Halloween Costume ideas 2015
June 2024

 पेट्रो डॉलरचा अस्त : पेट्रो युआनचा उदय?


उंट चारून उपजिविका भागविणार्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणार्या, अफाट दारिद्रयात जगणार्या, 50 अंश सेल्सियसच्या तापमानातील वाळवंटात भाजून निघणार्या, अज्ञानपणामुळे खुनशी झालेल्या अरबांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की कधीकाळी आपल्या वाळवंटात खनिजतेल निघेल आणि आपला कायापालट होईल. सर्व जगाला आपल्या तेलावर अवलंबून रहावे लागेल. त्यांना स्वप्नात जरी वाटले नसले तरी प्रत्यक्षात मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जन्माने पावन झालेल्या अरब भूमीमध्ये अल्लाहने एवढे खनीजतेल आणि गॅसचे साठे ठेवून दिले की, सऊदी अरब बरोबर युरोप  आणि अमेरिकेचा कायापालट झाला. 

4 मार्च 1938 रोजी सऊदी अरबच्या दम्मम शहरात (आजच्या विहिर क्र.7) मध्ये पहिल्यांदा खनिज तेल सापडले. आपल्या भूगर्भातून काळ्या रंगाच्या, घाण वास येणार्या, चिकट पदार्थाला क्रूड ऑईल म्हणतात, याचा अंदाज सुद्धा बदुईन अरबांना सुरूवातीला आला नाही. मात्र या क्रुड ऑईलचे महत्त्व अमेरिकेने चटकन ओळखले. एका बॅरेलला एक डॉलर देऊन जेव्हा अमेरिकन अभियंते क्रूड ऑईल आपल्या देशात घेऊन जाऊ लागले, तेव्हा अरबी शासक त्यांच्यासमोर अत्यंत विनयशीलपणे उभे राहून आभार व्यक्त करू लागले. अरबांच्या या भोळ्यापणाचा लाभ उठवत अमेरिकेने तात्काळ सऊदी अरबच्या भूमीत खनीजतेल संशोधनाच्या कामाला गती दिली आणि तेथील भूगर्भातील खनीज तेलाचे प्रचंड साठे पाहून त्यांचे डोळे फिरले. सुरूवातीला त्यांनी सैन्यशक्तीच्या बळावर हे साठे ताब्यात घेण्याचा विचार केला, परंतु अमेरिकेपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या सऊदी अरबच्या अतिउष्ण वातावरणात आपल्या सैनिकांचा टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी हा विचार सोडला आणि इसराईलच्या निर्मितीला गती दिली. त्याला सर्वोतोपरी मदत केली. त्याला खर्या अर्थाने शक्तीशाली बनवून भोळ्या भाबड्या अरबस्तानच्या मधोमध वसवून अरबांना कायम असुरक्षित करून टाकले. 1948, 1965 आणि 1973 मध्ये अरबांनी आपले सर्व बळ एकवटून इजराईलला नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिन्ही वेळा अमेरिकेने उघड मदत करून इजराईलची पाठराखण केली. अमेरिकेच्या लष्करी मदतीवर इजराईलने अरबांना तिन्ही वेळा झोडपून काढले. तिन्ही युद्धात अपमानास्पद पराभव स्विकारावा लागल्याने नव्हे भूमी गमवावी लागल्याने सऊदी अरबचे शासक चिडले आणि त्यांनी युरोप आणि अमेरिकेचा तेल पुरवठा खंडित करून टाकला. यालाच 1973 चा ऑईल एन्बार्गो असे म्हणतात.

एव्हाना अरबस्तानच्या आजूबाजूच्या देशांमध्येही खनीजतेल मिळू लागल्याने अरबांनी संघटितरित्या ओपेकची स्थापना केली. सर्वांनी मिळून ऑईल एम्बार्गो लावल्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड तेलाचा तुटवडा निर्माण झाला. युरोपमध्ये सुद्धा हाहाकार माजला. राष्ट्रपती निक्सन यांचे सायकलवर ओव्हल कार्यालयात जातानाचे चित्रही प्रसिद्ध झाले. मात्र लवकरच कावेबाज अमेरिकेने भोळ्याभाबड्या अरबांना आपलेसे करण्यासाठी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला. याच प्रस्तावाचे रूपांतर 8 जून 1974 साली पेट्रो डॉलर करारामध्ये झाले. या कराराचे दोन वैशिष्ट्ये होते. एक म्हणजे- त्यांनी सऊदी अरबला आपले तेल जगामध्ये कोणालाही विकतांना फक्त डॉलरमध्येच विकावे अशी गळ घातली. डॉलरचे आंतरराष्ट्रीय महत्त्व पाहता अरबांनी ही अट आनंदाने मान्य केली. दूसरे वैशिष्ट्ये म्हणजे,  अमेरिकेने सऊदी अरबच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. इजराईलसह कोणीही सऊदी भूमीवर आक्रमण करणार नाही आणि केल्यास त्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेने स्विकारली. अरबांनी या दोन्ही अटी आनंदाने मान्य केल्या. सऊदी अरबचे तत्कालीन तेलमंत्री अली जकी यमनी जे ओपेकचेही सचिव होते त्यांच्यात आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेनरी किसींजर यांच्यामध्ये हा करार झाला. या कराराचा लाभ सऊदी अरब आणि इतर खाडीच्या देशांना तर झालाच झाला मात्र त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लाभ अमेरिका आणि युरोपला झाला. सऊदी अरबमध्ये वापरून शिल्लक राहिलेले डॉलर पुन्हा अमेरिकेच्या ट्रेझरी बाँड (राष्ट्रीय रोख्यां) मध्ये गुंतविण्यासाठी अमेरिकेने अरबी शासकांना राजी केले. यामुळे खनीज तेलासोबत अतिरिक्त डॉलरचा पुन्हा पुरवठा अमेरिकेकडे सूरू झाला आणि त्याच्या प्रगतीला हा अधिकचा हातभार लागला. त्यामुळे अमेरिका आणि युरोपच्या दैदीप्यमान प्रगतीमध्ये खाडी देशातील तेलाची प्रमुख भूमिका राहिली. 1971 पर्यंत डॉलर छापतांना तेवढ्याच मुल्याचे सोने अमेरिकेला राखीव ठेवावे लागत होेते. पेट्रो डॉलर करारानंतर अमेरिकेने कागदी डॉलर छापण्यास सुरूवात केली आणि सोने राखीव ठेवण्याची प्रथा बंद केली. एव्हाना तेलाची प्रतिष्ठा एवढी वाढली होती की, सोनं न ठेवल्यावर सुद्धा या करारामुळे डॉलरचे मुल्य कमी झाले नाही. उलट ते वाढतच गेले. जगभरात ज्यांनाही खाडीच्या देशातून तेल खरेदी घ्यायचे असेल त्यांना आपल्या गंगाजळीत डॉलर गोळा करून ठेवणे गरजेचे बनले. त्यामुळे सगळ्या जगातून डॉलरची मागणी वाढली आणि अमेरिकेने कागदी नोटा छापून ती पूर्ण केली. आजही अमेरिकेमध्ये जेवढे डॉलर आहेत त्यापेक्षा जास्त डॉलर जगाच्या इतर देशात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. 

9 जून 2024 रोजी हा करार संपला आणि सऊदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या कराराला मुदतवाढ दिली नाही. उलट त्यांनी डॉलरसह चीनचे युआन, युरोपचे युरो आणि जापानच्या येनमध्ये तेल विक्री करण्यास मान्यता दिली. एवढे मोठे धाडस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी चीनच्या भरोशावर केले, हे उघड आहे. कारण चीनने सऊदी अरब आणि इराणचे जुने वैर संपवून दोघांमध्ये समेट घडवून आणला. सऊदीच्या आरामको या तेल कंपनीने चीनमध्ये मोठी रिफायनरी स्थापन करण्यास परवानगी दिली. यावरून स्पष्ट होते की, चीनने सऊदी अरबाला सैन्य सुरक्षेची सुद्धा हमी दिली असणार. कारण अमेरिकेचे सुरक्षाछत्र या कराराच्या संपण्यामुळे संपुष्टात आल्यावर इजराईल मार्फत अमेरिका ओपेक देशांवर सुद्धा हल्ला घडवून आणू शकतो. त्यावेळेस चीनच्या मदतीशिवाय स्वतःचे संरक्षण इजराईल, म्हणजेच पर्यायाने अमेरिकेकडून कसे होणार? निश्चितच चीनने यासंबंधी ठोस आश्वासन दिल्याशिवाय क्राऊन प्रिन्स एवढे मोठे धाडस करणार नाही. 

2016 पर्यंत अमेरिका खनीज तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला असून, उलट त्याने निर्यातीला परवानगी दिलेली आहे. युरोपमध्ये अमेरिकेचे तेल मिळत आहे. युक्रेन युद्धानंतर रशियाचे तेल बंद झाल्यावर युरोपने अमेरिकेकडून तेल खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. सऊदी अरबचे सात सुुलतान आणि अमेरिकेचे 15 राष्ट्राध्यक्ष होवून गेल्यावर सुद्धा हा करार संपुष्टात आला नव्हता तो आता आला आहे. 

हा करार संपल्याचे परिणाम

हा करार संपल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे समीकरण बदलेल यात शंका नाही. डॉलरचे महत्त्व संपणार जरी नसले तरी कमी मात्र नक्कीच होईल. अमेरिकेकडून आशियाई देशांना तेल खरेदी करणे भौगोलिक अंतरामुळे महाग पडेल म्हणून एशियाइ देशांना खाडी देशातूनच तेल घेणेच परवडणारे आहे. एशियामधील गरजवंतांमध्ये चीन सर्वात मोठा देश आहे. त्याला एकट्यालाच वर्षाला इतके तेल लागते की, बाकी एशियन देशांना तेवढे लागत नसावे. चीन नंतर भारत हा दूसरा मोठा देश आहे ज्याला अमेरिकेतून नव्हे तर खाडीच्या देशातून तेल आयात करणे आर्थिकदृष्ट्या परवडेल. 

आता पेट्रो-डॉलर करार संपल्यामुळे आर्थिकदृष्ट्या जगाची दोन भागात विभागणी झालेली आहे. पश्चिमेकडील देश तेलाकरिता डॉलर आणि अमेरिकेवर अवलंबून राहतील. तर पुर्वेकडील एशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील देश तेलासाठी खाडीच्या देशावर अवलंबून राहतील. भविष्यात पश्चिमेचे नेतृत्व अमेरिका तर पुर्वेचे नेतृत्व चीन करेल हे ओघाने आलेच.


- एम. आय. शेख 

लातूर


सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला लागणार लगाम!


कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली. त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेचा विरोधी पक्षनेता होणे काळाची गरज होती. राहुल गांधी यांनी पायी भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा काढून जनमान्यांच्या प्रश्नांना जाणून त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. त्यावर जनतेने विश्वास ठेवला आणि परिस्थिती विपरीत असतांना, निवडणूक आयोग पक्षपाती असतांना, धार्मिक उन्माद चोहीकडे पसरलेला असतांना, 400 पार घोषणेचा पार धुव्वा उडवत देशाच्या सुजान जनतेने राहुल गांधींवर विश्वास टाकला आणि आज ते प्रतीपंतप्रधान अर्थात संसदेतील विरोधी पक्षनेते बनले आहेत. देशाच्या लोकशाहीसाठी ही अत्यंत चांगली घटना आहे. 

राहुल गांधी एक सुशिक्षित विरोधी पक्षनेते असल्याने भारतीय संविधानाची रक्षा आणि लोकशाहीला मजबूत करतील, अशी अपेक्षा देशभरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. त्याची प्रचिती राहुल गांधी यांनी नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणून दिली. केंद्र सरकारला नाविलाजाने यासंबंधी चौकशीचे सीबीआयला आदेश द्यावे लागले. राहुल गांधी यांचा विरोधी पक्षनेते म्हणून देशातील सर्वच महत्त्वाच्या संस्थांपर्यंत थेट पोहोच असेल. त्यांचे पद कॅबिनेट मंत्रीदर्जाचे असून, विरोधी पक्षनेता म्हणून ईडी, सीबीआय केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, लोकपाल, निवडणूक आयुक्त, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष या सर्वांच्या निवडीमध्ये समावेश झालेला आहे. तसेच महत्त्वाच्या संसदीय समितींवर ते बायडिफॉल्ट सदस्य असल्यामुळे संसदीय समित्यांना सुद्धा आता बेलगामपणे काम करता येणार नाही. त्यामुळे मागच्या दहा वर्षांत या शासकीय संस्थांच्या नियुक्तीमध्ये ज्याप्रमाणे मनमानी केली गेली आणि ज्याप्रमाणे शासकीय संस्थांचा गैरवापर झाला त्याला आता निश्चितच चाप बसणार आहे. कोणतेही कायदे अथवा एकतर्फी निर्णय केंद्र शासनाला घेता येणार नाहीत किंवा अडाणीला आता राष्ट्रीय संपत्तीची खिरापत वाटता येणार नाही. ज्याप्रमाणे शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण, त्यांची अल्पदरात विक्री यापूर्वी झाली ती आता होवू शकणार नाही त्याला आळा बसेल, अशी भावना जनमाणसांतून व्यक्त होत आहे.   

विरोधी पक्ष यंदा मजबूत असल्याने भारताची प्रगती न्याय भावनेने होण्यास मदत होईल. इंडिया आघाडिचे संख्याबळ 240 असल्यानेही सत्ताधाऱ्यांवर अंकुश लागणार आहे. 

गांधी घराण्यातील तीसरे सदस्य 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधकांनी एकमताने 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (ङशरवशीेष जििेीळींळेप) निवड केली आहे. हे पद भूषवणारे राहुल गांधी, हे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी (1989-90) आणि सोनिया गांधी (1999-2004) यांनी हे पद भूषवले होते. विरोधी पक्षनेता हा साहजिकच पंतप्रधानपदाचा दावेदार मानला जातो.  

अधिकार आणि कर्तव्ये

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यांचे शासकीय सचिवालयात कार्यालय असेल. पगार आणि भत्त्यांसह त्यांना दरमहा अंदाजे 3.25 लाख रुपये मिळतील. 

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आता लोकपाल, सीबीआय प्रमुख, मुख्य निवडणूक आयुक्त आदी महत्त्वाच्या नियुक्त्यांसाठी पॅनेलवर असतील. त्याचप्रमाणे, उतउ, केंद्रीय माहिती आयोग आणि छकठउ प्रमुखांच्या निवडीशी संबंधित पॅनेलचे सदस्य देखील असतील. पंतप्रधान हे अशा सर्व पॅनेलचे प्रमुख असतात.


- बशीर शेख


 विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण


नीट पेपर लीक प्रकरणावरून सीबीआय, एटीएस, पोलिस दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. 26 जूनपर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे. रॅकेटचे केंद्र बिहार, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र आहे. नेटकडून सर्वात मोठा हलगर्जीपणा यंदा नीट2024 मध्ये दिसून आला. याचा फटका देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे रॅकेटच्या गळाला लागलेल्या काही हजार मुलांमुळे लाखो मुलांचे भवितव्य आजघडीला टांगणीला लागले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाबद्दल पालकांमध्ये चिंता दिसून येत आहे. सरकार नीटला नीट कधी करणार असा प्रश्न पालक, विद्यार्थी उपस्थित करत आहेत.  

अपयशाने खचलेल्या अथवा दोनदा परीक्षा देऊनही अपेक्षित यश न मिळालेल्या पालकांचा शोध घेऊन त्यांना गंडविणाऱ्या महाभागांची टोळी निर्माण झाली आहे. त्यात जे आमिषाला बळी पडले असतील, तेही चुकलेच. कठोरपणे यंत्रणा राबविण्याची ख्याती असलेली एनटीए 2024च्या परीक्षेत अपयशी ठरली. ज्या राज्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण घडले, ज्यांना गुणांची खिरापत वाटली गेली त्यांना शिक्षा मिळेल नाही मिळायलाच पाहिजे. मात्र, जे मुख्य सूत्रधार आहेत, त्यांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मारेकरी ठरवून कायमचे कोठडीत पाठविले पाहिजे. नव्या पेपर लीक कायद्याने एक कोटीचा दंड आणि दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. आता ज्या तऱ्हेने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे, ते पाहून दहा वर्षांची शिक्षाही कमीच वाटते आहे. सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणावर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सीबीआय दिल्ली टीम नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने दिल्लीतच गुन्हा दाखल केला आहे. पाटणा येथे आर्थिक गुन्हे युनिट ने तपास अहवाल, केस डायरी आणि पुरावे सीबीआयकडे सुपूर्द केले आहेत. तपास अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, नीट युजीची प्रश्नपत्रिका लीक झाली.  पैशासाठी की व्यवस्था उध्वस्त करण्याचा कट...

नीट पेपर लीक प्रकरणाने विविध प्रश्नांना जन्म दिला आहे. यामध्ये तपासाअंती अटक केले जात असलेल्या गुन्हेगारांकडून या गोष्टीचा शोध घेतला जावा की, ते पैशासाठी हे सगळे करीत होते अथवा एनटीएची पारदर्शक व्यवस्था उध्वस्त करून ही केंद्रीय स्तरावरील परीक्षाच रद्द करायची आहे. नीटच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सर्व   समाजघटकातील मुले वैद्यकीय परीक्षेत यश मिळवित आहेत. त्यामुळे काहीजणांना हे पहावतही नसेल. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सर्वस्तरातून होत आहे. 

ग्रेस गुणातील विद्यार्थी...

ग्रेस गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जाणे किंवा मूळ गुण स्वीकारणे, हा पर्याय होता. एकूण 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर इतरांनी मूळ गुण स्वीकारले. आता त्यांचा 30 जूनला निकाल येईल आणि पुन्हा गुणवत्ता यादीचा क्रम बदलेल. सध्या झारखंड, बिहार, गुजरात येथे दाखल गुन्हे व तेथील प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही येणाऱ्या निकालातून वगळली जाईल. मात्र, अजूनही सुरू असलेला तपास, महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतर आणखी काही विद्यार्थी प्रतिबंधित होतील. त्यामुळे सध्याचा तपास आणखी गतीने पूर्ण करून निकालाची अंतिम यादी समोर आली पाहिजे. अन् फेर परीक्षेचा मुद्दा असेलच तर त्याची घोषणा तत्पर करून विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. या सर्व मुद्द्यांवर खुलासा होत नाही आणि रोजच नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढत आहे. सरकारने परीक्षासंबंधी लवकर निर्णय घ्यावा.

- बशीर शेख



जागतिक स्तरावर दरवर्षी 26 जूनला संयुक्त राष्ट्रातर्फे संपूर्ण विश्वात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थांच्या वापरावर व तस्करीवर बंदी जरूर आहे पण अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. म्हणूनच तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या संख्येत आणि त्याच्या व्यापारात  मोठी वाढ होत चालली आहे. 

अंमली पदार्थाचे सेवन करणे हा एक भयानक रोग आहे ज्याने असंख्य कुटुंबाचे जीवन उध्वस्त  झालेली आहेत. अंमली पदार्थाची लत किंवा त्याच्या व्यापारात अडकून जाणे स्वतःचाच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा आणि संपूर्ण जगाचा विनाश करणे होय. 

अंमली पदार्थ म्हणजे ती सर्व पदार्थ ज्याने बुद्धी भ्रष्ट होते, स्मरणशक्ती, आकलन शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होते. अमली पदार्थांचे अनेक प्रकार आहेत. जसे गुटखा, सिगारेट, हुक्का, दारू, हशिष, अफिम, चरस, गांजा, भांग, हिरोईन, ब्राऊन शुगर, इंजेक्शन,कोकिन, पेट्रोल, नशा युक्त गोळ्या, नशायुक्त पकोडे, भांगचे पापड, क्रॅक इत्यादी . 

सद्यस्थितीत वेगवेगळे द्रव्य, टायर पंचरचे सॉल्युशन, सर्दी, खोकला इ. औषधी इत्यादींचा देखील नशा युक्त पदार्थ म्हणून नशेडी वापर करतांना दिसतात.

युएनओ चे कार्यालय (अमली पदार्थ आणि क्राईम) णछजऊउ ने जारी केलेल्या 2019 च्या अमली पदार्थ ड्रग रिपोर्ट प्रमाणे जगात जवळपास 275 मिलियन व्यक्तींनी अमली पदार्थाचे वापर केले. काही लोकांच्या अंदाजानुसार जगात अमली पदार्थांच्या स्मगलिंगचा व्यापार 650 बिलियन डॉलर्सच्यावर पोहोचलेला आहे. तसेच 36 मिलियन पेक्षा जास्त व्यक्तींनी अमली पदार्थांचा वापर करून स्वतःला अडचणीत आणले आहेत. नुकताच औरंगाबाद शहरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांनी एका युवकाचा खून केल्याचे समोर आले आहे.  अमली पदार्थांचा सर्वाधिक वापर अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रात होतो. अखचड ने केलेल्या सर्वेनुसार संपूर्ण भारतात 8 लाख 50 हजार लोक इंजेक्शन घेऊन अंमली पदार्थ वापरतात. जवळपास 460000 बालक आणि 18 लाख प्रौढ नाकाने ओढून नशा युक्त अमली पदार्थाचज्ञ वापर करतात. अंमली पदार्थांचा हा कारभार भारतासह संपूर्ण जगात एक गंभीर समस्या बनलेली आहे. 2017 च्या ग्लोबल बर्डन ऑफ डीसीसच्या डेटानुसार अवैध अंमली पदार्थाने यावर्षी संपूर्ण जगात 7.5 लक्ष व्यक्तींचे प्राण घेतले आहेत.

जवळपास 75 टक्के लोक मानसिक आजाराने किंवा दबावाने तात्पुरता आराम मिळावा म्हणून अंमली पदार्थांचा वापर करताना दिसतात. युवकांत अंमली पदार्थांची सेवन एक फॅशन बनलेली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाची सुरुवात सिगारेट ओढण्याने होते आणि गुटखा खाल्ल्याने. हे युवक मित्रांना खुश करण्यासाठी हे सर्व करतात. अशा तऱ्हेने त्यांना अंमली पदार्थांची लत लागते.

बलात्कार, घटस्फोट, कायमस्वरूपी आजार, बेरोजगारी, आणि जॉब सुटून जाणे असे दुष्परिणाम अंमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात होताना दिसतात.

अंमली पदार्थांचे उपयोग डान्स पार्टीमध्ये, देशातील मेट्रो सिटीज, पॉश आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये होताना दिसतात. ज्यामध्ये फक्त कपल सामील होतात. या पार्ट्यांमध्ये किंवा रेव पार्ट्यांमध्ये महागडी आणि सुंदर मॉडेल्स बोलावल्या जातात. डान्सरांना देखील आमंत्रित केले जाते. यामध्ये संपूर्ण रात्र धूमधडाका व घाणेरडे कामं तसेच नाच गाणे होतात, आणि इथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आलेले आहे. 

नशा करणे किंवा अंमली पदार्थांच्या वापराला तसेच व्यापार व तस्करी या सर्वांना इस्लाम पसंत करीत नाही. दारूला इस्लामने उम्मुल खबायीस म्हणजे सर्व वाईट कामांची जननी म्हटले आहे.

अंमली पदार्थामुळे वा दारू पिल्याने आपसात शत्रुत्व निर्माण होते, भांडणे होतात, अस्वच्छ वातावरण निर्माण होते, भ्रष्टाचार, अत्याचार वाढतात, खून देखील होतात, कुटुंब उध्वस्त होते, बलात्काराच्या घटना वाढतात, दरोडे आणि चोरीचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत राहते. राग आणि क्रूरतेमध्ये वाढ होते. दया करुणा, आपुलकी, आई-वडिलांचा सन्मान राहत नाही. बेरोजगारी वाढते. -(पान 7 वर)

घरातील सुख उध्वस्त होते.  एक असा समाज निर्माण होण्यास सुरुवात होते ज्याला विनाशापासून कोणीही सुरक्षित करु शकत नाही. परंतु इस्लामच्या शिकवणीत ती शक्ती आहे ज्यामध्ये या सर्व समस्यांचे समाधान आहे. जो इस्लामच्या सच्चा मनाने स्विकार करून त्यावर अमल करतो, तोच या सर्वांपासून दूर राहू शकतो. मग ते कोणीही असो.

इस्लामची तत्वे अशी आहेत की या सर्व समस्यांवर मात करू शकते. जर इस्लामची शिकवण आम्ही अंमलात आणली तर नशेडी लोक या जगात आम्हाला दिसणार नाही. अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम संपुष्टात येईल. बलात्कार होणार नाही,आदर सन्मान करणारा समाज निर्माण होईल. चोरी, दरोडे, मर्डर होणार नाहीत. युवकांमध्ये जीवन जगण्याची नवीन ऊर्जा निर्माण होईल. एक आदर्श समाज रचनेची प्रेरणा जागृत होईल. हरामखोरी होणार नाही. कोणाचे हक्क मारले जाणार नाहीत. अब्रूची रक्षा होईल. राष्ट्रात आणि जगात शांतता निर्माण होईल. कारण इस्लाम या विश्वासाठी शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेला आहे.  इस्लामचा अर्थ शांती होतो.

अल्लाह दिव्य कूरआन मध्ये आदेश देतो की,

हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.(5:90)

सैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?(5:91)

इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.) सांगतात की,

ज्या तऱ्हेने कुण्या झाडाला फांद्या निघतात त्याच तऱ्हेने दारूपासून  दुष्कर्म. (सनन ईबने माजा)

आजच्या स्थितीत सैतानाने मानवाचे रूप धारण केलेले दिसते. ते सर्व अंमली पदार्थांचे तस्करी करणारे व्यापारी आहेत ज्यांनी अंमली पदार्थांचे जाळे संपूर्ण जगात पसरविले आहे. यामागे त्यांचा उद्देश हाच आहे की लोकांना अंमली पदार्थाचा वापर करण्यास भाग पाडून त्यांना देशोधडीला लावावे. त्यांना कंगाल करुन सोडावे.  त्यांनी आजारी व नशेडी बनून जीवन जगावे. अंमली पदार्थ, दारू आणि जुगार यांना म्हणूनच जागतिक स्तरावर प्रोत्साहित केले जात असताना आम्ही बघत आहोत. तशी जाहिरात आणि कल्चर निर्माण केले जात आहे. कारण हे अंमली पदार्थांचे व्यापारी व तस्करी करणारे, मानवाच्या जीवन मृत्यूचे निर्दयी व्यापारी आहेत. त्यांची हीच इच्छा आहे की लोकांची संपत्ती काही मोजक्या व्यापाऱ्याजवळ असली पाहिजे. उरलेले सर्व लोक त्यांचे गुलाम झाले पाहिजेत, जेणेकरून ते ऐश व आरामाने जीवन व्यतीत करतील, आणि जनतेचे जीवन हालकीचे, गरीबीचे व गुलामीचे बनतील. इस्लाम अशा तस्करी व्यापाऱ्यांना, सैतानांना पसंत करीत नाही, जे लोकांच्या संसाराशी व जीवनाशी खेळतात. म्हणून इस्लाम अशा व्यवसायाला लगाम घालतो. दारू, जूगार, सट्टा, पैज व्याजवस्था ही सर्व इस्लाममध्ये निषिद्ध आहेत. जर या सर्वांवर बंदी घातली गेली तर हे अंमली पदार्थाचे व्यापार व तस्करी करणारे , रस्त्यावर येईल. त्यांचे ऐश आराम संपुष्टात येईल. म्हणून ते इस्लामला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असतात. काही पाश्चात्य राष्ट्रातील तसेच इतर काही संघ,परिषद,दल किंवा संघटन असे काम करताना दिसतात, ज्यामुळे  इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. ते इस्लामची छवी एकदम क्रूरतेची, आतंकाची, दहशतवादी निर्माण करण्याची दाखवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यामध्ये काहीच कसर ठेवत नाहीत. साधारण लोकांच्या मनात इस्लामबद्दल घृणा, द्वेष, नफरत निर्माण करणे त्यांचे एकमात्र काम उरलेले दिसते. असे का? याचे एकच उत्तर आहे की, जे सर्व अंमली पदार्थांचे व्यापारी व तस्करी करणारे आहेत त्यांना असे वाटते की जर दारू, जुगार आणि अंमली पदार्थांच्या वापरावर बंदी घातली गेली तर आमचे दुकान बंद होईल. आमच्या तिजोरीत येणारा पैसा साधारण जनतेच्या खिशात जाईल, आणि आमचे हे फसवणुकीचे अंमली पदार्थाचे व्यापार व तस्करीचे विशाल साम्राज्य कोसळेल. म्हणून ते इस्लामचे शत्रू बनलेले आहेत, परंतु सत्य तर सत्य आहे. एक दिवस विजय तर सत्याचेच होईल.अंमली पदार्थांच्या या तस्करीच्या साम्राज्याचे पतन सत्य धर्म करेल, कारण त्याच्यात अशी शक्ती आहे की तो या सर्वांचा सामना करू शकतो. आपण पाहत आपले शासक दारू दुकाने, बिअर व अन्य अल्कोहोल मिश्रित पेयांना परवानगी देतात व मोठा महसूल जमा करतात. यांच्याकडून काय अपेक्षा केली जावू शकते की हे नशाबंदी करतील. 

मी ईश्वर दरबारी प्रार्थना करतो आणि सर्व सज्जन नागरिकांना विनंती करतो की त्यांनी अंमली पदार्था विरोधात उभे राहावे आणि या चक्रव्यूहात न अडकता अंमली पदार्थांचे विद्रोही बनून समाजात चळवळ निर्माण करावी, तरच एक आदर्श समाज निर्माण होईल, आणि आपल्या राष्ट्राच्या आणि जगाच्या नवयुवकांना त्यांचे जीवन योग्यरित्या जगता येइल.अल्लाह आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो हीच अल्लाह दरबारी प्रार्थना. 


- आसिफ खान,

धामणगाव बढे

9405932295



मृत्यूच्या सीमेत दाखल होताच मरणोत्तर जीवनातील प्रत्येक वस्तुस्थिती मरणाऱ्यासमोर प्रकट होऊ लागते. मग त्या हकीकतींवर मृत्यूपूर्वी विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या श्रद्धेच्या बदल्यात मिळणारे ठिकाण दिसू लागते आणि ते सत्य नाकारणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट नशीब दिसते. जेव्हा आस्तिक व्यक्तीला मृत्यू येतो, तेव्हा फरिश्ते त्याला खुशखबर देतात की अल्लाह तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझा सन्मान केला जाणार आहे. ही सुवार्ता ऐकल्यावर त्याला आणखी पुढे जाण्याची, अल्लाहला भेटण्याची इच्छा होते, पण जेव्हा नास्तिकाला त्याच्या मृत्यूसमयी शिक्षेची खबर दिली जाते तेव्हा तो पुढे जाण्यास घाबरतो आणि आश्रय मागू लागतो. गयावया करत म्हणू लागतो की  मला परत जाऊ द्या, मी खात्री देतो की याआधी जे काही केले, ते आता करणार नाही. पण ईश्वराकडून त्याची विनवणी ठामपणे नाकारली जाते. त्या प्रसंगाचे वर्णन करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की,

’’हत्ता इजा जा’अ अहदहुमुल्-मवतु का-ल रब्बीर्-जिऊनि.’’

अनुवाद :- हे लोक आपल्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत इथपावेतो की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मरण येईल तेव्हा तो सांगू लागेल, हे माझ्या पालनकर्त्या, मला त्याच जगात परत पाठव, जे मी सोडून आलो आहे. (23 - मुिअ्मनून - 99)

जगात परत न पाठवण्याचे कारण हे आहे की हे जग परिक्षा स्थळ आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी निर्मात्याने माणसाला विवेक व बुद्धी दिली. जेणेकरून त्याने मरणोत्तर जीवनातील वास्तविकतेवर न पाहताही विश्वास ठेवावा आणि सत्य ओळखण्याचा प्रयत्न करावा. पवित्र कुरआनने मरणोत्तर जीवनाविषयी मानवी अस्तित्व आणि सृष्टीतील अनेक गोष्टींचे पुरावे मानवजातीसमोर ठेवले. त्यांची आठवण करून देण्यासाठी आणि लोकांना चांगल्या-वाईट परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अल्लाहने आपले पैगंबर पाठवले. त्यांच्यावर ग्रंथ अवतरित केले. जेणेकरून माणसांना सत्य ओळखण्यात अडचण येऊ नये. मग लोकांना आज्ञापालन किंवा अवज्ञा या दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य देण्यात आले. मात्र दोन्ही मार्ग अशा पद्धतीने स्पष्ट केले गेले की, जर माणसाने विवेकबुद्धीने विचार केला तर त्याला आज्ञापालनाचा मार्ग धरणे कठीण जात नाही, पण जेव्हा माणूस मृत्यूची सीमा ओलांडून मरणोत्तर जगात प्रवेश करतो आणि त्याच्यासमोर पुढील जीवनातील प्रत्येक वास्तविकता प्रकट होते, ज्यांवर सांसारिक जीवनात न पाहता विश्वास ठेवणे आवश्यक होते, तेव्हा त्याला संधी दिल्यास किंवा जगात परत पाठवल्यास या सांसारिक जगात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला काहीच अर्थ उरणार नाही. हे तर विद्यार्थ्यांसमोर उत्तरांसह प्रश्नपत्रिका ठेवण्यासारखे होईल. साहजिक आहे की असा प्रकार परीक्षेच्या नावाखाली एक विनोदच ठरेल. 

............................. क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद.


कुरआनी फळ - अंजीर


फळ येणे हा सपुष्प आवृत्तबिजी वनस्पतींचा मूळ गुणधर्म आहे. पुष्पावस्थेतील स्त्रीकेसराचा खालचा भाग फलित क्रियेनतर फळांमध्ये रूपांतरित होतो आणि या अंडाशयापासून तयार झालेल्या फळाला खरे फळ (true fruit) म्हणतात. अंडाशयाव्यतिरिक्त पुष्पासन, फुलाचा इतर भाग किंवा फुलांच्या गुच्छापासून तयार झालेल्या फळांना वैज्ञानिक भाषेत आभासी फळ (false fruit) म्हणतात. स्ट्रॉबेरी, तुती, अंजीर हे फुलांच्या गुच्छापासून तयार झालेल्या आभासी फळांची काही उदाहरणे आहेत.

उंबर किंवा अंजीर हा सूक्ष्म फुलांचा गुच्छ असतो ज्याला वनस्पतीशास्त्रात हायपॅन्थोडियम (Hypanthodium) म्हणतात. 

इतर फुलांप्रमाणेच पुंकेसर आणि स्त्रीकेसर असणारी फुले यामध्ये विशिष्ट प्रकारे रचलेली असतात जेणेकरून किटकांद्वारे परागीभवन पण होऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे उंबर व अंजीर ही फळे सपुष्प आवृत्तबिजी गटात मोडतात, परंतु यामधील फुले लहान असुन ते एका विशिष्ट आवरणात आतिल बाजूला असतात जी बाहेरून दिसत नाहीत, जणू काही यांना फुलेच येत नाहीत. म्हणूनच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला 'उंबराच्या फुलाची' उपमा देतात. हेच हायपॅन्थोडियम परिपक्व होऊन फळांचा आकार घेते ज्याला आपण आभासी फळ म्हणतो. पिंपळ, वड, रबर, उंबर, अंजीर हे पिंपळकुळातील सर्वच फळे आभासी फळे आहेत. या सर्वांमध्ये अंजीर फार उपयोगी आणि पारंपरिक पिकवले जाणारे फळपीक आहे.

अंजीर या फळाच्या वेगळेपणाबरोबरच यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत. अंजीराच्या सेवनाने मधुमेह, सर्दी, पडसे, दमा आणि अपचनासारख्या अनेक व्याधींवर लाभ होतो.  worldatlas.com अनुसार अंजीर हे मुळचे दक्षिण अरबस्तानातील फळ आहे. जेथे याची लागवड केली जाते. या बहुगुणी फळाचे महत्त्व अधिक वाढते जेव्हा अल्लाहने कुरआनमध्ये अत्-तीन म्हणजे अंजीर या नावाने एक अध्याय अवतरीत केला आणि त्याची शपथ घेतली.

"शपथ आहे अंजीर व जैतुनची,..." (९५:१)

या आयतीविषयी तय्-सीरुल कुरआन या ग्रंथात मौलाना अब्दुर्रहमान कीलानी यांनी केलेल्या भाष्याचा आशय असा घेतला जाऊ शकतो. मुळ अरबी शब्द अत्-तीन म्हणजे अंजिराचे झाड किंवा त्याचे फळ किंवा फक्त अंजीराचे बी. उत्तम चव असलेले हे एक प्रसिद्ध फळ आहे, जे भरपूर पौष्टिकतेने भरलेले आहे आणि अनेक रोगांवर उपचारही करते. ढोबळपणे बघीतले तर असे वाटते की अंजीर या फळाचीच ही शपथ आहे पण या आयतीत अंजीर किंवा त्याचे झाड आणि जैतुनाच्या झाडाची शपथ घेतलेली नाही, तर ज्या भूमीत ही झाडे विपुल प्रमाणात वाढतात त्या भुमीची शपथ घेतली आहे. ते क्षेत्र सीरिया आणि पॅलेस्टाईनचे क्षेत्र आहे. 

ज्याप्रमाणे अरबांचा नियम आहे की, एखाद्या गोष्टीचा मुख्य भाग म्हटल्यावर ते मूळ वस्तूचा अर्थ घेतात. त्याचप्रमाणे, त्यांच्यामध्ये एक नियम हाही आहे की एखाद्या प्रदेशाच्या प्रसिद्ध उत्पादनाचे नाव घेतल्याने ते त्या प्रदेशाचा अर्थ काढतात. जसे, महाराष्ट्रात जळगाव केळींसाठी आणि नासिक द्राक्षांसाठी ओळखले जाते. या अध्यायाच्या पुढील दोन आयतींनीदेखील हे स्पष्ट होते, म्हणजे सिनाई पर्वत आणि मक्का शहर ही सर्व ठिकाणे पैगंबरांची जन्मभूमी आणि निवासस्थाने आहेत. 

यावरून हे लक्षात येते की अरबांना अंजीर आणि अंजीर उगवणारे ठिकाण किती प्रिय होते आणि एखाद्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेताना किंवा त्याच्या सत्यतेवर साक्ष देताना त्याची शपथ घेतली जाते.

(क्रमशः)

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६



माणसांना ज्या गोष्टींमुळे प्रसन्नता लाभते, आनंद होतो, उत्साहित होतात अशा प्रसंगांची मर्यादा नाही. संपन्नता, धनदौलत, ज्ञान, महत्त्वाचे एखादे पद, विवाह, सण-उत्सव आणि शेकडो अशा प्रकारचे प्रसंग माणसांच्या दैनंदिन जीवनात येत असतात आणि अशा प्रत्येक प्रसंगांवर माणूस हर्षोल्हास, आनंद व्यक्त करतो, साजरा करतो. पण आनंद व्यक्त करण्यात अतिरेक होतो तेव्हा त्याचे कारण अहंकार आणि घमेंड असते. इतिहासातील सर्वांत श्रीमंत कारुन नावाच्या माणसाने ज्यास अल्लाहने अमर्याद धनदौलत, संपत्ती दिली होती, त्याने अहंकार केला तेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितले की घमेंड करू नकोस. अल्लाहला घमेंडी आवडत नाही. (सूरह अल कसस, पवित्र कुरआन) अल्लाहने तुम्हाला जे काही दिले आहे त्यावर चर्चा करू नका. कारण अल्लाहला गर्विष्ट लोक पसंत नाहीत. (सूरह अल हदीद, पवित्र कुरआन)

अल्लाहने मुस्लिमांची मने दुखविली नाहीत तर संतुलन कायम राखत आनंद साजरा करण्याची अनुमती दिली. मुस्लिमास जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने अल्लाहचे आभार मानावे आणि अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे जेणेकरुन माणसास ह्याचे भान असावे की ऐहिक जगात घमेंड आणि अहंकार करणे त्याला शोभत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांना जेव्हा आनंद होत असे तेव्हा ते अल्लाहसमोर नतमस्तक होत असत.

मुस्लिमांचे हे नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मित्रांना, भाऊबंधांना एखादा प्रसन्नतेचा प्रसंग लाभल्यास आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

प्रवासाहून परतल्यावर माणसाला घरी परतल्याचा आनंद होत असतो. अशा वेळी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जेवणाचे आमंत्रण द्यावे. प्रेषित मुहम्मद (स.) एकदा एका प्रवासातून मदीनेस परतले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रमंडळींना तसेच नातेवाईकांना जेवणाचे आनंत्रण दिले होते.

सामूहिकपणे एखाद्या विवाहप्रसंगी आनंदाचा प्रसंग येत असतो अशा वेळी इस्लाम धर्मात ढोल वाजवून गायन करण्याची अनुमती आहे जेणेकरून समाजात ह्या विवाहाची शुभवार्ता लोकांपर्यंत पोहोचली जावी. प्रेषितांनी एकदा सांगितले की वैध आणि निषिद्ध मधला फरक असा की एखाद्याच्या लग्नप्रसंगी ढोल वाजवून आणि गायन करून समारंभाचे आयोजन करुन लोकांना अशा विवाहाची सूचना दिली जाते जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळावी की अमुक व्यक्ती आणि अमुक महिलेचा विवाह समारंभ संपन्न झाला आहे. त्याच वेळी व्यभिचार लपूनछपून केला जातो जेणेकरून कुणाला याची माहिती होऊ नये.

(सीरतुन्नबी, शिबली नोमानी, सुलैमान नदवी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(६१) आणि स्मरण करा जेव्हा आम्ही दूतांना सांगितले, की आदमपुढे नतमस्तक व्हा तेव्हा सर्व नतमस्तक झाले पण इब्लीस (सैतान) नतमस्तक झाला नाही. त्याने सांगितले, ‘‘काय मी त्याच्यापुढे नतमस्तक होऊ ज्याला तू मातीने बनविले आहेस?’’

(६२) मग तो म्हणाला, ‘‘पाहा तर खरे, काय हा माझ्यावर श्रेष्ठत्व प्रदान करण्यायोग्य होता? जर तू मला कयामतच्या दिवसापर्यंत सवड दिलीस तर मी याच्या संपूर्ण वंशाचे समूळ उच्चाटन करून टाकीन. केवळ थोडेच लोक माझ्यापासून वाचतील.’’

(६३) सर्वश्रेष्ठ अल्लाहने फरमाविले, ‘‘बरे तर जा,यांच्यापैकी जे कोणी तुझे अनुकरण करतील तुझ्यासह त्या सर्वांसाठी जहन्नमच भरपूर मोबदला आहे.

(६४) तू ज्याला ज्याला आपल्या आमंत्रणाने फूस लावू शकतो, लाव. त्यांच्यावर आपले स्वार व प्यादे चालून आण, संपत्ती आणि संततीमध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर आणि त्यांना आश्वासनाच्या जाळ्यात अडकव आणि सैतानाचे आश्वासन एका फसवणुकीशिवाय काहीही नाही.

(६५) नि:संशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा पालनकर्ता पुरेसा आहे.’’ 

(६६) तुमचा (खरा) पालनकर्ता तर तो आहे, जो समुद्रात तुमची नौका वल्हवितो जेणेकरून तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. वस्तुस्थिती अशी आहे की तो तुमच्या स्थितीवर अत्यंत मेहरबान आहे. 

(६७) जेव्हा समुद्रात तुमच्यावर संकट येते तेव्हा त्या एकाशिवाय अन्य ज्यांचा तुम्ही धावा करीत असता ते सर्व हरवलेले असतात, परंतु जेव्हा तो तुम्हाला वाचवून खुश्कीवर पोहचवितो तेव्हा तुम्ही त्याच्यापासून विमुख होता. मनुष्य खरोखरच मोठा कृतघ्न आहे.


२५ जून शाहू महाराज जयंतीनिमित्त...



समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा हा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी शिक्षण घ्यावे म्हणून वसतीगृहांची निर्मिती केली. मुस्लिम समाज हा या देशातील भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर मुस्लिम समाजातील मागासलेपण नष्ट झाले पाहिजे असे त्यांचें मत होते. मुस्लिम समाजातील अज्ञान नाहीसे होऊन त्याला गती मिळाली पाहिजे, आणि त्याकरिता हा समाज शिक्षणाभिमूख झाला पाहिजे; अज्ञानाच्या डबक्यात अडकलेला मुस्लिम समाज बाहेर पडावा व तो शिकावा,सवरावा यासाठी आवश्यक ती धोरणे डोळ्यासमोर ठेवून आपल्या राज्याचा कारभार करणारा हा पहिला राजा होय.

कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी हिंदू - मुस्लिम ऐक्याविषयीचे मुलभूत विचार मांडले असल्याचे दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहन झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील ‘ ‘सार्वजनिक सभा ‘ या संस्थेच्या वतीने ही हिरा बागेत भव्य सत्कार सोहळा पार पडला होता.यावेळी शाहू महाराजांना मानपत्र देण्यात आले होते. यावेळी मानपत्राचे वाचन बॅरिस्टर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना शाहू महाराजांनी नुकत्याच उद्भवलेल्या हिंदू - मुस्लिम दंगली संदर्भात म्हटले होते की, “ या दोन समाजांत सलोखा आणि शांतता निर्माण केली जावी. हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजातील नेते त्या दृष्टीने प्रयत्न करत असतीलच. पण त्याचबरोबर सार्वजनिक सभेच्या नेते मंडळींनी हिंदू - मुस्लिम सलोखा व्हावा, म्हणून प्रयत्न करावेत.”

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू - मुस्लिम सलोखा संदर्भातील विचार सातत्याने अनेक वेळा व्यक्त केले आहेत, त्यांनी सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता ही तत्वे नजरेसमोर ठेवून आपल्या अनेक भाषणांतून हिंदू - मुस्लिम एकतेविषयीच नव्हे तर सर्व धर्मियांच्या एकतेचे विचार जाणीवपूर्वक व्यक्त केलेचे दिसून येते.

हुबळी येथे जुलै 1920 मध्ये भरलेल्या ‘कर्नाटक ब्राम्हणेत्तर सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदी राजर्षी शाहू महाराज होते, यावेळी बोलताना महाराज म्हणतात... “मुसलमान हे नेहमी मराठ्यांप्रमाणे क्षात्रकर्म करितात. त्यांच्या चालीरीती ही बहुतेक मराठ्यांप्रमाणे आहेत. मराठ्यांच्या फौजेत मोठ मोठे मुसलमान सरदार होते त्याचप्रमाणे मुसलमानांच्या फौजेत मराठी सरदार होते.  हल्ली इंग्रज सरकारचे फौजेत मराठी व मुसलमान खांद्यास खांदा भिडवून लढले आहेत” अशाप्रकारे मुसलमान समाज हा या देशात कोणी परका नसून तो इथल्या बहुजन समाजाचाच एक भाग आहे, हे वास्तव समाजमनावर ठसविण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक केलेला दिसून येतो.

हिंदू - मुस्लिम ऐक्याचे विचार फक्त भाषणांतून मांडून ते स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांस समान न्यायाने वागविले, अनेक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्यांच्या खाजगी बैठकीत आवर्जून उपस्थित असत. तर अनेक मुस्लिम समाजातील व्यक्तींना त्यानी महत्वाची पदे व वतने देऊन संस्थानात आपल्या पदरी ठेवले होते. मुस्लिम समाजातील अनेक दर्गे, मशिद व देवस्थानच्या निगराणीसाठी त्यांनी उदार अंतःकरणाने व सढळ हाताने मदत केल्याचे अनेक दाखले दिसून येतात. तसेच मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान अशा गुणीजनांच्या गुणांचा गौरव करून त्यांना उदार राजाश्रय दिल्याचे दिसून येते.रमजानच्या महिन्यात सामुदायिक नमाजपठणसाठी जागा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे, यांसारख्या संस्थानच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देत, शिवाय मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान व नेहमीच्या आपल्या खाजगी बैठकीतील मुस्लिम समाजातील व्यक्तींना खीर कुर्मा साठी लागणारी खजूर,खारीक, खोबरं, बदाम, पिस्ते यांसारख्या वस्तू व नवीन कपड्यांसाठी संस्थानमधून मदत देण्याचा आदेश देत असत.

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात ही देशात अनेक ठिकाणी हिंदू - मुस्लिम समाजात जातीय दंगली होत असताना कोल्हापूरात मात्र हिंदू - मुस्लिम हे दोन्ही समाज सलोख्याने व एकोप्याने रहात आले आहेत, हा इतिहास आहे; तमाम बहूजन समाज मोहरमचा सण साजरा करण्यात अग्रभागी असतो, करवीर नगरीची भूमी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारांनी सुपीक केलीय, त्यामुळेच या भूमीत हिंदू मुस्लिम समाजातील सलोखा व ऐक्य आजही अबाधित आहे.

संदर्भ: १) राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, संपादक: डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.मंजुश्री पवार.

२) श्री शाहू महाराजांच्या आठवणी,: भाई माधवराव बागल )


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२

(सदर लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार छत्रपती शाहू महाराज आणि लेखकाचे वैयक्तिक आहेत.)

न्यायाच्या तेजस्वी घटना 



एका व्यक्तीने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे एक पिशवी अनामत म्हणून ठेवली होती. ती पिशवी दिनारांनी (सोन्याची नाणी) भरलेली असल्याचे सांगितले. बरीच वर्षे लोटली तरी ती व्यक्ती आपली पिशवी न्यायला परत आली नाही. विश्वस्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने एक युक्ती खेळली. पिशवीच्या तळातून काळजीपूर्वक दोरा उस्वला आणि सर्व दिनार बाहेर काढले. त्याऐवजी पिशवीत दिरहम (चांदीची नाणी) टाकली. मग पूर्वीप्रमाणेच पिशवी शिवून ठेवून दिली. 

हा अनामतदर सुमारे पंधरा वर्षांनंतर या उच्च अधिकाऱ्याकडे आला आणि त्याने अनामत म्हणून ठेवलेली दिनारांनी भरलेली पिशवी परत मागितली. अधिकाऱ्याने ती पिशिवी अनामतदाराला परत केली. अनामतदाराने पिशवी आपलीच असल्याची खातरजमा केली आणि पिशवी उघडली. तेव्हा त्यात दिनारांऐवजी दिरहम होते. हे पाहून तो संतापला आणि म्हणाला, ही पिशवी माझी नाही. माझ्या पिशवीत दिरहम नसून दिनार होते. मला माझी दिनारांची पिशवी हवी आहे.

अधिकारी म्हणाला, ‘अरे! काळजीपूर्वक बघ. ही पिशवी तीच आहे, जी तू माझ्याकडे ठेवली होती, आजपर्यंत ती बंदच आहे. मी तुला फसवले नाही.’ अनामातदार म्हणाला, माझ्या पिशवीत दिनार होते. ही पिशवी जरी माझी असली तरी त्यात दिनार नाहीत, दिरहम आहेत.’ आपसात खूप वादविवाद झाला. प्रकरण मिटले नाही, तेव्हा अनामातदार, तत्कालीन अमीर, उमर बिन हुबेराह यांच्याकडे गेला आणि आपली तक्रार दाखल केली. उमर बिन हुबेराहने काझी इयास बिन मुआवियाकडे हे प्रकरण पाठवले.   

काझी इयास यांनी अनामातदाराला आपली बाजू मांडायला सांगितले. अनामतदार म्हणाला,’मी अनामत म्हणून या अधिकाऱ्याकडे दिनारांनी भरलेली पिशवी ठेवली होती, पण तो मला दिरहमने भरलेली पिशवी देत आहे.’ काझी इयास यांनी विचारले, ‘किती वर्षांपूर्वी ही पिशवी अनामत म्हणून ठेवली होती? अनामातदार उत्तरला,’पंधरा वर्षांपूर्वी.’

आता न्यायाधीश अधिकाऱ्याकडे वळले आणि विचारले,’तुम्ही काय म्हणता?’ अधिकारी म्हणाला, ‘त्याची पिशवी गेली पंधरा वर्षे आहे त्याच अवस्थेत माझ्याकडे सुरक्षित ठेवलेली आहे. ही पिशवी त्याचीच आहे.’ 

काझी इयास यांनी नोकरांना पिशवी उघडण्याचा आदेश दिला. नोकरांनी आदेशाचे पालन केले आणि पिशवीतील संपूर्ण दिरहम विखुरले. विखुरलेल्या दिरहमांमध्ये काही दहा वर्षे जुनी नाणी आणि काही पाच वर्षांची नाणी होती आणि काही नाणी त्यापूर्वीची आणि नंतरची नाणी होती. 

काझी इयास अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले,’तुम्ही कबूल केले आहे की, ही पिशवी तुमच्याकडे पंधरा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. याचा अर्थ या पिशवीमधील सर्वच नाणी 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी असायला हवी होती, परंतु पिशवीत पाच वर्षांपूर्वीचीही नाणी आहेत. म्हणजे या पंधरा वर्षांच्या काळात कधीतरी ही पिशवी उघडली गेली असावी आणि त्या वेळी दिनारांचे रूपांतर दिरहममध्ये झाले.’

काझी इयासच्या युक्तिवादाने गुन्हेगाराला आपला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. शेवटी अधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली. अशा प्रकारे अधिकाऱ्याचा गुन्हा उघडकीस आला. त्याचे पितळ उघडे पडले.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, 

‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 165)

 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


(१८७१-१९१५)


नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर, ज्यांनी केवळ भारतीय स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठीही काम केले. त्यांचा जन्म ७ जून १८७१ रोजी सध्याच्या बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाला.

नवाब सलीमुल्लाह १८९३ मध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट बनले. परंतु युरोपियन व्यापारी आणि अधिकारी यांच्याकडून होणारे शोषण त्यांना सहन न झाल्याने त्यांनी १८९५ मध्ये नोकरी सोडली. स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी त्यांनी विविध मार्गांनी सेवा केली. त्यांनी लोकांना शिक्षित करण्याला महत्त्व दिले. 

अलिगढमधील मोहम्मडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजच्या विकासासाठी त्यांनी मोठी रक्कम दिली. १९०१ मध्ये त्यांचे वडील नवाब अहसानुल्लाह यांच्या निधनानंतर ते ढाक्याचे चौथे नवाब बनले. त्यांनी १९०६ मध्ये बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते की हा उपाय गरीब मुस्लिम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांचे जमीनदारांकडून शोषण केले जात होते. गरीब मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने त्यांनी १९०६ मध्ये पूर्व बंगाल-आसाम प्रांतीय शैक्षणिक परिषद आयोजित केली. मुस्लिमांसाठी शैक्षणिक संधी मिळावी म्हणून त्यांनी ढाका येथे विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी केली. मुस्लिमांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची इच्छा होती आणि त्यांनी यासंदर्भात सुमारे दोन हजार मुस्लिम नेत्यांना पत्रे लिहिली होती. त्यांनी त्यांना आपल्या राजवाड्यात या विषयावर चर्चा करण्यासाठी ढाका येथील अहसान मंझिल येथे आमंत्रित केले. त्यांनी अलीगढ येथे २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९०६ या कालावधीत अखिल भारतीय मोहम्मडन शैक्षणिक परिषदही आयोजित केली होती. भोपाळच्या बेगम, अली ब्रदर्स, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या मान्यवर व्यक्तींनी परिषदेला हजेरी लावली. परिषदेच्या अंतिम दिवशी नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगचा प्रस्ताव मांडला आणि त्याच्या स्थापनेची गरज स्पष्ट केली.

त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘ऑल इंडिया मुस्लिम लीग’ची स्थापना झाली, ज्यामध्ये त्यांनी विविध प्रमुख पदे भूषवली. मुस्लिमांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी १९११ मध्ये ब्रिटीश सरकारला निवेदन दिले. १९१४ पासून सक्रिय राजकारणापासून ते स्वेच्छेने अलिप्त राहिले असले तरी त्यांनी केवळ शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी वसतिगृहांच्या विकासासाठी आपली संपत्ती खर्च केली नाही तर त्यांच्यासाठी सरकारी निधी मिळविण्यासाठी अविरतपणे काम केले..नवाब सर ख्वाजा सलीमुल्लाह बहादूर यांचे १५ जानेवारी १९१५ रोजी निधन झाले.

लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम



मुंबई 

अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे जोरदार आवाहन केले आहे.  ज्यामुळे आपल्या समाजात, विशेषत: तरुणांमध्ये हाहाकार माजला आहे.

मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आहे. ते म्हणाले की शिक्षण संस्थांनी अंमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये व्यापक जागरूकता कार्यक्रमांचा समावेश असावा, ज्याद्वारे मुले आणि तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल शिक्षित केले जाईल, जे व्यसन बऱ्याचदा लहान वयात सुरू होते. आपली मुले आणि तरुण लहान वयातच अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. हे एक संकट आहे ज्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांनी त्वरित आणि सातत्यपूर्ण हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

मौलाना इलियास खान फलाही यांनी पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी आणि वितरण नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले. या लढाईत पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या समुदायांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे जाळे नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी सतर्क आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.

अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी पालकांची अपरिहार्य भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. मौलाना फलाही म्हणाले, “पालकांनी आपल्या मुलांच्या आयुष्यात सावध आणि व्यस्त राहावे. आपल्या मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी मुक्त संवाद, अंमली पदार्थांच्या धोक्यांविषयी शिक्षण आणि घरातील पोषक वातावरण प्रदान करणे आवश्यक आहे.”

इस्लामी विद्वान, मशिदींचे इमाम, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि प्रसारमाध्यमांनी अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सामाजिक चळवळ सक्रियपणे पुढे नेण्याचे आवाहन मौलाना इलियास फलाही यांनी केले. समाजात जनजागृती आणि प्रबोधन करण्यात इस्लामी विद्वान आणि इमामांची महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी यांनी एकत्र येऊन भक्कम सपोर्ट सिस्टीम तयार केली पाहिजे आणि माध्यमांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले पाहिजे आणि सकारात्मक संदेशांना प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिनासारखे दिवस पाळणे पुरेसे नाही, यावर त्यांनी भर दिला. मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, “हा दिवस साजरा करणे महत्वाचे असले तरी आपल्याला सातत्यपूर्ण, ठोस कृतीची गरज आहे. अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात आपण सर्वांनी  एकत्र येऊन एक मजबूत, एकसंध आघाडी उभी केली पाहिजे. सामूहिक, सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच आपण आपल्या समाजातून हा धोका दूर करू शकतो.”



महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षणाची मागणी होत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम आरक्षणाची मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पक्ष राष्ट्रवादीने ४ जागा लढविल्या, त्यापैकी केवळ एक जागा जिंकली आहे. अशा तऱ्हेने आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष सरकारकडे महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षणाची मागणी करत असल्याचे दिसून येते.

एकीकडे मराठा आरक्षणाची आग पुन्हा पेटत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राजकीय पक्षांना घाम फुटू लागला आहे, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणाची मागणी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे लक्ष आता सरकारवर लागले आहे.

लोकसभेच्या खराब निकालांचे मूल्यमापन करण्यासाठी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत खुद्द अजित पवार यांनीच मुस्लिम मतदार आपल्यापासून दूर गेल्याची कबुली दिली आहे. महायुतीत सामील झाल्यानंतरही अजित पवार गटाने अल्पसंख्याकांचे आर्थिक हक्क, विश्वास आणि हित जपण्यासाठी अनेक निर्णय आणि प्रयत्न केले, जे लोकसभा निकालात अपयशी ठरले. आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि भाजपच्या साथीने, येत्या काळात आरक्षणावरून सुरू असलेला वाद शांत करण्याचे मोठे आव्हान असेल. कारण आता मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षणाने घेरलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणू शकतो.

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांनाही ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या रविवारी केली. आपल्या मागण्यांचे समर्थन करताना पाटील म्हणाले की, कुणबी समाजाच्या कागदपत्रांमध्ये अनेक मुस्लिमांचा उल्लेख आहे. अशा परिस्थितीत या मुस्लिम शेतकऱ्यांचा ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत विचार करून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क दिले पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य ओबीसी समाजासाठी अडचणीचे मानले जात आहे. मराठा समाजाला कुणबी मानून पूर्ण आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरंगे पाटील अजूनही ठाम आहेत. त्याला यात जर-तर कोणत्याही प्रकारची इच्छा नाही.

वास्तविक, मराठा समाजाचे लोक जे आरक्षण मागत आहेत ते ओबीसी समाजाचा भाग आहे. ओबीसी समाजातील लोक आधीच विरोधात उभे आहेत. मराठ्यांच्या आरक्षण पद्धतीमुळे त्यांना मिळणारे आरक्षण कमी होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटते. यावर एकजूट होऊन आवाज उठवण्याआधीच पाटील यांनी मुस्लिमांना ओबीसींच्या आरक्षणाबाबत बोलून आरक्षणाचा हा लढा आणखी कडवा बनवला आहे. पाटील यांनी मुस्लिमांवर अन्याय होऊ नये, असे उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे.

इथे महाराष्ट्रात जरांगे पाटील यांच्यासमोर आणखी एक आवाज बुलंद होत आहे. ओबीसी कोट्याचे सध्याचे स्वरूप कायम ठेवण्याची चर्चा करणाऱ्या एका नव्या कार्यकर्त्याची महाराष्ट्रात चर्चा आहे. लक्ष्मण हाके असे त्यांचे नाव आहे. मुस्लिम आरक्षणावर मनोज जरंगे पाटील यांच्या युक्तिवादाला लक्ष्मण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू धर्म सामाजिक धर्तीवर विभागला गेला आहे पण लोक मुस्लिम समाजाकडे जात म्हणून न पाहता धर्म म्हणून पाहत असल्याचं हाके यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाजातील काही जातींना आधीच ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी आयोगाची स्थापना झाली. २० फेब्रुवारी २०२४ ला एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. पण मुस्लिम आरक्षणाच्या दृष्टीने कुठल्याही हालचाली दिसल्या नाहीत.

आता त्यांना इथे राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवावी लागणार आहे आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अविभाजित राष्ट्रवादी-काँग्रेसने मुस्लिमांसाठी ५ टक्के आरक्षण मंजूर केले होते. मात्र नंतर देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षणाबाबतचा निर्णय फिरवला. या वेळी जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने व्यूहरचनात्मक विधान केले आहे, त्यावर मात करणे भाजपला सोपे जाणार नाही.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो. : ८९७६५३३४०४


गुन्हेगारी आणि गरिबीचे एकमेकांशी घट्ट नाते असते. लोकांना गुन्हेगार बनवायचे असेल तर त्यांना गरीब ठेवावे. जर लोकांना गरीब ठेवायचे असेल तर त्यांना गुन्हेगारीत गुंतवून ठेवावे. अशा प्रकारची रणनीती सत्ताधारी आणि संपन्न समाजाची असते. जगात कोणतेही सरकार असो, कोणत्याही देशात असो गरीब आणि श्रीमंतवर्ग नक्कीच असतात. जर प्रगत देशांनी ठरवलं तर त्यांना उपलब्ध सोयीसुविधा आणि आर्थिक धोरणानुसार आपल्या देशात कुणाला अति गरीब आणि अतिश्रीमंत ठेवायचेच नाही तर ही राष्ट्रे तसे सहजासहजी करू शकतात. पण त्यांच्या विचारधारेने हे ठरविलेले असते की समाजात सर्व नागरिकांना एकसारख्या सोयी, संपत्तीतून वाटा मिळू नये. एका वर्गाला श्रीमंत आणि एकाला गरीब ठेवायचे आहे हे त्यांच्या विचारधारेतच समाविष्ट आहे. म्हणून आपण जगात सर्वत्र गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग पाहत आहोत. पुढे जाऊन गरीबच अति गरीब, नंतर दारिद्र्यरेषेखालील आणि नंतर उपाशी अशा विविध श्रेणींत या गोरगरीब जनतेला विभागून टाकले जाते. गरीब म्हणजे एवढेच नाही की त्यांना पोट भरण्याच्या, जगण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गरीबीचा पहिला परिणा असतो की त्यांची सामाजिक क्षमता शून्य होऊन जाते इतकी की त्यांना समाजाचे अंग समजणे सुद्धा लोकांना आवडत नाही. सामाजिक स्थान नसले की नैतिक स्थान कुठले? जगण्याच्या जीवनमूल्यांशी यांचा काय संबंध? आणि याचा शेवट थेट त्यांना मानवजातीचा दर्जाच दिला जात नाही. आपल्या देशात आहेत असे वर्ग ज्यांना माणुसकी नाकारली गेली आहे. भले संविधानाने त्यांना माणूस म्हटले असले तरी इतर लोक त्यांना तो दर्जा बहाल करण्यास तयार नाहीत. जगाने इतकी प्रचंड प्रगती केलेली असताना सुद्धा अशा लोकांनी संपत्ती व संपन्नतेतून कसलाही वाटा मिळवता कामा नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. त्यांना गुलामीच्या उंबरठ्यावर ठेवण्यात यावे यासाठी बऱ्याच राजकीय व शासकीय युक्त्या आखल्य जातात, पण ह्याचा तपशील या जगी देता येणार नाही, कारण तो खूप विस्तृत विषय आहे.

आपण पाहत आहोत की कोट्यवधी नागरिकांच्या आपल्या देशात रोज कुठे ना कुठे माणसांच्या भावना दुखवणाऱ्या घटना घडत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात हत्येच्या घटना, दुसऱ्या क्रमांकावर आत्महत्येच्या घटना आहेत. हत्या आणि आत्महत्या मागची मानसिकता वेगळी नाही. ती एकाच माणसाला जेव्हा असे वाटते की त्याला होत असलेल्या यातना, त्याला हर प्रकारे वंचित ठेवणे, दैनंदिन गरजा पुऱ्या करणेसुद्धा जड जाते. अशा अवस्थेत तो नैराश्येच्या आहारी जातो. तो ठरवतो की माझ्या या अवस्थेला जो कुणी कारणीभूत असेल मी त्याला मारून टाकीन. काही लोक कोणते न् कोणते निमित्त करून दुसऱ्याची हत्या करुन टाकतात. पण काही असेही माणसे असतात ज्यांना इतरांना जिवे मारण्याचे साहस होत नाही, तेव्हा ते स्वतःच्याच जीवाची हत्या करतात. आपल्या देशात १०,००० माणसांकडे देशातल्या ३० कोटी नागरिकांकडे असलेली साधने आणि तितकी संपत्ती आहे. मग अशा देशात जिवावर उठणारे किती असतील! एका मुखबधीर मुलाला दगडाने ठेचून मारण्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्या मुखबधीर मुलाचा दोष कोणता, का त्याला मारले? याचे उत्तर एकच की ज्याने कुणी त्याला मारले असेल त्याने आपला राग व्यक्त केला पण त्याची वेदना समजणारा कोण आहे? त्याला स्वतःलाच प्रेमभावना माहीत नाहीत, कारण त्याच्या सामाजिक माणुसकीला अस्तित्वच नाही.

आज उच्च शिक्षणाची जिकडेतिकडे चर्चा आहे. गरीब-श्रीमंत कोणीही असो, सगळ्यांना उच्च शिक्षण- त्यातल्या त्यात डॉक्टर व्हायचे आहे. एका आईने आपल्या मुलीसह आत्महत्या केली. कारण त्या मुलीला सीबीएसई शाळेत प्रवेश घ्यायचा होता, पण तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून आईलेक दोघांनी आपला जीव दिला. पण त्यांच्या आत्महत्येमुळे या देशाच्या सत्ता-संपत्ती-संपन्नवर्गाला त्यांच्या संवेदना समजणार आहेत? भारतात दरवर्षी कोट्यवधी मुलेमुली स्पर्धात्मक परीक्षा देतात जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी. उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, डॉक्टर, अभियंता होता यावे, पण दर वर्षी या परीक्षांचे पेपर फुटतात, परीक्षा रद्द होतात आणि वर्षानुवर्षे परिश्रम घेतल्यानंतर जे स्वप्न साकार करायचे होते ते भंग होते. या पेपरफुटीमागे कोणत्या शक्ती? त्याच शक्ती ज्यांचा परिचय सुरुवातीला दिलेला आहे, त्यांना नको आहे. या इतर जातींना उच्चपदावर बसवायचे म्हणून ते पेपर फोडतात. ४० लाखांस विकत घेणारे गर्भश्रीमंत आहेत, ते विकत घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले होते त्यांना वंचित ठेवतात. NEET चे पेपर फुटले, यात ज्यांची नावे सुरुवातीला बाहेर आली, ते भट, परशुराम राय, पुरुषोत्तम शर्मा आणि इत्यादी, त्यांचे काय झाले माहीत नाही. हेच लोक त्या मानसिकतेचे सूत्रधार आहेत ज्याची चर्चा केली आहे. हेच माफिया गरीब आणि श्रीमंतांचे वर्गीकरण करणारे. हेच लोक श्रीमंत आणि शक्तिशाली विरुद्ध गरीब आणि वंचित.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो.: 9820121207


इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. रमजानचे उपवास संपल्यानंतर शाबानच्या पहिल्या दिवशीची ईद जिला ईद-उल-फित्र (दान देण्याचा सण). दूसरी ईद-उल-अजहा (कुर्बानी देण्याचा सण). ही ईद दरवर्षी इस्लामी कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्या (जिलहिज्जा) च्या 10 तारखेला साजरी केली जाते. यंदा ही ईद येत्या 17 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. बोली भाषेत या ईदला ‘बकरी ईद’ म्हटले जाते जे की चुकीचे आहे. हां ! ईद-ए-कुरबाँ म्हणणे योग्य आहे. यात साधारणपणे मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक बकरा कापून ईश्वराप्रती आपली एकनिष्ठता जाहीर करतात. त्यामुळे या कृतीला, बळी म्हणता येत नाही. ही ईद साजरी करण्यामागे एक इतिहास आहे पण त्याच्या तपशिलात न जाता जी घटना ही ईद साजरी करण्यासाठी कारणीभूत ठरली तिच्या संबंधी अगदी थोडक्यात माहिती घेऊया.  

हजरत इब्राहीम अलै.

ईद-उल-अजहाचा थेट संबंध ज्या इतिहास पुरूषाशी आहे त्यांचे नाव हजरत इब्राहित अलै. असे आहे. त्यांना इंग्रजीमध्ये ’अब्राहम’ म्हटले जाते आणि ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे ते समान स्विकृत आद्यपुरूषांपैकी एक होत. म्हणून या तिन्ही धर्मांना, अब्राहमिक रिलिजन्स असे म्हटले जाते. हजरत इब्राहिम अलै. यांचा जन्म ईसा पूर्व काळी 1996 तर 2510 हिजरी पूर्व काळी, ईराकच्या ’उर्र’ या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ’आजर’ असे होते. ते शिल्पकार होते. देवी, देवतांच्या मुर्त्या घडविण्यात निष्णात होते.     

कुरआनमध्ये सुरे इब्राहिम नावाचा एक अध्याय आहे ज्यात एकूण 52 आयाती आहेत तो यांच्याशी संबंधित आहे. याशिवाय, कुरआनमधील जवळ जवळ 63 अन्य आयातींमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ते 169 वर्षे जगले. आपल्या आयुष्यात सुरूवातीपासूनच त्यांना कठीण संघर्ष करावा लागला. ईश्वराने त्यांची अनेकवेळा परीक्षा घेतली. प्रत्येक परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. नुकत्याच जन्मलेल्या इस्माईल आणि आपली पत्नी हाजरा यांना आजच्या मक्का शहरातील निर्जनस्थळी सोडण्यापासून ते काबागृहाच्या निर्मितीपर्यंत अनेक ऐतिहासिक कार्यासाठी हजरत इब्राहिम अलै. ओळखले जातात. खत्ना करण्याची परंपरा जी तिन्ही सुमेटेरियन (एक ईश्वरवादी) धर्मामध्ये आढळते ती हजरत इब्राहिम अलै. यांच्यापासूनच सुरू झालेली आहे.

कुर्बानिची प्रथा कशी सुरू झाली?

ज्या कुर्बानिची आठवण म्हणून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणार्या प्रत्येक सधन मुस्लिम व्यक्तिवर कुर्बानी करण्याची जी ईश्वरप्रणित जबाबदारी टाकण्यात आलेली आहे तिचा तपशील कुरआनमध्ये अस्सफात या अध्यायाच्या आयात क्रमांक 100 ते 111 पर्यंत दिलेला आहे. त्याचा थोडक्यात तपशील असा की, वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी ईश्वराकडे पुत्रप्राप्तीसाठी याचना केली. ती स्वीकारली गेली. त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला ज्याचे नाव ईस्माईल असे ठेवण्यात आले. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात येत आहे तो म्हणजे अनेक ऊलेमा आणि अभ्यासक वयाच्या 85 व्या वर्षी मुलाचा जन्म म्हणजे चमत्कार या अर्थाने घेतात पण ह. इब्राहीम अलै सलाम चे वय 175 वर्षांचे होते हे ते विसरतात. 175 वर्षाच्या वयात 85 व्या वर्षी मुलाचा जन्म होणे म्हणजे ऐन तारुण्यात जन्म होणे आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही हे वाचकांची लक्षात घ्यावे. इस्माईल 12 वर्षाचे झाले तेव्हा अचानक एका दिवशी त्यांनी स्वप्न पाहिले ज्यात त्यांनी पाहिले की, ते इस्माईलची कुर्बानी देत आहेत. या स्वप्नामुळे ते विचलित झाले. पण हेच स्वप्न पुन्हा दोन दिवस सातत्याने पडल्याने त्यांच्या लक्षात आले की, ईश्वर त्यांच्या पुत्राची कुर्बानी मागत आहे. तेव्हा हे स्वप्न त्यांनी ईस्माईलला सांगितले, तेव्हा त्या आज्ञाधारक पुत्राने प्रेषित ईब्राहिम अलै. यांना आपले स्वप्न साकार करण्याची परवानगी दिली. तेव्हा इब्राहिम अलै. यांनी इस्माईल यांना घेऊन गावापासून दूर निर्जन ठिकाणी नेऊन इस्माईल यांची कुर्बानी देण्याची तयारी केली. सोबत एक धारदार सुरी नेली होती. ईच्छित स्थळी गेल्यावर त्यांनी प्रथम इस्माईलच्या डोळ्यांवर व नंतर स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली व इस्माईलला जमिनीवर पाडले आणि त्यांच्या गळ्यावर सुरी चालविली. मात्र सुरी चालविण्याअगोदर विद्युत गतीने एक ईशदूत प्रकट झाला आणि त्याने हजरत इस्माईलच्या ऐवजी एक दुंबा (मेंढा) त्यांच्या जागी ठेवला. येणेप्रमाणे सुरी मेंढ्याच्या गळ्यावर चालविली गेली. इस्माईल मात्र सुरक्षित राहिले. कुरआनमध्ये सुरे अस्सफ्फाच्या आयत क्रमांक 105 ते 108 मध्ये म्हटले आहे की, हे इब्राहिम अलै. ! तू स्वप्न साकार केलेस. आम्ही सत्कर्म करणार्यांना असाच मोबदला देत असतो. निश्चितच ही एक उघड परीक्षा होती. आम्ही एक मोठे बलिदान प्रतिदानात देऊन इस्माईलची सुटका केली. आणि त्यांची प्रशंसा व गुनगान भावी पिढ्यांसाठी सदैव ठेवले.कुरआनचे एक भाष्यकार या संदर्भात म्हणतात की, जेव्हा इब्राहिम अलै. यांनी हजरत इस्माईल यांना जमिनीवर पाडले तेव्हा पृथ्वीवरील सर्व प्राणी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि ईश्वराकडे इस्माईलला वाचविण्याचा धावा करू लागले. तेव्हा ईश्वराने तेवढ्या क्षणासाठीच जेवढे क्षण ईशदुताला दुंबा घेऊन कुर्बानीच्या स्थळी जाण्यासाठी लागतील, तेवढा वेळ, ’काळा’ला थांबण्याचा आदेश दिला. आणि पृथ्वीवरील सर्व हालचाली तेवढ्या क्षणापुरत्या निलंबित झाल्या. अर्थात ह्या गोष्टी श्रद्धेच्या आहेत. ज्यांची इस्लामवर श्रद्धा नाही त्यांच्यासाठी ह्या घटनांवर विश्वास ठेवणे कठीण आहे व तसा त्यांना विश्वास न ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु यामुळे सत्य काही बदलत नाही. प्रत्येक प्रेषितासोबत ईश्वराने काही चमत्कार दिलेच होते. कारण त्या काळात चमत्कार दाखविल्याशिवाय लोक प्रेषितांवर विश्वास ठेवत नसत. ईद-उल-अज़हा हा एक अतिशय उद्देशपूर्ण सण आहे आणि तो दिवस मानव इतिहासात संस्मरणीय असा दिवस आहे ज्या दिवशी एका वडिलाने आपल्या मुलाची प्रत्यक्षात कुर्बानी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची आठवण म्हणून मुस्लिमांना आदेश दिलेला आहे की, आपल्या प्रिय जनावराची कुर्बानी करावी. साधारणपणे भारतीय उपखंडात ईदच्या अगोदर बाजारात जाऊन जनावर खरेदी करून आणून चार-दोन दिवस ठेऊन कुर्बानी करण्याची प्रथा आहे, जी की चुकीची आहे. वास्तविक पाहता जनावर इतक्या दिवस पाळायला हवा की त्याचा लळा लागायला हवा. लळा लागलेल्या या जनावराची कुर्बानी देताना ज्या यातना होतात त्या अनुभवाला याव्यात हा या ईद मागचा उद्देश आहे. तसेच अशी कमिटमेंट आहे की, मी माझ्या या प्रिय जनावराला त्याचप्रमाणे तुझ्या इच्छिेखातर कुर्बान करत आहे जसे की हजरत इब्राहिम अलै. यांनी आपल्या मुलाला कुर्बान केले होते. शिवाय, यामागचा हेतू असा की, ईश्वराने जनावराची कुर्बानी मागितली आहे म्हणून मी जनावराची देत आहे. ही कुर्बानी म्हणजे एक टोकन आहे, आश्वासन आहे, ईश्वरासमोर कमिटमेंट आहे की, जर उद्या ईश्वराने ईब्राहिम अलै. सलाम प्रमाणेच माझ्या मुलाची किंवा दस्तुरखुद्द माझीच कुर्बानी मागितली तरीही ती मी द्यायला तयार आहे. कुर्बानी देण्यामागचा हा महान उद्देश आहे.

इस्लामचे अंतिम उद्दिष्ट

इस्लाम चे अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेकवेळा मुस्लिमांना आपला जीव आणि संपत्ती कुर्बान करावी लागते. ती करतांना जराही संकोच होता कामा नये, यासाठी दरवर्षी कुर्बानीचा हा सराव करून घेतला जातो. हे फक्त इस्लाममध्येच आहे असे नाही. जगाच्या इतिहासामध्ये मानवकल्याणासाठी संपत्ती आणि जीवाचे बलिदान देण्याची एक मोठी परंपरा आहे. यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण गुजरातचे देता येईल. ही घटना 1962 ची आहे. चीन ने भारतावर आक्रमण केले होते. भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता. आपले लष्कर युद्धासाठी पूर्णतः तयार नव्हते. अशा परिस्थितीत सैन्याच्या खर्चासाठी नेहरूंनी दानशूर नागरिकांना दान देण्याची अपील केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदाबादच्या 25 हजार लोकांनी एकत्र येऊन एक-एक पैसा जमा करून 25 हजार पैसे टोकन स्वरूपात नेहरूंना पाठविले होते आणि सांगितले होते की, हे 25 हजार पैसे देणारे लोक एका पायावर तयार आहेत. पंडितजींना योग्य वाटेल तेव्हा या 25 हजार लोकांना बोलावून ते देशासाठी प्रत्यक्षात कोणते बलिदान हवे असेल ते त्यांच्याकडून घेऊ शकतात. मग नेहरू त्यांची सेवा घेवो की प्रत्यक्षात त्यांचे बलिदान घेवो. हे 25 हजार लोक प्रत्यक्षात ना युद्धात सामील झाले ना त्यांचे बलिदान झाले ना त्यांनी कुठली लष्करी सेवा केली. मात्र त्यांनी एवढी जबरदस्त कमिटमेंट केली होती की, गरज पडली असती तर खरोखरच ते देशासाठी स्वतःचे बलिदान देण्यासाठी तयार होते. ही गोष्ट त्यांच्या कमिटमेंटवरून नेहरूंच्याच नव्हे तर देशाच्याही लक्षात आली होती. अगदी अशीच कमिटमेंट मुस्लिम लोक दरवर्षी ईद-उल-अजहाच्या दिवशी जनावराची कुर्बानी टोकन स्वरूपात देऊन ईश्वरापुढे करतात. जणू ते म्हणतात की, ऐ अल्लाह ! तू आदेश देत असशील तर आम्ही आज जनावरांची कुर्बानी जशी दिली तशी उद्या आपल्या जीवाचीही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत. त्यामुळेच तर कुरआन म्हणतो की, त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते. त्याने यांना तुमच्यासाठी अशाप्रकारे अधीन केले आहे की जेणेकरून त्याने प्रदान केलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही त्याचा महिमा वर्णावा. आणि हे पैगंबर (स.), शुभवार्ता द्या सदाचारी लोकांना.  

(सुरे हज (22) आयत क्र. 37)

इस्लाम एक आधुनिक आणि महान धर्म असून, मानवतेच्या कल्याणासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने अवतरित करण्यात आलेला आहे. या धर्मामधील दोन्ही ईद ह्या केवळ खाऊन पिऊन मौज करण्या किंवा डी.जे. लावून नाचण्यासाठी नसून दोन्ही वेळेस समाजातील गरीबांची मदत करण्यासाठी आहेत. ह्या ईद लोकांना त्याग करण्यासाठी प्रोत्साहित करतात. रमजान ईदपुर्वी जकात व फित्रा (अन्नदान) गरीबांना देण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे तर ईद-उल-अजहाच्या नमाजनंतर जनावरांची कुर्बानी देऊन त्याचे मांस गरीबांमध्ये वितरित करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सुबहानल्लाह! किती सुंदर धर्म आहे इस्लाम ! ज्यात फक्त दोनच ईद आहेत आणि त्यातही गरीबांचे हित पाहिलेले आहे.

सारांश, मानवतेच्या कल्याणाच्या कठीण मार्गामध्ये आपले धन प्रसंगी जीव देण्याची गरज पडल्यास ती देण्याची तयारी असल्याचे आश्वासन ईश्वराला देण्याचे नाव म्हणजे ईद- -उल-अजहा.


- एम. आय. शेख

लातूर



पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांची मदत संस्था असलेल्या यूएनआरडब्ल्यूएला युद्धग्रस्त गाझामध्ये विनाअडथळा काम करण्याची परवानगी देण्यात यावी, असेही जी-7 आघाडीच्या औद्योगिक देशांच्या इटलीत नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय शिखर परिषदेच्या अंतिम निवेदनात म्हटले आहे.

पॅलेस्टिनी प्रदेशातील सर्वात मोठी नियोक्ता असलेल्या यूएनआरडब्ल्यूएने हमासच्या कारवायांकडे कानाडोळा केल्याचा आणि बंडखोर गटांना सक्रियपणे मदत केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. फ्रान्सच्या माजी परराष्ट्रमंत्री कॅथरीन कोलोना यांच्या नेतृत्वाखालील यूएनआरडब्ल्यूएच्या स्वतंत्र पुनरावलोकनात तटस्थतेशी संबंधित काही मुद्दे आढळले आहेत, परंतु इस्रायलने अद्याप आपल्या मुख्य आरोपांसाठी पुरावे दिलेले नाहीत.

अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपानच्या नेत्यांनी गेल्या शुक्रवारी सांगितले     

की ते सहमत आहेत की यूएनआरडब्ल्यूए आणि इतर संयुक्त राष्ट्र संघटना आणि एजन्सीजचे वितरण नेटवर्क ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना मदत पोहोचविण्यास पूर्णपणे सक्षम असणे महत्वाचे आहे.

या गटाने नुकत्याच झालेल्या नवीन पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचे स्वागत केले  आहे कारण ते पश्चिम किनाऱ्यावर आणि संघर्षानंतर गाझामध्ये आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा हाती घेत आहे. युद्धोत्तर गाझाच्या प्रशासनात पॅलेस्टिनी प्राधिकरणाने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी बहुतांश आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा आहे, ज्याला सध्याचे इस्रायल सरकार नाकारते.

पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या तातडीच्या वित्तीय गरजा लक्षात घेऊन इस्रायलने कर महसूल जाहीर करावा आणि इस्रायलने वेस्ट बँकमधील आर्थिक परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून इतर उपाय काढून टाकावेत किंवा शिथिल करावेत अशी मागणी जी-7 ने इस्रायलला केली आहे.

पॅलेस्टिनी प्राधिकरणाला कमकुवत करणारी कृत्ये थांबली पाहिजेत, ज्यात इस्रायल सरकारकडून मंजुरीचा महसूल रोखणे समाविष्ट आहे, असे जी-7 च्या गेल्या शुक्रवारच्या पत्रकात म्हटले आहे. पश्चिम किनारपट्टीमध्ये आर्थिक स्थैर्य राखणे प्रादेशिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

हमास-इस्रायल युद्धात नागरी बळींच्या अस्वीकार्य संख्येबद्दल जी-7 च्या निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हमाससंचालित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत झालेल्या संघर्षात गाझाखोऱ्यातील 37,000 हून अधिक लोक ठार झाले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. या आकडेवारीची पडताळणी करता येत नाही.

जी-7 नेत्यांनी इस्रायलला पट्टीच्या दक्षिणेकडील रफाह शहरात मोठ्या हल्ल्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. हमासचा नायनाट करण्यासाठी अशी कारवाई आवश्यक असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

लेबनॉनच्या सीमेवर इस्रायल आणि इराणचे प्रॉक्सी हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या लढाईबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जी-7 च्या नेत्याने अधिक तणाव वाढू नये म्हणून सर्व संबंधित घटकांनी संयम बाळगावा असे आवाहन केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली सध्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्था आज जगाला भेडसावत असलेल्या अनेक आव्हानांना आणि समस्यांना तोंड देण्यासाठी धडपडत आहे. एका विशिष्ट राष्ट्रांच्या हितसंबंधांनी आणि इच्छेने प्रेरित होऊन ते संघर्षाला खतपाणी घालत आहे आणि जगभरातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धीमध्ये अडथळा आणत आहे.

नव्वदच्या दशकात शीतयुद्ध संपल्यानंतर जगाने एका नव्या उलथापालथीच्या युगात प्रवेश केला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायासमोर शांतता आणि स्थैर्यासाठी नव्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आधुनिक युगात प्रादेशिक आणि जागतिक अशा दोन्ही पातळ्यांवर सहकार्याची आवश्यकता आहे, समस्या सोडविण्यात जागतिक घटकांचा अधिक सहभाग आहे. तथापि, युक्रेन-रशिया युद्ध, इस्रायलचे पॅलेस्टाईनवरील हल्ले आणि इतर असंख्य संघर्ष प्रादेशिक समस्या सोडविण्यात आंतरराष्ट्रीय घटकांची अकार्यक्षमता आणि तोडगा काढण्याच्या त्यांच्या निर्धाराचा अभाव अधोरेखित करतात.

आंतरराष्ट्रीय संघटनांचा जागतिक प्रभाव कमी होत चालला आहे. कारण शतकाच्या अखेरीस उदयास आलेल्या बहुध्रुवीय आधुनिक जगाचे स्वरूप ओळखण्यात या संघटना अपयशी ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवस्था केवळ काही महासत्ता आणि त्यांच्या राजकीय व वैचारिक चिंतेमुळे आकाराला येऊ शकत नाही, हे मान्य करणे गरजेचे आहे. अशा जागतिक व्यवस्थेची कल्पना करणे अशक्य आहे ज्यात इतर देशांचे आणि लोकांचे शोषण करण्याच्या किंमतीवर विशिष्ट शक्तींच्या हितसंबंधांना आणि फायद्यांना प्राधान्य दिले जाते.

आंतरराष्ट्रीय संघटनांनी आणि त्यांच्यावर प्रभुत्व असलेल्या देशांनी हे वास्तव ओळखून त्यानुसार आपली रणनीती आखली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी जागतिक व्यवस्था उभी राहिली ती मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आधुनिक युगाशी सुसंगत अशी व्यवस्था निर्माण करणे अशक्य वाटते. आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी, उपक्रमांनी सध्याच्या युगाच्या गरजांशी सुसंगत अशी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी तत्परतेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

एक आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून, जी-7 हा सात देशांचा एक गट आहे जो समान मूल्ये आणि तत्त्वे सामायिक करतो आणि जागतिक स्तरावर स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतो. अलीकडची आंतरराष्ट्रीय संकटे आणि संघर्ष लक्षात घेता, जी-7 च्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या कामगिरीचा पुनर्विचार आणि चर्चा करणे आवश्यक आहे आणि त्याचे निर्णय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसे प्राप्त झाले आहेत.

जी-7 ला बंधनकारक निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तथापि, सध्याच्या परिस्थितीत, जेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्ये आणि कामकाज - जे बंधनकारक निर्णय घेण्यास सक्षम आहेत - तपासले जात आहेत, तेव्हा जी-7 हे प्रश्न टाळू शकत नाही.

या वर्षीच्या शिखर परिषदेची थीम नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणून निश्चित करण्यात आली होती. तीन दिवस पार पडलेल्या या परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्षापासून ते अन्नसुरक्षा आणि स्थलांतरापर्यंतच्या सद्यकाळातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या संरक्षणावर भर देण्यात आली.

शिखर परिषदेचा विषय अत्यंत योग्य होता कारण आजकाल काही राष्ट्रे सध्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने बांधलेल्या आणि जपलेल्या नियम, निकष आणि मानकांचे खुलेआम उल्लंघन करीत आहेत.

हा विषय असूनही आजच्या जगात काही राष्ट्रे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने स्वीकारलेल्या आणि तयार केलेल्या निकषांचे खुलेआम उल्लंघन करतात, हे दुर्दैवी वास्तव अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. इस्रायलने काही महिन्यांत गाझामध्ये हजारो निरपराध लोकांची कत्तल केली आहे आणि अखेरीस रफाहवरही बॉम्बहल्ला केला आहे.

गाझा आणि इतर शहरांमध्ये इस्रायलने केलेली कारवाई हा उघड युद्धगुन्हा आहे. इस्रायलला रोखण्याऐवजी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने संरक्षण दिले आहे, या समजुतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. सर्व कायदे, तत्त्वे आणि मूल्यांची अवहेलना करणाऱ्या इस्रायलच्या कारवायांना विरोध करण्यात आंतरराष्ट्रीय घटक, विशेषत: जी-7 देश अपयशी ठरले आहेत, हे नाकारता येणार नाही. इस्रायलने हजारो महिला आणि मुलांची कत्तल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय यंत्रणा अनेक महिने शस्त्रसंधीची बंधनकारक मागणी करण्यात अपयशी ठरली. जी-7 च्या नेत्यांना असे आवाहन करण्यासाठी वारंवार जनआंदोलने आणि विद्यापीठाच्या आवारात तरुणांचा जोरदार उठाव करावा लागला. इस्रायलच्या हल्ल्यांविरोधातील जागतिक आक्रोश आणि बंड हे इस्रायलला पाठिंबा देणाऱ्यांना अत्यंत लज्जेने स्मरणात ठेवले जाईल, याची आठवण करून देणारे आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 31 मे रोजी मांडलेल्या शस्त्रसंधी योजनेला जी-7 नेत्यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, हे आवाहन आणि जी-7 कडून मिळालेला पाठिंबा इस्रायलला पॅलेस्टाईनविरोधातील युद्ध सुरू ठेवण्यापासून रोखू शकेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जी-7 आणि इतर आंतरराष्ट्रीय देशांनी आणखी काही करणे अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. या व्यवस्थेची पुनर्रचना करणे आणि सत्ताधाऱ्यांच्या हितांपेक्षा शोषितांच्या हक्कांना प्राधान्य देणारी नवी चौकट प्रस्थापित करण्याच्या पद्धती आखणे आवश्यक आहे.


- शाहजहान मगदूम



तो समाज प्रगती करू शकत नाही जो आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर कमी आणि विवाहावर जास्त खर्च करतो. आजकाल कर्ज काढून लोक वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. वाढदिवसाच्या उत्साहात लोक पैशाचा अपव्यय करत आहेत. 60 हजारांपर्यंत अनेकांचे हॉटेल्सचे बिल होताना पाहण्यात आले आहे. एवढ्या पैशातून तर एक दोन मुलांच्या वार्षिक शिक्षणाचा खर्च भागू शकतो. शरियतने फिजुल खर्ची आणि चुकीचा पायंडा पाडण्यास करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने बर्थ डे सिलेब्रिशेन आणि विवाहावर अमाप खर्च करण्याचे टाळून शिक्षण आणि उद्योगावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन समाजमाध्यमावर दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिक्षण तज्ज्ञ डॉ. अब्दुल कदीर यांनी व्यक्त केले. 

डॉ. अब्दुल कदीर हे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आणि शाहीन एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी एसईएफची स्थापना 1989 मध्ये केली. शाहीन एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत देशभरात विविध शाळा आणि महाविद्यालये चालविले जात आहेत. डॉ. कदीर म्हणाले की, मी मुंबईत गेलो असता एका ऑटोमध्ये बसलो. ड्रायव्हरशी बोलताना मी त्याला विचारले, बेटा तुम्ही ऑटो चालवित आहाता, काय परिस्थिती आहे तुमची. तो युवक उत्तरला, जेव्हा पदवीचे शिक्षण घेत होतो तेव्हा मोठ्या बहिणीचे लग्न होते. वडिलांचे पेन्शनचे सर्व - (उर्वरित पान 2 वर)

पैसे संपले होते. आणि जेव्हा काही उद्योग उभारावा असा मनात विचार आला होता त्यावेळेस लहान बहिणीचे लग्न झाले. यामध्ये आम्हाला घर विकावे लागले. त्यामुळे मला नगदीमध्ये घर चालविण्यासाठी एकच मार्ग सापडला आणि तो म्हणजे ऑटो. विवाहामध्ये फिजुल खर्ची झाल्यामुळे अनेक पालक कर्जबाजारी झाले आणि ते आज अनंत अडचणींचा सामना करीत आहेत. खरे तर समाजात विवाह एकदम सोपा झाला पाहिजे. प्रेषित सल्ल. यांचे वचन आहे की, सर्वोत्कृष्ट विवाह तो आहे ज्यामध्ये कमीत कमी खर्च झाला असावा. विवाहाला सोपा कराल तर नेकीमध्ये वाढ होईल आणि विवाहाला अवघड केलात तर पापाचे धनी व्हाल. ही गोष्ट समजली पाहिजे. मी देशभरातील विशेषतः मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, विवाहात सामील व्हा, मात्र विवाहात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा बायकॉट करा. वलीमा करा आणि लग्नाला सोपे करा. लग्नात बडेजाव मिरविण्यापासून स्वतःला रोखा, फिजुल खर्ची टाळा, समाजातील गोर, गरीब घटकांकडे लक्ष द्या. लग्नातील जेवणाकडे देशातील 5 टक्के जरी लोकांनी याची सुरूवात केली तर हळूहळू ही प्रथा अगदी कमी होण्यास मदत होईल आणि जेवणासह इतर गोष्टींवरही होणारा विनासायास खर्च वाचेल. बरेच लोक म्हणतात आमच्याकडे ईश्वरकृपेने पैसा आहे. मित्रांनो! तुमच्याकडे कितीजरी पैसा असला तर तो खर्च कुठं, किती आणि कसा करावा यावे भान राखले पाहिजे. ईश्वराकडून याचीही तुम्हाला विचारपूस केली जाणार आहे. 

आपल्या संस्थेच्या उभारणीसंदर्भात डॉ. अब्दुल कदीर म्हणाले, दर्जेदार शिक्षण सर्वांना परवडणारे बनवण्याच्या आमचे ध्येय आहे. यासोबतच यशाची गाथा सुरू करण्यासाठी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे बिदरचे जुने वैभव; पुन्हा एकदा शिक्षणाचे ठिकाण म्हणून पुनरुज्जीवित करण्याची आमची वचनबद्धता आहे. बीदर हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे. 1472 मध्ये महमूद गवान यांनी उभारलेल्या मदरशात दोन शतके जगभरातील विद्यार्थी बीदरला येत असत. ते दिवस होते जेव्हा बिदर शिक्षणाच्या शिखरावर होते. शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून बीदरकडे पाहिले जाते. आज आम्ही जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन बीदरला शिक्षणातील गतवैभव बनवू इच्छित असल्याचे डॉ. अब्दुल कदीर म्हणाले.

जेव्हा मी माझा धाकटा भाऊ अब्दुल हन्नानसाठी दर्जेदार शिक्षण केंद्र शोधत होतो तेव्हा बीदर आणि आजूबाजूला मला एकही मानक शैक्षणिक संस्था सापडली नाही म्हणून माझा शोध निरर्थक ठरला. हाच तो टर्निंग पॉईंट होता ज्याने मला आखाती देशांतील अभियंता म्हणून माझ्या भरभराटीची कारकीर्द सोडून शैक्षणिक उद्योजक बनण्यास प्रवृत्त केले. माफक संसाधने, अल्लाहवरील दृढ विश्वास आणि उच्च दर्जाच्या सुविधा देणारे जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनवण्याची भक्कम दृष्टी हेच माझे भांडवल होते. ज्ञानसंपत्तीने समृद्ध आणि अल्लामा इक्बाल यांच्या तत्त्वज्ञानाचा सतत पाठपुरावा करणाऱ्या या भव्य शाहीन कुटुंबाकडे पाहून आज आपल्या सर्वांना आनंद वाटेल, असेही डॉ. कदीर म्हणाले.’’ शिक्षण घेणे प्रत्येक स्त्री-पुरूषाचे कर्तव्य आहे. सध्या शाळेचे प्रवेश सुरू आहेत. आपल्या कुटुंबात व आपण राहत असलेल्या परिसरात कोणीही शाळेविना राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नैतिक, व्यावसायिक शिक्षणानेच माणसाचा सर्वांगीण विकास होवू शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देवून दर्जेदार नागरिक घडवावे. 



सृष्टी अल्लाहच्या आविष्कारातून अस्तित्वात आली आणि प्रत्येक सजीवाचे अस्तित्व त्याच्याच ताब्यात आहे. जीवनही तोच देतो आणि एका निश्चित वेळी काढूनही घेतो. मृत्यूसमयी शरीरापासून आत्मा वेगळा होताना काय अवस्था होते? हा अनुभव प्रत्येकाच्या नशीबी लिहिलेला आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने म्हटले आहे,

’’कुल्लु नफ्सिन जा’इकतुल्-मवति, वनब्लूकुम् बिश्शर्रि वल्-खय्-रि फित्नतन, व इलय्-ना तुर्-जऊन.’’

अनुवाद :- प्रत्येक जिवाला मृत्यूची चव चाखायची आहे आणि आम्ही चांगल्या व वाईट परिस्थितीद्वारे तुम्हा सर्वांची परीक्षा घेत असतो, सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच परत यायचे आहे.

( 21 अल्-अम्बिया - 35 )

आत्मा शरीराशी जुळलेला असल्याने जेव्हा तो मृत्यूसमयी फरिश्त्यांकडून काढून घेतला जातो तेव्हा त्रास, वेदना व दुःख वाटणे स्वाभाविक आहे. त्यातून कुणाचीही सुटका नाही, म्हणून शहाण्या माणसाने मृत्यूनंतरच्या परिणामांची फिकीर करणे आणि अंततः यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या सुधारणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. माणूस कळत नकळत परीक्षेतून जात असतो. संपत्ती, संतती आणि इतर सांसारिक गोष्टी त्याच्यासाठी मोह ठरतात. या आयतीमध्ये चांगली परिस्थिती म्हणजे आर्थिक विपुलता आणि सुखसमृद्धीचा काळ आहे आणि वाईट म्हणजे त्रास आणि दुःखदायक परिस्थिती होय. अल्लाह माणसाला दोन्ही परिस्थितीत टाकून त्याची परीक्षा घेत असतो. सुखसमृद्धीच्या वेळी अल्लाहचे आभार मानून आणि अडचणीच्या वेळी दु:खांवर धीर धरून श्रद्धावान माणूस परीक्षेत यशस्वी होतो. मग सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही तो पुरस्कारांना पात्र ठरतो, परंतु जेव्हा नास्तिक व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते, सांसारिक सुखाचे दिवस येतात, तेव्हा त्याचे डोके फिरते. त्याला अहंकाराचा रोग जडतो. इराक व इजिप्तच्या इतिहासात नमरूद आणि फिरऔन या दोन हुकुमशहांचा उल्लेख आहे, ज्यांनी सत्तेच्या नशेत देवत्वाचा दावा केला होता. माणसाला एकदा अहंकाराने गिळले की त्याच्यातील माणूसपण संपत जाते. तो इतरांचा तिरस्कार करू लागतो. ’मी’ पणाच्या रोगामुळे हळू हळू तो स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना विनाशाकडे घेऊन जातो. अशा माणसावर वाईट दिवस आले तर तो खचून जातो. धीर धरण्याऐवजी ईश्वरावर अविश्वास दाखवू लागतो. ईश्वराला सोडून दारोदारी नाक घासू लागतो. अशा प्रकारे तो या जगाबरोबर मरणोत्तर जीवनातही अल्लाहच्या क्रोधाला पात्र ठरतो. आता ही व्यक्तीची जबाबदारी आहे की, त्याला शाकिर व्हायचे आहे की काफिर? म्हणजे तो कृतज्ञ बनू इच्छितो की कृतघ्न?  हेच पडताळून पाहणे माणसाच्या परीक्षेचा उद्देश आहे. 

शेवटी त्याला आपल्या स्वामीकडेच परत जायचे आहे, मग त्याचा हिशोब चुकता करणे हे ईश्वराचे काम आहे. काही अत्याचारी आयुष्यभर दडपशाही करून जगाला हादरवून सोडतात, पण या जगात त्यांना कोणतीही शिक्षा मिळत नसल्याचे दिसून येते. याउलट काही लोक आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेत घालून देतात आणि त्यांना बदल्यात कोणतेही बक्षीस मिळाल्याचे दिसत नाही. तसेच अनेक माणसं जन्मभर त्रास, दु:ख व कष्टाने जगतात, पण त्यांनाही कोणते फळ मिळत नसल्याचे दिसून येते. यावरून हा निष्कर्ष निघतो की मानवजातीला न्याय देण्यासाठी मरणोत्तर जीवनात कयामतचा दिवस प्रस्थापित केला जाईल आणि न्यायिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिथे माणसांना दूबार जीवन प्रदान केले जाईल. त्यामुळे बुध्दीमान तोच आहे जो सुखदुःखाची वेगवेगळी परिस्थिती समजून घेण्यात चूकत नाही. परिस्थिती कोणतीही असो, त्यातील परीक्षेचा पैलू लक्षात घेऊन तो सन्मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो.

....................... क्रमशः


अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये प्रतिकात्मक (आर्थिक) कुर्बानी करावी अशी चळवळ सुरू आहे. या चळवळीत सहभागी लोकांचे असे म्हणने आहे की आर्थिक कुरबानी मुळे त्याग केल्याचे समाधानही मिळेल आणि जनावरांचे जीवही वाचतील आणि तो पैसा शैक्षणिक किंवा इतर समाजोपयोगी कामासाठी वापरताही येईल. नाहीतरी कुरआनमध्ये म्हटलेलेच आहे की, ’ईश्वराला जनावराचे रक्त पोहोचते ना मांस.’

सुरूवातीला हा प्रकार दखल घेण्यासारखा वाटला नाही परंतु अलीकडे ही चळवळ फोफावते आहे आणि काही तथाकथित उच्चशिक्षित मुसलमानांनी प्रत्यक्षात केक कापून कुर्बानीकरून कुर्बानीच्या जनावरांची रक्कम सामाजिक संस्थांना दान केल्याच्या बातम्या मागच्या वर्षी कानावर आल्या. विशेष म्हणजे पुण्याच्या बाहेरही अशी प्रतिकात्मक कुर्बानी करण्यासाठी काही मुस्लिम स्वतःच पुढाकार घेत आहेत, असे आढळून आले आहे. यामुळे प्रतिकात्मक कुर्बानीचे वास्तव काय आहे, यासंबंधी चर्चा करणे गरजेचे झालेले आहे. या चळवळीत सामील लोकांवर आगपाखड करून उपयोग नाही ते अज्ञानी आहेत व त्यातूनच ही चळवळ फोफावते आहे. त्यांचे म्हणणे लॉजिकली खोडून काढल्यास ही चळवळ आपोआप संपुष्टात येईल यात शंका नाही.

2024 ची ईद-उल-अजहा अर्थात कुर्बानीची ईद तोंडावर आलेली आहे. 17-जून-2024 रोजी साजरी होणार आहे. अशावेळेस सर्वप्रथम वाचकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणे गरजेचे आहे की प्रतिकात्मक कुर्बानीची कुठलीच तरतूद इस्लाममध्ये नाही आणि प्रतिकात्मक कुर्बानीने कुरआनने कुर्बानीचा जो हेतू स्पष्ट केलेला आहे तो  साध्य होत नाही. ते कसे? याचेच विवेचन करण्यासाठी हा लेखन प्रपंच. माणूस हा एक संवेदनशील आणि भावना असणारा जीव आहे. तो अनेक गोष्टींमधून प्रेरणा घेतो. अनेक गोष्टी त्याला निराश करतात. आपल्या भावनांच्या समाधानासाठी तो अनेक वेळा मोठ्या प्रमाणात अनुत्पादक असा खर्च करतो. उदा. ब्रिटनच्या वर्चस्वाखाली शेकडो वर्ष राहिलेल्या देशांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केलेली आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त अशा देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. रोषणाई केली जाते. सरकारी इमारतींवर सजावट केली जाते. परेड आयोजित केली जाते. या सर्वात कोट्यावधी रूपये खर्च होतात. मग हा खर्च अनाठायी आहे म्हणून तो बंद करून सामाजिक कार्यात तो वापरावा, असे म्हणता येईल का?

आई-वडिल अत्यंत वृद्ध झालेले आहेत. ते सतत आजारी राहतात. त्यांच्या उपचारावर हजारो नव्हे लाखो रूपये खर्च होतात. एवढे रूपये खर्च करूनही ते वाचणार नाहीत याची खात्री असते. म्हणून का तो खर्च वाचवून इतर सामाजिक कामांना द्यावा, हे बरोबर राहील का? देशात दरवर्षी लाखो नागरिक देश विदेशात पर्यटन करत असतात पर्यटन केल्याने काय पोट भरते काय हा प्रकार थांबून तो पैसा शिक्षणासाठी वापरल्यास कसे राहील? स्पष्ट आहे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. त्याचप्रमाणे कुर्बानीचा खर्च वाचवून तो सामाजिक कार्यात द्यावा का? या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी आहे. 

हा प्रश्न का उद्भवला?

ज्याप्रमाणे स्वातंत्र्याची कुठलीच किंमत नसते ते अमुल्य असते. त्याप्रमाणे माणसाचा अल्लाहशी असलेल्या संबंधांना कुठलीच किंमत नसते ते अमुल्य असते. म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेला खर्च जरी सकृत दर्शनी वाया जात असलेला दिसत असला तरी त्यातून स्वातंत्र्याच्या भावनेला जी उर्जा मिळते ती अमुल्य असते. अगदी याच प्रमाणे ईश्वराने कुर्बानीचा आदेश दिलेला आहे आणि मी कुर्बानी करतोय मग तो खर्च सकृतदर्शनी वाया जात असतांना दिसत असला (खरे पाहता तो वाया जातच नाही त्यातून गरीबांंचे पोषण होते) तरी त्यातून मुसलमानांचे अल्लाहशी असलेले नाते दृढ होत असते व त्यातून माणसाला जी उर्जा मिळते ती अमुल्य असते. त्यामुळे प्रतिकात्मक कुर्बानी हा प्रकार खोडसाळपणाचा आहे. हे ते लोक आहेत ज्यांचा स्वतःचा ईश्वराशी संपर्क कमकुवत आहे. ज्याचे ईमान दृढ आहे तो अशा खुळचट कल्पनेला भीक घालत नाही. 

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा फायदा 

देशात 20 कोटी मुसलमान राहतात, त्यांच्यापैकी दहा कोटी मुसलमानांनी जरी दरवर्षी कुर्बानी केली असे गृहीत धरले तरी दर साल दहा कोटी जनावरे मुसलमान खरेदी करतात. कारण चोरून, बळजबरीने हिसकावून जनावरांची कुर्बानी करता येत नाही. एक जनावराची किंमत 15 हजार जरी धरली तरी मुस्लिम समाज किती रूपये गरीब शेतकरी आणि पशुपालन करऱ्यांना  वार्षिक लाभ करून देतात याचा विचार वाचकांनी स्वतः करावा. विशेष म्हणजे हा लाभ बहुसंख्य हिंदू शेतकरी आणि पशुपालकांना होतो. अनेक शेतकरी तर वर्षभर आपली भाकड जनावरे या आशेवर पोसत असतात की बकरी ईदच्या मुहूर्तावर किंमत जास्त येते. तेव्हा ते विकू आणि मुलीचे लग्न करू. हा फायदा सरकारी फायद्यापेक्षा ही जास्त आहे हे लक्षात ठेवा.

शिवाय लेदर उद्योगाला प्रचंड प्रमाणात चामडा लागतो त्याचा पुरवठा देखील या ईद च्या निमित्ताने होत असतो व त्यातून किती कुटुंबांचे उदरनिर्वाह होत असतील आणि लेदरच्या वस्तू एक्सपोर्ट करून किती परकिय चलन देशाला मिळत असेल याची कल्पना प्रज्ञावंत वाचकांनी स्वतःच करावी. केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करून काही साध्य होणार नाही. ईदुल अजहाच्या दिवशी जेवढी जनावरे कापली जातात त्याच्या कितीतरी पटीने जास्त जनावरे वर्षभर रोज कापली जातात. देशाची 90% टक्के जनता मांसाहारी आहे. मग या सर्वांनी शाकाहार स्विकारून, वर्षभर होणाऱ्या जनावरांच्या या कत्तली बंद करून तो पैसा सामाजिक कार्यामध्ये वापरणे कसे राहील.? याचे उत्तर या प्रतिकात्मक कुर्बानीच्या समर्थकांना देता येईल काय? याचा विचार सुजान वाचकांनी स्वतःच करावा.


- एम. आय. शेख 

लातूर

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget