Halloween Costume ideas 2015
February 2019

साहित्य क्षेत्रात ख्यातनाम एखाद्या लेखकाच्या साहित्यलेखनावर समीक्षण लिहणं म्हणजे – ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीचा अनुभव घेण्यास उताविळ झालेलो असल्याचे उघड करणे होय, असे मला वाटते आहे. परंतु बाबांनी मलालावरील गोष्टरूपाने एक चमकता तारा आपणासमोर सादर केला. तो पुस्तक-पेनाचं महत्त्व सांगतो आणि तरीही आपण त्यावर समीक्षण  केवळ एका बैलाच्या भीतीने लिहित नसू तर मग... आपलं शिक्षणच वाया गेलं, असं मला प्रकर्षाने जाणवू लागलं. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘‘मारशील तर मार बॉ!’’ ...येथे  मलालाचं व्यक्तिमत्व मला लिहिण्याची हिंमत देत आहे. यापेक्षा अधिक काय ती ‘बाबांची गोष्ट’ प्रभावी असावी! बाबांनी लिहिलेली ही गोष्ट काही साधीसुधी नाही. यात संघर्ष आहे. त्या  संघर्षासाठी धगधगत्या मशालीसारखे शब्द आहेत. शब्दांमध्ये अशी शक्ती आहे की वाचकाच्या हृदयाला पाझर फुटतो. पाझरलेले हृदय पेटून उठते. एक ठिणगी वनवा बनून साऱ्या जगात धगधगू लागते. त्याच्या प्रकाशात जगातील मुलींच्या शाळा उघडू लागतात. वाचन-लेखन चालू लागते. अधिकाराची जाणीव होऊ लागते. व्यक्तिस्वातंत्र्य कळू लागते. धर्माच्या नावावर  होत असलेला नंगानाच बंद पडतो. जगाच्या नजरा खऱ्याखोट्याचा शोध घेऊ लागतात. मलालाचं महत्त्व पटते. आमहालाही तिची ओळख पटते.
...‘‘अरे हो! ही तर आमच्या सावित्रीचीच लेक ...कोणी गोळी झाडली? ...कोण तो? ...प्रश्नामागून प्रश्नांची सरबत्ती आणि क्रोधाचे ढग जमू लागतात. बाबांची गोष्ट संपते पण मलालाची  गोष्ट संपत नाही. भारतीयांचं हृदय बोलू लागतं... ‘‘अरे पाकड्यांनो, तुम्हाला पौराणिक भारतखंडाचा एक भाग धर्माच्या नावाने दिला तो काय अधार्मिक कृत्ये करण्यासाठी?... लक्षात  ठेवा, जसा दिला तो काळजाचा तुकडा तसो तपरतही घेतला जाईल!’’... जवळजवळ साऱ्या जगातील आबालवृद्धांनी असंच काही बोललं, पण एवढं बोलून गोष्ट बंद झाली नाही. ती पुढे  चालतच राहिली... निरंतर! बाबांच्या या गोष्टीमध्ये डोळ्यांत बसणारे निसर्गचित्र आहे.
ते म्हणतात, ‘‘वर्षातून अधिकांश वेळेस डोंगरमाध्यावर बर्फाचा फेटा गुंडाळलेला असायचा. अंगावर काळीशार शेरवाणी घातलेला धिप्पाड पहाड जणू गावाची पाठराखण करी.’’... तर  कुठे... ‘त्या उकिड्र्याचं’ जेथून मलालाच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्याचं बिभित्स वर्णन. इतकेच नाही तर एका विषयाच्या परिघातून दुसऱ्या विषयाच्या परिघात  गोष्टीला नेऊन सुटसुटीत बसवण्याची लेखनशैली या लेखनात पाहावयास मिळते. त्याचं उदाहरण म्हणून- ‘‘तीन-चार वर्षांची झाली नाही तोच पहिल्या वर्गात येऊन बसू लागावी. त्या  वर्गात तिच्याहून मोठ्या वयाच्या मुली असायच्या. आपल्या पाटीवर ती लेखणीनं रेषा काढू लागली. रेषांची चित्रे होऊ लागली. अक्षरांशी मैत्री सुरू झाली.’’
मलाला या गोष्टीच्या पुस्तकात मलालाच्या कर्तुत्वाची गगनभरारी मारण्यास प्रवृत्त करणारी कहाणी आहे आणि तालिबाण्यांच्या क्रूरकृत्यांचा निषेधात्मक पाढा वाचण्यात आला आहे. एकीकडे एक लहान मुलगी जगाला घडविण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन विकास साधण्यासाठी म्हणते, ‘‘एक मुल, एक शिक्षक, एक लेखणी आणि एक पुस्तक हे जग बदलवू शकतं.’’ तर  दुसरीकडे स्वात खोऱ्यातील तालिबानी नेते मौलाना फजलुल्लाह म्हणतात- ‘‘महिलांना शिक्षण द्यायचे नाही. मुलींनासुद्धा शाळेत पाठवणं बंद करा. मुलींसाठी सुरू केलेल्या मदरसाही बंद  करा. इस्लामनं महिलांच्या शिक्षणास यापूर्वी प्रोत्साहन दिले होते, असं मला दाखवून द्या. जर कोणाला ते आढळलं तर त्याने यावे आणि माझ्या दाढीवर खुशाल लघवी करावी.’’ लेखक  बाबांनी या अशा तालिबाण्यांचं बिभित्सवर्णन करताना फार प्रभावी शब्द वापरले आहेत. ते लिहितात, ‘‘डोक्यावर विस्कटलेले केस आणि तशाच वाढलेल्या दाढीतली ही हत्यारबंद माणसं  विचित्र दिसत होती. या लोकांचा पोशाख म्हणजे अपरी सलवार, वर लांब कमीज आणि डोक्यावर काळा किंवा पांढरा फेटा गुंडाळलेला असे. काहींच्या पायात मळलेले बुट होते, तर  काहींच्या पायात प्लॅस्टीकच्या चपला. रस्त्याच्या कडेला खांद्यावर बंदूक घेऊन उभे दिसायचे. मळलेल्या पटक्याच्या टोकाला नाक शिकरतांना घाणेरडा आवाज ऐकून तिला किळस  यायची. चेहरा कपड्यात झाकून घेतलेला आणि डोळ्यांच्या ठिकाणी रुपयाच्या आकाराचे छिद्र ठेवलेले होते बघायला. छातीवर काळ्या रंगाची पट्टी होती. त्यावर लिहिलं होतं- ‘शरिया लॉ  म्हणजे हौतात्मसैनिक.’ वाचकांना या गोष्टीचा नायिकेबद्दल आदर, सद्भाव वाटून त्याचं या गोष्टीमधील व्यक्तिमत्व उठावदार दिसावं यासाठी खर्च केलेले शब्द अर्थात भारदस्त उपमा वापरल्या आहेत त्या अशा- शांततेची दूत, आजच्या काळातील जोन ऑफ आर्च, सावित्रीची एक लेक, मानवतेची परी, सावित्री मलाला, पाकिस्तानच्या सावित्रीची लेक, वर्तमानातील एक   चमत्कार, वीरनायिका इत्यादी. या सर्वांमधून गोष्टीतील नायिका उभारून तर येतेच पण बाबांच्या लेखणीची धारसुद्धा जाणवते. यामागे त्यांच्या अनुभवी जीवनाचा, ध्येयवादाचा, लेखन  कौशल्याचा आणि खास म्हणजे दूरदृष्टी ठेवून मेहनतीचा-कष्टाचा-सातत्याचा वारू दौडवत नेण्याचा वाटा आहे. ते आज असे जरी सांगत असले की या गोष्टीचा लेखनकाळ आला आहे  पण त्या लेखनामागे दीर्घकालीन साधना आहे. एकशेबावन्न पानी या अमूल्य पुस्तकास दोन भागांत विभागता येते. एका भागात स्वात खोऱ्यातील नैसर्गिक वर्णनासह अमेरिकेच्या कमर्शियल टॉवरवर तालिबान्यांनी तथाकथित केलेल्या विमान आत्मघाती सफल प्रयोगाचा आणि त्याच दिवसात स्वात खोऱ्यात जन्मलेल्या मलालाच्या बालपणापासून ते बीबीसीपर्यंत जाण्याचा प्रवास शब्दांनी जसाच्यातसा जीवंत ठेवलेला आहे. दुसऱ्या भागात मलालाची डायरी ज्यामध्ये ३९ दिवसांचे मत प्रगट आहे जे बीबीसीच्या उर्दू वाहिनीवर प्रक्षेपित झाले होते. त्यात मलालाचे नाव ‘गुलमकाई’ ठेवले होते. हा तिच्या संरक्षणाचा उपाय जरी होता तरी तिच्यावर दि. ९ ऑक्टो. २०१२ रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याबाबत  जगभरातून प्रतिक्रिया, जागतिक सहकार्य आणि अनेक पुरस्कारांनी होत जाणारा या सावित्रीच्या लेकाची सन्मान अदोरेखांकित आहे. तिचा लढा तिच्या शब्दांत असा- ‘‘मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात माझा लढा आहे.’’ ‘मलाला’ या नावाने पहिल्या भागात सादर झालेली ही विरबाला दुसऱ्या बागात ‘गुलमकाई’ या नावाने प्रगट होते. या एकाच  व्यक्तीच्या दोन नावांनी या गोष्टीचे दोन भाग पाडले, अथवा दोन भाग पाडले जाऊ शकतात.
दुसरा भाग हृदयद्रावक आहे. आसवांना वाट मोकळी करून देणारा आहे. जगभरात तिच्या जगण्यासाठी होणाऱ्या प्रार्थनेत वाचक नकळत सामील होतो, तसेच तो डोळ्यांमध्ये बदल्याची  आग उभी करणारा आहे. पण वाचक जेव्हा मलालाचे शब्द वाचतो की, ‘‘माझ्यावर गोळी झाडलेल्या तालिबानविषयी माझ्या मनात द्वेषाचा लवलेशही नाही. माझ्या हातात बंदू असली  आणि तो जर माज्यासमोर उभा राहिला तरी मी त्याच्यावर गोळी झाडणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.), प्रेषित येशू खिस्त आणि गौतम बुद्धांकडून मी शिकेलली ही कणव आहे. हाच  वारसा मी मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि मोहम्मद जिनांकडून घेतला आहे. महात्मा गांधी, बादशहा खान आणि मदर टेरेसांकडून शिकलेले अहिंसेचे हे तत्त्वज्ञान आहे.’’  ...आणि वाचकांच्या डोल्यांतील आसवं फुलं होऊ लागतात. त्यातच बदल्याची आग विझून जाते. बाबांनी शब्दरूपात सादर केलेली जगाच्या सर्व मुलींची प्रतिनिधी मलाला ही धैर्यवान,  क्षमाशील, विचारी, परोपकारी, मानवी कल्याणाची कास धरून जगाला... नवे जगनिर्मितीसाठी सज्ज असलेली सर्वसमावेशक शक्ती आहे. ती म्हणते, ‘‘मी एकटी नाही. मी म्हणजे अनेक  जण आहोत. मी म्हणजे जगातील सगळ्या मुली आहेत, ज्यांनी अजून शाळेचा उंबरठा ओलांडलेला नाही. त्या शाळेबाहेरच आहेत.’’ आज निम्मे जग उद्योगधंद्याच्या प्रगतीनं आधुनिकतेची आणि प्रगतीची फळं चाखत आहे; पण निम्मे जग गरिबी, भूकबळी, अन्याय आणि जगण्याचा संघर्ष करीत आहे. हे सर्व सादर करताना स्वात खोऱ्याच्या भौगोलिक व  राजकीय इतिहासाचे वर्णन, इस्लाम धर्माची महती, इस्लाविरूद्ध तालिबानी तत्त्व, स्वातची सामाजिक स्थिती याचे दर्शन घडते.
एकीकडे धर्माच्या नावावर आणि धर्माचीच आड घेऊन स्वातमध्ये रक्ताचे पाट वाहवू पाहणारा सत्तालोलूप तालिबान लेखकांनी आपल्या जीवंत शब्दांनी साकारला आणि जगकल्याणार्थ, जनकल्याणार्थ एक आदर्श जग उभं करण्यासाठी धडपडणारी बालिका खंबीरपणे उभी केली. यापैकी जगाने या बालिकेला सन्मानित केलं. ती विचारते, ‘‘बलाढ्य देश युद्धांसाठी बंदुका देऊ  शकतात, पण पुस्तकं का देऊ शकत नाही?’’
बाबालिखित ‘मलाला’ या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ स्वत: मलालाचेच आहे. संतुष्ट गोळेगावकर यांनी गोळा केलेल्या फोटोंपैकी ते एक असावे, कारण मुखपृष्ठाची सजावट ही त्यांचीच  जबाबदारी होती, जी त्यांनी अतिशय खुबीने पार पाडल्याचे जिसते. अक्षरजुळणी धारा प्रिंटर्स प्रा. लि. औरंगाबाद यांचे आहे. अचूक प्रिंटिंग ही त्यांच्या कौशल्याची पावती आहे. आतापर्यंत  या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या केवळ दोन वर्षांच्या काळात छापाव्या लागणे हे या पुस्तकाचे यश आहे. प्रकाशक साकेतभाऊ यांच्या औरंगाबाद येथील साकेत प्रकाशन आणि बाबांची  लेखनशैली या दोन सुगुणांचा सुवर्णसंगम या पुस्तकाच्या रूपाने अनुभवात येतो. तसे तर साकेत प्रकाशनाची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत आणि बाबांनी पण अनेक विषयांवर प्रभावी  लिखाण केलेले आहे, पण मलालाची गोष्टच न्यारी!... बालशिक्षणाचं स्वप्न पाहणारी मलाला आणि तिच्या जगभरातील मित्रमैत्रिणींना सलाम करीत लेखकांनी लेखणी उचलली आणि  वाचकांसाठी ज्ञानाचा, जीवनाचा, धोरणाचा, परोपकाराचा, संस्काराचा, सभ्यतेचा आणि इतिहासाचा एक आदर्श जगापुढे सादर केला. या पुस्तकाची मजबूत बांधणी, लिखाणाची वाचकांच्या  मनावर घेणारी मजबूत पकड, त्यातून होत जाणारे वाचकांवरील संस्कार या पुस्तकाला घरोघरी मानाचे स्थान देईल. त्यातून निश्चितच एक आदर्श माता, एक आदर्श पिता आणि अशाच  अनेक मलाला निर्माण होण्याची परंपरा सुरू राहील, कारण ही मलाला वडिलांच्या संस्कारातून, आदर्श मातेच्या ममतेतून, कुरआनच्या सत्यमार्गातून चालून आलेली आहे.
कुरआनमधील क्षमा- ‘‘माझ्याजवळ बंदूक असताना आणि माझ्यावर गोळी झाडणारा माझ्यासमोर उभा असतानाही मी त्याच्यावर गोळी झाडणार नाही.’’ ही क्षमा मलालामध्ये दिसते.  तिचे कुरआन सांगते, ‘‘एका माणसाची हत्या मानवजातीची हत्या आक्षहे.’ वडील झियाउद्दीन सतत अल्लाहला म्हणायचे, ‘‘तुझी लेक आहे. तूच आता तिला सांभाळ.’’ कुरआनच्या  आदर्शावर चालणारे हे स्वातमधील मिंगोरा गावी भाड्याच्या घरात राहाणारे गरीब कुटुंब, ज्यामधील कुटुंबप्रमुख अल्लाहवर पूर्ण विश्वास ठेवून ध्येयाकडे चालणारे. त्याच घरातील मलालाची आई, पतीची आज्ञाधारक, आदर्श पत्नी आणि म्हणून त्यांच्या पोटी मलालासारखी ‘सावित्रीची लेक’ जन्माला येऊ शकते. हा आदर्श घेण्यायोग्यतेचे हे पुस्तक आहे. याचे स्थान  पुस्तकांच्या कपटाता नाही तर वाचकांच्या हृदयात आहे, यात नवल नाही. मलाला ही गोष्ट पाकिस्तानच्या एका निसर्गरम्य पण मागासलेल्या प्रांतातील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीची  आहे. तिच्या कुरबानीची आहे. ही कुरबानी हजरत इब्राहीम (अ.) यांच्या वजनाची आहे. इस्लाम कुरबानी मागतो ते सत्यासाठी, मानवी कल्याणासाठी, जगशांतीसाठी, विश्वबंधुत्वासाठी.  इस्लामने समता, स्वातंत्र्य, सभ्यता, न्याय, लोककल्याण इत्यादींची द्वारे मानवांसाठी उघडी केली आहेत त्याचाच हा परिपाठ. त्यावर चालणाऱ्यांचीच ही गोष्ट आहे. त्यामुळे संग्रही  ठेवण्यायोग्य आणि मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे. त्याचा लाभ घेण्याची योग्यता मात्र वाचकात पाहिजे. हे पुस्तक परिणामकारक असल्याचा पुरावा म्हणजे मी लेखकांच्या आडनावाचा  उपयोग या समीक्षणात न करणे हो. युद्ध, बॉम्बस्फोट, गोळीबार, हत्या, जाळघपोळ, वाद उभा करणे, दहशत, भांडणतंटा या गोष्टी नकोशा झाल्या. लेखक बाबांचे आडनाव भांडणास  प्रवृत्त करणारे आहे म्हणून मी त्याचा उपयोगच केला नाही. ‘बाबा भांड... बाबा भांड’ असे लिहिल्यास भांडणास प्रवृत्त होऊन बाबा आपल्या समीक्षणातील चुकांना घेऊन आपल्यासोबत  भांडणार तर नाहीत ना!... ही माझ्या मनातील भीती.

पुस्तक : शांततेचे नोबेल पारितोषिक विजेती मलाला
लेखक : बाबा भांड

आजच्या या काळात आपल्या देशात पण १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा केला जातो. परंतु आम्ही ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा न करता ‘लज्जा दिवस’ साजरा करीत आहोत. कारण  ‘व्हॅलेन्टाइन डे’भारतीय संस्कृती नसून पाश्चिमात्य संस्कृती आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा करणे, टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटचा गैरवापर करणे, तोकडे कपडे घालणे, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड्स असणे हे आजच्या काळातले तरुण पिढीची फॅशन झाली आहे. परंतु याचा परिणाम काय होत आहे हेही आम्हाला माहीत आहे. देशात इतरत्र बलात्काराच्या कित्येक घटना  घडतच आहेत. एका दिवसात कित्येक बलात्कार होत आहेत. याची खात्री पण आम्हाला नाहीय. कारण कित्येक प्रकरणे रेकॉर्डवर येतात आणि कित्येक प्रकरणे रेकॉर्डवर येतच नाहीत. कित्येक मुले मुलींना लग्नाचे किंवा प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना फसवीत आहेत. मोबाइलमध्ये अश्लील क्लिप्स तयार करून मुले मुलींना ब्लॅकमेल करीत आहेत. हेच नाही तर अनेक  मुली लज्जेमुळे आत्महत्या करून आपली जीवनलीला संपवीत आहेत. अशा प्रकारे अनेक मुलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा प्रकारे ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा करणे हे वाईट मार्गाचे  चोर दरवाजे आहेत.
मुलांना समजले पाहिजे की आपले आई-वडील आपली लहानपणापासून काळजी करतात. आमच्या संगोपनासाठी कष्ट सहन करतात. आमच्या उच्चशिक्षणासाठी चांगल्या  महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळवून देतात. आमच्या शिक्षणावर आपली कष्टाची-परिश्रमाची कमाई खर्च करतात. कारण सर्वच पालकांचे स्वप्न असते की आपला पाल्य खूप  शिकावा. शिकून मोठा व्हावा. तेव्हा मुलांनी आदर्श व्यक्ती बनून आपल्या पालकांचे स्वप्न साकार करायला हवे. एखादी मुलगी आपल्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय एखाद्या  बॉयफ्रेंडबरोबर टाइमपास करते तर ही गोष्ट कोणत्याही पालकांना आवडत नाही. त्यांना दु:ख होते. अशा प्रकारे त्यांना दुखवू नये. आजच्या काळातल्या मुली तोकडे कपडे घालतात, आपल्या संस्कृतीनुसार वागत नाहीत. याविषयी पालकांनी काही सल्ला दिला तर त्यांना वाईट वाटते आणि पालकांचे म्हणणे त्या ऐकत नाहीत. पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार मोठ्या  प्रमाणात वाढला आहे. दुसरे म्हणजे टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटमुळे अश्लीलता व निर्लज्जताही खूप वाढली आहे. आम्हाला माहीत आहे की एका छोट्याशा साबनाची जाहिरात देखील  एका स्त्रीच्या तोकड्या कपड्यांतील शरीरप्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. अशा प्रकारे व्यवसायाच्या नावाखाली स्त्रीजातीचा अपमान होत आहे आणि अशा संस्कृतीमुळे जी नैतिकता  फैलावली गेली आहे त्यामुळे लग्नाला एक जुनी परंपरा ठरविले जाते तर बलात्काराला एक मनोरंजनाचा प्रकार आणि घटस्फोटाला क्षुल्लक खेळ आणि प्रेमी व्हायला स्वप्नातील स्वर्ग  समजले जात आहे. म्हणूनच ‘जीआयओ’ (गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन) ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा न करता ‘लज्जा दिवस’ साजरा करीत आहे.
 
- यास्मीन बानो
अचलपूर, मो.: ९३०९५३९६८२

समाजामध्ये एकोपा, प्रेम व शांती निर्माण करणारा उपक्रम


कल्याण (शाहजहान मगदुम)-
इस्लाम धर्मातील रूढीपरंपरांची अन्य धर्मीयांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी, या मस्जिदीत नेमके काय चालते? तसेच मस्जिद  आणि इस्लाम धर्माबाबतचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जमात-एइस्लामी- हिंदतर्फे 'मस्जिद परिचय' हा उपक्रम १० फेब्रुवारी २०१९ रविवारी राबवण्यात आला. या माध्यमातून  इस्लाम धर्म आणि मस्जिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आली.
कल्याणमध्ये १६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दूधनाक्यावरील जामा मस्जिदीत झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमेत्तर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.  सर्व समाजाला एकत्र आणतो, एकत्र घेऊन चालतो तो खरा धर्म, असे म्हटले जाते. या तत्त्वाला समोर ठेवून जमाअत- ए-इस्लामी-हिंद संस्थेच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. मस्जिद पाहण्यासाठी अन्य धर्मांचे येऊ लागताच अकील शेख, मोइन डोन, अ‍ॅड. फैसल काझी इत्यादी इस्लामी विचारवंतांनी उपस्थितांना गटागटांनी माहिती दिली.  आत प्रवेश केल्यावर हातपाय धुऊन नमाज पठणापूर्वी स्वच्छता बाळगली जाते, त्यास वुजू म्हटले जाते. त्याकरिता पाण्याचा हौद बांधण्यात आला असून नळासोबत वुजूसाठी  बैठकव्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे. पाण्याच्या हौदात मासेही सोडण्यात आलेले आहेत. मस्जिदीच्या आतल्या भागात महिरपीसमोर नमाजपठणाचे नेतृत्व केले जाते. नमाजपठण  काबाच्या दिशेने केले जाते. नमाजपठण सूर्योदयापूर्वी, दुपारी, सूर्यास्तापूर्वी, सूर्यास्तनंतर व झोपण्यापूर्वी असे पाच वेळा केले जाते. मस्जिदीमध्ये त्याच्या वेळा नमूद केलेल्या असतात.  शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मस्जिदीतील मौलाना १५ मिनिटांचे प्रवचन देतात. त्यात प्रथम अल्लाची महती विशद केली जाते. त्यानंतर, आसपासच्या समस्यांवर भर दिला जातो.  नमाजपठण सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात केले जाते. हे सगळे अन्य धर्मीयांनी या वेळी समजून घेतले.
खास औरंगाबादहून आलेले मुस्लिम धर्माचे विचारवंत प्रा. वाजिद अली खान यांच्या उपस्थितीत उपक्रमाविषयी माहिती दिली गेली. त्यांनी मस्जिद, नमाज, वुजू, शुक्रवारची नमाज तसेच  इस्लामची मूळ शिकवण आणि मरणोत्तर जीवनाविषयी आपले विचार मांडले. जमाअत- ए-इस्लामी हिंद या संस्थेतर्फे हा उपक्रम देशभरात सुरू आहे. यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, मुंब्रा,  पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात येथे हा उपक्रम घेण्यात आला. कल्याणमध्ये त्याची सुरुवात प्रथमच होत आहे.
काही विघातक प्रवृत्ती इस्लामविषयी जाणीवपूर्वक द्वेष व गैरसमज पसरवत आहेत. त्यांना मस्जिददर्शन हा उपक्रम एक प्रकारचे चोख प्रत्युत्तर आहे. मस्जिदीद्वारे अनेक सामाजिक  कामे केली जातात. त्याचा प्रचार व प्रसार केला जात नाही. ज्येष्ठ वकील फैजल काजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. वाजिद अली खान यांच्या व्याख्यानापश्चात सायंकाळचे नमाजपठण कसे केले जाते, याचेही दर्शन अन्य धर्मीयांना घडले. त्यापश्चात अन्य धर्मीयांनी खान यांना काही प्रश्न विचारले. त्याचेही समाधान खान यांनी चांगल्या प्रकारे केले. या  ‘मस्जिद परिचय' कार्यक्रमात सुमारे १२० हून अधिक मुस्लिमेत्तर बांधवांनी भाग घेतला. ९ जणांनी मुस्लिमांसोबत मगरीब या सूर्यास्तावेळीच्या सामूहिक नमाजमध्ये सामील होऊन  नमाजचा अनुभव घेतला. शेवटी आमच्या अन्य धर्मीय बंधुंनी पाठीमागे व वर गॅलरीत बसून प्रत्यक्ष सामूहिक नमाज बघण्याचा अनुभव घेतला.
प्रथमच मस्जिदीत आल्यामुळे अनेक जण भावूक झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि काहींनी स्वत:ला सावरून आपले अभिप्राय दिले. देशात स्फोटक वातावरण  असताना मस्जिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. आयोजकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत  साहित्यिक डॉ. गिरीश लटके यांनी या वेळी व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘हे माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्षण आहेत.’’ अ‍ॅडव्होकेट संकेत सरावते यांनी आपली प्रतिक्रिया देताना  म्हटले की, ‘‘मी या मस्जिदीसमोरून पाचशे वेळा गेलो असेन पण आज मला ही उत्तम संधी मिळाली.’’ राजेंद्र यांनी मुस्लिम बांधवांना विनंती केली की ‘‘निदान प्रत्येक सहा  महिन्यानंतर असा कार्यक्रम आयोजित करा. हा कार्यक्रम समाजात, एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा आहे.’’
या कार्यक्रमाला डॉ. गिरीश लटके, कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील, अनंत हलवाईचे अमृत गवळी, कोनगावचे प्रा. विनोद पाटील, अ‍ॅड. संदेश सरावते, गणेश अण्णा पाटील  माजी कोनगाव भाजपा अध्यक्ष, स्वाध्याय परिवारचे भास्कर भोईर, यांच्यासह जमात-ए-इस्लामी हिंद कल्याणचे प्रमुख मिशल चौधरी, मोईन डोन, शरफुद्दीन कर्ते, जामा मस्जिदीचे  इमाम जोहेर डोन, अ‍ॅड. फैसल काझी तसेच कोनगावमधून आलेले स्थानिक जमाअत- ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष इंतेखाब आलम, शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम, अफसर  खान, आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानवामानवांमध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम प्रतीक म्हणजे मस्जिद! अशीच भावना या वेळी  अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली.

मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाचे (कुरआन) अनुसरण करील, तो न जगात  मार्गहीन राहील ना आखीरतमध्ये (मरणोत्तर जीवनात) त्याच्या वाट्याला वंचितता येईल.’’ (हदीस - मिश्कात)
पवित्र कुरआनात पाच गोष्टी मा. अबु हुरैरा (र.) कथन करतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, पवित्र कुरआनात पाच गोष्टी आहेत. हलाल (वैध), हराम (अवैध),  मुहक्कम (मजबूत), मुतशबा (समान) आणि अमशाल (उहादरणे). तेव्हा हलाल गोष्टीस हलाल समजा, हराम गोष्टीस हराम समजा. मुहक्कम (कुरआनचा तो भाग ज्यात श्रद्धा नियम  इत्यादिची शिकवण दिली गेली आहे), त्या आचरणात आणा आणि मुकशाबा (कुरआनचा तो हिस्सा ज्यात अपरोक्षाच्या गोष्टींचे वर्णन दिले गेले आहे) वर इमान (श्रद्धा) ठेवा. (हदीस :  मिश्कात)

धर्माचे ज्ञान नाहीसे होईल
मा. जियाद बिन लबीद (र.) यांनी कथन केले आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्टीचा उल्लेख केला आणि मग म्हणाले, असे त्यावेळी होईल जेव्हा धर्माचे ज्ञान  नाहीसे होईल. तेव्हा मी म्हणालो, हे अल्लाहचे प्रेषित! ज्ञान का म्हणून नष्ट होईल. वास्तविक आम्ही कुरआन पठन करीत आहोत, आणि आपल्या मुलाबाळांना शिकवित आहोत आणि  आमची मुले आपल्या मुलाबाळांना शिकवत राहतील.
प्रेषित (स.) यांनी फर्माविले, ‘‘छान! हे जियाद! मी तुम्हाला मदीननाचा अतिशय समंजस माणूस समजत होतो! काय तुम्ही पाहात नाही की यहुदी व खिश्चन, तौरात व इंजील (हे त्यांचे धर्मग्रंथ) चे केवढे पठन करतात, पण! त्यातल्या शिकवणिंना थोडे तरी आचरणात आणतात काय?’’ (हदीस- इब्ने माजा)

आदर्श व उत्तम आचरण
माननिय आयशा (रजी.) सांगतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचणांचा आदर्श ‘दिव्य कुरआन’ होते. (म्हणजेच दिव्य कुरआनात ज्या उच्चतम नैतिकतेचा आदर्श मांडण्यात आला  आहे, प्रेषित मुहम्मद (स.) नेमक्या त्याच आदर्शाचा नमुना होते.) (हदीस - मुस्लिम)

दिव्य कुरआनचे पठण
मा. अनस (रजी.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नि:संदेह मानवापैकी काहीजण ईश्वराचे लाडके दास आहेत.’’ लोकांनी प्रश्न केला की, ‘‘हे प्रेषिता! हे  कोणते लोक आहेत? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘कुरआनवाले लोक, ईश्वरवाले आणि ईश्वराचे विशेष दास!’’ (हदीस - निसई, इब्ने माजा)

स्पष्टीकरण -
ईश्वरवाले लोक म्हणजे दिव्य कुरआनचे पठण करणारे व इतरांना शिकविणारे लोक होय.. तसेच त्याचा अर्थ समजून घेण्याचा व त्याच्या मार्गदर्शनावर आचरण करण्याचा प्रयत्न करणारे लोक होय. कुरआनसंबंधी प्रेषितांची वचने (हदीस) - माझ्या अनुयायांसाठी सर्वात तेजस्वी व अभिमानास्पद ठेवा म्हणजे पवित्र कुरआन. मुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पवित्र कुरआन. तुमच्यासाठी कुरआनकरीम सारखा ग्रंथ सोडून जात आहे. त्याप्रमाणे तुम्ही आचरण केल्यास, तुम्ही कधीही पथभ्रष्ट होणार नाही.

(३९) बरे तर या लोकांवर कोणते संकट कोसळले असते जर यांनी अल्लाह व परलोकावर श्रद्धा ठेवली असती आणि जे काही अल्लाहने दिले आहे त्यातून खर्च केले असते. जर यांनी  असे केले असते तर अल्लाहपासून यांच्या पुण्याईची स्थिती लपून राहिली नसती.
(४०) अल्लाह कोणावरही तिळमात्रसुद्धा अत्याचार करीत नाही. जर कोणी एक पुण्य केले तर अल्लाह त्याला द्विगुणित करतो व मग आपल्यातर्फे मोठा मोबदला प्रदान करतो.
(४१) मग विचार करा की तेव्हा हे लोक काय करतील जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमूहामधून एक साक्षीदार आणू आणि या लोकांवर तुम्हाला (अर्थात पैगंबर मुहम्मद-स. यांना) साक्षीदार  म्हणून उभे करू.६४
(४२) तेव्हा ते सर्वजण ज्यांनी पैगंबरांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांची अवज्ञा करीत राहिले, इच्छा करतील की पृथ्वीने तिच्या उदरात त्यांना सामावून घेतले तर किती छान! तेथे हे आपली कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपवू शकणार नाहीत.
(४३) हे श्रद्धावानांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या स्थितीत असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका६५ नमाज त्या वेळेस अदा केली पाहिजे जेव्हा तुम्हाला कळत असेल की तुम्ही काय बोलत  आहात६६ आणि याचप्रमाणे अपवित्रतेच्या स्थितीतसुद्धा६७ नमाजच्या जवळ जाऊ नका जोपर्यंत तुम्ही स्नान करीत नाही याव्यतिरिक्त की तुम्ही रस्त्याने जात असाल६८ आणि कधी  जर असे घडले की तुम्ही आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा...

६४) म्हणजे प्रत्येक युगाचा पैगंबर आपल्या युगातील लोकांवर अल्लाहच्या न्यायालयात साक्ष देईल की जीवनाचा तो सरळमार्ग आणि चिंतन व कर्माच्या सत्य मार्गाची शिकवण अल्लाहने मला दिली होती, त्या शिकवणीला मी या लोकांपर्यंत पोहचविले होते. नंतर हीच साक्ष पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या युगातील लोकांवर देतील. कुरआनने माहीत होते की  पैगंबर मुहम्मद (स.) यांचा युग त्यांना पैगंबरत्व प्राप्त् झाल्यापासून कयामतपर्यंतचा काळ आहे. (पाहा आलिइमरान, टीप ६९)
६५) हा दारूविषयीचा दुसरा आदेश आहे. पहिला आदेश सूरह २ आयत २१९ मध्ये आला आहे. त्यात फक्त हे दाखवून सोडून दिले होते की दारू वाईट गोष्ट आहे आणि अल्लाहला पसंत  नाही. यामुळे मुस्लिमांतील एक गट तेव्हापासून दारू सेवनापासून अलिप्त् राहिला होता. परंतु बहुतेक लोक त्याला पूर्वीसारखेच सेवन करीत होते. कधीकधी तर दारूच्या नशेतच  नमाजासाठी उभे राहात असत आणि काहीही बडबड करत असत. साधारण हि. स. ०४ च्या सुरवातीला हा दुसरा आदेश आला आणि नशेत नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आली.  याचा प्रभाव असा पडला की लोकांनी आपल्या दारू सेवनाच्या वेळा बदलून टाकल्या आणि अशा वेळी दारू पिणे बंद केले. याच्या काही दिवसानंतर दारूला हराम ठरविण्याचा आदेश सूरह  ५ आयत ९०-९१ द्वारा अवतरित झाला. येथे हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की आयत मध्ये `सुक्र' म्हणजे `नशा' हा शब्द आला आहे. म्हणून हा आदेश फक्त दारूसाठीच नव्हता तर  प्रत्येक नशावान सर्व वस्तूंसाठी होता आणि आताही तो आदेश जारी आहे. नशेच्या वस्तूंचा उपयोग हराम आहे. तर नशेच्या स्थितीत नमाज अदा करणे दुप्पट अपराध आणि महापाप आहे.
६६) याच कारणांसाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की एखाद्या व्यक्तीला झोपेची गुंगी येत असेल तर नमाजमध्ये तो सतत उंघत राहील, अशा वेळी त्याने नमाज सोडून  झोपी जावे. कोणी या आयतद्वारा या निर्णयाप्रत येतात की जो व्यक्ती नमाजमध्ये पठण होत असलेल्या अरबी मजकुराचा अर्थ समजत नसेल तर त्याची नमाज होत नाही. परंतु  त्यांचा हा अनुचित आणि जबरदस्तीचा तर्क आहे आणि कुरआनची शब्दरचनासुद्धा त्यास साथ देत नाही. कुरआनमध्ये `हत्तातफ़क़हु' किंवा `हत्तातफहमूमातकूलून' (येथपावेतो की तुम्ही  समजावे की तुम्ही काय करीत आहात) असे सांगितले नाही तर `हत्ता त़अलमु मा तकुलुन' (जेव्हा तुम्ही जाणावे की काय म्हणत आहात) असे सांगितले गेले आहे. म्हणजेच  नमाजमध्ये मनुष्याला इतके भान असले पाहिजे की तो आपल्या जिव्हेने (तोंडातून) काय उच्चरत आहे. असे होऊ नये की तो उभा राहिला नमाज अदा करण्यासाठी परंतु एखादी गजल  म्हणण्यास सुरु केले.
६७) मूळ शब्द आहे `जुनुबन' आणि याचा समानार्थी शब्द जनाबत आहे. जनाबतचा शब्दार्थ आहे अपरिचय. यानेच `अजनबी' शब्दाची उत्पत्ती झाली आहे. इस्लामी शरीयतच्या  परिभाषेत जनाबत म्हणजे `अपवित्रता' आहे जी स्वप्न दोषाने व वीर्यपतनाने होते. शरीयतनुसार असा व्यक्ती पवित्रतेपासून दूर होतो म्हणून अशा स्थितीला `जनाबत' म्हटले जाते.
६८) इस्लामच्या विधिज्ञांनी आणि भाष्यकारांच्या एका गटाने या आयतचा अर्थ हा काढला आहे की अपवित्रतेच्या स्थितीत मस्जिदमध्ये जाऊ नये, याशिवाय की एखाद्या कामासाठी मस्जिदमधून जाणे होते. याच मताचे अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) अनस बिन मलिक (रजि.) हसन बसरी आणि इब्राहीम नखई (रह.) इ. आहेत. दुसऱ्या गटांचे मत याने अभिप्रेत  प्रवास आहे. म्हणजे मनुष्य प्रवासात असेल आणि अपवित्र बनला तर तयमुम केले जाऊ शकते. मस्जिदमध्ये अपवित्र स्थितीत वुजू करून मस्जिदमध्ये बसणे या गटाच्या मतानुसार  योग्य आहे. हे मत माननीय अली (रजि.) इब्ने अब्बास (रजि.) आणि सईद बिन जुबेर (रजि.) आणि इतरांचे आहे. जरी याविषयी जवळजवळ सर्वांचे एकमत आहे की मनुष्य प्रवासात  असेल आणि अपवित्र झाला आणि स्नान करणे संभव नसेल तर तय्यमुम करून नमाज अदा करू शकतो. परंतु पहिला गट या विषयाला हदीसचा संदर्भ देतो तर दुसरा गट  सवलतीसाठी कुरआनच्या या आयतचा संदर्भ घेतो.

आपल्या देशातील सध्याचे वातावरण अतिशय संवेदनशील आणि सांप्रदायिकतेला खतपाणी घालणारे बनू पाहात आहे. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून देशाच्या सहिष्णुतेला  धोका निर्माण करण्याचे काम येथील काही असामाजिक तत्त्वांनी मोठ्या जोमाने सुरू केले आहे. देशात अनेक राज्यांमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली. अनेक ठिकाणी महिलांवरील बलात्कार व लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले. हिंदुत्वाच्या पाठिराख्यांचा विशिष्ट समाजाविरूद्धचा द्वेष उफाळून येऊ लागला. मुस्लिम आणि इस्लामविरूद्ध जे अभियान  गेल्या ७० वर्षांपासून सतत या संघटनांनी चालू ठेवले आहे त्याचे परिणाम उमटले नाहीत, हे मुस्लिमांच्या संयमी धोरणामुळेच. देश आणि महाराष्ट्रातील सांप्रदायिक सौहार्द अबाधिक  राखण्याच्या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेतर्फे संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमास  समाजातील विविध धर्मीयांकडून उत्तम प्रतिसादही मिळत असून त्यांना मस्जिदबरोबरच इस्लाम धर्माबद्दल सखोल माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. मस्जिद हे समाजात एकोपा  निर्माण करण्याचे उत्तम ठिकाण आहे आणि एकतेचे संरक्षणाद्वारेच ईश्वरीय लक्ष्य पूर्ण होऊ शकते.
पवित्र कुरआनमधील  तिसरा अध्याय आलिइमरानच्या आयत १०३ मध्ये ईश्वराने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्वजण मिळून अल्लाहच्या (ईश्वराच्या) दोरीस घट्ट धरून असा आणि आपसात मतभेद बाळगू नका. हाच संदेश मस्जिद परिचय या उपक्रमाद्वारे विविध मस्जिदींमध्ये अन्य धर्मीयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सध्या सर्वत्र सुरू आहे.
मस्जिदमध्ये अदा करण्यात येणाऱ्या नमाजव्यतिरिक्त या पवित्र स्थानाचे महत्त्व आणि त्याचे अनेक पैलूदेखील समजावून सांगण्यात येतात. यामध्ये सामाजिक पैलूदेखील आपणास  आढळून येतो. इस्लामी संस्कृती आणि विचारधारेनुसार मस्जिद हे उपासनेचे पवित्र स्थान आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे समाजविघातक व आक्षेपार्ह कार्य अजिबात पार पाडले जात  नाही. मस्जिद हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे. मात्र अज्ञानतेने काही मंडळी याला इस्लाममध्ये मस्जिदीला स्थान नसल्याचे निर्वाळे देतात, तर काही सामाजिक द्वेषभावना  बाळगणारे लोक मस्जिदीला दहशतवादाचे उगमस्थान म्हणतात, ही अतिशय चुकीची विचारसरणी आहे. मस्जिद हे इस्लामी संस्कृती, कला व सभ्यतेचे केंद्र असते. या ठिकाणी लोकांमध्ये एकता व सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्यांच्या सामाजिक बाबींवरदेखील चर्चा केली जाते. धार्मिक उपासना पार पाडण्यासाठी विशिष्ट स्थळाचे नियोजन असते तोच  विधी पार पाडण्यासाठी म्हणजे निर्मात्याशी संपर्क साधण्याचे ठिकाण म्हणजे मस्जिद होय. इमस्जिदमध्ये नमाज अदा करणे ही इस्लाममधील सर्वांत महत्त्वाची उपासना आहे.  नमाजमध्ये ईशदास नतमस्तक होतो (सजदा करतो) म्हणजेच ईश्वरासमोर समर्पित होतो. हीच गोष्ट कुरआनमध्ये अध्याय अन्नहल आयत ४९ मध्ये ईश्वर म्हणतो की पृथ्वी व  आकाशांत जितक्या प्रमाणात सजीव निर्मिती आहे आणि जितके दूत, सर्व अल्लाहसमोर नतमस्तक होत आहेत, ते कदापि घमंड करीत नाहीत. यावरून मस्जिदीचा अर्थ हादेखील होतो  की ते सजदा करण्याचे ठिकाण आहे. म्हणूनच मस्जिदीला धार्मिक संस्कृतीत ईश्वराचे घरसुद्धा म्हटले जाते. मस्जिदीमधील उपासनेमुळे मनुष्यास आत्मशुद्धी प्राप्त होते. ईश्वराची  निकटता प्राप्त होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा असे म्हटले आहे की ईश्वर म्हणतो की जमिनीवरील लोकांना आकाशातील तारे जसे चमकताना दिसतात त्याप्रमाणे  जमिनीवरील माझे घर म्हणजे मस्जिदी अस्मानवाल्यांना चमकताना दिसतात. एकतेचे प्रतीक असलेली मस्जिद समाजासाठी मागे उरणाऱ्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. मस्जिदीत  महिला, पुरुष, आबालवृद्धांसहित अनेक प्रकारचे लोक आणि विविध विचारांचे लोक एकत्र येतात. एक मन एका दिशेसह खांद्याला खांदा लावून नमाजसाठी रांगेत उभे राहातात.  मस्जिदीमध्ये महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येते. आपल्या देशात किंबहुना महाराष्ट्रातदेखील अशा अनेक मस्जिदी आहेत ज्यामध्ये महिलांसाठी नमाज अदा करण्याकरिता  वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मस्जिदमध्ये जाण्याने मनुष्य एकांताची भावना आणि दु:खापासून मुक्त होतो. तसेच जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन, प्रार्थनेची स्वीकारोक्ती, विश्वासाची भावना व ईश्वरावरील श्रद्धा,  सामूहिक स्वरूपात ईशयाचनेद्वारे ईशकृपेस पात्र होणे, परस्पर संपर्काद्वारे मैत्री व चांगुलपणाची भावना दृढ होते. खरे तर मस्जिदीत लोकांदरम्यान उपस्थित राहिल्याने त्यांच्याप्रती  आत्मिक व भावनात्मक लगाव निर्माण होतो. त्यामुळे मनुष्यास मानसिक समाधान आणि शांततेचा आभास होतो. एका मस्जिदीमध्ये विविध मत आणि संप्रदायाचे लोक एकत्र येणे हे त्यांच्या दरम्यान आस्था व मताच्या दृष्टिकोनातून असलेले अंतर त्यांना विभक्त करू शकत नसल्याचे द्योतक आहे. म्हणूनच की काय जमाअत-ए-इस्लामी हिंद या संघटनेने अन्य  धर्मीयांना मस्जिदमध्ये बोलावून या पवित्र स्थानाचा परिचय करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात या संघटनेला यशही लाभत आहे. त्याचबरोबर देशात व समाजात  सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी शासन करावे व विरोधी पक्षांनी विरोध करावा, अशी साधारणपणे संसदीय लोकशाहीची रचना असते. मात्र मागच्या आठवड्यात दोन   सरकारांनीच एकमेकांच्या विरूद्ध दंड थोपटून अभूतपूर्व असा घटनात्मक पेच निर्माण केेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा पेच तात्पुरता मिटला असला तरी त्याचे गांभीर्य कमी झालेले नाही. प्रत्येक पक्षांने शासन करतांना शिष्टाचार सोडू नये, हा संकेत जगात सर्वत्र पाळला जातो. काही छोटे-मोठे अपवाद वगळता गेल्या 65 वर्षे आपल्या देशातही तो पाळला गेला आहे. मात्र जशा-जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसा-तसा केंद्र आणि पश्‍चिम बंगाल सरकारमधील शिष्टाचार कमी होत असल्याचे जाणवत आहे.
    देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये स.पा. आणि ब.स.पा. यांच्यात युती झाल्यामुळे चाणाक्ष भाजपच्या लक्षात आलेले आहे की, मागच्या सारख्या तेथील 80 पैकी 72 जागा जिंकणे अशक्य आहे. तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी बंगालकडे आपली नजर वळविली. तेथे मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 16 टक्के मतं मिळाली होती. त्याच आशेवर बंगालमध्ये असलेल्या 42 लोकसभेच्या जागांपैकी अर्ध्याअधिक आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी शिष्टाचार बाजूला गुंडाळून भाजपने बंगालवर एका प्रकारची चढाईच केली आहे.
    त्यातूनच मग मागच्या आठवड्यात पश्‍चिम बंगालमध्ये सीबीआय विरूद्ध कोलकत्ता पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्या वादात आपल्या नावाच्या विरूद्ध वर्तन असणार्‍या ममता बॅनर्जी यांनी उडी घेउन शिष्टाचाराचा बोजवारा उडविण्यात आपण तुसभरही कमी नसल्याचे सिद्ध करून दाखवले. सीबीआय विरूद्ध कोलकत्ता पोलिसांच्या या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे अवघा देश ढवळून निघाला. म्हणून या घटनाक्रमाचा मागोवा घेणे अनुचित ठरणार नाही.
शारदा चीट फंड घोटाळा काय आहे?
    बंगाल, ओरिसा आणि आसाम या तीन राज्यातील 17 लाख लोकांच्या जीवनाला प्रभावित करणारा 40 हजार कोटींच्या शारदा चीटफंड घोटाळ्याची सुरूवात 2008 मध्ये झाली. यात शारदा ग्रुपने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या 34 पट रक्कम परत देण्याचे अशक्यप्राय आमिष दाखवून ठेवी जमा केल्या होत्या. यात प्रामुख्याने त्या काळी टीएमसीमध्ये केंद्रस्थानी असणारे व आता भाजपमध्ये असलेले मुकूल रॉय यांची प्रमुख भूमिका होती. मुकूल रॉय आणि खा. सुदीप बंदोपाध्याय हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळ होते. त्यामुळे शारदा चीटफंड घोटाळा होत असतांनासुद्धा ममता बॅनर्जी यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, असे मानण्यास हरकत नाही.2013 साली जेव्हा गुंतवणूकदारांनी आपला पैसा परत मागण्यास सुरूवात केली तेव्हा तो त्यांना मिळाला नाही. म्हणून राज्यभर लोकांचा उद्रेक झाला. त्यात अनेक एजंटांनी आत्महत्या केल्या. तेव्हा 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्याचा तपास करण्याचा आदेश सीबीआयला दिला. त्यात बंगाल, आसाम आणि ओरिसामधील राज्य सरकारांना निर्देश देण्यात आले होते की, त्यांनी सीबीआयला चौकशीमध्ये सहकार्य करावे.
    तत्पूर्वी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एप्रिल 2014 मध्ये ममता बॅनर्जी यांनी एका एसआयटीचे गठन केले होते. ज्याचे प्रमुख आजचे कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे होते. राजीव कुमार हे ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात. जेव्हा सीबीआयने चीटफंड घोटाळ्यामध्ये तपास करण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या तपासादरम्यान या घोटाळ्यासंबंधातील काही महत्त्वाच्या फायली गायब झालेल्या आहेत. त्यासंदर्भात जेव्हा सीबीआयने राजीव कुमार यांच्याकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजीवकुमार हे सहकार्य केले नाही. म्हणून सीबीआयकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले. ही नामुष्की सहन करूनही राजीव कुमार यांनी ममता बॅनर्जीवरील आपली निष्ठा कायम ठेवली.
    मागच्या आठवड्यात सीबीआयच्या पाच अधिकार्‍यांनी कोलकत्याला जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा बालीश प्रयत्न केला. बालीश हा शब्द यासाठी वापरतोय की कोलकतासारख्या महत्त्वाच्या शहराच्या पोलीस आयुक्ताला ताब्यात घेतांना जी संहिता पाळावी लागते ती न पाळताच सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे जावून आपला अधिकार गाजविण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल राजीवकुमार यांनीही तेवढ्याच बालिशपणे अटकेसाठी आलेल्या अधिकार्‍यांना अटक करून आपला दर्जा दाखवून दिला. या प्रकरणाचा कडेलोट तेव्हा झाला जेव्हा सीबीआय विरूद्ध कोलकत्ता पोलीस यांच्या वादात ममता बॅनर्जी यांनी उडी घेऊन मेट्रो चौकामध्ये आपल्या मंत्रीमंडळासहीत बसून उपोषण सुरू केले व तेथूनच विधानसभेेलासुद्धा संबोधित केले.
    सर्वात आश्‍चर्याची आणि अभूतपूर्व बाब अशी की, राजीव कुमार यांनीही आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा विचार न करता तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यासारखे ममतांबरोबर बसून उपोषण सुरू केले. एका पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने गणवेशामध्ये मुख्यमंत्र्याबरोबर उपोषणाला बसण्याचा भारतीय लोकशाहीमधील हा लाजीरवाणा प्रकार अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल.
    आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. हा प्रकार सीबीआयविरूद्ध कोलकता पोलीस इथपर्यंतच मर्यादित न राहता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षाचे त्याला स्वरूप प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे एक घटनात्मक पेच देशासमोर उभा राहिला आहे. यासाठी दोन्ही सरकारांच्या प्रमुखांचा आक्रास्ताळेपणा कारणीभूत आहे, अशी जनभावना देशात तयार झालेली आहे.
    जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणल्या आणि नावाजलेल्या आपल्या लोकशाहीचे असे बालिश प्रदर्शन जगासमोर मांडून या दोन्ही सरकारांच्या प्रमुखांनी आपलेच नव्हे तर देशाचे सुद्धा हसे करून घेतलेले आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालाने या संदर्भात संयमशील भूमिका घेऊन दोन्ही सरकारांना अतिशय समर्पक असे निर्देश दिले आहेत, ही समाधानाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे सीबीआयला आदेश दिला की, त्यांनी राजीव कुमार यांना अटक करू नये तर दूसरीकडे राजीव कुमार यांना आदेश दिला की, त्यांनी सीबीआयच्या चौकशीत सहकार्य करावे. मात्र या सर्व घडामोडींमधील दुर्देवाची बाब ही की, राष्ट्रीय संस्थांची जी हानी व्हायची होती ती झालीच.
सीबीआयची रचना व तिचे घटनात्मक स्थान काय आहे?
    सीबीआयचे अधिकारी देशभर अनेक ठिकाणी तपास करीत असतात. मात्र सीबीआयला असे करण्याचा घटनात्मक अधिकारच नाही,ही बाब बहुतेकांना माहीत नसावी. 8 सप्टेंबर 2013 रोजी गुहाटी उच्च न्यायालयाने रविंद्र कुमार विरूद्ध भारत सरकार या खटल्यात स्पष्ट नमूद केले आहे की, सीबीआय ही मुळातच अनधिकृत तपास संस्था आहे. न्या.इक्बाल अन्सारी यांनी जेव्हा एम.टी.एन.एल.चे कर्मचारी रविंद्रकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना सरकारी वकीलांना विचारले की, सीबीआयला तपासाचे अधिकार कोणत्या कायद्याखाली मिळालेले आहेत? तेव्हा त्यांना उत्तर देता आलेले नव्हते. म्हणून सीबीआयला घटनात्मक मान्यता नसल्याचा ऐतिहासिक निकाल त्यांनी दिला. तेव्हा साहजिकच या आदेशाविरूद्ध तेव्हाचे केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून त्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अंतिम निर्णय आजतागायत दिलेला नाही.
    महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना मुंबई पोलीस कायदा 1957 प्रमाणे जशी झाली तशी सीबीआयची स्थापना कुठल्याच कायद्यांतर्गत झालेली नाही हे सत्य आहे. 1 एप्रिल 1963 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक प्रशासकीय आदेश काढून सीबीआयची स्थापना करण्यात आली होती. हा आदेश दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट 1946 अंतर्गत काढण्यात आलेला होता. यावर राष्ट्रपतींची सही सुद्धा नव्हती. त्या आदेशांतर्गत सीबीआयचे काम आजतागायत चालू आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे या कायद्यामध्ये सुद्धा सीबीआय हा शब्द वापरण्यात आलेला नाही. म्हणूनच सीबीआयचे स्वतःचे अधिकारी नसतात. इतर राज्यातील अधिकार्‍यांना डेप्युटेशन (प्रतिनियुक्ती) वर घेऊन सीबीआयचे काम 1963 पासून आजतागायत सुरू आहे.
    याचे कारण असे की, संसदेला मुळातच तपास करणारी यंत्रणा उभी करण्याचा अधिकार नाही. कारण पोलीस हा राज्य सुचीमधील विषय आहे. ज्या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट 1946 खाली आदेश काढून सीबीआयची रचना केली आहे, त्या कायद्याचे कार्यक्षेत्र सुद्धा दिल्ली या केंद्रशासित शहरापुरतेच आहे. म्हणूनच कोणत्याही राज्यात जावून तपास करण्यापूर्वी त्या राज्याची रीतसर पूर्वपरवानगी घेणे सीबीआयवर बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर आयबीला सुद्धा कुठलीच संवैधानिक मान्यता नाही.
    राजकीय पक्षांची भूमिका
     तात्पुरत्या स्वरूपात स्थापन झालेल्या सीबीआयचा दुरूपयोग केंद्रात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने केलेला आहे. मात्र सध्या अस्तित्वात आलेल्या सरकारने जरा जास्तच केलेला आहे. म्हणून सीबीआय विरूद्ध सीबीआय आणि सीबीआय विरूद्ध कोलकत्ता पोलीस असा टोकाचा वाद सुरू झालेला आहे. अर्ध्या रात्री स्थानिक पोलिसांना सीबीआयच्या कार्यालयाचा ताबा घ्यावा लागलेला आहे.
    मुळात जेव्हा राष्ट्रीय स्तराच्या एका प्रिमीयम तपास यंत्रणेची गरज भासली तेव्हा केंद्रात अनेक वेळा पूर्ण बहुमत असलेल्या सरकारांनी राज्य सरकारांना विश्‍वासात घेउन घटना दुरूस्ती करून सीबीआयची स्थापना करायला हवी होती. मात्र तसे केले असते तर सीबीआयला घटनात्मक मान्यता मिळाली असती व तिच्या आधीन काम करणारे अधिकारी हे केंद्रातील मंत्र्यांचे बेकायदेशीर निर्देश मानण्यास तयार झाले नसते. थोडक्यात सीबीआयचा दुरूपयोग करता आला नसता. तो करता यावा म्हणूनच सीबीआयला जाणून बुजून लुळ्या पांगळ्या अवस्थेत ठेवण्याचे पाप केंद्रात आलेल्या प्रत्येक सरकारने केले आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला सीबीआय केंद्र सरकारच्या पिंजर्‍यातील पोपट असल्याचा शेरा मारावा लागला.
    खरे पाहता सीबीआय सुद्धा एक निष्पक्ष तपास यंत्रणा आहे, असे म्हणण्याला आता जागा राहिलेली नाही. म्हणून तिचा निष्पक्षपातीपणा कायम ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रहितासाठी एकत्र येउन सीबीआयची पुनर्रचना करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आता दोन महिन्यावर निवडणुका आलेल्या असल्याने या सरकारकडून असे घडणे अशक्य आहे. आतापावेतो झालेला तमाशा लक्षात घेउन पुढे येणार्‍या सरकारने तरी किमान सीबीआयला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा.
    मोदींची भ्रष्टाचार विरूद्ध लढण्याची मानसिकता?
    जेवढ्या ताकदीने केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शारदा चीटफंड घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, त्यावरून असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की केंद्र सरकार भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढण्यासाठी कटिबद्ध आहे. वास्तविकता याच्या विरूद्ध आहे. मोदींनी 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ’न खाऊंगा न खाने दूंगा’ अशी हिंदी चित्रपटात शोभेल अशी घोषणा दिली होती. त्यासाठी त्यांनी तीन आश्‍वासने दिली होती. 1. लोकपाल नियुक्त करणार. 2. भ्रष्ट नेत्यांना तुरूंगात पाठविण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करणार 3. पक्षांच्या निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कायदा करणार ही तीन आश्‍वासने होत. वाचकांना एव्हाना कळून चुकलेले आहे की, यातील एकही आश्‍वासन मोदींनी पाळलेले नाही. म्हणून चीटफंड घोटाळ्याआडून बंगालमध्ये आपली पाळेमुळे रूजविण्यासाठी हा सगळा द्राविडी प्राणायम भाजपकडून केला जात आहे, असे माणण्यास वाव आहे.

- एम.आय.शेख
8459538348

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
इस्लामी दृष्टिकोनानुसार समाजात कोणीही व्यक्ती अविवाहित राहू नये, विवाहामधे साधेपणा असायला हवे, प्रेषित ह़जरत मुहम्मद (स.) यांच्या वेळेस त्यांचे अतिप्रिय सोबती ह़जरत  अब्दुल रहमान विन औ़फ ऱिज यांनी आपला विवाह खूप साध्या पद्धतीने केला होता, या विवाहात त्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांनासुद्धा आमंत्रित केले नव्हते. मुहम्मद (स.) यांनी  स्वत: आपले आणि आपल्या मुलींचे लग्न खूपच साध्या पद्धतीने केले, असे विचार जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूर पश्चिम महिला विभागाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी  मोहिमेअंतर्गत ‘निकाह आसान करो’च्या ‘ओपन डिस्कशन’मधे ज़ेबा खान यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम पश्चिम नागपूर स्थित वेलकम सोसायटीच्या इकरा ग्राउंड येथे आयोजित  करण्यात आलेला होता.
त्यांनी सांगितले की आज समाजात खूप वायफळ खर्च आणि रुढीपरंपरानी विवाह संपन्न केले जात आहेत. श्रीमंत लोक आपल्या मुलींच्या लग्नात खूप जास्त पैसा खर्च करतात. गरीब  लोक हे दृश्य पाहून अशा प्रकारचे लग्न करण्यास कर्ज घेऊन मुलींचे लग्न करतात. श्रीमंत लोकांनी आपल्या लग्न समारंभात साधेपणा आणायला पाहिजे जेणेकरून समाजात असे  उदाहरण तयार होईल की गरीब लोक कर्ज घेण्यापासून वाचतील.
विवाहच्या रितीरिवाज ‘विदअत’मधे सामील होतात आणि ‘विदअत’ हा भटकण्याचा मार्ग आहे. महिला विभागच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी राज्यव्यापी ‘निकाह आसान  करो’च्या संबंधात राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मोहीमबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की विवाहाच्या बाबतीत लोक चिंतीत आहेत आणि त्याच्या समाधानाचे प्रयत्न  करीत आहेत. पॅनल डिस्कशनमधे सरळसोप्या लग्नाची पद्धत समोर आली. यामध्ये स़िफया खान, इऱफाना कुलसुम, ज़ेबा खान, रोमा खान, साजिदा परवीन, सादिया खान व अस़िफया  इऱफान यांनी भाग घेतला. ज्यांनी शरियतनुसार साधारण विवाह केला होता त्यांचा सत्कार करण्यात आला. या सेशनमधे ४५ वर्षीय पीएचडी अस़िफया इऱफान यांनी आपल्या साध्या  विवाहाची महत्ता आणि सफलता यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात सानिया फ़ातेमा यांनी नात पठण केले. सूत्रसंचालन साजिदा परवीन व आभारप्रदर्शन सुमय्या शे़ख यांनी केले.  कुरआन पठण अ़जरा परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुली उपस्थित होत्या.

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
वर्तमान लग्न समारंभात होणारे निरर्थक खर्च आणि हुंडा या चलनाने मुलीच्या नातलगांवर मानसिक आणि आर्थिक ओझे वाढले आहे. या कारणाने वैवाहिक संबंध अडचणीत येऊन  मुलीचे आईवडील जास्तच चिंता करण्यास विवश होतात. समाजात वाढत असलेल्या अशा कुरीतींविरुद्ध आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. विवाह अशा प्रकारे सोपा करायला पाहिजे  जसा प्रेषित मुहम्मद स.अ.व. च्या काळात होत होता, असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी  अविष्कार कॉलनीतील संघटनेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. त्यांनी सांगितले की जो पैसा आम्ही लग्न  आणि हुंडा यावर खर्च करतो, त्याला मुलींचे शिक्षण  आणि त्यांचे भविष्य सुधारण्यास खर्च करायला हवा.
विवाहच्या नावावर आज मुस्लिम समाजामधे ज्या काही रीति परंपरा अवलंबिल्या जातात, त्या इस्लामी नाहीत. आम्हाला वायफळ खर्च न करता या पैशाला गरजू लोकांची मदत करण्यास उपयोग केला पाहिजे. त्यांनी सांगितले की विवाहासारखे पवित्र संबंध सोपे बनवून लग्न वेळेवर होऊ शकते, तरूण पिढीला रेप (सर्व प्रकारचे लैंगिक शोषण) सारख्या  पापांपासून स्वत:ला वाचवू शकतो.
त्यांनी सांगितले की जमा़अत ए इस्लामी हिंद समाजातून अशा प्रकारची दुष्कृत्ये संपविण्यासाठी प्रयत्न करत असते. ज़ेबा ख़ान यांनी प्रश्नांची योग्य व समाधानकारक उत्तरे दिली.  सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये अ़फरो़ज अंजुम, फ़िरदौस खान, तुबा समरीन यांना बक्षीस देण्यात आले.
चिल्ड्रन सर्कलच्या बालकांनी 'शरई निकाह'वर नाटक प्रस्तुत केले.
‘तुटत असणारे नाते, विखुरलेले कुटुंब, त्याचे कारण आणि समाधान’ यावर पीपीटीद्वारे ‘प्री मॅरेज काउन्सिलिंग वर्कशॉप’मध्ये ओसीडब्लूच्या सीनियर मॅनेजर फ़रहत क़ुरैशी यांनी  विवाहाच्या सफलतेचे रहस्य सांगितले. त्यांनी सांगितले की अनेक कामे, जबाबदारीचे ओझे, राग, बॉडी लँग्वेज, फिल्मी स्टाईलचे अनुकरण, आपसातील मतभेद अशा साध्या गोष्टीची  तक्रार वैवाहिक जीवनावर संकटे उभी करतात. इस्लामी शिक्षणाच्या अनुपालनासोबत परस्पर वार्तालाप, ऐकणे -समजण्याची योग्य क्षमता ठेवून कुठल्याही वैवाहिक समस्येचे समाधान  निघू शकते. वैवाहिक जीवनाच्या सफलतेकरिता नातलग लोकांनी सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करावे. यानंतर इ़र्फाना कुलसुम यांनी सुखी परिवारच्या इस्लामी व्हॅल्यूवर प्रकाश टाकला.
हा कार्यक्रम जा़फरनगरच्या मर्क़जे इस्लामी सभागृहामधे आयोजित करण्यात आला होता. याची प्रस्तावना बुशरा जावेद यांनी केली. कार्यक्रमाच्या समाप्तीवर ओसीडब्ल्यू आणि  महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या हितार्थ येणाऱ्या उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा एक-एक थेंब वाचविला पाहिजे, याबाबत उपस्थितांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमात कुरआन  पठण राहिल परवीन, आयशा कुरैशी यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़िरदौस अंजुम, सुमैया शे़ख यांनी केले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हंगामी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा गाजरमुखी ठरेल याची प्रचिती नुकतीच आली. तीन निवडणुकांतील  पराभवानंतर आणि दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या तोंडावर निवडणुकोत्तर परिस्थितीत आव्हान राखण्यासाठी काही तरी लोकप्रिय असे सरकारला करावेच लागणार हे  उघड दिसत होते. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही प्राप्तीकर लागणार नसल्याची घोषणा नोकरदारांना आनंद देणारी आहे. त्याच वेळी आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनी स्वत:स गरीब मानून आरक्षणाचा फायदा घ्यायचा. मागील अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ४० हजारांवरून ५० हजार केली.  नोटाबंदीचा फटका बसल्यानंतर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांचा वाढता रोष अजून काही कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना संतुष्ट  करण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असल्याचे दिसते. व्यापारी, उद्योगांना बळ देण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला कितपत प्रतिसाद मिळतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट  होईल.
त्याचबरोबर घरांची विक्री वाढून बांधकाम व्यवसायाला चालना देण्याबरोबरच मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजारांच्या मदतीबरोबरच आणि  कामगारांसाठी घोषणा केल्या आहेत. रोजगाराची हमी नसलेल्या असंघटित क्षेत्रातील प्लंबर, मोलकरणी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील कामगारांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन  मिळणार आहे. जनतेला एकीकडे संभ्रमात टाकून दुसरीकडे त्यांना भुलवणाऱ्या आकड्यांच्या स्वरुपात सादर करण्याची संधी मोदी सरकार घेणार होते यात शंका नव्हती.
निवडणुकीच्या तोंडावर इतके बदल करणारा अर्थसंकल्प मांडणारे सरकार आज देशाने पाहिले. अशा अविचारी योजनेचा राजकीय बाजूने विचार केल्यास अनिश्चितताच दिसून येते. या  देशात अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या शेतावर राबणारे लाखो कष्टकरी, मजूर आहेत. या देशात महानगरे, बड्या-छोट्या शहरातील विविध उद्योगात काम करणारे लाखो गरीब असे आहेत  की ज्यांना रोजगाराची हमी नाही, या घटकांचा सरकारला विसर पडला असे समजायचे का? मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारची धोरणे भांडवलदार धार्जिणी व शेतकरीविरोधी  आहेत यावर देशातले राजकारण तापत चालले होते आणि त्याचा फटका भाजपला तीन राज्यात बसला. नोटबंदीचा परिणाम गृहनिर्माण उद्योगापासून मध्यमवर्गाच्या बचतीपर्यंत  पोहोचल्याने या वर्गाचा रोष पत्करून निवडणुकांना सामोरे जाणे भाजपला परवडणारे नव्हते. पाच वर्षापूर्वी महागाई, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, काळा पैसा, घराच्या वाढत्या  किंमती या मुद्यावर देशाचे राजकारण भाजपने ढवळून काढले होते. आता त्याच मुद्यांवर भाजपची पंचाईत झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सत्तेवर आल्यास गरीबांना किमान  वेतन देण्याचा मनोदय जाहीर केल्यापासून भाजपपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण सर्वांचेच तारणहार असल्याचे त्यांनी दाखवून दिले असले तरी जनतेला खुशीची गाजरे दाखवत असतानाच नव्या सरकारपुढे त्यांनी अनेक आर्थिक अडचणी निर्माण केल्या आहेत. अर्थसंकल्प म्हणजे विचार न करता घोषणांची बरसात  असे सोपे समीकरण भाजपने करून ठेवले आहे. देशात गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचे प्रमाण २०१७- २०१८ या वर्षामध्ये सर्वाधिक होते, असे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) अहवालात नमूद असल्याचे समजते. म्हणजेच मोदी सरकार रोजगार निर्मितीच्या आघाडीवर अपयशी ठरली आहे, असे म्हणावे लागते. असे असेल तर सरकारने जाहीर केलेले सवर्ण  आरक्षण आणि इतर निर्णय कोणाला लाभदायक ठरणार, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे. नोकऱ्याच नसतील तर आरक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही हे उघड आहे. या  पार्श्वभूमीवर, देशातील रोजगाराचे चित्र समाधानकारक असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात येत असली, तरी दुर्दैवाने आकडेवारी तसे काही सांगत नाही. म्हणूनच सरकारने याबाबतचे  वास्तव देशासमोर मांडायला हवे होते. दरवर्षी किमान दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण केला  याची माहिती समोर येणे गरजेचेच आहे. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय नोकरदार, व्यापारी, नवउद्योजक अशा सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न हंगामी अर्थसंकल्पातून करण्यात  आलेला असला तरी त्यांची ही खुशी मतांमध्ये कितपत रुपांतरित होते यावरच सत्तेचे गणित जुळविताना मोदी सरकारचे दुसरे पर्व अवलंबून असेल. हा अर्थसंकल्प कमी पण भाजपची  लोकसभा निवडणुकीनंतरची सत्तालोलुपताच दिसून आली. त्यात कोणतीही कल्पक अर्थशास्त्रीय मांडणी नव्हती, देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणाऱ्या, लोकांचे उत्पन्न वाढेल अशा  योजना नव्हत्या. महसूल अधिकाधिक गोळा कसा होईल याचाही साधा विचार नव्हता. ज्या घोषणा होत्या, त्या भूलभुलय्या निर्माण करणाऱ्या. देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात  रोजगार निर्माण करणाऱ्या संधींची गरज आहे, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे भान अर्थमंत्री या अर्थसंकल्पातून दाखवू शकले नाहीत. 

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

माननिय अब्दुल्लाह इब्ने अब्बास (रजी.) कथन करतात की, इस्लामचे अंतीम प्रेषित हजरत मुहम्दम (स.) यांनी सांगितले आहे की,  ‘‘जेव्हा एखाद्या समाज वा वस्तीमध्ये व्यभिचार आणि व्याजखोरी स्पष्टपणे व उघडरित्या बळावते, तेव्हा असे समजावे की लोकांनी  स्वत:ला ईश्वराच्या कोपास जाहिरपणे आमंत्रित केले. (हाकीम; तरगीब व तरहीब)
व्याज खाणाऱ्याची निर्भत्सना
माननिय अब्दुल्ला बिन मसअुद (रजी.) द्वारे उल्लेखित आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली व्याज खाणाऱ्याची,  व्याज खाऊ घालणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साथीदारांची आणि व्याज लिहिणाऱ्याची. (बुखारी, मुस्लीम) भावार्थ- प्रेषित ह. मुहम्मद (स.)  ज्या गोष्टीमुळे धिक्कार करतात, तो अपराध किती मोठा अपराध असेल, याचा अर्थ असा होतो की, कयामतच्या (प्रलय काळी)  प्रेषित (स.) अशा लोकांकरीता (जर ते तौबा, क्षमा-याचना) न करता मरतील, अल्लाहजवळ शिफारस नव्हे तर त्यांचा धि:कार  करतील.(निसई)

कर्जदारांस संधी द्या
व्याजाची निषिद्धता व त्याबद्दलची कायदेशीर मनाई
ह. मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी अत्यंत कडक शब्दात स्पष्ट केली आहे. ‘‘अज्ञान काळातील व्याज रद्द केले गेले आहे. सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबियातील अब्बास इब्ने अब्दुल मुत्तलिब यांचे व्याज पूर्णपणे रद्द करीत आहे. (मुस्लिम : किताबुल हज)

कर्जदारांशी नरमीचा व्यवहार
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे, नंतर आपल्या कारकुनास कर्जवसूली करण्यास पाठवित असे. आणि त्याला ताकीद देत असे की, जर  तू एखाद्या तंगीत असलेल्या कर्जदाराजवळ पोहोचशील तर त्याला माफ कर. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘हा मनुष्य जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहशी भेटला, तेव्हा अल्लाहने  त्याच्याशी माफीचा व्यवहार केला. माननीय अबु. कतादा (रजी.) कथन करतात की, ‘‘मी आदरणीय प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की, ‘‘ज्या माणसाला वाटत  असेल की, कयामतच्या (प्रलय काळाच्या) दिवशी, शोक, दु:ख आणि पश्चात्तापापासून त्यास मुक्ती मिळावी, तर त्याने गरीब कर्जदारास सवलत द्यावी किंवा माफ करावे.’’ (मुस्लिम)

सात ‘महापाप’
मा. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, सात महापापापासून स्वत:ला वाचवा. ही सात महापाप -
१) कोणालाही ईश्वराचा भागीदार ठरविणे,
२) जादू करणे,
३) कोणाला हकनाक ठार मारणे.
४) व्याज खाणे,
५) अनाथांची संपत्ती हडपणे
६) जिहादच्या वेळी पळ काढणे आणि
७) शीलवंत स्त्रियांवर व्यभिचाराचे आळ घेणे.
(बुखारी, मुस्लिम)

(३५) आणि जर तुम्हाला पतीपत्नीचे संबंध बिघडण्याचे भय असेल तर एक पंच पुरुषाच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा, ते दोघे,६० सुधारणा करू  इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्या मध्ये समेटाचा मार्ग काढील, अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.६१
(३६) आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची बंदगी (भक्ती) करा, त्याच्यासमवेत कोणाला भागीदार बनवू नका, आईवडिलांशी नेक वर्तणूक ठेवा, नातेवाईक आणि अनाथ व गोरगरीबांशी  चांगला व्यवहार करा आणि आप्तशेजारी, अनोळखी शेजारी, तोंडओळख असणारा साथीदार६२ व वाटसरू, आणि त्या दासी व दास जे तुमच्या ताब्यात असतील, त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा, विश्वास ठेवा की अल्लाह एखाद्या अशा व्यक्तीला पसंत करत नाही जी आपल्या अहंभावात गर्विष्ठ असते व आपल्या मोठेपणावर अभिमान करीत असते.
(३७) आणि असे लोकदेखील अल्लाहला पसंत नाहीत जे कंजूषपणा करतात आणि दुसऱ्यांनासुद्धा कंजूषपणाचा आदेश देतात व जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यास  ते लपवितात.६३ अशा कृतघ्न अश्रद्धावंत लोकांकरिता आम्ही नामुष्की आणणारी शिक्षा तयार ठेवली आहे.
(३८) आणि ते लोकदेखील अल्लाहला नापसंत आहेत जे आपली संपत्ती लोकांना केवळ दाखविण्यासाठी खर्च करतात आणि खरे पाहता ते अल्लाहवरही ईमान बाळगत नाहीत अथवा  परलोकवरदेखील. सत्य असे आहे की शैतान ज्याचा मित्र झाला त्याला अत्यंत वाईट मैत्री मिळाली.




६०) दोघांशी तात्पर्य मध्यस्थ (हकम) आहे आणि पती पत्नीसुद्धा आहेत. प्रत्येक भांडणात समझोता होणे शक्य आहे मात्र अट आहे की दोघांनी समेट घडवून आणण्याची इच्छा बाळगावी  आणि मध्यस्थांनासुद्धा समेट घडवून आणण्याची इच्छा असावी.
६१) या आयतीत आदेश दिला गेला आहे की जेव्हा पती-पत्नी मध्ये भांडण होते तेथे संघर्ष शिगेला न पोहचता किंवा न्यायालयात जाण्यापूर्वी घरातल्याघरात सुधार केला जावा. यासाठी  उपाय आहे की पती आणि पत्नीकडून प्रत्येकाच्या परिवारातील एक एक मनुष्य या उद्देशासाठी नियुक्त केला जावा. दोन्ही मिळून मतभेदाची चौकशी करावी आणि उपाय सुचवावा. या  पंच किंवा मध्यस्थांची नियुक्ती करणारा कोण आहे? यास अल्लाहने अस्पष्ट ठेवले आहे. जर पती-पत्नी दोघांनी इच्छिले तर आपल्या घरातील एक एक मनुष्य पंच म्हणून ठेवावा  किंवा बुजुर्ग मंडळीनी ठरवावे. जर मामला न्यायालयात गेला तर न्यायालयाने पुढील कारवायी करण्यापूर्वी पारिवारिक पंच नेमून समेट घडवून आणावा. पंचाचे अधिकार काय असावेत  याविषयी मतभेद आहेत. काहींच्या मते मध्यस्थांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही परंतु प्रश्न सोडविण्यासाठीचा उचित उपाय ते सुचवू शकतात. मान्य करणे अथवा अमान्य करणे  पती-पत्नीचा अधिकार आहे. जर पती-पत्नीने त्यांना तलाक, खुलाअ किंवा इतर मामल्याचा निर्णय देण्यासाठी आपला वकील नेमले असेल तर अशा स्थितीत त्यांचा निर्णय मान्य करणे  दोघांवर बंधनकारक आहे. हे मत हनफी आणि शाफई विद्वानांचे आहे. दुसऱ्या प्रकारच्या विद्वानांजवळ पंचाना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु वितुष्ट निर्माण करण्याचा निर्णय  घेण्याचा त्यांना अधिकार नाही; हे मत हसन बसरी व कतादा इ.चे आहे. काहींना वाटते की पती-पत्नींना विलग करणे किंवा त्यांच्यात समेट करणे दोन्ही अधिकार पंचाना आहेत.  माननीय इब्ने अब्बास (रजि.), सईद बिन जुबेर, शाबी, इब्राहीम नखई, मुहम्मद बिन सीरीन इ.चे हे मत आहे. माननीय उस्मान (रजि.) आणि अली (रजि.) यांच्या निर्णयाविषयी जे  काही आमच्यापर्यंत पोहोचले आहे, त्यावरून माहीत होते की न्यायालयाकडून पंचांना याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार देत होते. माननीय अकील बिन तालिब आणि त्यांची पत्नी फातिमा बिंते उतबांचा दावा जेव्हा माननीय उस्मान (रजि.) यांच्या न्यायालयात दाखल झाला तेव्हा त्यांनी पतीकडून एक पंच माननीय इब्ने अब्बास (रजि.) आणि पत्नीकडून माननीय  मुआविया बिन अबी सुफयान (रजि.) पंच नियुक्त केले. त्या पंचाना सूचित केले की आपल्या मतानुसार दोघात फूट करणे योग्य वाटत असेल तर अलग होण्याचा निर्णय द्यावा. याचप्रकारे एका दाव्यात माननीय अली (रजि.) यांनी पंच नियुक्त केले आणि त्यांना समेट करण्याचा व न करण्याचा अधिकार दिला. यावरून माहीत होते की पंच न्यायालयीन अधिकार  ठेवू शकत नाही. जर न्यायालयाने त्यांना तसा अधिकार दिला तर अशा स्थितीत पंचाचा निर्णय वैधानिक निर्णय ठरतो.
६२) अरबीमध्ये `अस्साहिब बिल जंबी' आहे. म्हणजे नेहमी बरोबरीने उठणारा बसणारा मित्र आहे आणि असा मनुष्यसुद्धा ज्याच्याशी कधी सहवास घडावा. उदा. आपण बाजारात  जाताना एखाद्याने तुमच्याबरोबरीने सोबत चालावे तसेच एखाद्या दुकानावर तुम्ही माल खरेदी करत आहात आणि त्यावेळी दुसरा खरेदीदार तुमच्यासोबत बसलेला आहे. किंवा प्रवासात  कोणी मनुष्य आपला साथी (सहप्रवासी) असेल. हा क्षणिक संबंधसुद्धा प्रत्येक सभ्य आणि सज्जन व्यक्तीवर एक अधिकार निश्चित करतो. अपेक्षा असते की त्याने यथासंभव त्या  साथीदारबरोबर चांगला व्यवहार करावा आणि त्याला त्रास देण्यापासून वाचावे.
६३) अल्लाहच्या कृपेला लपविणे म्हणजे मनुष्याने असे राहावे की अल्लाहने त्याच्यावर कृपा केली नाही. जसे कोणाला अल्लाह धनसंपत्ती देतो आणि तो आपल्या योग्यतेपेक्षा कमी  दर्जाचे राहाणीमान ठेवत असतो आणि स्वत: वर आणि आपल्या मुलाबाळांवर खर्च करीत नाही. अल्लाहच्या दासांना मदत करीत नाही की चांगल्या कामात भाग घेत नाही. लोकांनी  पाहिल्यावर समजावे की बेचारा गरीब आहे त्रस्त आहे. ही अल्लाहची घोर कृतघ्नता आहे. हदीसकथन आहे, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``अल्लाह जेव्हा एखाद्या दासाला  संपत्ती देतो व त्याच्यावर कृपा करतो तेव्हा अल्लाह पसंत करतो की याचा (समृद्धी) प्रभाव दासावर प्रकट व्हावा.'' म्हणजेच त्याचे खाणे पिणे, राहणीमान, कपडेलत्ते, घर आणि  त्याच्या व्यवहारातून तसेच प्रत्येक गोष्टीत अल्लाहने दिलेली संपत्ती प्रकट व्हावी.

स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय ही भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे भगवान बुद्धांशी निगडित असली तरी बुद्धानंतर पैगंबर येशू ख्रिस्तांनी आणि त्यांच्या पश्‍चात पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी घडविलेल्या महान क्रांतीची मूलतत्वे देखील हीच आहेत. मध्ययुगीन काळात भारतात अठरापगड जातीच्या संतांची परंपरा जी एकाएकी उदयास आली तिच्या मागेदेखील तत्कालीन मुस्लिम राजवटीचा आधार होताच. अन्यथा जेथे देवाचे नाव घेण्याचाही अधिकार नव्हता तेथे ’संत’ होण्याचा काय प्रश्‍न?
    संत तुकाराम महाराजांनी तत्कालीन सामाजिक ज्वलंत समस्यांविरूद्ध बंड पुकारले. ते आपल्या किर्तनातून आणि प्रबोधनातून समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा आणि नीतिचा संदेश देऊ लागले. अंधश्रद्धांविरूद्ध प्रखर भूमिका घेऊ लागले. सकल चराचर सृष्टीचा निर्माता अर्थात ईश्‍वर एकच असल्याचे ठामपणे सांगू लागले. उदा.
‘आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे, वीण जीवा सुख नव्हे’, का रे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसीतो जगासी एकला तो.’ इ.त्यांच्या अभंगातील चरणे प्रमाण आहेत, आपल्या काही अभंगांतून तुकोबांनी अनेक वेळा प्रत्यक्ष ’अल्लाह’ या शब्दाचा उल्लेख केलेलाही आढळतो. उदा. ’अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे’ अल्ला बगर नहीं कोये अल्ला करे सो ही होये..’
    एकेश्‍वरवादाबरोबरच तुकोबांनी समता आणि बंधुत्वाचे जोरदार समर्थन केले आहे. उदा.
‘अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्नभिन्न’ ’भेदाभेद भ्रम अमंगल’ ‘कायबा करीशी सोवळे ओवळे’ मन नाही निर्मळ वाऊगेची. समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान असल्यामुळे सर्व आपापसात बंधूभगिनी व समान आहेत. ही इस्लामची भूमिका संत तुकाराम महाराज अभंगातून मांडतात.
“ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनि म्हणती साधू
अंगा लावुनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप”
    असे अनेक अभंग तुकोबांच्या अंधश्रद्धा विरोधी भूमिकेची आणि माणसाला विचार, चिकित्सा, समीक्षा करण्यावर प्रवृत्त करण्याची साक्ष देतात. दिव्य कुरआनात अनेक ठिकाणी या आयाती आढळतात. ’अफलाताकेलून’, ’तुम्हाला अक्कल नाही काय?’
    ’अफला तुलसीरून’, तुम्हाला डोळे नाहीत काय? ’अफला तदब्बरून’ तुम्ही विचार, चिंतन का करत नाही?
    अशाप्रकारे तुकोबा आणि इस्लाम मानवी आचारविचारांच्या स्वातंत्र्याचे समर्थन करतात. मृत्यू अटळ आहे आणि माणसाला आपल्या बर्‍यावाईट कर्माची फळे मृत्यूपश्‍चात भोगावीच लागतील. हा ’आखिरत’चा इस्लामी संदेश तुकोबांच्या गाथेत अनेक अभंगांतून प्रत्ययास येतो. उदा.
’कठिण हे दुःख यम जाचतील, कोण सोडवील तसे ठायी’, राहतील दूर सज्जन सोयरी, आठवे श्रीहरी लवलाही” ’ मायबाप सवे न ये धनवित्त करावे संचित भोगावे ते.’
    अर्थात प्रत्येक माणसाला मृत्यू पश्‍चात ईश्‍वरासमोर आपल्या तमाम कर्माचा जाब द्यावा लागेल आणि ज्याचे जसे कर्म असेल तसाच त्याला मोबदला भेटेल. या बाबतीत तुकोबा आणि इस्लामच्या शिकवणीत जबरदस्त साम्य आहे.
    इस्लामी उपासनेची संकल्पना जीवनव्यापी आहे. जीवनातील प्रत्येक काम उपासना आहे. मात्र ते अल्लाहच्या आज्ञेनुसार असावे. संसार करणे, कमावणे, मुलाबाळांचे संगोपन करणे, समाजसेवा, राजकारण इ. सर्व उपासना, भक्ती, इबादतच आहे. मात्र ते ईश आदेशानुरूप केले तर.
    तुकोबांनासुद्धा भक्तीची हीच व्यापक व्याख्या अभिप्रेत आहे. असे त्यांच्या अनेक अभंगातून स्पष्ट होते. उदा. ’जोडोनिया धन उत्तमची व्यवहारे, उदास विचारे वेच करी,’ जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
    माता पित्यांच्या सेवेची कुरआन आणि पैगंबरांनी सक्त ताकीद केली आहे. ’आईच्या चरणांखाली स्वर्ग आहे’ असे पैगंबर (सल्ल.) म्हणतात तर तुकोबा म्हणतात, ‘माय बापे केवळ काशी, तेणे नवजावे तीर्थासी’ तुकोबांनी आपल्या प्रबोधन कार्याची सुरूवात वडिलोपार्जित सावकारकीची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवून केली. त्यांनी कर्जदारांना व्याजही माफ केले आणि मुद्दलही सोडून दिले. इस्लाममध्ये व्याज घेण्या- देण्याला हराम (निषिद्ध) म्हटले आहे हे जगजाहीर आहे.
    उपरोक्त संक्षिप्त विवरणावरून स्पष्ट होते की, तुकोबा महाराजांची शिकवण आणि इस्लाममध्ये जबरदस्त साम्य आहे. ही बाब आणखी भक्कम करणारा इतिहास आहे. तो हा की तत्कालीन सूफी संत हजरत अनगढशाह फकीर (रहे.) आणि संत तुकाराम महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. अर्थात वैचारिक देवाणघेवाण ही होती. अनगढशाह फकीर (रहे.) तुकोबांना भेटण्यासाठी पुण्याहून देहूला जात असत. या दोन महापुरूषांची प्रथम भेट जेथे झाली ते ठिकाण देहूपासून पुण्याकडे साधारणतः एक कि.मी. अंतरावर आहे. आजही तेथे अनगढशाह बाबांचे ठाणे (अस्ताना) आहे आणि तुकोबांची पालखी पंढरपूरला प्रयाण करते तेव्हा प्रथम अनगढशाह बाबांच्या ठाण्यावर सलामीसाठी थांबते. तद्वतच अनगढशाह बाबांच्या रास्ता पेठ, पुणे स्थित खानकाह (मठ) मध्ये तुकोबांची किर्तने होत असत. छत्रपती शिवाजी महाराजही येथे किर्तन ऐकण्यासाठी येत असत. तुकोबांच्या कीर्तनाचे जे चित्र आज उपलब्ध आहे त्यात तुकोबा महाराज कीर्तन करताना दिसतात तर श्रोत्यांमध्ये अनगढशाह बाबा व शिवाजी महाराज शेजारी बसून अत्यंत तन्मयतेने कीर्तन श्रवण करताना दिसतात. हजरत अनगढशाह बाबा आणि तुकोबांची ही मैत्री आजही अबाधित आहे.
    अद्यापही दरवर्षी देहूहून पंढरपूरला जाणारी तुकोबांची पालखी पहिला मुक्काम पुण्यामध्ये रास्ता पेठेत अनगढशाह बाबांच्या दर्ग्याच्या प्रांगणात करते. अनगढशाह फकीर बाबांना सलामी देऊन तुकोबांची दिंडी पंढरपूरकडे प्रयाण करते.
    हेच प्रेम, हीच सद्भावना, हाच एकोप्याचा वारसा जोपासण्याची आज देशाला आणि महाराष्ट्राला नितांत गरज आहे. इतिहासकारांनी यासंबंधी संशोधन करून हा माणसे जोडणारा इतिहास समाजासमोर आणणे अत्यंत गरजेचे आहे.

 - डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, अहमदनगर

उर्दू टाईम्सच्या 30 जानेवारीच्या अंकात प्रकाशित एका वार्तांकनामध्ये म्हटलेले आहे की, भाजपचा प्रत्येक नेता काँग्रेसच्या मागे हाथ धुवून लागलेला आहे. राहूल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनाही टिकेचे लक्ष करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे की, प्रियंका दिसायला सुंदर आहेत, परंतू सुंदर चेहर्‍याकडे पाहून लोक मतं देत नाहीत. स्त्री सौंदर्याबद्दल केलेले हे आक्षेपार्ह विधान हवेत विरते न विरते तोच भाजपा अध्यक्ष अमित शहांनी म्हटले की, गांधी परिवाराला टू जी नंतर थ्री जी, यांनी मोठमोठे घोटाळे केले. आता काँग्रेस थ्री जी मध्ये परावर्तीत झालेला आहे. त्यांचा निशाना प्रियंका गांधीवर होता. त्यांनी मोबाईल सवेमध्ये उपयोगात आणलेल्या जी या शब्दाशी केली व पुढे स्पष्ट केले की, टू जी आणि थ्री जीला जनता विसरली असून, आता फोर जी चा जमाना आलेला आहे, असे म्हणून आपली पातळी दाखवून दिली.
    31 फेब्रुवारी रोजी इन्क्लाब या वर्तमानपत्रात कर्नाटकमधील घोडेबाजारावर टिप्पणी करण्यात आलेली असून, त्यात म्हटलेले आहे की, कर्नाटकाचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्या काँग्रेस आणि जनता दल एस चे समन्वयक सिद्धरामय्या यांनी रविवारी म्हटले आहे की, मागच्या निवडणुकीनंतर कर्नाटकामध्ये शासन स्थापित करण्यात आलेल्या अपयशाला भाजपा पचवू शकत नाहीये. म्हणून कर्नाटक सरकारला अस्थिर करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. अनेक विधानसभा सदस्यांना अनेक कोटींचे आमिष दाखवून त्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केलेला आहे. सिद्धरामय्या यांनी असाही आरोप केला आहे की, आमचे आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रती आमदार 25 ते 30 कोटी एवढी प्रचंड रक्कम देण्याची लालूच दाखविलेली आहे. मात्र या प्रयत्नांना आमच्या आमदारांनी दाद दिलेली नाही. बीजेपी भविष्यातही यशस्वी ठरणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
    1 फेब्रुवारीच्या उर्दू टाईम्समध्ये मन्सूर एजाज यांनी एक लेख लिहिलेला असून, त्यात त्यांनी म्हटलेले आहे की, राहूल गांधी असोत की प्रियंका गांधी, मायावती असोत का प्रियंका गांधी यांनी लवकरात लवकर आपसातील तारतम्य वाढवून कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपा जिंकणार नाही, याची व्यवस्था करावी. असे झाले तरच राज्यात घटनात्मक वर्चस्व अबाधित राहील आणि भारताची गंगाजमनी संस्कृती जीवंत राहील.
    तसेच फारूख अन्सारी यांचा लेख प्रसिद्ध झाला असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून मुस्मि हा शब्द वगळण्याची जर मागणी होत असेल तर बनारस हिंदू विद्यापीठातील हिंदू हा शब्द सुद्धा गाळण्यात यावा. त्यांनी आपल्यात पुढे म्हटलेले आहे की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे सांप्रदायिक लोकांच्या नजरेमध्ये कायम सलत राहिलेले आहे. अनेकवेळा या विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत आणि आताही सुरू आहेत. भाजपाच्या खासदार सतिश गौतम यांचे म्हणणे आहे की, मुस्लिम शब्द कठोर असून, हिंदू शब्द मऊ वाटतो. म्हणून अलिगढ विद्यापीठाच्या नावातून मुस्लिम हा शब्द गाळण्यात यावा, असा त्यांनी अजब तर्क दिला.


- फेरोजा तस्बीह
9764210789

संवेदना मरणासन्न करणार्‍या या डिजीटली देशप्रेमाच्या अवस्थेत सामान्य माणसाला अत्यवस्थ करण्याचा उजवाडाव यशस्वी होतोय. अगदी अस्मितांच्या जोरावर आरक्षणाचे अनेक मोर्चे करून सुद्धा झुलती आशा, मुस्लिम, आरक्षणाच्या हक्काच्या लढाईचा तोंडदेखलेपणाचे छोट्या कॉलमची स्तुती आणि पटकन सवर्ण आरक्षणाचा मंजूर झालेला कायदा.
    थोरामोठ्यांच्या मानवतमंत्राची महत्ता जपत जगणार्‍या महाराष्ट्राला हंगामी त्यागमूर्तींची लागण झाल्यासारखी व्यक्ती महात्म्य वर्णन करणार्‍या सिनेमा-सिरीअल्सना अक्षरशः ऊत आलाय. जिभेला हाड आणि विचारांचा कणा नसलेल्या मुर्खादी नेत्या-चमच्यांची राजकीय वर्दळ द्वेषाचा धुरळा जनतेच्या डोक्यात फेकत कालच्या प्रश्‍नाला आज बगल देऊन नविन मुद्दा निर्माण करण्यात सत्ता पटाईत आहे. प्रश्‍नांच्या पाठशिवीचा खेळ खेळण्यात भोळी सूज्ञ जनता मग्न आहे.
    प्रियंका गांधीच्या राजकीय प्रवेशनाट्यावरून ओकली गेलेली नीच गरळ हीन मानसिकतेची अस्सलता उघड करीत होती. ते झाकावं, बाजूला व्हावं म्हणून महाराष्ट्रातल्या युतीच्या चढाओढीची फोडणी झकास दिली गेली. संघधर्मीय कार्यकर्त्यांच्या शस्त्रसाठेची चर्चा तापली असताना त्यांनी आनंदी तेल परतवलं. वंचितांच्या मेळाव्यात मीडिया मधून टाकून, ’हाउज द जोश’चा नारा उराऊरी बडविला. कुंभमेळ्याच्या मेळाव्यातल्या खर्‍या रिपोर्ताजना गाडून धार्मिकतेचा रंगांधळेपणा पसरवला.
    राफेलची चर्चाच फेल ठरवित, ट्वीटरच्या सहेतूक मांडणीचा फोटो सेव्हड् केला. अनुपम - बाबा - साध्वी वगैरे बाजूला सारत स्वतःच कॅरेक्टरायझेशन उदात केल सिनेमातून. गर्दीचा पूर ओसरला तरी पोपटमिडीयाला आस्वादक समिक्षक पुरविले. महान पुरूषांच्या पुतळ्या-स्मारकाची चर्चा दाबून स्मार्ट सिटीचे मृगजळ दाखविले. बजेट समजण्यापूर्वीच सरळ छापेमारीच्या सत्राची सुरूवात झाली. राज्या-राज्यातून देशपातळीवर बंगाली हायव्होल्टेज ड्रामा रंगला. त्यावर काही बोलू, लिहू पाहू तेव्हा उपोषण महंतांची बातमी धडकली.
    या बातम्या ऐकाव्यात पाहाव्यात तर केबल चॅनल्सचा धंदा प्रायव्हेट केला. पुन्हा उद्योगी भांडवलदारांचे आर्थिक उन्नतीकरणाचा उदात्त हेतू सफल झाला. या सगळ्या खेळात महाराष्ट्राची, देशाची जनता भावनिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत राहते. रोजच्या जगण्याच रूटीन, गरजेच्या गोष्टी, आरोग्य शिक्षण, सुविधा, जातीधर्माशिवाय केवळ देशवासी म्हणून चे काही हक्क अधिकार याचे काहीच देणेघेणे व्यवस्थेला नाही. मध्यमवर्गाला नवश्रीमंतीचे डोहाळे लावून स्वप्नरंजनाचे काजळ डोळ्यात घालण्याचे अ‍ॅडव्हस्टायनिंग कार्य सरकार पूर्ण करतंय. साहित्य-सांस्कृतिक चर्चापीठांतून वरच्या थरांतील पुरस्कार-मानधनाच्या घोषणेत धावपळ उडत आहे. ’पद्म’सारख्या प्रतिष्ठित, पुरस्कारांना परत करणार्‍या संवेदनशीलांना देशद्रोहीचा शिक्का उठसूट मारला जातोय.
    पुरोगामी, धर्मांध, उजवे, डावे, सेक्यूलर म्हणत-म्हणत वंचितांचा मुस्लिम सामान्यांचा प्रवास चिंतनीय. योग्य नेता, अभ्यासू राज, क्षेत्रीय जाणीवांची सुयोग्य मांडणी, पूर्वग्रहदुषित सांस्कृतिक समावेशकता यांचा अभाव सातत्याने माथ्यावर मारला जातोय. सर्वतोपरी उपरेपणाची जाणीवांच्या भिंती उभारून, भीतीच्या दबावाने आपणच देशप्रेमी कसे या दिखाऊपणाच्या भोळसर गडबडीत सामान्य क्षेत्रीय मुस्लिमाला केवळ मतदार म्हणून वापरण्याचा सुगीचा काळ जवळ आलाय.
    बाभळीला बहर आणि फुलातून जहर प्रसवत असेल तर आता पाठशिवीच्या खेळात सजगपणे कसर न ठेवता उतरायलाच हवे. सगळच फाट्यावर मारून, कुणासाठीही स्वार्थाची मोजपट्टी न बनता, स्वतःहून अधिक समाजकारणाची लढाई ठाशिवपणे गडद करायलाच हवी. एकात्मता-सहिष्णूतेच्या परीक्षा पास होण्यासाठी आपण नाही, हेच जाणून अधिक एकतेचा-मानवतेच्या इक्बाली संकेताचा आदरपूर्वक वापर करण्यासाठीचा विचार व्हायलाच हवा. हे सरळ कागदावर उतरवताना आण्णांच्या उपोषणाची सांगता होण्याची ब्रेकींग न्यूज मोबाईलवर आदळली.
    आता चौकातल्या गप्पांपासून टीव्ही एफबीपर्यंत आदरणीय आण्णामहात्म्य वाढतं ठेवलं जाईल. पण उद्या नव्याने प्रश्‍नांचा पाठ घोळावला जाईल, आपण घोळात राहू. सावध ऐका पुढच्या हाका...
अब भी कुछ नहीं बिगडा प्यारे,
पता करो लोहारों का
धार गिराना काम नहीं है,
लोहे पर सोनारों का!!

- साहिल शेख
8668691105


लोकशाही व्यवस्थेत संख्या महत्वाची असते. असे असतानादेखील जवळपास 20 कोटी लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज हा प्रभावशुन्य का झाला हा संशोधनाचा विषय आहे. मुस्लिमांचे हे मागासलेपण फक्त या समाजासच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हानिकारक आहे. कारण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समुहांचा समान विकास अनिवार्य असतो. एखादा समूह जरी विकासापासून वंचित राहिला तर त्याचे नुकसान संपूर्ण देशाला भोगावे लागते. कारण त्या मागासलेल्या समुहाचा अतिरिक्त भार हा इतर विकसित समाजाच्या कष्टाच्या कमाईतून करावा लागतो व विकासाच्या अशा असंतुलनामुळे देश प्रगती करू शकत नाही. विकास सर्वांगीण झाला नाही तर तो विकार बनतो. म्हणून देशातील जवळपास 1/5 एवढ्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाचे मागासलेपण संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय व्हायला हवा. एवढेच नव्हे तर त्यावर तात्काळ ठोस उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
    भारतीय उपमहाद्विपावर ज्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी जवळपास 900 वर्षे राज्य केले तसेच स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान दिले, तो समाज भारताच्या फाळणीनंतर मानसिकदृष्ट्या जर्जर झाला, अभिजात आणि सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात निघून गेला. जे भारतात रहिले त्यांच्याकडे पाकिस्तानात जाण्याचा पर्याय असूनसुद्धा ते स्वेच्छेने भारतातच राहिले. तसे पाहता फाळणी ही फक्त भूप्रदेशाचीच झाली नाही तर यामुळे मनं सुद्धा फाळली गेली. शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने राहणार्‍या हिंदू-मुस्लिम समाजात या फाळणीने दरी निर्माण केली. त्याची सल अद्यापपर्यंत पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात होणार्‍या नियमित दंगली ह्या त्याच दुभंगलेल्या मनाचे प्रतिक आहे. या संघर्षामुळे भारतात हा समाज नेहमीच असुरक्षिततेच्या भावनेत राहिला. किंबहुना ठेवण्यात आला.
    दुबळ्या राज्यकर्त्यांना या स्थितीचा भरपूर वापर केला व या दरीला आणखीन रूंद करण्याचे काम केले. द्वेषाच्या या अग्नित आणखी तेल ओतले व सातत्याने हिंदू-मुस्लिम वाद पेटवत ठेवण्याचे काम करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. अलीकडील काळात तर देशाच्या सर्वात प्रमुख पक्षाचे अस्तित्वच मुस्लिम विरोधावर आधारलेले आहे. विकासाच्या मुद्दयावर सपशेल अपयशी ठरलेल्या राज्यकर्त्यांच्या भात्यात शेवटचा बाण पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद राहणार यात शंकाच नाही. अशा रीतीने येथील राजकारणी अल्पसंख्यांक मुस्लिमांची प्रतिमा बहुसंख्यांक जनतेसाठी किती धोकादायक आहे हे बिंबवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. विकासाच्या मुद्याला बगल देऊन फक्त ’मुस्लिम विरोध’ केंद्रस्थानी करून राजकारण करण्याचा डाव सोयीस्कररित्या चालू आहे.
    एकीकडे विद्वेषी राज्यकर्त्यांच्या षडयंत्राचा शिकार तर दुसरीकडे प्रचंड मागासलेपण अशी दोन मोठी आव्हाने देशातील मुस्लिम समाजासमोर आहेत. या समाजाच्या सातत्याने होणार्‍या अधोगतीला जेवढे बाह्य कारणं जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त अंतर्गत कारणे कारणीभूत असल्याचे निदर्शनास येते. या दोन कारणांचे निष्पक्ष विश्‍लेषण झाल्याशिवाय आपण प्रगतीच्या वाटा चोखाळू शकत नाहीत.
    वास्तविक पाहता स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या अधोगतीला स्वतः 70 वर्षे राज्य केलेली सर्व सरकारे जबाबदार आहेत. जणू हा त्यांचा सामूहिक अजेंडाच होता. 1947 च्या तुलनेत अद्यापपर्यंत मुस्लिमांची जी सातत्याने दुर्दशा झाली हे त्याचे द्योतक आहे. कारण की भारतातील एवढा मोठा समाज सातत्याने 70 वर्षे निरंतर अधोगतीकडे जात असताना त्याची जाणीव शासकाला नसावी हे न उमजण्यासारखे आहे. म्हणून अधोगतीचा हा कार्यक्रम नियोजनबद्ध असावा अशी शंका निर्माण होते. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काँग्रेस शासित काळामध्ये सच्चर कमिटी, रगनाथ मिश्रा आयोग, महमद उर रहेमान कमिटी इत्यादी जेवढे आयोग नेमले ते सर्व देखावे मात्र होते. कारण की या सर्व आयोगाच्या अत्यंत गंभीर अशा शिफारशींना केराची टोपली दाखविण्यात आली.
    स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांना सरकारी नोकर्‍यांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे शिक्षण घेऊन करायचे तरी काय ही भावना समाजात निर्माण झाली. म्हणून माध्यमिक शिक्षणानंतर कॉलेजकडे जाण्यापेक्षा हा समाज छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळला आणि कशीबशी उपजीविकेची साधणे शोधू लागला; परंतु, फक्त संघर्षाने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटला असला तरी हा समाज आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती करू शकला नाही. शैक्षणिक मागासलेपणामुळे प्रशासनात त्याचे प्रतिनिधीत्व कमी होत गेले. आर्थिक मागासलेपणामुळे तो सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू लागला आणि या दुर्बलतेमुळे तो राजकीय कसोटीत देखील मागे पडला. अशारीतीने भारतातील वीस कोटी मुसलमान आज आपल्या अस्तित्वाच्या लढाईत जीवन जगत आहेत.
    ज्याप्रमाणे शासकीय नोकरीत नियोजबद्धरित्या या समाजाला दूर करण्यात आले. त्याचप्रमाणे षडयंत्रकाराने मुस्लिम समूहात हेतूपुरस्पर सक्षम नेतृत्व उभे राहू दिले नाही. काही अपवाद वगळता स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांमध्ये कोणताही मास लिडर आढळत नाही. निकृष्ट लोकांना समाजावर लादण्यात आले. या नेतृत्वाने समाजाचे प्रश्‍न शासन दरबारी मांडण्याऐवजी पक्षाचे फर्मान समाजावर लादण्याचे काम केल्याचे दिसते. अधिकांश नेतृत्वाने ’लिडर’ पेक्षा ’डीलर्स’चे काम केल्याचे दिसते. सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे हा समाज संघटित होऊ शकला नाही किंबहुना त्याला संघटित होऊ दिले नाही. त्यामुळे हा समाज राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अनाथच राहिला. कारण नेतृत्वच संघटन घडवित असते. नेतृत्व व पर्यायाने संघटनेच्या अभावामुळे तसेच या समाजाकडे रचनात्मक ठोस कृती कार्यक्रमाच्या अभावामुळे हा समाज दिशाहीन झाला. जवळपास 20 कोटींचा प्रचंड जनसमुदाय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्तित्वहीन झाला असून अफाट लोकांची गर्दी मात्र आहे आणि गर्दी कितीही मोठी असली तरी कोणतेच ’इन्क्लाब’ आणू शकत नाही. परिवर्तनासाठी गर्दीची नव्हे तर शिस्तबद्ध संघटनेची आवश्यकता असते.
    षडयंत्राची ही दोन महत्वाची कारणे असली तरी यापेक्षा महत्वाची अंतर्गत कारणांची मीमांसा केल्याशिवाय हे विश्‍लेषण पूर्ण होऊ शकत नाही आणि समस्येचा जोपर्यंत निष्पक्ष विश्‍लेषण होत नाही. तोपर्यंत समाधान निघू शकत नाही हे ही तेवढेच खरे आहे.
    अंतर्गत कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता या समाजाच्या बुद्धिजीवींनी निष्पक्ष आत्मपरीक्षण केल्याचे जाणवत नाही. अनेक वर्षांपासून हे तथाकथित बुद्धिजीवी फक्त समस्यांचीच चर्चा करण्यात, मुस्लिम समाजाच्या दुर्गतीचे रडगाणे गाण्यात आणि या परिस्थितीसाठी दुसर्‍यांना दोषी ठरविण्यातच व्यस्त राहिले.
    उम्र भर गालीब, यही भूल करता रहा
    धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा
    फक्त समस्यांवर चर्चा करण्याऐवजी त्यांनी त्यातील दहा टक्के ऊर्जा जरी त्यांच्या समाधानांवर खर्च केली असती तरी आज समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीत आमुलाग्र बदल घडला असता. ही चर्चासत्रे नशिस्तन, गुफ्तन, बर्खास्तन यापुढे जाऊ शकली नाहीत. तथाकथित विचारवंतांची डोकी समस्यांच्या चर्चेतच लॉक झाली. विरोधकांना आणि परिस्थितीला दोष देऊन मैफिल बरखास्त झाली. वास्तविक पाहता कोणत्याही समाजाला बाह्यशक्ती कधीच पराभूत करू शकत नाही. समाज जेव्हा आपले आत्मपरीक्षण थांबवितो तेव्हा त्याच्या अधोगतीची खरी सुरूवात होत असते.
    मला वाटते मुस्लिम समाजाच्या अधोगतीचे दूसरे मुख्य कारण त्यांनी ’इस्लाम’पासून ठेवलेले अंतर होय. भारतात ज्याप्रमाणे अनेक धर्म हे फक्त कर्मकांडापुरतेच मर्यादित आहेत. तसेच इस्लामला समजून बहुसंख्य मुस्लिमांनी त्याला इबादतींपुरते मर्यादित करून टाकले. वास्तविक पाहता इस्लाम फक्त धर्म नसून एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या प्रत्यक्ष आचरणात इस्लाम न आल्यामुळे इतरांपेक्षा आपण आपले वैशिष्ट्य गमावून बसलो. उत्कृष्ट जीवन पद्धतीला तिलांजली दिल्यामुळे येथील बहुसंख्यांक समाजाच्या जीवनपद्धतीचा या समुदायावर आपोआप प्रभाव पडला. वैयक्तिक, सामाजिक व व्यावहारिक जीवनात याचे प्रतिबिंब सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात.     मुस्लिमांमधील एक मोठा वर्ग ऐहिक जीवनापासून उदासीन झाला. मानवसेवेसाठी आपले योगदान थांबून मरणोत्तर जीवनाच्या तयारीत मग्न झाला. अल्लाहने मुस्लिमांना या जगामध्ये यासाठी नेतृत्व दिले होते की, त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून मानवतेची सेवा करावी. आपल्या सुरूवातीच्या काळात युरोपमध्ये मुस्लिमांनी शेकडो विद्यापीठे, रूग्णालय, अनाथालय, न्यायालये इत्यादी लोकोपयोगी वास्तू उभारल्या होत्या. आज हा समूह फक्त मोठमोठ्या अलिशान मशिदी बांधण्यातच व्यस्त आहे. निश्‍चितच यातील खर्च कमी करून अशिक्षित मुस्लिम समाजासाठी शाळा बांधता आल्या असत्या, मुस्लिम महिलांची शिक्षणाची सोय करता आली असती, मुस्लिम महिलांसाठी प्रसुतीगृह बांधण्यात आली असती; परंतु, ज्या समुहाकडे विकासाचे कोणतेच दीर्घकालीन नियोजन नसेल तर तो या व्यतिरिक्त विचार तरी काय करू शकणार?
    इस्लामने सर्व भेदभावांना समूळ नष्ट करून सर्व मानवतेला समसमान केले. विशाल जनसमुदायात सर्व घटकांसाठी आचरणास सोपे जावे म्हणून त्यात लवचिकता ठेवली; परंतु, याचा विपर्यास करीत समाजात जमातवाद निर्माण करीत धर्माच्या एकतेच्या गाभ्यालाच नुकसान पोहोचवून संघटन विस्कळीत केले गेले. जो धर्म फक्त मुस्लिमांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला एकसंघ करण्यासाठी आला होता त्याच्याच अनुयायांनी अगदी क्षुल्लक कारणावरून या समाजात टोकाचे मतभेद निर्माण केले. हे मतभेद एवढे विकोपाला गेले की, या समाजाला आता शत्रूंची गरजच शिल्लक राहिली नाही. ऐहिक व पारलौकिक या दोन्ही विश्‍वांसाठी सर्वात यशस्वी, सोपी आणि आधुनिक जीवनपद्धती ’इस्लाम’ आहे व तीच पद्धती सोडल्यामुळे हा समाज मागासलेल्या आणि निकृष्ट जीवनपद्धतीकडे वळला व ऐहिक जीवनाच्या आहारी गेला. दुनियेच्या प्रेमात पडल्यामुळे तो ईश्‍वरी आदेशांना आणि त्याच्या  स्वतःच्या अस्तित्वाच्या उद्देशालाच विसरला. त्याच्या अस्तित्वाचा उद्देश सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करणे हा होता. तसेच अन्याय, अत्याचार आणि अशांती विरूद्ध संघर्ष करून संपूर्ण मानवजातीला यशस्वी आणि शांतीपूर्ण जीवन प्रदान करणे हा होता. जेव्हापासून या समाजाने आपल्याला मूळ उद्देशापासून दूर केले. विशेषतः त्यांच्यातील सुशिक्षित सधन आणि बुद्धिजीवी वर्ग आपल्या मूळ उद्देशापासून विलग झाला, तेव्हापासून हा समाज वाईटाकडे ओढला गेला व याच्या अधोगतीची सुरूवात झाली. कारण
बुराई बुरो के शर से नहीं
अच्छों के खामोशी से फैलती है.

    भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, असमानता यासारख्या अनेक समस्येंनी जर्जर झालेल्या भारतीय समाजाला जर मुस्लिम नेतृत्वांने कुरआनाच्या मार्गदर्शनात समाधान दिले असते तर या समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. जसे त्यांनी याच देशात अत्यंत अल्प अशा मुस्लिमांना जवळपास 900 वर्षे नेतृत्व दिले. कारण त्यावेळेस आपण मानवतेचे उद्धारक होतो, मानवसेवेचा धर्म पाळला होता. परंतू जेव्हापासून आम्ही मानवतेच्या निःस्वार्थ सेवेतून परावृत्त झालो तेंव्हापासून या मानवतेने आम्हाला निवृत्त करून वाळीत टाकले. आज अशी स्थिती आहे की हा समाज लोकांसाठी नकोसा झाला आहे.
    मुस्लिम समाजाला जर भारतात आपले पूर्व वैभव, प्रतिष्ठा आणि यश मिळवायचे असेल तर त्याला निःस्वार्थपणे मानवसेवेकडे वळावे लागेल. मानवसेवा हा फक्त त्याचा धर्म नसून कर्तव्य आहे. त्याला मागणार्‍याच्या भूमिकेतून निघून देणार्‍याच्या भूमिकेत यावे लागेल. फक्त मुस्लिम समाजाच्याच नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झटावे लागेल. येथील अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरूद्ध आवाज उठवून शोषित आणि पीडित समाजालाही न्याय मिळवून द्यावा लागेल. या देशातील असमानता दूर करून सर्वांसाठी समान हक्काची लढाई लढावी लागेल. तसेच येथील भ्रष्टाचार आणि अशांती विरूद्ध एल्गार पुकारून एक शांतीपूर्ण समाजाच्या स्थापनेचे अहोरात्र प्रयत्न करून वास्तविकरित्या या देशाला कल्याणकारी राष्ट्र बनवावे लागेल आणि हे काम या देशात मुस्लिमच अग्रक्रमाने करू शकतात. कारण ही सर्व कामे त्यांचे आद्यकर्तव्य आणि इबादत आहेत.
सबक फिर पढ सदाकत का, शुजाअत का,अदालत का
दुनिया में फिर काम लिया जाएगा तुझसे इमामत का

    यासाठी समाजाच्या नेतृत्वाने निष्पक्ष आत्मपरीक्षणाची गरज आहे. अपयशाचे दोष फक्त दुसर्‍यावरच ना थोपता आपल्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. कितीतरी मतभेद असले तरी व्यापक जनहितासाठी आम्हाला आता कॉमन मिनिमम प्रोग्राम (किमान सहमती कार्यक्रम) अंतर्गत एकत्र यावे लागेल. अशा रीतीने हा समाज मानवसेवेच्या उदात्त उद्देशाने संघटित होऊ शकेल. वास्तविक पाहता मतभेद स्वीकारून एकत्र येणाच्या कृतीलाच संघटन म्हणतात. समाजाला आपल्यामधून नेतृत्व घडवावे लागेल. उसण्या नेतृत्त्वावर अद्यापपर्यंत जगात कोणत्याही  समूहाने प्रगती केली नसल्याचा इतिहास आहे आणि जवळपास 20 कोटींचा हा समाज नेतृत्वहीन असणे ही फक्त दुर्घटना नव्हे तर ऐतिहासिक शोकांतिका आहे. समाजातून सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी हेतूपुरस्पर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नेतृत्वाचे मातीचे पाय असतात. तो सामान्य लोकांमधून आलेला असल्यामुळे सामान्य लोकांसारखे गुण-दोष त्याच्यात आपसुकच आलेले असतात. म्हणून आपल्या नेतृत्वाला परिपूर्णतेच्या कसोटीवर न पाहता त्याच्या गुण-दोषाबरोबर स्वीकारण्याची सवय झाली पाहिजे. तरच समाजात नेतृत्व निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर समाजाच्या सक्षम लोकांनी फक्त चर्चा न करता प्रत्यक्ष मैदानात येऊन समाजाच्या आणि व्यापक मानवसेवेचे काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे बुद्धिजिवी आणि विचारवंतांनी एकत्र येऊन दीर्घकालीन कृती कार्यक्रम आखण्याची तीव्र आवश्यकता आहे. फेलींग टू प्लान इज प्लानिंग टू फेल. या युक्तीप्रमाणे नियोजनाशिवाय यश अशक्य आहे.
    भारतात परिस्थिती किती जरी विपरित असली तरी घोर अंधारानंतरच सूर्योदय होतो हे लक्षात ठेवले पाहिजे. द्वेषाला द्वेषाने कधीच मात देता येत नाही. द्वेषी राजकारणाविरूद्ध प्रेमाचे अस्त्र वापरावे लागेल. निःस्वार्थपणे मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घ्यावे लागेल. कुरआनचे स्पष्ट मार्गदर्शन आहे की, ’सदाचार आणि दुराचार एकसमान नाही.तुम्ही दुराचाराचे त्या सदाचाराने निरसन करा जे अत्युत्तम असेल, तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.”(कुरआन ः सुरह हा मीम सजदा आयत नं. 34)
    लोकांच्या हृदयात आपली जागा बनवावी लागेल. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः मैदानात यावे लागेल व ही सर्व निःस्वार्थ कामे फक्त आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहसाठी करावी लागतील. तसेच या मानवतेला आपल्या खर्‍या निर्माणकर्त्याची ओळख आणि शाश्‍वत यशाच्या जीवनपद्धती ’इस्लाम’शी परिचित करावे लागेल. याच गोष्टी भारतात मुस्लिमासाठी यशाचे द्योतक आहेत. असे ना झाल्यास 20 कोटींचा हा जनसमुदाय अधिक प्रभावहीन होईल व तत्कालीन इतिहास याला ’20कोटींची गर्दी’ असे संबोधेल.
ना समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदूस्तांवालो
तुम्हारी दास्तां भी ना होगी दास्तानों में!  
 

- अर्शद शेख
9422222332

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget