ह. आयेशा (र.) म्हणतात की मी बोलाचालीमध्ये ह. फातिमा (र.) आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासारखे साम्य इतर कुणातही पाहिलेले नाही. ह. फातिमा (र.) जेव्हा प्रेषितांच्या सेवेत हजर होत असत तेव्हा प्रेषित (स.) उभे राहून त्यांचे स्वागत करीत. त्यांच्या दिशेने जात, त्यांचा हात आपल्या हातात घेत आणि मग त्यांना बसण्याची सोय करून देत. तसेच जेव्हा प्रेषित (स.) फातिमा (र.) यांच्या घरी जात असत तेव्हा ह. फातिमा (र.) उठून त्यांचे स्वागत करीत, त्यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांना बसण्याची व्यवस्था करीत. (ह. फातिमा (र.) प्रेषितांच्या कन्या आहेत.) (अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, एखाद्या माणसाच्या तोंडातून भलाई आणि पुण्याची कधी एखादी अशी गोष्ट निघते जिचे महत्त्व त्या माणसाला कळत नाही, पण अल्लाह त्याच्यासाठी त्याच्या अल्लाहशी भेटीच्या दिवसापर्यंत आपली प्रसन्नता व्यक्त करत असतो. त्याच वेळी कधी कुणाच्या तोंडातून वाईट आणि विकृत अशी गोष्ट निघते जिची तीव्रता त्यालासुद्धा माहीत नसते, पण अल्लाह त्या कारणाने त्या माणसाशी जेव्हा भेट घेईल त्या दिवसापर्यंत तो आपली नाराजी आणि राग व्यक्त करत असतो. (तिर्मिजी, इब्ने माजा)
अबू हुरैरा म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की जो कुणी अल्लाह आणि शेवटच्या दिवसावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो त्याने भल्या गोष्टीसाठीच तोंड उघडावे अन्यथा गप्प बसून राहावे. (बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “श्रद्धावंत (कुणाचा) धिक्कार करत नसतो.” दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, “एका श्रद्धावंताने कुणाचा धिक्कार करावा ही गोष्ट त्याला साजेशी नाही.” (ह. अब्दुल्लाह इब्ने उमर, तिर्मिजी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, “जर कुणी कुणाला काही भेटवस्तू दिली असेल तर ज्याला ही भेटवस्तू दिली असेल त्यानेही त्याच्याकडे काही असेल तर त्याच्या बदल्यात ते द्यावे. जर कुणापाशी बदल्यात द्यायला काही नसेल तर त्याने त्या माणसाची प्रशंसा करावी. ज्याने असे केले त्याने त्या भेटवस्तूचा हक्क अदा केला आणि त्याची कृतज्ञता व्यक्त केली, पण जर कुणी तसे केले नसेल आणि भेट देणाऱ्या माणसाबद्दल कुणाला सांगितले नसेल तर त्याने त्याची कृतघ्नता केली.”
ह. आयेशा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताकीद केली की “एकमेकांना भेटवस्तू देत राहावे, कारण ह्या भेटवस्तूंमुळे मनामधील विकृती नष्ट होतात.” (तिर्मिजी) ह. आयेशा (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना कधी तोंड उघडून हसताना पाहिले नाही. त्यांचे हसणे म्हणजे स्मितहास्यासारखे होते. (बुखारी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment