशी जोडली गेली आहे. ५०० वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरु आहे, अशा लोकांच्या मनात न्यायालयासंबधी संशयाचं वातारवरण तयार होईल,न्यायपालिकेबद्दल संशय निर्माण होईल. हे शक्य होणार नाही, जागोजागी गृहयुद्ध सुरु होतील, गावोगावी भांडणे होतील, हिंदू-मुस्लिमांमध्ये अंतर निर्माण होईल. जगात इजिप्त, लेबनॉनमध्ये संघर्ष सुरु आहे, काश्मीरमध्येही संघर्ष सुरु आहे तशी परिस्थिती आम्हाला नको आहे, कोर्टानं बाबरी मस्जिदीला जागा दिली तर सिरियासारखी गृहयुद्धाची परिस्थिती भारतात उद्भवेल’
- श्री श्री रविशंकर
बाबरी मस्जिद जमीन वादावर सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कोर्टाचा निकाल डावलून देशात कशा पद्धतीने आराजकता निर्माण करता येऊ शकते, याची कवायत सरकारदरबारी सुरु आहे. त्यामुळे घटनात्मक अधिकार बासनात गुंडाळून मुस्लिम समुदायाला दहशतीत लोटण्याचं कारस्थान सुरू झालं आहे. त्यातून कटियार, डबल श्री सारखी लोकं, रस्त्यावर गृहयुद्धाची भाषा करत सुटले आहेत. राम मंदिर समर्थनाची दलाली (मध्यस्थी) करणाऱ्या श्रीश्री रविशंकर यांनी मुस्लिम समुदायाला थेटपणे चेतावणी देण्याचं कंत्राट हाती घेतलं आहे. सीरिया, आयसिस, गृहयुद्ध असे जाडजूड शब्द वापरून आध्यात्मिक धर्मगुरू अप्रत्यक्षपपणे हिंदूंना कोर्टाचा निर्णय मानू नका असे आदेश देत आहेत. लोकशाही राष्ट्रात एक तिऱ्हाईत माणूस देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देत आहे.
बाबरी भूमीचं प्रकरण आस्था किंवा श्रद्धा म्हणून नव्हे तर जमिनीचा मालकी वाद म्हणून हाताळला जाईल, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं महिनाभरापूर्वी दिलं. यानंतर भाजप सरकार व हिंदुत्ववाद्यांनी देशात दहशतीचं वातावरण तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. अशा वातावरणात एका समुदायाकडून ही वादग्रस्त ‘केलेली’ जागा दगाबाजी करत बळकावून घेण्याचं धोरण आखलं जात आहे. ‘राम मंदिरासाठी आयोध्येची जमीन द्या नसता, गृहयुद्ध करून मुस्लिमांना ठार मारू’ अशी अप्रत्यक्ष धमकी आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या डबल श्रींनी नुकतीच दिली आहे. बाबरी वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च कोर्टाबाहेर मध्यस्थी करू पाहणाऱ्या या ‘बिझनेस टायकून’ बाबाविरोधात देशद्रोहाचा पहिला खटला लखनऊमध्ये मुस्लिम संघटनांकडून दाखल करण्यात आला आहे. पण पुरोगामी म्हणवणारे कंपू देशभरात भारताचा सीरिया घडण्याची वाट पाहत असावेत का? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
टीव्हीवर बाबरी प्रकरणावर बोलताना ते मध्यस्थ कमी व विहिंप, संघ परिवार व भाजप सरकारचे प्रवक्ते जास्त वाटत होते. त्यांचा प्रत्येक मुद्दा मंदिरावर येऊन थांबत होता. एका अर्थाने ते भारतीय मुस्लिमांना चेतावणी देत होते. ‘बघा, जमीन देऊन टाका, नाही तर माझे अनुयायी तुमचा रक्तपात घडवतील’ त्यांच्या सदरील वादग्रस्त कथनात दोन विधाने मी वेगळ्या अर्थानं घेतो. पहिलं म्हणजे कोर्टानं बाबरीसाठी जागा दिली तर हिंदूंचा न्यायपालिकेसंबधी संशय निर्माण होईल. तर दुसरं विधान हिंदूंचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल; हीच दोन विधाने मुस्लिमांच्या बाबतीतही लागू का होऊ शकत नाही?
गेल्या १८ वर्षांपासून भारतीय मुस्लिम ‘इस्लामोफोबिया’च्या नावाने असुरक्षित केला गेला आहे. दहशतवादाचा खोटा आरोप, फेक एन्काऊंटर, न्यायात पक्षपातीपणा, अँण्टी मुस्लिम झालेली पोलीस व तपास यंत्रणा, राजकारणात डावललेपण इत्यादी बाबतीत मुस्लिम तरुण पिढीचा विश्वास लोकशाहीवरुन उडालेला आहे. २०१४ च्या सत्ताबदलानंतर मुस्लिम तरुणांना टारगेट करून ठार मारले जात आहे. देशद्रोहाचे आरोप लादले जात आहेत. अल्पसंख्याकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. अशा वेळी सरकारने अल्पसंख्याकांच्या अधिकाराला आस्थेच्या नावाने शहीद केलं तर मुस्लिमांनी जायचे कुठे? अशा परिस्थितीत मुस्लिम समुदायाला एकमेव आसरा व विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. मग न्यायपालिकेनं दिलेला निर्णय श्रद्धा म्हणून तुम्ही (भाजप सरकारव समविचारी संघटना) रद्द करणार असाल तर मुस्लिमांचा देशात वाली कोण आहे?  प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना जाहीररीत्या न्यायापालिकेविरोधात विधाने करणे कोर्टाचं अवमान नाही का?
डबल श्रींपेक्षा कमी इन्टेसिंटीच्या वादग्रस्त विधानांवर अनेक मुस्लिम नेत्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. पण या शांतिदूताने देशाच्या सुरक्षेला दिलेल्या आव्हानावर सर्व जण गप्प आहेत. घटमनात्मक मूल्यांना बाधा पोहचवणे या बाबासाठी नवं नाही, २०१६ मध्ये दिल्लीतील यमूना नदीच्या तटावर भव्य-दिव्य कार्यक्रम घेऊन पर्यायवरणाचं १० वर्षांत न भरून येणारं नुकसान या बाबाने केलं आहे. याविरोधात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) १२० कोटींचा दंड केला होता. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही या बाबाने दंड भरला नाही. तुरुंगात जाईल पण दंड भरणार नाही, असं विधान या बाबाने केलं होतं. एनजीटीने हा दंड कमी करत ५ कोटी केला, त्यावेळी इन्स्टॉलमेंटमध्ये डबल श्रींनी हा दंड भरला.
अशी विधाने करणाऱ्यांविरोधात लोकशाही मानणाऱ्या लोकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या बाबाविरोधात सहिष्णू आणि शांतिप्रिय हिंदूंनी एकत्र यावे. नसता या बाबाचे कोट्यवधी हिंसक अनुयायी, गंभीर हिंसा व अराजकतेला जन्म देतील व मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होईल. रामरहीमच्या अंध अनुयायांचा नमूना आपण नुकताच पाहिला आहे. २०१४ मधील रामपाल महाराजाच्या अनुयायांचं उदाहरण आठवून पाहा..!
बाबरी जमीन वादावर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सर्वमान्य असेल. पण सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला, तर १९९२ नंतर पुन्हा एकदा भारतीय मुस्लिमांत पक्षपातीपणा, न्यायात डावलल्याची भावना आणखी दृढ होईल. लोकशाही व न्यायव्यवस्थेवरील विश्वास गमावलेली ही पिढी भविष्यात कुठली स्वप्ने व आशा घेऊन जगतील? या पिढीची दिशा व मार्गर्दशक तत्त्वे काय असतील? साडेचारशे वर्षे ताबा असलेली बाबरीची जागा मुस्लिमांना परत मिळणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. बाबरी भूमीच्या निमित्ताने भारतातील न्यायपालिकेसमोर न्याय भूमिका मांडण्याचे मोठं आव्हान आहे. हे न्यायपालिकेला जपावं लागणार आहे.
कुठल्याही देशाचे कायदे तिथं राहणाऱ्या अल्पसंख्याकांच्या दृष्टीने पोषक आहे का? यावर त्या देशाच्या समानतेचा डोलारा उभा असतो. ज्या देशात अल्पसंख्याकांचे कायदे पायदळी तुडवले जात असतील, तिथं न्यायपालिकेचं काम असतं की सरकार व तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला याची जाणीव करुन द्यावी. देशातील लोकांच्या कल्याणकारी धोरणासांठी राज्यघटना आहे. त्या आधारे सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक देणं हे त्या न्यायव्यवस्थेचं कर्तव्य आहे. अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की देशातील बहुसंख्याक व अल्पसंख्याक यातील मतभेदामुळे किंवा अधिकारांचा प्रश्नांमुळे सर्वोच्च असलेली न्यायव्यवस्था दोलायम अवस्थेतून जाते, अशा परिस्थितीत न्यायपालिकेला न्याय्य भूमिका मांडण्याची कसरत करावी लागते. अशी कसरत भारतातील ज्युडिशिअरीला करायची आहे. हा भारतीय न्यायपालिकेसाठी परिक्षेचा काळ आहे. अल्पसंख्याकांना त्यांचे अधिकार मिळवून देणं ही सरकार व न्यायपालिकेची जबाबदारी आहे.
न्याय मिळाल्यवर कदाचित मुस्लिम समुदाय स्वखुशीने जागा मंदिरासाठी देऊ करेलही, पण भविष्यात कुठल्याही अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांना धक्का लागणार नाही, याची शाश्वती कोण देणार? 'बाबरी तो झाँकी हैं....' म्हणणाऱ्या शक्ती दुसरी बाबरी घडवणार नाहीत कशावरुन? त्यासाठी सुप्रीम कोर्टाला अल्पसंख्याकांचे सर्वच प्रार्थनास्थळे जतन करण्याची हमी द्यावी लागेल. अशा प्रकारचा कायदा आणून देशात तमाम अल्पसंख्य (मुस्लिम समाजासह) समुदायाला विश्वासात घ्यावे लागेल. सुप्रीम कोर्टाने तलाक ए बिद्दत रद्द करण्यासंदर्भात जसे आदेश सरकारला दिले होते, तसेच आदेश याही प्रकरणात द्यावे लागेल. याव्यतिरिक्त समाजातील सिव्हिल सोसायटीला विश्वासात घेऊन ‘धार्मिक स्थळे संरक्षण व जतन कायदा’ करण्यसाठी अभिप्राय मागवता येऊ शकतात. सुप्रीम कोर्ट व कायदेमंडळाला पुढाकार घेऊन ही चर्चा अंमलात आणावी लागेल. नसता, राम मंदिर निर्मिताचा तिढा सुटणार नाही.

-नझराना शेख, पणजी (गोवा)
इंटरनॅशनल सेंटर, दोनापाऊला, गोवामध्ये नुकतेच लैंगिक समानतेबद्दल अतिशय दुर्मिळ
    चर्चासत्र पार पडले. स्त्रियांचे सबलीकरण करणे आणि लैंगिक समानताच्या दृष्टीने त्यांच्या काय समस्या आहेत यावर खूप चर्चा झाली.
    प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकतर उत्साहाने साजरा केला जातो. परंतु महिलांसंबंधित समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. एका काळात समाजात ती अत्यंत दबलेली होती आणि आता ती स्वातंत्र्य व मुक्त आणि बहुतेक अधिकारांची हक्कदार असूनसुद्धा तिच्या दडपशाहीची आणि गैरवापराची कहाणी अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात तिच्या दडपशाहीत दुसऱ्या मार्गाने वाढ होत आहे.
    संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०१६-२०१७ ने सांगितले की अपहरण, मुली व स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, या गुन्हेगारीची संख्या भयावह पातळीवर पोहचली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तिची असुरक्षित वाढली आहे.
    एनसीआरबी डेटा २०१६ नुसार २०१६ मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २.९ टक्के वाढ झाली आहे.
    बलात्काराची प्रकरणे जी २०१५ मध्ये ३४,६५१ होती त्यातही २०१६ मध्ये १२.४ टक्के वाड झाली आहे.
    वर नमूद केलेले आकडे स्पष्ट करतात की, ‘स्वतंत्र आणि मुक्त’ अशी असणारी पश्चिम संस्कृतीचा नमुना घेऊन स्त्रियांची उन्नती करण्याचा आमचा निर्णय अयशस्वी ठरला आहे. ही संस्कृती तिला तो सन्मान देण्यासाठी चुकली आहे ज्यावर तिचा हक्क आहे. या संस्कृतीने  लैंगिक समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर खोटी प्रतिष्ठा देऊन तिला असला असुरक्षित आणि धोकादायक मंच दिला आहे ज्यामध्ये तिचे खूप चालाकीने शोषण चालू आहे.    
    समानतेच्या नावावर तिला सर्व कृतींच्या क्षेत्रांत आणले गेले. तिला पुरुषाचे अनुकरण करून त्याच्यासारखे वागायला, त्याच्यासारखे दिसायला आणि त्याच्यासारखे सामथ्र्य दाखवायला भाग पाडले. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांची प्रमुख भूमिका म्हणजे एक परिपूर्ण गृहिणी, आई, पत्नी, बहीण, हीसुद्धा जबाब्दारीने पार पडण्याची अपेक्षा तिच्यापासून केली गेली. स्त्रियांनीदेखील स्त्री-पुरुष अशी दुहेरी भूमिका निभावण्याची तडजोड केली. असे करताना तिला हे कळून चुकले की तिने दीर्घकाळामध्ये काय गमावले. तिला या दुहेरी भूमिकेत आपले कौटुंबिक जीवन आणि मातृत्वाचे बलिदान द्यावे लागले, पुरुषांच्या पूर्वाभिमुख समाजात चांगल्यारीतीने रचलेल्या सापळ्यात ती सहजपणे अडकत गेली. आज स्त्रिया शिक्षित, आत्मनिर्भर होऊनसुद्धा जुन्या काळाची स्त्रियांवरील अत्याचाराची कहाणी आजच्या आधुनिक जगात कायम आहे.
    पूर्वीच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणारी दडपशाही आज स्वातंत्र्य व समानता आणि न्याय या कवचाखाली एक सुनियोजित पद्धतशीर चालविली जात आहे, ज्यात तिचे शोषण नजरेला पडत नाही पण त्यामुळे तिला खूप नुकसान झाले आहे आणि तिच्यावरील वाढत्या अत्याचार आणि गुन्ह्यांचे मुख्य कारण बनले आहे.
    ज्ञान किंवा शिक्षण मानवजातीसाठी एक मोठी भेट म्हणून मानला जाते. ज्यामुळे व्यक्ती, समाज आणि जगाचा विकास होतो. पण याला मनुष्याने फक्त संपत्ती मिळवून देण्याचे साधन मानले. पूर्वी स्त्रियांना काम करावे लागत नव्हते म्हणून त्यांना ज्ञान आणि शिक्षणापासून दूर ठेवले गेले आणि आता आधुनिक काळात मुलींना तो अधिकार मिळाला तेव्हा तिच्या भक्षकांनी त्याला तिचापासून पैसे उत्पन्न करायचा  स्रोत बनवून टाकले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालकही स्वार्थी होतात आणि मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च मिळवून घेण्यासाठी तिला स्रोत बनवतात. पुत्रांनी जे केले नाही किंवा करू शकत नाहीत अशा सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा मुलींना दिली जाते. मुलींपासून या वाढत्या अपेक्षा त्यांना पुढे जीवनात महाग पडतात. यासाठी त्यांचा विवाह उशिरा होतो आणि मग एक चांगला जोडीदार शोधणे तिला अवघड होते आणि वैवाहिक जीवन सुरू करण्यातही तिला समस्या येतात. काही स्त्रिया आयुष्यभर अविवाहितसुद्धा राहतात.
    हुंडा प्रणालीचा धोका हाताळण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले गेले आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा फायदाही झाला आहे. परंतु इथेसुद्धा भक्षकांनी हुंडा हाताळण्याच्या नवीन पद्धतीं शोधून काढल्या आहेत. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलींची नवरी म्हणून निवड होते ते याच कारणामुळे की ती काम करून त्यांच्या संपत्तीला भर घालेल. स्त्रियांवरच सर्व आर्थिक आणि घरगुती जाबाबदारी घालून  काही बाबतीत त्यांचे पती पूर्णत: बेजबाबदार बनले आहेत. ज्या स्त्रिया स्वत:च्या इच्छेनुसार नोकरी करायच्या अधीन असतात त्यांना पण भावनांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या कमाईतून बराच पैसा या भक्षकांसाठी खर्च करण्यास लुभावले जाते. काही स्त्रियांना असल्या नोकऱ्यांतदेखील खेचले जाते, ज्यामध्ये फक्त त्यांच्या सौंदर्याची आणि शरीराची प्रशंसा होते आणि तिच्या अंत:करणाच्या प्रतिभेचे काही मोल होत नाही.
    या आकर्षित करणाऱ्या ग्लॅमरस दुनियेत तिची गुंतागुंत होते ज्यामुळे शेवटी तिच्या नशिबाला एकाकीपणा, नैराश्य, विनाश वाट्याला येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्या करून तिला आपली सुटका करावी लागते. एका बाजूला जेथे लैंगिक समानतेची पदोन्नती चालू आहे तिथेच दुसरीकडे वय, वर्ग, सौंदर्य, शरीर यांच्या आधारावर महिलांचा भेदभाव चालू आहे. आणि हाच निकष पाळून लग्न व नोकरीसाठी तिची निवड होते. जी स्त्री उच्च पदावर पोचली आहे तीसुद्धा कुठल्यातरी पुरुषाची किंवा पुरुषासंबंधी गटाचीच कठपुतळी म्हणून चालते. या सर्व प्रकरणांत स्त्रिया आपल्या विरूद चालणाऱ्या कटाला ओळखण्यात चुकतात आणि ज्या वेळेस ते जाणतात तेव्हा फारच उशीर झालेला असतो.
    आजच्या आधुनिक लढायांमध्ये सैनिकांपेक्षा जास्त नागरिकांची बळी जाते. त्यातही स्त्रियांना जास्त अत्याचार सहन करावा लागतो जो खूप वेळा लष्करी किंवा राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पद्धतशीरपणे विविध रूपाने स्त्रियांवर घडविला जातो. देहव्यापाराच्या वाढत्या गरजेमुळे मानवी तस्करी आणखीनच वाढली आहे आणि याचा परिणामसुद्धा स्त्रियांनीच जास्त भोगला आहे.
    स्त्रियांना न्याय देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याबाबतचे विश्लेषण करताना हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरुषाची नक्कल करणे आणि त्याला आदर्श म्हणून मानणे हे या समस्यांचे समाधान नाही. पुरुष आणि स्त्री ही दोन भिन्न लिंग आहेत आणि त्यांना  समाजात आपली अनोखी भूमिका निभावण्यासाठी रचले गेले आहे. त्यांची विशिष्ट शारीरिक, जैविक आणि मानसिक निर्मिती हे दर्शविते की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांना समान करण्याचा प्रयत्न शेवटी व्यर्थ ठरेल.
    प्रश्न हा आहे की स्त्रीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषाची नक्कल करणे किंवा त्याच्या पातळीवर पोहचणे का आवश्यक आहे? मानवाला जन्म देण्याची आणि मानवजातीला आपल्या प्रेमळता व काळजीने उभारण्याची उत्कृष्ट भूमिका तिला ईश्वराने दिली आहे, जी एक पुरुष प्रयत्न करूनसुद्धा साध्य करू शकत नाही. या भूमिकेने ती अशी मानवजाती आपल्या शिकवणीने निर्माण करू शकते जी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या दुर्बल शरीराचा फायदा न घेता त्यांच्या कोमल हृदयाचे मोल करू शकते आणि तिला तो आदर देऊ शकते ज्यास ती पात्र आहे. आईच्या पदरात लहानपणीच हे संस्कार पुरुषांना मिळाले तर पुढे ते स्त्रियांविषयी होणाऱ्या प्रत्येक शोषणला बंदी घालू शकतात आणि असले वातवरणही निर्माण करू शकतात जिथे स्त्रियांविरुद्ध सगळ्या षड्यंत्रांना रोखू शकतात आणि सर्व वाईट गोष्टीचा मुळांपासून नाश होऊ शकतो.
    लैंगिक समानता हा आजच्या आधुनिक समाजाचा नारा आहे. हा तोच समाज आहे जो भौतिकवाद, स्वार्थ, अमानवीपणा, लोभ, दृष्टा, शक्ती आणि संपत्तीसाठी वेड, असल्या बुद्धीच्या आधारावर विकसित झाला आहे. अशा समाजात स्त्रियांची सुरक्षितता कशी काय होणार? हा समाज लैंगिक समानता व स्वातंत्र्यच्या नावाखाली बनावट स्वाभिमान प्रदान करून महिलांचा लाभ घेऊन फक्त स्वत:ची तहान तृप्त करू शकतो. आज समता आणि मुक्तीची खरी परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तीची मर्यादा आणि समता चे स्पष्टीकरण केल्याशिवाय यात पाऊल टाकणे अतिशय धोकेदायक आहे. स्त्रीच्या शोषणास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सामाजिक वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी वातावरण तयार करणेही गरजेचे आहे. पुरुषाचे अनुकरण करून स्त्री-जातीच्या विशिष्ट दर्जाचा केवळ अपमानच होईल आणि ही दुहेरी भूमिका बजावताना फसवणूकच स्त्रियांच्या हाती लागेल.

- एम.आय. शेख. 9764000737
जिनको आता नहीं जिंदगी में कोई फन तुम हो
नहीं जिस कौम को पर्वा-ए-नशेमन तुम हो
ज्या धर्माची सुरूवातच इ़करा (वाच) या शब्दाने झाली त्या धर्माला मानणाऱ्या व महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुस्लिमांची शैक्षणिक परिस्थिती कशी आहे? याचा संक्षिप्त आढावा घेणे या लेखातून अपेक्षित आहे. मराठी मुस्लिमांच्या शैक्षणिक स्थितीची चर्चा करतांना एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की,”इल्म (शिक्षण) घेणे हे प्रत्येक स्त्री-पुरूषासाठी अनिवार्य आहे.”  या हदीसमध्ये असे कुठेच म्हटलेले नाही की इल्म म्हणजे फक्त दीनी इल्म. वास्तविक पाहता दीनी (नैतिक) आणि भौतिक दोन्ही इल्म घेणे प्रत्येक मुस्लिमांवर बंधनकारक आहे. यापेक्षा मोठे शैक्षणिक धोरण कोणत्या सरकारचे असू शकते? इस्लाम धर्मात अडाणीपणाला स्थान नाही, हे या हदीसवरून सिद्ध होते. 
    महाराष्ट्रातील मुस्लिम मात्र आपल्या मुलांना कोणते शिक्षण द्यावे याबाबतीत गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. त्याचे कारण असे की, मुस्लिमांनी शिक्षणाची दोन भागात विभागणी केलेली आहे. एक नैतिक (दीनी) शिक्षण व एक भौतिक शिक्षण. ही विभागणी जरी योग्य असली तरी भौतिक शिक्षणाकडे बहुतेकांचा कल जास्त असल्याने मुसलमानांच्या नवीन पिढीमध्ये अनेक स्वभाव दोष निर्माण झालेले आहेत. पुढील पिढीतून हे दोष नष्ट करावयाचे असल्यास नैतिक आणि भौतिक या दोन्ही शिक्षणामध्ये सुवर्ण संतुलन साधणे गरजेचे आहे. मात्र सध्यातरी हे संतुलन साधण्यात समाजाला सामुहिक अपयश आलेले आहे. बहुसंख्य मुस्लिम हे नैतिक शिक्षणापेक्षा भौतिक शिक्षणाकडे जास्त झुकलेले आहेत. त्याचे एकमेव कारण हे की, भौतिक शिक्षणातून रोजगार उपलब्ध होतो. याच शिक्षण प्रकाराबाबत अधिक भाष्य करण्याचा माझा मानस आहे.
    कोणत्याही कल्याणकारी लोकशाहीमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे सरकारी असणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आकार देतांना पंडित नेहरू आणि मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक सुरूवात ही चांगली करून दिली होती. आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विभागांची जबाबदारी त्यांनी सरकारवर टाकली होती. म्हणून गावोगावी सरकारी रूग्णालये आणि शाळा काढण्यात आल्या. त्यामुळे सर्व घटकांचा प्रचंड फायदा झाला. इतर मुलांबरोबर मुस्लिम समाजाची मुले ही या  शाळांमधून शिकू लागली. मात्र नंतर महाराष्ट्रात शिक्षणाच्या खाजगी करणाचा घाट घातला गेला व शिक्षण महाग झाले. खराबीची सुरूवात येथूनच झाली. या निर्णयामुळे राज्यातील गरीब विद्यार्थी दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या परिघाबाहेर आपोआप फेकले गेेले. मुस्लिम हा महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब घटक असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फटका याच घटकाला बसला.
    खाजगी शाळा यशस्वी व्हाव्यात म्हणून सरकारी शाळा ठरवून बकाल केल्या गेल्या. विविध कारणे पुढे करून त्यांचा निधी कापला गेला. त्यामुळे सरकारी शाळातून दर्जेदार शिक्षण मिळत नाही व  खाजगी शाळांमध्ये मुलांना पाठविण्याची ऐपत नाही अशा एका विचित्र शैक्षणिक चक्रव्युव्हात मुस्लिम समाज गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेला आहे. त्यातून मग सर्वाधिक गरीब गटातील मुले ही मदरशांकडे वळली गेली. सच्चर समितीच्या अहवालानुसार देशातील एकूण मुस्लिम समाजातील मुलांपैकी फक्त 4 टक्के मुलंच मदरशातून शिक्षण घेतात. उरलेले 96 टक्के हे सरकारी व खाजगी शाळातून शिकतात. त्यातही राज्यातील शालेय स्थितीत शाळा सोडण्याचे प्रमाण मुस्लिम विद्यार्थ्यांचेच अधिक आहे.
    एकीकडे अठरा विश्व दारिद्रय तर दुसरीकडे घरातील शैक्षणिक वातावरणाचा अभाव, तिसरीकडे शिक्षणाच्या महत्वासंबंधी नसलेली जाण, चौथीकडे सरकारी नोकऱ्यांमध्ये, केला जाणारा भेदभाव इत्यादी कारणांमुळे सामान्य मुस्लिम मुले मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचित रहात आहेत.
    त्यात पुन्हा पुरेशी पटसंख्या नाही व गुणवत्तेचा अभाव आहे या कारणांमुळे अलिकडेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील 1314 शाळा बंद केल्याचा सर्वाधिक फटका ही मुस्लिम विद्यार्थ्यांनाच बसलेला आहे. हा निर्णय सुद्धा सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाला सुसंगत असाच घेतला गेलेला आहे. सध्याच्या सरकारने कार्पोरेट (उद्योग) क्षेत्रास शाळा काढण्यास परवानगी देण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. यातून सरकारचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण निव्वळ व्यावसायीक झालेला आहे याची प्रचिती येते.
    आमदार, खासदारांचे पगार प्रचंड प्रमाणात वाढविणाऱ्या सरकारकडे शिक्षण क्षेत्राला देण्याकरिता मात्र पैसा नाही. म्हणून कार्पोरेट घराण्यांना आता या क्षेत्रामध्ये येण्याचे आवतन सरकारने नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेले आहे. कार्पोरेट घराणे आता या पवित्र क्षेत्राचा ’धंदा’ करतील याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचे काही कारण नाही. कारण की, सद्यस्थितीत महाराष्ट्रभर पसरलेल्या उच्च शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांमधून शैक्षणिक कारखानदारी कशी निर्माण झाली? त्यातूनच पुण्या-मुंबईमध्ये कशा पंचतारांकित शिक्षण संस्था निर्माण झाल्या? त्यात कुणाला प्रवेश मिळतो? कोण अस्पृष्य राहतो? हे उभ्या आडव्या महाराष्ट्राला माहित आहे. उच्च शिक्षणाच्या बाजारी करणाचे हे लोण आता शाळांपर्यंत झिरपणार म्हटल्यावर या शाळांमधून कुणाला शिक्षण मिळेल? कुणाला नाही? याची सहज कल्पना यावी.
    कोणत्याही भांडवलशाही देशात ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकूवत आहे त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू नये याची काळजी प्रत्येक सरकार घेत असते. तीच काळजी मागील काही वर्षापासून काँग्रेस आणि सध्याच्या भाजपच्या सरकारने पुरेपूर घेतलेली आहे. आजही अनेक तारांकित खाजगी शाळा आणि कॉन्वेंट अशी सुरू आहेत ज्यातून वर्षाकाठी लाखापेक्षा अधिक शुल्क घेऊन शिक्षण दिले जाते. पण हे शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने मुस्लिम या परिघाबाहेर आपोआप फेकले गेले आहेत.
    आता कोणी म्हणेल! घटना दुरूस्ती करून 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार 2002 सालीच बहाल करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने 2009 साली शिक्षण हक्क कायदाही मंजूर झाला आहे. मग गरिबांनी ओरडण्याचे काय कारण? तर या प्रश्‍नाचे उत्तर असे आहे की, ऍक्ट वेगळा असतो फॅक्ट वेगळी असते. हा कायदा जरी मंजूर झाला व सर्वशिक्षा अभियानावर कोटी-कोटींचा खर्च झाला तरी सामान्य घरातील मुलांना या कायद्याचा लाभ मिळू नये यासाठीच सरकारचे आजपावेतोचे धोरण राहिलेले आहे.
    सरकारनेे अगोदर कायम विना अनुदानित शाळा काढल्या. 2012 साली ’महाराष्ट्र स्वंय अर्थ सहाय्यित शाळा कायदा’ करून भविष्यात शाळांना सरकारी तिजोरीतून छदाम ही द्यावा लागार नाही याची पक्की व्यवस्था करून ठेवली. उद्योगपतींनी कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक करून शाळा काढाव्यात व त्यांच्याकडून अपेक्षा करावी की त्यांनी 6 ते 14 वयोगटातील गरीब मुलांना मोफत प्रवेश द्यावा. हा शुद्ध दांभिकपणा आहे. 2009 साली केल्या गेलेल्या शिक्षण हक्क कायद्याची किती प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे हे आपण सर्व जाणून आहोत.
    एकदा का कार्पोरेट क्षेत्राने शिक्षण व्यवस्थेवर कब्जा मिळविला की, अनुदानित शाळा बंद करण्याचा मार्ग मोकळा झालाच म्हणून समजा. मग टप्प्या टप्प्याने अनुदानित शाळा बंद पाडल्या जातील. शिक्षणाची सर्व सुत्रे कारखानदारांच्या हाती जातील व कारखानदार गुंतवणूकीच्या अनेक  पटीने उत्पन्न मिळाल्याशिवाय मुलांना प्रवेश देणार नाहीत. शाळांचीही ही स्थिती टोळनाक्यांसारखी होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. अशा शाळांमध्ये उद्योगपती ज्यांच्याकडून उत्पन्न मिळण्याची हमी असेल अशाच पालकांच्या पाल्यांना प्रवेश देतील. अशाने सामान्य मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी अशा शाळांची दारे बंदच राहतील, यातही शंका नाही.
    वास्तविक पाहता 1947 सालच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण कायदा व 2009 च्या शिक्षण हक्क कायद्यान्वये ही शैक्षणिक संस्थांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे बंधन राज्य सरकारवर आहे. म्हणूनच आजपर्यंत नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या मार्फतीने सरकारी शाळा चालविल्या जातात. खाजगी शाळांनाही राज्याच्या शिक्षण विभागामार्फत निधी दिला जातो. मात्र राज्य सरकारने आता ही जबाबदारी उद्योग क्षेत्रावर ढकलून स्वतःची त्यातून सुटका करून घेण्याचा चंग बांधलेला आहे, हे एव्हांना स्पष्ट झालेले आहे.
    घटनेच्या चौकटित राहूनही घटनाबाह्य काम कसे केले जाते? ह्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. भांडवलशाहीच्या मूळ नीति अनुसार स्वस्तात मजूरी करणारा एक शुद्र वर्ग कायम समाजात अत्यावश्यक असतो. हलकी कामे करायला शेवटी कोणता तरी वर्ग हवाच ना! मग आरोग्य सेवा व शिक्षण महाग केलं की हा शुद्र वर्ग गरीबांमधून आपोआपच तयार होतो. भारतात सर्वाधिक गरीब मुस्लिम समाज आहे. म्हणून या वर्गात मोठ्या संख्येने तेच येईल. आज ही रस्त्याच्या बाजूला बसून पंक्चर काढण्याच्या दुकानापासून भंगार गोळा करण्यापर्यंतची सर्व हलकी कामे हाच समाज करतोय. भविष्यात यात अधिक वाढ होईल. हे एक प्रकारचे चक्रव्यूव्ह आहे. यात सर्वच गरीब लोक अडकतील. गरीबांची संख्या मुस्लिमात जास्त आहे म्हणून ते या चक्रव्युव्हात मोठ्या प्रमाणात अडकतील. मग लाख मोलाचा प्रश्‍न हा आहे की,  हा चक्रव्युव्ह आपण कसा भेदू शकू?
कार्पोरेट शिक्षणाचे परिणाम...
    एकदा का कार्पोरेट क्षेत्राच्या हाती महाराष्ट्राच्या शिक्षणाची सुत्रे आली की लवकरच त्यातून अतीशय दर्जेदार शाळा निर्माण होतील व त्यातून कुशल विद्यार्थी बाहेर पडतील, यातही शंका नाही. परंतु, या कारखान्यारूपी शाळांमधून काही विजय माल्यापासून ते निरव मोदी सारखे राक्षसही बाहेर पडतील. काही मुत्रपिंड चोरणारे डॉक्टरही निघतील. भ्रष्ट अधिकारी निपजतील व देशाचे लचके तोडतील. शेतकऱ्यांना व गरीबांना लुबाडणारे राजकारणीही निघतील. कारण अशा शाळा फक्त भौतिक शिक्षण देऊ शकतात. त्या नैतिक शिक्षण देऊच शकत नाहीत. कारण ते त्यांच्या हातातच नाही. त्यांनी खरे नैतिक शिक्षण दिले तर त्यांचेच नुकसान होणार. दारू निर्मितीपासून ते चित्रपट  निर्मितीचे अनेक व्यवसाय बंद पडणार. ही संधी फक्त मुस्लिमांना आहे. कारण जगातील सर्वात दर्जेदार नैतिक शिक्षणाची संहिता म्हणजे कुरआन ही फक्त मुस्लिमांकडे आहे. अशावेळी एकीकडे कार्पोरेट शाळांमधून निघणाऱ्या अनितीमान विद्यार्थ्यांसमोर पर्याय म्हणून नीतिमान व त्यांच्याच तोडीचे भौतिक शिक्षण प्राप्त मुस्लिम तरूण जेव्हा निघतील तेव्हा ते खऱ्या अर्थाने देशाची सेवा करू शकतील. त्यानंतर एकवेळ अशी येईल की इतर धर्मीय विद्यार्थी ज्याप्रमाणे आज ख्रिश्‍चनांच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाण्यासाठी धडपडतात. उद्या अशा दर्जेदार मुस्लिमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी धडपडतील. पण त्यासाठी मराठी मुस्लिम समाजाच्या धुरिणांना कठिण तपश्‍चर्या करावी लागेल. शुद्ध त्यागाच्या भावनेतून महाराष्ट्रभर नैतिक व भौतिक दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेचे जाळे विणावे लागेल.  अशा संस्था स्वस्तात काढण्याचे कठिण आव्हान त्यांना पेलावे लागेल. त्यासाठी श्रीमंत मुस्लिमांना अर्थ त्याग करावा लागेल. आज जे आपल्या आजू बाजूस गल्लाभरू तथाकथित मुस्लिम शिक्षण सम्राट (?) गावोगावी काँग्रेस गवतासारखे फोफावलेले आहेत. त्यांना बाजूला सारून त्यागी, निस्वार्थी, श्रीमंत मुस्लिम व बुद्धीजीवींना पुढे यावे लागेल. प्रसिद्धीची आस न ठेवता लातूरला म़िजान नावाची एक्सीड पॅटर्नची शाळा काढून सुहैल काझी यांनी याची सुरूवात केलेली आहे. अशाच शाळा प्रत्येक ठिकाणी काढाव्या लागतील. तेव्हा कुठे मराठी मुस्लिम हे शैक्षणिक चक्रव्यूव्ह नुसते भेदणारच नाहीत तर शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व सुद्धा स्वतः होऊन त्यांच्याकडे चालून येईल.
    आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुस्लिम समाजातील श्रीमंत वर्ग आणि बुद्धीवादी लोक तसेच उलेमा जोपर्यंत एकत्र येऊन नैतिक व भौतिक शिक्षण देणाऱ्या दर्जेदार शाळा गावोगावी काढणार नाहीत तोपर्यंत हा समाज हे शैक्षणिक चक्रव्युव्ह भेदू शकणार नाही. आपल्या समाजाला मजूर वर्गातून काढून कौशल्यपूर्ण गुणवत्ताधारक समाजामध्ये रूपांतर करावयाचे असल्यास त्याची तयारी प्राथमिक शाळांपासून सुरू करावी लागेल. कारण प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हाच कुठल्याही समाजाचा पाया असतो. काही कारणाने सरकार जर शिक्षण देणार नसेल तर स्वतः समाजाला ती जबाबदारी पेलावी लागेल.
    मराठी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांनी एकत्रित येवून नैतिक व भौतिक शिक्षण देणाऱ्या शाळेची एक ब्ल्यू प्रिंट तयार करून ती महाराष्ट्रभर लागू केली व खाजगी शाळा काढल्या व त्यात कुरआनच्या शिक्षणाची इनबिल्ट व्यवस्था केली. तर इतर कारखानदारी शाळांपेक्षा उजवे विद्यार्थी या शाळांमधून निघतील. याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. नैतिक व भौतिक दृष्ट्या मजबूत विद्यार्थी हेच भविष्यातील भारताच्या पाठीचा कणा बनतील यातही शंका नाही. देशाला पाठीचा कणा प्रदान करण्याची क्षमता फक्त मुस्लिमांमध्ये आहे याची जाणीव मात्र आपल्यास यावयास हवी. त्यासाठी मुस्लिम मुलांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्य प्रदान करण्यासाठी कमी शुल्कात दर्जेदार शाळा त्याही मराठी आणि इंग्रजी माध्यमातून काढल्याशिवाय गत्यंतर नाही. अल्लाह याची समज आपल्या सर्वांना प्रदान करो व हे सरकारी चक्रव्युव्ह भेदण्याची आपल्या सर्वांना शक्ती प्रदान करो. (आमीन.)

पुणे (वकार अहमद अलीम) - सर्व धर्मीय महिलांवर होत असलेल्या अत्याचारासंबंधी केंद्र शासन तोंडात मिठाची गुळणी घेऊन मौन धारण करते. पण मुस्लिम महिलांवर मात्र सरकारची विशेष नजर आहे. पंतप्रधान म्हणतात, मुस्लिम स्त्रिया ”बिचाऱ्या” आहेत. आम्ही बिचाऱ्या नाहीत, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या शरिअतवर आम्ही अत्यंत खुश व समाधानी आहोत. म्हणून संसदेत प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी व तो रद्द करावा यासाठी दुपारच्या रखरखत्या उन्हाची पर्वा न करता आम्ही येथे जमलो आहोत. प्रचंड संख्येने जमलेल्या समस्त मुस्लिम भगिनींना धन्यवाद देऊन, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रत्येक कार्यक्रमास अशीच उपस्थिती दाखवून झोपेचे सोंग घेतलेल्या शासनास जागे करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या (रूक्न) डॉ. आस्मा जोहरा यांनी केले
    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आवाहानानुसर कुल जमाअती तंजीम पुणे यांच्या वतीने 10 मार्च रोजी  ’तहफ्फुजे शरियत’निमित्त महिलांची रॅली आयोजित केली गेली होती. रॅलीचा समारोप करताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या (रूक्न) डॉ. आस्मा जोहरा यांनी उपस्थित सुमारे 50 हजार मुस्लिम भगिनींसमोर प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्याचे पोस्टमार्टम केले. एम.डी.सह द्विपदवीधारक असलेल्या डॉ. आस्मा यांनी सांगितले की, तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडताना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी सांगितले होते की, या विधेयकाद्वारे मुस्लिम भगिनींना गुलामीतून बाहेर काढून त्यांना स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यांना सन्मान प्रदान करण्यात येईल. परंतु, सत्यस्थिती अशी आहे, साडे चौदाशे वर्षापूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित यांनी समस्त महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क व अधिकार बहाल केलेला आहे. स्त्री पुरूषांना समानता देणारा इस्लाम हा एकमेव धर्म आहे. इस्लामने स्त्रीयांना अर्थाजनापासून पूर्ण अलिप्त ठेवून अर्थाजनाची संपूर्ण जबाबदारी पुरूषांवर टाकली आहे. दरवर्षी 8 मार्चला महिला दिवस साजरा होतो. पण भारतात एका वर्षामध्ये 2 कोटी ’स्त्रि लिंग’ गर्भात मारून टाकले जातात. म्हणजेच दररोज 4 हजार 800 महिलांचा मुडदा पाडला जातो. लग्नात हुंडा, मानापमानाच्या नावाखाली 36 हजार 200 महिलांना जीवंत जाळण्यात आले. कौटुंबिक अत्याचाराच्या 41 टक्के महिला शिकार होतात. मुस्लिम समाजात केवळ तिहेरी तलाक हीच समस्या शिल्लक राहिली, असा समज करून दिला जात आहे. मुस्लिम महिलेला गुलामीत जखडून ठेवल्याचा गैरसमज पसरवून मुस्लिम पुरूषांनाही बदनाम केले जात आहे. पण आम्ही महिलांना खरेखुरे स्वातंत्र्य इस्लामने दिले आहे. तिहेरी तलाक विधेयकाद्वारे इस्लामिक शरिअतमध्ये बदल करण्याचा धूर्त डाव शासनाने टाकला आहे. इस्लामी शरिअतमध्ये कोणताही बदल आम्हाला मान्य नाही. संवैधानिक अधिकाराद्वारे आम्ही ते होऊ देणार नाही.यावेळी डॉ. आस्मा यांनी उपस्थित विराट जनसमुदायास आवाहन केले, हे विधेयक तुम्हास मंजूर आहे का? महिलांनी नाही म्हटले. विधेयकास विरोध करण्यासाठी हातवर करण्याचे आवाहन केल्यानंतर समस्त महिलांनी निषेधाचे प्रतिक म्हणून आपापले हात वर केले.

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
इक्बालांच्या काव्यातील राष्ट्रविषयक चिंतन,
सांस्कृतीक राष्ट्रवाद तथा  टागोर आणि मार्क्स
16डिसेंबर 1982 च्या टाईम्स ऑफ इंडीयाच्या अंकात इक्बालांनी 1920 साली एडवर्ड थामसन या आपल्या मित्राला एक पत्र लिहले होते. ते प्रकाशीत करण्यात आले आहे. त्यामध्ये इक्बाल म्हणतात, “ पाकिस्तान नावाच्या योजनेचा पुरस्कर्ता असे तुम्ही मला संबोधता, पाकिस्तान ही माझी योजना नाही. अलाहबादच्या अखिल भारतीय मुस्लीम लीगच्या वार्षिक अधिवेशनातील माझ्या भाषणात जी योजना मी सुचवली ती म्हणजे मुस्लीम बहुसंख्यांक प्रांतांची निर्मिती होय.  तो प्रांत नियोजित भारतीय संघराज्याचा भाग असला पाहिजे. ”इक्बालांचा राष्ट्रवाद हा विशुध्द स्वरुपाचा होता. त्यांनी मांडलेल्या राष्ट्रवादामध्ये पाश्तात्य  विचारवंताप्रमाणे मानव कल्याणाच्या जाणीवा होत्या. राष्ट्र आणि त्याच्या संस्कृतीचा अभिमान देखील त्यामध्ये होता. कारण राष्ट्र हि संकल्पना ठराविक भौगौलिक क्षेत्राच्या साम्य असणाऱ्या संस्कृतीच्या इतिहासातून निर्माण होते. त्या इतिहासातील इतिहास पुरुष हे त्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रेरणा देत असतात. त्यामुळे राष्ट्रवादामध्ये राष्ट्राच्या इतिहासाविषयीच्या अभिमानाला खूप महत्व आहे.
रविंद्रनाथ टागोरांच्या तुलनेत इक्बालांच्या साहित्यामध्ये राष्ट्रविषयक जाणिवा अधिक आहेत. इक्बालांनी भारतीय इतिहासपुरुषांविषयी प्रचंड असे लिखाण केले आहे. आपल्या काव्यप्रतिभेने इक्बालांनी भारतीय विचारवंतांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. वेगवेगळ्या धर्म पंथाच्या प्रमुखांविषयी त्याच्या संस्थापकांविषयी देखील इक्बालांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. इक्बालांच्या साहित्यात गौतम बुध्द, राम, गुरुनानक, चार्वाक, महाराणाप्रताप यांचे मोठे संदर्भ येतात. इक्बाल वसाहतवादाविरुध्द म्हणजे इंग्रजाविरुध्द संघर्ष केलेल्या 1857 च्या योध्द्यांविषयी कृतज्ञता प्रकट करतात. इंग्रजाविरोधातील लढ्यात शहादत पत्करलेल्या टिपू सुलतान यांच्याविषयी जावेदनामा मध्ये इक्बाल मोठ्या आत्मीयतेने लिहितात. टिंपूंची तुलना ते जगातील महान योध्यांशी करतात. इक्बाल इतिहासाला राष्ट्राची संस्कृती मानतात. पण इतिहासाला ते सांस्कृतीक संघर्षासाठीचे शस्त्र म्हणून पाहत नाहीत. उलट ते या देशातील बालकांना त्यांच्या संस्कृतीविषयीचा अभिमान शिकवतात. “हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत” या त्यांच्या कवितेत ते म्हणतात,
“ चिश्ती ने जिस जमीं में पैगामे हक सुनाया
नानक ने जिस चमन में वहदत का गीत गाया
तातारीयोंने जिसको अपना वतन बनाया
जिसने हजाजियों से दश्ते अरब छुडाया
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है। ”
चिश्ती पंरपरेतल्या सुफी संतानी पाखंडाच्या विरोधात सत्यधर्माच्या प्रसारासाठी ज्या भूमीची निवड केली ती पाक जमीन हीच आहे. नानकांनी एकेश्वरवादाचे गीत जिथे गायले ते चमन हेच आहे. तातारी योध्यांनी ज्याला आपले राष्ट्र मानले तो माझा देश, माझे वतन तेच आहे  ते इतके महान आहे की हजाजिंनी देखील याच्या प्रेमापोटी अरबस्तानाचा त्याग केला. देशाचा गौरव करताना इक्बाल याच काव्यात पुढे म्हणतात -
“ युनानियों को जिसने हैरान कर दिया था
सारे जहाँ को जिसने इल्मो हुनर दिया था
मिट्टी को जिसकी ह़क ने जर का असर दिया था
तुर्की का जिसने दामन हिरों से भर दिया था
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है।  ”
1947 मध्ये हिंदीच्या धर्मांध आग्रहापुढे भारतीय एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या उर्दूचा पराभव झाला नसता तर भारतीय बालकांना जाज्वल्य देशप्रमाची इक्बालची विचारधारा समजू शकली असती. खोट्या प्रतिकांचा गौरव करणाऱ्या गीतांऐवजी ते उज्वल देशाभिमानाची गीत गाऊ शकले असते. पण दुर्दैव इक्बाल आणि गालीबच्या  उर्दुचा ज्या देशात जन्म  झाला. त्या देशातून तिला विस्थापित होण्याची वेळ आली. हे सारं घडलं ते धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादातून. 
ज्या काळी सावरकरांपासून बकीमचंद्र चटर्जीपर्यंत सारेच भारतीय संघराज्याच्या राष्ट्रवादाला सांस्कृतीक अधिष्ठान देण्यात मश्गूल होते. त्या काळात इक्बाल संमिश्र राष्ट्रवादाचा आधार देऊ पाहत होते. एकिकडे बंकीचंद्र त्यांच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत हिंदू-मुस्लीम दंगलीचे चित्र रेखाटतात. त्यातील दंगलखोर आणि मुस्लीमांचे शिरकाण करणाऱ्या पात्रांच्या ओठी ‘ वंदे मातरम’ हे गीत घालातात. हा देश म्हणजे फक्त मुस्लीमेतरांची अधिसत्ता आहे असे निक्षून सांगतात. त्याच काळात इक्बाल देशनिष्ठेची व्याख्या करताना नानकांपासून गौतम बुध्दांपर्यंतच्या साऱ्या इतिहासपुरुषांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करतात. इक्बालांनी भारतीय समाजाच्या शोषणाचे मर्म देखील शोधून काढले.
इक्बालांच्या शायरीतील सत्यशोधकी परंपरा आणि राष्ट्रनिष्ठा वेगळी आहे. इक्बालांनी ज्या प्रमाणे कांट, नित्शे, डंकेन या पाश्‍चात्य विचारवंताशी वाद घातला. त्यांचे समर्थन केले. त्यापध्दतीने त्यांनी समकालीन काही प्रादेशिक अब्राम्हणी चळवळींचा अभ्यास केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इक्बालांच्या काळातच 1910 ते 1930 च्या दरम्यान भारतात अनेक समाज सुधारणावादी चळवळी मोठ्या धडाक्यात सुरु होत्या. तामिळनाडूतील द्रविड चळवळ, बंगालातील समता चळवळ, महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळ त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. याच काळात इक्बालांनी लिहिलेल्या अनेक कवितांमध्ये त्यांनी बहुजनांचे आणि इतल्या मुलनिवासी समाजाचे ब्राम्हणांकडून केल्या गेल्या शोषणाविषयी लिखाण केले. इक्बालांची एक कविता ब्राम्हणांना उद्देशून लिहलेली आहे. “ नया शिवाला ” हे त्याचे शिर्षक. त्यात इक्बाल म्हणतात-
“ सच कह दूं ऐ ब्रम्हण । गर तू बुरा न माने
तरे सनम कदों के बुत हो गए पुराने
अपनों से बैर रखना तूने बुतों से सिखा ”
ब्राम्हणांनी माणसा-माणसात भेद केला. त्यांच्या अहंकारांमुळे भारतीय समाजातील कित्येक वर्गांना पशू पेक्षा हीन जिणे जगावे लागले. त्यांच्या या कृत्याचा समाचार घेताना इक्बाल त्यांना म्हणतात ‘ तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुला सांगतो की तुमच्या प्रिय व्यक्तींच्या देवता आता जुन्या झाल्या आहेत. यांच्यापासूनच तू भेद करणे शिकला आहेस. त्यांच्यामूळेच आपल्या लोकांपासून भेद करण्याचा बोध तुला मिळाला आहे.’ मराठीतल्या केशवसूती प्रवृत्तीचे मुर्तीभंजक विचार यामध्ये आहेत. पण त्याला नुसता काव्यात्म प्रेरणा नाहीत. त्यामागे सामाजिक प्रेरणा आहेत. कविता रचून इक्बाल कधी थांबले नाहीत. आपल्या शायरीच्या माध्यमातून समाजक्रांतीचा अंगार त्यांना पेटवायचा होता. दुर्दैवाने शायर इक्बाल, कवी इक्बाल आणि धर्मचिंतक इक्बालवर आपण जितके संशोधक केले तितके संशोधन समाजसुधारक आणि समाजसेवक इक्बालांवर होऊ शकले नाही. त्यामुळेच इक्बालांचे साहित्य प्रकाशात आले तरी त्यांच्या सामाजिक प्रेरणा मात्र दुर्लक्षित राहील्या. एकिकडे इक्बाल ब्राम्हणकृत शोषणाची मिमांसा करतात. तर दुसरीकडे एकेश्वरवादी समाजचिंतकांचा गौरव करतात.
इक्बाल देवतांचे अवडंबर नाकारून एकेश्वरवादाचा प्रसार करणाऱ्या विचारवंतांचा गौरव करताना कृतज्ञता व्यक्त करतात. भारतातील जितक्या वैदीक विरोधी अब्राम्हणी चळवळी झाल्या त्यांनी गौतम बुध्दांना प्रेरणा पुरुष मानले. गौतम बुध्दांसारखा महान धर्मचिंतक, समाजचिंतक भारतात होउन गेला याचे इक्बालांना अभिमान वाटायचे.  इक्बाल बुध्दांविषयी म्हणतात,
“ कौमने पैगामे गौतम की जरा परवाह न की
कद्र पहचानी न अपने गौहरे यकदानां की ”
भारतीयांना गौतम बुध्दांचा विसर पडला त्यामूळेच भारतभूमी शुद्रांच्या दुःखाचे आगार बनली असल्याचेही इक्बालांनी म्हटले आहे, इक्बाल म्हणतात,
“ आह । शुद्दर के लिए हिंदौस्तां गमखाना है
दर्द इन्सानी से इस बस्ती का दिल बेगाना है ”
शुद्रांविषयी आत्मीयता प्रकट केल्यानंतर इक्बाल पुन्हा ब्राम्हणांच्या अहंकारावर आघात करतात, इक्बालांच्या कवितेतील या ओळी खूप मार्मिक आहेत.
“ बरहमन सरशार है अबतक मये पिंदार में
शमे गौतम जल रही है महफिले अयार में ”
ब्राम्हण अजूनही आपल्या अहंकारात मस्त आहेत. त्यामुळेच भारतीयांनी प्रज्वलीत केलेला गौतम नावाचा दिवा परक्यांच्या मैफीलीत जळतोय. गौतम बुध्दांनी उठवलेला न्यायाचा अवाज न ऐकता आपण गाफील राहिल्याचे इक्बाल सांगतात
“ आह। बदकिस्मत रहे आवाजे हक से बेखबर
गाफिल अपने फल की शीरीनी से होता है”
  अशा वेदना प्रकट करुन इक्बाल पुन्हा गुरु नानकांच्या समतावादाने आशावादी होतात. नानक या कवितेत ते म्हणतात,
“ फिर उठी सदा तौहीद की पंजाब से
हिंद को इक मर्दे कामिल ने जगाया ख्वाब से  ”
इक्बालांच्या काव्यात अशा अनेक राष्ट्रीय प्रतिकांचा गौरव होतो. इतिहासाचा अभिमान प्रकट केला जातो. पण त्या तुलनेत सावरकरांपासून टागोरांपर्यंत समकालीनांनी  गौतम बुध्दांपासून शिवाजी महाराजांपर्यंत या सर्व इतिहासपुरुषांवर अन्यायच केला. सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय ठरवून नाकारले. तर गौतम बुध्दांच्या बौध्द चळवळीला संपवणाऱ्या पुष्यमित्रशुंगाचा सावरकरांनी भारतीय इतिहासातील सोनेरी पान म्हणून गौरविले. भारतीयांच्या दुर्दैवाने भारतीय इतिहास प्रतिकांना नाकारणारे आज भारताच्या स्वाभिमानाचा तर भारतीय प्रतिकांना गौरवणारे इक्बाल निंदेचा विषय ठरले आहेत. 
इक्बालांच्या साहित्यात मानवकल्याणाची निष्ठा आहे. इक्बालांच्या साहित्यात गरीबांविषयीची कणव आहे. इक्बाल सामान्यांना विकसित करु पाहतात. इक्बाल त्यामुळेच गौतम बुध्दापासून चार्वाकापर्यंत सर्वांचा गौरव करतात. याच मानवकल्याणाच्या तडफेसाठी ते कार्ल मार्क्सच्या समाजावादी मुल्यांचादेखील गौरव करतात. त्याच्या नास्तिकतेला नाकारून इक्बाल मार्क्ससीझममधल्या इस्लामिक प्रेरणांचा शोध घेतात.
मार्क्स आणि इक्बालचा शिकवा, कुफ्र नाही, तर दुःखाचा शोध
मार्क्सने जगातील दुःखाचा शोध घेतला. त्याची कारणे धुंडाळली. समाजात दुःख पसरवणारे स्त्रोत त्याने निश्‍चीत केले. शोषणातून दुःखाची निर्मिती होते. हे त्याने ताडले. त्यासाठी धर्म ही व्यवस्था जबाबदार नाही. हे देखील त्याने मान्य केले. पण सामान्यांच्या कल्याणासाठी असलेली धर्म नावाची व्यवस्था, शोषकांच्या मक्तेदारीत अडकल्याचे त्याच्या नजरेने हेरले. मार्क्सची प्रवृत्ती बंडखोराची होती. त्यामुळे तो या धर्ममुखंडांविरोधात उभा राहीला. म्हणून इश्वर आणि माणूस यांच्यातील ‘दलाल’ व्यवस्थेला सुरुंग लागले. मग मार्क्स हा धर्मविच्छेदक असल्याचा प्रचार धर्ममुखंडांनी सुरु केला. तो आजतागायत सुरु आहे. पण मार्क्स इतके धर्माचे कौतूक कोणीच केले नाही. धर्म चांगला असेल. तर त्यातून ऐहीक कल्याण साध्य होतं. या धर्ममुल्यावर त्याची निष्ठा नव्हती काय? धर्म व्यवस्थेवर मळभ दाटलं. त्यामुळे धर्म व्यवस्थीत पणे कार्यरत होत नाही. हा मार्क्सचा शिकवा (गर्‍हाणे) होता. त्यामुळे त्याने हा शिकवा समाजासमोर मांडला. दास कापिटल म्हणजे मार्क्सच्या गार्‍हाण्याचा संग्रह. म्हणजे शिकवा.
इक्बालांनी देखील शिकवा मांडला. इक्बालांचा ‘जावेदनामा’ आणि ‘असरारे खुदी’ काय आहेत ? इक्बालांनी लिहलेली ‘शिकवा’ नावाची कविता हा त्यांचा शिकवा नाहीये. ती त्यांची काव्य प्रतिभा आहे. पण त्यांचा अस्सल शिकवा हा त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात शब्दांकीत झालाय. धर्म नावाची उदात्त व्यवस्था कार्यान्वीत करणारे सर्वोत्तम प्रेषित येउन गेले. पण त्यांच्या विचारांना ग्रंथात बंदीस्त करुन आम्ही त्या प्रेषितांनाही पराभूत करतोय का? हे प्रश्न इक्बालांच्या विचारांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केले. इक्बालांनी मांडलेला इस्लाम तोच होता. जो प्रेषित सल्ल. यांंनी मांडलेला होता. इक्बालांनी सांगितलेली व्यवस्था देखील तीच होती. जी कुरआनने सांगितली होती.  त्याचा भौतीकतावाद इक्बालांनी इस्लामीझमच्या केलेल्या व्याख्येशी मेळ खाणारा नव्हता काय? (क्रमशः) 
(लेखक इतिहास संशोधक असून टिप सुलतान, इक्बाल इत्यादी इतिहासातील व्यक्तिमत्वांवर संशोधन करून ते त्यांचे विचार व्यक्त करतात) (भाग-2)

अंधेरो में शमा जलाए रखना, सुबह होगी जरूर माहोल बनाए रखना
एम.आया.शेख
9764000737
इस्लाम धर्म (मजहब) म्हणून सर्वांना स्विकार आहे मात्र एक व्यवस्था (दीन) म्हणून बहुतेक लोकांना स्विकार नाही. कित्येक मुस्लिमांना सुद्धा नाही. धार्मिक विधी, इबादतींसाठी मुस्लिम लाखोंच्या संख्येने एकत्रित येतात, कोट्यावधींचा खर्च करतात. मात्र प्रतक्षात जीवनात इस्लामी तत्त्वांना लागू करण्याचा आग्रह केला की पहिल्यांदा स्वतः मुस्लिमांमधूनच त्याचा विरोध सुरू होतो. फक्त धार्मिक विधींपुरता, व्यवस्थाशुन्य इस्लाम खरा इस्लाम नाही. असा इस्लाम खऱ्या इस्लामच्या  छायाचित्रासारखा आहे. सुंदर, देखणा, चमकदार मात्र निर्जीव. मौलाना अबुल आला मौदूदी यांनी 1941 साली जमाअते इस्लामीची स्थापना करतांना खऱ्या-खुऱ्या जीवंत इस्लामचा आग्रह धरला होता. त्यांच्या मते सकृतदर्शनी मुस्लिमासारखे दिसण्यापेक्षा खरे मुस्लिम असणे जास्त महत्वपूर्ण आहे. फार कमी लोकांनी त्यांच्या या संदेशाकडे लक्ष दिले. याचा अर्थ सकृतदर्शनी मुस्लिम दिसणे यास त्यांचा विरोध होता असे नाही. 
इस्लाम, कायद्याचा वापर करून समाजाचे नियमन करण्यापेक्षा अख्लाक (चांगल्या सवई) चा वापर करून समाजाचे नियमन करण्याला अधिक महत्व देतो. त्यासाठी समाजामध्ये पावित्र्य राखणे गरजेचे असते. म्हणूनच इस्लाममध्ये इबादतींची व्यवस्था केलेली आहे. सामाजिक बांधिलकी मजबूत व्हावी व एकोपा रहावा यासाठी लग्न आणि तलाक सुलभ करण्यात आलेले आहेत. मुस्लिमांनी अल्लाहच्या या दयेचा दुरूपयोग असा केला की लग्न महाग करून टाकलेली आहेत व एका दमात तीन तलाकचा दुरूपयोग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. मागील काही महिन्यात झालेल्या प्रबोधनामुळे तीन तलाकच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. 
या विषयावर मागील काही महिन्यामध्ये इतके लिहिले आणि बोलले गेलेले आहे की, आता देशाच्या सर्वधर्मीय शालेय विद्यार्थ्यांनाही कळून चुकले आहे की तीन तलाकची व्यवस्था कुरआनमध्ये नाही. तोंडी तलाकच्या व्यवस्थेचा मुस्लिम पुरूषांनी दुरूपयोग केल्याने तीन तलाकचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे. राज्यसभेत या संबंधीचे बिल प्रलंबित आहे. 
तीन तलाक हा महिलांवर अन्याय आहे हे माहित असूनसुद्धा कित्येक पुरूषांनी मुक्तपणे त्याचा दुरूपयोग केला. एका दमात तीन तलाक दिल्याने देशातील अनेक महिलांना त्याचा फटका बसला. सततचा अन्याय सहन न झाल्याने मुस्लिम महिला जेंव्हा सर्वोच्च न्यायालयात गेल्या तेंव्हा सुद्धा कोर्टात आपली बाजू मांडण्यात मुस्लिमांना फारसे यश आले नाही. तीन तलाक भविष्यात कसे रोखणार? या संबंधीची ठोस योजना कोर्टासमोर मांडण्याचा एकीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड प्रयत्न करत असताना दूसरीकडे मात्र अनेक वर्तमानपत्रातून व वाहिन्यांमधून कोर्टात आलेल्या महिला कशा धर्मभ्रष्ट आहेत. इथपासून तर त्यातील काही वाईट चारित्र्याच्या कशा आहेत. हे सांगण्याकडेच बहुतेकांचे लक्ष होते. 
      या सर्व गुंतागुंतीचा फायदा भाजपाने उचलला नसता तरच नवलं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिवार तलाकवर प्रतिबंध घालण्याच्या निर्णयाचा आधार घेत तात्काळ एक बिल लोकसभेत मंजूर करून घेतले.
प्रास्तावित कायदा कसा आहे? 
मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेजेस असे या कायद्याला नाव देण्यात आले असून यात खालील गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. 
अ) जर पतीने एका दमात तीन तलाक जरी दिला तरी तो लागू होणार नाही. 
ब) असे असले तरी असे करणाऱ्याला दोष सिद्धी नंतर तीन वर्षापर्यंत कैदेची शिक्षा व दंड होईल. 
क) आकारलेला दंड तलाक पीडितेकडे न जाता शासनाच्या तिजोरीत जाईल. 
ड) मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तलाक पीडितेवर राहील. खर्च मात्र पतीला द्यावा लागेल. सरकार यात काहीच मदद करणार नाही. एकंदरित हा कायदा मुस्लिम महिलांवर अन्याय करणारच आहे असे नाही तर हा मुस्लिमांच्या शरियतमध्ये सरळ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून असंवैधानिक आहे. अनुच्छेद 25 धर्म स्वतंत्र्याचा अधिकाराचा संकोच करणारा आहे.
तलाक पीडित महिलांची स्थिती
मुस्लिम समाजामध्ये स्त्रीचे स्थान प्रामुख्याने गृह केंद्रित आहे. इस्लामने स्त्रीसाठी घर चालविण्याचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. म्हणून समाजाचा कल आपल्या मुलींना गृहकर्तव्यदक्ष बनविण्याकडे असतो. शिवाय उच्च सहशिक्षणातून निर्माण होणारी गुंतागुंत टाळावी व मुलींचे लग्न वेळेवर लावून द्यावे, ही परंपरा असल्यामुळे मुस्लिम मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलींची तीन तलाक नंतर बिकट अवस्था होऊन जाते. उच्च शिक्षण नसल्याने तलाकनंतर उच्च दर्जाचं काम मिळत नाही. लोकांची धुनी-भांडी करून आपले व आपल्या चिमुकल्यांचे पोट भरण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिवाय निकृष्ट अन्न, रक्ताशय, कमी हिमोग्लोबीन, लैंगिक शोषणांची संभावना, मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था यामुळे उद्भवणाऱ्या भिषण परिस्थितीच्या चक्रात या दुर्देवी महिला व त्यांची मुले कायमची अडकून पडतात. 
समाजात अशा काही महिला नेहमीच असतात की त्यांना काम केल्याशिवाय गत्यांतर नसते. तलाक पीडित महिलांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचे लग्न झाले नसताना ज्यांच्यावर होती त्यांच्यावरच पुन्हा येते. परंतु, काही कारणाने ते ती जबाबदारी पेलू शकत नसतील तर सरकारनी अशा महिलांसाठी सन्मानाने जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा. ही कुठल्याही कल्याणकारी सरकारची जबाबदारी आहे. 
निरूपयोगी श्रीमंत मुस्लिम
जेव्हा सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही तेव्हा मुस्लिम समाजतील श्रीमंत तसेच बुद्धीवादी आणि उलेमा या सर्वांनी ती जबाबदारी स्विकारायला हवी. मात्र मुस्लिमांच्या या जबाबदार गटाने कधीच त्रिवार तलाक होऊ नये म्हणून गंभीर पावले उचलेली नाहीत किंवा तरूण तलाकपीडित गरजू महिलांच्या मदतीसाठी  कुठलीही ठोस व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. 
अलिकडे उलेमांच्या पुढाकाराने तीन तलाकच्या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात देशभरात हजारो महिलांचे मोर्चे  निघत आहेत. ज्या मुस्लिम पुरूषांनी त्यांच्यावर अन्याय केला म्हणून त्या कोर्टात गेल्या त्याच निर्णयावर आधारित कायद्याच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी त्यांच्यावर आली. किती हा दैवदुर्विलास? त्यात पुन्हा तेच लोक मोर्चासाठी त्यांना प्रेरित करीत आहेत ज्यांनी तीन तलाक दिले जात असतांना गप्प बसनेे पसंत केले होते. अशा या दुष्ट चक्रात मुस्लिम महिला या अडकलेल्या आहेत. एक तर आपल्या मुलींना पवित्र गाय बनवून ठेवावे व तीन तलाक झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे हा काही मुस्लिम पुरूषांचा ढोंगीपणा आता संपावयास हवा. 
मोर्चे काढून फारसे कांही साध्य होत नाही. महाराष्ट्रात आरक्षणासाठी मुस्लिमांनी लाखोंचे मोर्चे काढले. त्यांचे काय झाले? हा इतिहास जुना नाही. तरी मोर्चे, धरणे, प्रदर्शन आदी लोकशाही आयुधे वापरून हा कायदा मंजूर होणार नाही यासाठी यथासंभव प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. सरकारच्या मनोधैर्यावर जरी त्याचा परिणाम झाला नाही तरी समाजाच्या मनोधैर्यावर या मोर्चाचा चांगला परिणाम होईल यात शंका नाही.आता जेव्हा सरकारने हा कायदा आणण्याचा निर्णय केलेलाच आहे. राज्यसभेतही भाजपचे बहुमत होत आलेले आहे. म्हणून हा कायदा आज न उद्या मंजूर होईल याचीच शक्यता जास्त आहे. हा कायदा मंजूर होणार अशी शक्यता गृहित धरूणच मुस्लिम समाजाने पुढचे धोरण आखले पाहिजे. 
पुढचे संभाव्य धोरण
1) सरकार मदत करणार नाही याची मनाशी पक्की खुनगाठ बांधून वार्षिक जकातीमधून अशा महिलांना पुरेल असा निधी प्रत्येक शहरात राखून ठेवावा व त्याचे न्याय वितरण होईल यासाठी सज्जनांची समिती नेमावी. 
2) अशा महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी अनुकूल असे वातावरण समाजात जाणून बुजून तयार करावे व अशा महिलांना पुनर्विवाहसाठी प्रोत्साहन द्यावे. 
3) तीन तलाक किती भयंकर परिणाम करतो यासाठी जनजागृती करावी. 
4) ज्यांची लग्न होऊ घातलेली आहेत अशा तरूणांसाठी लग्नपूर्वी समुपेदशनांसाठी प्रत्येक शहरामधील एखाद्या दारूल उलूममध्ये, दारूल इस्लाह (सुधारणा केंद्र) सुरू करावे व तेथे त्यांना पती-पत्नींचे शरई अधिकार आणि कर्तव्य तसेच तीन तलाकमुळे होणारे सामाजिक नुकसान इत्यादींबाबत त्यांना एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्याखेरीज त्यांचा निकाह लावला जाणार नाही असे काझींनी घोषित करावे.  5) शिवाय, नवीन लग्न होवून आलेल्या सुनेला कसे नांदवावे, यासंबंधी प्रौढांचेही समुपदेशन आवश्यक असल्यास करण्याची व्यवस्था दारूल इस्लाहमध्ये करण्यात यावी.  
6) तरूण मुलींनाही याच पद्धतीचे समुपदेशन देण्यासाठी तज्ञ व अनुभवी महिलांचे समुपदेशकांमार्फतीने दारूल इस्लाहमध्ये व्यवस्था करावी व लग्नानंतर सासरी कसे वागावे ज्यामुळे तीन तलाक पर्यंत प्रकरण पोहोचणार नाही, या संबंधीची त्यांची बौद्धिक तयारी करवून घ्यावी.
एवढे सगळे उपाय करून ही एखाद्याने तीन तलाक दिलाच तर त्याने दिलेला तीन तलाक असाधरण परिस्थितीत दिला गेलेला व योग्य होता का याची छाननी उलेमा व वकीलांच्या समितीने करावी व कारण योग्य नसेल तर त्याचा पुनर्विवाह सहजा सहजी होणार नाही यासाठी समाजाने एकत्रित रित्या योग्य ती पावले उचलावीत.
हा कायदा तलाक पीडित महिलांवर कसा अन्याय करणारा आहे. हे आता आपण पाहूया - 
1) पतीला तुरूंगामध्ये पाठवून सुद्धा लग्न मोडले जाणार नसल्याने कोण पती तुरूंगातून परत येऊन त्याच पत्नीशी पुन्हा संसार करील? 
2) पती तुरूंगात असतांना मुलांच्या सांभाळाची जबाबदारी गृहिणी असलेली तलाक पीडित महिला कशा पेलू शकतील? 
3) शिक्षेच्या भीतीने मुस्लिम पतीसुद्धा गुजरात पॅटर्न प्रमाणे तलाक न देता पत्नीला वाऱ्यावर सोडून देतील व आज अस्तित्वात नसलेला परित्याक्त्या महिलांचा एक नवा वर्ग मुस्लिम समाजात निर्माण होईल. त्यातून परत नवीन समस्या निर्माण होतील. 
4) या कायद्याचा पुढील टप्पा इस्लाममधील तोंडी तलाकच्या पद्धतीचेच समुळ उच्चाटन करणे आहे. याचा अंदाज या कायद्यातील ’तलाक’ या शब्दाच्या व्याख्येवरून येतो. दुर्देवाने तसे झाल्यास मुस्लिम महिलांच्या आत्महत्याचे किंवा त्यांच्या हत्येंचे प्रमाण भविष्यात वाढेल. अशी सार्थ भीती वाटते.
इस्लाममध्ये तोंडी तलाक देण्याची सुलभ व्यवस्था असल्याने ही अल्लाहची एका प्रकारची कृपाच आहे. सुलभ तलाक मिळाल्याने तलाक झालेल्या महिला स्वतःच्या हिमतीवर किमान जीवंत तरी राहू शकतात. तोंडी तलाकची व्यवस्था नष्ट झाल्यास त्यांना जीवंत राहणे देखील कठीण होऊन जाईल. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाला या महिलांकडे सहानुभूतीने पाहण्याची नव्हे तर सहकार्य करण्याची गरज आहे. हे जेव्हा उमजेल तोच सु दीन. समाज एकसंघ ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवावी लागते हे मान्य. परंतु, कुटुंबाचा पाठीचा कणा असलेल्या स्त्रीला असे एका दमात तीन तलाक देवून वाऱ्यावर सोडून देणे जितके वाईट तितकेच या प्रस्तावित कायद्याच्या भितीने त्यांचा परित्याग करणे सुद्धा वाईट. म्हणून आता आळस झटकून कामाला लागण्याची वेळ येवून ठेपलेली आहे. आपल्या विवाहित मुलींना/सुनेला शक्यतो तलाक दिलाच जाणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. अल्लाहला हलाल गोष्टींमध्ये तलाक सर्वात अप्रीय गोष्ट आहे याचे भान सर्वांनी ठेवायला हवा. 
आपल्या मुलींना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची सामुहिक जबाबदारी माझी, तुमची आणि सर्व मुस्लिम समाजाची आहे. अधिच भरपूर उशीर झालेला आहे अजून उशीर केला तर याचे दुष्परिणाम एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील याची सर्वांनी खात्री बाळगावी. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की आपल्या सर्वांना या प्रश्नाला भिडण्याची शक्ती मिळो व खरे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याची ही संधी आपल्यालाल चालून आलेली आहे अल्लाह करो या संधीचे सोने करण्याची सर्वांना सद्बुद्धी मिळो.(आमीन.)

सीमा देशपांडे - 7798981535
ईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून  त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे  पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने  त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले  तुमचा स्वामी कोण आहे?  सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले  निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात.   व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर  शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही  मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .
जेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित  होवुन जाते. जेव्हा की  हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते? कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास  ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच,  सर्वात भयानक म्हणजे  ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व  त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची  उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची? असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत? 
त्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा.  नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय? खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय? मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे  परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्‍लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय? 
तुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित? काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी.  एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा? अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा? काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा? पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे  ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्‍चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु!)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)
माननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,
मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.
माननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.
तिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.
त्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.)! अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?’’
तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)
स्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या 
संकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.
विश्वास
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)

(२७६) अल्लाह व्याजाचा ऱ्हास करतो आणि दान-धर्माची वाढ करतो३२० आणि अल्लाह कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही.३२१
(२७७) होय, जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, नि:संशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दु:खाचा प्रसंग नाही.३२२
(२७८) हे ईमानधारकांनो, अल्लाहचे भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या, जर खरोखर तुम्ही ईमानधारक असाल.
(२७९) परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे.३२३ अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील.


३२०) या आयतमध्ये एक असे सत्य वर्णन करण्यात आले आहे जे नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने पूर्ण सत्य आहे. व्याजाने संपत्ती वाढते असेच दिसते आणि दान-पुण्याने संपत्ती घटते असे दिसून येते. परंतु सत्य हे आहे की मामला याविरुद्ध आहे. अल्लाहचा नैसर्गिक नियम हाच आहे की व्याज नैतिक, आध्यात्मिक तसेच आर्थिक व सांस्कृतिक प्रगती करण्यात अडथळाच बनून राहात नाही तर या सर्वांच्या पतनाचे कारण बनते. या विपरीत दान-पुण्याने (ज्यात कर्जे हसना (उत्तम कर्जसुद्धा सामील आहे) नैतिकता, आध्यात्मिकता, संस्कृती आणि आर्थिक स्थिती इ. सर्व विकसित होत जातात.
३२१) स्पष्टत: व्याजावर पैसा तोच व्यक्ती लावतो ज्याला गरजेपेक्षा जास्त मिळाले आहे. हा गरजेपेक्षा जास्त हिस्सा जो त्या व्यक्तीला मिळतो ती कुरआनच्या दृष्टीने अल्लाहची कृपा आहे. अल्लाहच्या कृपेची खरी कृतज्ञता व्यःत करणे म्हणजे अल्लाहने जशी त्याच्यावर कृपा केली त्याचप्रमाणे त्याने अल्लाहच्या इतर गरजवंत दासांवर मेहरबानी करावी. तो जर असे करत नसेल परंतु याविरुद्ध अल्लाहच्या कृपेला या उद्देशासाठी वापरतो, की त्या कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या त्यांच्या अल्पशा हिश्यातून आपल्या पैशाच्या जोरावर काही भाग हडप करत असतो तर असा मनुष्य खरे तर अल्लाहचा कृतघ्न आहे, तसेच अन्यायी, अत्याचारी आणि दुष्‌कर्मसुद्धा आहे.
३२२) या आयती (नं. २७३ ते २८१) मध्ये अल्लाहने पुन्हा पुन्हा दोन प्रकारच्या चारित्र्याला डोळ्यांपुढे ठेवले आहे. एक चारित्र्य स्वार्थ, लोभी आणि कृपण शायलॉकवृत्ती मनुष्याचे आहे. अशी व्यक्ती अल्लाह आणि दासांच्या हक्कांशी बेपर्वा बनतो. तो तर फक्त रुपये पैसे मोजण्यात आणि मोजून मोजून संभाळून ठेवण्यातच आणि संपत्ती वाढविण्यातच आपले आयुष्य वेचतो. दुसरे चारि्त्र्य एकेश्वरवादी, दानशूर आणि मानवतेचे भले करणाराचे चारित्रय आहे. तो अल्लाह आणि अल्लाहच्या त्या दासांच्या हक्कांविषयी जागरूक असतो. आपल्या कष्टाने कमवितो, स्वत: खातो आणि दुसऱ्यांना खाऊ घालतो; तसेच मन:पूर्वक भलाईच्या कामात खर्च करतो. पहिल्या प्रकारचे चारित्रय अल्लाहला अति अप्रिय आहे. जगात या चारित्र्याने भले समाज निर्माण न होता बिघाड निर्माण होतो आणि परलोकात अशा चारित्र्याच्या व्यक्तीसाठी दु:ख, परेशानी, पीडा व कष्टच आहे, याविरुद्ध अल्लाहला दुसऱ्या प्रकारचे चारित्रय अतिप्रिय आहे. यामुळेच जगात भल्या समाजाची घडण होते आणि परलोक सफलता यावरच आधारित आहे.
३२३) ही आयत मक्का विजयानंतर अवतरित झाली होती तेव्‌हा अरबस्थान इस्लामी शासनाच्या पूर्ण आधीन होते. यापूर्व व्याज एक अप्रिय वस्तू समजली जात होती. परंतु कायद्याने त्यावर बंदी घातली गेली नव्‌हती. ही आयत अवतरित झाल्यानंतर इस्लामी राज्याच्या सीमेत व्याजबट्ट्याचा व्यवहार फौजदारी गुन्हा बनला. अरबांच्या ज्या टोळया व्याज खात होत्या त्यांच्याकडे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले वसुली अधिकारी पाठवून त्यांना तंबी दिली की त्यांनी व्याजबट्ट्याच्या व्यवहारापासून दूर राहावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले जाईल. आयतच्या अंतिम शब्दांनुसार इब्ने अब्बास, हसन बसरी, इब्‌ने सरीन आणि रूबैअ बिन अनस यांच्या मते जो मनुष्य इस्लामी राज्यात व्याज खाईल त्याला क्षमा-याचना (तौबा) करण्यास भाग पाडावे आणि मान्य केले नाही तर त्याला ठार करावे. दुसऱ्या   फिकाहशास्त्रींच्या  (फुकाह)  मते  अशा   व्यक्तीला   कैद   करणे   पुरेसे   आहे.  जोपर्यंत  तो व्याजबट्ट्यांचा व्यवहार बंद करण्याचे सोडत नाही, तोपर्यंत त्याला तुरुगांतून सोडले जाऊ शकत नाही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget