Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग ११)

वनस्पतींमधील दानधर्माचा गुणविशेष


माणूस आज आपल्या धावपळीच्या युगात खूप स्वार्थी झाला आहे. आहे त्यात समाधान मानणे सोडून अधिकाधिक कमावण्याचे वेड त्याला लागले आहे. या स्वार्थीपणात तो दानधर्म करणे सुद्धा विसरून गेला आहे. आपल्याकडे जे आहे त्यात दुसऱ्याचाही वाटा आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. ही जाणीव आपल्याला वनस्पती करून देतात.

वनस्पतींच्या वर्गीकरणात सर्वात विकसित गट आवृत्तबीजी वनस्पतींचा आहे. बिया येणे हा त्यांचा सर्वात मूलभूत गुणधर्म आहे. वनस्पतीच्या खालच्या स्तरातील म्हणजे ज्यांना बीज येत नाहीत, अशा वनस्पती आपल्या मर्यादित क्षेत्रातच पसरतात. मात्र आवृत्तबीजी वनस्पतींनी फुला-फळांच्या विकासामुळे आपला बीजप्रसार झपाट्याने वाढण्याचे गुणधर्म अंगीकारले.

फळांचाही इतिहास फार मनोरंजक आहे. या बियांचा प्रसार व्हावा यासाठी हवा, पाणी यांसारख्या अजैविक घटकांसोबत प्राण्यांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे.  प्रकाश-संश्लेषणात तयार झालेले अन्न अधिकाधिक प्रमाणात साठवण्यासाठी आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये फळांची उत्क्रांती करण्यात आली. जेणेकरून या फळांच्या शोधात शाकाहारी प्राणी वनस्पतींपर्यंत पोहोचतील आणि त्यामध्ये लपलेली बीजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातील. कालांतराने या फळांचा आकार काही वनस्पतींमध्ये वाढत गेला तर काही वनस्पतींमध्ये कमी होत गेला.

आंबा, पपई, टरबूज यांसारख्या फळाचा आकार मोठा तर शेंगा, तेलबिया, मेवे आणि तृणधान्य पिकांची फळे हे छोट्या आकारात विकसित झाली. मोठ्या फळांचा गोड आणि मधाळ गर प्राण्यांना आकर्षित करतो तर ज्या फळांना गर नसतो त्यामध्ये बियांची संख्या अधिक प्रमाणात असते जेणेकरून या बियांचा वापर अन्न म्हणून केला जावा आणि त्यातील काही बिया पूणर्उत्पादनासाठी प्राण्यांमार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जाव्यात.

मानवी विकासात जेव्हा शेतीचा समावेश झाला तेव्हा नैसर्गिकरित्या बियाणांचा होणारा प्रसार मानव करू लागला आणि अशा पिकांची लागवड होत होती ज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन व्हावे. माणूस जेव्हा एक बी पेरतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की त्याच्या एका बीपासून जास्तीत जास्त उत्पादन व्हावे आणि या बीयांमध्येही जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता निसर्गनिर्मात्याकडून ठेवलेली आहे.

वनस्पती आपल्या बियांच्या प्रसारासाठी अधिकाधिक उत्पादन देऊन आपले कार्य पूर्ण करतात. एका श्रद्धावंताला आपल्या श्रद्धेची ग्वाही देताना आपल्या जवळील संपत्ती सत्कार्यात खर्च करावी लागते. पेरलेल्या बियांच्या ७०० पटीने जसे धान्य परत मिळते तसेच सत्कार्यात खर्च केलेली मालमत्ता ७०० पटीने परत मिळण्याची खात्री कुरआनने अध्याय अल्-बकराच्या २६१ व्या आयतीमध्ये दिली आहे.

"जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, त्यांच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जसे एक बी पेरली जावी आणि तिच्यातून सात कणसे यावीत आणि प्रत्येक कणसात १०० दाणे असावेत. अशाच तऱ्हेने अल्लाह ज्याच्या कृतीला इच्छितो त्याला समृद्धी प्रदान करतो. तो उदारहस्त देखील आहे आणि जाणणारा सुद्धा."

जितकी निष्ठा आणि सखोल भावनेसह मनुष्य अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करेल तितका जास्त मोबदला त्याला अल्लाहकडून प्राप्त होत जाईल. जो अल्लाह एका बिजामध्ये इतकी समृद्धी देतो की ज्यामध्ये ७०० बीया तयार होतात त्या अल्लाहसाठी अशक्य नाही की तुमच्या दान देण्यालाही तितकेच जास्त मोबदल्यात वाढवावे. अट फक्त एवढी आहे की तुमची श्रद्धा आणि दान देण्याची भावना.

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget