मयुरिचा आनंद गगनात मावत नव्हता. झालंच असं होतं की, आज तिचा नवरा घरीच होता. त्याने संपूर्ण कुटुंबाला शॉपिंगसाठी नेले होते. प्रत्येकाच्या आवडीच्या वस्तू घेवून दिल्या होत्या. महिन्याचे राशन भरले होते. मुलांची आज मजाच मजा झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज त्याने दारू पिलेली नव्हती. मयुरीला मारहाणही केली नव्हती. हा व्यसनमुक्तीचा परिणाम होता. त्याने मयुरीने केलेल्या स्वयंपाकाचे कौतुकही केले होते. मयुरीसारखेच मायाच्या नवऱ्यानेही तिला आज मजुरी करण्यासाठी जाऊ दिले नव्हते व तिची या कामातून कायमची मुक्तता केली होती. त्याने स्वतः घरच्या सर्व जबाबदाऱ्या उचलण्याचे धैर्य दाखविले होते. तिच्यासारखेच मीराच्या पतीनुसुद्धा जो नेहमी घराबाहेरच रहायचा आज मीरावर प्रेमाचा वर्षाव करत होता. त्याने मिराला वचन दिले की तो यापुढे कधीही बाहेरचा नाद करणार नाही. ही उदाहरणे जी एक गोष्ट दर्शवितात ती ही की, महिलांचे जीवन त्यांच्या जीवनात असलेल्या पुरूषावर अवलंबून असते.
पुरूष सुधारले की, त्यांचे जीवन आपोआप सुधारते. महिलांच्या जीवनात क्रांती ही पुरूष सुधारल्याने येवू शकते. ही कल्पना कितीही सुंदर वाटत असली तरीही वास्तविकतेशी याचा काही संबंध नाही. महिला दिनी किती पुरूष असं वागत असतील, किती शेतात जाणाऱ्या, मोलकरीन म्हणून काम करणाऱ्या, स्वयंपाकीन म्हणून काम करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनावर महिला दिनाचा परिणाम होतोय? एक तर त्यांना माहितच नसते की महिला दिन म्हणजे काय? ज्यांना माहित असते ते त्या सहभागी होवू शकत नाहीत. कारण त्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो. खरी गरज महिला दिवस साजरा करणाऱ्यांना या गोष्टीची वाटायला हवी की, त्यांनी महिलांना त्या अनावश्यक कामातून मुक्ती मिळवून द्यायला हवी, जी इस्लामच्या दृष्टिकोनातून पुरूषांनी करावयाची कामे आहेत. वेश्या व्यवसापासून मुक्त करून, अशा महिलांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार द्यावा; तो फक्त एक दिवसासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी.
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची आठवण करून देतो. पण ती आठवणच राहून जाते, ही एक हास्यास्पद गोष्ट आहे. ज्या महिला इतरांच्या तुलनेत मागे पडलेल्या आहेत, ज्यांना प्रगतीची खरोखरच गरज आहे, ज्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे, ज्यांना याची जाणीवही नाही त्यांच्यासाठी आवाज उठवून त्यांच्यात जागरूकता निर्माण करून त्यांचे जीवन चांगले करण्याचे या महिला दिनानिमित्त किती प्रयत्न होतात? यासाठी एक दिवस नाही तर सदासर्वकाळ प्रयत्न करणे गरजेचे आहे.
8 मार्च रोजी नेमके काय होते?
या एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांची प्रगती झाली असे दाखविण्यात येते. त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यांच्या कामाचे गोडवे गायले जातात. कर्तृत्त्वान महिलांना पारितोषिके दिले जातात. पण का यामुळे खरोखरच महिलांचे जीवन सुधरते? प्रगती होते? आतापर्यंत साजरे झालेल्या महिला दिनामुळे महिलांची प्रगती झाली का अधोगती? तथ्य काय आहे? पाश्चिमात्य महिला जेंडर इ्नवॅलिटी आणि महिला सक्षमीकरणाच्या नावावर स्वतःला खूप प्रगतीशील समजतात. त्यांना आपण जग जिंकल्यासारखे वाटते. पण या जग जिंकण्याच्या नादात त्या काय करत हरत आहेत, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांच्या लक्षात एक गोष्ट येतच नाही की त्या नैतिकता आणि कुटुंब व्यवस्थेला मुकलेल्या आहेत. आपल्या भारतातील महिलाही विशेष करून उच्चवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय महिला एका दिवसाचा महिला दिन साजरा करून स्वतःला खूप, ’’तोफ’’ समजत असल्या तरी समाजात त्याचे काय परिणाम होत आहेत, याचा मागोवा त्या घेत नाहीत. त्यांनी तसा कधी प्रयत्न केलाय का? याचे उत्तर नाही असेच आहे. आपण कोणतेही काम काहीतरी सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठीच करत असतो. पण 8 मार्च नंतर आपल्या वस्तीत, शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय सकारात्मक बदल झाले, याची दखल घेण्याची जबाबदारी कोणाची?
मग 8 मार्च साजरे करणे बंद करावे का?
वर्षातून एकच दिवस मिळतो महिलांना मग तो ही साजरा करायला नको का? हा दिवस साजरा करणारे वेडे आहेत का? याचे उत्तर असे आहे की, मी महिलांना दिल्या जाणाऱ्या एक दिवसाच्या सन्मानाच्या पक्षात नाही. मला तर वाटते की, महिलांना कायमस्वरूपी आयुष्याचा सन्मान मिळावा. एक दिवसासाठी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बनवून कितीही अधिकार दिले तरी त्याचा उपयोग काय?
महिलांना खरे तर पुरूषांकडून प्रेमाचे दोन शब्द, कौतुकाचे दोन शब्द व सन्मानाचे दोन शब्द हवे असतात. महिलांच्या सर्व गरजा पूर्ण करणे ही पुरूषांची जबाबदारी असते. जे पुरूष या गरजा पूर्ण करतात ते खऱ्या अर्थाने नायक असतात. यासाठीच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले आहे की, तुमच्यापैकी ते पुरूष सर्वश्रेष्ठ आहेत जे आपल्या पत्नीसाठी कनवाळू आहेत. पुरूषांनी महिलांना, महिला दिवस नव्हे तर महिलांचे युग आणण्यासाठी मदत करावी. महिलांचे युग म्हणजे महिलांचे वर्चस्व असलेले युग नव्हे तर ते असे युग ज्यामध्ये महिलांना सर्व अधिकार लाभतील. त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल, त्यांना राणीसारखी वागणूक दिली जाईल व नैसर्गिकपणे घरी राहून मुलांचे पालन पोषण करण्याची मुभा दिली जाईल. हे फक्त इस्लामने दिलेल्या शिकवणीचे पालन करूनच शक्य आहे. इस्लाम महिलेला ’रब्बतुल बैत’ अर्थात घराच्या राणीचे स्थान देतो. इस्लामला ना पुरूषप्रधान समाज मान्य आहे ना स्त्री प्रधान. तो एक संतुलित समाजाची अपेक्षा करतो. इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहेत. आपापल्या क्षेत्रात काम करून आदर्श समाज घडवावा, हे इस्लामला अपेक्षित आहे. प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असतात. आपण एका शल्यचिकित्सकाकडून अपेक्षा करू शकत नाही की त्याने दंतचिकित्सकाचे काम करावे किंवा स्त्री रोग तज्ज्ञांकडून ही अपेक्षा नसते की त्याने नेत्र तज्ज्ञासारखे काम करावे. मग स्त्रीयांकडून ही अपेक्षा का की, त्यांनी पुरूषांचे कार्य करावे? पुरूष स्त्रीयांची कामे करत नाहीत, करूही शकत नाहीत. बाळांतपण व मुलाला दूध पाजणे, त्यांचे पालनपोषण करणे मग स्त्रियांनी त्यांची कामे (घराबाहेरची) का म्हणून करावीत? थोडक्यात हे की, स्त्री-पुरूषांनी आपापले कार्यक्षेत्र ओळखून तज्ज्ञ व्हावे व एकमेकांना सहकार्य करून एकमेकांना अधिकार देऊन मानवजातीच्या प्रगतीसाठी काम करावे व आदर्श समाज निर्मितीमध्ये आपली बहुमुल्य भूमिका वठवावी. जी की इस्लामने दिलेल्या शिकवणीशिवाय शक्य नाही. आज आपण पाहतो, स्वतःला पुढारलेल्या समजलेल्या एका महिलेने बंगळुरूमध्ये आपल्या पतीला यासाठीच ठार केले की त्याने तिला लग्नाच्या वाढदिवसाची भेट दिली नाही. ही कसली प्रगती? ही कसली पुरोगामी विचारधारा? शेवटी अल्लाकडे प्रार्थना आहे की, आम्हा स्त्रीयांना महिला दिवस नाही तर महिलांचे युग लाभू दे.. जसे की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या युगामध्ये लाभले होते. (आमीन.)
- डॉ.सीमीन शहापुरे, लातूर
Post a Comment