Halloween Costume ideas 2015

रमजान आणि कुरआन


बालपणी रमजान म्हणजे रोजांचा महिना एवढेच माहित होते. थोडं कळायला लागल्यावर रोजासोबत पाचवेळेसची नमाज अदा करणेही अनिवार्य आहे हे माहित झाले. पण रमजान महिन्याला एवढे महत्त्व का आहे? आणि रमजानमध्ये कुरआन का वाचले जाते हे कळायला खूप वेळ लागला. जमाते इस्लामी हिंद शी संलग्न झाल्यानंतर रमजानचे महत्त्व उलगडले गेले. भारतात जमात-ए- इस्लामी हिंद एक एकमेव अशी जमात आहे जी इस्लामची खरी संकल्पना कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात उलगडून दाखविते. काही कमी जास्त न करता अगदी अचूकपणे ही कल्पना स्पष्ट करते. माझी सगळ्यांना विनंती आहे की, या सामाजिक सुधारणेच्या संस्थेशी किंबहुना आंदोलनाशी स्वतःला जोडून घ्यावे. जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुरआन व हदीसच्या प्रकाशात मार्गदर्शन करते. रमजानचा शाब्दीक अर्थ आहे जाळणे (टू बर्न) रमजानमध्ये पाप जाळले जातात. अल्लाहची भक्ती करून व इच्छा, आकांक्षानाही जाळले जाते. वैज्ञानिक दृष्टीने बघितल्यास रोजामुळे कॅलरीज बर्न होतात. रमजानचे महत्त्व कुरआनमुळे आहे. याच महिन्यात शब-ए-कद्र येते. याच रात्री कुरआनच्या अवतरणास सुरूवात झाली व त्यानंतर 23 वर्षाच्या कालावधीत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हृदयावर कुरआनच्या आयाती हळूहळू अवतरित झाल्या व ह्या एकत्रित आयातींचेच नाव कुरआन आहे जे सर्व मानवजातीच्या प्रशिक्षण आणि कल्याणासाठी पुरेसे आहे. 

कुरआनमुळे शबे कद्रला श्रेष्ठत्व लाभले. व सूरह अलकद्र आयत नं. 3 मध्ये याला हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम अशी रात्र म्हटले गेले. एक रोमांचक बाब म्हणजे या रात्री फरिश्ते आपल्या पालकनर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. ती रात्र पूर्ण शांतीची आहे. पुढचे दहा दिवस रमजानचे शेवटचे दहा दिवस   -(उर्वरित पान 7 वर)

आहेत. त्याच्या विषम रात्रीत म्हणजे 21,23,25,27 आणि 29 यामध्ये जर जास्त इबादत (प्रार्थना) करून या रात्रीचा लाभ आपल्याला घेता येवू शकतो. 

कुरआनचा शाब्दीक अर्थ, ’शब्द व वचनांना अर्थपूर्ण क्रमात जोडून मुखाणे उच्चारणे’ असा आहे. सामान्यतः यालाच आपण पठण असे म्हणतो. कुरआन ह्या शब्दाचा अर्थ वारंवार वाचला जाणारा ग्रंथ असा सुद्धा आहे. हा शेवटचा दैवी ग्रंथ आहे. मानवाला सत्य मार्ग दाखविणारा दूसरा कोणताही ग्रंथ आता येणार नाही. 

1. कुरआन अल्लाहची मोठी निशाणी आहे. याला समजून वाचल्यास आपण प्रत्यक्ष आपल्या निर्मात्याशी संवाद करत आहोत, असा अनुभव येतो. 

2. असे म्हटले जाते की कुरआन अल्लाहचा दस्तरख्वान (जेवताना अंथरले जाणारे कापड) आहे. ज्यावर वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले जातात. कुरआनच्या दस्तरख्वानावर हजेरी लावल्याने आत्म्याला पोषण मिळते. आपण जसे शरीराला संतुलित आहार देतो, नियमित कुरआन पठणाने आत्म्याला सुद्धा संतुलित आहार मिळतो.

3. कुरआन अल्लाहची दोरी आहे. याचा उल्लेख सूरह आलेइमरान आयत नं. 103 मध्ये आलेला आहे. ज्यात म्हटलेले आहे की, सर्वांनी मिळून अल्लाहच्या दोरीला घट्ट धरा आणि आपसात फाटाफूट होवू देवू नका. 

4. कुरआन अरबी भाषेमध्ये असल्यामुळे काही लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अरब होते आणि कुरआन अरबी भाषेत आहे म्हणून तो अरबांसाठीच आहे. इतरांना त्याच्याशी काय देणेघेणे. पण कुरआनचे अवतरण संपूर्ण मानवजातीसाठी विशिष्ट जाती, संप्रदाय किंवा भौगोलिक क्षेत्रासाठी नाही. हा ग्रंथ पूर्ण मानवजातीसाठी जगण्याची एक आचारसंहिता (मॅन्युअल) आहे. सूरह अलअंबिया आयत क्र. 107 मध्ये म्हटले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल. आम्ही तर तुम्हाला समस्त जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ 

5. कुरआनवर श्रद्धा ठेवणे आणि कुरआनला नाकारणे यावरच मृत्यूनंतरच्या आपल्या सर्वांचे यश किंवा अपयश अवलंबून आहे. 

6. कुरआन हा एकमेव असा ग्रंथ आहे जो आजपर्यंत सुरक्षित आहे आणि याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अल्लाहने स्वतः घेतलेली आहे. 

7. कुरआनने आव्हान दिलेले आहे की, असा ग्रंथ तर सोडा या ग्रंथाची एक आयत सुद्धा कोणी रचू शकत नाही. या संदर्भात सूरह अलबकरा आयत नं. 23 मध्ये हे आव्हान सविस्तरपणे नमूद केलेले आहे. 

कुरआनची वैशिष्ट्ये

1. सूरह जुमर आयत नं. 23 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, ’’अल्लाहने उत्तम वाणी अवतरली आहे, एक असा ग्रंथ ज्याचे सर्वभाग त्यासारखेच उत्तम आहेत. ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेलेली आहे. ज्याच्या श्रवणाने लोकांच्या अंगावर शहारे उभा राहतात. जे आपल्या पालनकर्त्यांचे भय बाळगणारे आहेत. मग त्यांचे शरीर आणि त्यांचे हृदय मृदू होवून अल्लाहकडे आकर्षित होतात. तो ज्याला इच्छितो सन्मार्गावर आणतो आणि ज्याला अल्लाहनेच मार्गदर्शन केले नाही तर मग कोणीही मार्गदर्शक नाही.

2. कुरआन महान आहे (संदर्भ अलहिज्र आयत नं.87)

3. कुरआन करीम (उच्चकोटीचे) आहे. (सं. सूरह अलअंबिया आयत नं.77-78)

4. कुरआन नूर (प्रकाश) आहे. (संदर्भ : सूरह अलतगाबुन आयत नं.4)

5. कुरआन मुबीन (स्पष्ट) बयान आहे. (संदर्भ : सूरह अलशुरा आयत नं.2)

6. कुरआन हकीम (विवेकशील) आहे (सं. सूरह यूनूस आ.क्र.1)

7. कुरआन मजीद (बुलंद, श्रेष्ठ) आहे. (सं. सूरह अलबुरूज आ.क्र.2)

8. कुरआन मुबारक (लाभदायक) आहे. (सं. सूरह सॉद आ.क्र.29)

9. कुरआन अजीज (जबदरस्त) आहे. (सं. सू. हामीम सज्दा आ.क्र. 41)

10. कुरआन रहमत (कृपा) आहे.(सं. सू. अलआराफ आ.क्र.203) 

11. कुरआन बसायर (डोळसपणा आणणारा प्रकाश) आहे. (सं. सू. अलआराफ आ.क्र.203) 

12. कुरआन हुदा (मार्गदर्शक) आहे. (सं. सू. अलबकरा आ.क्र.2)

13. कुरआन इल्म (ज्ञान) आहे. (सं. सू. अलबकरा आ.क्र. 120)

14. कुरआन फुरकान (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) आहे. (सं. सू. अलफुरकान आ.क्र.01)

15. कुरआन ज़िक्र (आठवण करून देणारा) आहे. (सं.सू. अबस आ.क्र.11)

16. कुरआन बुशरा (सुवार्ता) आहे. 

17. कुरआन नजीर (ताकीद) आहे. (सं.सू.नज्म, आ.क्र.56)

18. कुरआन मोएजा (उपदेश) आहे. (सं.सू. युनूस आ.क्र.57)

19. कुरआन शिफा (इलाज) आहे. (सं.सू. युनूस आ.क्र.57)

20. कुरआन रूह (आत्मा) आहे. (सं. सू. शुरा आ.क्र.57).

कुरआनचे माणवांवर हक्क

1. ईमान बिल कुरआन (कुरआनवर श्रद्धा ठेवणे) आहे. (सं.सू. निसा आ.क्र.136)

2. कुरआनचा सन्मान करणे.

3. तिलावतुल कुरआन (पठण करणे) (सं.सू.नमल आ.क्र.91-92)

4. इस्तमाअ इलल कुरआन (कुरआन ऐकणे) (सं.सू.आराफ आ.क्र.204)

5. फिकहल कुरआन (कुरआन समजणे) (सं.सू.अनआम आ.क्र.98)

6. तदब्बुरूल कुरआन (कुरआनवर चिंतन करणे) (सं.सू.सॉद आ.क्र.29)

7. तजकीर बिल कुरआन (कुरआनातील आयातींचा उपदेश देणे) (सं.सू. सॉद आ.क्र.29)

8. रूजू इलल कुरआन (कुरआनकडे वळणे) (सं.सू. निसा आ.क्र.59)

9. तजकिया बिल कुरआन (स्वतःला पवित्र करणे) (सं.सू.जुमा आ.क्र.2)

10. इताअत बराह कुरआन (अल्लाह आणि प्रेषितांच्या आदेशांचे पालन करणे)

11. तमसीक बिल कुरआन (कुरआनशी दृढतेने नाते जोडणे). (सू. अलआराफ आ.क्र.170)

12. दावत इलल कुरआन (कुरआनकडे बोलाविणे) (सू. आलेइमरान आ.क्र.23)

13. इकामते कुरआन (कुरआनच्या आदेशांची अंमलबजावणी करणे). (सू. मायदा आ.क्र. 66.)

कुरआन का वाचावे?

सूरह ताहा आ.क्र.124 मध्ये अल्लाह फरमावितो, जो माझ्या जिक्र (कुरआनपासून) तोंड फिरविल त्यासाठी त्याचे जीवन अडचणीचे होईल आणि पुनरूत्थानाच्या दिवशी आम्ही त्याला अंध उठवू. तो म्हणेल हे पालनकर्त्या जगात तर मी डोळस होतो येथे मला आंधळा म्हणून का उठविले. त्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाह फरमाविल, होय अशाच प्रकारे तर आमच्या वचनांना जेव्हा त्या तुझ्यापाशी आल्या होत्या तू विसरला होतास त्याच प्रकारे तू आज विसरला जात आहेस. 

मला या आयातींची खूप भीती वाटते व प्रत्येकाला विनंती करते की, मृत्यूनंतर आंधळे उठायचे नसेल तर कुरआन अवश्य समजून वाचा. अडचणीचे जीवन जगायचे नसेल तर कुरआन वाचा. स्वर्गात जायचे असेल तर कुरआन वाचा विशेषतः सूरह नहल वाचा. नरकात जायचे नसेल तर कुरआन वाचावे. अल्लाह सर्वांना कुरआन वाचण्याची व त्यातील उपदेशांवर चालण्याची सद्बुद्धी देओ. आमीन. 


- डॉ. सिमीन शहापुरे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget