Halloween Costume ideas 2015
February 2018

    माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा रात्री झोपण्यासाठी पहुडतात तेव्हा आपला हात गालाच्या खाली ठेवत आणि म्हणत, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या नामाबरोबर मरतो आणि जिवंत होतो.’’ आणि जेव्हा जागे होतात तेव्हा म्हणतात, ‘‘अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतो की त्याने आम्हाला जिवंत केले मृत्यू दिल्यानंतर आणि आम्हाला पुन्हा जीवन व्यतीत करून त्याच्यापाशी जायचे आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जेव्हा मनुष्याच्या मनात पारलौकिक जीवनाची ‘चिंता’ घर करते तेव्हा झोपताना त्याची स्थिती अशी होते की तो अल्लाहचे नामस्मरण करतो आणि म्हणतो की अल्लाहचे नाव माझ्याबरोबर निरंतर राहावे, मरतानादेखील आणि जीवनातदेखील, झोपतानाही आणि झोपून उठल्यानंतरही. जेव्हा झोपून उठतो तेव्हा अल्लाहचे आभार व्यक्त करतो की त्याने जीवन व्यतीत करण्यासाठी आणखी मुदत दिली, जर काल माझ्या हातून एखादी चूक घडली असेल तर तशी आज माझ्या हातून चूक घडता कामा नये आणि या एक दिवसाच्या मिळालेल्या कालखंडाचा लाभ उठविला पाहिजे.
    अशी अवस्था त्याची प्रत्येक दिवशी होत असते. जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याला परलोक आणि त्याचा हिशोब आठवतो की मला एक दिवस मरण येणार आहे आणि मग जिवंत होऊन हिशोबासाठी पालनकत्र्यापाशी जावे लागणार आहे. जर ही जीवनाची मुदत वाया जाऊ दिली तर कोणत्या तोंडाने त्याच्यासमोर जाईन आणि कोणते उत्तर देईन.
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय मुआविया (रजि.) यांनी सांगितले की एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) घरातून बाहेर पडले तेव्हा पाहिले की काही लोक घोळका करून बसले आहेत. पैगंबरांनी विचारले, ‘‘साथीदारांनो! तुम्ही येथे का बसला आहात आणि काय करीत आहात?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘आम्ही येथे बसून अल्लाहचे नामस्मरण करीत आहोत, त्याने आमच्यावर केलेले उपकार स्मरण करीत आहोत, अल्लाहने आमच्याकडे आपला ‘दीन’ पाठविला आणि आमच्यावर ‘ईमान’ बाळगण्याची ईशकृपा केली आणि आम्हाला सरळमार्ग दाखविला, या उपकाराचे स्मरण करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा एखाद्या भक्ताच्या एखाद्या अपत्याचा मृत्यू होतो तेव्हा अल्लाह आपल्या देवदूतांना विचारतो, ‘‘तुम्ही माझ्या भक्ताच्या अपत्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘तुम्ही त्याच्या काळजाच्या तुकड्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘माझ्या भक्ताने काय म्हटले?’’ ते म्हणतात, ‘‘या संकटसमयी त्याने तुझी प्रशंसा केली आणि ‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन’ म्हटले.’’ तेव्हा अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या या भक्ताकरिता स्वर्गात (जन्नतमध्ये) एक घर बनवा आणि त्याचे नाव ‘बैतुल-हम्द’ (कृतज्ञता व्यक्त करण्याचे घर) ठेवा. (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या धर्मनिष्ठ भक्ताने तुझी स्तुती केली म्हणजे म्हटले, ‘‘हे अल्लाह! मी तुझे आभार मानतो. माझे अपत्य हिरावल्यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी कसलाही गैरसमज निर्माण झालेला नाही. तू जे काही करतो तो अत्याचार व अन्याय नसतो. आपली वस्तू जर कोणी घेतली तर त्याच्यावर नाराजी कसली?’’
    ‘‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन.’’ हा संयमाचा मंत्र आहे आणि मनुष्याला संयमाचे शिक्षण देतो कारण त्याचा अर्थ असा आहे की ‘‘आम्ही अल्लाहचे दास आणि भक्त आहोत. त्याच्या इच्छेनुसार जगात जीवन व्यतीत करणे आमचे काम आहे आणि आम्ही त्याच्याचकडे परतून जाणार आहोत. जर आम्ही संकटप्रसंगी संयम बाळगला तर चांगला बदला मिळेल अन्यथा वाईट बदला मिळेल. ‘जगातील प्रत्येक वस्तू नष्ट होणार आहे’ अशा विचारामुळे संकटाला सहज वाव मिळतो.
    माननीय सुहैब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मोमिनची स्थितीदेखील विचित्र असते, तो ज्या स्थितीत असतो त्यातून चांगुलपणा व भलाईच प्राप्त करतो आणि हे नशीबवान मोमिनव्यतिरिक्त कोणालाही लाभत नाही. जर तो दारिद्र्य, आजारपण आणि दु:खाच्या स्थितीत असतो तेव्हा संयम बाळगतो आणि जेव्हा तो आनंदाच्या स्थितीत असतो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या दोन्ही स्थिती त्याच्याकरिता भलाईची सबब बनतात.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत कमी दर्जाचे आहेत त्यांच्याकडे पाहा (तेव्हा तुमच्यात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल) आणि त्याच्याकडे पाहू नका जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत उच्च दर्जाचे आहेत, जेणेकरून ज्या ईशदेणग्या तुम्हाला या वेळी लाभल्या आहेत त्या तुमच्या दृष्टीने कमी दर्जाच्या ठरू नयेत (अन्यथा अल्लाहच्या कृतघ्नतेची भावना तुमच्या मनात निर्माण होईल).’’ (हदीस : मुस्लिम)

(२७४) जे लोक आपली संपत्ती रात्री व दिवसा उघडपणे व गुप्तरीत्या खर्च करतात त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कसलेही भय आणि दु:खाला स्थान नाही. (२७५) परंतु जे लोक व्याज३१५ खातात त्यांची दशा त्या माणसाप्रमाणे असते ज्याला शैतानाने स्पर्श करून झपाटून सोडले आहे.३१६ आणि ते या दशेत गुरफटण्याचे कारण हे आहे की ते म्हणतात, ‘‘व्यापारदेखील शेवटी व्याजासारखीच गोष्ट आहे.’’३१७


३१५) यासाठी अरबीतील "रिबा' हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ होतो ""जास्त व अधिक'' असणे. अरब लोक या शब्दाचा उपयोग त्या अधिक रकमेसाठी करीत होते जो एक सावकार आपल्या कर्जदाराकडून एक निश्चित केलेल्या दराप्रमाणे मूळ धनापेक्षा जास्त वसूल करीत होता. याला उर्दु मध्ये "सूद'' आणि मराठीत ""व्याज'' म्हणतात. कुरआन अवतरणाच्या काळात व्याजाविषयी जो मामला प्रचलित होता त्यास अरब लोक ""रिबा'' म्हणत असत. म्हणजे एक मनुष्य दुसऱ्याला काही वस्तू विकतो आणि किंमतीसाठी निश्चित वेळ ठरवून घेतो. जर मुदतीत किंमत दिली नाही तर मुदत वाढवून आणि किंमत वाढवून दिली जाते. तसेच एक मनुष्य दुसऱ्याला कर्ज देतो आणि हे निश्चित करून घेतो की इतःया मुदतीत इतकी जास्त रक्कम मूळ धनापेक्षा घेतली जाईल. मुदत कर्ज देताना व घेताना निश्चित जास्त रक्कम ठरविली जात होती. मुदत संपल्यावर तीच रक्कम वाढविली जात असे. हा व्यवहार येथे उल्लेखला गेला आहे.
३१६) अरबांमध्ये वेड्या माणसाला "मजनू'' म्हणत. जेव्हा कोणाला "वेडा' संबोधन करायचे झाल्यास म्हणावयाचे की यास जिन्न लागले आहे. याच प्रचलित म्हणीचा उपयोग करून कुरआन व्याजखोराला "पागल' म्हणून संबोधत आहे. असा मनुष्य पैशाच्या मागे वेडा होतो आणि स्वार्थपरायणतेला वशीभूत होऊन वेडसर होतो. त्याला पर्वा नसते की आपल्या वागणुकीने मानव, प्रेम, बंधुत्वाची आणि सहानुभूतीचीमुळे नष्ट होत आहेत आणि सामूहिक हित व कल्याणकारी कामे बाधित होत आहेत. तसेच कित्येक लोकांना बदहाल करून तो स्वत:ला खुशहाल करून घेत आहे. त्याच्या या वेडसरपणाची स्थिती या जगात अशी आहे. परलोकात तो याच स्थितीत पुन:र्जीवित केला जाईल ज्या स्थितीत त्याने या जगात जीव दिला होता. म्हणून व्याजखोर मनुष्य परलोकात बावùयासारखा व एका वेड्याच्या स्थितीत उठविला जाईल.
३१७) म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनाचा हा दोष आहे की व्यापारात मूळ गुंतवणूक केलेल्या रकमेवर जो फायदा होतो त्यात आणि व्याजामध्ये हे लोक अंतर करीत नाही. दोघांना एकसारखे समजून तर्क काढतात की व्यापारात लावलेल्या रकमेपासून मिळणारा फायदा वैध आहे तर कर्जावर दिलेल्या रकमेवरील फायदा घेणे अवैध कसे? याचप्रमाणे  आजकालचे  व्याजखोर  लोक तर्क  लावतात आणि  व्याज  घेणे  व  देण्यास  योग्य  ठरवितात. ते  म्हणतात  एक मनुष्य ज्या रकमेला व्यापारात  लावण्याऐवजी दुसऱ्याला कर्जरूपात देतो तो दुसरा व्यक्ती त्या रकमेद्वारा फायदाच उठवितो. शेवटी काय कारण आहे की कर्ज देणाऱ्याच्या पैशातून कर्ज घेणारा जो फायदा उठवितो त्यातून काही भाग त्याने कर्ज देणाऱ्यास का देऊ नये? परंतु हे झपाटलेले लोक यावर विचार करीतच नाही की जगात जेवढे कारोबार होतात; मग ते शेतीवाडी, व्यापार-उदीम किंवा उद्योग धंद्याचे असोत, त्यांना मनुष्य आपल्या मेहनतीने अथवा मेहनत व रक्कम लावून करतो. यात तो मनुष्य नुकसानीचा धोका (risk) सुद्धा पत्करतो. तसेच निश्चित नफ्याची शाश्वतीसुद्धा नसते. मग संपूर्ण कारोबाराच्या विश्वात एक कर्ज देणाराच (सावकार) असा का आहे जो नुकसानीच्या धोःयापासून वाचतो आणि निश्चित नफा मिळवणारा हकदार असावा? लाभ न देणाऱ्या कामाचा मामला थोड्यावेळासाठी बाजूला ठेवू आणि व्याजदराच्या कमीजास्तीचा मामला दृष्टीआड करू. मामला त्याच कर्जाचा असू द्या जो लाभकारी कामासाठी लावला जातो आणि व्याज दर तोच असू द्या. येथे प्रश्न हा आहे की जे लोक व्यापारात अथवा उद्योगात आपले श्रम, वेळ, योग्यता आणि धन रात्रंदिवस लावतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनीच धंदा फलद्रुप होतो व वाढीस लागतो. अशासाठी तर निश्चित अशा फायद्याची शाश्वती नाही परंतु नुकसानीची टांगती तलवार त्यांच्याच डोक्यावर अस्ते.ने फक्त आपला पैसा त्यांना कर्ज रूपाने दिला आहे, तो कोणताही धोका न पत्करता एक निश्चित फायदा वसूल करतो. शेवटी हे कोणत्या तर्कात, विचारसरणीत आणि अर्थशास्त्राच्या सिद्धान्तानुसार आणि न्यायाच्या कोणत्या नियमानुसार योग्य आहे? आणि एक मनुष्य एका कारखान्याला वीस वर्षासाठी कर्जाऊ रक्कम देतो आणि आजच निश्चित करतो की पुढे वीस वर्ष तो पाच टक्के दराने फायदा लाटत राहील? तो कारखाना वीस वर्षाच्या कालावधीत मग तोट्यात राहो की नफ्यात? हे कसे शक्य आहे की एका राष्ट्राची तमाम प्रजा राष्ट्राच्या रक्षणासाठी युद्धाचा धोका, नुकसान आणि प्राणाची आहुती देत राहील आणि दुसरीकडे तो सावकार भांडवलदार युद्धसामुग्रीसाठी राष्ट्राला व्याजाने कर्ज देतो आणि शंभर वर्षांच्या मुदतीपर्यंत त्यावर व्याजच खात बसतो?

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
भारतीय इतिहासात अल्बेरुनी आणि त्याच्या ‘तहकीक-मा-लिल-हिन्द” या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. ‘तहकीक - मा - लिल - हिन्द’  चे मूळ शिर्षक “किताब - अबुल - रेहान - मोहम्मद - इब्न - अहमद - अल् - बेरुनी - तहकीक - मा -लिल् - हिन्द ” असे आहे. भारतीय इतिहासात मात्र ‘तहकीक-मा-लिल- हिन्द” या संक्षिप्त नावानेच हा ग्रंथ ओळखला जातो. त्याच्यातील विचारांच्या महानतेने त्या ग्रंथाला ‘किताबुल हिंद’ हे लकब (उपाधी) प्राप्त करुन दिली. 
अलबेरुनी हा मुळचा ख्वारजमचा. 4 सप्टेंबर 973 मध्ये ख्वारजम च्या विरुन या छोट्याशा खेड्यात अलबेरुनीचा जन्म झाला.  अकू शाही इसा उर्फ अबू नासर हे त्याकाळातील प्रख्यात विद्वान, अल बेरुनीच्या प्राथमिक शिक्षणात त्याला शिक्षक म्हणून लाभले. अलबेरुनी त्याच्या उमेदीच्या काळात ख्वारजमच्या शासकाकडे दरबारी अश्रित म्हणून राहिला. ख्वारजम चे शासक देखील त्याच्या विचारांनी मोठे प्रभावित होते. त्यामूळेच त्यांनी आपल्या दरबाराचे शाही सदस्यत्त्व देउन अल्बेरुनीचा सन्मान केला.  “ इ.स. 994-995 मध्ये गुरगंज च्या शासकाने स्वतंत्र राज्याची उद्घोषणा केली. त्यानंतर अलबरुनी गुरगंज मध्ये येउन स्थायिक झाला. गुरगंज मध्येच अल बेरुनीने त्याची इतिहासविख्यात वेधशाळा स्थापन केली.”
गुरगंज येथील वास्तव्यात अलबेरुनीने त्याची विख्यात रचना “अथरल बकीय” लिहून पुर्ण केली. त्यानंतर अल बरुनी ने इ.स. 1009 मध्ये पुन्हा स्थलांतर केले.8 पुन्हा ख्वारजम येथेच त्याने आश्रय घेतला. पुढे इ.स. 1017  मध्ये महमूद गजनवीने ख्वारजम वर आक्रमण करुन सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर परतीच्यावेळी ख्वारजमच्या सर्व विद्वानांना देखील महमूदने गजनीला आपल्यासोबत आणले.  या विद्वानांमध्ये अल्बरुनीचा देखील समावेश होता. 
गजनीत आल्यानंतर अल्बेरुनीचा भारतीय विद्वानांशी संबध आला. भारतीय विद्वानांशी सातत्याने त्याची चर्चा व्हायची. इतिहास, भूगोल, खगोल, ज्योतिषशास्त्र, भारतीय धर्मव्यवस्था आणि परंपरांच्या संदर्भात बरुनीने या विद्वानांकडून बरीच माहिती घेतली. त्यातून मग त्याने स्वतः भारताविषयीच्या माहिती संकलनास सुरवात केली. याच काळात त्याने काही भारतीय ग्रंथाचे संस्कृत भाषेतून अरबी, फारसीमध्ये अनुवाद केले. अलबेरुनीकडे संशोधनाची स्वतंत्र अशी दृष्टी होती. संशोधनाच्या आपल्या दृष्टिकोनाविषयी माहिती देताना बरुनी “तहकीक-मा-लिल्-हिन्द” मध्ये म्हणतो, “ऐतिहासिक अधिकृततेच्या (प्रश्नांच्या) संदर्भात, आपण जे ऐकले ते , आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले त्याची बरोबरी करु शकत नाही, हे कुणीही अमान्य करु शकत नाही. कारण पाहणार्यांनी ज्या काळी पाहिले त्या काळचे आणि ज्या स्थळी पाहिले त्या स्थळाचे संबधित सार त्याची दृष्टी ग्रहण करीत असते. ऐकिवात त्या मानाने बर्याच उणिवा असतात. ”
भारतीय संस्कृतीला वैश्विक ओळख मिळवून देणारा समाजशास्त्रज्ञ
भारतीय लोकजीवन, धर्म, संस्कती, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रुढी, चालीरिती, धर्मग्रंथ आणि भारतातल्या विविध विचारधारांविषयी अलबेरुनीच्या पुर्वी कोणत्याच भारतीय किंवा परकीय विद्वानाने त्याच्या इतके समग्र लिखाण केलेले नाही. अल्बेरुनीने  त्याच्या ग्रंथप्रकल्पासाठी संस्कृत भाषा अवगत करुन घेतली. ऐकीव माहिती पेक्षा स्वतः संशोधन करण्याचा मार्ग त्याने चोखाळला.  संस्कृत भाषा शिकणे आणि भारतीय समाजाविषयीचे संशोधन हे कीती  मोठे दिव्य आहे, याविषयी अल्बेरुनी लिहितो, “आपल्या देशामध्ये व इतर कित्येक देशांमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या बर्याच समान गोष्टी आढळतात तथापि भारत आणि आपला देश या दोहोंमध्ये तुलना केल्यास या दोन्ही देशात कितीतरी बाबतीत वेगळेपण आढळते. या संदर्भात भाषेचा प्रश्न मुख्यत्वेकरुन उपस्थित होतो. भारतीयांची संस्कृत भाषा शिकणे ही वरकरणी वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. संस्कृत भाषेतही अरबी भाषेप्रमाणेच शब्दसंग्रहांचे आणि प्रत्ययांचे वैपुल्य आढळते. संस्कृत भाषेत एकाच वस्तूसाठी कितीतरी संज्ञावाचक शब्दांचा उपयोग केला जातो. कधी-कधी तिच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांकरिता एकाच व्यापक शब्दानेही काम भागविले जाते. अशा ठिकाणी त्या शब्दाचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय त्याचा नेमका अर्थ कळत नाही.” अल्बरुनीने मांडलेले हे विचार त्याच्या प्रगल्भ आणि सर्वव्यापी विद्वेत्तेचा परिचय घडवतात. अल् बेरुनीच्या ‘तहकीक-मा-लिल्-हिन्द’ या ग्रंथात त्याने हाताळलेले विषय त्याच्यातील भौतीकतावादी तत्वज्ञाचा परिचय घडवतात. लिखाणातील सखोलता, विषयाची समग्र मांडणी, विश्लेषण यातून अल्बेरुनीने त्याच्या ग्रंथाचे सौंदर्य आधिकच वाढवले आहे. हिंदू धर्माविषयी लिखाण करताना कित्येक किचकट धर्मग्रंथांचे त्याने वाचन केले आहे. भूगोल आणि गणिताविषयी भारतीयांची मते, ज्योतिषावर असणारी त्यांची श्रध्दा याविषयी कोणतेही पुर्वाग्रह न बाळगता अल् बेरुनीने लिखाण केले आहे. एकुण 80 अध्यायामध्ये त्याने ‘तहकीक-मा-लिल्-हिन्द‘ ची रचना केली आहे. पहिल्या अध्यायात प्रास्ताविकाचा समावेश आहे. दुसर्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत धार्मिक दार्शनिक विषयांचे विवेचन आहे. त्यानंतर च्या सहा अध्यायात साहित्य आणि विभिन्न चालीरितींविषयी माहिती दिली आहे. अठरा ते एकविसाव्या अध्यायापर्यंत भुगोल, गणित आणि पौराणिक कथांविषयी लिखाण केले आहे. यानंतरच्या पुढील 30 अध्यायात ज्योतिष, धार्मिक परंपरा, आणि हिंदू समाजाविषयीची माहिती दिली आहे. 63 व्या अध्यायापासून कायदे, शिष्टाचार, उत्सव, व्रत वैकल्ये यांच्याविषयीचे विचार मांडले आहेत. ग्रंथाचे लिखाण अल् बेरुनीने अत्यंत निष्पक्षपणे केले आहे. आपला धर्म श्रेष्ठ असल्याचा अहंभाव त्याच्या लिखाणात कुठेही आढळत नाही. कोणत्याही मुद्यावरुन आपल्या धर्माशी अकारण त्याने तुलना केलेली नाही. उलट इस्लामी परंपरामध्ये झालेला काहिसा प्रक्षेप देखील त्याने मांडला आहे. हिंदू धर्मशास्त्राविषयी लिहिताना ग्रीक परंपरा, प्लेटोचे कायदेशास्त्र, ग्रीस देशातील धार्मिक नागरी कायदे, इस्लामी शरिया यांच्यातील फरक देखील  अल् बेरुनीने दाखवून दिला आहे.
मुर्तीपुजेविषयी लिहताना अल् बेरुनीने त्यावर टिका केली नाही. तर्काच्या आधारे त्याने मुर्तीपुजेचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अल् बेरुनी लिहतो, “आपल्याला ज्यांच्याविषयी आत्यंतिक आदरभाव वाटतो किंवा श्रध्दा वाटते, अशा व्यक्ती प्रेषित, ऋषी व देवता यांची स्मृती त्यांच्यानंतर चिरकाल मनात राहावी, म्हणून लोक त्यांच्या प्रतिमा तयार करतात, स्मारके उभारतात. मुर्तींच्या निर्मितीमागील हिच खरी प्रेरणा आहे.तथापि बराचसा कालावधी लोटल्यावर युगानुयुगे व काही पिढ्या लोटल्यावर लोकांना मूर्तीच्या निर्मितीमागील कारणांचा विसर पडला.”
अल् बेरुनीच्या लिखाणात वैश्विक समाजाची अनेक रुपे
समाजाची कोणतीही अवस्था चिरंतन नाही. समाज नित्य विकसित होत राहतो. प्रगती हा त्याचा स्थायीभाव आहे. भिन्न प्रदेशात वैश्विक समाजाची एकाच काळात वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. म्हणून विकसित प्रदेशातील कुणी अविकसित प्रदेशातील समाजाला हिणवण्याचे कारण नाही. युरोपीय विद्वान जी वैचारिक सहिष्णूता आधुनिक काळात दाखवू शकले नाहीत, ती अल् बेरुनीने अकराव्या शतकात दाखवली. त्याने भारताचा अभ्यास करताना कुठेही टिका केली नाही. हेटाळणी केली नाही. कि कोणत्याही धार्मिक रुढींची निंदा केली नाही. भारतीय समाजाच्या धर्म, चालीरिती यांचा समाजशास्त्र, तर्कशास्त्र आणि प्रसंगी इतिहासाचा आधार घेउन अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.
तरीही अल् बेरुनी नुसता समाजाचा अभ्यास करणारा समाजशास्त्रज्ञ नाही. भटकंतीसाठी आलेला प्रवासीही नाही. कुणा राज्यकर्त्यांची खुशामत गाणारा, कवने रचणारा, ग्रंथ लिहणारा दरबारी लेखक नाही.  अल् बेरुनी हा खर्या अर्थाने समाजाचा, राजकारणाचा, कायदेशास्त्राचा अभ्यास करताना एका वेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करणारा दार्शनिक आहे.  अल् बेरुनी एखादा विषय मांडताना प्लेटो च्या तत्वज्ञानाला हात घालतो.  कधी ग्रीसचे नागरी समाजाचे कायदे सांगायला लागतो. विवाह विधीचा भारतीय इतिहास सांगताना प्रेषित पुर्व अरबी समाजाच्या विवाहसंस्थेवर भाष्य करतो. ज्यु विवाह पध्दती विषयी विचारांची मांडणी करतो. खगोलशास्त्र सांगताना भिन्न प्रदेशातील अंतराळ विज्ञानावर काही तरी वेगळीच माहिती देउन जातो. इतिहासातील एखादा प्रसंग सांगून आपल्या विचारांना पुष्टी देण्याचे भौतीक उदाहरणशास्त्रही अल् बेरुनीला चांगलेच ज्ञात होते. आलेक्झांडर, कामोडोस, प्रेषित मुसानंतर आलेला मियानस नावाचा राजा, गजनवी कुळातील सरदारांच्या इतिहासातील कित्येक प्रसंग त्याने उदाहरणादाखल नोंदवले आहेत. आणि डेक्रो, सोलोन आणि पायथागोरस सारख्या असंख्य  विद्वानांच्या साहित्यावरही भाष्य केले आहे. संस्कृतचे व्याकरण शास्त्र सांगताना अल् बेरुनी अरबी मात्रादर्शक चिन्हांची संस्कृत मात्रादर्शक चिन्हांशी तुलना करायला लागतो. फारसी, तुर्की भाषेच्या सौंदर्यस्थळांचेही दर्शन घडवतो.  त्यामूळेच अल् बेरुनी हा इब्ने खल्दुनचा पुर्वसुरी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
(संदर्भ ः सरफराज शेख लिखित ‘मध्ययुगीन भारतातील मुस्लीम विद्वान’ या आगामी ग्रंथातून) (लेखक ः इतिहास तज्ज्ञ असून पत्रकारही आहेत.)

एम.आर.शेख
फिर दहेक उठेगी आग हाय,
हमने रो-रो के अभी बुझाई थी

र्मनिरपेक्ष लोकशाही मुल्यांच्या प्रभावाखाली गेली 69 वर्षे राहिल्याने भारतीय मुस्लिम, त्यात ही विशेष करून काही उलेमांनी इस्लामला फक्त निकाह, तलाक, वजू, गुसल, नमाज, रोजे, हज पर्यंतच मर्यादित करून टाकले आहे. यापुढे बोलणार्यांना हे लोक ’दीन में इन्हेराफ (धर्मभ्रष्ट) करणारे’ म्हणून जाहीर करतात. त्यामुळे इस्लामची नैसर्गिक वाढ भारतात होऊ शकली नाही. बहुतेक मुस्लिमांचे चारित्र्य तसे बनू शकलेले नाही जसे की इस्लामला अभिप्रेत आहे. याचा एकत्रित परिणाम असा झाला की मुस्लिमांच्या व्यक्तिगत चारित्र्यात इस्लामी इबादतींमुळे काही अंशी नैतिकता आली परंतु, सार्वजनिक जीवनामध्ये ज्या दर्जाची नैतिकता हवी होती त्या दर्जाची नैतिकता साधारणपणे आलेली नाही. म्हणून वैयक्तिक सद्गुणांपलिकडे मुस्लिमांना जाता आले नाही.
    एक परिपूर्ण जीवन व्यवस्था (दीन) उपलब्ध असतांना सुद्धा आपल्या आचरणाने भारतीय मुस्लिमांनी इस्लामला ईतर धर्मांप्रमाणे एका धर्मात बंदिस्त करून टाकलेले आहे. त्यामुळे भारतात इस्लामची वाढ खुंटलेली आहे. परिणामी, इस्लामबद्दल बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यापैकी एक मोठा गैरसमज मुस्लिम राष्ट्रवाद हा आहे. भारतातील बहुसंख्य बांधवांना असे प्रामाणिक पणे वाटते की, मुस्लिम राष्ट्रवाद हा त्यांच्या हिंदू राष्ट्रवादासमोर एक मोठे आव्हान आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे व ही वाढती लोकसंख्या त्यांच्या राष्ट्रवादासमोर भविष्यात अडचणीची ठरणार आहे. वेस्टमिनिस्टर पद्धतीच्या संसदीय लोकशाही असणार्या आपल्या या देशात शासन तेच करू शकतात ज्यांची संख्या जास्त आहे. म्हणून बहुसंख्यांकांच्या मनातली भीती ही सार्थ आहे.
    राष्ट्रवाद एक महान विचार आहे यात वाद नाही. राष्ट्रवादातून जी ऊर्जा निर्माण होते ती नागरिकांना आपल्या देशासाठी मोठ्यात मोठा त्याग करण्यासाठी प्रेरित करते यातही वाद नाही. परंतु, याच राष्ट्रवादाचा जेंव्हा अतिरेक होतो तेव्हा आपल्याच देशातले अल्पंसख्यांक, दलित, आदिवासी, शीख, ख्रिश्चन हे आपल्यालाच शत्रुवत वाटू लागतात हे ही विसरून चालणार  नाही. याच राष्ट्रवादाच्या गर्भातून हिटलर, मुसोलिनी सारखे लोक जन्माला आले व त्यांनी मानवतेची कधीही न भरून निघणारी अशी हानी केली हे ही विसरून चालणार नाही. राष्ट्रवादाच्या याच अतिरेकी भुमिकेमुळे निरपराध पॅलिस्टीनीयन मुस्लिमांवर अत्याचार करण्याची प्रेरणा इजराईलला मिळते.
    इस्लाम समोर राष्ट्रवाद एक संकुचित विचार आहे. इस्लामकडे फक्त देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व मानव जातीच्या कल्याणाची योजना आहे. तो फक्त इबादतींपुरता मर्यादित नाही. नैतिकतेवर आधारित इस्लामी जीवन मुल्यांना समाजात प्रत्यक्षरित्या लागू करण्याचे इबादत एक साधन आहे. याचा विसर मुस्लिमांना पडलेला आहे. ते साधनाला साध्य समजून जीवन जगत आहेत. इस्लामी व्यवस्था परिपूर्ण आहे. त्यात आदर्श समाज निर्मितीसाठी आवश्यक असलेली कुटुंब व्यवस्था, नैतिक व भौतिक शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था, समाज कल्याण व्यवस्था, राजकीय व्यवस्था, शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था, न्याय व्यवस्था या सर्व व्यवस्थांचा त्यात समावेश आहे. हे बहुसंख्य बांधवांना पटवून देण्यात आपण अपयशी ठरलोत, याची कबुली द्यावीच लागेल. इस्लाम इतर धर्माप्रमाणे एक धर्म नाही की ज्यात थोड्या फार धार्मिक विधीं (रिचवल्स)वर जोर देऊन बाकी विभांगामध्ये अनुयायांना मोकळे सोडून दिलेले आहे. जमाअते इस्लामी सारखा अपवाद सोडला तर परिपूर्ण इस्लामी जीवन व्यवस्थेवर आधारित विचारांची मांडणी कोणीच करीत नाही. उलट हिंदू राष्ट्रवादाला विरोध म्हणून मुस्लिम राष्ट्रवादाचा पर्याय समोर ठेवण्यात येतो. त्यामुळे दोन्ही समाजात विनाकारण स्पर्धा वाढीस लागते. मुस्लिम राष्ट्रवादाचा विरोध केल्यामुळेच मौलाना अबुल कलाम आझाद, दारूल उलूम देवबंद यांना कवि डॉ. अल्लामा इक्बाल, मुहम्मद अली जीना व मुस्लिम लीगचा प्रचंड विरोध सहन करावा लागला होता.
    भारतात हिंदू राष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम वि.दा. सावरकर यांनी 1923 साली ’हिंदुत्व’ या पुस्तकात मांडला तर त्याच कालखंडात मुस्लिम राष्ट्रवादाची मांडणी सर्वप्रथम कवि इक्बाल यांनी केली. याच विचारांच्या पायावर मुस्लिम लीगची स्थापना झाली. संकुचित विचारांच्या मुस्लिमांचा लीगला पाठिंबा पण मिळाला. काँग्रेस पक्षांतर्गत कोंडी झाल्याने जीना सारख्या इंग्रजांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष व्यक्तीला पक्ष सोडून मुस्लिम लीगच्या आश्रयाला जावे लागले. त्यांचाच वारसा चालविण्याचे काम अलिकडे एमआयएमने सुरू केले आहे.
    एमआयएमचे अध्यक्ष बॅ.ओवेसी यांचे राजबिंडे व्यक्तिमत्व, त्यांना असलेली इस्लामी मुल्यांची जाण, भारतीय मुस्लिमांच्या प्रश्नांची जाणीव, ब्रिटिश शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रभावी वक्तृत्व, बेजोड तर्क शक्ती, उत्तम मांडणी, राज्यघटनेवरील त्यांची अव्याभिचारी निष्ठा इत्यादी गुणांमुळे ते अल्पावधीतच मुस्लिमांचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले व मुस्लिम तरूणांच्या गळ्यातले ताईत झाले. मौ. आझाद नंतर राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यावी असे नेतृत्व म्हणून बॅ. ओवेसींकडे पाहता येईल. सुरूवातीला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करणार्या मेनस्ट्रीम मीडियाचे आज ते प्रिय पात्र बनलेले आहेत. इंग्रजीपासून हिंदी पर्यंतच्या सर्व वाहिण्यांवर त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यांचे मत म्हणजे भारतीय  मुस्लिमांचे मत असे समजण्याची जणू परंपरा रूढ होऊ पहात आहे. ते मुस्लिम राष्ट्रवादाचे जणू प्रतिक असल्यासारखे वागत आहेत व तशीच सामुहिक समज बनू पाहत आहे. म्हणून या सर्व प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.
    उत्तर प्रदेशातील एक उजव्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते विनय कटियार यांनी अलिकडेच मुस्लिमांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर प्रामुख्याने दोन प्रतिक्रिया आल्या. एक प्रतिक्रिया डॉ. फारूख अब्दुल्लांची होती. त्यांनी तेवढ्याच तीव्रतेने कटियार यांचा प्रतिवाद केला, जेवढ्या तीव्रतेने कटियार यांनी सल्ला दिला होता. त्यांनी कटियार यांना उद्देशून वक्तव्य केले की, ’ हिंदुस्थान कटियार के बाप का है क्या?’ दूसरी प्रतिक्रिया बॅ.असदोद्दीन ओवेसींची आली. त्यांनी व्यथित अंतःकरणाने सांगितले की, ’ऊठसूठ कोणीही आम्हाला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देतोय. हा आमच्या राष्ट्रनिष्ठेचा अपमान आहे. भरपूर सहन केले आता सहन होत नाही. आता वेळ आलेली आहे की, संसदेने असा कायदा करावा की, जो कोणी मुस्लिमांना पाकिस्तानात निघून जा, असे वक्तव्य करील त्याला तीन वर्षाची शिक्षा केली जावी.’ त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात, समाज माध्यमांवर केले. बॅ.ओवेसींच्या अलिकडील काही वक्तव्यांनी बुद्धीवादी मुस्लिमांना निराश केलेले आहे. काळजी वाटावी इतपत टोकाची भूमिका अलिकडे बॅ.ओवेसी घेत आहेत. तीन वर्षे शिक्षेची मागणी करणारा कायदा तयार करण्याची त्यांची मागणी किती फोल आहे, याचा मागोवा घेणे त्यामुळेच गरजेचे आहे.
    तीन वर्षाची शिक्षा करणारा कायदा
    आज देशात शेकडो कायदे असे आहेत की, ज्यांच्यावर अमलबजावणी होत नाही. शाहबानो केसनंतर संसदेने मंजूर केलेल्या मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायद्याची काय वाट लावली गेली, याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजूरीला प्रतिबंधक करणारा कायदा इत्यादी अनेक कायदे आहेत. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच शक्य झालेली नाही. आज देशात दलितांना अपमानित करण्याविरूद्ध दोन कायदे अस्तित्वात आहेत. एक पीसीआर अॅक्ट (प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स अॅक्ट) व दूसरा अॅट्रॉसिटीज अॅक्ट (अनुसूचित जाती व जमाती यांच्यावरील अत्याचावर प्रतिबंधक कायदा). असे असतांनाही दलितांना अपमानित करण्याच्या घटना बंद झाल्या का? त्यांच्यावरील अत्याचार संपले का? नक्कीच नाही! कायदे करून समाज भावनेला जास्त दाबून ठेवता येत नाही. दोन-दोन कायदे असून जेव्हा दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत तर ओवेसी यांनी मागणी केल्याप्रमाणे जरी कायदा केला  तरी मुस्लिमांचा अपमान व त्यांच्यावर होणारे अत्याचार बंद होतील, याची काय हमी?
     अशा कायद्याची मागणी करणे मुदलातच चुकीची आहे. कारण भारतासारख्या बहुसंख्येने हिंदू असलेल्या देशामध्ये अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा एखादा कायदा मंजूर होऊ शकतो. मात्र अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी बहुसंख्यांकांना तुरूंगात टाकणारा कायदा मंजूर होऊ शकत नाही, ही सामान्यज्ञानाची बाब आहे. असे जर शक्य झाले असते तर शिवराज पाटील चाकूरकर केंद्रात गृहमंत्री असतांना व काँग्रेस पक्षाचे संसदेत बहुमत असतांना अल्पसंख्यांकाचे जातीय हिंसेपासून रक्षण करणारा कायदा कधीच मंजूर झाला असता. तो कायदा मंजूर होवू नये यासाठी काँग्रेस पक्षातूनच मोर्चेबांधणी करण्यात आली होती, हा इतिहासही फारसा जुना नाही.
    बॅ.ओवेसींना ही गोष्ट माहित नाही अशातला प्रकार नाही. ते भारतीय राजकारणातील एक मुरलेले नेते आहेत. स्वतः बॅरिस्टर आहेत. ते जाणून बुजून नरेंद्र मोदी यांच्या उग्र हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात आपला उग्र मुस्लिम राष्ट्रवाद उभा करू पाहत आहेत. इस्लाम समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, हे ही बॅ.ओवेसींना चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र ते जाणून बुजून फक्त दलित आणि मुस्लिमांचाच कैवार घेतात. बहुसंख्य हिंदुंच्या बाबतीत ते कधीच कुठलीही भुमिका घेत नाहीत. ही त्यांची इस्लामविरोधी प्रवृत्ती आहे. मोदी मुस्लिम हिताची भाषा बोलत नाहीत किंवा मुस्लिमांचे कल्याण करू इच्छित नाही, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. कारण की त्यांच्यावर झालेले संस्कार हे संघाच्या संकुचित विचारप्रणालीतून झालेले आहेत. मात्र बॅ.ओवेसींचे असे नाही. ते स्वतः इस्लामचे ध्वजवाहक आहेत. त्यांना अशी संकुचित भूमिका घेवून चालणार नाही. हे माहित असूनसुद्धा ते संकुचित विचार करतात. अशाने त्यांच्यात आणि मोदींमध्ये फरक तो काय राहील? संकुचित विचाराचा व्यक्ती आणि साहेबे शरियत व्यक्ती यांच्यात काहीतरी फर्क असावयास हवा की नाही?
    या समस्येचे समाधान
सबक पढ सदाकत का, शुजाअत का, अदालत का
लिया जाएगा तुझसे काम कौमों की इमामत का
    राष्ट्रवाद फक्त आपल्या लोकांवर प्रेम करणे शिकवितो, मग त्यांचे वागणे चुकीचे का असेना. इस्लाम ठीक याच्याविरूद्ध भूमिका घेतो. तो सर्व मानवतेवर प्रेम करण्याची शिकवण देतो व चुकीचे वागणार्या विरूद्ध ठोस भूमिका घेतो. किंबहुना त्यांच्याविरूद्ध कठोर शिक्षेची तरतूद करतो. मग ते मुस्लिम का असेनात. उग्र हिंदू राष्ट्रवादाला उत्तर उग्र मुस्लिम राष्ट्रवादाने देता येणार नाही. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने नाही तर पाण्याने धुतले जातात, ठीक त्याच प्रमाणे शत्रुत्वाचे उत्तर शत्रुत्वाने देता येणार नाही. ते मित्रत्वानेच दिल्या गेल्यासच शत्रुत्व संपेल. यासंबंधी कुरआनचे निर्देश स्पष्ट आहेत. अल्लाहने खालील शब्दात मुस्लिमांना निर्देश दिलेले आहेत की, ”आणि हे पैगंबर (स.)! सदाचार आणि दुराचार एकसमान नाहीत. तुम्ही दुराचाराचे त्या सदाचाराने निरसन करा जे अत्युत्तम असेल. तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे” (कुरआन ः सुरे हा-मीम-सजदा, आयत क्र. 33-34).
    या संदर्भात जमाअते इस्लामीचे संस्थापक यांचे विचार सुद्धा उद्बोधक आहेत. ते म्हणतात, ” इस्लाम का जो अजीमोश्शान मक्सद हमारे सामने है, जिन जबरदस्त ताकतों के मुकाबले में हमको उठकर इस मक्सद के लिए काम करना है उसका अव्वलीन (प्रथमतः) तकाजा (आग्रह) ये है के, हम में सब्र (धैर्य) हो, तदब्बुर (उच्च विचारशक्ती) और मामला फहेमी (परिस्थितीची जाण) हो और इतना मजबूत इरादा हो के जिससे हम दूररस नतायज (दूरगामी परिणाम) के लिए लगातार अन्थक सई (प्रयत्न) कर सकें. बेसब्री (घाई) के साथ जल्दी-जल्दी नतायज बरामद करने के लिए बहोतसे ऐसे सतही काम (स्तरहीन कार्य) किए जा सकते हैं. जिनसे एक वक्ती (तात्पुर्ती) हलचल बरपा हो जाए, लेकिन उसका कोई हासिल इसके सिवा नहीं है के, कुछ दिनों तक फजा (वातावरण) में शोर रहे और फिर एक सदमे के साथ सारा काम इस तरह बरबाद हो जाए के मुद्दत-हाय -दराज (कित्येक वर्षे) तक उसका नाम लेने के भी कोई हिम्मत न कर सके” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 88-89).
    मला वाटते की यापेक्षा अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक बुद्धीमान हिंदू आणि मुस्लिम व्यक्तीने वर नमूद आयात व मौलाना मौदूदी यांच्या वक्तव्याच्या कसोटीवरच हिंदू व मुस्लिम दोघांचा अतीराष्ट्रवाद देशासाठी कितपत योग्य आहे याचा विचार करावा. जय हिंद!

- राम पुनियानी
राजकीय शक्ती आपला अजेंडा रेटण्यासाठी इतिहासाचा नेहमीच दुरूपयोग करित असते. हे लोक भुतकाळात घडलेल्या घटनांसंबंधी आपला स्वार्थ साधण्यासाठी चक्क खोटं बोलण्यासही मागे पुढे पहात नाहीत. जिथपर्यंत इतिहासाचा संबंध आहे त्यावर हा सिद्धांत लागू होत नाही की, ’सत्य पवित्र आहे, मत स्वतंत्र आहे’ तुम्ही सत्याची प्रताडना करू शकत नाही मात्र त्याचा अर्थ लावण्यात तुम्ही स्वतंत्र असता. मोदी आणि त्यांच्यासारख्या विचाराच्या अन्य लोकांसाठी, ’ प्रेम आणि युद्धात सर्व क्षम्य आहे.’ आपल्या व्यक्तिगत महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या राजनैतिक अजेंड्याला लागू करण्यासाठी मोदींनी अनेक सीमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरदार पटेल यांचे उदात्तीकरण करण्यासाठी ते जवाहरलाल नेहरूंची उंची कमी करण्याचा प्रयत्न करित आलेले आहेत. या दोन्ही नेत्यांना एकमेकाचे प्रतिद्वंद्वी सिद्ध करण्यासाठी ते सिद्ध झालेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, ’ मोदी परिवाराने’ कधीही भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग नोंदविलेला नाही. म्हणून ते पटेलांना आपलेसे करून ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर दूसरे हे की, मोदी हे जाणून आहेत की, पटेल यांचे मत होते की, मोदींचे ’वैचारिक पितामह (हिंदू महासभा-आरएसएस) महात्मा गांधीच्या हत्येसाठी जबाबदार होते. या दोन्ही संस्थांच्या हालचालीमुळे देशात एक असे वातावरण बनले होते की ही मोठी घटना घडून गेली. आरएसएसच्या हालचाली सरकार आणि राज्याच्या अस्तित्वासाठी एक संकट आहे.’
    राहता राहिला प्रश्न देशाच्या विभाजनाचा तर त्यासंबंधी अनेक विद्वत्तापूर्ण पुस्तके आणि लेख उपलब्ध आहेत. जे वाचकांना फक्त विभाजनाच्या पार्श्वभूमीशीच परिचित करत नाहीत तर हे ही सांगतात की, विभाजन अनेक किचकट प्रक्रिया आणि कारणांमुळे झाले. तुम्ही तुमच्या सोयीने त्यातील एखादे कारण वेचून आपल्या मनाप्रमाणे चित्र तयार करू शकता. मुहम्मद अली जीन्नांच्या समर्थकांच्या दृष्टीकोनातून देशाच्या विभाजनासाठी काँग्रेस जबाबदार होती. मोदीही जीन्नांच्या समर्थकांप्रमाणे काँग्रेसलाच विभाजनासाठी जबाबदार धरतात. वास्तविक पाहता विभाजनामागे तीन प्रमुख कारणे होती. एक - इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा निती. याबाबतीत असे म्हणता येईल की, इंग्रज भारतीयांना चांगल्या प्रकारे जाणून होते. त्यांना हे माहित होते की, भारतीय राजकीय नेतृत्वाचा कल समाजवादाकडे आहे आणि त्यांना भिती होती की स्वातंत्र्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय समाजवादी नेतृत्व असणार्या रशियाकडे झुकेल. आपल्या साम्राज्यवादी हितांच्या रक्षणासाठी इंग्रजांची अशी इच्छा होती दक्षिण आशियातील एक देश कायम त्यांच्या पाठीमागे रहावा आणि पाकिस्तानने ही भूमिका चांगल्या प्रकारे वठविली. पाकिस्तानमुळे ब्रिटिशांना आपले उद्देशपुर्ती करणे सहज शक्य झाले. दूसरे कारण असे की,  सावरकर जे की, मोदीच्या विचारधारेचे मूळ प्रतिपादक होते. त्यांनी द्विराष्ट्राच्या सिद्धांताची मांडणी केली होती. तीसरे कारण असे की, जीन्नांचीसुद्धा हीच भूमिका होती की मुस्लिम एक वेगळे राष्ट्र आहे. म्हणून त्यांचा एक वेगळा देश असावयास हवा.
    ’गिल्ट मेन ऑफ इंडियाज पार्टीशन’ या पुस्तकाचे लेखक लोहिया लिहितात की, ’ हिंदू कट्टरवाद त्या शक्तींमध्ये सामील होता ज्यांनी देशाचे विभाजन केले. जे लोक आज ओरडून अखंड भारताची मागणी करीत आहेत. अर्थात जनसंघ (भाजपचा पूर्व अवतार) आणि त्यांच्या पूर्ववर्तीयांनी जे हिंदू धर्मातील बिगर हिंदू परंपरेचे वाहक होते यांनी भारताच्या विभाजनासाठी इंग्रज आणि मुस्लिम लीगची मदत केली होती. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणून देश एकसंघ ठेवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचे परस्पर संबंध खराब करण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न केले आणि दोन समुदायातील हेच मतभेद विभाजनाचे मूळ कारण ठरले. वेळेबरोबर जीन्नांनीही मग पाकिस्तानच्या आपल्या मागणीवर ठाम राहत आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली. नेहरूंनी कॅबिनेट मिशन योजनेला ते बांधिल नाहीत हे स्पष्ट केल्यानंतर तर जीन्नांनी पाकिस्तान निर्मितीसाठी स्पष्ट भूमिका घेतली. आणि आपल्या या भूमिकेपासून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.
    ज्यावेळेस इंग्रज हे कुटिल डाव खेळत होते त्यावेळेस महात्मा गांधी हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये पेटलेल्या हिंसेच्या आगीला शमविण्यात व्यस्त होते. त्यांनी विभाजनाचा मुद्दा हाताळण्यासाठी आपले दोन विश्वस्त सहकारी सरदार पटेल आणि नेहरू यांना नेमले होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपले विद्वत्तापूर्ण पुस्तक, ’ इंडिया विन्स फ्रिडम’ मध्ये म्हटलेले आहे की, ”सरदार पटेल हे पहिले प्रमुख काँग्रेसी नेता होते ज्यांनी भारताच्या विभाजनाच्या इंग्रजांच्या योजनेचे समर्थन केले.” मौलाना आझाद यांनी विभाजनाच्या योजनेचा कधी स्विकार केला नाही. शेवटी गांधींनी मोठ्या खिन्न मनाने विभाजनाच्या योजनेला स्विकृती दिली. तरीसुद्धा त्यांना ही आशा होती की, भारत कधी ना कधी पुन्हा एक देश होईल. मोदींच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री एम.जे. अकबर यांनी नेहरूवरील आपल्या पुस्तकात ज्याचे नाव ’ नेहरू-द मेकिंग ऑफ इंडिया’ (1988) आहे. मध्ये लिहिलेले आहे की,”भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रणयी नेहरूंच्या फारपूर्वी देशाच्या विभाजनाचा स्वीकार केला होता.” (पान क्रं. 406).
    आपल्या सर्वांना हे ही माहित आहे की, मोदींच्या पक्षाचेच एक मोठे नेते जसवंत सिंग यांनी आपले पुस्तक,’ जीन्नाह-पार्टीशन-इंडिपेन्डन्स’ मध्ये सरदार पटेलांच्या भूमिकेची चर्चा करताना लिहिले आहे की, ’पटेलांनी निर्माण झालेल्या परिस्थितीसमोर लवचिक भूमिका घेवून विभाजनाचा स्वीकार केला.’ हेच कारण आहे की, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांंनी या पुस्तकावर आपल्या राज्यात बंदी घातली होती.
    काश्मीर खोर्याच्या प्रश्नाबाबत जेवढे कमी बोलले जाईल तेवढे चांगले. हा प्रश्न ऐतिहासिक परिस्थितीची देण आहे. काश्मीर एक मुस्लिम बहुल राज्य होते. परंतु, ते राज्य पाकिस्तानात जावू इच्छित नव्हते. पाकिस्तानी सेनेच्या सह्योगाने काही टोळ्यांद्वारा काश्मीरवर आक्रमण झाल्यानंतर महाराजा हरिसिंग यांनी भारताची मदत मागितली होती. शेख अब्दुल्ला यांना वाटत होते की, भारताने मदत करावी. या प्रश्नावर पटेल आणि नेहरू यांचाही विचार एकच होता. मात्र पटेल काश्मीर खोर्यावर भारताचा दावा सोडण्यासाठी तयार होते. राजमोहन गांधी यांनी पटेलांचे चरित्र ’पटेल-ए-लाईफ’ लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, पटेलांची अशी भूमिका होती की, जीन्नाह जर हैद्राबाद आणि जुनागड यांना भारतात विलीन होण्यासाठी मान्यता देत असतील तर काश्मीरचे पाकिस्तानात विलय करण्यासाठी त्यांना कुठलीही आपत्ती नव्हती. त्यांनी जुनागडच्या बहाउद्दीन महाविद्यालयात दिलेल्या एका भाषणाचा दाखला देत म्हणतात की, ” हम कश्मीर पर राजी हो जाएंगे, अगर वो हैद्राबाद के बारे में हमारी बात मान ले” (पान क्र. 406-408). हे भाषण सरदार पटेल यांनी भारतामध्ये जुनागडच्या विलीनीकरणानंतर दिले होते.
    नेहरू आणि पटेल यांच्या संबंधाबाबतीत सर्वात महत्वपूर्ण कथन राष्ट्रपिताच्या महात्मा गांधींचे आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना एकदा त्यांनी म्हटले होते की, ”मोटे तौर पर कहें तो कश्मीर समेत सभी मामलों में पटेल और नेहरू की सोंच एक जैसी थी.’ मोदी एक खोटी गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगून तिला खरी सिद्ध करू पहात आहेत. ते ही फक्त यासाठी की, त्यात त्यांना स्वतःचा लाभ दिसतो.
    (लेखातील काही संदर्भ सुधिंद्र कुलकर्णी लिखित पुस्तक ’मोदीज् डिसलाईक फॉर नेहरू कॅन नॉट ओब्लीटिरेट द फॅक्टस्’मधून साभार).
    (सदर लेखाचा इंग्रजीतीतून हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया व हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले.)

नगीना ना़ज साखरकर
9769600126
लव जिहाद ही संज्ञा कुठल्याच पुस्तकात नाही. हा शब्द सर्वप्रथम केरळमधून समोर आला आणि भारतभर पसरला. या
शब्दावरून 2013 ची मुज्जफरनगरची दंगल घडली. या शब्दाबद्दल कधीच कुठल्याच मुस्लिम व्यक्तिने विचारसुद्धा केला नसावा. हे जरूर आहे की अगदी प्राचीन काळापासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये प्रेम प्रसंग आणि त्यातून लग्न करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. अनेक लग्न यशस्वीसुद्धा झालेली आहेत. वास्तविक पाहता इस्लाममध्ये लग्नापूर्वी प्रेम करण्याची परवानगीच नाही. ज्या मुलीशी लग्न करावयाचे आहे तिला सर्व नातेवाईकांसमक्ष एक नजर पाहून घेण्याची परवानगी  आहे. मात्र प्रेमाशिवाय लग्न होवूच शकत नाही, हे आधुनिक समीकरण इस्लामला मान्य नाही. प्रेम करणे तर लांबच राहिले, परस्त्रीकडे टक लावून बघणेसुद्धा इस्लामला मान्य नाही. हे सर्व मुस्लिम समाज जाणून आहे. अशा पार्श्वभूमीवर काही दक्षीणपंथी संस्थांचा हा आरोप की मुस्लिम तरूणांना टू व्हीलर्स व काही पैसे देवून मुस्लिमेत्तर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या कामाला लावले जाते व त्याला लवजिहाद म्हणतात. अशा पद्धतीने मुस्लिमेत्तर मुलींना मुस्लिम बनविण्याचे व्यापक षडयंत्र रचण्यात आलेले आहे, हा आरोप हास्यास्पदच नव्हे तर मुस्लिमेत्तर मुलींचा अपमान करणारा सुद्धा आहे. मुस्लिम पालकांना आपल्या मुलांना शिकविण्याचे सोडून हे असले प्रकार करायला लावणे परवडणारे नाही. एवढी साधी समज आरोप करणार्यांना नाही.
    अल्पवयीन मुलींना गाठून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून, गरोदर करून सोडणारे लोक सर्व समाजात मुठभर का असेना आहेत. काही विकृत मानसिकता असलेले लोक असले अश्लाघ्य प्रकार करीत असतात. पण त्यात मुस्लिम तरूणाांच सहभाग अपवादानेच आढळतो. ते ही नामधारी मुस्लिम असतात. इस्लामची खरी शिकवण त्यांच्यात उतरलेली नसते. कारण ज्याच्या मनामध्ये इस्लामची शिकवण उतरते तो स्वतः होवून वाम मार्गापासून दूर राहतो. त्याला कायद्याचीही गरज लागत नाही. त्याच्यामध्ये एवढी नैतिकता असते की, कायद्याची भीती दाखविण्याची गरजच पडत नाही. भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंत बिगर मुस्लिम तरूण-तरूणींचे मुस्लिम धर्मात होणारे स्वेच्छेने धर्मांतर हा याचा पुरावा आहे.
    इस्लाममध्ये लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणे हा अत्यंत घृणास्पद गुन्हा मानला गेलेला असून, शरियतने त्याला शंभर फटक्यांची शिक्षा फरमाविलेली आहे. केवळ लग्नासाठी इस्लामधर्म स्विकारणे याला सुद्धा इस्लाममध्ये मान्यता नाही. कोणालाही जबरदस्तीने मुस्लिम बनविता येत नाही. स्वेच्छेने इस्लामचा अभ्यास करून त्यातील स्वच्छ, साधी व तणावरहीत जीवन व्यवस्था आवडल्याने जर कोणी मुस्लिम होवू इच्छित असेल तरच त्याचे धर्मांतर हे वैध मानले जाते, अन्यथा नाही. इस्लामी विचारधारा स्वतःच इतकी शक्तीशाली आहे की, इतरांना या धर्मामध्ये आणण्यासाठी लवजिहाद सारखे तदन् फालतू प्रकार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आजकाल सैतानाचे राज्य चालू आहे. लग्नाशिवाय स्त्री पुरूषांमध्ये उघडपणे असलेल्या संबंधांना प्रेमाचे गोंडस नाव देण्यात येत आहे. विशेष म्हणजे समाजातील काही वर्गामध्ये अशा संबंधांना स्वीकारलेले देखील आहे. इस्लामी शिकवणीचा अव्हेर करून प्रेम करणारे महाभाग प्रत्येक काळामध्ये होते. आजही आहेत. याचा इन्कार करता येणे जरी शक्य नसले तरी इस्लामी समाजामध्ये अशा लोकांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही, हे मात्र खरे. अशा संबंधांना मान्यता देणे तर दूरच अशा जोडप्यांकडे तिरस्काराने पाहण्याची पद्धत मुस्लिम समाजात रूढ आहे.
    भारतीय समाज एक संयुक्त समाज आहे. शेकडो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या शेजारी राहतात. यातून हिंदू-मुस्लिम प्रेम संबंधांच्या काही घटना घडणे स्वाभाविक आहे. मात्र याला लव जिहाद म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. मुस्लिम समाजाने अशा प्रेम प्रसंगाच्या घटनांतून अनेक वेळा कटू अनुभव घेतलेला आहे. अनेकवेळेस कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक शालीन मुस्लिम आपल्या पाल्यांच्या अशा कृत्यामुळे तुरूंगामध्ये सुद्धा गेलेले आहेत. अशा वेळेस मुस्लिम समाजाने आपल्या पाल्यांना अशा प्रेम प्रसंगापासून सावध राहण्याची शिकवण देण्याची वेळ येवून ठेपलेली आहे, असे माझे मत आहे. अनेक मुस्लिम मुली हिंदू मुलांबरोबर लग्न करतात व इस्लाम सोडून इतर धर्म स्विकारतात. तेव्हा सर्वकाही शांत असते. मात्र मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी असेल तर लगेच लव जिहादच्या नावाने हाका मारल्या जातात. लोकांना संघटित केले जाते आणि तनाव निर्माण केला जातो. प्रत्येक वेळेस निशाण्यावर मुस्लिमच असतात. प्राचीन काळापासून भारतात एक म्हण प्रचलित आहे की, प्रेम आंधळे असते. त्याला जात, धर्म, समाज काही दिसत नाही. परंतु, तणाव निर्माण करणार्या लोकांच्या लक्षात ही म्हण राहत नाही.
    मुस्लिमांची संख्या वाढविण्यासाठी मुद्दामहून लव जिहादचे प्रकार घडविले जातात. हा आरोप मुळातच चुकीचा आहे. इस्लामचा प्रचार आणि प्रसार हा नैसर्गिकरित्या होतो. हे त्रिकालाबादित सत्य आहे. इस्लामची विचारधारा एवढी जबरदस्त आहे की, ती लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. म्हणून मुस्लिमांची संख्या वाढते. मुस्लिमांना आपली संख्या वाढविण्यासाठी लव जिहादसारखे तद्न फालतू प्रकार करण्याची मुळीच आवश्यकता नाही. काही लोक मुद्दाम असा अपप्रचार करून गरीब मुस्लिमांममध्ये दहशत निर्माण करीत आहेत. सर्वसामान्य हिंदूही या दुष्प्रचाराचे बळी ठरून इस्लाम आणि मुस्लिमांचा द्वेष करीत आहेत. समाजात विष पसरविणार्या या शक्तींपासून दोन्ही समाजांनी सावध राहण्याची गरज आहे. हा एक असा मार्ग आहे ज्याचा कुठेच अंत नाही. हा मार्ग फक्त द्वेष, दुश्मनी आणि विनाशाकडे घेऊन जाणारा आहे.
    आश्चर्य म्हणजे अनेक चित्रपट नट आणि नट्यांनी शिवाय राजकारण्यांनी आंतरधर्मीय लग्न केलेली आहेत व आजही करीत आहेत. सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या लग्नाची घटना तर अगदी ताजी आहे. याला मात्र विरोध झालेला नाही. झाडून सगळे उच्च भ्रू या लग्नाच्या पार्टीला हजर होते. मरण फक्त गरीबांचे होत आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये असे लग्न झाले की लगेच त्याचे पडसाद उमटू लागतात आणि लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. श्रीमंत हिंदू-मुस्लिमांचे प्रेम प्रकरण लव जिहाद ठरत नाहीत. मात्र सर्वसामान्यांचे ठरतात. यापेक्षा मोठे सामाजिक ढोंग दूसरे असूच शकत नाही. खरे पाहता लव जिहादच्या माध्यमातून दोन समाजामध्ये फूट टाकून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा काही संस्था कायम प्रयत्न राहिलेला आहे. जोपर्यंत ही खेळी हिंदू-मुस्लिम समाजाच्या सामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत यापासून होणारे नुकसान दोन्ही समाजांना भोगावे लागणार आहे. खरे पाहता देशाला स्वतंत्र होवून 70 वर्षे झालेली आहेत. मात्र मानसिकदृष्ट्या अजून आपण गुलामगिरीतच आहोत. खरे पाहता लव जिहाद हा शब्द कोणाच्याच जिभेवर यायला नको. कारण याच्यात सत्यता नाही. खोट्या प्रचाराला बळी पडणे ही मानसिक गुलामगिरी नव्हे तर दूसरे काय आहे? लव जिहाद असो का दूसरा आणखीन कुठला आरोप. खोटी गोष्ट पुन्हा-पुन्हा खरी आहे म्हणून सांगितली गेली तर काही काहानंतर सामान्य लोकांना ती खरीच वाटू लागते. आपल्या प्रिय देशाला होणार्या नुकसानापासून वाचविण्यासाठी लव जिहादसारख्या फालतू गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा राष्ट्रनिर्माणाच्या इतर महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची सद्बुद्धी आम्हा सर्वांना अल्लाह देवो हीच प्रार्थना.

    कानपूरच्या एम.के.यू. या नामवंत कंपनीने महाराष्ट्र पोलिसांना कमी दर्जाची बुलेटप्रुफ जाकिटे पाठवून गंभीर प्रकारचा बेजबाबदारपणा केलेला आहे. अशी १ हजार ४३० जाकिटे पुन्हा परत करून त्याऐवजी दर्जेदार जाकिटे मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी केलेली आहे ते त्यातून गंभीर वाटते. २६/११ च्या हल्ल्यानंतर पोलीस दलाला १७ कोटी रुपये किंमतीची पाच हजार बुलेटप्रुफ जाकिटे खरेदी करण्याचे ठरले होते. त्यापैकी १४३० जाकिटांची चंदीगढ येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असता एके ४७ रायफलीमधून गोळ्या झाडतना त्या सरळ आरपार गेल्या. तेव्हा त्याची चौकशी झाली पाहिजे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे अशाच निकृष्ट जाकिटाचे बळी ठरले होते.
    त्याचप्रमाणे बुलेटप्रुफ व्हॅन असलरेल्या माक्र्स व्हॅन, बॉम्ब तसेच अंमली पदार्थांची अचूक माहिती देणारी मोबाइल स्वॅâनर व्हेइकल, बॉम्ब सूट, बुलेटप्रुफ जाकिटे, स्पीड बोटी आणि अत्याधुनिक शस्त्रे यांची पूर्तता करण्यास सुरूवात झालेली आहे. परंतु त्यातही काही गडबडी झाल्याचे ऐकिवात आहे. सरकारी खरेदीमध्ये वशिलेबाजी, कमिशनबाजी, अप्रामाणिक हेतू सर्वत्र आढळत असतो. पण ज्यामध्ये जीव घेण्याचा धोका असतो. तो होणे मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो. दुर्दैवाने असे प्रसंग घडले तर सरकारवरचा विश्वास उडण्याची व अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधल्या कमिशनबाजी व भ्रष्टाचारी यंत्रणेचे पातक देशाच्या प्रतिष्ठेला भोगावे लागते. त्यासाठी ताकही फुंकून प्यावे लागते.
    १७ कोटी रुपये खर्चून पाच हजार बुलेटप्रुफ जाकिटांची खरेदी आणि ७ कोटी रुपये खर्चून पांढरा हत्ती बनलेल्या स्पीड बोटी (मोबाइल स्वॅâनर व्हेइकल) भंगारात दुरुस्तीविना पडलेल्या आहेत. त्याची चौकशी करून असा जीवघेणा प्रकार मुळीच गडणार नाही, अशी पक्की खात्री करून घेण्यात यावी.
- ज्ञानेश्वर भि. गावडे,
फोर्ट, मुंबई.

    कोळे (ता. कराड, जि. सातारा) येथील समीर व सलमा नदाफ हे दांपत्य मुस्लिम मसाजासाठी आदर्श आहेत, असे त्यांचे कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी आहे. त्यांनी तब्बल २४ भीक मागणाऱ्या लहान अनाथ बेवारस मुलांना मांडीवर घेऊन त्यांचे संगोपन केले आहे. दोन दिवसाचे अर्भक उघड्यावर फेकले होते आणि दोन कुत्री त्याचे लचके तोडीत होती, ते दृश्य बघून समीर नदाफ यांच्या आयुष्यालाच कलाटनी मिळाली आणि त्यांनी अनाथ, बेवारस मुलांची ‘परवरीश’ करण्याचा विडा उचलला. २५ एप्रिल २०१५ पासून त्यांनी या ‘सवाब-ए-जारीया’ (निरंतर पुण्यकार्य) ला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून अनाथालय सुरू केले. नंतर सातारा, सांगली, कागल, मुंबई, कर्नाटक येथून भीक मागत फिरणारी तब्बल २४ मुले आणली. कोणाची आई मनोरुग्ण आहे, तर कुणाला आईबाप नाहीत, कुणाची माय शरीरविक्रय करणारी अशी वंचित मुले आता समीर-सलमांच्या अनाथालयात राहात आहेत. ही मुले आता शाळा शिकत आहेत. सलमा रोज पहाटे पाच वाजता उठतात व मुलांची काळजी घेतात. रोज सकाळी व रात्री आठ ही मुलांना जेवण देण्याची वेळ त्या नित्यनेमाने पाळतात. मुले भरपेट जेवल्याखेरीज दोघांच्या घशातून अन्नाचा घास खाली उतरत नाही. त्यांची स्वत:ची तीन मुलेही त्यात मिसळून गेली आहेत. अनाथ मुलांना त्यांनी स्वत:चे नाव दिले असून ही मुलेही स्वत:च्या नावापुढे वडील म्हणून समीर यांचे नाव अभिमानाने घेतात. ज्या कोणास समाजातील लोक अशी कामे करतात त्या समाजाला अल्लाहशिवाय कुणीच हटवू वा मिटवू शकत नाही, हाच यातून बोध!        - निसार मोमीन, पुणे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाइनला भेट देऊन भारत देश स्वातंत्र्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला कटिबद्ध असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. मोदींच्या इस्रायल भेटीदरम्यान यहुदीवादी प्रसारमाध्यमांनी अरब व मुस्लिम राष्ट्रांना खिजविण्याचा आणि पॅलेस्टाइनला हिरमुसले करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाइनला भेट देऊन भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि जागतिक हितसंबंध जपणारे आहे, हे जगाला दाखवून दिले आहे.
    इस्रायलशी संबंध मजबूत करताना पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याला भारताने वाऱ्यावर सोडलेले नाही हेही यातून निष्पन्न झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या भारतभेटीच्या वेळीच भारताने आपला पॅलेस्टाइनचा दौरा जाहीर केला होता यावरून पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याविषयी भारताचे गांभीर्य अधोरेखित झाले होते. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित करण्याला भारताने राष्ट्रसंघात नकार दिला आहे. तेव्हा इस्रायल व अमेरिकेच्या दबावाखाली भारत आला नाही, हे विशेष!
    जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला हे वर्तन शोभणारे आणि साजेसे तसेच समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे!
- निसार मोमीन, पुणे.

- मिनहाज शेख
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘नशा आणणारी प्रत्येक वस्तू निषिद्ध आहे की जी तुमच्या अकलेला झाकून टाकते.’’
                                 (हदीस : इब्ने माजा)
प्रेषितांच्या या कथनातून हे सिद्ध होते की नशेच्या व व्यसनाच्या सर्व गोष्टी मनुष्यासाठी वाईट, पाप मानल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये पुढील सर्व गोष्टींचा समावेश होतो. जसे- दारू, चरस, गांजा, तंबाखू, विडी, सिगरेट, अफीम, गुटखा, ड्रग्ज इ.
    आज आपल्या समाजाला अधोगतीला नेणाऱ्या कारणांमध्ये ‘व्यसन’ एक प्रमुख कारण आढलते. विशेषत: तरुणवर्गामध्ये. म्हणजे अल्लाहने माणसाला जे काही कौशल्य, शक्ती, पैसा, वेळ, कार्यक्षमता या चांगल्या गोष्टी समाजकल्याणासाठी दिल्या, त्या सत्कारणी न लावता त्या व्यसननाच्या चक्रव्यूहात अडकून वाया जात आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचे व्यसन हा एक आजार आहे. तो बाटलीमध्ये विकला जातो, टी.व्ही.वर दाखविला जातो आणि स्टंट्स सिंबॉल म्हणून मिरविला जातो.
वस्तुस्थिती दर्शविणारे काही मुद्दे-
 सर्वांत जास्त शिविगाळ करणारे – दारूडे.
 सर्वांत जास्त अपराध्यांचे प्रमाण – नशेच्या अंमलाखाली.
 खून, मारामारी, चोरी इ. घटना – नशेच्या अंमलाखाली
 नात्याच्या मुली व स्त्रियांवर बलात्कार – नशा करणारे नातेवाईक.
 आईवडिलांवर हात उचलणारे – नशेखोर मतीभ्रष्ट अपत्ये.
    या काही ठळक वस्तुस्थितींचे परीक्षण करा तेव्हा लक्षात येईल की एक सामान्य व्यक्ती नशेच्या प्रभावाखाली कशी शैतानी कृत्ये करतो. विज्ञानाच्या आधारेसुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यानुसार आपल्या मेंदूमध्ये ‘इनहिबिटरी सेंटर’ नावाचे एक केंद्र असते, जे आपल्या योग्य-अयोग्य गोष्टींची समज देत असते. उदा.: एका सामान्य माणसाला लघुशंकेची गरज निर्माण झाली तर तो सर्वांसमोर न करतो रोखून ठेवतो. परंतु नशेच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती असे कृत्य कुठेही व कधीही करू शकते, कारण तिचा मेंदू सक्षम निर्णय घेऊ शकत नाही आणि याच अवस्थेमध्ये व्यसनी मनुष्य अति वाईट गोष्टी वा गंभीर गुन्हे सहज करीत असतो. उदा.: स्वत:च्या मूलीवर बलात्कार करणाऱ्या ९९ टक्के व्यक्ती नशेच्या अंमलाखाली असल्याचे आढळून आले आहे. अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आज होत आहेत, हे आमचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
    एक कुटुंब दारूच्या व्यसनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असल्याचे मनात आणा. पत्नी विधवा, मुले झोपडपट्टीत फिरणारी... वगैरे. निश्चितच क्षणार्धात अशी बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर तरळून गेली असतील! मग ती नात्यातील, मित्रांपैकी, शेजारी अथवा कामवालीच्या घरातील असो. आज तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इतर आजारांपेक्षा जास्त आहे. उलट अशा घटनांमध्ये मरणारी व्यक्ती आपल्या कुटुंबालादेखील मरणयातना देऊन जाते. पत्नीला मारहाण होते, मुलांचे शिक्षण सुटते. एका आदर्श समाजाचे भवितव्य बनू पाहणारी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात.
    हदीसमध्ये एका प्रसंगाचा उल्लेख आला आहे तो असा,
    एकदा एका सदाचारी पुरुषाला एक स्त्री अनैतिक संबंधासाठी बोलविते, पण तो पुरुष त्यास नकार देतो. तेव्हा ती त्या पुरुषाला बळजबरीने घरात ओढते आणि त्याच्यासमोर तीन पर्याय ठेवते- एक तर तू माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव, दुसरा पर्याय तिच्याकडे एक लहान मूल असते त्याची हत्या कर किंवा तिसरा पर्याय म्हणजे तिच्याकडे जी मदिरा आहे तिचे प्राशन कर. तेव्हा तो भला माणूस विचार करतो की पहिल्या दोन पर्यायांपेक्षा तिसरा पर्याय कमी पापाचा आहे. म्हणून तो मदिरा पितो आणि पीतच जातो. मग त्या नशेच्या अवस्थेत तो तिच्याबरोबर संबंधदेखील ठेवतो आणि त्या लहान मुलाची हत्याही करतो. यावरून कळते की नशा कशा प्रकारे इतर गुन्ह्यांचे मूळ आहे.
    महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमची तरुण पिढी सिगारेट ओढण्यासारख्या सवयींना व्यसन मानत नाही. ते हे किरकोळ कृत्य असल्याचे समजते. त्यांना हे व्यसन हौस व मजा वाटते. हीच मजा फुप्फुस, हृदय, किटनी, लिव्हर सगळे काही नष्ट करून टाकते. तंबाखू आणि गुठख्यामुळे होणारे वॅâन्सर सर्वांत जास्त नोंदविले गेले आहेत.
    ‘मी फक्त सोशल ड्रकिंर आहे’ असे म्हणणाऱ्यांनी समजून घ्यावे की सर्वच पिणारे हे सुरूवातीला सोशल ड्रकिंर असतात किंवा चेन स्मोकिंग करणारेदेखील सुरूवातीला कधीतरी ओढवणारेच असतात.
    ‘‘आपल्या हातांनी आपला सत्यानाश करू नका.’’ (कुरआन, २:१९५)
    माणूस स्वत:हून स्वत:ला कधी हातोडा मारून घेतो का? सुरीवर पाय ठेवतो का? नाही ना... मग या नशेच्या सवयीच्या परिणामाची कल्पना असूनही तो या जाळ्यात कसा ओढला जातो? इथे जबाबदजारी सरकारचीसुद्धा आहे. दारूमुळे समाजाचे किती नुसान होत आहे हे सरकारला का दिसत नाही? दारूबंदी केल्याने समाजातील इतर बऱ्याच समस्या कमी होतील हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण सरकारच्या तिजोरीत दारूवरील कर जमा होतो... अरे! जेवढ्या मोठ्याने ओरडून तुम्ही मांसाहाराचे तोटे सांगता, तेवढी मेहनत दारूसाठी लावाल तर खरेच समाजाचे भले होईल हो! इतर काही देशांत सरकारने दारूबंदी केलेली आहे. त्यांचे उदाहरण सरकारने घ्यावे. फक्त वर्षातून दोनदा ‘ड्राय डे’ साजरा करून काय पदरी पडणार?
    ‘दारू व सिगारेट हे तुमच्या तब्बेतीसाठी हानिकारक आहे.’ बस्स... फक्त एवढे लहानशा अक्षरांत छापायचे आणि जबाबदारीपासून हात झटकून मोकळे व्हायचे एवढीच आमच्या सरकारीच भूमिका!
    समाजाला नशेपासून मुक्त करण्यासाठी आम्ही काय करू शकतो?
१)    नशा किंवा व्यसन ही एक दलदल आहे. यातून बाहेर पडणे खूप अवघड असते. म्हणून मुलांना त्या दलदलीकडे जाण्यापूर्वीच रोखले पाहिजे. आपण त्यांना सर्व जगाचे शिक्षण देतो, पण कुरआनच्यिा शिकवणीकडे तितके लक्ष देत नाही. त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर सालेय शिक्षणासह त्यांना नैतिक शिक्षणही दिले जावे. नशेच्या गोष्टी वाईट आणि वाईटच आहेत हे संस्कार त्यांच्या मनावर बिंबविले पाहिजेत, जेणेकरून तरुण वयात जर का त्यांच्यासमोर या गोष्टी आल्या आणि येणारच, तर त्यांनी गंभीरतेने विचार करून यापासून दूर राहावे.
२)    मुलांना सतत रागविणे, दबाव टाकणे, अपेक्षा लादणे, त्यांना वेळ न देणे, या गोष्टी आजकाल खूप वाढल्या आहेत. पाल्य व पालक दोघांचाही संयमाचा आलेख खालावला आहे. अशा स्थितीत ज्या मुलांना, तरुणांना घरी परिपूर्ण वातावरण मिळत नाही ती मुले बाहेर भरकटण्याची, नशेच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते. त्या उलट घरात एक सुरक्षित आनंदित वातावरण निर्माण करावे. मुलांना इतका वेळ व हिंमत द्यावी की उद्या जर एखाद्या वेळी त्यांच्या बाबतीत काही चूक घडलीच, जसे- नापास होणे, व्यवसायातील अपयश, इ. तर त्यांनी तुम्हाला ते सर्व मनमोकळेपणाने सांगावे. नाहीतर चुकीच्या मित्रांमध्ये या भावना ते व्यक्त करतात आणि नशेकडे ओढले जाऊ शकतात.
३)    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर का पालकांना समजलेच की आपला मुलगा वा मुलगी नशेच्या आहारी गेले आहेत, तर मग पुढे काय? अशा बिकट परिस्थितीत संयमाने काम घेतले पाहिजे, द्वेषाने नव्हे.
हजरत उमर (रजि.) यांचे याबाबतीत खूप मोलाचे विचार हदीसच्या पुरस्तकात आढळतात. ते म्हणतात, अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला समजविण्याचा प्रयत्न करा. त्याला अल्लाहची दया व शिक्षा दोन्ही गोष्टींचा भरवसा द्या आणि अल्लाहची क्षमा मागा आणि या उलट त्या व्यक्तीला तुम्ही भलेबुरे बोलू नका, त्याला संताप व राग देऊ नका. नाही तर तो दूर निघून जाईल आणि शैतानची मदत होईल आणि त्याचे काम जास्त सेपे होईल.
    अशा व्यक्तीसाठी ‘समुपदेषन केंद्र’ व ‘व्यसन मुक्ती केंद्र’ इत्यादी काही सामाजिक संस्था कार्य करत आहेत. त्यांची मदत घ्यावी. या सर्वांमध्ये आयुष्यातील काही महत्त्वाचा काळ खर्ची जातो, पण तोल गेलेला माणूस स्वत:ला सावरायला शिकतो.
४)    कुरआनच्या पहिल्याच अध्यायात अल्लाहकडे मनुष्य प्रार्थना करतो की ‘मला सरळमार्ग दाखव.’ (१:५)
    मग एकदा का हा सरळमार्ग आम्हाला मिळाला तर तिथे ठाम राहा आणि नुसते तिथे थांबू नका तर चालत राहा आणि आपल्या बरोबरच इतर सर्वांनाही या मार्गावर बोलवा. हेच कुरआन सांगतो.
    जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्वेक्षणानुसार,
 प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतीयाचा मृत्यू दारूमुळे होतो.
 रोज ९० आत्महत्या नशेच्या अंमलाखाली भारतात होतात.
 ७२ टक्के अपघात दारू पिलेल्या चालकांमुळे होतात.
 ४० टक्के कर्करोग तंबाखू सेवनामुळे होतात, तोंडाचे, घशाचे कर्वâरोग.
 रोज ५०० नवीन मुले / तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जातात.
 १० दशलक्ष भारतीय अंमली पदार्थांचे सेवन करतात. ही संख्या स्वीडन या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.

–सुनीलकुमार सरनाईक
शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम  सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली. त्यामध्ये स्वकीय मुस्लिम होते. तसेच शत्रूकडील मुास्लिम देखील होते. त्यांनी शिवरायांना युद्धात मदत केली. सुख-दु:खात मदत केली. शिवरायांचे नेतृत्व त्यांनी आनंदाने आणि निरपेक्ष भावनेने मानले. `शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरुद्ध होते.' `ते हिंदू धर्मरक्षक होते.' `हिंदू पदपातशहा होते.', `गोब्राह्मण प्रतिपालक होते'' अशी प्रतिमा रंगवून छत्रपती शिवरायांना एका ठराविक चौकटीत बसविण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला आहे. पण शिवरायांच्या पदरी असणारे निष्ठावंत व नेक दिलाचे इमानदार मुस्लिममावळे पाहिल्यावर तसेच तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केल्यावर उपरोक्त प्रतिमेचे खंडन होते.
१) सिद्दी अंबर वहाब : हे हवालदार असून १६४७ साली कोंडाणा किल्ला जकिंण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली.
२) नूरखान बेग : हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनोबत होते. त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रूबरोबर प्राणपणानेला दिला.
३) सिद्दी इब्राहीम : हे शिवरायांचे अंगरक्षक होते. अंगरक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे. अशी महत्त्वाची जबाबदारी ज्या अंगरक्षकांकडे होती त्यामध्ये सिद्दी इब्राहीम एक होते. अफजल खान भेटीच्या प्रसंगी सिद्धी इब्राहीम यांनी राजांचे अंगरक्षण केले, तर कृष्णाजी कुलकर्णींने शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. १६७५ च्या एप्रिलात सिद्दी इब्राहीम यांनी सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला जकिंला. तेव्हा राजांनी सिद्धी इब्राहीमचा सत्कार केला व त्यांची फोंड्याच्या किल्लेदारपदी नेमणूक केली.
४) सिद्दी हिलाल : हे शिवरायांच्या घोडदलात सेनापती होते. शिवाजीराजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्धी हिलालने सिद्दी जौहर बरोबर लढा दिला. उमराणीजवळ प्रतापरावांच्या सोबत बेहलोलखानाशी लढा दिला.
५) सिद्दी वाहवाह : हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडिलांच्यासोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते. सिद्दी जौहरशी लढताना ते जखमी झाले, त्यांना कैद करण्यात आले. शिवरायांची सुटका व्हावी, यासाठी या युवकाने प्राण गमावले, पण सिद्दी जौहरला शरण गेला नाही.
६) रुस्तुमेजमान : रुस्तुमेजमान हे शहाजीराजांचे जिवलग मित्र रनदुल्लाखान यांचे पुत्र होते. तसेच ते शिवाजीराजांचे आदिलशाही दरबारातील जिवलग मित्र होते. अफ जलखान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे. ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तुमेजमानने सांगितली. रुस्तुमेजमानने राजांना हुबळीच्या ल्यात मदत केली. तसेच सिद्दी मसऊदच्या संकटाची बातमी राजांना प्रथम रुस्तुमे जमाननेच सांगितली. रुस्तुमे जमानने राजांना प्रामाणिक मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला.
७) मदारी मेहत्तर : मदारी मेहत्तर हे राजांचे विश्वासू मित्र होते. १७ ऑगस्ट १६६३ रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालून राजांना मदत केली. त्यात मदारी पकडले गेले. औरंगजेबाच्या सैनिकांनी मदारीला पाट फुटेपर्यंत मारले पण मदारीने राजे कोठे गेले सांगितले नाही. अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला. तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले.
८) काझी हैदर : हे शिवरायांचे १६७० ते ७३ पर्यंत वकील होते. त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले. फारसी पत्रलेखनाची जबाबदारी राजांनी त्यांचेवर सोपविली. वकील, सचिव, पत्रलेखक इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे किती विश्वासू मित्र असतील, याचा वाचकांनीच विचार करावा.
९) शखा खान : हे शिवरायांचे सरदार होते. मोगलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शखाखानने प्राणाची बाजी मारली.
१०) दौलतखान : हे शिवरायांच्या आरमारदलाचे प्रमुख होते. यांनी १६८० साली उंदेरीवर हल्ला केला. पराक्रम गाजविला. १६७४ साली सिद्धी संबुलचा पराभव केला.
११) दर्यासारंग : हे शिवरायांच्या आरमाराचे सुभेदार होते. यांनी खांदेरीवर विजय मिळविला. बसनूर जकिंण्यास मदत केली.
१२) हुसेनखा मियाना : हे शिवरायांच्या लष्करातील अधिकारी होते. यांनी मसौदखानाच्या अदोनी प्रांतावर हल्ला केला व १६७१ साली बिळगी, जमिंखड आणि धारवाड जिंकले.
१३) इब्राहीम खान : हे आरमारातील अधिकारी होते. दर्यासारंग यांच्याबरोबर शत्रूशी लढा दिला.
१४) सिद्धी मिस्त्री : हेदेखील शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते.
१५) सुलतान खान : हे आरमारात अधिकारी होते. तर १६८१ साली सुभेदार झाले.
१६) दाऊत खान : हेदेखील आरमारात सुलतान खानानंतर सुभेदार झाले. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळविला.
१७) इब्राहीम खान : हे राजांचे तोफखानाप्रमुख होते. अनेक लायात तोफांचा वापर करुन शत्रूला पराभूत करण्यात इब्राहीम खानाचा मोठा वाटा आहे.
१८) चित्रकार मीर महंमद : हे शिवकालीन चित्रकार असून शिवाजीराजांचे जगातील पहिले आणि प्रत्यक्ष चित्र मीर महंमद यांनीच रेखाटले. मीर महंमद यांनी शिवाजीराजांचे चित्र नसते रेखाटले तर आज आपणाला राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते.
१९) मौनीबाबा आणि बाबा याकूत : पाटगावचे मौनीबाबा आणि केळशीचे बाबा याकूत हे मुस्लिमसंत शिवरायांचे हितिंचतक होते. त्यांच्या भेटीसाठी शिवाजीराजे पाटगावला आणि केळशीला अनेकवेळा गेले. त्यांनी शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
    या सर्वांहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरुन मुस्लिमधर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे  धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या `शककर्ता शिवाजी' या पुस्तकातील हा उतारा पाहा,
    ``....सन १६४८ च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले पाचसातशे पठाण शिवाजींकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला, तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला,
    ``तुमचा लौकिक ऐकू न हे लोक आले आहेत त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे त्यांचा संग्रह करुन ठेवावे.'' १६४८ मध्ये अजून शिवाजीचं संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरुन व्यक्त होतं.
    ग्रँड डफ नेसुद्धा त्यांच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करुन म्हटले आहे की....
    ''शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिमधर्मीयांचासुद्धा भरणा होता. हे यावरुन स्पष्ट व्हावे. शिवाजी हा मुस्लिमधर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिमशिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिमराज्यकत्र्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुास्लिमसुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते.’’
    धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता. राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती. राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिमसरदार व मावळे होते, तसेच मुस्लिमराजवटीत शहेनशहांच्या पदरी अगणित मराठे, हिंदू सरदार व सैन्य होते.
    प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे किंवा धर्मासाठी लाया होत नव्हत्या, राज्य मिळविणे व ते टिकविणे हेच मुख्य कारण होते, अर्थात त्याकाळी `धर्मबुडवे', `धर्मकेष्टे' किंवा `मुास्लिमधार्जिणे' असे कुणी म्हणत नव्हते, धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला फारच महत्त्व व मान्यता होती.
(लेखक भारत सरकारतर्फे  स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून  लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

-शाहजहान मगदुम
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच बडोदे येथे पार पडले. विचारांचे आणि मनामनाचे मिलन म्हणजेच साहित्य होय. कसदार साहित्यिक जेव्हा आपल्या वक्तव्याद्वारे किंवा लेखणीद्वारे व्यवस्थेवर शब्दप्रहार करतो तेव्हा निश्चितच राजकारणी व सत्ताधारी मंडळी त्याला काळ्या यादीत टाकून देतात किंवा त्याला एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद देऊन त्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. अशा या गळचेपीला न घाबरता सरकारच्या उत्तरदायित्वाची परखडपणे जाणीव करून देणारे विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख निश्चिच कौतुकास पात्र ठरतात. शोषण करणारी व्यवस्था बदलली पाहिजे, असे सांगण्याचा अधिकार लेखकाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचे कुरूप फळ आहे. एकेक शेतकऱ्याचे जगणे आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणे व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. आपल्या भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचे उच्चाटन केले आहे पण ७० वर्षे झाली तरी तथाकथित वरिष्ठ जातिजमातीची मानसिकता फारशी बदललेली नाहीय. दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१८ च्या प्रथम दिवशी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जमा झालेल्या लाखो दलित बांधवांच्या अभिवादन समारंभाच्या निमित्ताने झालेली दंगल पाहता उच्चवर्णीय हिंदू समाजास संविधानाच्या शस्त्राने व शिक्षणामुळे आलेल्या आत्मभानातून जागी झालेली दलित अस्मिता सहन होत नाही. ही का केवळ त्या समाजाची शोकांतिका आहे? नव्हे, ती सर्व भारताची शोकांतिका आहे. जे भारतीय संविधानानं त्यांना दिलेले अधिकार मागत आहेत. त्यासाठी संघर्ष व्हावा, हे भारतीय समाजाला एकविसाव्या शतकात शोभत नाही. त्यामुळे सरकार, राजकीय पक्ष व व्यवस्था आणि आपण साऱ्या सुशिक्षित विचारी माणसांनी यावर बोललं पाहिजे. सामूहिक आवाज बुलंद केला पाहिजे. भारताच्या लोकसंख्येच्या १८ टक्के असणऱ्या मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडेही त्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. आपण मराठवाड्याचे असल्यामुळे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या ‘मिलीजुली’ संस्कृतीचा पुरस्कर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत ही आपली भूमी मानून इथे राहणाऱ्या मुस्लिमांकडे आपल्या हिंदू समाजातील काही तथाकथित कट्टर लोक शंका व विद्वेषाने आजही का पाहत आहेत? संविधानाने त्यांनाही समान नागरिकत्व व सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत, पुन्हा त्यांना आपली भाषा व संस्कृती व धर्म जपण्याचे पण अधिकार दिले आहेत. पण एका बाजूला त्यांचा मतासाठी अनुनय करणारे पक्ष तर दुसरीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे - त्यांना प्रतिनिधित्व नाकारणारे पक्ष, या दोन्हींनी मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांना असुरक्षित केले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या ‘आयडेंटिटी’चा प्रश्न जीवन मरणाचा बनला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य व सर्वधर्मसद्भावाचे वागण्या-बोलण्यातून आपल्यापुरते तरी आचरण करण्याचे आवाहन करताना ते म्हणतात, भारतीयांनी आपल्याच मुस्लिम बांधवांना आरोपीच्या पजिंऱ्यात उभे न करता ते याच भूमीत आपल्यासारखेच जन्मलेले व मरणारे भारतीय आहेत, असे मनापासून मानायला पाहिजे. देशातील असहिष्णुतेविरोधात आवाज उठवला आणि ‘राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या भूमीवरच सरकारचे कान टोचायचे काम केले. देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून काही काळापूर्वी लेखकांनी पुरस्कार परत करण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यामागील त्यांची भूमिका शासनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवे. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. खरे तर देशमुख फक्त साहित्यिक नाहीत तर माजी सनदी अधिकारी आहेत. म्हणूनच त्यांनी व्यक्त केलेले हे विचार जास्त महत्वाचे आहेत. एवढ्या थेटपणे सरकारला समज देण्याचे काम यापूर्वी पु. ल. देशपांडे (१९७४, इचलकरंजी संमेलन), दुर्गा भागवत (१९७५ चे कऱ्हाड संमेलन), वसंत बापट (१९९९ चे मुंबई संमेलन) आणि डॉ. श्रीपाल सबनीस (२०१६ पुणे संमेलन) यांनीच केले होते. त्यामुळे हे चौघेही सरकारच्या काळ्या यादीत गेले होते. देशमुख यांनी तो धोका पत्करून आपले मत मांडले. अर्थात, सरकारनेही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षांनी मांडलेले विचार गांभीर्याने घ्यायला हवेत. साहित्यिकांनी आता भूमिका घ्यायला हवी आणि सरकारनेही या भूमिकेचा सन्मान करायला हवा. ङ्खचुकणाऱ्या राजा’ला त्याच्या चुकांची जाणीव करून देणारे साहित्यिक जेवढे जास्त वाढतील तेवढ्याच राजाच्या चुकांचे प्रमाण कमी होत जाईल, हाच संदेश देशमुखांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

-निरंजन टकले
न्या. लोयांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये हृदय घाताने मृत्यू असे कारण दिलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट जो जास्त अचुक असायला पाहिजे त्यात अचानक मृत्यू (सडन डेथ) असे म्हटलेले आहे. म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट पूर्णपणे असंबद्ध आहे, जो की नेमका असायला पाहिजे होता. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये बॉडीचे तीन व्हिसेरा सँपल काढले असे नमूद आहे. तर हिस्टोपॅथिक रिपोर्टमध्ये तब्बल 32 व्हिसेरा सँपल तपासल्याचे नमूद आहे, हे सगळं संशयास्पद होतं. अशा विशेष परिस्थितीमध्ये मृत्यू झालेल्यांची पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे. असे असतांना सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश असणाऱ्या लोयांच्या पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली नाही. वेळेमधील फरक, रायगर मॉर्टिसमधील फरक आणि सँपलमधील फरक कसा आला? याबाबतीत कोणीच काही बोलत नाही. माझ्या स्टोरीमध्ये मी हे सर्व प्रश्‍न उपस्थित केले.
    स्टोरीमध्ये जे दोन न्यायाधीश मोडक आणि कुलकर्णी त्यांना मुंबईहून घेवून गेले होते व त्यांच्या सोबत नागपूरच्या रविभवन विश्रामगृहामध्ये थांबले होते. त्यांनी सांगितलेली माहिती अशी की, रात्री 12.30 वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. माझी स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर सात दिवसांनी दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेस व एनडीटीव्ही इंग्लिशशी बोलले. की आम्ही गाडी घेऊन त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. स्टोरी 20 तारखेला आली होती. मग हा खुलासा 21 ला का नाही केला? हा 27 ला का बरं? दुसरी गोष्ट मला मिळालेल्या माहितीप्रमाणे रिक्षाने नेलं. तुमच्या सांगण्यानुसार कारने नेलं. रविभवन हे व्हीव्हीआयपी विश्रामगृह आहे. जिथे फक्त अति महत्वाचे लोक राहतात. जिथे 7 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं. अशा परिस्थितीत ही घटना 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरच्या रात्री घडते. मुंबईतलं अख्ख मंत्रालय महिना पंधरा दिवस अगोदर तिथे शिफ्ट केलेल असतं. सगळे अधिकारी तिथे राहत असतात. तिथे 10-15 लाल दिव्यांच्या गाड्या कायमस्वरूपी असतात. तुम्ही गाडीने नेलं म्हणता माझी स्टोरी रिक्षाने नेलं म्हणते. मग सीसीटीव्ही फुटेज दाखवा ना. त्यात जे काय असेल ते दिसेल. मग रिक्षा असेल की गाडी जे असेल ते दिसेल. याबद्दल कोणीच बोलत नाही. या स्टोरीमधील महत्वाचे लोक मग ते न्या. मोडक असो की न्या. कुलकर्णी, न्या. मोहित शहा असो बाहेती असो कोणीच काही बोलत नाही आणि ज्यांचा स्टोरीमध्ये कुठेच उल्लेख नाही तेच सगळेजण बोलतात.
    इसीजी रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसने छापला. त्यात हार्ट अटॅक स्पष्टपणे दिसतोय. असे जर असेल तर मृत्यूच कारण स्पष्ट आहे. मग पोस्ट मार्टम का केलं? कपड्यावर पोस्ट मार्टम करताना रक्त लागलं असावं अस उत्तर दिले गेले. वास्तविक पाहता पोस्ट मार्टम पूर्वी कपडे काढून सील केले जातात. पोस्ट मार्टम झाल्यावर बॉडी बॅगमध्ये ठेवली जाते. बॉडीला पुन्हा कपडे घालत नाहीत. मग कपड्याला रक्त लागलं कसं? टाक्यामधून निघालेल रक्त बॉडी बॅगला लागेल. सील केलेल्या कपड्यांना कसे लागेल. खोटं बोलण्याच्या नादात हे लोग अनेक प्रश्‍न नव्यान उपस्थित करण्याची संधी देत आहेत.
    12 जानेवारीला पुढे येवून सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी जे प्रश्‍न उपस्थित केले त्यात न्या. लोयांच्या मृत्यू संबंधीचाही प्रश्‍न होता. अचानक देशभर गदारोळ सुरू झाला की, या न्यायाधीशांनी न्यायपालिकेची प्रतिष्ठा धोक्यात आणली. न्याय पालिकेला कलंक लावला. त्यांनी हे बोलण्याच्या दीड महिना अगोदर नागपूरमधील दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेसशी बोलले ते स्वागतार्ह होते? कदाचित ते सोयीचं होतं आणि त्यानंतर दीड महिन्यांनी सुप्रिम कोर्टाचे चार न्यायाधिश बोलतात. तर लगेच न्यायापालिकेला कलंक! मुंबईमध्ये असे विशेष वकील बघितलेले आहेत की जे आमुक-आमुक आरोपीला बिऱ्याणी खाऊ घातले म्हणून सांगतात. दोन वर्षानंतर मी कसं खोटं बोललो होतो म्हणून सांगतात आणि मग त्यात न्यायपालिकेला काय होत नाही. ते हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईच्या खटल्यातून पत्र देऊन माघार घेतात आणि बलात्काराच्या केसेसमध्ये हिरीरीने सहभाग घेतात. माणसाला फाशी झाली की अबतक 50 म्हणतात. कोणाचाही मृत्यू हा विजय कसा काय वाटू शकतो? आपण अशा थराला येवून पोहोचलेलो आहोत की, आपण एखाद्याच्या मृत्यूचा आदेश साजरा करतो! वर्तमान पत्रामध्ये बातमी आली की आमुक- आमुक माणसांना फाशीची शिक्षा सुनावली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. समाज म्हणून, माणूस म्हणून इथक्या खालच्या थराला येवून पोहोचलेलो आहोत, की आपणाला एखाद्याचा मृत्यू साजरा करावासा वाटतो. अशा मृत्युमधून होणाऱ्या एकाही प्रश्‍नाच उत्तर मिळत नसतं. 26 जानेवारीला मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात लिहिलं, दांडे हॉस्पिटलमधून त्यांना ज्या मेडेट्रीना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यातही मृत अवस्थेत आणण्यात आले, असे नमूद आहे. मात्र मेडेट्रीना हॉस्पिटलच्या बिलामध्ये लिहिलेलं आहे की, डॉ. पंकज हारकुट यांनी ब्रिजगोपाल लोया यांच्यावर न्युरो सर्जरी केली. म्हणजे हार्टचा पेशंट अगोदर दांडे हॉस्पिटलला नेलं जे की आर्थोपेडिक हॉस्पिटल होतं आणि कार्डियाक हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं काय केल तर न्युरोसर्जरी. ती का केली? डोक्याला काय जखम होती काय? कोणी मारलं होत काय? म्हणून न्युरोसर्जरी केली. मात्र या जखमीची नोंद इन्क्वेस्ट पंचनाम्यापासून ते फॉरेन्सिक रिपोर्ट कशातच कशी नाही? मग ह्या जखमेचं रक्त होतं का शर्टवर? म्हणजे परवापर्यंत प्रश्‍नच उभे राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सांगितले की या प्रकरणातील सर्व मेडिकल रेकॉर्ड सादर करा. महाराष्ट्र सरकारने लोयांची पत्नी, मुलगा, बहिण आणि दोन न्यायाधीश यांचे जबाब आणि मेडिकल रिपोर्ट असा दस्तावेज सादर केला. चौकशी करा असे सांगितलेलेच नव्हते, जबाब कोर्टाने मागितलेलेच नव्हते. या केसमध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार सुद्धा नाही. मग मेडिकल रिपोर्ट सोबत कुटुंबियांचे जबाब पाठविण्याची आवश्यकता नव्हती. वकील देण्याची आवश्यकता नव्हती पण महाराष्ट्र शासनाने वकील सुद्धा दिलाय. अनुज लोयांनी मुख्य न्यायाधिशांना पत्र लिहून सांगितलं की, सुरूवातीला अने लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आम्हाला संशय आला होता पण आता संशय नाही. पण प्रश्‍न उपस्थित होतात. कारण माझी स्टोरी प्रसिद्ध झाली 20 नोव्हेंबर 2017 ला. 17 नोव्हेंबरला लोयांच्या बहिणीचा आणि वडिलांचा इंटरव्युव्ह औरंगाबादमध्ये त्यांच्या राहत्या घरी रेकॉर्ड केला. त्याच इंग्रजी भाषांतर करून प्रसिद्ध होईपर्यंत 20 तारीख उजाडली व जगाला कळाले. ही स्टोरी 10 ते 12 कोटी लोकांनी वाचली. 20 नोव्हेंबरपर्यंत कुटुंबियांच्या मनामध्ये शंका होती. 29 नोव्हेंबर 2017 ला जेव्हा अनुजनी मुख्य न्यायाधिशांना पत्र दिलं तेव्हा संशय संपलेला होता. संशय संपला असेल तर उत्तम. 20 ते 29 या 9 दिवसांमध्ये तुमच्या मनातला संशय कोणी दूर केला? किती जणांनी दूर केला? कसा दूर केला? असं काय दाखवलं की ज्यामुळे तुमचा संशय दूर झाला? हे पण कळायला हवं. कारण सगळ्या शंका उपस्थित करतांना तुम्ही माझे खांदे वापरले. आता तो कसा दूर झाला हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. खुलाश्यामुळे सुद्धा नवीन प्रश्‍न उपस्थित झालेले आहेत.  एक न्यायाधिश आहेत त्यांचे नाव राठी असे आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून दिले आहे की, त्या दिवशी मी दांडे हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलचे इसीजी मशीन बंद पडलेले होते. त्यांनी दुरूस्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत ते बंदच होते. आता पुन्हा प्रश्‍न इसीजी मशीन जर बंद पडलेलं होतं तर छापून आणलेला ईसीजी रिपोर्ट कोणी दिला? बंद पडलेल्या मशीनमधून इसीजी निघाला का? आणि तो रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसपर्यंत कोणी पोहोचविला? इसीजी जर निघालाच नाही तर असं का म्हणता की मृत्यू हृदय घाताने झाला आणि तिकडे न्युरोसर्जरी. ’आग सोमेश्‍वरी बंब रामेश्‍वरी’ असा हा प्रकार. आजार हार्टचा आणि उपचार मेंदूवर! म्हणून हे प्रश्‍न उपस्थित होतात. म्हणून या प्रश्‍नांची उत्तरे हवीत.
    नातेवाईकांनी हे सांगितलं की निरंजन टकले नावाचा एक पत्रकार आला होता आणि आम्ही त्याच्याशी बोललो पण त्याने हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं हे आम्हाला माहितच नाही. मी तुमच्या समोर बसलेलो आहे, स्टँडवरती कॅमेरा लावलेला आहे, तो ऑन केल्यानंतर अगोदर मी तुमची परवानगी घेतली, तुम्ही हो रेकॉर्ड करा, असं म्हटल्यानंतर हा इंटरव्यूव्ह मी रेकॉर्ड केला. मी उघड-उघड कॅमेरा लावून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड करतो आहे, हे दुसऱ्या कॅमेऱ्यावरसुद्धा रेकॉर्ड केलं. मनात आलं आणि हौसेने मी पत्रकार झालो असा प्रकार नाही. मी सर्वतोपरी काळजी घेतली. मला माहित होत या स्टोरीनंतर बोट कुठे दाखविल जाणार. सर्व प्रकारची दक्षता घेवून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड केला. असे असतांना नुसत्या शंका दूर झाल्या असं म्हणणं कितपत योग्य आहे? या प्रश्‍नांची उत्तर द्याना.
    परवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमात परिचय करून देतांना माझा उल्लेख निर्भय पत्रकार असा करण्यात आला. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की असा माझा परिचय का करून देण्यात आला? म्हणजे मी भयग्रस्त असायला हवं का? मी निर्भयपण नाही आणि भयग्रस्तपण नाही. मी नॉर्मल आहे. ज्यांच्याकडे या स्टोरीमुळे अंगुलीनिर्देश होतो त्यांच्याबद्दल त्यांचे समर्थक म्हणतात, ते फार न्यायप्रीय आहेत. त्यांचा घटनेवरती, कायद्यावरती, अहिंसेवरती भरपूर विश्‍वास आहे. ते जर इतके चांगले आहेत तर मी भय बाळगायचं काय कारण आहे? मी भ्यायला हवं असं वाटत असेल तर कारण मला सांगाना. का पत्रकारांनी घाबरायला हवं? का विरोधकांनी घाबरायला हवं? का न्यायाधिशांनी घाबरायला हवं? का पक्षातील सहकाऱ्यांनी घाबरायला हवं? सुषमा स्वराज अशा विदेशमंत्री की त्या भुटान आणि नेपाळ सोडून कुठल्याच देशात गेल्या नाहीत. हे दोन्ही देश असे आहेत जिथे जायला पासपोर्ट लागत नाही. त्या का गप्प आहेत? पूर्वी त्या खूप बोलायच्या. पक्षातील बाकीचे लोक का गप्प आहेत? कोणी विरोध केला की तो देशद्रोही. असे एकंदर देशाचे वातावरण आहे.
    (सोलापूर येथील रंगभवन मध्ये 30 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता  ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निरंजन टकले यांच भाषण झालं. ते भाषण आणि मुलाखत आम्ही अंक नं. 8 मध्ये प्रकाशित केली. त्याचा हा शेवटचा दूसरा भाग.)

सीमा देशपांडे
7798981535
लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना  उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक आश्‍चर्यकारक बोध आहे. खासकरुन त्या लोकांसाठी जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतात आणि त्या लोकांसाठी पण जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवत नाहीत. डॉ. विन डायर ह्यांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे जे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला सादर करते.
उदाहरण- एका मातेच्या पोटात दोन जुळे मुले असतात
पहिल्याने विचारले: काय तुझा प्रसवनंतरच्या जीवनावर विश्‍वास आहे का?
दुसरा म्हणाला: असे का विचारतोस? मला वाटते,प्रसवनंतर नक्कीच काहीतरी असावे. कदाचीत आपला जन्म एक परिक्षा देण्यासाठी तयार झाला असावा व त्यासाठी आपण इथे आलो असू.
पहिला म्हणाला:  तुझे बोल तर मला अगदी मुर्खपणाचे व व्हाय्यात वाटतात.
दुसरा म्हणाला: मला माहित नाही परंतु माझे अंतर्मन मला वारंवार हिच जाणिव करुन देत आहे कि, आपल्या पुढील जन्मात इथल्यापेक्षा जास्त प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या हाताने जेवू, स्वत:च्या पायावर चालू. याविषयी आपल्याला इथे काही संवेदना असतील ज्या आपल्याला आत्ता कळत नसाव्यात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू.
पहिला म्हणाला: तुझे हे विचार अगदी अर्थहीन आहेत. पायावर चालणे अशक्य आहे आणि मुखाने खाणे तर अगदी हास्यास्पद आहे! एकिकडे पाहिल्यास गर्भाशयात आपणास नाभीद्वारे पोषण पुरविले जाते आणि दुसरीकडून पाहिल्यास नाभीची लांबी लहान असते. म्हणजेच डिलिवरी नंतरचे आयुष्य तार्किकद्रष्ट्या वगळलेले बरे आणि ते अशक्यच आहे.
दुसरा फार आग्रहाने म्हणाला: मला वाटते, काहितरी जरुर आहे. पुढचे आयुष्य आपण जे अनुभवतोय त्यापेक्षा खूप-खूप वेगऴे असावे आणि त्यावेळेस आपल्याला आईच्या नाभीची आवश्यकता पण नसावी.
पहिला हसत म्हणाला : मुर्खपणा! डिलिवरीनंतर जर पुन्हा आयुष्य असेल तर आजपर्यंत जे मृत्यु पावले ते पुन्हा का या धरतीवर परत नाही आले? डिलिवरी नंतरचे आयुष्य हे आपले अंतिम जीवन आहे. उलट, डिलिवरी नंतर काही नसतं, फक्त काळोख व शांतता असते आणि त्यानंतर जीवन शुन्य होवुन जाते. अशा रितीने आपण कुठेही जात नाही.
दुसरा म्हणाला: - मला माहित नाही पण निश्‍चितपणे ईश्‍वर आपली व आपल्या आईची काळजी घेईल आणि अखेरिस आपल्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे.
पहिला म्हणाला: आई? काय तू वास्तविकपणे विश्‍वास ठेवतोस कि तू पुन्हा आईला भेटशील? तो हसत म्हणाला जर आईचे अस्तित्व असेन तर ती कुठे आहे ? त्याचप्रमाणे ईश्‍वर कुठे आहे? जेणेकरुन तो आपणा सर्वांची पुन्हा भेट घालेन.
दुसरा म्हणाला: ईश्‍वर आपल्यामध्ये नाही तर आपल्याभोवती सर्वत्र आहे. त्याचा घेरा आपल्या चोहिकडे आहे. त्याच्याशिवाय आपले व या अथांग विश्‍वाचे अस्तित्व शुन्य आहे.
पहिला म्हणाला:  मला तर असे कधीच दिसले नाही म्हणून हे तर्कसंगत आहे व त्याचे अस्तित्व कुठेही नाही.
दुसरा म्हणाला:  कधीकधी जेव्हा तु एकांतात असशील तेव्हा एकदा तुझ्या सभोवतालच्या निसर्गाकडे व खुद स्वत:कडे नजर टाक आणि पहा. रात्र-दिवस याचे प्रबोधन, असंख्य ताऱ्यांनी भरलेले सुंदर आकाश, सूर्य ,चंद्र  यांचे कार्य, विशिष्ट प्रमाणात पावसाची निर्मिती, झाडे, प्राणी, पशु, कृमी-किटक याची निर्मिती आणि मानवाची निर्मिती अजुन बरेच काही. काय हे मनुष्य सर्व निर्माण करु शकतो का? हे सूर्य ,चंद्र, तारे व सर्व निसर्ग ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे स्वत:चे काम शांतपणे पार पाडतात? मग काय मनुष्य ईश्‍वराच्या आज्ञेचे पालन करत आहे का? कारण जर  हि सृष्टी असली असती व मनुष्य नसला असता तरिही या सृष्टीला काहिही फरक पडला नसता पण जर मनुष्य धरतीवर असला असता आणि हि सृष्टीही नसली असती तर तो जगु शकला असता का? जसे, हवा नसली असती तर तो श्‍वास घेवु शकला असता? तहानलेला मनुष्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासाविस होतो मग पाऊस पडला नसता तर त्याची तहान भागली असती का?, ही झाडे, प्राणी निर्माण केले नसते तर मनुष्य त्याच्या पोटाची भूक स्वत: भागवू शकला असता का? नाही ना ! कारण ईश्‍वराने ही सृष्टि मनुष्याच्या उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे. मग मनुष्य त्याच्या निर्मात्याचा आज्ञाधारक बनला पाहिजे का त्याच्या निर्मितीचा? कदाचित मनुष्य सत्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण ते अदृश्य आहे आणि असत्याकडे लक्ष केंद्रित करत आहे कारण ते दृष्टीत आहे.
    जसे एकदा पाच मित्र सहलीला अगदी उत्साहाने निघतात मात्र अचानकपणे टिव्हीवरुन एक बातमी ऐकायला मिळते की त्यांच्या सहलीला जाणाऱ्या मार्गाने लागणारा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणे घातक आहे. ही बातमी ऐकताच त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा बेत रद्द करतात. मात्र त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा निर्णय घेतात कारण त्यांचे मत असते कि ही बातमी बनावट असू शकते आणि तसेपण पुलाची स्थिती  आपण डोळ्याने थोडीना पाहीली आहे जेणेकरुन त्याच्यावर आपण विश्‍वास ठेवू. अश्या दृष्टीहीन बातमीवर विश्‍वास ठेवने मुर्खपणाचे लक्षण आहे. असे म्हणून त्यातील काही मित्र त्या मार्गाने जाण्याचे धाडस करतात. अचानकपणे दोन तासांनी एक बातमी कानावर पडते की त्या पुलावरुन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन तरुण मुले जखमी झाले व ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. ते दुसरे-तिसरे कोणी नसून तीच मुले होती ज्याना या बातमीची पुर्वसुचना त्यांना  मिळाली असतानाही त्यावर विश्‍वास न ठेवता स्वत:चा शहानपणा केल्याची ही शिक्षा ते भोगत आहेत. आज त्या मुलांचे शरीर पुर्ववत होवु शकते का? किवा कोणते अवतार त्याला पुर्ववत करण्याचे धाडस करु शकते का?..जर आपण हिच बातमी माकडाला दिली असती वा नाही दिली असती तरी त्याने त्या पुलाच्या मार्गाने जाण्याचे धाडस केलेच असते पण आपण ह्याचे कारण सहजपणे समजू शकतो ईश्‍वराने त्याला हे समजण्याची क्षमता दिलीच नाही आहे कि काय चुक व काय बरोबर आहे.  मात्र हि क्षमता मनुष्याला नक्कीच बहाल केली आहे. पण.
    आज माणसाची स्थिती माकडासारखीच झालेली आहे त्याला म्हंटले की, तुम्हा-आम्हा सर्वांचा निर्माता एकच आहे. त्याच्याच मार्गाने जीवन व्यतित करा, कारण हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगुर आहे. खरे जीवन मृत्युनंतर आहे जे अथांग आहे. तेथे एकिकडे  ह्या ऐहिक जीवनापेक्षा सुंदर जीवन आहे आणि दुसरीकडे अत्यंत ज्वालामुखीने भरलेले यातनामय ठिकाण आहे. स्वत:ला नरकाग्नीपासुन वाचव. अशी अदृश्य सत्याची पुर्वसुचना दिल्यास असंख्य लोक तुझ्यासारखे (पहिल्या मुलासारखे)  विचार करतात !, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने शारिरिकदृष्ट्या ईश्‍वराला पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बनावट बातमीवर विश्‍वास का  ठेवायचा? आम्ही काय मुर्ख आहोत का? ह्यांची स्थिती त्या मुलासारखी होवू नये जे अदृश्य सत्याला बनावट मानत होते व त्यांना कायमची शिक्षा भोगावी लागेन जिथुन त्यांना पुर्ववत होणे अशक्य असेन. तसेच काही लोक या संभ्रमात आहेत कि ईश्‍वर आपल्यामधेच आहे ..असे असले असते तर मनुष्याचा जन्म-मृत्यु त्याच्या हातात का नाही? असा विचार केला असता हा संभ्रम अर्थहीन वाटतो. तसेच, आजही काही तुरळक लोक अदृश्य सत्य मान्य करतात कारण ते ईश्‍वराने त्यांना प्रदान कलेल्या विवेकबुद्धिचा वापर करतात. जागरुक बुद्धी व संवेदनशील अंत:करण ज्या मनुष्यात असेल ते ह्या सृष्टीचे चिन्ह व मनुष्याचा जन्म व मृत्युचा खरा हेतू या अदृश्य सत्येवर सडेतोर उत्तर देते की आपणा सर्वांचा ईश्‍वर/निर्माता एकच आहे व त्याच्या आज्ञेचे पालन करुन कर्म करायचे आहे. शेवटी आपल्याला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि स्वत:ला नरकाग्नीपासून वाचवायचे आहे. जे लोक या सत्याचा स्विकार करत नाहित ते स्वत:हून त्यांचे पुढील आयुष्य नरकात जाण्यास आमंत्रण देत आहेत. शेवटी पहिले मुल निरुत्तर झाले. कदाचित त्याच्या अहंकाराने त्याला निरुत्तर केले असावे पन त्याचे अंत:करणाने त्याला नक्कीच विचार करायला भाग पाडले असावे.
    मित्रांनो! जरी ही एक बोधकथा असली तरी ती आपल्याला खऱ्या अदृश्य सत्याची आठवण करुन देत आहे. माझी तुम्हाला कळकऴीची विनंती आहे, आजही वेळ गेली नाही कृपा करुन सत्याचा स्विकार करा व स्वत: ला नरकापासून वाचवा. ईश्‍वर आपल्या सर्वांना हे सत्य स्विकारण्याची सदबुद्धी देवो! आमीन.

मुंबई (नाजीम खान) : गुणवत्ता आणि सेवा यांचा ज्यावेळी योग्य मिलाफ होतो त्यावेळी व्यवसाय वाढीस बळ मिळते. गुंतवणुकदार मार्केट पाहून त्याबाबतची गुंतवणूक करतो तर छोटा व्यापारी आपल्या गुणवत्तापूर्ण माल व विक्री पश्चात सेवेने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. बाजारात अनेक लोक एकच माल विकतात परंतु, एखाद्याकडेच लोकांची अधिक गर्दी असते. त्याचे कारण हेच की त्याची सेवा, संवाद आणि मालाची गुणवत्ता उत्कृष्ट असते. त्यामुळे तो मोठ्या स्पर्धेतही टिकतो, असे मत अहेमदाबाद विद्यापीठ व इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)चे प्रा. अबरार अली सय्यद यांनी सांगितले.
    मुंबई येथे नुकतीच रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे सिद्दीकी कॉलेज भायखळा येथील अल्लामा लतीफी हॉल मध्ये आयोजित एकदिवस व्यावसाय कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर रिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलाउद्दीन अहमद, मोनिस खान, इम्तियाज शेख उपस्थित होते. यावेळी अबरार अली यांनी उपस्थित व्यावसायिकांना केस स्टडी द्वारे सखोल मार्गदर्शन केले. डिजीटल एक्स्पर्ट मार्केटिंग आणि ई-कॉमर्सचे तज्ज्ञ मोनिस खान म्हणाले, व्यापार्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे सांगितले. त्यांनी कशा पद्धतीने इंटरनेट व अन्य ई-कॉमर्सबद्दल सखोल मार्गदर्शन केले. इम्तीयाज शेख यांनी टीम वर्क आणि व्यावसायिकतेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच काही प्रात्यक्षिकेही करून घेतली. रहेबर फायनान्शियल कन्सलटिंगचे संचालक एम.एच. खटखटे यांनी बिनव्याजी फायनान्स देणे आणि घेणे याबद्दल माहिती सांगितली. प्रास्ताविक रिफाचे कार्यकारी अधिकारी सलाहउद्दीन अहमद यांनी केले. त्यांनी रिफा द्वारा 2015 पासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यशाळेस मुंबई, पुणे, अहमदनगर, धुळे, लातूर, अकोला येथील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला होता.

मुस्लिम पर्सनल लॉ  बोर्डाने बाबरी मस्जिद संदर्भात जी भूमिका घेतली आहे ती योग्य असल्याची प्रतिक्रिया जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी बुधवारी दिली. ते लातूर येथे आले असता त्यांच्याशी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मौलाना सलमान नदवी यांच्यामध्ये सुरू असलेल्या मतभेदांसंबंधी शोधनचे उपसंपादक बशीर शेख आणि स्तंभलेखक एम.आय. शेख यांनी संवाद साधला.
    या विषयी बोलताना ते म्हणाले, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे धोरण स्पष्ट आहे. बोर्डाने अगदी सुरूवातीपासून या विषयावर बोलणी करण्यासाठी बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी गठित केली होती. त्यांच्यात आणि विविध गटांमध्ये अनेकवेळा बोलणी झाली सुद्धा. मात्र प्रत्येक वेळेस मंदीर समर्थकांकडून एकच मुद्दा रेटला गेला की, हा आमच्या आस्थेचा प्रश्‍न आहे म्हणून मुस्लिमांनी ही जागा आम्हाला द्यावी. चर्चा याच्यापुढे जातच नव्हती. अनेक वर्ष लोटल्यानंतर देखील चर्चेतून काही निष्पन्न होत नसल्याची खात्री झाल्यावर शेवटी बोर्डाने असा निर्णय घेतला की, आता हे प्रकरण न्यायालयाच्या मार्फतच सोडविले गेले पाहिजे. कोर्ट जो निकाल देईल त्याला आम्ही मान्य करू. मात्र उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचा या संबंधात निकाल विचित्र आला. त्यांनी जागा तीन विभागामध्ये विभागून दिली. हा निर्णय कोणालाच पटला नाही म्हणून प्रकरण  सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्षानुवर्षे चर्चा करून सुद्धा चर्चेला काहीच फळ आले नाही. म्हणून प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीपर्यंत आले. आता बोलणी करण्याचे काही औचित्यच राहिलेले नाही. मौलाना सलमान नदवी साहेबांची पहिली चूक आहे की, ते बोर्डाचे सन्माननीय सदस्य असल्या कारणाने बोर्डाच्या भुमिकेपासून वेगळे होवून त्यांनी कोणाशीही बोलणी करायलाच नको पाहिजे होती. कारण मुस्लिम समाजातील सर्व गटांची ही संयुक्त भुमिका होती की, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तोच मान्य केला जाईल.
    दुसरी चूक नदवी साहेबांनी अशी केली की त्यांनी सांगितले की, बोर्डाचं वय आता संपलेल आहे. आता मी एक वेगळा बोर्ड तयार करणार आहे. जेव्हा त्यांनी बोर्डापेक्षा वेगळी भूमिका मांडली आणि बोर्डाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले तेव्हा बोर्ड त्यांना आता आपल्यामध्ये कसा ठेवू शकतो? म्हणून बोर्डने जाहीर केले की मौलाना सलमान नदवी यांचा यापुढे बोर्डाशी काहीही संबंध राहणार नाही. पर्सनल लॉ बोर्डची भूमिका स्पष्ट आणि बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल”.
    मुळात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांनी बाबरी मस्जिदीचे प्रकरण एक जमीनीचा विवाद म्हणूनच ऐकूण निकाल देण्यात येईल, असे जाहीर करताच केंद्र सरकार आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येवून चुकले की, आता हा निकाल आपल्याविरूद्ध लागणार आहे. म्हणून त्यांनी श्री श्री श्री रविशंकर यांच्या मार्फतीने बोर्डातील कमजोर कडी मौलाना सलमान नदवी यांना आपल्या गळाला लावले आणि त्यांच्या मार्फतीने वेगळी भूमिका मांडून बोर्डात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुस्लिमांच्या सर्व गटांकडून होत आहे.

एम.आर.शेख
पद्मावत चित्रपटामुळे अल्लाउद्दीन खिल्जीचे नाव नव्याने प्रकाश झोतात आलेले आहे. अभिनेता रणवीरसिंहने रंगवलेला खिल्जी इतिहासाच्या मूळ खिल्जीसारखा नव्हता, असे चित्रपट पाहणाऱ्यांचे मत आहे. काहींचे मत याच्या उलट आहे. अशा या उलट-सुलट मतांमध्ये अल्लाउद्दीन खिल्जी प्रत्यक्षात कसा होता हे पाहणे उद्बोधक ठरेल, त्यासाठी हा लेखप्रपंच.
    अल्लाउद्दीन खिल्जी, खिल्जी वंशाचा दूसरा सम्राट होता. मात्र तो तसा नव्हता जसा संजय लीला भन्साळी ने आपल्या चित्रपटात दाखविलेला आहे. तो विदेशी हल्लेखोर नव्हता किंवा समलैंगिकही नव्हता, असे त्याच्या इतिहासावरून नजर टाकल्यास लक्षात येते. त्याचा जन्म अखंड भारताच्या बंगाल प्रांताच्या बीर भूम जिल्ह्यात (आजचा बांग्लादेश) 1250 मध्ये झाला. त्याचे मूळ नाव जुना उर्फ जान मुहम्मद खिल्जी होते. त्याच्या वडिलांचे नाव शहाबुद्दीन मसूद असे होते. त्याने एकूण तीन लग्ने केली होती. त्याच्या एका पत्नीचे नाव कमलादेवी होते. जी राजा कर्नसिंगची पूर्व पत्नी होती. शिवाय, मलिका-ए-जहाँ (ही जलालुद्दीन खिल्जीची मुलगी), महेरू (दिल्लीच्या एका सरदाराची मुलगी) ही त्याच्या इतर दोन पत्नींची नावे होत.
    मलिक काफूर नावाचा एक किन्नर त्याचा सर-सेनापती होता. त्याच्याशी खिल्जीचे समलैंगिक संबंध होते, असा काही इतिहासकारांनी आरोप केला असला व तसे पद्मावत मध्ये सुद्धा दाखवले असले तरी तो खरा वाटत नाही. कारण की, मलिक काफूर हा अत्यंत धाडसी आणि युद्धनिपुण व खिल्जी एवढाच तुल्यबळ व्यक्ती होता. गुलामापासून सर-सेनापती पर्यंतचा प्रवास त्याने लिलया सर केला होता. त्याने पहिल्यांदा दक्षीण भारतातील देवगिरी (सध्याचे दौलताबाद) व वरंगल (सध्याचा तेलंगना) हे प्रांत जिंकून दिल्लीच्या सत्तेत जोडले होते. शिवाय, अल्लाउद्दीनची हत्या विषप्रयोग करून त्यानेच केली होती.
    अल्लाउद्दीनला एकूण चार मुले होती. कुतूबोद्दीन, शहाबुद्दीन, खिजरखान व शादीखान अशी त्यांची नावे होत. अल्लाउद्दीन खिल्जी निरक्षर मात्र शरिराने धिप्पाड व युद्ध कौशल्य निपुण होता. तो प्रचंड ताकदवान व महत्त्वाकांक्षी होता. तो एक कुशल संघटक होता. म्हणून खिल्जी घराण्याचा पहिला सम्राट जलालुद्दीन याने त्याला आपली मुलगी देऊन कडा व अवध या दोन प्रांतांचा राज्यपाल नियुक्त केला होता. मात्र त्याची महत्वाकांक्षा या दोन प्रांतात मावत नव्हती म्हणून त्याने जलालुद्दीनची परवानगी न घेता दक्षीणेवर स्वारी केली होती व प्रचंड लूट करून दिल्लीला परतला होता.
    जलालुद्दीन खिल्जी ने लहानपणापासूनच स्वतःच्या मुलासारखा अल्लाउद्दीन खिल्जीचा सांभाळ केला होता. जलालुद्दीन खिल्जी हा अल्लाउद्दीन खिल्जीचा चुलता होता. एक दिवस संध्याकाळी असरच्या नमाजनंतर जलालुद्दीन खिल्जी नौकानयन करत कुरआन   पठण करीत होता. तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी  त्याला भेटायला गेला. अल्लाउद्दीनला पाहून जलालुद्दीनने नौका किनाऱ्यावर घेतली व तो चालत अल्लाउद्दीन जवळ आला. दोघांनी गळाभेट घेतली. तेवढ्यात अल्लाउद्दीनने इशारा केला आणि महेमूद बिन सालीम आणि इख्तीयारूद्दीन या दोन शिपायांनी ठरल्याप्रमाणे जलालुद्दीनवर तलवारीने हल्ला केला व जलालुद्दीनचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर लगेच 12 आक्टोबर 1296 रोजी दिल्लीमध्ये तीन दिवसीय राज्य रोहन सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात त्याने रितसर भारताचा सम्राट म्हणून सत्ता ग्रहण केली. त्याच्या अखत्यारित पश्चिमेस पंजाब व सिंध, मध्य भारतात गुजरात व उत्तरप्रदेश तर पूर्व भारतात बिहार, माळवा व राजपुताना एवढे प्रांत होते. 1298 मध्ये त्याने गुजरात काबिज केले होते. 1299 मध्ये जेसलमेर, 1301 मध्ये रणथंबोर, 1304 मध्ये जालोर व 1305 मध्ये माळवा या प्रांतांना त्याने ताब्यात घेऊन दिल्लीच्या तख्ताशी जोडले होते. अलाउद्दीन खिल्जी पहिला असा सम्राट आहे ज्याने भारतात सुसंघटित थलसेना (ऑर्गनाईज्ड आर्मी) उभी केली होती. तो जेथे जाई विजयी होवून परत येई. अल्लाउद्दीन आणि विजय असे समीकरणच त्या काळात रूढ झाले होते. म्हणून जनतेचा आणि त्याचा दोघांचा असा समज झाला होता की, अल्लाउद्दीन खिल्जी यास दैवी मदत प्राप्त आहे. असे असले तरी त्याला कश्मीर, नेपाळ आणि आसाम जिंकता आला नाही. त्याच्या काळात मंगोलांनी अनेक वेळेस दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतावर हल्ले केले होते. मात्र प्रत्येकवेळी त्यांना मात खावी लागली होती. शेवटी 1307 मध्ये अलाउद्दीन खिल्जीने मंगोलांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर मंगोलांचे भारतावरील हल्ले बंद झाले. अल्लाउद्दीन खिल्जीने 1296 ते 1316 असे एकूण 20 वर्षे शासन केले.
    दक्षीणेतील त्याच्या पहिल्या स्वारीनंतर त्याचा सेनापती मलिक काफूर याने 1306 मध्ये दूसरी स्वारी केली. ज्याची सुरूवात देवगिरी (दौलताबाद महाराष्ट्र) येथून सुरू झाली. त्यात दौलताबादचा राजा रामचंद्र याने मलिक काफूर समोर आत्मसमर्पण केले. 1310 मध्ये मलिक काफूर याने वरंगलकडे मोर्चा वळविला. तेव्हाचा वरंगलचा राजा रूद्रदेव याने स्वतःची सोन्याची मूर्ती तयार करून शंभर हत्ती, 700 घोडे व जड जवाहीरसह मलिक काफूर समोर शरणागती पत्करली व दिल्लीचे मांडलीकत्व स्विकारले. इतिहासकार एकीकडे मलिक काफूरचे शौर्याचे वर्णन करतात तर दूसरीकडे तो किन्नर होता असे लिहितात. असे जरी असले तरी मलिक काफूर हा गुलाम होता एवढे मात्र नक्की. गुजरातच्या मोहिमेमध्ये नुसरतखान नावाच्या सरदारने 1000 दिनारमध्ये खरेदी करून त्याला अलाद्दीन खिल्जीला भेट म्हणून दिले होते. अल्पावधीतच मलिक काफूर आपल्या अंगभूत गुणांच्या व शौर्याच्या बळावर खिल्जीचा सर्वाधिक विश्‍वासपात्र बनला होता. मात्र याच महत्वकांक्षी मलिक काफूरने शेवटच्या काळात विषप्रयोग करून अल्लाउद्दीन खिल्जीची हत्या केली. त्याच्या दोन मुलांचे डोळे काढले व तीन वर्ष वयाचा राजपूत्र शहाबुद्दीन याला गादीवर बसवून शासनाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली होती. मात्र काही आठवड्यातच अल्लाउद्दीन खिल्जीच्या विश्‍वासपात्र सैनिकांनी मलिक काफूरची हत्या केली. अल्पवयीन शहाबुद्दीनला त्याचाच भाऊ मुबारक शहा ने गादीवरून उतरवून स्वतः राज्य प्राप्त केले. 1316 ते 1320 पर्यंत तो दिल्लीच्या तख्ताचा सम्राट होता. 1320 मध्ये त्याचीही हत्या झाली व खिल्जी वंश समाप्त झाला व तुघलक वंशाची सुरूवात झाली.
अल्लाउद्दीन खिल्जीचे गुण-दोष
    मध्ययुगीन अनेक मुस्लिम सम्राटाप्रमाणे अल्लाउद्दीन खिल्जीही ही एक नाममात्र मुस्लिम सम्राट होता. त्याचा इस्लामशी फारसा संबंध नव्हता. किंबहुना इस्लामच्या विरोधी त्याचे आचरण होते. त्या काळी प्रत्येक राजा युद्ध हे सत्ता, संपत्ती, जमीन यासाठीच करत होता. तसेच अल्लाउद्दीनने जेवढे युद्ध केले ते फक्त जमीन बळकावण्यासाठी व इतर राजांची संपत्ती हडपण्यासाठी केले. सतत मिळत गेलेल्या विजयामुळे त्याची महत्वकांक्षा एवढी वाढली होती की, दिल्लीचे तख्त एखाद्या विश्‍वासपात्र सरदाराच्या स्वाधीन करून मध्यपूर्व, युरोप आणि तुर्कस्तान सुद्धा जिंकण्याचा त्याचा मन्सुबा होता. म्हणूनच तो स्वतःला सिकेंदरे सानी (अ‍ॅलेक्झांडर द्वितीय) म्हणून घेत असे.
    त्याच्या धार्मिक विचारांसबंधी देवबंदचे इतिहासकार मुहम्मद कासीम फरिश्ता हे म्हणतात की, ’तमाम कामियाबीयों के बाद अल्लाउद्दीन के दिल में अजीब-अजीब खयालात आने लगे. उन खयालात में से एक खयाल ये भी था के जिस तरह (अस्तगफिरूल्लाह) हुजूर मुहम्मद सल्ल. ने अपनी कुव्वत से शरियत कायम की और उनके चारों खुलफा (रजि.) ने उस शरियत को मजबूत बनाया ठीक उसी तरह अगर मैं भी अपने उमरा (सरदार) अलमास बेग, अलग खान, मलिक हजबरूद्दीन जफरखान, मलिक नुसरत खान और संजर अलप खान की कुव्वत और सहारे के बलपर एक नया मजहब जारी करूं तो फिर यकीनन रोजे कयामत तक मेरा नाम दुनिया में बाकी रहेगा. अलाउद्दीन महेफिले शराब में अक्सर व बेशतर अपने इसी खयाल का जिक्र करता था और अपने सरदारों से मश्‍वरा किया करता था. अल्लाउद्दीन जाहील महेज था. उसकी सारी जिंदगी जाहील खिल्जीयों में गुजरी. सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी कभी-कभी इस खयाल का भी इजहार करता था के, मुल्क की हुक्मरानी और बादशाहीयत के निजाम को सिर्फ बादशाह की राय और उसकी मस्लेहतों से ताल्लुक होता है. उन सियासी कामों से खुदावंते ताला की (अस्तगफिरूल्लाह) शरियत का कोई वास्ता नहीं है. मजहबी उलेमाओं का काम सिर्फ इतनाही है के, वो मुख्तलिफ किस्म के मुकद्दमों का फैसला करें, खानदानी झगडों को खत्म करें और खुदावंदे ताला की इबादत के बेहतरीन तरीके बयान करे.’ (संदर्भ ः ’तारीख-ए-फरिश्ता’ पान क्र. 245  )
विकास हेच अल्लाउद्दीनच्या विजयाचे रहस्य होते.
    अलाउद्दीन जरी दारूचा शौकीन होता तरी लवकरच त्याला दारूच्या नुकसाना संबंधींची उपरती झाली व त्याने दिल्ली शहरामध्ये दारूबंदी नुसती केलीच नाही तर ती अमलात सुद्धा आणली. अल्लाउद्दीन खिल्जी भारतीय इतिहासातील पहिला राजा होता ज्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित केले होते. त्यापेक्षा जास्त दरावर व्यापाऱ्यांना वस्तू विकण्यास प्रतिबंध केला होता.  शेतकऱ्यांचा माल त्यांच्या बांधावर जावून खरेदी करण्याची व्यवस्था त्यांनी विकसित केली होती. शासकीय कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जावून त्याच्या गरजेपुरता माल सोडून बाकी मालाचे मुल्य चुकवून शेतातूनच माल उचलून घेवून जात होते. रोजच्या रोज बाजारांमधील मालांच्या मुल्यांचे उतार चढाव बादशाहपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कृत्रिम भाव वाढविण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. कपड्यांच्या किमतीसुद्धा ठरविण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नव्हता. त्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. त्यामुळे कपड्यामध्ये सुद्धा लूट करण्याची व्यापाऱ्यांना संधी नव्हती. घोड्यांच्या वेगवेगळ्या जातींच्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. इतर पशु जसे गाय, बैल, म्हैस, बकरी यांचेही दर त्यांच्या दर्जाप्रमाणे शासकीय स्तरावर ठरविले जात. अल्लाउद्दीनच्या काळात चांदी, सोन्याचे वेगवेगळे तंगे (नाणे) होते तसेच सोने आणि चांदी यांच्या मिश्रणातून तयार केलेलीही नाणे बाजारात उपलब्ध होती. सोन्याच्या नाण्याला तंगातलाई आणि चांदीच्या नाण्याला तंगा नखराह म्हटले जात होते. या जनहित सुधारणांमुळे जनता सुखात होती. त्यामुळे सैनिक प्रत्येक युद्धात जीवाची बाजी लावून लढत होते. त्यामुळे विजय मिळत होता. अल्लाउद्दीन खिल्जीच्या सातत्यपूर्ण विजयी श्रृंखलेचे हेच रहस्य होते.
बॉलीवुड आणि मुस्लिम
    गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये ठरवून मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खलनायक आणि आतंकवाद्यांचे पात्र मुस्लिम रंगविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पीके हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्या चित्रपटासाठी आमीर खान या नटाची केवळ तो नावाने मुस्लिम आहे म्हणून आलोचना केली गेली. वास्तविक पाहता त्या चित्रपटाची कथा, पटकथा तथा दिग्दर्शन हे करणारे सर्व बहुसंख्य समाजातील होते. त्यांना कोणी दोष दिलेला नाही. केवळ निर्देशकाने दिलेल्या निर्देशनाप्रमाणे अभिनय केला म्हणून आमीर खानला टार्गेट करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याची पत्नी किरण राव हिचे वाक्य आमीरनेच म्हटले, अशी हाकाटी पिटण्यात आली. मूळ वाक्य (सद्याच्या वातावरणात मला माझ्या मुलांच्या भविष्यासाठी भारतात राहण्याची भीती वाटते.) बोलणारी किरण राव हिला कोणी दोष दिला नाही. एकंदरच बॉलीवुडमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटात मुस्लिम व्यक्तीरेखांची निवड करून त्यांना क्रूर, कृतज्ञ, देशद्रोही दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. पद्मावत न पाहताच करणी सेनेने जो अभूतपूर्व विरोध केला. तसा विरोध अनेक मुस्लिमांनी चित्रपट पाहूनसुद्धा केलेला नाही. यातच कोणाला राष्ट्रीय संपत्तीची काळजी आहे हे स्पष्ट होते. मुस्लिमांनी सॅटॅनिक व्हर्सेसपासून ते तस्लीमा नसरीन पर्यंतच्या विरोधातून मिळालेल्या अनुभवातून एक धडा नक्कीच शिकलेला आहे. तो म्हणजे असा की, विरोध कधीच उपयोगी पडत नाही. उलट त्यात आपलेच नुकसान होते. म्हणून असे चित्रपट, पुस्तके आणि व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे कधीही चांगले. राहता राहिला प्रश्‍न अल्लाउद्दीन खिल्जीचा तर तो जरी धर्माने मुस्लिम होता तरी त्याचे वर्तन किंवा शासन इस्लामी नव्हते, यात वाद नाही. त्यामुळे त्याचे विकृत चित्रकरण म्हणजे भारतीय मुस्लिमांचा अपमान वगैरे आहे, असे काही नाही. भारतीय मुस्लिमांनी त्याच्या विषयी सहानुभूती बाळगावी, असे काही नाही.
    करनी सेनेने गुरू ग्राममध्ये शाळेच्या बसवर हल्ला करून ज्या पद्धतीने त्या हल्ल्यात मुस्लिमांना गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला तो निषेधार्ह आहे. गुरू ग्राम पोलिसांनी वेळीच स्पष्ट केले की, मुलांनी खचाखच भरलेल्या शाळेच्या बसवर हल्ला करणाऱ्या अटक आरोपितांपैकी एकही मुस्लिम नाही. ही संतोषजनक बाब आहे.
    मुळात देशाचे एकंदरित वातावरणच पावणेचार वर्षात मुद्दामहून बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अल्लाहच्या कृपेने हिंदू बांधवांमधूनच काही बांधव मुस्लिमांच्या बाजूने सत्याची लढाई लढत आहेत. म्हणून भारत महान आहे. भारत आपला देश आहे. विविधतेने नटलेला आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सामिल होण्याची गंगा-जमनी परंपरा या देशाला आहे. जोपर्यंत हिंदू बांधव मुस्लिमांच्या हक्काची लढाई लढत आहेत तोपर्यंत मुस्लिमांना भय बाळगण्याचं कारण नाही. जय हिंद !

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget